सगुण की निर्गुण

Submitted by मोहन वैद्य on 24 May, 2012 - 12:10

देवासंबंधी एक सुन्दर गीत (यशवंत) देवांनी संगीतबद्ध केले आहे.
कुठे शोधीसी रामेश्वर
कुठे शोधीसी काशी
ह्रुदयातील भगवंत राहीला
ह्रुदयातून उपाशी
खरेच देवाचे हे निर्गुण निराकार स्वरूप आपल्याच ह्रुदयात आहे हे शब्द चित्रात कविने चितारले आहे. तर बाबुजी अर्थात सुधीर फडके यांनी त्या चित्राला नादमय रुप दिले. सर्वव्यापी तो परमेश्वर आपल्या प्रत्येकामध्ये आहेच पण आपण मात्र हे साफ विसरतो. आणि डोंगर - दर्‍यात, मंदिरात आपण त्याच्या दर्शनाला जातो. पण आपल्या ह्रुदयातील देवाचे दर्शन काही आपल्याला होत नाही. किंबहुना आपण तसा प्रयत्नच करित नाही.

आणि जेव्हा त्या ईश्वराची जाणीव होते तेव्हा त्याचे वर्णन करिता येत नाही. अगदी अमृताते पैजा जिंकण्यार्‍या ज्ञानेश्वरांना देखील. स्वतः ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात,

पाया पडू गेले तव पाऊलची ना दिसे
ऊभा की स्वयंभू असे समोर की पाठीमोरा ना कळे.

हा विठ्ठल - परमेश्वर सर्वत्र भासतो, मग तरीही तो समोर आहे की पाठी आहे, कळत नाही. पाया पडावे म्हटले तर पायच दिसत नाहीत. नामदेव महाहाज म्हणतात, " तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुपूजा विठ्ठल. .." सगळीकडे विठ्ठलच विठ्ठल व्यापून आहे. एक प्रश्न मात्र नेहमीच पडत राह्तो, की या संत शीरोमणींना विठ्ठलाचे म्हणजे परमेश्वराचे दर्शन किवा अनुभूति झाल्यानंतर सुद्धा ते निर्गुणाचे वर्णन (?) करित नाहीत. खरेच, निर्गुण, निराकाराचे, किवा जो "गुणःत्रयातीतः, देहःत्रयातीतः, कालःत्रयातीतः" आहे त्याचे वर्णन तरी करायचे कसे? निर्गुणाचा अनुभव व सगुणाचे वर्णन यांची सांगड घालायची तरी कशी?

तुकाराम महाराज, " राजस सुकुमार मदनाचा पुतळा " आपल्यापुढे उभा करतात. " सुन्दर ते ध्यान ऊभे विटेवरी, करकटावरी ठेवूनीया; मकरकुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ विराजित " असे बघतात. ज्ञानेश्वर महाराज सगळळ्या वारकर्‍यांच्या मनातले बोलतात, " तेणे मज लवियला वेडू"

यातील काय खरे मानायचे? एकाच स्तोत्रात एकीकडे म्हणायचे, " त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि, .... त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि" (तूच ते ब्रह्मतत्व आहेस. तूच निर्गुण, निराकार आहेस - कारण ब्रह्म हे निर्गुण, निराकार आहे.) तर दुसरीकडे त्याच स्तोत्रात म्हणायचे, "एकदंतं, चतुर्हस्तं, पाशं अंकुश धारिणम". सगुण की निर्गुण? कळत नाही. " तुज सगुण म्हणू की निर्गुण रे ? तुज स्थूल म्हणू की सूक्ष्म रे? " सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. निर्गुण म्हणावे तर नमस्कार कोठे करायचा?; अनुभव घेण्यासही अवघड. सगुण म्हणावे तर पसारा वाढतच जातो. " घननीळा लडीवाळा" म्हणावे की, " कर्पूर गोरा.. विषे कंठ काळा" म्हणावे. की शांताबाईंना नाचतांना दिसला तसा "गणराज रंगी नाचतो" असा आहे? कसा आहे तो ईश्वर?

आता एकच ऊपाय दिसतो. जे जे दिसते ते ते सर्व निर्गुण परमात्म्याने धरण केलेले रूप आहे असे समजायचे. आशाताई बरोबर गायल्या, " देव रूप होऊ सगळे, देव रूप होऊ सगळे". " राजस सुकुमार मदनाचा पुतळा" हाही देवच आणि तांडव करणारे शंकर हेही देवच. वक्रतुंड महाकाय ही देवच. अहो येवढेच कशाला, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि" म्हटल्यावर, ईश्वर सर्वत्र आहे. म्हणजे आपल्या सर्वांच्या ह्रुदयात आहे. आता ह्रुदयातील भगवंताचा ऊपास सुटला. काशी, रामेश्वरातील शोध थांबला.

गुलमोहर: 

खरचं अंतर्मुख व्हायला लावणारा लेख आहे.
प्रत्येकाला जर आपल्या ह्रुदयातिल देवाची जाणिव झाली तर देवस्थान समित्यांनी भक्तिच्या नावाखाली भोळ्या भाविकांची जी लूट चालवली आहे त्याला काही प्रमाणात तरीए आळा बसेल

जगावेगळी,

देवाच्या भक्तीसोबत त्याचं ज्ञान होणंही आवश्यक आहे. त्यामुळे अंधविश्वास नाहीसा होतो. भक्तांची लूट थांबवायला त्यांना खरे आणि खोटे यांतील फरक कसा करायचा ते दाखवलं पाहिजे.

निर्गुण साधनेमुळे निष्कामता अंगी बाणायला मदत होते.

आ.न,
-गा.पै.

"जगा वेगळी"
आणि "गामा पैलवान",
आपल्या प्रतिसादाबद्धल आभारी आहे... मोहन वैद्य

Piyu Pari,

By mistake it appeared in "katha" section. I accept my mistake.

mohan vaidya.

वैचारिक,

आपण फार कठीण प्रश्न विचारलात. मी एक सामान्य माणूस आहे. पण आपण विचारलेत म्हणून प्रयत्न करतो.

अंतिम सत्य निर्गुण आहे. तेथे पोचण्याचा सोपा मार्ग सगुण भक्तीचा आहे. आपल्या संतांनी देखील सांगितले की सगुण भक्ती त्यागू नका. पण सगुणाची भक्ती करताना सतत ही जाणीव हवी की परमेश्वर निर्गुण आहे. ही जाणीव नसली तर अंधश्रद्धेकडे घसरण्याचा धोका असतो. आपल्याला आठवत असेल काही वर्शांपूर्वी गणपती दूध प्यायल्याची अफवा उठली होती. हा सगुण भक्तीचा अतिरेक नाही का? आमच्या सोसायटीतील एका भगिनीने असा दावा केल्यावर मी म्हटले माझ्या पुढ्यात तसबीरीला दूध पाजा. साहजिकच तसबीर दूध प्यायली नाही.
आता सगुण भक्ती करायची म्हणजे सोमवारी शंकराला वंदन, मंगळवारी गणेश वंदन,..... हे कठीण काम आहे. पण एका परमेश्वराचे रूप जर मला सर्व देवतांच्या मध्ये बघता आले (अजून जमलेले नाही) तर निर्गुण भक्ती साधली असे मी समजेन.