PMS...अर्थात- प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम !

Submitted by रुणुझुणू on 9 May, 2011 - 08:25

" किती जोरात बोलतोस ? जरा हळू बोल."
......"अरेच्चा, कमाल आहे तुझी. मी नेहमीसारखाच बोलतोय. तुलाच मोठ्याने ऐकू येतंय."

" प्लीज मला त्रास देऊ नका. का सगळे मला छळायला टपलेत ?"
......नवरा हतबल. आणि मुलांचे गोंधळलेले, दुखावलेले प्रश्नांकित चेहरे. "आई असं का करतेय ?"

" माझ्या हातून काहीच होणं शक्य नाही. मी काहीही करायच्या लायकीची नाही."
....उच्चशिक्षित, जबाबदार पदावर असलेल्या समर्थ स्त्रीच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्यं....टिपिकली मासिकपाळी यायच्या आधीच्या दिवसांतली.
हे सगळं ती बोलत होती, ह्यावर पाळी येऊन गेल्यावर तिचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही.

हा लेख वाचत असणार्‍यांपैकी कित्येक जणींनी ही परिस्थिती स्वतः अनुभवली असेल.
मासिक पाळीच्या आधी होणार्‍या ह्या त्रासाची PMS ह्या नावाने बर्‍याच जणींना ओळखही असेल.

पण हे प्रकरण नेमकं आहे काय ? का होतो हा त्रास ? सगळ्याच स्त्रियांना होत असेल कि काहीजणींनाच ? ह्यातून काही गंभीर तर नाही ना उद्भवणार ? सगळ्यांत महत्वाचं म्हणजे....ह्यावर काही उपाय ?

PMS....अर्थात प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम ह्याची सोप्या भाषेतील व्याख्या अशी करता येईल.

" मासिक पाळीच्या साधारणपणे दोन आठवडे आधीपासून होणारे त्रासदायक शारीरिक आणि मानसिक बदल."

वैद्यकीय भाषेत सांगायचं तर...

" PMS is a condition which manifests with distressing physical, behavioural & psychological symptoms, in the absence of organic or underlying psychiatric disease, which regularly recurs during the luteal phase of each menstrual cycle & which disappears or significantly regresses by the end of menstruation."

ह्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे.
थोडेफार शारीरिक बदल जवळजवळ ८०-९० % स्त्रियांमध्ये होतात. पण त्यांच्या दैंनदिन आयुष्यात त्यामुळे फारसा अडथळा येत नाही.

साधारणपणे २०-३०% स्त्रियांना हा त्रास जास्त होतो....म्हणजेच त्यांच्या ' क्वालिटी ऑफ लाईफ ' वर विपरीत परिणाम होण्याइतका !

PMS चे प्रकार ----

१. सौम्य (Mild) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात कसलाही व्यत्यय येत नाही.

२. साधारण (Moderate) - ह्या बदलांमुळे वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक आयुष्यात व्यत्यय येतात. पण तरीही ती स्त्री आपली कामं उरकू शकते, लोकांमध्ये मिसळू शकते.(Suboptimal functioning)

३.तीव्र (Severe) - ह्या स्त्रिया ह्या दिवसांमध्ये वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्य हाताळू शकत नाहीत. ह्या सगळ्यातून अंग काढून घेतात. (withdrawl)

४. प्रिमेन्स्ट्रुअल एक्झॅजरेशन / मेन्स्ट्रुअल मॅग्निफिकेशन - ह्यामध्ये मुळातच काहीतरी मानसिक आजार असू शकतो, ज्याची लक्षणं ल्युटिअल फेजमध्ये वाढतात, आणि ही लक्षणे पाळी संपल्यानंतरही पूर्णपणे नाहीशी होत नाहीत.

५. PMDD (Premenstrual dysphoric diosrder) - हे PMS चे आणखी तीव्र स्वरूप. ह्याचा संबंध गुणसूत्रांशी आढ्ळून आला आहे. साधारण ५-६ % स्त्रियांमध्ये हे तीव्र स्वरुप दिसून येतं.

नेमकं घडतं काय ?
वर एवढ्या ठिकाणी 'शारीरिक आणि मानसिक लक्षणे' हा शब्द आला आहे.
काय असतात PMS ची लक्षणे ?

अ. शारीरिक बदल-

१. ओटीपोट गच्च झाल्यासारखं वाटणे (ब्लोटिंग)
२. स्तनांमध्ये जडपणा वाटणे, दुखणे
३. चेहर्‍यावर पिम्पल्स येणे
४. घट्ट शौच
५. वजनात वाढ
६. शरीरावर सूज येणे
७. अतिभूक लागणे किंवा भूक न लागणे
८. थकवा येणे
९. झोप न लागणे किंवा सारखं झोपावंसं वाटणे
१०. डोकेदुखी

ब. मानसिक बदल-

१. उगीचच रडू येणे
२. अस्वस्थ, निराश, हताश वाटणे
३. चिडचिड होणे
४. अति हळवं होणे
५. मनस्थितीत टोकाचे बदल होणे
६. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता न येणे
६. आत्महत्येचे विचार मनात येणे

एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की स्त्रियांमधील अपघातांचं, आत्महत्येचं, किंवा गुन्ह्यांचं प्रमाण ल्युटिअल फेजमध्ये जास्त असतं.

हा घडतं हे सगळं ?

१९३१ मध्ये अमेरिकेतील स्त्रीरोगतज्ञ- डॉ..फ्रँक आणि डॉ. हॉर्नी ह्यांनी पहिल्यांदा ह्या आजाराचा एक खराखुरा आजार असा उल्लेख केला. ( त्यांना मनापासून धन्यवाद ! )
त्याआधी ह्या लक्षणांकडे कोणीच गंभीरपणे पहात नव्हतं.

(अर्थात अजूनही कित्येक लोक ह्या आजाराकडे 'बायकांच्या विनाकारण आणि नेहमीच्या तक्रारी' अशाच नजरेने बघतात!)

ह्या सगळ्या बदलांचा ट्रिगर म्हणजे ओव्ह्युलेशन !
( ओव्ह्युलेशन म्हणजे बीजांडातून बीज बाहेर पडण्याची प्रक्रिया, ही साधारणपणे पाळी यायच्या १४ दिवस अगोदर घडते.
पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते ओव्ह्युलेशनपर्यंतच्या काळाला फॉलिक्युलर फेज म्हणतात आणि ओव्युलेशन ते पुन्हा पाळी चालू होण्याच्या काळाला ल्युटीअल फेज म्हणतात.)
ओव्ह्युलेशननंतर शरिरात होणार्‍या हॉर्मोनल बदलांमुळे ( आणि त्यासोबतच होणार्‍या मेंदूतील सिरोटोनिन नावाच्या न्युरोट्रान्समिटरच्या पातळीतील बदलामुळे ) PMS ची लक्षणे चालू होतात.

तसेच PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते, असं एका संशोधनात आढळून आले आहे.

बाकी काही थेअरींवर अजून संशोधन चालू आहे.
उदा.- १. जीवनसत्वांची कमतरता
२. थायरॉईडचे आजार
३. पर्सनॅलिटी फॅक्टर्स

PMS चे निदान --

रक्तातील साखरेची पातळी मोजली की मधुमेहाचं निदान करता येतं तसं PMS चं निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत करता येणारी कुठलीही ठोस चाचणी नाही !

ह्या आजाराचं निदान करण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे लक्षणांची नोंद. ( Symptom Diary )
तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक जे काही बदल जाणवतील त्याची रोजच्या रोज नोंद करून ठेवायची. साधारणपणे २-३ महिने अशी नोंद केल्यावर ह्या लक्षणांचा ठराविक पॅटर्न,तसेच ह्यातील ठळक लक्षण समजून येते. त्यावरून हा आजार नक्की PMS च आहे का, आणि असेल तर किती तीव्र स्वरुपाचा आहे, हे ठरवता येतं.

PMS सारखीच लक्षणे असलेले काही आजार-
१. नैराश्य
२. हायपोथायरॉईड
३. अ‍ॅनिमिया ( रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे )
४. मायग्रेन

मग ह्यापासून PMS वेगळा कसा ओळखणार ?

PMS चं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी लक्षणे पाळी चालू झाल्यावर नाहीशी होतात आणि पुढचे किमान दोन आठवडे लक्षणरहित जातात. असं होत नसेल तर हा वेगळा आजार असण्याची शक्यता जास्त !

अशावेळी लवकरात लवकर संबंधित तपासण्या करून घ्यायला हव्या.

PMS वर उपाय काय ?

PMS बरा करणारा किंवा त्याचं समूळ उच्चाटन वगैरे करणारा काहीच उपाय अजून सापडलेला नाही !
पण तो आटोक्यात रहावा किंवा त्याची तीव्रता कमी करता यावी म्हणून उपाययोजना नक्कीच करता येते.

१. आहार-विहारातील बदल---

ज्या काळात ही लक्षणे जाणवतात, त्या काळात आहारातील काही बदलांमुळे बरीच मदत होते.
१. मीठाचे ( आणि खारवलेल्या पदार्थांचे ) प्रमाण कमी करा.
२. एकावेळी पोटास तड लागेल इतकं खाण्यापेक्षा थोडं थोडं विभागून खा.
३. जंक फूड टाळून फळं आणि भाज्यांचा जास्त वापर करा.
४. कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा वापर वाढवा किंवा/आणि कॅल्शिअमचे सप्लीमेंटस घ्या.
५. कॉफी आणि अल्कोहोल शक्यतो टाळा किंवा मर्यादित प्रमाणात घ्या.
६. तंतुयुक्त पदार्थांचा आहारात वापर वाढवा.
७.मल्टिविटामिन ( विशेषतः विटामिन- बी-6 ), मॅग्नेशिअम चे पूरक डोस घ्या.
८. ई-जीवनसत्वाचे पूरक डोस घ्या.

२. व्यायाम--

आहाराइतकाच महत्वाचा आहे व्यायाम.
( इथेही आलाच का व्यायाम ? " कुठे जाशी भोगा, तर तुझ्यापुढे उभा ! Wink )

पोहणे, सायकल चालवणे, चालणे किंवा एरोबिक व्यायाम ह्या सगळ्याचा फायदा होतो.
नेमकं काय घडतं व्यायाम केल्याने ?

आधी उल्लेख केल्याप्रमाणे PMS चा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये बीटा-एण्डॉर्फिन्स ह्या न्युरोट्रान्समिटर्सची पातळी कमी असते.
व्यायाम केल्याने शरीरामध्ये पुरेसे बीटा-एण्डॉर्फिन्स तयार होतात. त्यामुळे मनस्थिती प्रसन्न रहाण्यास मदत होते.

३. ताण-तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम करा.

४.आवडीच्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. जबाबदारीची किंवा खूप कार्यक्षमता लागणारी कामे ( उदा.- ठरवून करण्याजोगा एखादा समारंभ, मिटींग ) शक्य असल्यास ल्युटिअल फेजच्या आधी ठेवा.

५.औषधोपचार--
ओव्ह्युलेशन हा जर ट्रिगर फॅक्टर म्हणून सर्वमान्य झाला आहे तर ओव्ह्युलेशन होऊ न देणे हा अर्थातच ह्या आजारावरचा लॉजिकल उपाय म्हणून वापरला जातो आणि त्याचा बर्‍याच स्त्रियांना उपयोग होतो.

गर्भनिरोधक गोळ्या वापरत असताना ओव्ह्युलेशन होत नाही. उदा.- ओवराल-जी, नोवेलॉन, फेमिलॉन.
ह्या प्रकारच्या गोळ्यांनी काही जणींना मळमळ, डोकेदुखी, वजन वाढणे असे त्रास होऊ शकतात.
नवीन ' यास्मिन ' नावाच्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्यांच्यामुळे हे दुष्परिणाम होत नाहीत.
यास्मिनमुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी बर्‍याच उलटसुलट चर्चा होतात. पण स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार्‍या जागतिक संस्था ह्या आजारासाठी यास्मिन रेकमेंड करतात.

-- इस्ट्रोजेन पॅचेस हासुद्धा PMS वरील एक उपाय म्हणून वापरला जातो.
( गर्भाशय काढलेलं नसेल तर नुसते इस्ट्रोजेन पॅचेस वापरल्यास गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे हे पॅचेस प्रोजेस्टेरॉन ह्या हॉर्मोनसोबतच आणि अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानेच वापरावेत.)

-- डॅनॅझॉल, सुप्रिफॅक्ट अशा नावाची काही औषधे ह्या आजारावर वापरली जातात. पण ह्यांचेही काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

-- स्तनांचे दुखणे, पोटात कळ येणे ह्यासाठी वेदनाशामक औषधे वापरली जातात.

अ‍ॅण्टिडिप्रेसन्टस्--

PMS वरील उपचारांमध्ये ह्या औषधांचा मोठ्ठा सहभाग आहे. अगदी कॉमनली वापरलं जाणारं औषध म्हणजे- फ्लुओक्झेटिन (Fluoxetine)
ह्या औषधाचं काम म्हणजे शरीरातील सिरोटिनिनची पातळी टिकवून ठेवणे.
( वर वाचलेलं आठवलं का ? सिरोटोनिनची पातळी कमी असलेल्या स्त्रियांमध्ये PMS ची लक्षणे जास्त दिसून येतात.)
ही औषधे बर्‍याचदा पाळीच्या आधीचे दोन आठवडे घेण्यासाठी दिली जातात.
सलग पूर्ण महिनाभर घेण्यासाठी दिली असतील तर बंद करताना एकदम बंद करू नयेत. असं केल्याने सगळी लक्षणे रिबाऊंड होण्याची शक्यता असते.

६. शस्त्रक्रिया--

जेव्हा वरील सगळे उपाय करूनही त्रास होत राहतो, तेव्हा हा शेवटचा पर्याय म्हणून विचारात घेतला जातो.
( असं खूप कमी वेळा होतं. त्यामुळे घाबरू नका ! )
ह्यामध्ये गर्भाशय आणि दोन्ही ओवरी काढून टाकल्या जातात.
शस्त्रक्रिया करण्याच्या आधी काही विशिष्ट औषधांनी कृत्रिम मेनोपॉज घडवून आणला जातो. त्यामुळे शस्त्रक्रियेचा फायदा होईल की नाही ह्याची चाचणी घेता येते.

सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं .....PMS चा त्रास आहे म्हणून त्याच्यामुळे आणखी काही गंभीर शारीरिक आजार उद्भवत नाही.
औषधोपचार केले तर PMS आटोक्यात राहू शकतो !

...... मग पुढच्या महिन्यात PMS ची लक्षणं दिसायला लागली की ?........
होठ घुमा, सिटी बजा, सिटी बजा के बोल....भैय्या ( मैय्या !) ऑल इज वेल !!!

____ रुणुझुणू ( स्त्रीरोगतज्ञ )

******************************************************************************************************
डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश पी. एम. एस. ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages