ट्रॅफिक सिग्नल, रोझ गार्डन आणि माधुरी दिक्षित

Submitted by अजित अन्नछत्रे on 27 May, 2012 - 09:13

सॅमच्या flat हून युनिवार्सिटीला मेन स्ट्रीटने जाताना तीन सिग्नल्स लागतात. त्या दिवशी पहिली २ सिग्नल्स तर त्याने कशीबशी पार केली, पण तिसऱ्या सिग्नलला मात्र तो चुकला. धडधडीत रेड सिग्नल दिसत असताना तशीच गाडी त्याने पुढे काढली तेव्हाच मला समजल कि ही व्यक्ती चांगलीच एग्रेसीव असली पाहिजे. मान्य आहे आम्हाला लेक्चरला उशीर होत होता. पण म्हणजे काय ट्राफिक सिग्नल तोडायचा? मला नियम तोडणारी माणसे अजिबात आवडत नाहीत. साऱ्या गोष्टी कशा नियमानुसार व्हायला हव्यात. आता सॅमला ट्राफिक सिग्नल तोडल्या बद्दल १०० डॉलरच तिकीट मिळणार हे नक्की झाल होत. त्यात त्याने कालच नवीन गाडी घेतली होती - म्हणजे सेकण्ड हेन्ड. नवीन गाडीचा श्रीगणेशा चांगलाच झाला होता.

सॅमची आणि माझी मैत्री तशी नवीनच होती. आम्ही दोघे डेनव्हर जवळील युनिवार्सिटी ऑफ कोलोराडो मध्ये नुकतेच रुजू झालो होतो. सॅमच्या म्हणण्या नुसार डेनव्हरच नाव साऱ्या जगभर राहणाऱ्या मराठी माणसामध्ये फेमस झाल होत ते कवळ एकाच कारणामुळे - ते म्हणजे लग्नानंतर माधुरी दिक्षित येथेच स्थाईक झाली होती.

जस जसे दिवस गेले तस तशी माझी आणि सॅमची मैत्रीही वाढत गेली. सॅम हा चार लोकांपेक्षा "जरा हटके" असा होता. त्याच्या भोवती अद्भुततेच, काहींस रहस्यमय अस वलय मला नेहेमीच जाणवायच. In fact, त्याला मी "शॉक ट्रीटमेंट थेरापिस्ट" असच म्हणायचो. का? आता हेच बघा ना - त्याच्या flat च्या लिव्हिंग रूमला लागून एक लहानशी खोली होती. त्या खोलीत मी कधीच गेलो नाही. किंबहुना, सॅम त्या खोलच दार नेहेमीच बंद ठेवायचा. जणू काही "नो एन्ट्री" ची पाटी लावल्यासारखा. त्यामुळे मीही त्या बाबतीत कधी फारशी उत्सुकता दाखवली नाही. पण त्या खोलीत काय आहे हे जाणून घ्यायची जिज्ञासा मला नेहेमीच असायची.

त्या दिवशी सकाळी युनिवार्सिटीला जाताना त्यान मेन स्ट्रीटचा तिसरा ट्राफिक सिग्नल तोडून जो नवीन शॉक दिला होता त्याबद्दल त्याची संध्याकाळी कानउघाडणी करण जरुरीच होत. मी संध्याकाळी जेव्हा त्याच्या flat वर पोहोचलो तेव्हा तो मला कोठेच दिसेना. लिव्हिंग रूम मध्ये नाही, बेड रूम मध्ये नाही आणि किचन मध्ये पण नाही. तेवढ्यात माझ्या लक्षात आले कि सॅम "त्या" खोलीत आहे. माझ्या मनातल्या नाराजीची जागा कुतूहलाने घेतली. मी तसाच "त्या" खोलीचा दरवाजा उघडला आणि आत गेलो. आणि बघतो तर काय - त्या लहानश्या खोलीत असंख्य चित्र टांगलेली होती. पेन्सिलीने काढलेली काळी-पांढरी चित्र. काही निसर्ग चित्र, काही व्यक्ती चित्र तर काही modern art सुद्धा. आणि सॅम स्वतः एक चित्र काढण्यात मग्न होता. कुणाच चित्र? माधुरी दिक्षितच! मी आश्चर्य चकित झालो. काय, सॅम चांगला चित्रकार आहे? आणि ही गोष्ट मला अजून पर्यंत माहिती नव्हती? मी काहीसा ओशाळलो. पण सॅमने काढलेली चित्र पाहण्यात संध्याकाळ कशी निघून गेली ते समजलच नाही. सकाळी सॅमने ट्राफिक सिग्नल तोडल्याची नाराजी पार दूर पळून गेली होती!

मी म्हटलं "सॅम, मला माहित नव्हत कि तू चांगला चित्रकार आहेस!"
सॅम म्हणाला: "माहिती नव्हत न? अशी बरीच सिक्रेट्स माझ्याकडे आहेत ज्याचा तुला थांगपत्ता पण नसेल!"
मी: "पण एक गोष्ट सांग, तू ह्या चित्रांना रंग का देत नाहीस?"
सॅम: "अरे black and white में जो मजा हैं वो Eastman color में कहां?"
मी: "ते काहीही असो, पण निदान माधुरी दिक्षितला तरी रंग द्यायचा प्रयत्न कर!"

दुसऱ्या दिवशी सकाळी युनिवार्सिटीला जाताना सॅम मला माझ्या खोलीवरून pick up करणार होता कारण माझी गाडी मी गराजमध्ये दुरुस्तीला टाकली होती. पुढच्या आठवड्यात होळीनंतर माझी driving टेस्ट होती. ही नवीन driving टेस्ट सर्वाना घेण जरुरीच होत. त्याकरिता मला माझी गाडी चांगल्या condition मध्ये हवी होती. मला सॅमन pick up केले आणि आम्ही निघालो युनिवार्सिटीला जाण्यासाठी. परंतु सॅमन गाडी मेन स्ट्रीटला घेतलीच नाही.

मी म्हटलं "सॅम, आपल्याला युनिवार्सिटीला जायचय. कुठे निघाला आहेस तू?"
सॅम म्हणाला: "हो बरोबर आहे, आपण तिकडेच निघालोय!"
मी: "मग हे काय? गाडी साऊथ स्ट्रीटला का वळतोयस मेन स्ट्रीट ऐवजी?"
सॅम: "मला कालच समजलंय, साऊथ स्ट्रीट हाउस नंबर ८ ला कोण राहत माहिती आहे?"
मी: "कोण?"
सॅम: "माधुरी दिक्षित!"
मी: "अरे, पण साऊथ स्ट्रीटने युनिवार्सिटीला जायचे म्हणजे तब्बल ५ किलोमीटर अंतर जास्त!"
सॅम: "बरोबर आहे, पण मला सांग मेन स्ट्रीटला काय ठेवले आहे?"
मी: "काय ठेवले आहे?"
सॅम: "३ सिग्नल्स, that’s all!"
मी: "बर मग?"
सॅम: "आणि साऊथ स्ट्रीटला? माधुरी दिक्षित! तुला पाहिजे तर मेन स्ट्रीटची ३ सिग्नल्स ठेव तुझ्या वाट्याला. मला मात्र हवी साऊथ स्ट्रीटची माधुरी दिक्षित!"

ही अजब वाटणी पाहून मी अचंबित झालो. जाताना साउथ स्ट्रीटच्या हाउस नंबर ८ च दर्शन घेतल. माधुरी दिक्षित बाई तर कुठे दिसल्या नाहीत. त्यामुळे आपल्या वाटेला आलेल्या ३ सिग्नल्सवरच मला समाधान मानावं लागल!

या वर्षाची होळी युनिवार्सिटी जवळ असणाऱ्या rose garden मध्ये होती. Rose garden म्हणजे आमच्या सर्वांच्या आवडीची जागा! समरमध्ये असंख्य रंगाचे गुलाबाचे ताटवे तेथे फुललेले असायचे. लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा आणि काळाही! आणि प्रत्येक रंगात असंख्य छ्टा! त्यामुळे रसिकांनी रंगाची होळी खेळण्यासाठी चांगलाच spot निवडला होता.

त्यादिवशी होळीला जाताना सॅमन नेहमीप्रमाणे गाडी मेन स्ट्रीट ऐवजी साउथ स्ट्रीटला वळवली आणि वर म्हणाला "तुला माहिती आहे, आज होळी खेळायला कोण येणार आहे? माधुरी दिक्षित!"

खर तर माझ अर्ध लक्ष माझ्या उद्याच्या driving टेस्टकडे होते.

मी: "Jokes apart सॅम, माझी उद्या driving टेस्ट आहे. काही तरी कर."
सॅम: "तुझी टेस्ट ठेव बाजूला - आजची माधुरी दिक्षित बरोबरची होळी enjoy कर!"

त्या दिवशीची होळी चांगलीच रंगली. सगळ्यांनी आणलेले रंग मध्ये ठेवले होते. दोन अडीच तास नुसती रंगांची उधळण चालली होती. सगळ्यांच्याच उत्साहाला नुसत उधाण आल होत. मागच्या back ground वर असंख्य रंगाच्या छटांचे गुलाब वाऱ्याच्या झोक्यावर डुलत होते. सूर्यास्त होत होता आणि मावळत्या दिनकराने आसमंतात असंख्य रंग उधळले होते. Perfect setting for रंगतदार होळी. पण, पण हे काय? सॅम कुठे होता? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी शोधक नजरेने दृष्टी फिरवली. सॅमतर मला कुठेच दिसेना. माझे मन सैर भैर झाले. मी पुन्हा सॅमचा शोध घेतला. तर तो दूर एकटाच झाडाखाली बसला होता. मी पळतच त्याच्या जवळ गेलो.

"हे काय सॅम एकटाच बसलायस? होळी खेळायची नाही?" मी विचारल. आणि पाहतो तर काय सॅमच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते - तो चक्क रडत होता. मी त्याच्या जवळ येतोय हे समजल्यावर त्याने स्वतःला सावरले आणि अश्रू पुसले.

"मला आज होळी खेळायची नाही." सॅम म्हणाला
"होळी खेळायची नाही? पण का?" मी विचरल.
"कारण सांगू? - माधुरी दिक्षित आली नाही म्हणून!" सॅम म्हणाला.

आता मात्र कहर झाला! मी त्याला तसाच फरफटत सगळ्यांमध्ये घेऊन गेलो. त्याच्या अंगावर रंग उडविले, भांग पाजली आणि शेवटी त्याला समोरच्या तलावात बुडविले - मग मन जरा शांत झाले.

दुसऱ्या दिवशी मी driving ची परीक्षा द्यायला गेलो. परीक्षेतील सगळ्यात अवघड टेस्ट म्हणजे गाडी ४५ अंशाच्या चढावर थांबविणे आणि तसूभरही मागे न जाऊ देता गाडी पुन्हा चालू करणे. हा भाग तर मी फारच शिताफीने पार केला. लेखी परीक्षेबद्दल तर प्रश्नच नव्हता. आता उरला तो शेवटचा, नवीनच add केलेला भाग. निरनिराळ्या रंगांच्या ठिपक्यांचे समूह - ते ओळखायचे. हि चाचणी झाल्यावर असा निष्कर्ष काढण्यात आला कि मी color blind (रंगांधळा) नाही. मी टेस्ट पास झालो होतो. मला नवीन driving license मिळाला होता.

आनंदाच्या भरात मी गाडी परत जायला मेन स्ट्रीटला घेतली. पहिला traffic सिग्नल लागला. हिरवा, पिवळा आणि लाल. मी थांबलो. लाल सिग्नलमधून गाडी घालायला मी काय सॅम आहे? आणि आता तर मी color blind (रंगांधळा) नाही हेही सिद्ध झालय! मी? मी रंगांधळा नाही? नाही, खचितच नाही! मग कोण आहे color blind ? माझ्या मनात कडाडून वीज चमकली. समोरून दुसरा सिग्नल येत होता. पुन्हा हिरवा, पिवळा आणि लाल. मी थांबलो. काय सॅम? सॅम color blind आहे? माझ्या शरीरावर सरसरून काटा उभा राहिला. माझी उत्सुकता शिगेस पोहोचली. समोरून तिसरा सिग्नल येत होता. आणि शेवटच्या सिग्नलचा लाल लाईट तोडून मी गाडी साऊथ स्ट्रीटला वळविली आणि थेट थांबविली ती हाउस नंबर ८ समोरच. बाहेर नाव लिहील होत "P. Collingwood." म्हणजे? म्हणजे माधुरी दिक्षित तेथे रहातच नव्हती? माझी शंका बळावली - सॅम खरच color blind असला पाहिजे.

मी थेट गाडी काढली ती सॅमच्या flat वरच. सॅम shower घेत असावा. मी सरळ त्याच्या drawing रूम मध्ये शिरलो. पाहतो तर काय - सॅमन माधुरी दिक्षितच चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला होता - अतिशय केविलवाणा प्रयत्न. केसांना हिरवा रंग, ओठांना पिवळा आणि गालांना निळा ! मला सॅमच्या रंगांधळेपणाबद्दल confirmation मिळाल होत. आणि सॅम नावाच कोड हळू हळू सुटत चालाल होत. ह्या सॅमन आपल्या जन्मजात दोषावर माधुरी दिक्षितच्या नावच अलगद पांघरून ओढलं होत. मेन स्ट्रीटपेक्षा साउथ स्ट्रीट त्याला बरा वाटत होता कारण मेन स्ट्रीटची ३ सिग्नल्स ओळखणं त्याला अवघड जात होत. रोझ गार्डन मधील गुलाबांचे रंग त्याला उमगत नव्हते, तर होळीतील रंग त्याला बेरंग करत होते - आणि म्हणूनच त्याला होळी खेळायची नव्हती.

तरी सुद्धा मला final confirmation हवे होते.

मी दिवाणखान्यात आलो. सॅमचाच मोबाईल उचलला आणि त्याच्या आईला फोन लावला.

"हेलो, सॅमची आईच बोलताय ना?" मी प्रश्न केला
"होय, आणि आपण?" पलिकडून आवाज आला.
"मी त्याचा मित्र बोलतोय. मला एक गोष्ट सांगा - काय सॅम color blind आहे?" मी सरळ मुद्याला हात घातला.
"होय! जन्मापासूनच!" सॅमची आई उत्तरली.
"मग तो driving कसा करतोय?" मी विचारणा केली.
"काय, सॅम driving करतोय?" सॅमच्या आईने आश्चर्याने विचारले.
मी म्हणालो, "होय! आई, हे आपण ताबडतोब थांबवील पाहिजे. एखादी दुर्घटना घडायच्या आधी. एक काम कराल? त्याला नवीन driving टेस्ट घ्यायला सांगा"

एवढ बोलून मी सॅमला न भेटताच बाहेर पडलो.

आणि जे व्हायचं तेच झाल. सॅम driving टेस्ट नापास झाला. त्यानंतर मी तब्बल महिनाभर सॅमला भेटलोच नाही. त्याला कस सामोरी जाव हेच मला समजेना. पण मन नेहमीच बेचैन असायचं. नंतर library मध्ये "Nature" जरनलमध्ये एक article पहायला मिळाल. "color blindness is curable" मी चपापलो आणि ते article अधाश्यासारख वाचल. "स्टेम सेल मधील संशोधनाने हे सिद्ध झाले आहे कि रंगांधळेपणावर उपाय करता येतो." काय? रंगांधळेपणा बरा होऊ शकतो? मग सॅमलासुद्धा .....?

मी शेजारीच असणाऱ्या संगणकावर झेप टाकली आणि गुगल सर्च केला - केवळ ३ शद्ब "color blindness, curable आणि Denver ." मला डेनव्हर जनरल हॉस्पिटलच्या स्टेम सेल संशोधन केंद्राचा पत्ता मिळाला होता.

आज सॅमची treatment चालू होऊन ६ महिने झालेत. सॅम treatment ला चांगलाच प्रतिसाद देतोय. त्याला रंगांचा अर्थ समजू लागलाय. आणि हो, कालच त्याला driving लायसेन्स पण मिळालाय बर का!

त्याच अभिनंदन करण्यासाठी काल संध्याकाळी मी त्याला भेटलो आणि म्हणालो: "रंगांच्या जगतात तुझ स्वागत!" त्यावर सॅम म्हणतो कसा, "बरोबर आहे, आता मला माधुरी दिक्षित चांगली कलर करता येईल!"

मी नुसताच हसलो आणि नकळत माझ्या तोंडातून शब्द निघाले "Biotechnology झिंदाबाद!"

(समाप्त)

गुलमोहर: 

मस्तच!
वाचन करताना कधी सॅम मध्ये गुंतुन गेलो कळलेच नाही.

जबरदस्त कथानक व शेवट एकदमच वेगळा जो मनाला खूप भावला.

chan

वेगळीच कथा... व्यंगावर/आजारावर आधारीत असूनही हलकीफुलकी वाटली.. Happy

या आधी जेव्हा प्रत्येक वेळी मेडीकल टेस्ट देताना कलर ब्लाईंडनेसची टेस्ट द्यायचो तेव्हा हसायला यायचे की काहीही फालतूच्या टेस्ट काय घेत बसतात.. रंगांधळे लोकांचा किंवा त्यांच्या आयुष्याचा कधी विचार केलाच नव्हता..

सर्वाना: कथा आवडल्या बद्दल आणि अभिप्राया बद्दल धन्यवाद! भेटू असेच पुन्हा कधितरी, कुठेतरी!!

Pages