स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज [२८ मे ] जन्मदिन ! त्या तेजाला विनम्र अभिवादन!

Submitted by दामोदरसुत on 25 May, 2012 - 00:37

" आणि म्हणून हिंदी राष्ट्राचा मूळ पाया , आधारस्तंभ , निर्वाणीचे त्राते असे हिंदू [सावरकरी व्याख्या] लोकच आहेत. एवढ्याकरिता हिंदी राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने देखील, हे हिंदूंनो ! तुम्ही हिंदु राष्ट्रीयत्वाला दृढमूल आणि समर्थ बनवा. हिंदुस्थानातील आपल्या कोणत्याही अहिंदू बंधूला, वास्तविक म्हटले म्हणजे जगातील कोणालाही, उगाच अपमान करून दुखवू नका. परंतु , न्याय्य आणि निकडीच्या, आपल्या जातीच्या [म्हणजे हिंदुजातीच्या] आणि देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असा, कि ज्यामुळे खंडाखंडामधून जे विशिष्ट संघ (आशियात पॅन इस्लामिक, युरोपीय राष्ट्रांमध्ये राजकीय , अमेरिका-आफ्रिका येथील वर्णाधारीत संघटना इ.) धिंगाणा घालीत आहेत त्यांच्याकडून विनाकारण हल्ले होणे बंद होईल व कोणालाही बेइमानपणाने तिला ठकविता येणार नाही.
हिंदुस्थानातील इतर जाती [सावरकरी हिंदुत्वात अंतर्भुत नसणारे धर्म या अर्थी] जोवर ' हिंदुस्थान आधी' असे म्हणत नाहीत किंवा जगातील इतर लोक ' मनुष्यजाती आधी' असे तत्वज्ञान आचरीत नाहीत, परंतु , जोपर्यंत हे लोक चढावाची व स्वसंरक्षणाचीच तयारी करण्यासाठी, केवळ जातीच्या वा धर्माच्या संकुचित दृष्टीने संघटना आणि जूट करण्याचा विश्वप्रयत्न करीत आहेत, तोपर्यंत हिंदूंनो! तोपर्यंत तरी तुम्ही शक्य तर तुमच्या जातीच्या जीवनाच्या व सामाजिक जीवनाला , ज्ञानततूंच्या जाळ्यांप्रमाणे एकजीव करणारी सर्व बंधने दृढीभूत करा. जे कोणी 'हिंदू' हे नाव आत्मघातकीपणाने नाकारतील त्यांना पुढे असा विषमय अनुभव येईल की आपल्या जातीच्या जीवनाच्या व सामर्थ्याच्या झर्‍यापासूनच त्यांनी स्वतःला तोडून घेतले आहे."

- वि. दा. सावरकर ( 'हिंदुत्व' मधून)

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'हिंदुत्व' संकल्पनेबद्दल कमालीचे विपर्यस्त लिखाण कसे केले जाते त्याचे विवेचन प्रा शेषराव मोर्‍यांच्या मूळ ग्रंथांमध्ये खूप विस्ताराने केले आहे ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
'हिंदुत्व' चे मूळ इंग्रजी हस्तलिखित सावरकरांच्या स्थानबद्धतेआधी रत्नागिरीच्या तुरुंगात असतांना सिद्ध झाले. ते त्यांनी गुप्तपणे कारागृहाबाहेर पाठवले. अभिनव भारत या संघटनेचे एक सदस्य विश्वनाथ विनायक केळकर [नागपूर] यांनी ते 'मराठा' या टोपण नावाने १९२४ मध्ये प्रकाशित केले. सावरकरांचे धाकटे भाऊ डॉ नारायण दामोदर सावरकर यांनी इंग्रजी ग्रंथाचे मराठी मध्ये भाषांतर केले. त्याची पहिली आवृत्ती चैत्र वद्य पंचमी शके १८४७ मध्ये [ सन १९२५ मध्ये ] प्रकाशित झाली. त्यानंतर त्याचे हिंदी भाषांतरही प्रसिद्ध झाले. मला उपलब्ध झालेली प्रत नारायणराव सावरकरांनी केलेले भाषांतर आहे [ तिसरी आवृत्ती , १४० पाने, किं. रु ६ ] .
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्यातील अनेक विचार बहुतांशी आजही सुसंगत [relevent] आहेत. हे विचार मांडले त्याकाळात सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते आणि त्यांना राजकारणात येण्यास प्रतिबंध होता आणि तो १० मे १९३७ पर्यंत होता. हिंदूंचे नेतृत्व बव्हंशी महात्माजींकडे होते पण आपण सर्वांचेच नेते आहोत हा त्यांचा दावा बहुसंख्य मुसलमानांना मान्य नव्हता. त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी महात्माजींनी 'खिलापती'सारख्या भारताशी असंबधित धार्मिक चळवळीला स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग केले असूनही. मुसलमात्र मात्र आम्ही गांधिजींच्या मागे नाही तर गांधीच आमच्या या चळवळीच्या मागे उभे आहेत असे सांगत होते. गांधिजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीला मुसलमानांचा पाठिंबा मिळावा म्हणून गांधिजी मुसलमानांच्या अधिकाधिक मागण्या मान्य करीत होते. हिंदूंच्या [येथे 'हिंदू'ची सावरकरी व्याख्या अभिप्रेत आहे] न्याय्य हक्कांचा या पायात बळी जाऊ नये ही सावरकरांना काळजी होती. या ग्रंथाला अशी तत्कालीन पार्श्वभूमी देखील होती. मुसलमानांच्या मागण्या नंतर वाढतच गेल्या, त्यांची पूर्तता करून घेण्यासाठी 'डायरेक्ट अ‍ॅक्शन' करून यशही मिळवले गेले आणि जीनांना पंतप्रधान करण्याची तयारी दर्शवूनही गांधिजींना फाळणी टाळता आली नाही. उपोषण करून डॉ. आंबेडकरांवर जसे नैतिक दडपण त्यांनी आणले तसा प्रयोग त्यांनी जीना, नेहरू, पटेल आदींवर नैतिक दडपण आणायला त्यावेळी का केला नाही हे समजत नाही. जीनांच्या 'डायरेक्ट अ‍ॅक्शन'च्या यशस्वी प्रयोगानंतर धार्मिक दंगली पुन्हा होण्याची १०० टक्के खात्री [ तसे नेहरूंनीच बोलून दाखविले आहे ] असूनही, त्या उसळल्यावर उपोषण करण्याऐव़जी फाळणी टळण्यासाठी किवा अटळच असेल तर निदान दोन्हीकडील हिंदु आणि मुसलमानांच्या जीव आणि वित्त यांचे संरक्षणाची पूर्ण तरतूद करण्यास भाग पाडण्यासाठी तरी उपोषणाचा विचार का केला नाही याचे उत्तर सापडत नाही. जे होऊन गेले त्यावर आता उपाय हाच कि आता तरी तशा चुका होऊ नयेत. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाकडे पाहिल्यावर आपण कांही शिकलो आहोत का असा प्रश्न पडतो.
.
आपल्या आसपास आणि जगात जे कांही चाललेले असते व आपणही वागतो त्याकडे करडी नजर ठेवून तपासले तर असे दिसते की उर्वरीत जग आपल्याला सावरकरांनी सांगितलेल्या मार्गावरून जायला भागच पाडत आहे. फरक इतकाच कि जबरदस्त किंमत मोजल्यावरच आपले एक पाऊल त्या दिशेने पडते. सावरकरांनी दाखवलेल्या 'लाल दिव्यां'कडे कायम दुर्लक्ष करण्यामुळे तशी वेळ आपल्यावर आली आहे.
पुन्हा अशी जबरदस्त किंमत आताच्या भारतातील नागरिकांना देण्याची वेळ येऊ नये म्हणून या ग्रंथात मांडलेले विचार सर्वांनीच मूळातूनच वाचावेत. त्यावर विचार करावा. घडून गेलेल्या घटना आणि घडत असलेल्य घटना यांकडे भाबडेपणाने न पाहाता डोळसपणे तपासाव्या, योग्य आचरण करावे.
वाचाल तर वाचाल आणि पुढील पिढ्यांनाही वाचवाल !
सावरकरांचे साहित्य आता इ-बुक स्वरुपात विनामूल्य उपलब्ध असल्याची माहिती श्री जोग यांनी अलिकडे दिली आहेच. त्यामुळे जिज्ञासूंना मूळचे लिखाण वाचण्यास कोणतीही अडचण उरलेली नाही.

हा लेख वाचणार्‍या सर्वांनाच मनापासून धन्यवाद !
या लेखावर फक्त'विचारपूस' मधून आलेल्या प्रतिसादांना येथे प्रतिसाद देण्याचे माझ्यापुरते मी ठरविले आहे.

गुलमोहर: 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
त्यांच्या तेजस्वी विचारांचे थोडे जरी अनुकरण करता आले तरी आपले सदभाग्य समजावे.

अंदमानातल्या तुरूंगात सलग १३ वर्षे ब्रिटिशांचा अनन्वित छळ सहन केलेल्या स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर या महान स्वातंत्र्ययोद्ध्याला अभिवादन!

थोर बुद्धिवादी, प्रखर राष्ट्रप्रेमी, भाषा-विशारद आणि प्रतिभावान कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र आदरांजली !

जामोप्या जी
हा लेख लिहायला सुरुवात केली तो लेखाचा दिनांक म्हणून आलेला दिसतो आहे. लेख कालच पूर्ण झाला होता पण आजच सकाळी प्रकाशित केला. हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. हा दिनांक संपादित करता येईल का ते पाहातो.

दामोदरसुत, धन्यवाद आठवणीबद्दल. सावरकरांबद्दल जेवढी जास्त माहिती होते तेवढे त्यांचे मोठेपण जास्त जाणवते.

हा खालील भाग फक्त मुद्द्यांबद्दल आहे. तुमच्या हेतूबद्दल शंका नाही.

आपण सर्वांचेच नेते आहोत हा त्यांचा दावा बहुसंख्य मुसलमानांना मान्य नव्हता. >>> १९३० चा भाग धरला तर सिंध, पंजाब, बंगाल, वायव्य सरहद्द हे मुस्लिम बहुसंख्य व सत्तेत बराच वाटा असलेले प्रांत कॉंग्रेसबरोबरच होते. म्हणजे "बहुसंख्य मुसलमानांना" हे जरा ताणलेले लॉजिक वाटते. कारण हे प्रांत जर काँग्रेसबरोबर असतील तर तेव्हाच्या कॉंग्रेस नेत्यांचे (त्यात गांधीजीही आलेच) नेतृत्व त्यांना मान्य होते असे म्हणता येइल.

दामोदरसुत,

>> या लेखावर फक्त'विचारपूस' मधून आलेल्या प्रतिसादांना येथे प्रतिसाद देण्याचे माझ्यापुरते मी ठरविले आहे.

लेखात शेवटी आपल्या विचारपुशीचा दुवा दिलात तर बरं होईल. Happy

आ.न.,
-गा.पै.

आजच सकाळी स्वातंत्रवीरांच्या सावरकरांच्या जन्मभुमीत - भगुर - येथे जावून त्यांच्या घरात त्यांना विनम्र वंदन करून आलो. त्यांना वंदन करतांना मन भरून आले होते.

स्वातंत्रवीर सावरकरांचा विजय असो!!!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
त्यांच्या तेजस्वी विचारांचे थोडे जरी अनुकरण करता आले तरी आपले सदभाग्य समजावे. >> +१

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र आदरांजली !

स्वातंत्रवीर सावरकरना अभिवादन.

गांधीजी सार्‍या विश्वाचे आदर्श आहेत. त्यात हिंदुंचे, मुसलमानांचे असे वादही घालणे योग्य नाही.

असो.

महान क्रांतीवीर आणि हिंदुनेते सावरकर याना पुन्हा एकदा आदरांजली.

ज्या विभूतीचे नाव आणि स्मरण करताच 'तेज' समोर झळकले असे वाटते, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.

@ चंद्रगुप्त

"गांधीजी सार्‍या विश्वाचे आदर्श आहेत. त्यात हिंदुंचे, मुसलमानांचे असे वादही घालणे योग्य नाही."

~ अगदी योग्य विचार.....सहमत....ज्या काळात तसे वाद घातले असतील त्याचा सद्यस्थितीत विचार करणेही अयोग्य.

अशोक पाटील

हिंदुस्थानातील इतर जाती [सावरकरी हिंदुत्वात अंतर्भुत नसणारे धर्म या अर्थी] जोवर ' हिंदुस्थान आधी' असे म्हणत नाहीत

भारतात असणार्‍या सर्व धर्माना कायद्याने स्वतंत्र आस्तित्व दिलेले आहे. त्यामुळे हिंदु वगळता इतर धर्म म्हणजे जाती आहेत, अशा वल्गना करणे इष्ट नाही. हिंदुही धर्मच आणिकोण कुठला अल्पसंख्यसेल तर तोही धर्मच..

http://twocircles.net/2011jan16/muslims_just_3_army_account_6_martyrs.html

जम्मु आणि काश्मीर इन्फन्ट्रीत तर ५० % अहिंदु आहेत आणि १९४७ पासून आजअखेर झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणावर त्या धर्माचे लोक भारतासाठी शहीदही झालेले आहेत.

http://www.globalsecurity.org/military/world/india/rgt-jakli.htm

http://en.wikipedia.org/wiki/Jammu_and_Kashmir_Light_Infantry

त्यामुळे स्वातंत्र्यवीरांचे नाव घेऊन कुठल्या तरी धर्माना सरसकट धोपटणे इष्ट नाही.

दामोदरसुत, तुमचा सावरकरांबद्दलचा आदर, भक्ती, त्यांच्या कार्याचा अभिमान, त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोचावी ही कळकळ अत्यंत खरी आहे, त्याबद्दल तुमचे नक्कीच कौतुक आहे.
पण तुमच्या कोणत्याही लेखात अजून एक लेख लपलेला असतो, ज्यात तुमचा हिंदुत्ववादी- गांधीविरोधी अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न स्पष्ट्च असतो. ही कसरत कशासाठी? तुम्हाला सावरकरांचे कर्तुत्व सांगयचे आहे ही उत्तम बाब आहे पण त्याआडून चालवलेले तिरकस शरसंधान नको त्या प्रतिक्रिया आणि भांडणे यांना आमंत्रण देतात. आणि यासगळ्यात तुमचा 'सावरकर विचार' पोचवण्याचा मूळ उद्देश बाजूला पडतो. मग शंका ही येते की हा मूळ उद्देश आहे की सावरकर केवळ एक निमित्त आहेत?
माझाच लेख भरकटवला जातो म्हणून मी फक्त विपूतच चर्चेला उत्तर देईन, ही वेळ का आली याचा थोडा विचार करा.

@ गा. पै.

आपण मायबोलीवरचे खरोखरच गामा पैलवान! तरीही विपु ची लिंक का द्यावी लागते आहे ते समजले नाही. कारण आतापर्यंत तरी ज्यांनी मला विपुत लिहिले त्यांना अशी लिन्क पाठवावी लागलि नव्हती.
ही लिन्क कशी द्यायची हे मला कोणीतरी कृपया सांगावे.

Pages