कोकम फळाचे /रातांबे [आमसुल]सरबत.

Submitted by सुलेखा on 18 May, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आमसुलाची फळे [कोकम] ३० नग.
साखर ४ वाट्या भरुन.
रुंद तोंडाची काचेची बरणी.

क्रमवार पाककृती: 

हे नैसर्गिक सरबत सहज सोपे आहे.यासाठी चा वेळ हा प्रत्यक्ष कृति चा आहे.त्यानंतर ७-८ दिवस उन्हात बरणी ठेवायची आहे.भरपुर रस सुटला कि सरबत तयार.
आमसुलाची फळे धुवुन पुसुन घ्यावी.
मधुन चिरुन प्रत्येकी एकाच्या दोन फोडी कराव्या.
फळ गोल आकाराचे असते त्यामुळे वाटी च्या आकाराच्या सर्व फोडी होतील.
फोडी करतानाच मधल्या बिया काढुन घ्याव्या.
आता प्रत्येक वाटीत मावेल इतकी साखर भरुन सर्व फोडी भरुन घ्याव्या व बरणीत अलगद एकावर एक जमवा.जर साखर उरली तर ती बरणीत वर पसरुन टाका .
kokam -1.JPG
रोज उन्हात ठेवा.साखर रसाबरोबर विरघळुन "आमसुलाचे सरबत /कोकम सरबत" तयार साखर भरल्यावर अगदी अर्ध्या तासातच बरणीत सुंदर रंगाचा रस सुटलेला दिसतो.
मी काल रात्री केले आहे व आज फोटो काढला आहे.
kokam -2.JPG
७ ते ८ दिवसांनी यातील फोडी मोडणार नाहीत अशा रितीने अलगद पिळुन काढायच्या त्यावर मीठ घालुन त्या वाळवायच्या कि आमटीत/भाजीत घालायला ,आमसुलाची चटणी करायला आमसुले तयार होतील.
हा तयार रस एक भाग व थंडगार पाणी तीन भाग किंचित मिठ घालुन सरबताचा आस्वाद घ्या.

अधिक टिपा: 

साखर विरघळायला साधारण ८ दिवस तरी लागतात.
उन्हात ठेवले तर साखर लौकर विरघळते.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लॅककॅट, मराठी वस्ती असलेल्या दुकानात जा. मुंबईत किराणा माल दुकानदार मराठी असलेलं मला एकही दुकान माहित नाही. Happy

सोलकढी, सार, पिठलं, आमटी यात आमसुलाशिवाय मजाच नाही. <<< खरं आहे.
मासे पण आम्ही कोकमाच्या आगळात करतो...:)

>>>>>>

याला माझाही +७८६
कोकम किंवा कोकमाच्या आगळाशिवायही मासे करता येतात हे जेव्हा मला समजले तेव्हा तो माझ्यासाठी कल्चरल शॉक होता.

मुंबईत किराणा माल दुकानदार मराठी असलेलं मला एकही दुकान माहित नाही. Happy
>>>>>

पण त्यांना मराठी नावे सगळी माहीत असतात.
लहानपणी मला प्रश्न पडायचा की या अमराठी लोकांना आता अमुकतमुक पदार्थ हिंदीत कसा सांगावा... पण नंतर समजू लागले की मलाच माहीत नाही ते शब्दही त्यांना माहीत आहेत. धंदा आहे तो त्यांचा. मराठी माणसे गिर्हाईक आहेत त्यांची. रिकाम्या हाती परत गेली तर नुकसान नाही का..

अगदी. आता इथे कोकम, आगळ वगैरे मिळत आणि आमसुलाशिवाय आमटी नाहीच. गुळ आणि आमसुल हवच. कार्ल्याच्या भाजीला आणि रसमला तर हवच हव. एकदा शेंगदाण्याचा कुट घातलेली (सांगली कोल्हापुर जिल्ह्यात करतात तशी गुळ घालुन आणि कोल्हापुरी तिघा/चटणी घालुन) ढबु मिरचीचीच्या भाजीत आमसुल घालून पहा. उत्कृष्ट लागत.

आमच्याकडे , आमसुलं म्हणजे कैरी/ आंब्याची सुकवलेली फोडी.

कोकमं म्हणजे रतांब्याच्या'' साली ज्या गराचा रसात भिजवून भिजवून वाळवून बनवतो.
कोकम बियांपासून बटर बनवून पायाला व केसाला चोळायची आजी लहानपणी.

आमसुलं म्हणजे कैरी/ आंब्याची सुकवलेली फोडी.>>आंबोशी म्हणतो आम्ही त्याला,आगळ तर मस्ट आयटम असतो घरातला,कौरीच्या दिवसात सोडून इतर वेळी भाजी आमटीत ही कोकमं च वापरतो

कैरीच्या सुकवलेल्या फोडी म्हणजे आंबोशी पण सासूबाई कैरीची सोले म्हणायच्या असं पुसट आठवतंय. आमसुल किंवा कोकम याला नुसती सोले म्हणायच्या.

आमसुले म्हणजेच कोकम आमच्याकडे. आमसुली रंग त्यावरूनच आलं आहे.

आमटी, कुळथाच्या पिठल्यात कोकम हवंच, ते पित्तनाशक असल्यामुळे कुळीथ किंवा तूरडाळीचा पित्तकरपणा कमी करते असं आई म्हणते. सा बा मात्र कु पि मध्ये कैरी सोले म्हणजे आंबोशी किंवा कैरी पण टाकत असत आंबटपणासाठी पण मी कोकम वापरते. बेसन पण पित्तकर बहुतेक. मी कुठलीही आमटी केली तर कोकम वापरते, तुरडाळ खात नाही त्यामुळे मुग, मसूर डाळ आणते. फक्त सांबार करायचे असेल तर चिंच.

यावेळी नवऱ्याने थोडे रातांबे आणलेले गावाहून ते असेच तिखट, मीठ, वेसवार घालून खाल्ले. बिया खाली सोसायटीत पेरू का विचार करतेय किंवा कुंडीत घालून रोप आलं तर पावसाळ्यात नेऊन लावेन. अगदी थोड्या असल्याने तेल वगैरे मेहनत कोण करणार.

कोकम म्हणजेच आमसूल. >>> बरोबर.

माझं अगदी अगदी करायला चुकलं थोडं, आदू यांच्या पोस्टला. एडिट करते. मुळ पोस्ट झंपी यांची आणि त्याला रीप्लाय आदु यांनी दिलाय.

लहानपणी आम्ही रतांबे फोडून या पद्धतीने सरबत व सालापासून कोकम बनवण्याचे उद्योग केलेत. नखं खराब होत . सरबतासाठी वापरलेल्या सालाचे कोकम गोडसर (कमी आंबट) लागते असे ऐकले होते . मालवणात कोकम व सोलं / सोलाॅ ( लिहिता येत नाही) है दोन्ही शब्द वापरत.
आम्ही अजून ही कोकमं च वापरतो , गावावरून आणलेली किंवा विकतची. मासे खाणारे मुंबई ला/ परदेशी निघताना सोला व तिरफळा ंं शिवाय गावाबाहेर पाऊल टाकत नाही .

सोलाॅ ( लिहिता येत नाही) है दोन्ही शब्द वापरत...... येस.

रातांबे,कोकम वगैरे न म्हणता भिरिंडा/ भिन्ना (लिहिता न येणारा उच्चार) असं म्हणत.घरी मुंबईत मात्र सोलां म्हणत.

अमाहाराष्ट्री किराणा मालाच्या दुकानात आमसूल , मेतकूट विचारले की त्यांना ते आधी म्हणायला शिकवण्यात 2 मिनिटे जातात, मग हरवलेल्या व्यक्तीसारखे रंग गव्हाळ , लांबी रुंदी, गोल , पावडर , चव इ सांगावे लागत:....>> नवी मुंबईत अपना बाजारने हे काम सोप्पे केलेय.

तसपण अमसुले सर्रास मिळतात पण रतांबे वाशीला गेल्याशिवाय नाही मिळत.

कोकमं / अमसुले, आगळ हा आजही वाणसामानातील अविभाज्य घटक आहे.

Pages