होम अन बॅग मेकर सुप्रिया (मुलाखत)

Submitted by मंजूताई on 11 June, 2012 - 07:57

माझ्या अवतीभवती बऱ्याच अश्या स्त्रिया आहेत ज्यांनी आपलं घर, कुटुंबाला प्राधान्य देत समाजात स्वतःची अशी एक ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. अश्या काही स्त्रियांचं काम, कला आपल्या पर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे. ह्या मालिकेतली पहिली स्त्री होती, बाहुल्यांच्या दुनियेत रमणारी रमणी. त्याला आपण सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. मनापासून सगळ्यांना धन्यवाद! आज जिच्याबद्दल मी लिहिणार आहे, ती आहे सुप्रिया पोतदार. सुप्रिया चारचौघींसारखीच एक मुलगी. पदवी घेतली, नोकरी केली, जोडीदार स्वतः शोधला, लग्न झालं, संसार सुरू झाला....... आटपाट नगरातल्या सर्वसामान्य मुलीची कहाणी. इथे कहाणी संपत नाही तर सुरू होते. जाणून घेऊ या तिच्याकडूनच तिच्याविषयी.
सौ सुप्रिया पोतदार
६०१ शेवाळकर टॉवर्स
डागा ले आउट,
नागपूर ३३
फोन - ९८८१०४७७४४

मी: लग्न झालं वर्षभरात राज्ञीचा जन्म झाला त्यानंतर काय झालं?

सुप्रिया: हो, वर्षभरात राज्ञीचा जन्म झाला त्याचबरोबर माझ्या व्यवसायाचाही पण जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही. ही गोष्ट आहे १९९४ सालची. त्याचं काय झालं, मी लग्नापूर्वी एका कंपनीत नोकरीला होते. लग्न करून नोकरपेशा फाटकांच्या घरातून व्यावसायिक पोतदारांच्या घरात आले. पोतदारांचं नागपूरच्या पंचशील चौकात 'आराम कार्यालय' हे वडिलोपार्जित दुकान. आमचं एकत्र कुटुंब व तसाच व्यवसायही. बाहेर जाऊन नोकरी करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे नोकरी सोडावी लागली. खूप वाईट वाटले पण राज्ञीच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे फारसं जाणवलं नाही. राज्ञीचा जन्म झाला. दोन महिन्यांनी बारसं झालं. बारशाला मुंबईहून नणंद आली. तिने मला एक छानशी एक कप्प्या-कप्प्यांची पिशवी दिली. ती मला खूपच आवडली. मला जशी आवडली तशी इतर बऱ्याचजणींना आवडली. त्यात वेगवेगळे कप्पे असल्यामुळे बाहेर जातेवेळी बाळाचं सामान व्यवस्थित ठेवता यायचं. आज अश्या प्रकारच्या पिशव्या अगदी कॉमन वाटतात पण १७-१८ वर्षांपूर्वी त्याचं अप्रूप होतं. त्या वेळेला अश्या पिशव्या नागपूरमध्ये मिळत नव्हत्या. मनात आले आपणही अश्याप्रकारच्या पिशव्या शिवून पाहायला काय हरकत आहे? मूळ स्वभाव धडपड्या काहीतरी सतत करत राहण्याचा. विचार शांत बसू देईना. मध्यंतरी नोकरी करायची नाही म्हटल्यावर घरात राहून काय-काय करता येईल विचार करतच होते. त्यापैकी शिवणकाम करता येण्यासारखे आहे, असे वाटून थोडं शिवणकाम शिकले. ते अल्पसं शिवणकामाचे शिक्षण व आजेसासुबाईंची मशीन ही पुंजी माझ्याजवळ होती. ती मिळालेली पिशवी उलटी-पालटी करून बघितली. कापड आणलं अन प्रयोग करून बघितला. पिशवी तर चांगली झाली पण त्यात खूप सफाई, सुबकता नव्हती. माझ्या दोन माम्या वर्षा व माधवी आठवले बाळंतविडा करून प्रदर्शनांमधून विकायला ठेवायच्या. त्यांना ती पिशवी प्रदर्शनांत ठेवायला दिली. प्रयोगच होता तो विकल्या जाईल की नाही, शंका होतीच पण ती विकल्या गेली अन मला काय आनंद झाला म्हणून सांगू? तो दिवस मी आजही आयुष्यात विसरू शकणार नाही. अन तो दिवस ठरला माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट! कुठल्या शब्दात सांगू समजत नाही मला खजिन्याची किल्ली म्हणा किंवा अल्लाउद्दिनचा जादुई दिवा सापडला म्हणा!
7123957935_9631955225_m.jpg7123957935_9631955225_m.jpg

मी: तर ही अशी तुमच्या व्यवसायाला सुरुवात एका पिशवीच्या विक्रीने झाली. पुढे इतका पसारा काय वाढला?

सुप्रिया: एक पिशवी तर विकल्या गेली. त्या आनंदात होते. पण सुबकता व सफाईदारपणाची उणीव मनात ठसठसत होती. जे करायचं ते उत्तम करायचं! आता त्यावर लक्ष केंद्रित केलं. सराव सुरू होता. जसं जसा सराव करत गेले तस तशी सफाई येत गेली. आणि मग मागे वळून बघितलंच नाही. हा व्यवसाय आता त्या बाळाच्या पिशवी पुरता मर्यादित राहिला नाही. त्या पिशव्यांमध्ये विविधता तर आणलीच त्याच बरोबर इतरही अनेक प्रकारच्या पिशव्या, बटवे, प्रवासी पिशव्या, ओटीचे बटवे साडी -ब्लाऊज, शर्ट-पॅंट कव्हर, जुन्या नवीन साड्यांच्या रजया अश्या अनेक वस्तू बनवायला सुरवात तर केली त्याबरोबर कापडापासून जे-जे काही म्हणून बनवता येऊ शकत ते ते सगळ्ळं मागणीनुसार बनवू लागले. हे सगळं मला घर सांभाळून एकटीने करणं शक्य नव्हतं मग मी काही काम दुसऱ्यांकडून करून घेऊ लागले. नवरा-मुलींकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून जेव्हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हाच मनाशी पक्कं ठरवलं होतं की घरी व्याप वाढवायचा नाही.

मी: कुठलीही गोष्ट करायची म्हणजे नोकरी असो वा व्यवसाय अडचणी ह्या असणारच त्यावर कशी मात केली? अपयश आलं का आणि त्याला सामोरं कसं गेल्या?

सुप्रिया: हो, अडचणी ह्या आल्याच. मुख्य अडचण होती ती म्हणजे 'विक्री'. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे विक्रीची सुरुवात झाली ती प्रदर्शनांमधूनच. महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदर्शन लागायचे. तिथे आठवले मामींच्या स्टॉलवर पिशव्या ठेवायला लागले. मुली लहान असल्यामुळे स्टॉलवर पूर्णवेळ देऊ शकत नव्हते. रविवारी स्टॉलवर जात असे. माझ्या जवळ मार्केटिंग स्किल नव्हतं. लोकांशी बोलायचं कसं हे माहीत नव्हतं. ते सगळं माझा नवरा संदीपने शिकवलं. मला शिकण्याची आवड असल्यामुळे व्यवसायाला लागणाऱ्या अनेक गोष्टी शिकत गेले. मी वाहन चालवायला शिकले. त्यामुळे स्वतंत्र व स्वावलंबी झाले. माझ्या दुसऱ्या मुलीचा रोशनीचा जन्म झाला त्या वेळेला मी बराच माल बाळंतपणापूर्वी बनवून ठेवला. पाय मशीन होती तिला मोटर बसवून घेतली. संसार म्हटलं की अडचणी ह्या असायच्याच. योग्य नियोजन व नवऱ्याची साथ असल्यामुळे खड पडला नाही. सुरुवातीला प्रदर्शनामधून विक्री होत असे पण कालांतराने प्रदर्शनांच स्वरूप बदललं. पूर्वी एका प्रकारच्या वस्तूचा एकच स्टॉल असायचा. ती पद्धत आता राहिली नव्हती. स्पर्धा वाढली. खप कमी झाला पण मी कश्याप्रकारचे काम करते हे लोकांपर्यंत पोहोचलं होतं. गिऱ्हाईक घरी येऊन आपल्या मनाजोगतं माझ्याकडून बनवून घेऊ लागले. हळूहळू मी प्रदर्शनांमधून काढता पाय घेतला. अपयश आलं ना! एका बाईने वेल्वेटची बॅग शिवायला दिली ती मला जमली नाही. माझ्या मशीनवर वेल्वेट शिवल्या नाही जात, तसं मी त्यांना सगीतलंही पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. प्रयत्न केला, फसला. आजही ती बिघडलेली बॅग जपून ठेवली आहे.

मी: तुम्ही जी एक खास 'बॅग' शिवता व ज्या बॅगमुळे मला तुमच्या बद्दल जाणून घ्यायची इच्छा, खूप उत्सुकता होती त्याबद्दल सांगा.

सुप्रिया: माझं बॅग आणि इतरही कापडी वस्तू शिवण सुरू होतं. प्रदर्शनांमधून विक्री होत होती. दुकानांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पण ते फारसं जमलं नाही. माझ्या मुली लहान होत्या. मी त्यांना घेऊन नागपुरातले नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ चोरघडेंच्या 'तारांगण वेल बेबी क्लिनिक' मध्ये लसीकरण किंवा नियमित तपासणी करिता जात असे. संदीप, माझ्या नवऱ्याचेही लहान असतानाचे तेच डॉक्टर. आमचे त्यांचे घरगुती छान संबंध होते. तिथे बऱ्याच स्त्रिया लहान बाळांकरिता लागणाऱ्या वस्तू, विक्रीसाठी ठेवत. मी त्यांना विचारताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला बॅग ठेवायला परवानगी दिली अन मी तिथे बॅग ठेवू लागले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डॉ अभय व डॉ राणी बंग दांपत्य गडचिरोलीत काम करतात. त्या भागात बालमृत्युचे प्रमाण खूप होते. त्याची कारणं शोधून काढण्याच्या कामाकरिता नागपूरमधून बरेच बालरोग तज्ञ जायचे त्यात डॉ चोरघडे पण जायचे. कुपोषित गर्भार स्त्रिया, अस्वच्छता व अंधश्रद्धा अशी अनेक कारणे बालमृत्युस कारणीभूत होती. आदिवासी समाजात घरीच बाळंतपण करतात. दगडांनी नाळ ठेचून काढतात त्यामुळे रोग व्हायचे अन बाळं दगावायची. त्याकरिता तिसरी - चौथी पास स्त्रियांना डॉ बंगने प्रशिक्षण दिले. नवीन ब्लेडने नाळ कापायला शिकवले. त्या भागात महिनाभरापर्यंत बाळांना कपडेच घातले जात नाही. तिथे इतकं दारिद्र्य आहे की अंगभर वस्त्र दुर्मिळच. बाळांना घालायला कुठून आणणार? हेही एक कारण असावं अन त्याचबरोबर अंधश्रद्धाही. हा सगळा भाग दाट जंगलाचा. इथे थंडीही खूप असते. त्यासाठी नवजात बाळांसाठी 'वार्मबॅग्ज' बनवायचा उपाय डॉ चोरघड्यांनी सुचवला. आता ह्या बॅग्ज बनवायच्या कुणी? डॉ चोरघडे काकांनी माझे नाव सुचवले. मी आणि काकांनी बसून त्या बॅग्जचे डिझाइन तयार केले. त्यावर बरेच प्रयोग केले, फेरफार केले अन शेवटी एक बॅग निश्चित केली. 'सर्च' ह्या संस्थेतर्फे ह्या 'वार्मबॅग्ज' नवजात बालकांना देतात. आता ह्या सगळ्या उपायांमुळे बालमृत्युचे प्रमाण घटले आहे. डॉ बंग जिथे जिथे जातात तिथे ह्या बॅग्ज घेऊन जातात. माझी म्हणण्या पेक्षा आमची ही बॅग अनेक राज्यांमध्ये वापरतात. आता आम्ही त्या बॅग्जच्या डिझाइनचं पेटंट करण्यासाठी अर्ज केला आहे. तसेच 'सर्च'मध्ये बऱ्याच कार्यशाळा/शिबीरं होत असतात. त्याकरिता शिबिरार्थींसाठी 'सर्च'चा लोगो असलेल्या पिशव्या बनवते. अशी ही एकप्रकारे समाजसेवेची संधी मला मिळाली. सामानाची गुणवत्ता, माफक किंमत व वक्तशीरपणा यामुळे 'सर्च' ही संस्था माझे नाव सुचवू लागली. भारताच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये माझे सामान जाऊ लागले. इतर बॅग्जमधून मला आर्थिक मिळकत होते आणि 'सर्च'च्या कामामधून मिळकत होते ती आत्मिक समाधानाची!

मी: फावल्या वेळातले काय करता?

सुप्रिया: तसा खरं तर वेळ मिळतच नाही. माझ्याकडे कुठल्याचं कामाला बाई नाही. सगळ्या कामांसाठी यंत्र आहेत अगदी भांडी घासण्याचं सुद्धा. वाचायला आवडतं तसेच वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतं. गाणं आवडत. शाळेत असताना गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत. शाळेत असताना गाणारी सुप्रिया म्हणूनच ओळखल्या जायची. आता फक्त ऐकत असते. दिवसभर रेडिओ चालू असतो. माझ्या मुली 'परांजपे' शाळेत होत्या. दरवर्षी शाळेतर्फे आनंद मेळावा भरायचा. तिथे मी नेहमी जात असे. तिथे बालसदनामधील मुलांचाही स्टॉल असायचा. तिथे त्यांनी शिवलेल्या काही पिशव्या विक्रीसाठी ठेवलेल्या असायच्या पण त्या पिशव्यांमध्ये विविधता नव्हती. मला कळलं की त्यांना तिथे योग्यरितीने शिकवणारं कोणी नाही. मला जे येतं ते त्यांना शिकवावं वाटलं आणि संध्याकाळी तिथे मी निःशुल्क शिकवायला जाऊ लागले. आता तिथल्या काही मुलांची शिकवणी पण घेते. बालमंदीर संस्था, धरमपेठ, नागपूर द्वारा संचलित बालसदनामध्ये अठरा वर्षांपर्यंत मुलांना ठेवतात. त्यांना सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यात माझा हा अल्पसा सहभाग.

मी: श्रेय कोणाला द्याल?

सुप्रिया: सर्वप्रथम श्रेय देते ते माझ्या नवऱ्याला, संदीपला! संदीपची मदतीशिवाय मी काहीच करू शकले नसते. आजपर्यंत सातत्याने तो मला मदत करत आला आहे. त्यानंतर डॉ चोरघडे ह्यांना ज्यांच्यामुळे 'सर्च' सारख्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेशी जोडल्या गेले. आता मुली मोठ्या झाल्या आहेत त्याही मला सर्वतोपरी मदत करत असतात.

मी: आता ह्या क्षणी काय वाटत? भविष्यातील योजना काय?

सुप्रिया: एकच वाटतं, तंत्रशुद्ध शिवणाचं शिक्षण घेतलं असतं तर अजून चांगलं काम झालं असतं. भविष्यातील भव्य दिव्य अश्या काही योजना नाहीयेत. हे असंच सगळं चालून देत. मी जे करतेय त्यातून खूप आनंद, समाधान मिळतंय. मुलींनी आपल्या आवडी, इच्छेनुसार करियर करावं. माझं काम पुढे चालू ठेवलं पाहिजे अशी जबरदस्ती नाही. मी मात्र माझ्यात बळ आहे तोपर्यंत 'सर्च'चं कामं व बालसदनचं काम करत राहण्याची इच्छा आहे.

तुमच्या इच्छापूर्तीसाठी ईश्वर तुम्हाला स्वस्थ, दीर्घायुष्य देवो!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आणि मस्त मुलाखत......... Happy

मंजु अशाच मुलाखत घेत रहा आणि आह्मी वाचत राहु..... Wink

सुप्रिया ला अभिनंदन आणि शुभेच्छा....... Happy