कोकम फळाचे /रातांबे [आमसुल]सरबत.

Submitted by सुलेखा on 18 May, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आमसुलाची फळे [कोकम] ३० नग.
साखर ४ वाट्या भरुन.
रुंद तोंडाची काचेची बरणी.

क्रमवार पाककृती: 

हे नैसर्गिक सरबत सहज सोपे आहे.यासाठी चा वेळ हा प्रत्यक्ष कृति चा आहे.त्यानंतर ७-८ दिवस उन्हात बरणी ठेवायची आहे.भरपुर रस सुटला कि सरबत तयार.
आमसुलाची फळे धुवुन पुसुन घ्यावी.
मधुन चिरुन प्रत्येकी एकाच्या दोन फोडी कराव्या.
फळ गोल आकाराचे असते त्यामुळे वाटी च्या आकाराच्या सर्व फोडी होतील.
फोडी करतानाच मधल्या बिया काढुन घ्याव्या.
आता प्रत्येक वाटीत मावेल इतकी साखर भरुन सर्व फोडी भरुन घ्याव्या व बरणीत अलगद एकावर एक जमवा.जर साखर उरली तर ती बरणीत वर पसरुन टाका .
kokam -1.JPG
रोज उन्हात ठेवा.साखर रसाबरोबर विरघळुन "आमसुलाचे सरबत /कोकम सरबत" तयार साखर भरल्यावर अगदी अर्ध्या तासातच बरणीत सुंदर रंगाचा रस सुटलेला दिसतो.
मी काल रात्री केले आहे व आज फोटो काढला आहे.
kokam -2.JPG
७ ते ८ दिवसांनी यातील फोडी मोडणार नाहीत अशा रितीने अलगद पिळुन काढायच्या त्यावर मीठ घालुन त्या वाळवायच्या कि आमटीत/भाजीत घालायला ,आमसुलाची चटणी करायला आमसुले तयार होतील.
हा तयार रस एक भाग व थंडगार पाणी तीन भाग किंचित मिठ घालुन सरबताचा आस्वाद घ्या.

अधिक टिपा: 

साखर विरघळायला साधारण ८ दिवस तरी लागतात.
उन्हात ठेवले तर साखर लौकर विरघळते.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या दिवसात रातांबे तयार झाले असतील ना, त्याची आठवण झाली.
पुर्वी कोकणात घरोघर असे सरबत तयार करत असत. ताजे रातांबे मिळाले तर रंगही सुंदर येतो.

केदार्,बिया काढुन एक फुलपात्र भर पाण्यात टाकुन त्याचा सर्व गर काढुन घ्यावा.त्यात जिरेपुड्,मीठ व पिठीसाखर घालुन लागेल तसे थंड पाणी घालावे.लगेच पिण्यासाठी सरबत तयार ..यात रंग थोडा कमी असतो पण चव मात्र छान असते.

मस्त. कोकम सरबत पहिल्यांदा जेव्हा बनवल त्यावेळी मी तर सत्यानाशच केलेला या रेसेपीचा आणि कोकमांचा. छान बिया वगैरे काढुन भरपुर साखर भरुन उन्हात ठेवलेल. आणि मी आणि भावंड रोज अपेक्षेने बाघायचो आता रंग बदलेल आता रंग बदलेल. पण तेव्हा कोणाला माहित बियांमध्येच खरा स्वाद असतो. मग आज्जीने सांगितल काय चुकल ते. फेकुन दिल सगळ. वर आज्जी म्हणे पहिल्या वेळेला चुकलीस ना, आता आयुष्यभर लक्षात राहील.

व्वा! मस्तच. कोकण ट्रिप झाली की हा उद्योग दरवर्षी असतोच. यंदा बहुतेक कुणी तरी रातांबे आणून देतील.
पण तू उसगावात ना? तिकडे मिळतात रातांबे?
आणि या सरबताला हिरवी मिरची अलगद ठेचून लावतात. काय मस्त चव येते. अगदी हलकासा झटका.
२ वर्षापूर्वी कोकणातच एकांकडे असं कोकम सरबत प्यायले होते.

उन्हाळय़ात पित्तकारी पदार्थ जास्त खाल्ल्याने अंगावर पित्ताच्या गाठी येतात. त्या गाठींवर ताजा आमसुलाचा रस करून चोळल्यास आणि आमसुलाचं सरबत करून प्यायल्यास गाठी कमी होऊन त्वचा पूर्ववत होते. (माहिती जालावरुन साभार)

सुलेखा,मस्त!! सरबताचा रंग सुरेख आला आहे Happy
पण घरात आमसूल असेल तर सरबत करता येते का?ते कसे करतात?

रेसिपीसाठी धन्यवाद.

पूर्वा, आमसुलं पाण्यात कोळून घे. मग त्यात चवीनुसार साखर, जिरेपूड घाल. सहसा आमसुलांना टिकवण्यासाठी मीठ लावलेलं असतं, तेव्हा ते चव बघून लागलं तरच घाल. पाणीसुद्धा चवीनुसार घाल असं म्हणेन.

घरात आमसुले असतील तर सरबत,आमसुलाचे/कोकम सार-नारळाच्या दुधातले,आमसुलाची चटणी करता येते.
आमसुले थोडी सुकी असतील तर पाण्यात भिजत घालायची .मिक्सरमधे थोडे भाजलेले जिरे व साखर घालुन वाटुन घ्यायची .याचा उपयोग सरबत व सार करण्यासाठी करायचा .सार करताना नारळाच्या दुधात हे वाटलेले आमसुलं,अगदी लहानशी लसुण कळी ठेचुन [पण सबंध ] व हिरव्या मिरच्यांचे तुकडे,मीठ घालायचे.या साराला फारच सुंदर आमसुली रंग येतो व चव ही खुपच मस्त येते.
चटणी साठी लाल तिखट,भाजलेले जिरे,आमसुले ,साखर/गुळ पाणी घालुन सरसरीत वाटायचे ,मीठ घालुन पुन्हा फिरवायचे.पोळी/ब्रेड/पराठा -भजी/वडे -उत्तप्पा/दोसा काहीही घ्या ही चटणी खाता येते.यातील घट़कांचे गुणधर्म पहाता अतिशय गुणकारी चटणी आहे तसेच टिकाऊ आहे.लहान मुलांना जॅम ऐवजी दिली पाहिजे व मोठ्यांनीही खाल्ली पाहिजे.
मानुषी ,मी सध्या मुंबईत आहे.

आमच्या घरी आमसुलाची चटणी फक्त श्राद्धाला करतात.. इतर वेळेला मागितले तर दणके मिळतील. ( हिंदु धर्म की जय! )

जामोप्या,
अगदी खरे आहे तुमचे म्हणणे.तांदुळाची खीर्,उकड काढलेले वडे अन ही आमसुलाची चटणी फक्त श्राद्धालाच करतात्.पण इतर भाषी लोकांच्यात राहुन तांदुळाची खीर एरवी नेहमीच खाऊ व करु लागले .त्यामुळे वडे व आमसुल चटणी नेहमी करते.आपल्या मनाची तयारी हवी.

सह्हीच! कोकणातुन येताना नेहमी आणायचो रातांबे आणि घरी येताच आई त्यांचे असे सरबत करायची. मला ते रातांबे मुरेपर्यंत अजिब्बात धीर नसायचा मग हळुच बरणीतून एक-दोन रातांबे लम्पास करायचे Lol

देशातुन येताना आगळ आणते नाहीतर आता इथे क्रॅनबेरी ज्युस मधे जीरेपूड घालुन पिते....

मी अगदी हिच रेसिपी लिहिण्या साठी आले होते आज.

केदार्,बिया काढुन एक फुलपात्र भर पाण्यात टाकुन त्याचा सर्व गर काढुन घ्यावा.त्यात जिरेपुड्,मीठ व पिठीसाखर घालुन लागेल तसे थंड पाणी घालावे.लगेच पिण्यासाठी सरबत तयार ..यात रंग थोडा कमी असतो पण चव मात्र छान असते. >> आम्ही त्याला कोकमाचं पन्हं म्हणतो.

कोकमाचा कुठलाच भाग वाया जात नाही बिया सोडल्यास.. गराचे मस्त पन्ह, रसाचे सरबत आणि साल परत सुकवून गोडामसुले!

मला एक शंका आहे.. उन्हात ठेवायला जमले नाही तर खराब नाही ना होणार सरबत ? सध्या ऑफिसमुळे रोज उन दाखवणे जमत नाहीये

कोकमाच्या बिया या तेल बिया असून कोकणी शेतकर्‍यासाठी पैसे कमवून देणारे पीक आहे...
मला वाटतं की घरगुती वापरात १०/२० रातांबे वापरल्याने त्याच्या बीया काय करणार / कुठे विकणार ? म्हणुन वाया जातात..

मस्त, रंग बघूनच तोंडाला पाणी सुटते. पित्ताचा त्रास असेल तर कोकम सरबत हे अमृतासमान.
मी त्यावरच जगतो. आगूळ देखील घरात ठेवतोच.
आजारातही तोंडाला चव नसेल तर लिंकोमीसा सरबत बनवतो. लिंबू कोकम मीठ साखर साधेसेच घटक पदार्थ. पण बनवायची पद्धत कोकम उकळून, लिंबू साखर जाळून वगैरे..

इतका वेळ लेख दिसत होता पण ऋन्म्याचा प्रतिसाद बघितला आणि हे कॉकटेल मध्ये छान लागेल हा साक्षात्कार झाला. Proud

आता आजकाल कुणी वापरत नाही..... आं,कोणी सांगितले?

सोलकढी,काही आमट्या ,पिठले यात जरूर वापरतो.आगळापेक्षा सोलांची चव सोलकढीत जास्त चांगली लागते.

आमच्या गावात मिळत नाही तर आमसुलांसाठी मुद्दाम टोरांटोची दुकानं पालथी घालतो दर ट्रिपला.
सोलकढी, सार, पिठलं, आमटी यात आमसुलाशिवाय मजाच नाही.

सोलकढी, सार, पिठलं, आमटी यात आमसुलाशिवाय मजाच नाही. <<< खरं आहे.
मासे पण आम्ही कोकमाच्या आगळात करतो...:)

तरी प्रमाण कमी झाले आहे

अमाहाराष्ट्री किराणा मालाच्या दुकानात आमसूल , मेतकूट विचारले की त्यांना ते आधी म्हणायला शिकवण्यात 2 मिनिटे जातात, मग हरवलेल्या व्यक्तीसारखे रंग गव्हाळ , लांबी रुंदी, गोल , पावडर , चव इ सांगावे लागते.

सरबताच्या दुकानात मात्र उलट प्रकार असतो, तिथले भैय्ये कोकम सरबत मागितले की ये आयुर्वेदिक पौधे से बनता है इ सांगत बसतात.

Pages