कोर्पोरेट कथा- लढाई....

Submitted by मोहन की मीरा on 5 June, 2012 - 07:00

" नको रे कटकट करूस !!! माहिती आहे ना आज....." मीनल चं वाक्य पुर न करू देता रुची म्हणाली.
"सोमवार आहे !!!!" .

नेहेमी प्रमाणे अजित आणि रुची च्या खाणाखुणा झाल्या. आणि दोघे फिसफिसायाला लागले.

" मार देईन हा दोघांना !!! खा आता पुढ्यातल. आणि मादाम तुम्ही. लक्षात ठेवा की आपल्याला एक घर आहे. सुट्टी असली तरी घरातच राहायचं. सगळ जग उंडारत फिरायचं नाही. "

" ए आई, घे ना कलटी ... बाबा काय बोर आहे हो तुमची बायको. आज १० दिवसांनी ही ऑफिस ला जाते आहे आणि आमच्या डोक्याला ताप. "

बाबा काय लगेच तत्परतेने हासला. " मिनू डियर शांत हो पाहू. खूप दिवसांनी ऑफिसला जाते आहेस ना, मग शांत डोके ठेव. "

आपली आवरा आवरी करताना मीनल च्या डोक्यातून हा विचार जात न्हवता. १० दिवस म्हणजे खूप सुट्टी झाली ह्या वर्षी. पण आता परदेशी सुट्टी वर जायचे म्हणजे ८-९ दिवस लागायचेच. ह्यावेळेला तर तिच्या बहिणी कडे फ्रांस ला गेले होते. १० दिवस मस्त मोकळे गेले होते. तनुजा, तिची बहीण, तिचा नवरा राजेश आणि छोट पिल्लू आयुष, ह्यांच्या बरोबर अगदी मस्त दिवस गेले होते. अजित पण खूप फ्रेश झाला होता. रुची तर काय, स्वर्गातच होती. तिकडची हवा, निसर्ग सगळ मनात ताजं होत.
मोठ्ठ्या सुट्टी वरून ऑफिस ला जायचं म्हणजे तिला शिक्षाच वाटायची. अजितच बरं होतं तो स्वत: बॉस असल्याने त्याला काही चिंता न्हवती. पण मीनलच तसं न्हवत. तिच्या ऑफिस मध्ये खूपच राजकारण होत.

मीनल ने एक सुस्कारा टाकला.

ऑफिस ची तयारी करताना तिच्या मनात आज काय होईल ह्याचाच विचार होता. आरशात पहाताना ती सवयीने आवरत होती. अजित ने मागून मिठी मारली, तेंव्हा ती दचकलीच.
"अरे... हे काय..... रुची पाहिलं ना !!! आपण फ्रांस ला नाहीत भारतात आहोत "
" अं.... अस काय ग!!! रुची केंव्हाच खाली गेली तिच्या आजी कडे. आणि माझं म्हणशील तर मी अजूनही फ्रांस लाच आहे. तिकडच्या थंडीत, तू जवळ... आणि."

" बास. पुरे!!!. महाराज मला जायचं ऑफिस मध्ये. जाऊ ना ??"

" नको जाऊ. "

"ए, चल्ल, अज्या. चल तिकडे हो."

" काय म्हणालीस अज्या? खरच मीनू एकदम कॉलेज मध्ये असल्या सारखं वाटतंय. "
मीनल एक मिनिट हरखून गेली. ते सोनेरी दिवस. .....

" ए बाबा मला खरच जाऊ दे. नाहीतर तिकडे आग लागेल. "

" मीनल, तू बँकेत ब्रान्च ला होतीस ना तेंव्हाच बरं होतं. आमच्या वाटेला तरी यायचीस. आज काल ह्या कॉर्पोरेट लोन ला आल्या पासून तू आम्हाला मिळण मुश्कील झालाय." अजित कौतुकाने म्हणाला. डोळ्यात आपल्या कर्तुत्ववान बायकोचा अभिमान भरलेला होता.

मीनल आणि अजित, एकमेकांना कॉलेज पासून ओळखायचे. अजित तिच्या पेक्षा एका वर्षाने मोठा. तो म्हणजे गाणे बजावणे, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा ह्यात गुंतलेला. आणि मीनल एकदम अपोझिट. अभ्यासू, पहिली येणारी. त्या मुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं तेंव्हा अनेक मुलींची हृदयं तुटली. कारण अजित वर फिदा असणार्‍या खूप जणी होत्या.

कॉलेज नंतर अजित ज्वेलरी डीझायनींगचा कोर्स करायला लंडन ला गेला, त्याला घराच्या सोन्याच्या व्यवसायातच पुढे जायचे होते. त्या तीन वर्षात मीनलने फायनान्स मध्ये करीअर करायची ठरवली होती. त्या प्रमाणे तिने एम.बी.ए. करून एका बँकेत नोकरी पकडली. अजित आल्यावर घरच्यांच्या संमती ने त्यांनी लगेच लग्न पण केले. सुरुवातीच्या जबाबदार्या पार पाडताना, दोघांची आपापली घोडदौड पण चालू होती.
अजित ने घरगुती पेढीला आधुनिक अवतार घालायचा चंग बांधला होता. नवी तंत्र, नव्या क्लुप्त्या वापरून, त्याने बघता बघता व्यवसायात पाय रोवला. एकाची दोन दुकानं झाली, दोनाची चार. आज त्यांच्या सोन्याच्या दुकानांच्या मुंबई, पुणे, बंगलोर आणि दुबई मिळून सात शाखा होत्या. अजित त्याच्या क्षेत्रात खूपच नाव कमावून होता. त्याचे आई वडील त्यांच्याच कडे राहायचे. जसा व्यवसायात जम बसला, तसा अजित ने त्याच इमारती मध्ये अजून दोन ब्लॉक घेऊन, आपल्या आई वडिलांची वेगळी सोय लावून दिली. म्हंटल तर एकत्र म्हंटल तर वेगळ.
मीनल तिच्या नोकरीत नव्या नव्या क्षेत्रात पुढे जात होती. खूप हुशार आणि मेहेनती असल्याने कायम बढती साठी तिचे नाव पुढे येत राहिले. घराची, रुचीची जबाबदारी सासुबाईन्नी समर्थ पणे सांभाळली. मीनल ला प्रगतीत काहीच अडथळे न्हवते. पहिले ब्रान्च लेव्हलला आणि नंतर कोर्पोरेट लेव्हलला ती कायम पुढे जाताच राहिली. तीचं काम म्हणजे तिचा श्वास झाला. आता तर ती लोन विभागात महत्वाच्या पदावर विराजमान होती. नव्या जबाबदार्या, नवी आव्हाने.

कधी कधी नको जीव व्हायचा. मुख्य करून राजकारणामुळे. पण तरीही, पुढे जायची आस होतीच. अजित चा दृष्टी कोण एकदमच वेगळा होता. त्याची समस्येकडे बघण्याची दृष्टीच वेगळी होती, कारण त्याची आव्हाने वेगळी होती. पण मीनल चे तसे न्हवते. मुळात विषयाच्या खोलात जाण्याचा स्वभाव असल्याने, तिचा विचार वेगळाच असायचा. अजित अनेकदा तिच्या ह्या वृत्तीचे कौतुक करायचा. तिने घराच्या बिझनेस मध्ये लक्ष घालावे असे त्याला फार वाटायचे. पण तिची बाहेरील स्वतंत्र कामगिरी पाहून तो भारावून जायचा. आपण तिला घराच्या बिझनेस मध्ये ओढून तिच्या हुशारीवर अन्याय तर करत नाहीना असे त्याला नेहेमी वाटायचे.

आता ही ऑफिसला जाताना मीनल हाच विचार करत होती.

नेहेमी प्रमाणे रिसेप्शन वरच्या पीरोजाने तिला मनापासून गुड मोर्निंग म्हंटले. मीनल परत माणसात आली. तिनेही हसून अभिवादन केले. आपल्या केबीन कडे जाताना अनेकांनी तिला विष केलं. मल्होत्रा तर नेहेमी प्रमाणे मिठी मारायला आली. सगळेच मिनलच्या सुट्टी बद्दल ऐकायला उत्सुक होते. तिच्या केबीन मध्ये मैफील जमली. तिने आणलेली चॉकलेट्स खाता खाता सगळे तिच्या फ्रांस च्या कथा ऐकत होते. हळू हळू गर्दी पांगली. फक्त ती आणि तिची asistant विदुला उरली.
" बोल विदुला, कसं काय आहे इकडे. एनी प्रोब्लेम."

" नो नो . नॉट at all . सगळं ठीक आहे."

" अग मग तुझ्या चेहेर्‍याला काय झालं? "

" मॅडम... तुम्ही नसताना मिश्राजी इथे फार वेळा यायचे. .... म्हणजे काय कधी कधी ठिय्याच मारायचे."

" अस्स. काय काय म्हणायचा तो."

" म्हणजे... खूप काय काय चौकशा, फायली तपासणे... बरेच उद्योग. बर स्वत: जी.एम. नी सांगितल्या मुळे मी काहीच विरोध करू शकले नाही."

" जी.एम. स्वत: !!! " मीनल विचारात पडली.

तेवढ्यात फोन वर जी.एम च्या सेक्रेटरीचा फोन आला.
" मॅडम यु आर कॉल्ड बाय बॉस."

" मी जरा जाऊन येते विदुला, तो पर्यंत तू गेल्या १० दिवसातल्या लोन sanctions आणि disbursement ची लिस्ट काढून ठेव. मला बघायची आहेत."

विदुलाने त वरून ताकभात ओळखला. ती तिच्या मॅडमला चांगली ओळखत होती. आता मिश्राचा गेम करायला मॅडम आली होती. तिला अगदी बर वाटलं. गेल्या १० दिवसात मिश्राने तिला जाम पिडलं होत. नको नको ते प्रश्न आणि फायली उपसून त्याने तिला जेरीस आणलं होतं. रोज उशीरा पर्यंत थांबवून ठेवलं होतं.

"मे आय काम इन सर " मीनल ने जी.एम च्या केबीन मध्ये डोकावताना विचारले.

" ओह मिसेस पाठक, प्लीज काम इन. " जी एम आदराने म्हणाले.

आत मिश्रा ठिय्या देवून होताच. तिला बघून त्याने दात विचकले. मीनल ने दोघां पुढे चॉकोलेट्स ठेवली.

" गुड मॉर्निंग सर. मै मिश्राजीके लिये भी लायी. मुझे पता था वोह भी यहां मिलेंगे. " ती सूचक हसली.

जी.एम आणि मिश्राची नेत्र पल्लवी झाली.

" आय होप युवर ट्रीप वाज नाईस. लेट्स टोक बिजनेस नाऊ. " जीएम एकदम मुद्द्यालाच आले.

नंतर च्या आर्धा तासात, मीनल समजून चुकली की तिने जी लोन प्रपोझाल्स "अपूर्ण" किंवा " नॉट सुटेबल" ठरवली होती ती सगळी गेल्या १० दिवसात पास झाली होती. त्या वरचे रिमार्क ओके करून त्या पास करण्यात आल्या होत्या. आता तिचा सेक्टर मिश्रा पहाणार होता. आणि तिच्या कडे तुलनेने कमी महत्वाचा सेक्टर आला होता. आता ती फक्त लोन अनालिसिस करणार होती, पण पासिंग आणि त्या साठी लागणार्या बाबी पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र मिश्रा कडे आली होती. त्यात बोर्ड मीटिंग आणि इतर सगळच आलं. म्हणजेच तिचं काम फक्त रिपोर्ट देण्या पुरत मर्यादित ठेवण्यात आल होतं. तिचा कस्टमरशी संबंध येणारच न्हवता. थोडक्यात तिचे हात पूर्ण पणे बांधले गेले होते.

मीटिंग झाली. तिने चेहेर्यावर काहीच दाखवले नाही. मिश्राने तिच्या चेहेर्‍यावर नाराजी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती खूपच शांत होती.

आपल्या केबीन मध्ये आल्यावर मात्र तिने अश्रुंना वाट करून दिली. काय कमावलं आपण इतकी वर्ष? हा कोण कुठला माणूस येतो आणि एवढे चांगले जीएम पण त्याच्या बाजूचे होवून जातात? का पण? का का? शोधलच पाहिजे कारण. गप्प बसायचं नाही. वेळ पडली तर मेन ऑफिस ला दिल्ली ला जाऊ.
की जाऊ दे हे सगळ? सोडून देऊयात ही नोकरी ? घराचा बिझनेस आहेच? कशाला ह्या फालतू लोकांची मग्रुरी सहन करायची? पण का? का म्हणून मी ह्यांचा बेत सफल होऊ देऊ!!! नाहीच देणार !!! मी फाईट करणारच!!!!

कॉफीच्या कपातील कॉफी पोटात गेल्यावर मीनल शांत होऊ लागली. तेवढ्यात विदुला तिला हवा तो रिपोर्ट घेऊन आली. मीनल चा अंदाज खरा ठरला. अनेक प्रपोझाल्स जी वरच्या लेव्हल ला डिस्कस व्हायला हवी होती, ती जीएम लेव्हलालाच ओके झाली होती. काही प्रस्तावांवर चर्चा आणि अजून कागदपत्रे हवी होती, ती पूर्तता करून घेऊन घाई घाईने लोन पास झाली होती. एकंदर सगळी रक्कम साधारण पणे ३०० कोटीच्या घरात जात होती. त्यात काही काही प्रस्ताव तर बँकेच्या धोरणाच्या पूर्ण विरुध्ध होते. त्यांची बँक ही अतिशय सावध आणि थोडी चिकित्सक म्हणून प्रसिध्द होती. ही बँक कधीही जमीन खरेदी साठी लोन देत नसे. किमान पैसे देताना आधी बिल्डर ने जागा/ जमीन खरेदी केलेली आहे, ह्याची खातरजमा करूनच लोन देत असे. असे प्रस्ताव सरळ दिल्ली ला पाठवायचे आदेश ह्यांच्या रीजन ऑफीस ला होते. त्या प्रमाणे जायच्या आधी मीनल ने तसे शेरे त्या प्रपोझल्स वर दिले होते. तरीही, ती लोन्स फक्त १० दिवसात जीएम लेव्हल लाच पास झाली होती.

मीनल ने विदुला कडे त्याच्या फायली मागवल्या. आश्चर्य म्हणजे मीनल च्या नोट्स गायब झाल्या होत्या. आता मात्र मीनल सावध झाली. हे प्रकरण वाटतं तेवढं सोप्प नाही. ह्यात नक्कीच जीएम पण गुंतले आहेत. सावध पणे पावलं टाकायला पाहिजेत. मीनल ने नजरेत न येता काम करायचं ठरवलं.
पहिले तर सगळ्या फायली मिश्राला दिल्या. नीट सगळं handover केलं. मिश्रा तिच्या प्रतिक्रियांवर बारकाईने नजर ठेवून आहे हे तिने ओळखले.
मीनल खूप सावध पणे काम करत होती. पुढला महिनाभर तिने काहीच हालचाल केली नाही. एकदम गप्प राहिली. मिश्रा निर्धास्त झाला.
घरी देखील तिचा अस्वस्थ पणा तिने खूपच लपवला. पण अजितच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटला नाही. अजित आपल्या बायकोला चांगला ओळखून होता. तिचा शांतपणा हा किती भयानक असू शकतो हे त्याला माहित होते.
एका शनिवारी त्याने तिला जेवण झाल्यावर समुद्रावर फिरायला जाऊ, असे सांगून बाहेर काढले.

"मीनू, काय झालाय?"

"कुठे काय? मस्त आहे की मी!!"

" मीनू तुला गेली २२ वर्ष ओळखतो आहे. तू १८ वर्षांची शेंबडी होतीस ना तेंव्हा पासून!! तुझ्या चेहेर्‍या वरची नस जरी हलली ना तरी मला कळतं. काय झालाय सांग बघू!!!"

ही गोळी मात्र लागू पडली. बांध फुटल्या सारखी मीनू बोलत सुटली. त्याने तिचं पूर्ण ऐकून घेतलं. त्याला एकंदर परिस्थिती समजली.

" अगं सगळीकडेच भ्रष्टाचार असतो. तू किती पहाणार. किती मनाला लावून घेणार. आज तू इकडे आहेस, कधी न कधी तुझा रोल बदलणारच ना. "

" अजित, अरे पण हे सगळ एका फ्रॉड च्या दिशेने वाटचाल करत आहे. आत्ता जिथे घोटाळा वाटतो आहे ते प्रस्ताव छोट्या रकमेचे आहेत. पण ह्यानेच काळ सोकावणार आहे. तेच घातक आहे. मी तिथे असताना हे होवू देणार नाही. पण एक नक्की की मिश्रा ने जीएम ना भरीला पाडलं आहे. पैश्याचं अमिश भल्या भल्यांना चक्रावून टाकतं. त्याचा नक्कीच दिल्लीत कोणीतरी हस्तक असणार. नाहीतर एवढं धाडस त्याला शक्य नाही."

अजित ला आपल्या बायकोचा स्वभाव माहित होता. तो जाणून होता की ती घेतलेलं काम पुरं केल्या शिवाय रहायची नाही. त्याने तिच्या खांद्यावर थोपटले.

मीनल एकदम सावधगिरीने काम करत होती. एकदा तिला एक फोन आला.
"मीनल मॅडम, मी सुनंदा गुप्ते बोलते आहे. आधुनिक बिल्डर मधून. आपली वेळ मिळू शकेल का भेटी साठी. आम्हाला एका प्रस्तावावर चर्चा करायची आहे."

" मिस गुप्ते, प्रस्ताव आणि त्याची चर्चा हे काम आजकाल मी. मिश्रा पहातात. तुम्ही त्यांना contact करा."

" नाही मॅडम, त्यांच्याशी बोलण झालाय. तुम्ही पूर्वी हे काम करायचात असे आम्हाला कळले. आम्हाला तुमच्याशीच बोलायचे आहे."

मीनल चक्रावली. आणि सावधही झाली. तरी तिने काय प्रकार आहे बघायचे ठरवले. तिने त्यांना दुसर्‍या दिवशी दुपारची वेळ दिली.

मधल्या काळात तिने त्यांच्या ग्रुप चा पूर्ण अभ्यास केला. आधुनिक बिल्डर एक विकासक होते. अनेक ठिकाणी त्यांच्या निवासी संकुलांचे काम चालू होते. ठीक ठिकाणी त्यांच्या जमिनी होत्या. बांधकामाचा फारसा चांगला रिपोर्ट नसला तरी एकंदर सुविधा, शाळा आणि इतर शोबाजी असल्याने त्यांची घरे धडाधड विकली जात. त्यांचा फायानंशियाल रिपोर्ट फारसा बरा न्हवता. क्रिसिल ने त्यांना "बी" रेटिंग दिले होते. ( क्रिसिल ही आर्थिक बाबी तपासणारी अग्रगण्य संस्था आहे. कुठलेही लोन देताना त्यांचा/किन्वा तशाच एखाद्या कम्पनीचा रिपोर्ट घेणे हे लोन धारकाला बंधनकारक असते. हे आर.बी.आय ने ठरवलेले बंधन आहे) ह्याचाच अर्थ ही कंपनी काही फारशी चांगली आर्थिक परिस्थिती वाली न्हवती.
हा अभ्यास आधीच केल्या मुळे मीनल त्यांच्या भेटी साठी सज्ज झाली.

ठरलेल्या वेळी मिस गुप्ते आणि तिचा बॉस मी.पटेल आले. पटेल पक्का बनेल वाटत होता. गुप्ते मात्र त्या मानाने नवी होती. पटेल बोलायला लागला.
"मॅडम काय हाये की, आम्ही एक प्रपोझल दिला होता. ते तुम्ही सुटी वर होते ना तवा. ते मिश्राजी होते तवा. …ते…ते मॅडम खूप जास्त भाव सांगते."

"भाव कसला भाव? इंटरेस्ट तर तुमचा क्रिसिल रिपोर्ट असेल त्याच प्रमाणे बसेल ना !!! त्यात मिश्रा काय करणार."

पटेल आणि गुप्ते एकमेकां कडे बघायला लागले.

पटेल म्हणाला, " मादाम तो भाव नाही. इंटरेस्ट तर बघून घेयाल. पण ते प्रपोझल तुमच्याच लेव्हल ला करून घ्याना. मी मिश्राला बोलला होता की तुमचा काय असेल तर पटवून टाकेल. पण ते प्रपोझल तेवढा करून टाकाच. तुम्ही तर तेला येवढा सिनियर. मंग तुमची वट इकडे चालणारच ना. आमचा विरारला प्रोजेक्ट हाय तेच्यामंदी काय वन बी एच के चा तुमचा बघून टाकू. बघा मॅडम विचार करा. ही छोकरी तुमच्या कडे येईल दोन दिवसा पछी. तेला काय ते फायनल जवाब द्या. "

पटेल चे शब्द मिनलच्या कानात सुरी सारखे घुसत होते. २०० कोटी च्या लोन साठी तो सरळ सरळ एका flat ची लाच देत होता. मिश्रा ची भूक ह्या पेक्षाही मोठी होती. मीनल चे कान गरम झाले. डोकं जड झालं. आत्ता ह्याला हकालावासा वाटायला लागला. पण तिने संयम पाळला.

"ठीक आहे तुम्ही या. मी बघते काय करायचं ते."

"मॅडम सोचना नही. कर ही देना. हवे सोचोगी तो बाद मे पछताओगी" पटेल लुब्र्या सारखा म्हणाला. सुनंदा गुप्ते गोड हसली.

मीनल ने खुप विचार केला. तिच्या डोक्यात काही योजना शिजू लागल्या.

ठरल्या प्रमाणे सुनंदा तिला भेटायला आली.
"मॅडम काय ठरलाय तुमच? आम्ही काय करू ते सांगा?"

" सुनंदा तुम्ही मिश्राला काय ऑफर दिली होती?"

"अं...म्हणजे....ते....."

"सांग सांग आग घाबरू नको. एवढी शिकलेली तू. एवढी प्रोजेक्ट्स केलेली. चाचारतेस काय!! बोल ग इथे कोणाला कळतंय."

" मीनल मॅडम ते मिश्रा तर कॅश शिवाय ऐकतच न्हवते. त्यांना ५० लाख हवे होते. त्याच काय आहे प्रोजेक्ट चालू झाल्यावर आम्हाला परवडत हो, पण आधीच एवढी कॅश generate होत नाहीना. पण ते म्हणाले आता दिल्ली पर्यंत पोहोचवायचे तर वाटायला कॅश च बरी. परत ५० जरा जास्तच होतात. म्हणजे तुमचे तुम्ही सांगितले नाहीत तरी....."

" मी कमीत पटेन असे का वाटले तुम्हाला?"

"त्याच काय आहे मॅडम तुम्ही काय मिश्रा सारख्या नाही. तुम्हाला नाव आहे, तुमच्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही पास केलेली प्रपोझाल्स जीएम काय, दिल्ली पण नाकारू शकत नाही. त्यामुळे तुम्हीच आम्हाला नीट गाईड कराल असे वाटले. "

"मी तुमचं प्रपोझल करेन, पण त्या साठी तुला माझी मदत करावी लागेल. मी एक पैसा ही न घेता हे काम करेन, पण तुला मिश्रा आणि कंपनी विरुध्ध मला मदत करावी लागेल? मंजूर?"

" न...नको मॅडम..... मी काय ठरवणार...... आहो मी फक्त फोलो अप करणारी. प्रत्यक्ष वचक तर पटेल साहेबांचाच ना!!!! मी तुमच्या भानगडीत नाही अडकणार!!!"

" हेच तर तुझं चुकतंय. तो पटेल तुला वापरून घेतोय. अग तू एवढी शिकलेली, हुशार, आणि त्याच काय ऐकतेस? हे असे छप्पन जॉब मिळतील तुला. मी लावून देईन. घाबरू नकोस."

" मला काय करायला लागेल? "

मग मीनल ने तिला पूर्ण योजना सांगितली.

दुसर्‍या दिवशी पटेल, सुनंदा गुप्ते सह हजर.
मीनल हैराण झाली. आता काय नवीन? सुनंदा चा चेहेरा पडलेला.

" मॅडम तुम्ही तर एकदम चोकस निघालात. आम्हालाच फसवायला निघालात!!! ते मिश्रा आम्हाला इथे उभे राहू देईल काय? छोकरी घाबरली!!"

" अरे पटेल साहेब तुम्ही तरी!!!! ती पोरगी लहान आहे. तुम्हाला समजलं नाही तुमचा फायदा?"

फायदा म्हंटल्यावर पटेल सरसावून बसला.

"अहो पटेल असे पैसे खर्च करून, जागो जागी flat देवून तुम्ही खूप प्रपोझाल्स करत असाल. एखादे प्रपोझल जर पैश्या शिवाय झाले, तर तुमची वट किती वाढेल? विचार करा. जे पैसे तुमची कंपनी मिश्राला देणार होती ते वाचवून दाखवा. त्या जोरावर तुम्हाला किती कौतुक मिळेल.?"

"पण आमच्या प्रपोझल मध्ये गोची असताना तुम्ही ते कसे काय करणार पास?"

" मी तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिला आहे. आहो तो इतका वाईट नाही. फक्त तुम्ही तुमचे रीसीव्हेबाल्स आम्हाला म्हणजे बँकेला द्यायचे. तुमच्या प्रोजेक्ट ला लोकेशन मुळे बुकिंग चांगले मिळालेले आहे. ४०% बुकिंग तर आधीच झालेले आहे. मग काय उरलेले ६०% फक्त विकायचे आहे तेही ३ वर्षात. मग काय!!! तुमची पोझीशन strong दाखवता येईल. प्रत्येक slab ला येणारे पैसे आपण रिपेमेंट म्हणून दाखवायचे. म्हणजेच तुमचा आर्धा लोन पोर्शन तर आत्ताच्याच बुकिंग मधून निघाला. बाकीचा येणार्‍या बुकिंग मधून होईल. आहो प्रपोझल चांगलं आहे तुमच. रहाता राहिलं क्रिसिल रेटिंग, त्या साठी तुम्हाला १ टक्का इंटरेस्ट जास्त लावू सुरुवातीला, नंतर तुमचं रेग्युलर रिपेमेंट झालं की परत कमी करायची विनंती करू. बरं लोन disbursement थोड्या थोड्या tranches मध्ये करू, म्हणजे एकदम उचल होणार नाही. आणि जे टोटल लोन आहे त्याच्या २०% तुम्हाला ओव्हर ड्राफ्ट देऊ. काय बरोबर ना?"

पटेल चा चेहेरा पहाण्या सारखा झाला होता. आत्ता पर्यंत फक्त पैसे देवून काम करायची सवय त्याला होती. एवढे चांगले point आपले असू शकतात ह्यावर विश्वास न्हावताच त्याचा. कामं अशीच लाच देवून होतात हा पक्का समाज झाला होता. मीनल म्हणजे त्याच्या साठी जगातलं आठवं आश्चर्य ठरली होती. तो चक्रावून गेला. त्याच्या गुजराथी डोक्याने त्याला ग्रीन सिग्नल दिला. ही संधी सोडायची नाही.

" आता मला काय करायला लागेल बेन? सांगा. तू जे म्हणेल ते मी करेल."

मीनलचा चेहेरा उजळला. तिने त्यांना सगळी योजना समजावली.

मीनलचा चेहेरा खुलून गेला.
त्या नंतरच्या घटना फार वेगाने घडल्या.

ठरल्या प्रमाणे सुनंदा आणि पटेल ही दुक्कल मिश्रा कडे गेली. सुनंदाने आपल्या मधाळ आवाजात त्याला परत प्रपोझल पास करण्याची गळ घातली. मिश्राने आपला भाव वाढवला. ५० वरून ६० वर आला. त्याने दिल्ली वाल्याचं नाव ही घेतलं. शेवटी सौदा ५५ वर तुटला. मिश्राला माहीतच न्हवत की सुनंदाच्या मोबाइलचा कॅमेरा ऑन होता. तिने सगळ रेकोर्ड केलं होतं. पटेलने ऑफिस ला जाऊन ते रेकॉर्डींग मिनलला पाठवून दिलं.

मिनलने पटेलच्या प्रस्तावाचं काम वेगाने पूर केलं. नियमा प्रमाणे बोर्ड च्या परवानगी साठी दिल्लीला पाठवलं. हे करताना तिने एकच काळजी घेतली की हे प्रपोझल दुसर्‍या रीजनल ऑफिस मधून approval ला जाईल. त्या मुळे मिश्राला ह्याचा सुगावा लागलाच नाही.

यथा अवकाश आधुनिक बिल्डरच प्रपोझल बोर्डा समोर आलं. मिनलच्या comments ना वेटेज मिळाल. आणि "ना हरकत प्रमाणपत्र " त्याला मिळाल. इकडे मात्र मिश्राचा दिल्लीचा माणुस जागा झाला. त्याने सगळं प्रकरण काढून घेऊन मिश्राला जागं केलं.

हातातले ६० लाख जाणार त्या मुळे मिश्रा पेटला. त्याने जीएम कडे तक्रार केली. जीएम च्या ऑफिस मधून मीनल ला फोन आला.
मीनल जी एम समोर उभी होती.

"धिस इज नॉट फेअर मिसेस. पाठक. यु हवे चीटेड अस. हाऊ कॅन यु डू द प्रपोझल विदाउट माय नॉलेज?"

"सर, आपके पास तो प्रपोझल आया था. आपने तो देखाही नाही. मैने तो सिर्फ रिमार्क मारके भेज दिया. मिश्राजी तो पार्टीसे बात कर ही राहे थे. ये देखिये उनके बातोंकी झलक."

तिने आपल्या मोबाईल वर पटेल,सुनंदा आणि मिश्राच्या बोलण्याची क्लिप दाखवली.

खेटर मारल्यासारखे दोघांचे चेहेरे झाले.

"हे... हे काय आहे मिसेस पाठक. धिस इस क्रिमिनल.!!! आय विल स्यू यु इन द कोर्ट."

"सर यु कान्ट डु दॅट. आपको मालूम है. ये अगर दिल्ली पोहोंच गया तो ...तो क्या होगा?"

मिश्रा तिडीकीने बोलला. " आपने ये प्रपोझल मंजूर कारवाया, और वो भी दिल्ली से. कैसे? बीना कूछ खाये? बात करती है......."

"आप बीच मे ना बोले तो ठीक रहेगा मिश्राजी. तमीज से बात किजीये. मेरी तराफ आंख उठाने की भी जुर्रत मत किजीये, मेरे नजर का तेज आपको सहा नही जायेगा. अपने गिरेबान मे झाकीये. जी एम जी जैसे नेक इन्सानको आपने एक गुनेहगार की लेव्हल मे लाया है. आप क्या मेरेसे बात करते है. चूप रहिये."

तिचा तो अवतार बघून मिश्रा चपापला आणि जीएम खजील झाले. त्यांना त्यांची चूक पूर्ण पणे समजली. तिच्या डोळ्याला डोळा द्यायची हिम्मत त्यांना झाली नाही.

"सर, तुम्ही मला आज का ओळखता. मी हे प्रपोझल कसं केलं हे तुम्हाला पूर्ण पणे माहित आहे. नियमांच्या चौकटीत बसणारी रिस्कच मी घेते आणि घेत आलेली आहे. तुम्ही मला अगदी ब्रांच लेव्हल पासून ओळखता. माझी क्षमता पाहूनच तुम्ही मला इकडे आणलत. सर मी खूप दिवसांपासून अस्वस्थ ह्याच गोष्टी साठी आहे की हा मिश्रा तुमच्या इमानाला धक्का लावतो आहे. मी १० दिवस बाजूला गेल्यावर त्याने बरोबर दावा साधला. सर मी हे म्हणत नाही की तुम्ही चुकलात, पण हे नक्की म्हणेन की तुम्ही बरोबर नाही वागलात. घाबरू नका. मी हे रेकोर्डिंग आत्ताच डीलीट करते आणि सुनंदाने पण ते डिलीट केल आहे ह्याची खात्री देते. सर, माझ्या बोलण्याचा विचार करा."

"मीनल, आज तुमने मुझे बचा लिया. मेरा खोया हुवा जमीर मुझे वापस दिलाया. मै कैसे ....कैसे तुम्हारा शुक्रिया अदा करू. मै हमेशा पढता था, सुनाता था, जमीर की बाते!!! आज समझ मे आई!!! धन्यवाद. thank यु.
मिश्राजी .....आप कौनसे ब्रांच जाना पसंद करेंगे. पर जहा भी जायेंगे याद रखिये संभाल कर राहियेगा. मीनल ....मुझे माफ करना. "
बाहेर पडता पडता मिश्राने रागारागाने मीनलकडे पहिले.
मीनल मात्र शांत होती. एका वेगळ्याच लढाईला सुरुवात झाली होती.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

chan

गापै, ह्याचे उल्लेख कथेत आहेत. "मीनल खूप सावध पणे काम करत होती. पुढला महिनाभर तिने काहीच हालचाल केली नाही. एकदम गप्प राहिली. मिश्रा निर्धास्त झाला." >>> यातले बारकावेही दाखवता आले, तर वाचायला अजून मजा येईल. Happy

छान आहे कथा. लक्ष देवून वाचली व बर्‍याच ठिकाणी माझ्या अनेक अनुभवांशी साम्य आढळले.उत्तम शब्दांकन व प्रवाह!!
Happy

मोकिमी अगदी लगेच विचारायला येणार होते की ही सत्यघटणेवर आधारीत आहे का तर अगदी सुरुवातीच्याच रिप्लाय मधे उत्तर मिळाले.

या व अशा पद्धतीने कर्ज मान्य करुन मग कर्ज माफी द्यायची यात तर काही बँका माहिर आहेत Happy मॅनेजमेन्ट बोर्डाच्याच लोकांच्या इतर उद्योगांना कर्ज मिळाल्यावर इतर काय होणार म्हणा. Sad उगाच नाहि दिवाळखोरी चालत.

कथा चांगली जमलीय. Happy

मोनालिप

हे असे उद्योग अनेक बँकात अगदी सर्रास चालतात. आणि सर्व मान्य पण असतात. माझ्याच माहितितल्या एका अशा "सेटींग" करणार्‍या मॅनेजर ला "गुड पर्फॉर्मन्स" चे बक्षिस देउन सहकुटुंब सह-परिवार सिंगापुर ची ट्रीप बहाल करण्यात आली होती. फक्त "बीझनेस एक्स्प्लोरेशन" असे गोंडस नाव देऊन. ते ही नॅशनलाईज्ड बँकेत.

हे असे उद्योग अनेक बँकात अगदी सर्रास चालतात. आणि सर्व मान्य पण असतात.>>> अगदी अगदी. काहि लोक जॉबच्या शेवटी शेवटी या सर्वाला कंटाळुन रिटायरमेंन्ट घेताना पाहिले आहेत. कारण वयाप्रमाणे मग लढा देणे जमत नाही वा नकोसे होते.

कथा छान. आपण चांगले लेखन करु शकता हे निश्चित सीद्ध झाले आहे. अर्थात, कथेचा कॅनव्हासच्या मर्यादा आहेत................... विषय कादंबरीचा आहे................. आपल्या लिखाणात अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो ह्या शुभेच्छा....................... हाच विषय घेवुन दिर्घकथा किंवा कादंबरी होवु शकेल.......... (हा फुस. {फुकट सल्ला}) अर्थात आम्ही वाचुच.

Pages

Back to top