“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449
“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521
“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727
सहावा दिवस : ०८ जानेवारी २०१२
उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा
नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता मोहीम निघाली. आता बाबा रामदेव भक्त कमी होऊन निद्रादेवी भक्तांची संख्या भलतीच वाढली होती. थंडी भरपूर असल्याने पहिल्यांदा आम्हाला नाव ठेवणारे पण आता आमचं अनुकरण करायला लागले होते. सकाळी देवास मधील दत्तमंदिरात माथा टेकवून सर्वजण उज्जैनच्या दिशेला निघाले. सकाळी ठीक ०९४५ ला मोहीम उज्जैनला पोहचली.
उज्जैनविषयी थोडेसे:
उज्जैन (उज्जयिनी) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे. या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिवयांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.
मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे.
मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोक ची राजधानी हीच.
चंद्रगुप्त दुसरा उर्फ विक्रमादित्याची हि सांस्कृतिक राजधानी होती.
उज्जैनची वेगवेगळी नावे :
अवंतिका
पद्मावती
कुशस्थळी
भगवती
हरण्यावती
कंडकत्रिंगा
कुमुदवती
प्रतीकल्पा
विशाळा
(आंतरजालावरून साभार)
आज रविवार असल्याने उज्जैन मधील मंदिरात भरपूर गर्दी होती. सगळ्यांनी दर्शन करायचं म्हटलं तर ५-६ तास सहज लागले असते. तेव्हा सर्वानुमते शाजापुरला निघायचं ठरलं. भक्तगण बरेच हळहळले, काहीजण कळसाच तरी दर्शन घेतो म्हणून आत धावले आणि आम्ही मात्र जागेवरूनच जय बम बम भोले म्हणतं जागेवरूनच हात जोडले. नसते उपद्व्याप सांगितलेत कुणी. त्याच्या मनात असलं तर होईल परत कधीतरी आयुष्यात दर्शन म्हणून मी विषय सोडला. आज मला चक्क गाडीच्या आणि हेल्मेट lock च्या चाव्या बनवायच्या आहेत याची आठवण झाली आणि आम्ही दोघा चौघांनी आपल्या गाड्यांच्या चाव्या बनवून घेतल्या. मोहीम पुढं निघून गेली होती. उज्जैन सोडता सोडता आम्हाला १०४५ वाजले.
नदीवर धुक्याने पांघरलेली चादर
काकांचा फोटो यासाठी, कि या अवलियाने एकट्याने पुणे ते पानिपत मोहीम दुचाकी वर पार केली.
अजून असेच एकजण मोहिमेत होते त्यांनी तर चक्क Activa वर हि मोहीम पूर्ण केली. एकाने त्यांना मजेने विचारले कि काका, Activa पोहचणार का पानिपातपर्यंत, तर ह्यांचे उत्तर – Activa भूतान पर्यंत जाऊन आलीये, पानिपत तर फारच जवळ आहे, पुढचा गपगार
आणि हद्द म्हणजे काळे काकांची त्यांनी आपल्या सौ ना घेऊन हि मोहीम पूर्ण केली. काळे काकांनी यापूर्वी “ भारत जोडो ” हे बाबा आमटेंनी केलेले आंदोलनात पण भाग घेतला होता. त्यामध्ये त्यांनी जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास सायकलवर केला होता.
काय कलंदर माणसं असतात एक एक. ( आणि आमच्या पिताश्रीना वाटतं, त्यांचाच मुलगा कलंदर आहे :))
आता पुढचा थांबा होता शाजापूर. बऱ्हाणपूर तसेच अजून एक दोन ठिकाणी झालेल्या सभांमध्ये थोड धर्मांध(????) वातावरण निर्माण झाल होत. त्यामुळे काही जण घाबरले होते. तर काहीना हिंदू – मुस्लीम अशी दंगल तर व्हायची नाही ना अशी भीती वाटायला लागली होती. याचाच परिणाम कि काय आज काहीजण मोहीम सोडून गेले. तशी मोहिमेला गळती औरंगाबाद मधूनच लागली होती. काहींना झोपायची तर काहींना इतर व्यवस्था पसंत पडली नव्हती. आयुष्यात सर्वच काही मनासारखे होत नाही याची त्या व्यक्तींना कदाचित जाण नसावी. मला तर काहीच काळजी नव्हती कारण सभांमध्ये मी नसल्यामुळे नक्की काय झाल हे मला माहित नव्हत. तर काहींच्या मते आपण पानिपतपर्यंत जाऊ आणि नंतर येताना गुजरात, राजस्थान करत येऊ अस चालल होत. असाच एक जण मोहीम सोडून गेला आणि त्याचा मित्र दीपकची जबाबदारी मी घेतो या अटीवर दिप्या माझ्याबरोबर राहिला. शाजापुरच्या सरस्वती विद्यालयामध्ये आज दुपारच जेवण होत.
आम्ही शाजापुरला १२३० ला पोहचलो. आसपास बघण्यासारख काहीच नसल्यामुळे आज आम्ही मोहिमेबरोबर होतो. शाजापूरमध्ये हि आमचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आल. कितीतरी वेळा वाटत काय संबंध होता त्या लोकांचा? महाराष्ट्रापेक्षाही जोरदार स्वागत आम्ही इतर राज्यांमध्ये अनुभवलं.
स्थळ : शाजापूर, मोहिमेतील एक क्षण
मोहीम अक्षरशः फुलांच्या वर्षावात न्हाऊन निघत असे
गावामधून आज मोहीम फिरणार होती म्हणून थोडा आराम करावा या हेतूने मी शाळेवर परत आलो. दुपारचे १४०० वाजत होते. नुकतेच आमचे सेनापती निखील्रराजे अंघोळ करून बाहेर पडत होते, हे बघून मला देखील अंघोळ करायची खुमखुमी आली आणि मी अंघोळ करण्यासाठी नळाखाली बसलो आणी नळ सुरु केला. अंगावर एखाद्याने बर्फ ओतावा तसं झाल आणि आपण उत्साहात येऊन भलतीच चूक केली आहे याची जाणीव झाली आता दुसरा काही मार्ग नव्हता. अशावेळी माघार घेऊन चालणार नव्हतं. कशीबशी अंघोळ उरकली.
शाजापूर सोडता सोडता मोहिमेला १६०० वाजले. सभांमुळे मोहीम मंदावत होती हे जरी खरे असले तरी गावातले लोकच आमच्या पोटापाण्याची सोय बघत असल्याने सभांना थांबण्यावाचून दुसरा उपाय नव्हता.
शाजापूर मध्ये उशीर झाल्याने मोहीम जोरातच निघाली होती. त्यामुळे सारंगपूर आलं कधी आणि गेलं कधी याचा काही पत्ताच लागला नाही. ( नाही हो, या वेळेस गाडीवर झोपलो नव्हतो मी )
संध्याकाळी ०७३० ला ब्यावरामध्ये आमच आगमन झाल. सरदार लोकांनी चक्क ढोल-ताशांच्या गजरात आमचं स्वागत केलं. प्रत्येकाला श्रीफळ-हार. आयोजन करणाऱ्या संदीप गुरुजींना त्यावेळी मला साष्टांग दंडवत घालावे असे वाटले. कधी कधी ज्यांची आपली साधी ओळख देखील नाही अशी माणसं आपल्याला मदत करतात. आज देखील आम्ही दमदमासाहिब पातशाही दसवी गुरुद्वारा, ब्यावरा येथे राहायला होतो. आज जेवायला खिचडी होती. ती देखील आमच्याच सदस्यांनी बनवलेली. खरंतर थोडीशी करपली होती पण अन्नाला नाव ठेऊ नये जे मिळेल ते गोड मानून खाव हे बाबांचे शब्द आठवून मी ती खाल्ली. आणि तिथे असलेल्या शेकोटीवर मस्त ऊब घेत बसून राहिलो. आज देखील रात्रीची सभा झाली नाही. आज मुक्कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचल्यामुळे सगळेच दमले होते. त्यात गावांमधून मोहीम जात असली कि सारखे क्लच आणि ब्रेक दाबून बोट घाईला यायची आणि आता तर थंडी असल्यामुळे काही विचारू नका.
मस्त पैकी शेकून झोपायला गेलो तर अगोदरच तिथे कुणीतरी पसरले होते. त्यामुळे मी आपला बाड-बिस्तरा घेऊन दुसरी जागा शोधायला लागलो. तेवढ्यात दुसरे एक काका झोपायला त्यांच्या दुसऱ्या एका मित्राबरोबर निघून गेले आणि त्यांच्या जागी मी आपला बाड-बिस्तरा पसरला.थंडी भयानकच असल्यामुळे जमीन पण चांगलीच थंड झाली होती. सगळेजण जर्किन, स्वेटर इत्यादी घालूनच झोपत असत. आम्ही देखील झोपताना पायमोजे, हातमोजे, कानटोप्या घालायचो. आज विशेष असं काही बघायला मिळालं नाही. शाजापूरमधेच आज बराच वेळ गेला. असो कधीतरी असाही दिवस घालवण्यात मजा असते. नेहमीप्रमाणे आई-बाबांना फोने केला. आज काही जास्त सांगण्यासारख नव्हतचं, त्यामुळे फोन लवकर आटोपला आणि जाऊन पडी मारली.
आजचा प्रवास : २२२.९ किमी
सातवा दिवस : ०९ जानेवारी २०१२
गुणा – शिवपुरी
आज थंडीमुळे सगळेजण उशिरा उठले. मी देखील सकाळी ०७०० ला उठलो, सगळ आवरून झाल्यावर गुरुद्वारामध्ये जाऊन माथा टेकून आलो. हे अस करायला मला खूप आवडत. कधी मशिदीमध्ये जाऊन नमाज पढून या, कधी चर्च मध्ये जाऊन गुडघे टेकवून या, असलं सगळ करण्यात काहीतरी वेगळ वाटत. आज मस्तपैकी जिलेबी होती नाश्ता म्हणून.
मी ०७४० ला गाडी ला starter मारून गाडी गरम करायला थोड्या वेळ चालू ठेवली.
तेवढ्यात अमर आला. चल बे साऱ्या चहा मारून येऊ. चल, मी म्हटल.
जवळच चहाची टपरी होती. त्याच्या मागेच पेट्रोल पंप होता.
थंडीमुळे आम्ही दोनदा चहा प्यालो. तेवढ्यात रुपेश,स्वागत,स्नेहल (मुलाचं नाव आहे हे ) आले.
मग परत सगळ्यांनी चहा घेतला. मग कांदा-पोहे कार्यक्रम पार पडला. मी टपरी वाल्याला म्हणालो ,
“भैया, ९ चाय और ५ प्लेट पोहा, कितना हुआ”?
५७ रु
क्यां ?????????
मुंबई येवढयासाठी १०० ची नोट सहज गेली असती.
मला क्षणभर विश्वासच बसला नाही, अजूनही चहा ३ रु ला मिळतो आणि पोहे ५ रु प्लेट असू शकतात हे मला माहितीच नव्हत. बिहारी आणि उत्तर प्रदेशमधील मुंबईमध्ये का येत असतील याची मला आता चांगलीच कल्पना आली.
म्हणूनच प्रवास करावा, त्यामुळे आजूबाजूला काय परिस्थिती आहे याची जाणीव होते. नाहीतर आपण आपल्याच कोशामध्ये इतके गुरफटलेलो असतो कि आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे याची कल्पनाच नसते.
आमच्या मोहिमेने मग त्याच्या पोह्याचा फडशा पडला.
जवळच पेट्रोल पंप असल्याने सगळ्यांनी मग आपापल्या दुचाकींमध्ये आपापल्या पैशाने इंधन भरले .
मोहीम ज्या पेट्रोल पंप वर थांबायची, त्या पंप मालकाची मात्र चांगलीच चंगळ व्हायची.
पहिल्या दिवशी गाडीने सरासरी चांगलीच दिली होती (५५.५६ किमी/ली). दुसऱ्या दिवसापासून मात्र सरासरी फारच कमी झाली. त्यातच ४-५ जणांकडून आपले पेट्रोल चोरीला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मग मात्र आम्ही दररोज साधारण ५०० रु. चच पेट्रोल टाकत असू. उगाच रिस्क कशाला. खर-खोट देव जाणे.
आज मात्र थंडीने कहर केला होता संपूर्ण रस्ता धुक्याने भरला होता. मोहीम ४० च्या वेगाने हळूहळू पुढे सरकत होती. आता मध्य प्रदेशमधल्या रस्त्यांचा अनुभव घेत होतो. २-३ किमी चा रस्ता चांगला असायचा आणि मधेच २-३ फुट खोल खड्डा यायचा, या असल्या रस्त्यांमुळे मोहिम काही वेग घेईना. वाटेतच लोक थांबून चहा पिऊन परत दुचाकीवर स्वार होत होते. १००० वाजता सुर्यदेवानी दर्शन दिल.
अशाच एका गावात झालेलं मोहिमेच स्वागत :
वाटेत एका गावात चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यकर्त्यांनी त्यावर येथेच्छ ( विशेषतः पारले-जी वर ) ताव मारला. आम्ही आमच्या नेहमीच्या शैलीत गावात घुसताच आसपास एखाद बघण्यासारखं ठिकाण आहे का याची चौकशी केली. हे गुगलपेक्षा भारी, खोट नाही सांगत, अनुभव आहे आणि खबर लागली, मिळालेल्या माहितीनुसार गावापासून १२ किमी अंतरावर बजरंग गड म्हणून एक भुईकोट किल्ला होता. नेहमीप्रमाणे आम्ही मोहिमेला सोडून किल्ला बघण्यासाठी निघालो. यावेळेस मात्र आमच्याबरोबर रुपेश, स्नेहल, अमर आणि बन्या होते.
आम्ही बजरंग गडावर १२३५ ला पोहचलो. गडावर आतपर्यंत जाण्यासाठी पक्की सडक आहे. गडाचा विस्तार प्रचंड आहे. गडाला लागूनच नदी वाहते. नदीच्या पलीकडेदेखील टेहळणी बुरुज आहेत. पागा, राहण्याची ठिकाण अजून शाबूत आहेत.अनेक ठिकाणी वेगवेगळी सांकेतिक चिन्ह होती. शंकर, गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गडाविषयी माहिती देणारा फलक मात्र दिसला नाही.बुरुज अजूनही चांगल्या स्तिथीत आहेत. मंदिराच्या समोरच एक मोठी तोफ आढळते.साधारण १४०० च्या सुमारास आम्ही गड सोडला. आज गड बघायला मजा आली. अगदी मनसोक्तपणे मी गड बघून घेतला. संपूर्ण तटबंदीवरून फेरफटका मारून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळला. गडावर कुठेच माहिती देणारा फलक दिसला नाही. गुगल वर पण बरंच शोधल पण या गडाविषयी काही माहिती सापडली नाही. कुणाला माहिती असेल तर सांगा.
बजरंग गड
किल्ल्याच्या बाहेर असणारे टेहेळणी बुरुज:
बाजूची तटबंदी
किल्ल्यावर असलेली एकमेव तोफ :
किल्ल्याच्या बाजूलाच असलेला बगीचा
तिथे शेजारीच माणसांच्या पूर्वजांचे एक कुटुंब बसले होते. आता गपगुमान तिथून जाव कि नाही, तर अमरला हुक्की आली, साऱ्या मी माकडांना पलीकडून हुसाकावतो, तू त्यांनी उडी मारली कि त्यांचा हवेतच फोटो काढ, आता काय म्हणावं या माकडाला. त्याला त्याच्या विचारांपासून परावृत्त करण्यात बराच वेळ गेला. जर का माकडांनी मनात आणल असत तर त्यानीच आम्हाला तिथून हुसकावून लावलं असतं. पण “ आ बैल मुझे मार ” अशी विचारसरणी असलेल्याला, मला हसावं का रडावं तेच कळत नव्हतं. शेवटी असाच एक टाईमपास म्हणून त्या माकडांच्या कुटुंबाचा फोटो घेतला, तेव्हा कुठ आमच माकड शांत झाल.
गडावरून गाड्या बाहेर काढताच होतो तेवढ्यात २-३ लहान मुलं आली, त्यातल्या एकाच्या हातात एक सुंदर फुल होते. त्या फुलाचे मग फोटो सेशन झाले. त्याला सहजच मी गमतीने घेऊन जाऊ का हे फुल म्हणालो, तर चक्क हो म्हणाला. कोण या मुलांना हे शिकवत काय माहिती ? आपल्याकडे मात्र लोकांना घ्यायचच माहित असतं.
हेच ते फुल ( कुणाला नाव माहित आहे का? )
परत आम्ही मोहिमेला गुण्यामध्ये येऊन मिळालो. गुरुद्वारा मध्ये मोहिमेचे जेवण संपत आले होते. आम्ही देखील जेवायला बसलो. लोणचं वाग्यांच्या भाजीसारख दिसत होत. मोठमोठाल्या फोडी होत्या.
स्वागत आणि रुपेश आमच्या नंतर जेवायला बसले.
स्वागतने नेहमीप्रमाणे जेवायला काय आहे? भाजी कुठली आहे? अस विचारलं.
अमरया आणि माझ अगोदरच ठरल्याप्रमाणे आम्ही स्वागतला वांग्याची भाजी आहे, मस्त झालिये अस सांगितलं. स्वागत वाग्यांची भाजी म्हणून लोणचं अजून द्या अजून द्या करून मागत होता. हे बघून आम्हाला मात्र हसू आवरलं नाही. त्याने पहिला घास खाल्यानंतर त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
आम्ही आमच जेवण उरकून सटकलो. मोहिमेबरोबर राहिलो तर शिंदे छत्री पण बघता येणार नाही, मोहिमेला शिवपुरीत पोहचायला वेळ होईल असे वाटत होते. मी आणि अमर मोहिमेच्या पुढे निघालो.
शिवपुरीत शिंदे छत्रीच्या इथे बरोबर १७५० ला पोहचलो. पाटील काका आमच्या अगोदरच तिथे पोहचले होते. आम्ही गेल्या गेल्या काकांनी पोरांनो पटकन जावा. अतिशय प्रेक्षणीय आहे अस सांगितलं.
आम्ही आत गेलो. साधारण २० रु. च तिकीट काढावं लागत. कॅमेरा असेल तर जास्तीचा चार्ज द्यावा लागतो. आम्ही आत गेलो.
अप्रतिम अस शिंदे छत्रीच बांधकाम केल होत. तिथे कामाला असलेल्या एकाने आम्हाला थोडीफार माहिती सांगितली. जवळपास दीड तास आम्ही छत्री बघत होतो
.
शिंदे छत्री विषयी थोडसं :
शिवपुरी पासून ३ किमी अंतरावर शिंदे छत्री आहे. ह्या छत्रीच बांधकाम १९२६ ते १९३३ अस चालू होत.येथे माधवरावजी सिंदियांच्या अस्थि आहेत.
शिंदे छत्रीची मागील बाजूशिंदे छत्रीची दर्शनी बाजू
कलाकुसर
आतमधील शिवलिंग
तिथल्याच एकाने संपूर्ण लाईट चालू करून दाखले. लाईट चालू करायला पण त्याला ओवाळणी द्यावी लागलीच. पण आपण भारत नामक राष्ट्रात राहतो, म्हणल्यावर अशी ओवाळणी आलीच. लाईट पडला कि चमकणाऱ्या ओकम या दगडाची माहिती दिली.
आम्ही रात्री ८ ला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो. आज पौष पौर्णिमा होती. चंद्राचा मस्त प्रकाश पडला होता. रात्रीच्या सभेमध्ये उद्या सकाळी शिंदे छत्री बघायला जायचं नक्की झाल.
रात्री सगळे जमले कि आज कुणी कुणी काय काय बघितलं, याची चर्चा व्हायची. दरवेळेस आम्हीच आघाडीवर असायचो. आज मात्र काहीजण चक्क राजगढ नावाचा किल्ला बघून आले होते. त्यांचे किल्ल्याचे फोटो बघून माझ्या मनात मात्र कालवाकालव झाली. राजगढ, ब्यावाराच्या जवळपास आहे हे मी एकूण होतो, पण इतक काही मला ते क्लिक झाल नाही. जाऊ दे राजगढ ची तहान बजरंग गड वर भागली म्हणून मी पण गप्प बसलो. आम्ही पण मग बजरंग गडाचे फोटो दाखवून थोडा भाव खाल्ला.
मी माझा भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र बाहेर charging ला लावलं होत. सभा झाल्यावर मी बाहेर थोडा वेळ काकांशी गप्पा मारत बसलो. थोड्यावेळाने लघुशंकेला जाऊन आलो बघतो तर काय भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र गायब. गुरुजीच नेहमीप्रमाणे घेऊन गेले असणार याची मला खात्री होती. तरी पण नक्की कराव म्हणून अजितला विचारलं. अजित म्हणाला हो गुरुजी आताच सगळे charging लावलेले भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र घेऊन गेले. गुरुजींचा कडक नियम असायचा, भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र charging लावून कुठही जाता यायचं नाही. गुरुजींना सापडलं तर ते जप्त करायचे व प्रत्येंक यंत्रामागे १०० रु. दंड आकारात असत. म्हटलं चला आता २०० रु. ला टोला.
आजचा प्रवास : २०६.३ किमी
उद्याचा प्रवास: झाशी – दतिया – ग्वाल्हेर
मस्त!!! पुढिल भागाच्या
मस्त!!!
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
मस्त च रे सारंग........ येऊ
मस्त च रे सारंग........ येऊ देत अजून.
व्वा छान चाललेय यात्रा, हाही
व्वा छान चाललेय यात्रा, हाही भाग मस्त!
पुढिल भागात, झाशी आणि ग्वाल्हेरच्या किल्ल्याचा इतिहास वाचायला आणि प्र.चि. पहायला उत्सुक.
सारन्ग >> छान चालू आहे मोहिम.
सारन्ग >>
छान चालू आहे मोहिम.
माझा एक भाबडा प्रश्न.
मोहिम चालू असतांना, इतरत्र फिरता येते का? त्यामूळे चुकामुक वा भांडणे/कुरबुर वगैरे होतात का?
पुलेशु.
सही
सही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सारन्ग | 19 June, 2012 -
सारन्ग | 19 June, 2012 - 08:11
मला तुमच्या ह्या प्रवास वर्णन मालिके मधील आवडलेली ही काही वाक्य खाली देत आहे. ह्या सगळ्या चांगल्या विचारांची तुम्हाला जाणीव आहे म्हणून तुमच कौतुक. आत्तापर्यंत वाचलेलं चारही भाग अप्रतीम. माझ्याकडून पुढील लेखांसाठी शुभेच्छा.
~आयुष्यात सर्वच काही मनासारखे होत नाही याची त्या व्यक्तींना कदाचित जाण नसावी. ~ आयुष्यात ह्या विचारांची जाणीव जितकी लवकर होईल तेवढे चांगले कारण मग अगदी छोट्या छोट्या गोष्टीन मध्ये सुधा आनंद अनुभवता येतो कुरकुर न करता.
~ आज जेवायला खिचडी होती. ती देखील आमच्याच सदस्यांनी बनवलेली. खरंतर थोडीशी करपली होती पण अन्नाला नाव ठेऊ नये जे मिळेल ते गोड मानून खाव हे बाबांचे शब्द आठवून मी ती खाल्ली. ~ ह्या वेळी आईचे अजून एक वाक्य आठवले "आज मिळते आहे उदया मिळेलच की नाही सांगता येत नाही.....म्हणून जास्त मिजास न करता पानात यईल ते आवडीने खावे."
~ गुरुद्वारामध्ये जाऊन माथा टेकून आलो. हे अस करायला मला खूप आवडत. कधी मशिदीमध्ये जाऊन नमाज पढून या, कधी चर्च मध्ये जाऊन गुडघे टेकवून या, असलं सगळ करण्यात काहीतरी वेगळ वाटत. ~ अगदी मुंबईचे दिवस आठवले माउंट मेरी, हाजीआली दर्गा आणि सिद्धिविनायक सगळेकडे एकच शांतता अनुभवायला मिळायची. Humanity is the Only Religion ह्या concept वरील माझा विश्वास दृढ होण्यासाठी हे सुधा एक कारण आहे.
~ म्हणूनच प्रवास करावा, त्यामुळे आजूबाजूला काय परिस्थिती आहे याची जाणीव होते. नाहीतर आपण आपल्याच कोशामध्ये इतके गुरफटलेलो असतो कि आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे याची कल्पनाच नसते. ~ ह्या साध्या विचारांमुळे आयुष्य अजून सोप्प्या पद्धतीने आनंदात जगता येते आणि खूप नवीन चांगल्या गोष्टींचा अनुभव घेता येतो. जात, धर्म, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित, सुंदर, कुरूप...वगेरे वगेरे ह्या सारख्या गोष्टीना असणारे महत्व आपल्या मनातून कमी कमी होत जाते आणि उरतो तो फक्त आदर.
सारंगा.. बेस्ट लिहीतोयस..
सारंगा.. बेस्ट लिहीतोयस.. वाचायला पण मजा येतेय.. नि तो बजरंगगड खासच.. हे मात्र बरे केलेत.. येउदे पुढचा भाग
शापित गंधर्व,निशदे ,विजय
शापित गंधर्व,निशदे ,विजय आंग्रे,पाकिपुंगा आणि चिन्मय, योगी आणि अनन्या - सर्वाना मनापासून धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विजय, माधव राष्ट्रीय उद्यानाचा निबंध लवकर आटोपला तर नक्कीच झाशी आणि ग्वाल्हेरच्या किल्ल्याचा इतिहास टाकेन नाहीतर भाग ६ मध्ये तर नक्कीच टाकेन
पाकीपुंगा - मोहिम चालू असतांना, इतरत्र फिरता यायचं, चुकामुक होऊ नये म्हणून जे लोक मोहीम सोडून कुठेच जाणार नाहीत याची खात्री असायची अशा लोकांचे फोन नंबर अगोदरच घेऊन ठेवले होते. भांडणे/कुरबुर मात्र कधी नाही झाली आणि शेवटी आमच्याबाबतीत म्हणायचं तर सुबह का भुला जब शाम को घर आता है तो उसे भुला नही कहते ,,, हा मोहिमेचा पवित्रा असे.
जबरी सुरु आहे रे. मजा येतेय.
जबरी सुरु आहे रे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा येतेय.
मस्त... छान अनुभव. तुमच्या
मस्त... छान अनुभव. तुमच्या खोड्या पण जबरी..
शेवटी असाच एक टाईमपास म्हणून त्या माकडांच्या कुटुंबाचा फोटो घेतला, तेव्हा कुठ आमच माकड शांत झाल.>>>>
हाहाहा .....
तुमची लेखन शैली मस्त आहे. मुख्य म्हणजे फीरायला जाताना ठेवलेला अॅटीट्युड चांगला आहे.
अरे ते फूल कमळाचे आहे....
अरे ते फूल कमळाचे आहे....
अरे ते फूल कमळाचे आहे....>>>>
अरे ते फूल कमळाचे आहे....>>>> मला वाटतं ते बहुतेक वॉटर लिली आहे, कमळ वेगळे असते.
सही रे.. मस्त चालु आहे..
सही रे.. मस्त चालु आहे..
झकासराव, मीरा, आशु, शशांक ,
झकासराव, मीरा, आशु, शशांक , चिमुरी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आशु >>>>>>>>>>>>>>> मला देखील पहिल्यांदा ते कमळच वाटले, पण त्या मुलाला विचारलं असता नाही म्हणाला
आपल्याकडे कमळ वेगळे असते,
शशांक >>>>>>>>>>>>तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते वॉटर लिलीच असेल असे वाटते.