घराच्या दारासमोर पायरीवर रामा एकटाच विमनस्क अवस्थेत बसलेला होता. गेले दोन दिवस लोकांचे प्रश्न ऐकून ऐकून बिचार्याचा जीव कावला होता.
'कमळी कुठं गेली रे? '
'रामा, तिला कुणी पळवलं तर नसेल? '
'तिचं कुणासंगट लफडं होतं का रे?'
'गावात सगळीकडं शोधलं म्हंतोस, खरं गावातल्या पडक्या हिरीत बघितलास काय रे?'
एकेकाचा एकेक प्रश्न. आणि एकाही प्रश्नाचं उत्तर बिचार्या रामाकडे नव्हतं. 'पाचामुखी परमेश्वर' असं म्हणतात खरं, पण अशा वेळेला लोकांच्या तोंडून परमेश्वर नव्हे सैतान बडबडत असतो, याचा पुरेपूर अनुभव रामा दोन दिवस घेत होता. शब्द वेगळे, प्रश्न वेगळे परंतु सगळ्यांचा अर्थ एकच होता- कमळी गायब आहे. रामाची एकुलती एक पोरगी, दहावीच्या वर्गात जाणारी, तरणी पोर दोन दिवसांपासून गायब होती.
त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच ती शाळेला निघाली. जाण्यापूर्वी रोजच्या सवयीनुसार स्वयपाकघरातल्या देवघरासमोर गेली. तिने डोळे मिटून मनोभावे देवाला नमस्कार केला . डोळे उघडले. देवघरात एका छोट्या ताटलीत ठेवलेल्या अंगठीकडे बघत रामाला म्हणाली, ' बाबा, या अंगठीवर कमळाचं चित्र का कोरलेलं आहे?'
ती अंगठी तिच्या आईची-जानकीची होती. कमळी जन्मली त्यावेळी तिनं स्वतः साठवलेले पैसे खर्चून ती एक तोळ्याची सोन्याची अंगठी बनवलेली होती. पोरीच्या लग्नात ही अंगठी ती तिला देणार होती. पण कमळी सहा महिन्याची असताना कसल्याश्या आजाराने जानकी मरण पावली. जाताना रामाच्या पदरात दोन गोष्टी घालून गेली. कमळी आणि अंगठी. जानकीच्या मृयुत्युनंतर ती अंगठी देवघरात आली . तिलाही देवत्व मिळालं. ' तुझ्या आईला कमळाचं फूल फार आवडायचं. कमळ म्हणजे लक्ष्मी असं ती म्हणायची. आपला संसार कमळागत फुलावा हे तिचं स्वप्न होतं. म्हणून तिनं अंगठीवर कमळ कोरून घेतलं होतं.'
बापाचं उत्तर मनात साठवून पोर शाळेला गेली.
आणि गेली ती गेलीच. संध्याकाळचे आठ वाजले तरी तिचा पत्ता नाही. शाळेत एक्स्ट्रा क्लास असेल, असं समजून रामानं आधी दुर्लक्ष केलं. पण तिच्याच वर्गातली शेजारची मीना आधीच आली होती, हे कळल्यावर त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानं तडक तिची शाळा गाठली. गेटला भलं मोठं कुलुप. अंधारात त्यानं कमळीच्या नावानं दोन हाका मारल्या. पण अंधारात बुडलेल्या आणि कुलपात जखडलेल्या शाळेतून कसलाही प्रतिसाद आला नाही. तिच्या सगळ्या मैत्रिणींची घरं पालथी घालून झाली. संध्याकाळपर्यंत कमळी शाळेत होती. नंतर कुठे गेली, हे कोडं मात्र सुटलं नाही. हताश होऊन त्यानं गाव पिंजून काढला. या धावपळीतून एकच गोष्ट झाली. कमळी गायब झाली ही गोष्ट गावभर पसरली. चर्चेला ऊत आला. काय करावे हे रामाला समजतच नव्हते. कोण सांगत होतं पोलिसात कळव, कोण म्हणत होतं, गावात दोन दिवसानी आमदार दगडे पाटील येणार आहेत. डायरेक्ट त्यानाच गाठ.
तूर्त पोलिसात गेलेलं चांगलं . हा विचार करून रामानं पोलिस स्टेशन गाठलं. फौजदारसाहेबानी रामाची संपूर्ण हकीकत ऐकून घेतली. मग हलक्या आवाजात प्रश्न केला, ' ती कुठं आहे?'
'कोण? कमळी?'
' कमळी नव्हं, अंगठी- अंगठी.. ती कुठं आहे?' त्यांचा तो प्रश्न आणि त्यामागचा मतलब रामा समजून चुकला.
'पण...'
'पण नाही बीण नाही. गावात दोन दिवसानी आमदार दगडे पाटील येणार आहेत. आपल्या गावचे पुढारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मानेसाहेब हेही त्यांच्यासोबत असणार आहेत त्यांची व्यवस्था पहायला. त्यांची मोठी सभा होणार. त्याच्या बंदोबस्ताचं काम सोडून तुझ्या पोरीच्या मागनं मी फुकट कशासाठी फिरु?'
सुन्न होऊन रामा ऐकत होता. कमळीला दैवानं गिळलं आणि हा आता अंगठीला गिळणार. ही फरपट टाळणं आपल्या हातात नाही, हे त्याला कळून चुकलं.. फार नाही, वीस मिनिटं. फौजदार साहेबाना फार वेळ वाट पहावी लागली नाही.
अधाशी नजरेनं फौजदार अंगठीकडे बघत बसले होते.
' काय साहेब, आत यावं काय?'
हाक कानावर पडताच चमकून त्यानी दाराकडे पाहिलं. दारात नाना कापसे उभा होता. नाना व्यवसायानं पत्रकार. पण बातम्या छापण्यापेक्षा न छापणं जास्त फायद्याचं असतं या तत्वावर त्याची पत्रकारिता चालत होती. गावातल्या बेकायदेशीर व्यवहारांचे पोलिसांसमवेत हप्ते ठरवणं, नवीन बातम्या पोलिसाना पुरवणं आणि पोलिसांकडून त्यांच्या फायद्यातून आपला हिस्सा खाणं हा त्याचा खरा उद्योग होता.
'म्हटलं जरा हिशोब क्लिअर करावा. दोन महिने इकडं यायला जमलं नाही. शिवाय दोन दिवसानी दगडे पाटलांची सभा आहे. दुसर्या दिवशी पेपरात त्यांचा आणि तुमचा फोटोही छापून देऊ......' लाचार हसत कापसे म्हणाला.
' या खेपेला पैशाऐवजी वस्तू दिली तर चालेल काय?'
' न चालायला काय झालं? तुम्ही द्याल ते लाखमोलाचं असणार.'
'लाखमोलाचं काय नाही. पण बावन्नकशी आहे, हे मात्र नक्की.' फौजदारानी दिलेली वस्तू खिशात टाकून कापसे उठला.
' काय लगेच निघालात?'
' होय, मानेसाहेबाना जरा भेटायचे आहे. उद्या परवा ते आमदारांच्या सभेच्या कामात असणार. आजच भेटलेलं बरं. महत्वाचं काम आहे. '
साहेबाना कोड्यात टाकून कापसे निघाला.
***********************************************
' गाडी उजवीकडे वळवा.' मानेसाहेब ड्रायवरला सूचना देत होते. आमदार दगडे पाटलांची गाडी सभास्थानी निघाली होती. माने आणि दगडे पाटील यांच्या गप्पा सुरु होत्या. अचानक दगडेसाहेबांचं लक्ष मानेसाहेबांच्या हाताकडे गेलं. ' आँ, अंगठीवर कमळाचं चित्र? ही कुठली अंगठी? ' त्यानी विचारलं.
'अशीच कुठलीतरी, आता आपलीच.' मानेसाहेब म्हणले.
'म्हणजे?'
' एका मास्तरणीची बदली करायची होती. तिचा नवरा पत्रकार. नाना कापसे. आमच्याच टोळक्यातला आहे. परवा संध्याकाळी आला होता. शिक्षण उपसंचालकांकडे शब्द टाका म्हणाला. मी म्हटलं काम करतो तुझं. तर नको नको म्हणत असताना ही अंगठी देऊन गेला.'
'तुम्हाला ही अंगठी नको होती?' आमदारसाहेबानी हसत विचारलं.
'-------'
' मग द्या की मलाच.'
अंगठी गेली हे मानेसाहेबानी ओळखलं. ..
आमदार दगडे साहेबांची सभा नेहमीप्रमाणेच गाजली. कुणीतरी लिहून दिलेल्या भाषणापेक्षा स्वतःच मोकळेपणानं बोलणं हा त्यांचा आवडता छंद. याच्या जिवावरच तर ते वस्तादपणे राजकारणात टिकून होते. भाषण संपलं. टाळ्यांचा कडकडाट होत असतानाच ते परत आपल्या खुर्चीकडे निघाले. तेवढ्यात त्यानी पाहिलं की कुणीतरी एक इसम स्टेजकडे धावत पळत येतोय. आजूबाजूचे लोक, पोलिस कुणालच न जुमानता तो स्टेजकडे पळत येत होता.
तो रामा होता. आमदारसाहेबानी जवळच बसलेल्या मानेसाहेबांकडे नजर टाकून नजरेनेच प्रश्न केला - हा काय प्रकार आहे? मानेसाहेबानी दगडे पाटील साहेबांच्याकडे धाव घेतली आणि सांगितलं, ' साहेब, हा पळत येणारा माणुस रामा आहे. याची तरुण मुलगी दोन दिवस झाले बेपत्ता आहे. हेच गार्हाणं घेऊन तो येत असणार.'
'मग?'
' एक माणूस त्याच्या हरवलेल्या मुलीचं गार्हाणं घेऊन आपल्यापर्यंत येत आहे. समोर पन्नास एक हजार पब्लिक बसलं आहे. असं काहीतरी बोला की जमाव थक्क होऊन जाईल. लोकांचं मन जिंकण्याची सुवर्ण संधी दवडू नका साहेब.'
रामा पळत येत होता. आमदार विचारमग्न झाले होते.
सु व र्ण सं धी ! सु व र्ण ! सं धी !!!
त्यांच्या नजरेसमोर अक्षरानी फेर धरला होता.
जमावात हलकल्लोळ माजला होता. एव्हाना रामा स्टेजवर येऊन पोहोचला होता. त्याला जवळ घेत आणि जमावाला शांत होण्याचं आवाहन करीत दगडे साहेब बोलू लागले-
' या माणसाची हकीकत आम्हाला आताच समजली आणि वाईट वाटले. सीता, सावित्री, अहिल्या यांच्या देशात एक मुलगी पळवली जाते , ही घटनाच माणुसकीला काळीमा फासनारी आहे. पण त्या मुलीचा शोध लावण्यासाठी आमचे पोलिस अगदी आकाश पाताळ एक करतील याची मी हमी देतो.'
एवढं बोलून आमदारसाहेबानी खिशातून एक अंगठी बाहेर काढली आणि लोकाना दाखवत ते बोलू लागले-
' आमचं बोलणं आणि आमचं सरकार म्हणजे विरोधी पक्षासारखं पोकळ नाही, याचा विश्वास म्हणून ही अंगठी मी या माणसाला देत आहे. यांची मुलगी मिळेल, आम्ही शोधू.. तिच्या लग्नाचा हा अॅडवान्समध्ये दिलेला आहेर समजावा.'
क्षणभर शांतता पसरली. आणि मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ' आमदारसाहेब जिंदाबाद' ' दगडे पाटलांचा विजय असो' घोषणानी वातावरण दुमदुमलं आणि स्टेजवरच्या नेतेमंडळींमध्ये चैतन्य पसरलं.
पत्रकार पुढे सरसावले. फ्लॅशेस चमकले.
रामानं डबडबत्या नजरेनं अंगठीकडे पाहिलं. डोळ्यातलं पाणी सरताच त्याला ती अंगठी अगदी लख्खपणे दिसली आणि तो चमकला.. अंगठी, त्यावरचं कमळाचं चित्र..... अरे, ही तर आपलीच अंगठी. तो मनोमन सुखावला. घरातून बाहेर पडलेली अंगठी पुन्हा परत आली.. उद्या कदाचित कमळीही....
आणि तिथेच त्याच्या विचाराने दिशा बदलली.
आपण तर ही अंगठी फौजदाराना दिली होती.. काय झालं असेल तिचं पुढं? किती जणानी तिला हाताळलं असेल.. अंगठी कसली सोंगटीच म्हणायची. ज्यानं त्यानं आपल्या सोयीसाठी तिला वापरलं असणार!
कमळीसुद्धा कदाचित अशीच सोंगटी होऊन इकडे तिकडे फिरत असणार..
आपल्या मनातला हा विचार काढून टाकणं त्याला आता शक्य नव्हतं, आताच काय कदाचित आयुष्यभर त्याला हाच विचार घेऊन जगावं लागणार होतं. तो हातातल्या अंगठीकडे पहात होता.
नजरेसमोर हळुहळू पसरणारा काळा विचार सोनेरी अंगठीला काळवंडून टाकत होता.
******************************************************************************************************
४-५ वर्षापूर्वी एका दैनिकात ही कथा प्रसिद्धही झाली होती.
*******************************************************************************************************
वाचतो जामोप्या
वाचतो जामोप्या
लेखनशैली छान आहे. आवडली कथा.
लेखनशैली छान आहे. आवडली कथा.
छान आहे.
छान आहे.
छान
छान
आवडली कथा.
आवडली कथा.
आवडली
आवडली
सुन्न. त्याचे मनातले हे विचार
सुन्न. त्याचे मनातले हे विचार तो अंगठीला (तीला) स्विकारेल का नाही येथे येउन थांबतात.
हिच समाजाची खरी रड आहे.
नको वाटतय आजकाल अस काही
नको वाटतय आजकाल अस काही वाचायला
शैली आवडली जामोप्या
छान लिहिलय
पण अस कुणाच्या आयुष्यात कधीच घडू नये
मस्तच.
मस्तच.
खूप छान कथा आहे.. भिडली..
खूप छान कथा आहे.. भिडली..
गुंतवून ठेवणारी कथा
गुंतवून ठेवणारी कथा आहे.
भारीच लिहितोस जामोप्या. बोल्ला नाहीस कधी?
उत्तम. लहानच पण बावनखणी.
उत्तम. लहानच पण बावनखणी.
मस्तच ..
मस्तच ..
सआदत मन्टोची ़खोल दो
सआदत मन्टोची ़खोल दो वाचल्यानन्तर ही कथा वाचली. सुन्न् झाले.
मस्त कथा आहे गंमतीशीर प्रवास
मस्त कथा आहे
गंमतीशीर प्रवास अंगठीचा, पण प्रत्येक टप्प्यावर आपल्या समाजातील कीड दाखवत पुढे जातो
अभिनंदन कागलकर
चांगली लिहिली आहे कथा.
चांगली लिहिली आहे कथा.
बहोत खूब... जामोप्या, सलाम...
बहोत खूब...
जामोप्या, सलाम... इतका छोटा जीव असलेल्या ह्या कथेचा शेवटही खूप आवडला...
नको वाटतय आजकाल अस काही
नको वाटतय आजकाल अस काही वाचायला- अगदी अगदी. डिप्रेस झाले मी. पोरीच काय झाल असेल याचा विचार करून.
असो. जामोप्या शैली छान आहे.
जामोप्याचा आय डी डिलिट
जामोप्याचा आय डी डिलिट झाला.
श्रद्धांजलि
छान आहे. आवडली कथा..
छान आहे. आवडली कथा..
थोडक्यात पण मनाला भिडणारं...
थोडक्यात पण मनाला भिडणारं... छान
आपण तर ही अंगठी फौजदाराना
आपण तर ही अंगठी फौजदाराना दिली होती.. काय झालं असेल तिचं पुढं? किती जणानी तिला हाताळलं असेल.. अंगठी कसली सोंगटीच म्हणायची. ज्यानं त्यानं आपल्या सोयीसाठी तिला वापरलं असणार!
कमळीसुद्धा कदाचित अशीच सोंगटी होऊन इकडे तिकडे फिरत असणार.. >>>
बापरे फार भयंकर आहे. कथा आवडली.