तू पण ना...

Submitted by सुमेधा आदवडे on 16 June, 2012 - 00:53

विस्तीर्ण समुद्र किनारा.
काय सुरेख नाव आहे ह्या गावाचं!
समुद्रही तितकाच सुंदर आहे इथला.
लख्ख निळं पाणी...तळाला वाळुच्या अगदी बारीक सारीक हालचाली सुद्धा डोळ्यांना स्पष्ट टिपता याव्यात, असं.
लाटांचा एका लयीतील गाज...त्याला वाऱ्याच्या झुळूकेची सुरेख सोबत..
चहु बाजुंनी हिरव्या मऊ सुया अंगावर लेऊन उंच गेलेली सुरुची बनं...
आणि जणु त्यांच्याशी पैज लावल्याप्रमाणे त्यांच्यापेक्षाही उंच जाणारे, डोक्यावर झापांचा मुकुट आणि गळ्यात नारळांची कंठी घातलेले माड...
बदामी रंगाची,पाऊल टाकुनही खराब होईल की काय असं वाटायला लावणारी आणि म्हणुनच की काय, पावलं टाकल्यावर त्यांना भाजणारी, गरम वाळु...
ह्या किनाऱ्यावर आम्ही दोघं फिरतोय.
अगदी हातात हात घालुन वगैरे कसे प्रेमी लोकं फिरतात...तसे.
पण त्याच्या चेहऱ्यावर ऊन येतंय वाटतं. तरीच मला तो नीट दिसत नाही आहे.
इकडे बघ ना रे.
श्या! बघितलं त्याने, तरी दिसत नाहीये.
थांब जरा, आपण सावलीत जाऊ तिकडे. मला बघायचंय तुला.
काय म्हणालास? हो रे...बघते ना रोज. पण आज इथे पुन्हा बघायचंय...बराच वेळ...सतत..एका चित्ताने.
हसु नकोस रे. जा. नाही बघत मग.

अहं..मी नाही जा आता..माझी नेहमी अशी मस्करी करतोस तू.
आता ऑफिसमध्ये पण नाही बघणार तुझ्याकडे.
च्च्च्च..काय बोलले मी...मी पण ना बोलता बोलता काहीपण बोलुन जाते.
.
.
नाही हं..तसं काही अगदी तुझ्याचकडे बघत नाही बसत मी. कामं असतात मलाही...तुमची टीम लीडर आहे म्हटलं मी.
ठीक आहे, चल त्या सुरुच्या झाडांच्या सावलीत बसु.
पाण्यातुन चालायची खुप इच्छा आहे पण इथे ऊन मी म्हणतंय.
चल पटापट..पाय भाजताहेत.
बोल आता.
अरे बोल ना, आता का शांत? असा काय बघतो आहेस आता?
.
चल! मी कशाला लाजु?
.
ह्म्म्म..माहित आहे,हा प्रत्येक पिक्चरमधल्या हिरोचा पेटंट डायलॉग आहे....
खरंच का सगळ्या मुली लाजल्यावर आणि रागवल्यावर छान दिसतात?
ते राहुदे..चल सगळे वाट पाहत असतील...जेवण झाल्यावर निघायचंय आपल्याला.
.
.
हो रे...मलाही नाही निघावसं वाटत आहे. आपण दोघांनी तरी काही काळ इथे थांबावं,
संध्याकाळी पुन्हा समुद्रावर यावं,
रात्री जेवण झाल्यावर झोपाळ्यावर मस्त गप्पा मारत बसावं..
अख्खी रात्र सुद्धा चालेल!
गप्पा तरी काय...मीच बोलत असते...तू फक्त श्रोत्याचं काम बजावतोस.
पण किती शांतपणे, मन लावुन ऐकतोस रे तू...खरंच ऐकतोस ना रे?
मी पण काय विचारतीये..तूच म्हणाला होतास ना की मी बोलत असले की तुला ऐकतच रहावसं वाटतं.
असो...हे कितीही हवंहवंसं वाटलं तरी शक्य नाही मि.सारंग देसाई.
उद्यापासुन ऑफिस आणि नाना व्यवधानं असणार आहेत आपल्याला. निघावंच लागेल आज.
चल..उगाच आपल्यामुळे उशीर नको.
.
.
हं, माहित आहे मी किती अनरोमॅंटिक आहे, बोरिंग आहे अ‍ॅण्ड ऑल दॅट...आणखी काही?
तू पण ना असा आहेस अगदी...चल आता.

******
अ‍ॅण्ड आय वॉन्ट धिस टु बी डन इन टु आवर्स!
हम्म.. नुसते येस मॅम म्हणु नका. चला कामाला लागा.
का रे सारंग? तू का असा उभा? चल लवकर कोड घे हातात, आज डेमो द्यायचा आहे ना क्लायंटला.
.
आता काय बोलायचंय माझ्याशी? संध्याकाळी बोलु डेमो झाल्यावर.
.
हो रे बाबा...सि.सि.डी ला जाऊ.
इकडे असल्यावर आपल्या बोलण्याला कॉफीची साक्ष नाही असं कधी होतं का?
नाऊ कमॉन. गेट गोईंग.

******
मस्त झाला ना डेमो? अगदी खुश झाला क्लायंट.
मला वाटतं याच्या पुढच्या काही ऑर्डर्स येतील आपल्याला. वुई हॅव मेड ईट सारंग!
.
बरं बाबा, नाही करत ऑफिसच्या गोष्टी.
बोल. तू काही बोलणार होतास ना.
.
.
.
.
.
अरे काय बोलणार? म्हणजे तू अचानक असं काही सांगशील असं मला वाटलंच नाही.
.
हो.बरोबर आहे.पहिल्यांदा मलाच सांगतोय्स.
पण अचानक लग्न वगैरे?
.
गप्प बस हं..काहीही फुटकळ कारणं सांगु नकोस...
लग्नाचं वय वगैरे झालंय हे काही कळत नाही का मला?
सगळ्यांना कळतं. पण...या आधी बोलला नाहीस कधी.
कदाचित मीच कधी विचारलं नाही.
.
हो रे राजा, मी खुश आहे. खुश नसायला काय झालं?
तू पण ना असा आहेस अगदी... मग पुढचं कसं काय?
******

हो गं आई. कळतं मला. पण जरा वेळ दे ना.
आता कुठे मी जॉब मध्ये स्थिर होत आहे. काय घाई आहे लग्नाची?
.
हम्म्म..मी काही टाळत वगैरे नाही आहे.
.
हो गं. कोणी असेल आवडत तर तुला सांगेन येऊन...
.
पण नुसतं मला आवडुन काय आहे? समोरच्याला पण मी आहे अशी आवडली पाहिजे ना.
.
नाही. काही नाही.
चल मी निघते ऑफिसला.
,
काय? आज कशाला ठेवला बघण्याचा कार्यक्रम?
तू मला विचारुन का नाही ठरवत गं ह्या गोष्टी?
आज मला उशीर होणार आहे ऑफिस मधुन यायला. पुढच्या दोन दिवसात डिलीव्हरी करायची आहे अ‍ॅप्लिकेशनची.
.
बघु गं पुन्हा कधीतरी.
चल बाय. मी गेले.

******
काहीतरी काय बोलतोय्स सारंग? मी का खुश नसेन अरे?
.
.
अरे बाबा..त्या दिवशी घरी जायची घाई होती.
आता म्हणुन तर तुला मुद्दाम कॉफी साठी बोलवलं. सांग आता चल.
....
बोल आता. काय झालं शांत बसायला?
.
.
.
काय म्हणजे? नाव काय आहे तुमच्या होणाऱ्या सहचारीणीचं?
....
अय्या...लाजतोय्स की काय?
.
कसं कळलं म्हणजे? मी काय आज ओळखते का तुला? सांग आता.
.
संध्या. छान नाव आहे रे. शेवटी माझं पण नाव आहे ते म्हटलं.
आणि काय? ह्याच शहरातली आहे का?
उत्तम!
दिसायला सुंदर असणारच...आफ्टर ऑल सारंग देसाईची चॉईस आहे.
.
.
.
काय म्हणतोय्स?
.
अरे नाही रे. शांत नाही बसले मी. विचार करत आहे.
.
काय?
.
चल! असं काही नाही. आणि असलं तरी...
.
.
नाही. काही नाही.
.
.
.
.
आग्रह करतो आहेस म्हणुन सांगते. हो. आवडतोस मला तू. मनापासुन आवडतोस.
खुप प्रेम करते मी तुझ्यावर!
.
.
नाही..मी नाही रडत आहे.
प्रत्येकाला आपला जोडीदार निवडायचा हक्क आहे. आणि...
.
आणि मी ही अशी.
हं, स्वप्नं असतातच रे...सगळ्यांचीच असतात.
पण ती कोणाला पुरली आहेत आयुष्याला?
आय अ‍ॅम रिअली हॅप्पी फॉर यु सारंग.
तुला खुप चांगली जोडीदारीण मिळाली आहे.
.
.
म्हटलं ना, नाही रडत मी.
.
ए गप्प बस हं तू. म्हणे मुली मंद असतात...मी काय केलं आता मंदासारखं?
.
.
काय?
.
मला बरं वाटावं म्हणुन म्हणतोय्स ना?
.
चल! माझा नाही विश्वास बसत. ठरलं असेल तुझं लग्न.
.
अरे पण..
.
तुला माझ्याकडुन ऐकायचं होतं? माझ्या होकाराची वाट बघत होतास?
पण...पण हे असं खोटं का सांगितलंस?
.
.
मग? कळलं का आता...मला काय वाटतं ते तुझ्याबद्दल?
.
काय?
.
.
.
अरे काय बोलु? तू पण ना असा आहेस अगदी.
.
मी लाजत नाहीये.
.
.
ओके.ओके. आय लव्ह यु टू.

किती पीडतो हा मला. पण हे सत्यच आहे ना?
की मी स्वप्न बघतीये?
म्हणजे...म्हणजे खरंच त्याला मी आवडायचे?
त्यालाही माझ्याबद्दल तेच वाटतं जे...
मला ना...समुद्रा किनारी फिरल्यासारखं वाटतंय आता...
खाली पायांना वाळुचा स्पर्श जाणवतोय...पण..
यावेळी, सकाळचा.. मऊ, थंड...गुबगुबीत गादीवरुन चालत गेल्यासारखा
हो...तशीच कुरवाळतीये ती माझ्या पायांना...जसं
तू..मला..माझ्या मनाला कुरवाळलंस...
अरे...मला त्या लाटांचा लयीतला गाजही ऐकु येतोय..खरंच!
आपण कुठे आहोत सारंग?
.
.
गप रे.. चिडवु नकोस.
पण असा कसा रे तू?
एवढे दिवस फक्त माझी प्रतिक्रीया पहायला हे सगळं केलंस?
.
.
नाही रे..मी स्वत:ला कमी लेखत नाही. पण तरीही कुठलाही...
.
.
हो. कुठलाही धडधाकट मुलगा माझ्याशी लग्न करेल अशी अपेक्षा मी ठेवलीच नाही कधी आयुष्यात!
.
ए...फटके काय देतोय्स..गप रे.
चल आता ती केन दे माझी इकडे. नीट फोल्ड होत नाहीये..आतली रस्सी तुटलीये.
बदलुन आणायला हवी.
.
.
तोपर्यंत काय करणार म्हणजे?
आहेस ना तू आधार द्यायला?
तुझे दोन डोळे पुरे आहेत आपल्याला जगाकडे बघायला. चल!

गुलमोहर: 

छानच... मी अश्याच आशयाची एक एकांकिका केली होती कॉलेज मध्ये असताना... त्या एकांकिकेचे नाव होते "तिच ती दिवाळी"