इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे शरीरावर होणारे परिणाम आणि त्याची लक्षणे मागच्या लेखात आपण पाहिली.
शरीरातील काही अतिशय महत्वाच्या संस्थांवर इस्ट्रोजेनच्या अभावाचे दूरगामी परिणाम होतात आणि त्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.
मेनोपॉजमुळे शरीराला कोणते धोके निर्माण होऊ शकतात ?
१. ऑस्टिओपोरॉसिस (Osteoporosis) म्हणजेच हाडे ठिसूळ होणे
२. हृदयविकार
३. युरिनरी इनकॉन्टिनन्स (Urinary incontinence) म्हणजे आपोआप लघवी होणे
ह्या लेखामध्ये ऑस्टिओपोरॉसिसबद्दल आपण जरा विस्ताराने पाहू या.
ऑस्टिओपोरॉसिस (Osteoporosis) म्हणजेच हाडे ठिसूळ होणे
भारतात हाडे ठिसूळ होऊन मोडण्याचे प्रमाण दर पाच स्त्रियांमागे एक इतके जास्त आहे. आणि हा धोका मुख्यत्वे मेनोपॉजनंतर वाढतो.
Osteoporosis शब्दातील Osteo म्हणजे हाड आणि porosis म्हणजे चाळणीसारखं सच्छिद्र होणे.
आपल्या शरीरातील हाडे ह्या जिवंत पेशी असतात. त्यांची वाढ होत असते, झीज होत असते.
ह्याला "बोन रिमॉडेलिंग (Bone remodelling)" असे म्हणतात.
ज्या पेशी हाडांच्या वाढीसाठी कारणीभूत असतात त्यांना ऑस्टिओब्लास्टस (Osteoblasts) असे म्हणतात. आणि ज्या पेशी हाडांच्या जीर्ण झालेल्या थरांना काढून टाकतात त्यांना ऑस्टिओक्लास्टस (Osteoclasts) असे म्हणतात.
हाडे मजबूत राहण्यासाठी ह्या दोन पकारच्या पेशींच्या कार्यामध्ये समतोल राहणं अतिशय आवश्यक असतं.
शरीरातील जास्तीतजास्त (सुमारे ९९%) कॅल्शिअम हाडांमध्ये साठवलेलं असलं तरी त्याची रक्तासोबत देवाणघेवाण होत असते.
असं समजूया की, हाडे ही कॅल्शिअमची बँक आहेत.
जेव्हा रक्तामध्ये इतर पेशींच्या गरजेपेक्षा जास्त कॅल्शिअम येतं, तेव्हा ते हाडांमध्ये जमा केलं जातं....
"फिक्स्ड डिपॉझिट" .....ज्यावेळी रक्तामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण कमी होतं तेव्हा मात्र हे फिक्स्ड डिपॉझिट मोडावं लागतं.
आणि शरीराने खात्यात काही जमा न करता फक्त डिपॉझिट मोडण्याचा सपाटा चालू ठेवला तर.....अर्थातच बँकेचं दिवाळं निघेल !
पण हाडे आणि दात ह्याव्यतिरिक्त शरीराला कॅल्शिअम लागतंच कशाला ?
कॅल्शिअम हा आपल्या शरीराच्या होमिओस्टॅसिस (Homeostasis) ( मराठी प्रतिशब्द ?) मध्ये लागणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
स्नायूंच्या आकुंचनासाठीसुद्धा कॅल्शिअम लागतं.
उदा.- हृदयाच्या स्नायूंना कॅल्शिअम मिळालं नाही तर हृदयाचा पंप बंद पडू शकतो !
रक्तवाहिन्यांमध्येही स्नायू असतात. त्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळे रक्तदाब योग्य पातळीत ठेवला जातो. आणि ह्यासाठी कॅल्शिअम हवंच.
..... मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही बँकेत एफ डी केली....पण जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला काही गंभीर आजार निघाला, आणि त्यासाठी मोठी रक्कम लागणार असेल तर तुम्ही मागचापुढचा कसलाही विचार न करता शिक्षणासाठी ठेवलेली एफ डी मोडाल की नाही ?
शिक्षण महत्वाचे आहेच...पण जीव वाचवणे जास्त महत्वाचे !
शरीरातही अगदी असंच होतं.
कॅल्शिअम हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे, ते कमी झालं तर हाडे कमकुवत होऊन मोडतील ........मान्य....पण जर कॅल्शिअमच्या अभावी रक्तवाहिन्या, हृदय ह्यांचं काम ठप्प झालं तर ??
शरीर हा धोका स्वीकारत नाही.
रक्तातील कमतरता हाडांमधून कॅल्शिअम काढून पूर्ण केली जाते. आणि परिणामी हाडे ठिसूळ बनतात !
पण मग ह्या सगळ्याचा इस्ट्रोजेनशी काय संबंध ?
आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की, इस्ट्रोजेन हे पुलंच्या "नारायणा" सारखं सगळा मंडप स्वतःच्या खांद्यावर वागवत असतं...
इस्ट्रोजेन हाडांमध्ये जास्तीत जास्त कॅल्शिअम साठवून ठेवण्यासाठी मदत करतं....अर्थातच मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हाडांना असलेलं हे संरक्षण जातं. आणि हाडं ठिसूळ होतात.
स्त्रीपुरूष दोघांनाही ऑस्टिओपोरॉसिसचा धोका असतो. पण स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनचं संरक्षक कवच गेल्याने त्यांच्यामध्ये ह्या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते.
हा आजार होण्याची शक्यता वाढवणारे इतर घटक (Risk factors) :
१. स्त्री असणं
२. वयाच्या ४० व्या वर्षाच्या आत मेनोपॉज येणं
३. आई, वडील, भाऊ, बहीण ह्यापैकी कुणाला ऑस्टिओपोरॉसिस असणं किवा आईवडिलांपैकी कुणाचं खुब्याचं अथवा मणक्याचं हाड मोडलेलं असणं
४. वजन खूप कमी असणं ( Underweight - म्हणजे BMI १९ पेक्षा कमी )
५. मेनोपॉजच्या आधी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ पाळी न येणे - प्रमाणाबाहेर व्यायाम किंवा डाएटिंगमुळे असं होऊ शकतं
६. उतारवय - ५० वर्षांपेक्षा जास्त
७. व्यायामाचा अभाव
८. कॅल्शिअम आणि 'ड' जीवनसत्वाचे अपुर्या प्रमाणात सेवन
९. अतिरिक्त मद्यपान
१०. धूम्रपान
११. हायपरथायरॉइड, किडनी फेल्युअर ह्यासारखे आजार.
१२. स्टिरॉइअडच्या औषधांचे अतिरिक्त सेवन - ही औषधे बर्याचदा दम्याच्या उपचारांमध्ये वापरली जातात
१३. कर्करोगासाठी घेतलेली किमोथेरपी
ह्या आजाराची लक्षणे काय ?
दुर्दैवाने ह्या आजाराची लक्षणे लवकर जाणवत नाहीत.
जवळजवळ सगळ्या केसेस मध्ये, अगदी किरकोळशा धक्क्याने शरीरातील एखादं हाड मोडल्यानंतरच ह्या आजाराचं निदान होतं.
ऑस्टिओपोरॉसिस मुळे होणारी फ्रॅक्चर्स ही मुख्यत्वे मणक्याची हाडे, खुब्याचे हाड किंवा मनगटाच्या हाडांमध्ये आढळून येतात.
मणक्याच्या हाडांमध्ये Compression फ्रॅक्चर्स होत गेल्याने असह्य पाठदुखी होते आणि मणक्याला बाक येतो.
उतारवयात झालेल्या ह्या आजारपणामुळे अनेकदा परावलंबित्व येतं.
मोडलेली हाडे लवकर भरून न येणं, जंतुसंसर्ग होणं असे अनेक धोके उत्पन्न होतात.
आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तसेच जगण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
ऑस्टिओपोरॉसिसच्या निदानासाठी उपलब्ध असलेल्या तपासण्या :
हाडे किती मजबूत आहेत हे पाहण्यासाठी त्यांची घनता तपासतात. त्यालाच बोन मिनरल डेन्सिटी (BMD) असे म्हणतात.
साधारणपणे वयाच्या ३० व्या वर्षी हाडांची घनता ही सर्वाधिक असते. त्यानंतर ती हळूहळू कमी होत जाते.
हाडांची घनता मोजण्याच्या तपासणीला डेक्सा स्कॅन (DEXA scan) असे म्हणतात.
आजकाल संपूर्ण शरीराची तपासणी करण्याचे जे 'पॅकेजेस' असतात, त्यामध्ये बर्याचदा डेक्सा स्कॅनही केला जातो.
(इतर काही तपासण्यांच्या मदतीने सुद्धा हाडांची घनता मोजता येते. जसे की अल्ट्रासोनोग्राफी, क्वांटिटेटिव्ह कॉम्प्युटेड टोमोग्राफी (QCT). पण बहुतांश ठिकाणी डेक्सा स्कॅनचा वापर केला जातो. म्हणून इथे त्याबद्दल थोडं विस्ताराने देत आहे.)
DEXA म्हणजे Dual Energy X-ray Absorptiometry.
डेक्सा स्कॅनरमध्ये दोन वेगवेगळ्या क्षमतेच्या क्ष-किरणलहरी वापरल्या जातात ( म्हणूनच Dual Energy !)
जास्त क्षमतेच्या लहरी आणि कमी क्षमतेच्या लहरींमधील फरकाच्या मदतीने हाडांची घनता मोजली जाते.
ह्यातून होणारा क्ष-किरणांचा मारा छातीचा एक्सरे काढताना होणार्या मार्यापेक्षाही कमी असतो, त्यामुळे ह्या तपासणीमधील धोके कमी आहेत.
संपूर्ण तपासणीला साधारणपणे १५ ते २० मिनिटे लागू शकतात.
ही तपासणी वेदनारहित असते. ह्यामध्ये कुठलंही इंजेक्शन किंवा सलाईन वापरावे लागत नाही.
तपासणीआधी नेहमीचे जेवण घेतले तरी चालते. मात्र साधारण २४ तास आधीपासून कॅल्शिअमची पूरक औषधे बंद ठेवावी लागतात.
खुब्याचे हाड आणि मणका ह्या दोन ठिकाणची घनता तपासून त्याच्या सहाय्याने शरीरातील इतर हाडांना असणार्या फ्रॅक्चरच्या धोक्याचा अंदाज वर्तविला जातो.
३० वर्षे वयाच्या निरोगी व्यक्तीच्या हाडांच्या घनतेशी रूग्णाच्या हाडांच्या घनतेची तुलना करून रुग्णाचा टी-स्कोअर काढला जातो.
जागतिक आरोग्य संस्थेने ऑस्टिओपोरॉसिसच्या निदानासाठी काही व्याख्या बनवल्या आहेत.
नॉर्मल टी स्कोअर ----> ० ते -१ ह्या दरम्यान
ऑस्टिओपिनीआ (काही प्रमाणात ठिसूळ झालेली हाडे) ----> -१ ते -२.५ मधील टी-स्कोअर
ऑस्टिओपोरॉसिस ( ठिसूळ हाडे ) ---> -२.५ किंवा त्याहून कमी असलेला टी-स्कोअर
तुमचा टी-स्कोअर ऑस्टिओपिनीआ ह्या वर्गात असेल तर हाडे ठिसूळ होऊन होणार्या फ्रॅक्चर्सचा धोका २ ते ३ पटीने अधिक असू शकतो आणि टी-स्कोअर जर ऑस्टिओपोरॉसिस ह्या वर्गात असेल तर असा धोका ५ पटीने अधिक असू शकतो !
डेक्सा स्कॅन कोणी करावा ?
- ६५ वर्षे वयाच्या पुढील स्त्रिया,
- वर उल्लेख केलेले रिस्क फॅक्टर्स असणार्या ६५ वर्षे वयाच्या आतील स्त्रिया
- वर उल्लेख केलेले रिस्क फॅक्टर्स असणारे पुरूष
- अस्थिरोगतज्ञांनी सल्ला दिला असल्यास.
असे म्हणतात की, "Osteoporosis is a disease of childhood which manifests in adult age !"
म्हणजेच हा प्रौढावस्थेत लक्षणे दाखवणारा, पण लहान वयापासूनच उद्भवलेला आजार आहे.
त्यावर उपाय आहेत. पण नंतर उपचार करण्यापेक्षा आधीपासूनच हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त हितावह आहे.
- रुणुझुणू (स्त्रीरोगतज्ञ)
********************************************************************************************************************
- सर्व चित्रे जालावरून साभार.
- डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश मेनोपॉज ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत.
- लेखात जागोजागी आलेल्या इंग्रजी शब्दांसाठी क्षमस्व. पण काही शब्दांचे मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत आणि काहींचे माहीत असले तरी ते दुर्बोध वाटले म्हणून लिहिले नाहीत. सोपे आणि समर्पक शब्द सुचवले तर योग्य तिथे बदल करीन.
********************************************************************************************************************
रुणुझुणु खुपच उपयुक्त
रुणुझुणु खुपच उपयुक्त लेखमालिका आहे हि! धन्यवाद !
रूणू खूपच छान आणि आवश्यक
रूणू खूपच छान आणि आवश्यक माहीती,वाचतेय.
तुमची लेखनाची पद्धत आवडते.
तुमची लेखनाची पद्धत आवडते. उत्तम शिक्षकासारखी माहिती तुम्ही लिहीता हे अधिक प्रशंसनीय आहे.
>> आधीपासूनच हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त हितावह आहे. <<
याबद्दल प्रतिसाद्/पुढच्या भागांमधे अधिक माहिती येईल याची खात्री आहे.
रुणुझुणु, बर्थ कंट्रोलसाठी
रुणुझुणु, बर्थ कंट्रोलसाठी आजकाल हार्मोन रिलीझ करणारी IUD असते तिचा मेनॉपॉजवर काही परिणाम होतो का?? हे सगळं इस्ट्रोजेन बद्दल आहे म्हणुन विचारते आहे.
तू एका स्वतंत्र लेखात ही सर्व गर्भप्रतिबंधक साधने आणि त्यांचे दूरगामी परिणाम - ते परिणाम मेनॉपॉजशी संबंधित असतील अस नाही पण हार्मोन बॅलन्स बद्दल असू शकतील याबद्दल लिहीशील का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेख आवडला हे सांगणे नकोच.
रुणु मस्त सोप्या शब्दात
रुणु मस्त सोप्या शब्दात माहिति देते आहेस. तुझे सगळे लेख आवडले.
तू आणि साती अगदी उत्तम लेखक आहात. डॉक्टर्स रुक्ष असतात या सामान्य लोकांच्या कल्पनेला तुम्ही छेद देताय हं.:-)
हा लेखही छान झालाय !
हा लेखही छान झालाय !
प्रिंसेसला मोदक! मस्त
प्रिंसेसला मोदक! मस्त लिहीतीएस!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे आभार. तुमच्या
सर्वांचे आभार. तुमच्या प्रोत्साहनामुळे पुढचे लेख लिहायला जास्त प्रेरणा मिळते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@स्वप्ना_तुषार,
आईला लवकर ४० वर्षे वयाच्या आधी मेनोपॉज आला आहे का ? तसं असेल तर तो धोका काही प्रमाणात तुम्हाला (आणि तुमच्या बहिणींना) देखील आहे.
तुमच्या आहारातील कॅल्शिअम पुरेसं आहे, रोज थोडा तरी सूर्यप्रकाश शरीरावर पडतो आहे, आणि व्यायाम केला जातो आहे ह्याची काळजी घ्या.
आणि जरूरीप्रमाणे स्त्रीरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्या. मी लिहिणार आहेच ह्या विषयावर. अजून २-३ लेखांनंतर आपण उपाययोजनेपर्यंत पोहोचू.
शक्य तितक्या लवकर लेख प्रकाशित करीन.
@धनश्री,
)
<< व्हिटेमिन डी आणि बी १२डेफिशियन्स१२चा हाडा.न्च्या प्रॉब्लेम्शी काही स.म्बम्ध असतो का?>> हो. व्हिटॅमिन डी तर हवंच. ते आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं. त्याशिवाय शरीरातील कॅल्शिअम वापरलं जात नाही. ( आठवा...." दूध तो देती हो, पर कॅल्शिअम के लिए क्या करती हो ?" वाल्या जाहिरातीमधील बहिणी.
@ अकु,
<< रुणू, जी माहिती प्रतिसादांत दिली आहेस ती शक्य झाल्यास आवश्यकतेनुसार मुख्य लेखात घालू शकशील का?>>
पण तसं केलं तर मूळ लेखाचा फ्लो जाईल ना ? ( असं मला वाटतं.)
असं करू या का ? पुढच्या लेखापासून मी पहिला प्रतिसाद देऊन ठेवते. आणि मग जी प्रश्नोत्तरे होतील ती पहिल्या प्रतिसादात एकत्रित करून ठेवू या.
@ ३_१४ अदिती,
मी लिहिलेलं तुम्हा सगळ्यांना आकलन होतं आहे हे पाहून मला खरंच हुरूप येतो आहे.
<< उत्तम शिक्षकासारखी माहिती तुम्ही लिहीता हे अधिक प्रशंसनीय आहे.>> ठांकु.
@ धनश्री,
<< रुणुझुणु, बर्थ कंट्रोलसाठी आजकाल हार्मोन रिलीझ करणारी IUD असते तिचा मेनॉपॉजवर काही परिणाम होतो का?? हे सगळं इस्ट्रोजेन बद्दल आहे म्हणुन विचारते आहे. >>
हॉर्मोन रिलीझ करणारी IUD असते तिला LNG-IUS म्हणतात. त्यामध्ये Levonorgestrel नावाचं प्रोजेस्टेरॉन असतं. इस्ट्रोजेन नसतं. त्यामुळे ते वापरल्याने मेनोपॉज आधी किंवा उशिरा येणं असं होत नाही. मात्र त्याचे अनेक चांगले उपयोग आहेत. हॉर्मोन रिप्लेसमेंटच्या लेखात त्याबद्दल लिहिणार आहे.
<<तू एका स्वतंत्र लेखात ही सर्व गर्भप्रतिबंधक साधने आणि त्यांचे दूरगामी परिणाम - ते परिणाम मेनॉपॉजशी संबंधित असतील अस नाही पण हार्मोन बॅलन्स बद्दल असू शकतील याबद्दल लिहीशील का?>>
नक्की लिहिणार आहे. पण गर्भनिरोधक साधने हा सुद्धा खूप मोठ्ठा आणि खूप महत्वाचा विषय आहे. एका लेखात त्याला न्याय दिला जाणार नाही. मेनोपॉजची मालिका संपली की दुसरा विषय तोच घ्यायचा प्रयत्न करते.
@ प्रिन्सेस,
(तसंही मला कालच विपुत आवाहन आलं आहे.)
<< डॉक्टर्स रुक्ष असतात या सामान्य लोकांच्या कल्पनेला तुम्ही छेद देताय हं.>> डॉक्टर्स रूक्ष नसतातच मुळी. पाडू का २-४ कविता ?
रुणुझुणू, लेख चांगला हे वेगळे
रुणुझुणू, लेख चांगला हे वेगळे नको सांगायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आठवा...." दूध तो देती हो, पर कॅल्शिअम के लिए क्या करती हो ?" वाल्या जाहिरातीमधील बहिणी>>> म्हणजे हे खरे आहे का? आजकाल हे हेल्दी ड्रिंक्स वाले इतके काय काय भरभरुन सांगतात की यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. त्यामुळे हे पण खरे वाटले नव्हते.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अतिशय उपयुक्त !पुढच्या
अतिशय उपयुक्त !पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.....
मोनाली, नाही नाही. मी त्या
मोनाली,
नाही नाही. मी त्या हेल्थ ड्रिंक्समधल्या व्हिटॅमिन डी बद्दल नाही बोलत. मी सूर्यप्रकाशापासून आपल्या शरीरात तयार होणार्या व्हिटॅमिन डी बद्दल बोलत आहे.
बाकी जाहिरातींमध्ये दाखवणार्या गोष्टींबद्दल मी सुद्धा काहीच ठामपणे सांगू शकत नाही गं. विश्वास ठेवायचा की नाही किंवा किती मर्यादेपर्यंत ठेवायचा ह्याबाबत आपण एकाच नावेतील प्रवासी.
अग हो, ते आले लक्षात पण
अग हो, ते आले लक्षात पण म्हणजे व्हि. ड. लागते हे खरे आहे तर असे म्हणायचे आहे मलाही. त्या जाहिराती म्हणजे तर अरे देवा. खरेच आपली नाव एकच आहे त्या बाबतीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उत्तम माहिती
उत्तम माहिती
उपयुक्त लेख.
उपयुक्त लेख.
रुणू, पहिले लेख सार्वजनिक
रुणू, पहिले लेख सार्वजनिक होते, हा संयुक्तापुरता झालाय का फक्त?
उपयुक्त आणि सहज समजेल अशा
उपयुक्त आणि सहज समजेल अशा शब्दातली माहिती. धन्यवाद रुणुझुणू.
साती, सार्वजनिक आहे लेख. लॉगाउट करूनही दिसतो आहे.
थँक्स रुणुझुणू. पहिल्या
थँक्स रुणुझुणू. पहिल्या प्रतिसादात सर्व प्रश्नोत्तरे एकत्र करायची कल्पना छान वाटते आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच उपयोगी आणि सोप्या भाषेत
खुपच उपयोगी आणि सोप्या भाषेत लिहिलेला लेख आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद रुणुझुणु.
रुणुझुणु लोकसत्तामध्ये पण एक
रुणुझुणु लोकसत्तामध्ये पण एक लेख वाचला, याच्याशी संबंधीत (मेनॉपॉज) नसला तरी हाडांच्या झीजेवर आहे. उत्तम वाटला.
http://www.loksatta.com/chaturang-news/arogyam-bone-wastage/
अत्यंत उपयुक्त लेख. धन्यवाद
अत्यंत उपयुक्त लेख. धन्यवाद रुणुझुणु.
खुप छान लेख.. धन्स गं ....
खुप छान लेख.. धन्स गं ....
माझ्या आईची बोन मिनरल
माझ्या आईची बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट केल्यानंतर डॉ म्हणाले की तीच्या वयाच्या मानाने हाडांची खुपच जास्त झीज झाली आहे.कॅल्शिअम गोळ्या दिल्यायत.बी पी , डायबिटीज आहे .पण आणखि काय करता येईल हाडे कमीतकमी ठिसुळ होण्यासाठी. कारण ते म्हणाले की जराश्या पडल्यानेही हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी वाटते.
डॉ उपचार योग्य करतातच पण वेळेअभावी अशी व्यवस्थित माहीति देत नाहीत.मराठीतुन इतकी मह्त्वाची माहीती दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
तुमचे आणि साती जींचे हार्मोन्स विषयावरचे असे सोप्या भाषेतले लेख फार मह्त्वाचे व उपयोगी आहेत.
चारही लेख खूपच सोप्या भाषेत
चारही लेख खूपच सोप्या भाषेत आणि एकदम माहितीपूर्ण झालेत. उर्वरित लिहायचं नक्की मनावर घ्या.
Pages