अहो, ऐकलंत का!

Submitted by मामी on 6 June, 2012 - 23:57

स्थळ : एका मध्यमवर्गीय घराचा दिवाणखाना.
काळ : चालू म्हणजे सांप्रतकाळ.
पात्रं : एका मध्यमवर्गीय घराच्या दिवाणखान्यात योग्य अशी - वडिल (वय वर्षे ५० च्या आसपास), मुलगी (वय वर्षे २५ च्या आसपास), मुलगा (वय वर्षे २५ च्या पुढे आणि बहिणीपेक्षा २ वर्षांनी मोठा), आई (नवर्‍यापेक्षा बरोबर ५-६ वर्षांनी लहान).
वेशभुषा : एका मध्यमवर्गीय घराला आणि काळाला योग्य अशी - वडिल, मुलगा शर्ट्-प्यांटीत. आई - पंजाबी ड्रेसात, मुलगी - जीन्स-टॉप मध्ये.
वातावरण : हां इथेच मेख आहे. बाकी सगळं एकदम चपखल आहे ना? चौकोनी कुटुंब, आईवडिलांची योग्य वयात लग्न झालेली, दोन मुलांत नेमकं दोन वर्षांचं अंतर, मोठा मुलगा आता नोकरी स्थिरावलाय, मुलगी नुकतीच नोकरीला लागलेय. आता जरा मुलांच्या जबाबदारीतून बाहेर पडतोय असं आईवडिलांना वाटत असतानाच त्यांच्यावर दुर्दैवाची कुर्‍हाड कोसळलेय. कशी ते कळेलच ....

************************************************

वडील : आदित्य काय ऐकतोय मी हे? आताच आईनं सांगितलं मला. हे नस्ते थेर माझ्या घरात चालायचे नाहीत. आपल्या घराण्याचे संस्कार कुठे आणि तुझं हे थिल्लर वागणं कुठे. खबरदार, हा विषय पुन्हा या घरात निघाला तर.

आई : अहो, ऐकलंत का!.....

वडील : तू एकदम गप्प बस. तु दिवसभर घरात असतेस. तूच त्याच्यावर संस्कार करायला कमी पडलीस. नाहीतर देशपांडे घराण्यात असला चवचालपणा कोणी करूच शकणार नाही. मुलांवर नीट लक्ष ठेवायला होतं काय तुला?

मुलगा : बाबा, यात आईचा काय दोष? आणि माझातरी काय दोष? प्रेम काय ठरवून केलं जातं का? मी सांगतोय ना, एकदा तुम्ही सायलीला भेटा. फक्त जात वेगळी आहे म्हणून काय झालं? बाकी स्वभाव बघा, हुशारी बघा. अहो, बाबा, माझ्याच बॅचची आहे पण माझी बॉस आहे ती. किती धडाडी आहे तिच्यात!

वडील : घ्या! अजून एक. तुझ्याच एवढी शिकूनही तुझ्यापुढे गेलेय? म्हणजे उद्या आमच्या डोक्यावर मिर्‍या वाटणार की ती! नाकापेक्षा मोती जड होईल. पन्नासच्या वर पावसाळे पाहिलेत आम्ही. केस काही उन्हात नाही पांढरे केलेत.

आई : अहो, ऐकलंत का! .....

मुलगी : बाबा, मी भेटलेय सायलीला. मस्त मनमोकळी आणि गोड मुलगी आहे ती. मला वहिनी म्हणून एकदम पसंत आहे. तुम्ही आदित्यला लग्नाची परवानगी द्यावी असं मला वाटतं. म्हणजे माझाही मार्ग मोकळा होईल.

वडील : असल्या जातीबाहेरच्या सुना घरात आणण्याची देशपांडे घराण्याची पध्दत नाही. आमच्या घरात रहायचं असेल तर मी सांगेन तसंच झालं पाहिजे. नाहीतर घराचे दरवाजे उघडे आहेत. पण लक्षात ठेव तुझ्या निर्णयावर तू ठाम असशील तर तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो. तुझ्या नावानं आंघोळ करून मोकळा होईन मी. अस्सल देशपांड्यांचं रक्त आहे माझ्यात! आणि खबरदार तू आमचं नाव लावलंस तर. एकदा का या घराबाहेर पडलास तर आमच्या घराण्याचं नाव लावायचं नाही आधीच सांगतोय! माझ्याशी गाठ आहे.

मुलगा : (वैतागून पण ठामपणे) हे बघा तुम्ही असला तमाशा करणार असाल तर मला रहायचंच नाहीये इथे. मी चाललो. आणि हो, तुमचं नावही लावणार नाही बरं. तुमच्या नावाच्या कुबड्यांची मला गरजच नाहीये. मी माझं नाव बदलून पांडे करणार आहे. चल ग, आदिती. तू पण चल. मला घराबाहेर काढतायत, तर तुला तर नक्कीच काढतील.

वडील : का? तिला का घराबाहेर काढेन? (संशय येऊन) आणि तू मगाशी काय म्हणालीस ... तुझाही मार्ग मोकळा होईल? का? (डोक्यात प्रकाश!) म्हणजे??????? तुही तुझं लग्न जमवलंयस की काय???? (बायकोकडे वळून प्रचंड रागानं) हे मला का नाही सांगितलंस??????

आई : मलाही कुठे माहित होतं. पण ऐकलंत का .....

वडील : एकदम गप्प बस. (मुलीकडे वळून) आणि तुम्ही काय दिवे उजळलेत ते ही सांगा. घर सोडायला लागणार म्हणजे तुम्हीही जातीबाहेर शोधला असणार ...

मुलगी : बाबा तो एक साऊथ इंडियन आहे. तुम्ही ओळखता त्याला. आजारी पडलो की आपण त्याच्याकडूनच औषध आणतो की!

वडील : (थयथयाट करत) म्हणजे तो डॉक्टर. हे राम, असला दिवस दाखवण्याआधी देवानं मला वर का नाही बोलावून घेतलं. चालते व्हा तुम्ही दोघं आताच्या आता. आम्हाला मुलं झालीच नाहीत असंच मी आणि तुमची आई समजू...

आई : अहो, ऐकलंत का ....

वडील : तू एकदम गप्प बस.

आई : बास झालं सारखं गप्प बस, गप्प बस. इतकी वर्षं तुमचं ऐकत, घराण्याची इज्जत, जातीचं मोठेपण ऐकत राहिले तेच चुकलं. आज माझ्या मुलांना जर घराबाहेर काढणार असाल तर मीही त्यांच्याबरोबर घराबाहेर पडणार. पण त्याआधी इतकी वर्षं एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही ती सांगून जाणार आहे.

वडील : खुश्शाल जा तूही. मी एकटा राहीन. देशपांड्यांच्या घराण्यात कोणीही कितीही मोठ्या संकटाला भीत नाही, समजलीस. अस्सल देशपांडे रक्त खेळतंय माझ्या अंगात!

आई : तेच सांगायचंय. सासूबाईंनी त्या मृत्युशय्येवर असताना मला ही गोष्ट सांगितली. इतके दिवस मी ती माझ्या मनात ठेवली होती. आता वेळ आलीये की तुम्हालाही हे कळलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या आईवडीलांचा सख्खा मुलगा नाहीत.

वडील : आँSSSSS

आई : आणखी ऐका ..... सासूबाईंना मूल होत नव्हतं. त्याच काळात तुमच्या वडीलांची बदली मध्यप्रदेशात झाली होती. तिथे तुमच्या वडिलांचं एका स्त्रीशी प्रेमप्रकरण झालं होतं. पुढे त्या बाईला मुलगा झाला. तोच तुम्ही. कोणालाही न कळवता गुपचूप त्या मुलाला सासूबाईंनी आपला मुलगा म्हणून वाढवला. म्हणूनच तुम्ही एकुलते एक राहिलात कारण त्यानंतर पुन्हा तुमचे वडील इथे परत आले.

वडील : (मटकन खुर्चीत बसत) काय सांगतेस हे ..... भयानक आहे हे सगळं .....

आई : आणखी ऐका ..... ती स्त्री मुसलमान होती!!!!

वडील : (झीट आल्याने बोलण्याच्या पलीकडे ......)

गुलमोहर: 

छाने. Happy
(आमच्या नात्यातल्या एका कुटुंबाची आठवण झाली. कुटुंबातल्या चारही मुलींनी परप्रांतीय / परधर्मीय मुलांशी प्रेमविवाह केले, ते देखिल वडिल जमदग्नीचे अवतार असताना)

पण नाटकाचा एक प्रवेश लिहिण्याऐवजी एखादी सविस्तर कथा का नाही लिहिलीस?

mast!!:D

मामी, सणसणीत दिलीत एकदम. म्हणजे आम्हि इकडे विचार करतोय अजुन की कसा प्रतिसाद द्यावा, आणी तुम्हि प्रवेश लिहुन मोकळ्या. मस्तच आहे.

मामे... बरं झालं २४/३२ असा काही आकडा टाकला नाहीस, नाहीतर त्यावर पण मालिका यायची, माझे २४/३२
आंतरजातीय टिंब टिंब टिंब.. म्हणून.

याला अन्य कुठल्या बाफवरच्या चर्चेचा संदर्भ आहे का? Uhoh
तसं असल्यास माझा आधीचा प्रतिसाद डिलीटते, झालं !!!

मामी,

>> पात्रं : एका मध्यमवर्गीय घराच्या दिवाणखान्यात योग्य अशी - वडिल (वय वर्षे ५० च्या आसपास),
>> मुलगी (वय वर्षे २५ च्या आसपास), मुलगा (वय वर्षे २५ च्या पुढे आणि बहिणीपेक्षा २ वर्षांनी मोठा),
>> आई (नवर्‍यापेक्षा बरोबर ५-६ वर्षांनी लहान).

बापाचं वय धरूया ५० वर्षे. मुलगी २५ वर्षाची. मुलगा तिच्यापेक्षा २ वर्षांनी मोठा म्हणून २७ वर्षांचा. बायको नवर्‍यापेक्षा ६ वर्षांनी लहान म्हंजे ४४ वर्षांची.

तर बायकोला मोठा मुलगा झाला तो ४४ - २७ = १७ व्या वर्षी.म्हंजे तिचं लग्नं झालं १६ व्या वर्षी.

बालविवाहाचा णिशेद !!! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

नवर्‍यापेक्षा बरोबर ५-६ वर्षांनी लहान<<< मोठीही असूच शकते.

बाकी मामे... काही म्हण अस्सल देशपांड्याचं रक्तच ते. आई कोणी का असेना काय फरक पडतो? गोत्र, जात, धर्म एकदम अस्सल देशपांडेच की.... उगाच सादर समर्पित केलंस बघ! Wink Proud

गामा, या मुद्द्यावर विचार करूनच मी लिहिलेले आहे. आसपास हा शब्द म्हणूनच योजला आहे.

वडील पन्नासच्या आसपास वय : ५२-५३ वर्षे
आई : ४६-४८ वर्षे
मुलगी : २४-२५ ची
मुलगा : २६-२७ चा
= आईचं लग्नाच्या वेळचं वय : ४६-२८ = १८ वर्षे (worst case scenario)
किंवा ४८-२७ = २१ वर्षे

तसदी घेतल्याबद्दल धन्यवाद. एनीवे, लेखाचा मूळ उद्देश लक्षात आला असेलच. Happy

मस्तच Biggrin
तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो. तुझ्या नावानं आंघोळ करून मोकळा होईन मी. अस्सल देशपांड्यांचं रक्त आहे माझ्यात! आणि खबरदार तू आमचं नाव लावलंस तर. एकदा का या घराबाहेर पडलास तर आमच्या घराण्याचं नाव लावायचं नाही आधीच सांगतोय! माझ्याशी गाठ आहे.>>>>>>>> कॉपी पेस्ट केलत का? Happy Wink

मामी,

>> लेखाचा मूळ उद्देश लक्षात आला असेलच.

आला हो! खोड हुडकायची जित्याची खोड आहे म्हंटलं आमची!! Wink

आ.न.,
-गा.पै.

Lol भारी. देशपांडे घराणं म्हणजे बाजीप्रभू देशपांडे तर नव्हे? तेवढेच एकच कुणाला ' न भिणारे' आठवले Proud

आता तू वडिलांचं वय ५० च्या आसपास म्हटल्यास बोलणंच खुंटलं नाहीतर वडिलांनी ५० च्या वर पावसाळे कसे पाहिले अशी शंका आली होती Wink

देशपांडे गडावर चढण्याआधीच बायकोने पुरते दोर कापले ग.... अरारा.......

घात झाला

>> अरे दोर कापले नाही (पाच नाहित पण) तीन तोफा डागल्या (बायको मुलगा आणि मुलीने)

Pages