३ मिनिटाचा टॉक टाइम्....पल्लि

Submitted by पल्ली on 8 May, 2008 - 04:27

'हॅलो...हॅलो....प्लीज...!'
'हॅलो, कोण बोलतंय्...लाईन स्पष्ट नाहीये. मोठ्यान बोला....'
'हॅलो, समीर्...राजा मी बोलतेय रे. ऐक ना जरा....देवा....'
'हॅलो, कोणीच बोलत नाहीये...कोण आहे?'
'देवा, काय रे हे? तीनच मिनिटाचा टॉक टाईम. त्यात आवाजच पोचत नाहीये माझा त्याच्या पर्यंत. टॉक टाईम वाढवा ना...वाढवता कसा येत नाही...मला किती बोलायचंय समीरशी....'
'अरे कोण रडतंय पलिकडे...कोण आहे?'
'समीर, मी आहे रे तुझी सुमा..........'
'सुमे........'
'माझा आवाज पोचला तुझ्यापर्यंत. थँक्स देवा...'
'कोण मस्करी करतंय च्यायला....तुझ्या @#$*#.......ए....'
'अजुन शिव्या द्यायची सवय गेली नाही तुझी? कितिदा सांगितलं. आधी चेक करत जा कोण बोलतंय ते फोनवर?'
'सुमा.....खरंच ...तु आहेस?'
'का विश्वास बसत नाही ना. माझाही बसत नव्हता. पण माझ्या केलेल्या चांगल्या कामांबद्दल मला ही फॅसिलिटी मिळाली आहे....'
'सुमा....माझी सुमा...तु? ?'
'अरे प्लीज विश्वास ठेव. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. फक्त ३ मिनिटाचा टॉक टाइम् दिलाय ह्यांनी....'
'सुमा, का दूर गेलीस गं. माझ्याकडे, मनुकडे कोण बघणार?'
'मला जायला लागलं रे...मन्या कसा आहे? अभ्यास करतो का? वेळेवर जेवतो का? जास्त टि. व्ही. बघु नकोस म्हणावं....डोळे खराब होतात अश्यानं............माझी आठवण येते का रे त्याला?'
'तुझी आठवण प्रत्येक क्षणात आहे गं. माझ्या श्वासात आहे. हलणार्‍या पडद्यात आहे. झुलणार्‍या झुंबरात आहे. माझ्या मनात आहे, माझ्या डोळ्यात आहे.....माझ्या देहभर आहे गं........'
'अरेच्या तु कविता करायला लागलास की? सुधारणा आहे राजे...'
'तुझं हे 'राजे' म्हणणं खुप गोड वाटतं गं...आठवतं...पहिल्यांदा तुला जवळ खेचलं तर हलक्याशा रागानं म्हणाली होतीस्.....राजे, हे युद्ध नव्हे...जरा हळुवार...'
'हं...आणि अजुन पर्यंत धसमुसळेपणा कमी नाही झाला तुझा? खरंतर तेच मला आवडतं . वाघासारखं. रांगडं. मराठी माणसाला शोभेल असं...'
'ऍ हॅ..नेहमी तर तक्रार करतेस की....ऑफिसमध्ये मैत्रिणि चिडवतात म्हणुन....'
'मग्...तु जरा अतिच करतोस्......तुझं सगळंच अति. रागही अति आणि प्रेमही. किति रडलास तेव्हा....मला नव्हतं वाटलं तु एवढा हळवा असशील म्हणुन..'
'म्हणजे काय? च्यायला मी पण माणुस आहे...आणि तु! किति निवांत्...कसं काय जमतं तुला...'
'दोघांपैकी कुणीतरी एकानं संयम करावा लागतोच ना...म्हणुन तर आपल्याला फक्त मन्या झाला. नाहीतर तुझ्या नादांत्....तुला तर भानच नसतं कधी.'
'हा हा हा:'
'हसु नकोस'
'हसु नको तर काय करु? चंद्र्शेखर गोखलेचं छान वाक्य आहे गं....इथं वेडं असण्याचे फायदे आहेत, नाहितर शहाण्यासांठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत....'
'बघ आत्ता ही तुला भान नाही...३ मिनिटाचा टॉक टाइम् आहे फक्त माझ्याकडे.........'
'सुमे, थांब ना गं...त्यांना म्हणावं माझ्या नवर्‍यानंही खुप चांगली कामं केली आहेत्....त्याचाही मोबदला मलाच द्या म्हणावं...सुमा गं...'
'नको रे इतकी आर्त हाक मारुस्....कासाविस् होते रे....तु जेव्हा ऑफीसच्या टूरवर जायचास तेव्हा तु परत येइपर्यंत असं व्हायचं की ....आणि तु...तुझ्या गावी पण नसायचं. दमलोय म्हणायचास आणि तोंड फिरवुन झोपायचास्...मी वाट बघत बसायची वेड्यासारखी...'
'त्याचीच शिक्षा देतीयेस का मला...का गेलीस...?
'अहं...मी निदान फोन तरी लावला....'
'मी चुकलो गं .. पण आता परत ये. बास झालं...सुमे...'
'सुमे सुमे म्हणतोस. मस्का मारतोस आणि जिंकतोस दर वेळी.....'
'बरं बाई, मनापासुन म्हणतो... ये ना.....'
'त्या दिवशी बाथरुममध्ये मला शॉक लागला किति हाका मारल्या तुला.....तु आलाच नाहीस....'
'मी क्रिकेट बघतो, तुला आवडत नाही.....शेवटची ओव्हर होती. मला वाटलं नेहमीप्रमाणे...तु...'
'आता मी कशी रे परत येउ?...माझं बाळ्...माझा मन्या......त्याला सांभाळ रे....फक्त साडे चार वर्षाचा आहे रे तो... त्याला रागवत जाउ नकोस्.....तो सहसा रडत नाही...पण रडला की समज नक्कि काहितरी गडबड आहे. तुला नाही समजलं तर डॉक्टरांना दाखव सरळ्......माझं मनु........मना........'
'----सु---मा---गं....'
'राजे, तुम्ही ही एकटे राहु नका......एखादी..कुणी....मन्याला सांभाळेल अशी....'
'नको सांगुस सगळ्.....मला नाही जमणार तुझ्याशिवाय्......कपाटभर तुझ्या साड्यांचा वास्........देवघरात तुझ्या मंगळ्सुत्राचे मणी.....भिंतिवरचं तुझं लाडकं पोस्टर्.....तुझ्या कविता.......सगळं घर मला खायला उठतय गं सुमे.......तुझी कुकिंगची पुस्तकं.....तुझी निळी लाडकी ओढणी........तुझा इ-मेल चा निरुत्तरित आय डी....मन्याची शोधक बावरी नजर्...त्याच्या टप्पोर्‍या डोळ्यात चमकणारे ते २ थेंब......काळीज फाटतंय गं माझं....क्षमा तरी कुठं--कुणाला मागु मी. फार मोठी शिक्षा भोगतोय गं सुमे......सुमे....सुमा.....सुमा? सुमा?........सुमा????
लाईन तुटली?...टॉक टाईम संपला?...इतक्या चागल्या प्रेमळ माणसाला फक्त ३ मिनिटं......सुमे, तुझ्या सारखी खुप खुप चांगली माणसे असतील ना क्यु मध्ये....सगळ्यांना आपापल्या प्रिय व्यक्तीशी बोलायचं असेल......सुमे, आपल्या बोलण्यात मन्याशी तुझं बोलणंच नाही झालं गं.....मी अजुन खुप चांगला वागेन्.....माझा टॉक टाईम ही तुच घे......नाही तरी तुझ्या नंतर कुणाशी बोलण्या साठी टॉ़क टाईम घेणार मी......घे ना गं सुमे ३ मिनिटाचा टॉ़क टाईम वाढवुन्..............'

गुलमोहर: 

पल्लवी, खरंच खुप सुंदर लिहिलंय.... पण वाचल्यावर मी मात्र खुप सुन्न झालो...

विशाल तुला मोदकांच ताट रे. मी पण सुन्न झाले वाचुन Sad
टॉक टाईमची कल्पना परिणामकारक, अशा बर्‍याच गोष्टी असतात ज्या निघुन गेल्यावर/ घडुन गेल्यावर चुट्पुट लागुन रहाते, कधी ती कळ आत आत रुतुन बसते आपल्या बरोबर जाण्यासाठी.

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

चान्गल लिहिलय! (इतक्या उशिरा का बघितल मी हे?)
प्रत्यक्षात, टॉक टाईम मिळत नस्तो! कुणालाच! गेलेल्याला काय की शिल्लक राहिलेल्या काय!

जे बोलायचे, व्यक्त व्हायचे, ते आत्ताच, तत्क्षणीच क्षणी उरकुन घ्यावे हेच बरे!
अन्यथा मागे शिल्लक रहाते ती फक्त रुखरुख!
जित्याजागत्या माणसान्ना शहाण करण्यास ही कथा पुरेशी ठरावी! Happy
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****

इतके दिवस कशी दिसली नाहि कोणास ठावुक?
पल्ली कथा म्हणुन छान आहे पण त्या ४ वर्षाच्या बाळाकडे बघुन नको वाटत अस लिहिणे आणि वाचणे सुध्दा.
=======================
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शीळ वाजवतो.....

पल्ली... कशाला गं एवढं आर्त लिहिलयस... Sad
तुझी कथा फुलवण्याची कौशल्य खरंच खुप छान आहे ... Happy

खूपच छान!!! आणी काहीही स्पष्टीकरण न देता फक्त सन्वादातून कथा फुलवली आहे त्यामूळे जास्त परीणामकारक वाटते...
फुलराणी

इतके दिवस कशी दिसली नाहि कोणास ठावुक?
पल्ली कथा म्हणुन छान आहे पण त्या ४ वर्षाच्या बाळाकडे बघुन नको वाटत अस लिहिणे आणि वाचणे सुध्दा.>>>>>
सखि ला अनुमोदन.
Sad

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

फारच छान !शब्दात सान्गता येणार नाही.

छान आहे कथा, पण आधी पोस्टली होती का ?

एकदम आरपार!!! छिन्न!!!
सहीच पल्ली

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

अशी वेळ शत्रूवर पण न येवो. ४ वर्षाच्या बाळाला मागे सोडून जाववणारच नाही ग आईला, तिचा जीव तिथे घुट्मळत राहील, तडफडत राहील. Sad

त्याचं तुटणं पण नीट मांडलयस!

कथा म्हणून चांगली आहे पण गोष्ट रडवी आहे Uhoh

पल्ली कथा छान उतरलीय. मन उदास उदास.... Sad

ही मी एकदाच पोस्टलीय. सगळ्यांचे आभार, टॉक टाइम मिळत नसतो हे खरेच, म्हणुन शहाणे व्हा आणि जे वाटते ते मनापासुन दुसर्‍याला न दुखवता मोकळे व्हा...........

बाप रे पल्ले काय हे? गार पडलोय....

Pages