या आधीचे भाग १-२-३ खालील लिंक वर वाचू शकता.
http://www.maayboli.com/node/34649
आणि जर का ते वाचले नसतील तर ते वाचूनच मग हा भाग वाचायला घ्या..
........................................................................................................................
.
.
------------------------------------------ भाग -४ (अंतिम भाग) -------------------------------------------
.
.
.......................................................................................................................
.
.
शमीन एकेक घटना सांगत होता तसे सौरभच्या चेहर्यावरचे भाव बदलत होते. अविश्वास आणि थट्टेच्या जागी गांभीर्य येत होते. खरे तर हे असे काही घडत असावे यावर सौरभचा म्हणावा तसा विश्वास बसला नव्हता, पण निदान तो शमीनची वेड्यात गिणती करत नव्हता. जे काही घडत होते, घडत असावे त्या मागचे स्पष्टीकरण सौरभलाही सुचत नव्हते. पण तरी त्याच्या डोक्यात सर्वप्रथम आली ती डायरी, जी या सार्या प्रकरणाच्या मुळाशी होती... तिलाच जाळून टाकले तर... शमीनलाही त्याचे म्हणने काही अंशी पटले... जर खरेच डायरीत लिहिलेले घडत असेल तर ती डायरीच का नष्ट करू नये??
सौरभला खरे तर ती डायरी बघायची होती. कारण गेल्या दोन घटनांचा तो देखील साक्षीदार होता. पण शमीनने मात्र आता वेळ न दवडता आजच्या आज ती डायरी जाळून टाकायचे ठरवले.
रात्री जेवण झाल्यावर शमीन स्वयंपाकघरातील काडेपेटी घेऊनच आपल्या रूममध्ये गेला. घरातले सारे झोपी गेल्यावरच डायरी जाळणे योग्य राहिले असते. म्हणून शमीनने उशीरापर्यंत जागायचे ठरवले. तोपर्यंत चाळा म्हणून मग परत त्याने डायरीच वाचायला घेतली. गेले काही दिवस अघटीत घडले असले तरी त्या आधीच्या काही हव्याहव्याश्या वाटणार्या आठवणी होत्या त्या डायरीत. त्या काही दिवसांचे वाचताना शमीनला वाटले की ही पाने फाडून बाजूला काढून डायरी जाळली तर... पण नकोच ते.. का विषाची परीक्षा घ्या.. डायरीची ती पाने पुन्हा पुन्हा वाचताना त्याचा पडल्यापडल्याच डोळा लागला. मध्यरात्री कधीतरी पाने फडफडल्याचा आवाज झाल्याने जाग आली तर ती डायरी तशीच त्याच्या छातीवर होती. घरातील सारे झोपले होते. हीच संधी साधून त्याने मागच्या दाराने बाहेर अंगणात जाऊन त्या डायरीची पाने-पाने सुटी करून, ती जाळून, त्याची सारी राख घरामागून वाहणार्या नाल्यात टाकली आणि परत आपल्या जागेवर येऊन झोपला.
.............तरी त्याला अजून सुटल्यासारखे वाटत नव्हते. एक दडपण, एक अस्वस्थता अजूनही होती. अजूनही डायरीची पाने फडफडल्याचा आवाज ऐकू येत होता. पण यावेळी मात्र तो कुठूनतरी लांबवरून आल्यासारखा वाटत होता.
सकाळी अलार्म वाजल्याच्या आवाजानेच शमीनला जाग आली. पाहतो तर डायरी त्याच्या जवळच पडली होती. म्हणजे काल रात्री त्याने स्वप्नच पाहिले होते. डायरी जाळायची आपली हिंमत नाही, किंवा हा यातून सुटकेचा मार्ग नाहीच आहे हे आता तो समजून चुकला. डायरीने त्याच्या मनाचा, डोक्याचा आणि त्यांतील विचारांचा ताबा घेतला होता. त्याच्या हातून तरी आता ती नष्ट होणार नव्हती.
दुसर्या दिवशी शमीन ती डायरी सौरभला दाखवायला म्हणून आपल्याबरोबर ऑफिसला घेऊन गेला. कदाचित सौरभ यातून काही मार्ग काढू शकेल, कदाचित त्याला ही जाळून टाकणे किंवा हिची विल्हेवाट लावणे शक्य झाले असते. ऑफिसमध्ये पोहोचताच दोघेही ती डायरी घेउन तडक कॅन्टीनमध्ये गेले. सौरभसमोरच शमीनने ती डायरी उघडली आणि एकेक पान उलटत त्याला ती डायरी वाचून दाखवू लागला. गेले महिना-दोन महिने जे काही घडत होते, शब्द न शब्द, एकेक घटना जशीच्या तशी.. त्या दिवशीच्या बसमधील घटनेबद्दलही सौरभने शमीनला जबाबदार धरले होते पण त्याची देखील आधीच डायरीत नोंद होती.. जसे शेवटचे पान संपवून शमीनने सौरभकडेकडे पाहिले तेव्हा सौरभचा चेहर्यावर देखील भितीचे सावट पडले होते. त्याने ती डायरी शमीनच्या हातातून खेचून बंद केली आणि याची कुठे वाच्यता करू नकोस असे बोलून ती आपल्याबरोबरच घेऊन निघून गेला.
.
.
.........................................................................................................................................
.........................................................................................................................................
.
.
डॉ. फडके, एक नावाजलेले मानसोपचारतज्ञ.. किडकिडीत शरीरयष्टीचे पण प्रथमदर्शनीच एक असाधारण व्यक्तीमत्व वाटावे अशी देहबोली, बोलण्यात कमालीचा गोडवा आणि हळूवारपणा.. हवे तर जादूच म्हणा ना.. संमोहनशास्त्रावर यांची खास मास्टरी... आजवर गुंतागुंतीच्या बर्याच केसेस यांनी सहजगत्या सोडवल्या होत्या. अर्थात तशीच गुंतागुंतीची केस असल्याशिवाय ते लक्षही घालत नसत. थोडक्यात सांगायचे तर बाप होते त्यांच्या क्षेत्रातील. मोठ्या मुश्किलीने सौरभने त्यांची अपॉईंटमेंट घेतली होती. खरे तर त्यांच्याशी संपर्क साधणेच अवघड होते, पण जेव्हा सौरभने शमीनबद्दल त्यांना सांगितले तेव्हा ही केस तशीच खास आणि अर्जंट आहे हे जाणून त्यांनी स्वताहूनच संध्याकाळची अपॉईंटमेंट दिली होती.
आपण एक मानसोपाचाराच्या दृष्टीने क्रिटीकल केस आहोत ही भावना शमीनच्या मनावरचे दडपण वाढवत होती. पण त्याच वेळी आणखी उशीर होण्याआधी योग्य जागी पोहोचलो आहोत ही गोष्ट दिलासा देखील देत होती. कदाचित आपण खरेच मनोरुग्ण असू, आपल्याल वेडही लागले असावे, पण हे असले अतार्किक काही घडू शकत नाही यावर शमीनचा अजूनही विश्वास होता, ही एक सकारात्मक बाब होती. त्याच्या दृष्टीनेही आणि डॉ. फडके यांच्या दृष्टीनेही. आता हे का आणि कसे घडत असावे याची कारणमीमांसा करायचे काम शमीनने डॉ. फडक्यांवर सोडायचे ठरवले.
डॉ. फडक्यांचे अंधेरी हायवेवरील क्लिनिक हे इतर दवाखान्यांपेक्षा वेगळेच होते. संपूर्णपणे पांढर्या रंगाचे ईंटीरीयर आणि पार्श्वभूमीला मंदपणे वाजणारी "ओssम.. ओssम...." ची धून त्यांना आल्याआल्या एका वेगळ्याच वातावरणात घेऊन गेली. डॉ. फडक्यांनी शमीनला जास्त वेळ वाट बघायला लावली नाही. थोड्याच वेळात त्याला त्यांच्या केबिनमधून बोलावणे आले. सौरभलाही त्याच्या बरोबर यायला सांगितले. सुरुवात नेहमीसारखी औपचारिक संभाषणाने झाली. शमीनबद्दल त्यांनी बरीचशी माहिती सौरभशी फोनवर बोलून आधीच गोळा केली होती. जुजबी बोलणे करून डॉक्टरांनी सरळ विषयाला हात घातला. पहिल्यांदा त्या मुलीला पाहिल्यापासून, डायरी लिहायचे खूळ शमीनच्या डोक्यात शिरल्यापासून ते कालपर्यंतच्या सार्या घटना शमीन त्यांना सविस्तर वर्णन करून सांगू लागला. आपले तिच्या मागे मागे जाणे, तिने भाव न देणे, म्हणून मग आपले तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी, तिला मिळवण्यासाठी प्रयत्न करने, त्यात काही प्रमाणात यशस्वी होणे, पण मग अचानक सारे काही विपरीत घडणे, आणि याला जबाबदार असणारी ती डायरी... आधी त्या डायरीचे आपल्या तालावर नाचणे, आणि मग आपल्यालाच तिचे घुमवणे.. शमीन एका विश्वासानेच सारे कथन करत होता आणि डॉ. फडके सारे मन लाऊन ऐकत होते.
शमीनचे सारे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या ड्रॉवरमधून एक डायरी काढून ती शमीनच्या हातात दिली. ती डायरी शमीनचीच होती. डॉ. फडक्यांनी ती आधीच सौरभकडून मागून घेतली होती. शमीनला त्यांनी त्यातील गेल्या चार-पाच दिवसांच्या घटना पुन्हा एकदा वाचायला सांगितल्या. शमीन वाचत होता आणि ते दोघे शमीनच्या हालचाली, त्याच्या चेहर्यावरचे भाव न्याहाळत होते. वाचताना मध्येच त्याने डॉ. फडक्यांकडे पाहिले तसे त्यांनी नजरेनेच त्याला पुढे वाचायला सांगितले. आपले बोलणे डॉक्टर सरांना पटतेय हे बघून शमीन परत पुढे वाचू लागला. त्याचे वाचून झाले तसे डॉ. फडक्यांनी आपल्या ड्रॉवरमधून आणखी एक तशीच डायरी बाहेर काढली आणि शमीनच्या हातात दिली. शमीनच्याच कंपनीची डायरी असल्याने अगदी त्याच्या डायरीसारखीच होती ती. सहज कुतुहलाने त्याने काही पाने चाळून पाहिली तर जवळपास कोरीच होती. प्रश्नार्थक नजरेने त्याने डॉक्टर फडक्यांकडे पाहिले. तसे ते म्हणाले, "आता त्या डायरीचे पहिले नावाचे पान बघ..."
शमीनला पाहताच धक्का बसला. पहिल्या पानावर त्याचेच नाव लिहिले होते. खालोखाल घरचा अॅड्रेस, ऑफिसचा एक्स्टेंशन नंबर, त्याचा मेल आयडी, ब्लड ग्रूप ए पॉजिटीव्ह... ही खरी शमीनची डायरी होती. पण मग ती कोरी कशी?? सुरुवातीची दोनचार पानेच काय ती भरली होती.. पुढचे लिहिलेले कुठे गेले?? आणि मगाशी वाचली ती डायरी.. ती कोणाचे होती?? ती जर आपली नव्हती तर त्यात लिहिलेले... ते कुठुन आले? त्यात कोणी लिहिले? आणि यातले कुठे गेले? ... थोड्याश्या अविश्वासानेच शमीनने पुन्हा पहिली डायरी उघडली. तर त्यात पहिल्या पानावर सौरभचे नाव होते. म्हणजे एवढा वेळ तो ज्या डायरीत बघून सारे वाचत होता ती सौरभची डायरी होती.. दोघांच्या डायर्या ऑफिसच्याच असल्याने सारख्याच होत्या. आत चाळून पाहिले तर पहिल्या चार-पाच पानांवर सौरभने ऑफिसच्या कामासंदर्भात काही लिहिले होते. पण पुढे मात्र कोरीच होती. आता मात्र शमीनच्या चेहर्यावर हजार प्रश्नचिन्ह उमटली होती.. आणि हे पाहूनच डॉक्टर फडक्यांनी सारी सुत्रे आता आपल्या हातात घेतली आणि बोलायला लागले,
"हे बघ शमीन, सर्वात पहिले म्हणजे आपल्या मनातून काढून टाक की तुला वेड वगैरे काही लागले आहे. आणि आता मी काय सांगतो ते अगदी शांतपणे ऐक. हा एक मानसिक आजार आहे. जसे सर्दी, ताप, खोकला यांसारखे छोटे-मोठे आजार असतात तसाच हा देखील एक, आणि याचा उपचार सुद्धा आपण तसाच करणार आहोत.
तर... यात घाबरण्यासारखे काही नाही.
काय होते ना शमीन, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या घटनेचा एवढा विचार करतो की ती सारखी आपल्या आसपास घडत आहे असा आपल्याला भास होतो. तर कधी एखादी घटना घडून गेल्यावर असे वाटते की आपण हे या आधी पण अनुभवले आहे किंवा आपल्याला हे आधीच ठाऊक होते की हे असेच घडणार.." डॉ. फडके त्याच्याशी एखाद्या मित्राशी गप्पा मारल्यासारखे बोलत होते. कदाचित हीच त्यांची ट्रीटमेंट करायची खासियत असावी.
"तसेच तू दुहेरी व्यक्तीमत्वाबद्दल कुठेतरी वाचले असशील किंवा एखाद्या सिनेमात पाहिले असशीलच.." डॉ. फडक्यांनी उत्तराच्या अपेक्षेने क्षणभर शमीनकडे पाहिले. पण तो मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत नव्हता हे त्यांनी ओळखले आणि स्वताहूनच पुढे सुरू झाले..
"ओके.. दुहेरी व्यक्तीमत्व.. ज्याला आमच्या मेडीकल टर्ममध्ये मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असेही बोलतात. यात काय होते ना, आपल्यातीलच व्यक्तीमत्वाचा एक पैलू आपल्याही नकळत बाहेर पडतो. जो बर्याचदा आपल्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध असतो. आणि मुळात हेच याचे कारण असते. आपल्या एखाद्या विशिष्ट स्वभाव वैशिष्टयाबद्दल आपल्याला कमीपणा वाटू लागतो, आणि कालांतराने तो एवढा वाढतो की एकाक्षणी आपल्याला असे वाटू लागते की आपल्या या स्वभावाने आपण बरेच काही गमावले आहे. आता तरी आपण बदलले पाहिजे. पण स्वभावबदल हा असा अचानक क्रांतीसारखा घडणे शक्य नसते. पण तरीही आपण तो घडवायला जातो. काही अंशी आपण यात यशस्वीही ठरतो, तरीही चोवीस तास तसेच वागता येत नाही परिणामी आपण एकाच वेळी दोन व्यक्तीमत्वे जगायला सुरुवात करतो. सुरुवातीला आपल्यातील ठराविक काळासाठी होणारा हा बदल आपल्याला चांगला वाटू लागतो आणि त्यामुळे आपणच त्याला खतपाणी घालतो. पण हळूहळू आपला त्याच्यावरील कंट्रोल सुटत जातो, जो खरे तर मुळातच फारसा नसतो. आणि मग गुंता वाढत जातो.. तुझ्या बाबतीत पण असेच काहीसे घडत आहे..."
अजूनही शमीन भांबावलेल्या अवस्थेतच होता. डॉक्टर फडक्यांना हे अपेक्षितच होते. त्यांनी आपले बोलने न थांबवता तसेच पुढे चालू ठेवले, "तर.. ही झाली थिअरी, आता याचा तुझ्याशी कसा संदर्भ लागतो हे आपण बघूया, नाही का..", तसा शमीन आता उत्सुकतेने ऐकू लागला. सौरभही आपली खुर्ची सरसावून बसला.
"तु त्या मुलीमध्ये, काय तिचे नाव.. हा अमृता.. तर तू त्या अमृतामध्ये जरा जास्तच गुंतलास. दिवसरात्र चोवीस तास तिचाच विचार करायचा. त्यात तू तिच्याबद्दल डायरी लिहायला घेतलीस, याचा परिणाम असा झाला की तिच्या विचारांनी तुझ्या मेंदूचा आणखी ताबा घेतला. डायरीत सुरुवातीला जे घडेल ते तू व्यवस्थित लिहायचास, पण जेव्हा त्यात तोचतोचपणा येऊ लागला तेव्हा तुला आपल्या आयुष्यात, या प्रेमकहाणीत काही वेगळे घडावे असे वाटू लागले. पण तुझा बुजरा स्वभाव पाहता ते शक्य नव्हते. आज पर्यंत या स्वभावामुळे कदाचित तू बर्याचदा प्रेमात माघार घेतली असावीस. नेमक्या याच गोष्टाचा तुला कुठेतरी त्रास होत होता. या सर्वाचा परीणाम म्हणून मग तुझ्यातील एक लपलेले व्यक्तीमत्व बाहेर पडले. तू स्वता आयुष्यात काही केले नसले तरी उघड्या डोळ्यांनी स्वप्न मात्र बरीच बघितली असणार, की जरा माझ्यात हिंमत असती तर मी असे केले असते, जर मी असा असतो तर तसे केले असते.. बस्स.. हेच तू आता करायला घेतले होतेस. पण हा तुझा मूळ स्वभाव नव्हता. हे जरी तूच करत असला तरी तुझे स्वताचे मन तुला हे पटवून देऊ शकत नव्हते की हे करणारा तू स्वताच आहे. कारण तुझी विचारशक्ती हे मान्य करायला तयारच नव्हती की तू स्वता हे करू शकतोस. मग आता स्वताच्याच बुद्धीला हे पटवायचे कसे?? आणि म्हणूनच तुझ्या मनाने डायरीचा आधार घेतला. तू डायरी मध्ये काही लिहित नव्हतास, जे घडत होते ते तूच घडवत होतास, आपल्या बदललेल्या व्यक्तीमत्वाच्या जीवावर. तरी तू स्वताची अशी समजूत घातली असल्याने की हे सारे डायरीमुळे घडतेय, घरी आल्यावर जेव्हा तू डायरी बघायचास तेव्हा तुला घडलेली घटना आपण आधीच लिहिलेली आहे असे त्यात दिसायचे. ते शब्द म्हणजे निव्वळ भास होता. तुझ्याच मनातील विचार तुला त्या कोर्या पानांवर शब्दरुपात दिसत होते. डायरी उघडायच्या आधीच ती घटना, ते शब्द तुझ्या अंतर्मनात छापले गेले असल्याने त्या पलीकडे जाऊन तू कधी विचार करूच शकला नाहीस. आता त्या दिवशीचे ताजे उदाहरणच घे ना, तू आधी त्या मुलीकडे चोरून चोरून बघायचास पण त्या दिवशी बसमध्ये मात्र बेधडक बघू लागलास, आणि त्यावर त्या मुलीची प्रतिक्रिया योग्य अशीच होती. तिचे चिडणे साहजिकच होते. पण याला जबाबदार सुद्धा तू डायरीला धरलेस. आणि घरी गेल्यावर तुला ते डायरीत दिसायला लागले. कारण तुला तुझ्या त्या दुहेरी व्यक्तीमत्वाला दोषी ठरवायचे नव्हते. परिणामी जे घडले ते परत तुला डायरीत दिसू लागले किंवा तू ते बघू लागलास.."
डॉ. फडके बोलायचे थांबले आणि शमीनकडे बघू लागले. शमीनला स्वताहून त्याच्या डोक्यातील गुंता सोडवायला त्यांनी थोडा वेळ दिला.. आता ते शमीनकडून प्रश्नांची अपेक्षा धरून होते.
"............"
"ह्मम.. विचार विचार, डोक्यात काही ठेऊ नकोस."
"पण मग.. बसचा संप आणि पाऊस... ?? त्याचे काय .. ?? " बर्याच वेळाने शमीन कसेबसे एवढेच उत्तरला.
"अच्छा.. ते कसे डायरीत लिहिल्याप्रमाणे घडले असावे हेच ना..? पण मुळात तू स्वताच मगाशी पाहिलेस की डायरी तर कोरीच होती. म्हणजे तसे काही घडावे अशी नोंद मुळात तू डायरीत केली नव्हतीसच. पण मग आता नक्की झाले काय... तर जेव्हा तू तिच्याबरोबर एकत्र रिक्षाने प्रवास करायचा अनुभव घेत होतास तेव्हा तुझ्या मनात हा प्रवास असाच लांबावा, रोज रोज घडावा किंवा छानसा पाऊस पडून मस्त रोमॅंटीक वातावरण तयार व्हावे असे येत असणारच.. खरे तर एवढेच नाही तर अश्या बर्याच कल्पना मनात येत असाव्यात. पण त्यातील ज्या एक-दोन कल्पना प्रत्यक्षात उतरल्या त्याचा संबंध तू डायरीशी जोडलास. बसचा संप फिस्कटने ही काही फार मोठी बाब नाही, तसेच ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणे यातही काही नवल नाही. पाऊस पडावा हे तुला आतून रोजच वाटत असावे, पण पाऊस नेमका ज्या दिवशी पडला त्या दिवशीच तुला ते तसे डायरीत लिहिल्याचे दिसले... किंवा जसे आपण मगाशी पाहिले की तुझ्या मनाने तुला ते दाखवले..
शमीनला हळूहळू सारे पटू लागले होते. तसा मुळातच तो बुद्धीवादी जीव होता. पण तरीही आपल्याशी जे घडत होते तो निव्वळ भास होता, आपल्याच मनाचा खेळ होता हे पचवने त्याला जड जात होते.
सौरभनेच मग शांततेचा भंग केला, "थॅन्क यू सर, आज तुमच्यामुळे माझा मित्र मोठ्या संकटातून वाचला."
तसे डॉक्टर लगेच उत्तरले, "नाही नाही, इतक्यात नाही. आता हे आपण फक्त रोगाचे निदान केले आहे, उपचार करायचा अजून बाकी आहे."
"म्हणजे?" शमीन दचकूनच म्हणाला, "आता मला समजले आहे ना सारे, की हा माझा निव्वळ भ्रम होता, मग आता अजून उपचार असा काय बाकी आहे."
"त्याचीच तर भिती आहे.." डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलू लागले, "आता हे जसे तुला समजले आहे तसेच तुझ्यातील त्या दुहेरी व्यक्तीमत्वाला देखील समजले आहे. आता तो तुझ्यावर हावी व्हायचा प्रयत्न करणार. तुला स्वताला ती आवडत असली तरी तू आपल्या मर्यादेत राहून तिला मिळवायचा प्रयत्न करणार. आणि तुझे ते आभासी व्यक्तीमत्व मात्र कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला मागेपुढे पाहणार नाही. खरा प्रॉब्लेम तर तेव्हा सुरू होणार जेव्हा या दोन व्यक्तीमत्वांच्या लढाईत तुझी मानसिक ओढाताण होणार. आणि त्यांच्यात कोणीही जिंको.. हार मात्र तुझीच होणार.
"पण मग यावर उपाय काय??", शमीनच्या आधी सौरभनेच उत्सुकतेने विचारले.
"ह्म्म, उपाय तर आहे, पण त्या साठी शमीनच्या मनाची पुर्ण तयारी हवी.." डॉक्टर शमीनकडे बघत म्हणाले,
"म्हटले तर खूप साधा सोपा उपाय आहे पण जर तुझ्या मनाने विरोध केला तर कधीच शक्य होणार नाही असा....."
"....... काही समजले नाही"
"तुला त्या मुलीला विसरावे लागणार शमीन... अगदी पूर्णपणे विसरावे लागणार.. विसरणे म्हणजे तिला आपल्या विचारांतूनच काढून टाकणेच नाही... तर..., तिची आठवण, तिचे विचार, तिच्याशी संबंधित सार्या काही गोष्टी तुला तुझ्या मनातून, डोक्यातून कायमचे काढाव्या लागणार. जसे कॉम्प्युटरची एखादी डिस्क फॉर्मेट करतात किंवा त्यातील अनावश्यक भाग तेवढा इरेज करतात. अगदी तसेच अमृता नावाचा चाप्टर तुझ्या डोक्यातून आपल्याला आजच, आताच क्लोज करावा लागणार. जरा जरी काही मनात राहिले तर पुढे मागे परत द्विधा मनस्थितीत अडकशील आणि मग मेंटल डिसऑर्डरची शक्यताही नाकारता येणार नाही.... ज्याचा परीणाम तुला वेड लागण्यापासून ब्रेन हॅमरेजने मृत्यू ओढावणे पर्यंत काहीही होऊ शकतो..."
"........................"
डॉ. फडके बोलत होते आणि शमीन शून्यात बघितल्याप्रमाणे त्यांच्याकडे नजर लाऊन ते सारे ऐकत होता. हा उपाय होता की शिक्षा हेच त्याला समजत नव्हते. आणि गुन्हा देखील असा काय तर, एखादीवर गरजेपेक्षा जास्त प्रेम करणे..
तिला न विसरता आपल्यातील ते दुसरे व्यक्तीमत्व बाहेर काढून फेकता येणार नव्हते का?? परत आपण पहिल्यासारखेच तिला लांबून बघत राहू. खूश होतो आपण यातच. ती मिळालीच पाहिजे असा काही हट्ट नाहिये माझा. पण तिला विसरायला नका सांगू....
शमीनच्या चेहर्यावर एक प्रकारची उदासी आली होती जी डॉक्टर फडक्यांनी बरोबर हेरली.
"हे बघ शमीन, जर तू इतर कुठे गेला असतास किंवा एखादा मांत्रिक तांत्रिक केला असतास तर त्याने तुला एखादा गंडा-दोरा दिला असता. ती शुद्ध फसवणूक असते असे मी नाही म्हणनार. कारण जर त्याच्यावर तू श्रद्धेने विश्वास ठेवला असता तर नक्कीच काही काळापुरता तू मानसिकदृष्ट्या सक्षम झाला असतास. पण जशी एखादी हलकीशी विपरीत घटना घडली असती तसे लगेच तुझा त्याच्यावरचा विश्वास उडाला असता आणि तू कमजोर पडला असतास. म्हणून जर हा आजार मुळापासून बरा करायचा असेल तर हाच एक मार्ग आहे आणि तो देखील आज आता ताबडतोब अंमलात आणायची गरज आहे. आणखी उशीर करून चालणार नाही. कारण, ती मुलगी अजूनही तुझ्या मनात असल्याने तू कितीही ठरवलेस तरीही स्वताच्याच नकळत त्या आभासी व्यक्तीमत्वाला पुन्हा उसळी घ्यायला तू स्वताच मदत करणार. म्हणून हे सारे इथेच थांबवावे लागणार.." डॉ. फडके यावेळी स्पष्टच आणि निर्णायक म्हणाले.
शमीन अजूनही शांतच बसला होता. डॉक्टर फडके त्याच्या मौनालाच होकार समजून पुढच्या तयारीला लागले. शमीन जरी द्विधा मनस्थितीत असला तरी त्यांना पक्के ठाऊक होते की या परिस्थितीत काय करायचे आहे. शमीनचे चित्त शांत व्हायला त्यांनी त्याला अर्ध्या तासाचा ब्रेक दिला. पण सौरभला मात्र त्याच्याच बाजूलाच बसायला सांगितले. त्याने सवयीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारून शमीनला रिलॅक्स करायचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.
जवळपास वीस-पंचवीस मिनिटांनी डॉक्टर परत आले. शमीन आता बर्यापैकी संतुलित दिसत होता. त्याला त्यांनी जवळच असलेल्या एका आरामखुर्चीवर बसायला सांगितले. आरामखुर्ची खरेच खूप आरामदायक होती. बसल्याबसल्याच झोपावे असे वाटणारी. मगासपासून शमीनच्या डोक्याला जो ताण आला होता तो बसताक्षणीच जरासा निवळल्यासारखा वाटला. रूममधील दिवे मंद केले गेले. एअर कंडीशनची सेटींग चेंज केली तसे कसलातरी दर्प नाकात शिरला. हळूहळू शमीनला आपले डोके जड झाल्यासारखे वाटू लागले. डॉक्टर फडके त्याच्या समोर येऊन उभे राहिले आणि इशार्यानेच त्याला न घाबरता थोडावेळ तसेच पडून राहण्यास सांगितले. सौरभ रूम मध्ये होता की नाही हे ही शमीनला समजत नव्हते. मान वळवून त्याला बघणेही अंगावर आले होते. पण आता डॉक्टर साहेबांनी शमीनचा ताबा घेतला होता.. प्रश्नोत्तरांचा राऊंड सुरू झाला होता..
"नाव काय आहे तुझे?"
"शमीन"
"पुर्ण नाव?"
"शमीन नाईक"
"कुठे राहतोस?"
"माझगावला.."
"घरी कोण कोण आहेत?"
"आई, बाबा..."
"काम काय करतोस?"
"सिविल ईंजिनीअर आहे..."
"आता जॉबला कुठे आहेस?"
"ऑब्लिक कन्सलटंट प्रायवेट लिमिटेड..."
"कुठे आली ही कंपनी?"
"कांदिवलीला..."
"ऑफिसला कसा जातोस?"
"ट्रेनने..."
"सकाळी घरून किती वाजता निघतोस?"
"साडेसातला..."
"ऑफिसला कधी पोहोचतोस?"
........
.....
...
डॉक्टर प्रश्न विचारत होते आणि शमीन जेवढ्यास तेवढे निमूटपणे उत्तर देत होता. त्याला आधी वाटले होते की लंबक वगैरे फिरवून आपल्याला संमोहीत केले जाईल. पण अजूनपर्यंत डॉक्टरांनी तसे काही केले नव्हते. किती प्रश्न विचारले गेले, किती अजून विचारले जाणार, त्याला काही समजत नव्हते. अजूनपर्यंत त्यांनी अमृताबद्दल काहीच विचारले नव्हते. थोड्यावेळाने त्याला असे वाटू लागले की आपल्याला आता गाढ झोप येत आहे. आणि हळूहळू आपण चक्क झोपतही आहोत. तरीही प्रश्न तसेच सुरू होते. जणू काही डॉक्टर आपला स्वप्नातही पिच्छा सोडणार नव्हते. पण शमीन मात्र शहाण्या बाळासारखे त्यांच्या सार्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. हे संपवून त्याला गाढ झोपी जायचे होते...
डॉक्टरांनी अचानक अमृताचा विषय काढला आणि तिचे नाव न घेताच थेट विचारले,
"किती प्रेम करतोस त्या मुलीवर?"
"प्रेमात किती वगैरे असे काही नसते.. जे काही करतो ते तिच्यावरच करतो.. ती सोडून दुसर्या कोणत्या मुलीकडे बघावेसे वाटत नाही.. की इतर कोणाचा साधा विचारही मनात येत नाही.. दिवसरात्र मी तिच्याच विचारात असतो.. तिला वजा केल्यास माझ्या आयुष्यात काही उरणार नाही.."
एवढा वेळ एका शब्दात उत्तर देणारा शमीन अचानक भावनांचा बांध सुटल्याप्रमाणे मनातील सारे रिकामे करू लागला.
"पण तिचे तुझ्यावर प्रेम आहे का?" डॉक्टर सरांनी मध्येच टोकले.
काय फरक पडतो...?? .... शमीनच्या ओठावर आलेले शब्द तसेच विरले..
"नाही.., माहीत नाही"
"मी सांगतो ना, तिचे तुझ्यावर जराही प्रेम नाही. प्रेम तर सोड, राग करते ती तुझा.. तुझा अपमान करायची एकही संधी सोडत नाही ती." डॉ फडक्यांनी वर्मावरच घाव घातला.
"नाही तुम्ही खोटे बोलत आहात, तसे काही नाहिये." शमीन कासावीस होत उत्तरला.
"अच्छा, मग त्या दिवशी काय म्हणाली ती तुला सर्वांसमोर... आठवतेय, की मी सांगू... तुला तिच्याबद्दल एवढे वाटते पण ती मात्र तुला जराही भाव देत नाही.. विसर तिला शमीन, मुलींची काय कमी आहे का जगात, एक गेली दुसरी मिळेल.. तसेही ती तुझ्या योग्यतेची नाही आहे.. एवढा हुशार तू, एवढा शिकलेला आहेस, आईवडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा, लग्नाला उभा राहिलास तर मुलींची लाईन लागेल... काय ठेवलेय तिच्यात.. काढून टाक तिचा विचार आपल्या मनातून.." डॉ. फडके अक्षरशा जिव्हारी लागेल अश्या टोनमध्ये शब्दफेक करत होते. पण शमीन मात्र या क्षणी त्यांच्याच संमोहनाच्या प्रभावाखाली होता.
"हो... खरे आहे... पण तरीही... तिच्या सारखी मुलगी मला नाही मिळणार कुठे..." शमीनच्या बोलण्यातील आत्मविश्वास आता डळमळीत होऊ लागला होता. तसेही गेल्या एकदोन घटना पाहता तिच्यापासून शमीन दुखावला गेला होता हे खरेच होते. त्याचे तिच्यावर प्रेम असले, आणि तो तिच्या कितीही योग्यतेचा असला तरी ती आपल्याला मिळण्याची शक्यता कमी आहे हे त्यालाही ठाऊक होते. डॉक्टरांच्या शब्दांवर त्याचा आता विश्वास बसू लागला होता. किंवा खरे तर तेच त्याच्या सोयीचे होते. ती आपल्याला मिळू शकत नाही यापेक्षा ती आपल्या योग्यतेचीच नव्हती अशी मनाची समजूत घालायला शमीनने सुरुवात केली. डॉ. फडकेंना हेच हवे होते. शमीनच्या डोक्यातून तिचे विचार काढून टाकण्यासाठी आधी त्याच्या मनातील तिच्याबद्दल असलेल्या प्रेमभावना कमजोर पाडणे गरजेचे होते. त्याचे मन या काही क्षणांसाठी कमकुवत करणे गरजेचे होते.
"डोळे उघडून बघ शमीन, जवळपास किती सुंदर मुली आहेत. आणि काय कमी आहे तुझ्यात...." डॉक्टर फडकेंचे शमीनचे ब्रेनवॉश करणे सुरूच होते.
मध्येच हळूवार बोलत तर मध्येच कडक भाषा वापरत हळूहळू डॉक्टरांनी शमीनच्या मनाचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. आता पुढचे काम डॉक्टर सरांसाठी सोपे झाले होते. हीच योग्य वेळ आहे हे जाणून डॉक्टरांनी शमीनच्या डोक्यात त्यांना हवी ती माहिती भरायला सुरूवात केली... ते जसे बोलत होते, तेच आता शमीन बोलत होता...
"अमृता नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही... माझे नाव शमीन नाईक असून मी एक ईंजिनीअर आहे... मी माझगावला राहतो... मी कांदिवलीला कामाला आहे... रोज सकाळच्या साडेसातच्या ट्रेनने प्रवास करतो... तिथून बस पकडून थेट ऑफिस गाठतो... ऑफिसमधील माझे काम उरकले की संध्याकाळी परत तसाच उलटा प्रवास... आधी बसने स्टेशनला येतो मग तिथून ट्रेनने घरी... या प्रवासात ना मला कोणी भेटते ना मी कोणाला ओळखत... अमृता नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही... माझे कोणत्याही मुलीवर प्रेम नाहीये... अमृता हे नावही मी कधी ऐकलेले नाहीये... कॉलेजमध्ये असताना शमिता नावाची मुलगी मला आवडायची... तेच माझे शेवटचे प्रेम.. त्यानंतर मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडलो नाही... आता माझी झोपायची वेळ झाली आहे... मला झोप येत आहे... मला झोप आली आहे... आता मी झोपलो आहे... अगदी गाढ झोपलो आहे.........!!
.
.
.....................................................................................................................................
.....................................................................................................................................
.
.
आज सकाळी शमीनला आपला मूड काहीतरीच फ्रेश वाटत होता. खूप दिवसांचा आळस झटकून उठल्यासारखे वाटत होते. प्रत्येक पहाट एवढी रमणीय असते की आजच काही खास वाटत होते ठाऊक नाही पण मुद्दामच त्याने आज नवीन कपड्यांचा जोड बाहेर काढला. आई देखील म्हणाली, "वाह., क्या बात है.. आज माझे पिल्लू एकदम हिरो बनून चाललेय ऑफिसला.." ... पण खरेच, रस्त्याने चालतानाही आज त्याला वेगळाच उत्साह वाटत होता, जसे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जाताना प्रत्येक मुलाला वाटते. रोजचाच रस्ता असूनही त्याने नवीन कात टाकल्यासारखी वाटत होती. पाय नुसते हवेत उडत होते, मनालाही कसलीशी अनामिक हुरहुर लागली होती. ट्रेन थोडीशी लेट आली पण आज नेहमी सारखी त्याने चिडचिड नाही केली. कुठे एवढी घाई होती. ऑफिसमध्ये सर्वात आधी पोहोचून काय झाडू मारायची आहे का, असा विचार करून तो स्वताशीच हसला...
ट्रेन आपल्या ठरलेल्या वेळेला कांदिवली स्टेशनला पोहोचली. नेहमीप्रमाणे कांदिवली स्टेशनच्या बाहेर बसच्या रांगेत जाऊन तो उभा राहिला. रांगेत कोणी ऑफिसचे ओळखीचे दिसते का म्हणून इथे तिथे नजर फिरवू लागला. कोणी खास ओळखीचे दिसले नाही. सौरभही कुठे दिसला नाही. पाच मिनिटे झाली पण बस काही आली नाही. मागच्या ट्रेनने आलेला लोंढा मागे येऊन रांगेत उभा राहिला. मग सवयीप्रमाणे त्यात एखादा बघण्यासारखा चांगला चेहरा दिसतो का म्हणून त्याने पुन्हा नजर फिरवली.... आणि अचानक.... त्याची नजर एका जागी स्थिरावली.... कोण होत्या त्या दोघीजणी... त्यांना या आधीही कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते.. त्यातील एकीला तरी नक्कीच... निरखून बघत तो आठवायचा प्रयत्न करू लागला, तसे त्या दोघींचेही त्याच्याकडे लक्ष गेले.. त्यांच्यातील एक जण सहज हसली.. गालातल्या गालातच.. तर दुसरीने उगाचच तोंड फिरवल्यासारखे केले.. शमीननेही मग मुद्दाम मानेला झटका दिला... सुंदर मुलींना का उगाच गरज नसताना भाव खायची हुक्की येते असे त्याच्या मनात येऊन गेले..
इतक्यात बस आली आणि रांग सरकली.. शमीनने पुन्हा एकदा वळून पाहिले, तर त्यांचे लक्ष त्याच्यावरच होते. नजरेत एक ओळख दिसली. पण नक्की काही आठवत नव्हते. त्याच्यापाठोपाठ त्या देखील त्याच्याच बसमध्ये चढल्या. त्या पुढे बसायला गेल्या आणि शमीन मात्र मागेच उभा राहिला. पण त्याची नजर मात्र अजूनही त्यांनाच न्याहाळत होती. कुठे पाहिले असावे बरे यांना या आधी... आपल्या कॉलेजच्या असाव्यात का? की आपल्या शाळेत होत्या? की ट्रेनमध्ये वगैरे कुठे....?? छे..!! काहीच संदर्भ लागत नव्हता.. पण त्यांनी एकदोन वेळा आलटून पालटून मागे वळून पाहिले.. आता मात्र शमीनची त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आणखी चाळवली गेली आणि तो जरासा पुढे सरकून उभा राहिला.. आता त्याला त्यांच्या गप्पा थोड्याफार ऐकू येत होत्या. पण अजून त्यातून काही म्हणावे तसे हाती लागले नव्हते.. कंडक्टरने "कॅप्सूल, कॅप्सूल" करत घंटी मारली आणि आज स्टॉप जरा लवकरच आला असे त्याला वाटले.. उतरायला म्हणून पुढे गेला इतक्यात त्यातील एका मुलीने त्या दुसर्या सुंदरश्या मुलीला हाक मारली........, "अमू......!!"
अमू ????
"..............."
पुढे ती काय बोलतेय म्हणून शमीन क्षणभर तिथेच थांबला, तसे लगेच तिने आपल्या मैत्रीणीला चापटी मारली, "अमू काय ग सारखे... अमृता बोल ना..."
ओहह... अमृता...!!
एवढावेळ शमीनला सारखे वाटत होते की आपण यांना कुठेतरी नक्की पाहिले आहे... आणि आता तिच्या मैत्रीणीने तिला मारलेली हाक... अमू.... अमृता...
छे...!!
या नावाच्या एकाही मुलीला शमीन ओळखत नव्हता... तो आपला निव्वळ भास होता हे त्याला समजून चुकले..
पण मुली दिसायला छान होत्या. खास करून ती अमू.. अमृता.. शमीनला ती आपल्या टाईपची वाटली. कॉलेज सुटल्यावर शमीतानंतर त्याला पहिल्यांदा असे कोणत्या मुलीबद्दल वाटले होते. बस मधून उतरल्यावर मागे वळून पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही.. तर नेमकी तिच्याशीच नजरानजर झाली.. तिची नजर खिडकीतून शमीनवरच लागली होती.. दोघांच्या पापण्या किंचित फडफडल्या.. शमीनला हा इशारा पुरेसा होता..
आई खरेच बोलत होती, आज तिचा शमीन बाळ नक्कीच हिरो दिसत होता. कधी हा किस्सा सौरभशी शेअर करून भाव खातो असा विचार मनात येऊन शमीनची पावले ऑफिसच्या दिशेने जरा जास्तच झपझप पडू लागली.....
.
.
xxxxxxxxxxxxx ......... समाप्त ......... xxxxxxxxxxxxx
.
.
.
एक महत्वाचे - कथा अंशतः काल्पनिक आहे.
दुसरे (त्यापेक्षाही जास्त) महत्वाचे - या कथेवर कोणाला मालिका, नाटक अथवा चित्रपट बनवायचा असेल तर त्याने खालील ई-मेल पत्त्यावर लेखकाशी संपर्क साधावा. जेणे करून शमीनच्या भुमिकेसाठी कलाकार शोधायचा त्रास वाचेल..
अभिषेक नाईक - abhiabhinaik@gmail.com
.
.
धन्यवाद,
...तुमचा अभिषेक
मी पहिली.खुप खुप
मी पहिली.खुप खुप आवड्ली.शेवट्पर्यंत गुंतवून ठेवल.
धन्यवाद, मायाजी.. मलाही तीच
धन्यवाद, मायाजी.. मलाही तीच उत्सुकता असते की पहिली प्रतिक्रिया काय आणि कोणाची येते..
लय भारी!
लय भारी!
Hero chhan diary
Hero chhan diary
मंदार -- धन्यवाद.. चिमुरी -
मंदार -- धन्यवाद..
चिमुरी - स्पेशल धन्यवाद..
चांगली आहे कथा... शेवटचा भाग
चांगली आहे कथा... शेवटचा भाग 'भुलभुलैया' सारखाच आहे.
जाता जाता, 'हावी होणे'ला मराठी पर्याय 'भारी पडणे', 'वरचढ होणे' किंवा 'डोक्यावर बसणे' असू शकतात. वाचता वाचता उगाच हिंदी शब्दांनी रसभंग होतो, म्हणून सुचवले. पटल्यास बघा नाही तर सोडून द्या.
धराजी धन्यवाद... मी पण ते
धराजी धन्यवाद...
मी पण ते "हावी होणे" लिहिताना विचार करत होतो... की नक्की हा शब्द मराठी आहे की हिंदी... शेवटी दोन तीन वेळा मनाशीच बोलून पाहिले तर असे वाटले की मराठीच असावा... मुंबईत सारे आयुष्य गेल्याचा परीणाम असावा.. पण बाकी हिंदी शब्द उगाच वापरायची हौस म्हणून हे केले नाही तर माझ्या अज्ञानाने हे झाले... सुचवल्याबद्दल धन्यवाद.. सध्या तेवढ्यासाठी म्हणून आता अद्ययावत करत नाही.. पण पुढच्यावेळी नक्की काळजी घेईन..
हं! छान! काल्पनिक आहे. दुसरे
हं!
छान!
काल्पनिक आहे.
दुसरे (त्यापेक्षाही जास्त) महत्वाचे - या कथेवर कोणाला मालिका, नाटक अथवा चित्रपट बनवायचा असेल तर त्याने खालील ई-मेल पत्त्यावर लेखकाशी संपर्क साधावा. जेणे करून शमीनच्या भुमिकेसाठी कलाकार शोधायचा त्रास वाचेल..
>>>>
हे भारी आहे हं !
रीया --- आपलं तर तेच भारी
रीया --- आपलं तर तेच भारी असते..
तुला पण स्पेशल धन्यवाद
तुला पण स्पेशल धन्यवाद
अभिजीत नाही..... अभिषेक...
अभिजीत नाही..... अभिषेक... "तुमचा अभिषेक" एवढे नाव लिहूनही कसे चुकतात लोक..
आणि ते स्पेशल थँक्स "हीरो" साठी होते..
अभिजीत नाही.....
अभिजीत नाही..... अभिषेक...
>>>>
हाहापुवा
सॉरी
सॉरी
चिमुरी... प्रतिसाद द्यायच्या
चिमुरी... प्रतिसाद द्यायच्या आधी तुला माझे नाव चेक करावे लागले... ?? आता तर मला जास्तच राग आलाय..
@ रीया.. एवढे हसायची गरज नाही... अभिजीत नाव टीपिकल आणि अभिषेक हे युनिक असल्याने चुकतात लोक..
अभिषेकदादा : ते मी नावं चुकले
अभिषेकदादा : ते मी नावं चुकले त्याला नाही हसले रे
तू जो प्रतिसाद दिलायेस ना त्याला हसले.
संपादित करु का सांग... आपका हुकुम सर आखोंपे!
पण अभिजित टिपिकल आणि अभिषेक युनिक याबद्दल पुन्हा आणि सॉरी
अप्रतिम ! अभिषेकराव खुप आवडली
अप्रतिम !
अभिषेकराव खुप आवडली 'डायरी'!
छान कथा, आवडली.
छान कथा, आवडली.
मस्तच! पहिल्या पासुन
मस्तच! पहिल्या पासुन शेवटपर्यंत छान प्रवाही ठेवली आहे कथा, वाचताना कुठेच कंटाळा नाही आला.
सॉरी रे..
सॉरी रे..
वॉव.. छान शेवट.. आवडली रे!!!
वॉव.. छान शेवट.. आवडली रे!!!
गुडू, सोनाली --- धन्स..
गुडू, सोनाली --- धन्स..
वर्षूदी --- थॅन्कू...
विनाच --- वेरी वेरी थॅन्क्स..
चिमुरी --- बस्स... झाले.. आता... मला राग नाही आला..
रीया --- नो कॉमेट्स.. नाहीतर परत तू मला अभिषेकदादा बोलून काहीतरी रीप्लाय देशील..
मस्त आहे
मस्त आहे
धन्स आशू..
धन्स आशू..
छान आहे डायरी... आवडली.
छान आहे डायरी... आवडली.
छान.. उगीच गुडीगुडी शेवट न
छान.. उगीच गुडीगुडी शेवट न करता धक्कादायक केलात म्ह्णून जास्त आवडली कथा अभिषेकजी.. असेच लिहीते रहा..
मस्त! आवडली कथा पहिल्या ३
मस्त!
आवडली कथा
पहिल्या ३ भागांचे लिखाण्/फ्लो जास्त आवडले....
कथेला दिलेले वळण आवडले.
कथेला दिलेले वळण आवडले. क्षणभर वाटले, काही अमानवीय असले का त्या डायरीत, पण नाही.
मस्त. अजुन नविन काही येउद्यात.
अभिषेक कथा छान आहे. लाजो
अभिषेक कथा छान आहे. लाजो म्हणाले तसं... पहिले तीन भाग जास्त प्रवाही वाटले. हा भाग थोडा घाईघाईने संपवल्यासारखा वाटला... पण फ्लो चांगला आहे
आवडला हाही भाग. दुसरे
आवडला हाही भाग.
दुसरे (त्यापेक्षाही जास्त) महत्वाचे - या कथेवर कोणाला मालिका, नाटक अथवा चित्रपट बनवायचा असेल तर त्याने खालील ई-मेल पत्त्यावर लेखकाशी संपर्क साधावा. जेणे करून शमीनच्या भुमिकेसाठी कलाकार शोधायचा त्रास वाचेल..
>>> हे जास्ती आवडलं
छान कथा, आवडली. "कार्तिक
छान कथा, आवडली.
"कार्तिक calling कार्तिक " , चित्रपटाची आठवण झाली...
पु.ले.शु.
Pages