मृत्यूचा उलगडा

Submitted by बेफ़िकीर on 17 May, 2012 - 10:17

शारदा होस्टेल फॉर वर्किंग वूमेनच्या तिसर्‍या मजल्यावर अनया पोचली तेव्हा ती सर्वार्थाने संपलेली होती. तीन मजल्यांचे सहा जिने चढण्यापूर्वी ती ऑफीसपासून बस स्टॉप आणि बस स्टॉप पासून होस्टेल असे एकंदर एक किलोमीटर चाललेली होती. संध्याकाळचे साडे सहा वाजूनही उकाडा कमी झालेला नव्हता. कधी एकदा पाण्याची बाटली तोंडाला लावतीय असे तिला झाले होते. पण इतकी दमणूक रोजच व्हायची. आज काहीतरी विशेष झाले होते. त्यामुळे अनयाचा संपूर्ण धीर संपलेला होता. अक्षरशः लोटलेल्या दारातून ती आत आली आणि बेडवर दाणकन आडवी झाली.

शहनाझ चकीत होऊन बघतच बसली. शहनाझचे खरे नांव प्रार्थना होते, पण व्यवसायासाठी असे जरा चमकदार नांव असावे म्हणून तिने शहनाझ हे नांव घेतले होते. प्रार्थना हे नांव उच्चारायला अवघड म्हणून होस्टेलमध्ये तिला सगळ्याजणी परी म्हणत असत. ती जाहिरात क्षेत्रात मॉडेल होऊ इच्छीत होती. वेगवेगळ्या ठिकाणी सतत काम मागायला जाणे आणि एरवी आधीच्या असाईनमेन्टमध्ये मिळालेल्या पैशांवर चैन करत होस्टेलमध्ये आराम फर्मावणे हे तिचे छंद होते. तिने आजवर तीन जाहिराती केल्या होत्या दोन वर्षात. फक्त तीन जाहिरातींमधून तिला आजवर फक्त एक लाख दहा हजार रुपये मिळाले होते. पण नवनवे पोषाख आणणे, मेक अप ची प्रसाधने आणणे आणि होस्टेलची फी भरणे या शिवाय काहीही खर्च नसल्यामुळे दोन वर्ष तिल ते पुरले तर होतेच, पण त्यातून तिने आणखीन स्वतःचे सुंदर फोटोग्राफ्स काढून त्याच्या कॉपीज अनेकांना पाठवलेल्या होत्या. मोबाईल फोनचे बिल मात्र भरमसाठ यायचे, पण लहान सहान असाईनमेन्टमध्ये कोणाला थोडीशी मदत केली पाच सातशे मिळायचे. मग ही मदत काहीही असू शकायची. जाहिरातीसाठी लागत असलेल्या गोष्टी स्वस्तात आणून देणे, सर्व काही वेळच्यावेळी जागच्या जागी येईल यासाठी संपर्क करून कोऑर्डिनेशन करून देणे, काहीही. प्रत्यक्ष जाहिरातीत ती नसली तरी तिचा जनसंपर्क ठीकठाक असल्यामुळे तिला हलकी सलकी कामे मिळायचीच. आजवर तिने एका ब्रॅन्डची साडी, एक टूथपेस्ट आणि एक औषध अशा तीन जाहिराती केल्या होत्या, त्यापैकी टूथपेस्टच्या जाहिरातीची होर्डिंग्ज लागलेली होती. साडीची जाहिरात काही दिवस पेपरमध्ये आलेली होती. आणि औषधाची जाहिरात मात्र धक्कादायकरीत्या फारच गाजली होती कारण त्यातील जी पंचलाईन होती ती लोकांच्या तोंडात बसली असतानाच ती लाईन म्हणण्याची परीची, म्हणजे शहनाझची शैली अतिशय सुंदर होती. याच जाहिरातीच्या रिपीट व्हर्जन्समधून तिला पैसे मिळत गेले होते.

आत्ता दाराकडे पाठ करून निवांत लवंडलेल्या परीला मागच्या बाजूला जोरदार हादरा बसला आणि ती घाबरून उठून बसली. बघते तर अनया एकदम जोरात पलंगावर आदळल्यासारखी आडवी झालेली आणि तिची नजर समोरच्या भिंतीवर शून्यात पाहतात तशी खिळलेली.

"काय गं?? बरीयस ना?"

अनयाने परीच्या या प्रश्नाची जणू दखलच घेतली नसावी तशी ती भिंतीकडेच पाहात बसली. परी तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली

"अगं झालं काय ? आं? अशी का बघतीयस???"

साधारण दोन वर्षाचा काळ त्या दोघींनी त्या रूममध्ये एकत्र काढलेला होता. मैत्रिणी झालेल्या होत्या त्या. अनेक सुखद आणि दु:खद क्षण एकत्र घालवून मने जवळ आली होती. जिवलग मैत्रीणी भांडतात तशा याही भांडलेल्या होत्या. अगदी आठ आठ दिवस अबोले वगैरे. पण नंतर परत गळ्यात पडलेल्या होत्या. दुसरीसाठी झटत होत्या. अनयाच्या घरी परी एकदाच गेलेली होती. अनयाचे गाव लांब होते बरेच. खुद्द अनयाही सहा महिन्यातून एकदा जायची. पण आठ हजार रुपये दर महिन्याला घरी पाठवायची. तिच्या पाठच्या दोन बहिणींच्या लग्नाला मदत म्हणून. अनया स्वतः मात्र इतक्यात लग्न करणार नव्हती. घरच्यांचा आग्रह असूनही. तिचा मित्र जय तिच्याशी लग्न करणारच होता, पण दोघांचे मिळून एक घर घेतल्यावर. तोवर लहान बहिणींची लग्ने उरकून घ्या असे अनयाने घरी स्पष्ट सांगितलेले होते.

परीलाही एक मित्र होता, अजित. तोही त्याच क्षेत्रात होता आणि तोही उमेदवारीच्याच काळात होता. पण त्यांच्या मैत्रीला अजून 'तसली' वगैरे किनार नव्हती. ते नुसतेच एकाच अवस्थेत असल्याने एकमेकांबरोबर थोड्या गप्पा मारायचे आणि तो कधीतरी परीला मोटरसायकलवरून होस्टेलला आणून सोडायचा वगैरे.

परीच्या स्पर्शाने उरला सुरला धीर संपलेली अनया परीच्या कुशीत बिलगून रडू लागली. धक्क बसलेल्या परीने विचारपूर्वक प्रथम अनयाला रडू दिले. काय आहे ते सावकाश समजेलच असे तिला वाटले. पण बराच वेळ अनया काही बोलेना. खोदून खोदून विचारल्यावर रडत रडत म्हणाली.

"कॅश टॅली झाली नाही... काउंटरला मी होते आज... चाळीस हजार शॉर्ट आहेत... "

"अँ??? ... मग??? इतकी का रडतीयस??? अगं असतील हिशोबात कुठेतरी राहिलेले... "

"अकरा वेळा टोटल केली अकरा... सगळ्यांनी मिळून पुन्हा पुन्हा केली टोटल.. नाही लागत आहे..."

"अगं पण.. पण म्हणजे काय??? म्हणजे तुझ्याकडे नाहीयेत ना पैसे???"

"अगं माझ्याकडे असते तर मी सरळ हिशोबातच धरले नसते का?? प्रश्नच आला नसता टॅली न होण्याचा..."

" हो पण कंप्यूटराईझ्ड आहे ना???"

"आज लाईट नसतात ना???... आज आम्ही मॅन्यूअल रेकॉर्ड्स करून ती शुक्रवारी अपलोड करतो..."

"अगं पण त्यात प्रॉब्लेम काय आहे??? काहीतरी घोळ झालेला असेल इतकंच... मिळेल ती एंट्री"

"अगं मी वेडीय का? शक्य नाही आता ते पैसे मिळणं... कोणीतरी उचललेत ते..."

"प... पण.. म्हणजे तुला काय प्रॉब्लेम केला का बॅन्केने???"

"मला काय सोडतील का ते??? तलवार थैमान घालत होता... आधीच शीघ्रकोपी..."

"काय म्हणाला तो???"

"तो म्हणाला हे पैसे याच महिन्यात जमा केले नाहीस तर तुला अटक करायला लावीन...."

"काय माणसंयत.. तू तिथे दोन वर्षापासून आहेस ना???"

"त्याला काय माझ्यावर विश्वास थोडीच असणारे???"

"पैसे गेले कसे पण??"

"ते कळल्यावर मी रडेन का ?"

"सॉरी.. पण बाकीचे काय म्हणतायत???"

"पर्सेस आणि पाकीटं खोलायला लावली त्या तलवारने सगळ्यांची... ऑल क्लीअर.. ओन्ली आय अ‍ॅम इन अ फिक्स"

"पण.. त्यांना म्हणाव कंप्लेन्ट करा की???"

"तो तेच करायला चाललावता....मी रिक्वेस्ट केली की मला वेळ द्या थोडा..."

"बावळट आहेस.. असे काही झाले की पहिले पोलिसांना इन्व्हॉल्व्ह करायचे असते..."

" अगं पण माझी काय अवस्था करतील ते?? तुला समजत नाहीये का?"

"चाळीस हजारांसाठी तू चोरीचा गुन्हा करशील???"

"हे कोणाला पटणार परी? "

"पण.. तू जयशी बोललीस का?"

"तो कुठंय इथे?? तो दिल्लीलाय..."

"हो पण कळवलंस का?"

"अगं त्याला कळवून काय करू??? तो आधीच व्याजाचे हप्ते फेडतोय.."

"अगं पण त्याला माहीत असायला हवे ना???"

"अगं बाई त्याला आणि घरच्यांना कळवणं ही माझी प्रायॉरिटी नाहीये..."

"एक मिनिट... मी.. चहा आणू का तुझ्यासाठी..."

"नकोय मला काही..."

"अनु अगं मला एक सांग.. तुझं रेकॉर्ड इतकं क्लीन असताना चाळीस हजाराचं तुला का टेन्शन येतंय?? बृन्केतला एकही माणूस यावर विश्वास ठेवणार नाही की चाळीस हजार तू घेतले असशील.... कोणाला तरी क्रेडिट झाले असणार एक्स्ट्रॉ किंवा काहीतरी चूक असणार.. ती उद्या समजेल.."

"परी... अख्खा स्टाफ दुपारी तीन नंतर नेहमीचे काम सोडून सलग अडीच तास हेच करत होता... प्रत्येक एन्ट्री करेक्ट आहे.. प्रत्येक नंबर्स जुळतायत... फक्त एकच गोष्ट खटकण्यासारखी आहे.. ती म्हणजे अ‍ॅक्च्युअल कॅश चाळीसने कमी पडतीय..."

" हे काल झाले नसेल कशावरून???"

"अगं डेली टॅलींग आहे..."

"मग कालचं परफेक्ट होतं का???"

"रोजचं परफेक्ट असल्याशिवाय आम्ही कॅशशी कन्सर्न्ड लोकं निघूच शकत नाही... एखाद्याला लवकर जायचं असलं तर स्पेशन पर्मिशन लागते.."

"तुझ्याइथे कोण आलंवतं का?"

"केबीन आतून बंद करते मी कांऊंटरची... सकाळी दहापासून बाथरूमलाही गेले नाही अडीचपर्यंत..."

"आणि कोणी आत आलं नाही..."

"कोणीही नाही..."

"मग कस्टमरला जास्ती गेले..."

"पण डेबिट्सशी बॅलन्स मॅच होत नाहीये..."

"तुझ्या टेबलखाली पडले???"

"मी ते बघणार नाही का?"

"मग झालं काय??? तुला कॉल वगैरे आला होता का??"

"दोन कॉल्स आले होते.. पण ते घ्यायला जाताना मी केबीन लॉक करून गेले होते... बाकी सहा कॉल्स सेल फोनवरच आले.."

"अनया.. घोळच आहे बाई.."

"घोळ??? माझी नोकरी गेली समज तू आता... "

अनया पुन्हा रडू लागली. परी तिला थोपटू लागली. तेवढ्यात अनुला सेलवर कॉल आला. कॅशला असलेला आणखी एक माणूस दळवी तिला फोन करून धीर देत होता. तेव्हाही त्याच्याशी बोलताना ती रडतच होती.

शेवटी परीने तिला स्पष्ट सांगितले. चाळीस हजार घेणारी तू मुलगी नाहीस हे शेंबडे पोरगेसुद्धा सांगेल. काहीतरी चूक झालेली आहे किंवा कोणीतरी चोरी केलेली आहे, पण तू केलेली नाहीस. आत्ता रडून उपयोग नाही. आणि उद्या जर तलवार म्हणाला की केस करायची तर सरळ केस करूदेत... उलट तू को ऑपरेट कर.. चोर सापडेल.

अनयाची पर्स बिनदिक्कत हातात घेऊन परीने हे सगळे बोलताना तिची पर्सही तपासली.

उदासवाणेपणाने दोघी बसून राहिल्या. दिवे लावायचेही सुचले नाही.

मुसमुसत्या आवाजात अनया परीला घरचे प्रॉब्लेम्स सांगू लागली. जयला हे कळल्यावर तोही भडकेल म्हणू लागली. दोन बहिणींच्या लग्नाची निवृत्त झालेल्या वडिलांनी पुरेशी तयारी केलेली नाही हेही म्हणाली. जीवनाने सर्व दिशांनी संकटे बरसवलेली आहेत असे म्हणून तशीच पडून राहिली.

ती रोज आठ वाजता बाप्पाला दिवा लावते हे आठवून तिला थोपटत बसलेल्या परीने उठून दिवे लावले आणि बाप्पासमोर दिवा व उदबत्ती लावली. स्वतःच नमस्कार केला. बाप्पाला नमस्कार करायला अनया उठलीही नाही. तिचा चेहरा रंग उडाल्यासारखा झाला होता.

"चल अनु.. झालं ते झालं.. तुझी काही चूक नाहीयेना?? मग तू घाबरू नकोस.. काही तुझी नोकरी जात नाही अन काही होत नाही... फार तर काय... चाळीस हजार फेडावे लागतील ना??? आपण फेडू दोघी मिळून.. जयलाही सांगू नकोस सगळे पैसे फिटेपर्यंत... आणि घरीही सांगू नकोस... चल उठ... जेवायला जाऊ..."

अनु कशीबशी उठली. तोंडावर पाण्याचे सपकारे मारून तिने चेहरा आरश्यात पाहून जरा नीट केला. हसू तर फुलतच नव्हते, पण रडू आवरावे लागत होते. तिच्या पाठीवर थोपटत परी तिला खाली घेऊन जायला निघाली.

मेसमध्ये जेवताना अनुसाठी म्हणून परीही कोणाशीही काही बोलत नव्हती. एरवी ती इतक्या गप्पा मारायची की जेवणच राहून जायचं. पंण आज फक्त हाय हॅलो एवढंच. तसेही कोणी फार चौकशी करतच नव्हते अनुची. प्रत्येकीला आपापली फिकर. जेवणे आटोपून दोघी वर आल्या तेव्हा नऊ वाजलेले होते.

"चल झोप आता.. .उद्या पाहू... गोळी घेतीयस का?"

अनुने होकार भरला. परीने गोळी हातात घेऊन हात तिच्यासमोर केला तशी अनु म्हणाली...

"आय विल गेट सम मिल्क... तू घेशील???"

"मी आणू का?"

"नको.. मी आणते.. तू घेशील ना?"

"हं..."

अनु पुन्हा उठून मेसमध्ये गेली. कूपन दाखवून दोन ग्लास दूध घेतले आणि पुन्हा पायर्‍या चढून आपल्या खोलीत आली. टेबलवर ग्लास ठेवून वाजणार्‍या सेलकडे पाहिले..

"जयचा आहे... " - परीने बेडवर बसून पाहिले..

धावत जाऊन अनुने जयचा कॉल उचलला आणि त्याला अफरातफरीबद्दल काहीही न सांगता बाकीचे बोलत राहिली व नॉर्मल असल्याचे दाखवत राहिली. परी बेडवरच होती. तिला जयचाही आवाज अस्पष्टपणे येत होता. त्याच्या स्वरात नेहमीचीच मिश्कील छटा असावी असे परीला वाटले. आपल्या मैत्रिणीला किती मानसिक दबाव सहन करावा लागत आहे हे पाहून तिला वाईट वाटले.

जयचा कॉल संपत असताना परी टेबलवरील स्वतःला वाचायचे असलेले पुस्तक शोधत होती. अनुने ते पाहिले व ती गोळी घेऊन दूध घ्यायला तेथे गेली. पुन्हा एकदा परीला आपल्या मिठीत घेऊन अनुने स्वतःलाच धीर द्यायचा प्रयत्न केला. आणि मग गोळी घेऊन वर दूध पिऊन अनु शांतपणे परीकडे पाठ करून झोपून गेली.

परीनेही पुस्तक वाचायला घेतले आणि बोटाने दूधावरची साय दूर करत एक एक घोट घ्यायला सुरुवात केली.

एकंदर इतक्या लवकर न झोपणारी परी... आज दूध पिऊन नऊ वीसलाच शांतपणे झोपून गेली.

================

पहाटेचा पाचचा अलार्म सेलफोनमध्येच होता परीच्या.

तो अलार्म वाजताच ती नेहमीसारखीच दचकून उठली. त्यानंतर तिला काळजीही नेहमीचीच वाटली की अलार्मने अनु जागी होईल आणि जाग आल्यामुळे भांडण काढेल. त्यामुळे तिने तो अलार्म घाईघाईत बंद केला आणि योगाच्या क्लासला जायला सज्ज होऊ लागली. तिच्या व्यवसायात सुडौल दिसण्यास महत्व असण्यामुळे उशीरा उठण्यास महत्व नव्हते. व्यायामाचा पोषाख घालून ती शूज घालत पलंगावर बसली. अजित पाच वाजताच जीमला आलेला असेल असे तिच्या मनात आले. गेले काही दिवसांपासून त्याची भेट व्हावी याची वाट बघणे सुरू झाले आहे याबद्दल तिने स्वतःलाच मनातल्या मनात खडसावले. बारीक दिव्यात कसेबसे आवरणे आवरून तिने बाहेरच्या दाराकडे पाय टाकला. दार उघडून बाहेर पडून एकदाच तिने आत नजर टाकली. बाहेरच्या दिव्याचा प्रकाशाने या झोपलेल्या बयेला जाग येऊ नये आणि नवा वाद होऊ नये याची तिला काळजी होती. पण बाहेरच्या दिव्याचा प्रकाश अनुच्या चेहर्‍यावर पडलाच. खरंच... तो आज पडायला नको होता असे परीलाच पहिल्यांदा वाटले....

...कारण जे दृष्य दिसले ते शहारवणारे होते.. पहाटेच्या शीतल वातावरणात घामाने भिजून किंचाळत परी बाकीच्या मुलींना बोलावत होती... होस्टेलच्या सर्व खोल्यांची दारे धाडधाड उघडली जात होती.. सर्व मुलीही किंचाळतच त्या रूमकडे जात होत्या.. आणि परी तोवर फिट येऊन कोसळलेली होती... तिने पाहिलेले दृष्य होतेच तसे... तोंडातून प्रचंड फेस आलेला... डोळे सताड उघडे आणि बाहेर आलेले... अतिशय बटबटीत, चेतनाहीन आणि भयावह डोळे.. आणि निष्प्राण कलेवर... अनयाचे

============================

नगमा या सुंदर नावाच्या मुस्लिम असलेल्या आणि पुरुषापेक्षाही करारी भासणार्‍या महिला इन्स्पेक्टरसमोर परीची बोबडी वळलेली होती.... खुर्चीवर बसून पंख्याच्या वार्‍याखालीही गळ्यावरचा घाम पुसायला जीमसाठी घेतलेला छोटा नॅपकीन पुरत नव्हता... नग्माचा आवाज एखाद्या घंटेसारखा होता... डोळे आणि नजर खंजीरासारखे डोळ्यात घुसत होते.. तिचे आपल्याभोवती फिरत फिरत प्रश्नांची सरबत्ती करणे परीला आजूबाजूने गिधाडे उडत असल्यासारखे वाटत होते... सेल फोन नग्माने जप्त करायला लावलेला होता... त्या खोलीत तिच्याशिवाय एक महिला पोलीस आणि एक पुरुष पोलीसही होते... त्यातील महिला पोलिसाने परीचे केस हातात धरून ताणून मागे वळवलेले होते... त्यामुळे आपोआपच परीचे तोंड वर झाले होते आणि वरचा दिवा डोळ्यांना फिरवायला भाग पाडत होता....

आपण एक संपूर्ण रात्र एका प्रेताशेजारी झोपलो होतो याची भीतीच अजून परीच्या मनातून गेलेली नव्हती.. डोळ्यांमधून अश्रूंचे पाणी जास्त येत आहे की दिव्याच्या त्रासामुळे होणारे पाणी जास्त येत आहे हे कोणाला कळले नसते.. होस्टेलच्या मेट्रनने हजार विनंत्या करूनही शेवटी नग्माने परीला चौकशीसाठी आतल्या खोलीत नेलेच होते... कारण सर्व प्रकारची चौकशी करूनही अनया आत्महत्या करेल हे नग्माला मान्यच होत नव्हते.. बाहेर अजित.. म्हणजे परीचा मित्र आल्याचे नग्माला समजले तसे नग्माने त्याला बसवून ठेवायला सांगितले... बाहेर अजितच्या मनात प्रचंड धाकधूक वाढलेली होती.. त्याला आत, जेथे परीची चौकशी चाललेली होती तेथे प्रवेशही नव्हता आणि बाहेरही जाता येत नव्हते....

"पारीख... केन दे रे..."

पारीख हवालदाराने एक केन नग्माच्या हातात दिली.. परीकडे बघत नग्म म्हणाली..

"अय जन्नत की परी... जानेमन... आता तडाखे बसणार आहेत... बोलतेस की कसं???"

तो अवतार, ती केन आणि तो आवाज पाहूनच परीच्या तोंडातून शब्द फुटेना. आपले जगात कोणीही असे नाही की जे आत्ता आपल्या मदतीला धावेल याची तिला आज प्रथमच सर्वाधिक जाणीव झाली..

हुंदके अनावर होऊन परी रडू लागली... अजून तर तिला साधा एक फटकाही कुणी दिलेल नव्हता.. तोवर तिची ही परिस्थिती झालेली होती ..

शेवटी परीने ठरवले... जे झाले ते पुन्हा सांगून पाहायचे... मात्र मगाशी अफरातफरीचे सांगितले नव्हते... तेही आता सांगायचे... आत्तापर्यंत परीने ते सांगितले नव्हते कारण उगाच मेल्यावर अनयाच्या अब्रूचे धिंडवडे उडायला नको होते तिला... अजून बॅन्का उघडलेल्याच नसल्याने अनु मेली हे बॅन्केत अजून कळलेलेच असणार नव्हते... ते कळल्यावर कदाचित बॅन्केने चाळीस हजाराचा विषय बंदच केलाही असता... उगाच बिचारी मेल्यावर कशाला ती केस खोदायची... त्यापेक्षा राईट ऑफ करण्याचे प्रपोझल बनवू... पण आता हे सगळे सांगणे भाग होते... कारण परीला वाटत होते की आत्महत्या आहे म्हंटल्यावर पोलीस केस होईल, पण त्यात ती गोवली जाण्याचे काही कारणच नसेल..

"मी सांगते सगळं...."

तिचे केस त्या अजस्त्र महिला हवालदाराच्या तावडीतून सुटले... दिवा बंद झाला.. मान खाली लटकली.. वेदना होत होत्या मानेत... पण या काहीच नव्हत्या... नग्माने केन खाली टाकली आणी एक खुर्ची गेहून परीच्या इतकी जवळ बसली की आता परी बोलली नाही तर ही तिला खाऊनच टाकेल..

"बोल... काय काय झालं.... कसं कसं पॉयझनिंग केलं???"

"ती... अनु... त... बॅन्केत चाळीस हजार..ची... अफरातफर झाली होती... "

"काय?????????"

"चाळीस...."

"म्हणजे????? मयत ज्या बॅन्केत होती तिथे अफरातफर केली होती तिने????"

"नाही नाही... तिनी नाही... ते चुकून झालं होतं.... "

"तुला काय माहीत चुकून झालं होतं????"

परीने सगळा प्रकार सांगितला...

आता केसला एक ठाम चेहरा मिळाला... केलेल्या फ्रॉडचा पश्चात्ताप म्हणून आत्महत्या असा...

नग्म खोलीतल्या खोलीत येरझारा घालू लागली.. तेवढ्यात पारीखने अनयाच्या जप्त केलेल्या सेल फोनवरून तलवारचा नंबर शोधला आणि त्याला कॉल लावला.. ताबडतोब हजर व्हायला सांगितले... अर्थातच तलवार एकटा आला नाही... त्याच्यासोबत दोन पुरुष सहकारी आणि एक महिला सहकारीही आले...

आता तलवारची चौकशी सुरू झाली...

"मिस्टर तलवार... तुम्हाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम लागेल..."

"मॅडम अहो... कोणालाही विचारा... चाळीस हजार ही काय अमाऊंट आहे का मॅडम?"

"किती रुपयांना आत्महत्या करणे योग्य ठरेल तलवार???"

"मॅडम.. तसं नाही म्हणायचं मला..."

"असं नाही अन तसं नाही... तुम्ही तिला हॅरॅस केलंत... धमक्या दिल्यात... "

"कोणाचीही शपथ घेऊन सांगतो मॅडम... मी तिच्यावर चिडलो हे खरे आहे... पण मी तिला म्हणालो की पैसे मिळाले नाहीत तर तुला रिपे करावे लागतील..."

"ती चाळीस हजार एकरकमी एका महिन्यात देणार होय?? हाच तर प्रॉब्लेम झाला ना? तिला टेन्शन आलं ते ह्याच गोष्टीचं की पैसे नाही मिळाले तर तुम्ही तिच्या एफ डी मधून ते रिकव्हर करणार आणि तिला हाकलून देणार.. "

"तिची एक रुपयाचीही एफ डी आमच्या बॅन्केत नाहीये मॅडम..."

"हे थोडे आश्चर्यजनक आहे नाही??? ज्या बॅकेच्या कमी व्याजदराच्या जाहिरातींमधून चांगले चांगले लोक तेथे खातं काढतात... तिथे एका कर्मचार्‍याचेच खाते नाही....???"

"तिचा एक मित्र होता मॅडम.... तो घर घेणार होता.. हिने स्वतःचे पैसे थोडे त्याला दिले आणि थोडे एका वेगळ्याच बॅन्केत स्वतःच्या नावावर ठेवले..."

"पण तुमच्याच बॅन्केत का नाही ठेवले???"

"मला खरंच नाही सांगता येणार... आमच्या स्टाफने तिला तसे सुचवलेलेही होते पूर्वी... पण तिला ते पटलेच नाही... का ते माहीत नाही..."

"तिची मैत्रीण... प्रार्थना उर्फ शहनाझ... ओळखता तुम्ही???"

"एकदोनदा भेट झालेली आहे..."

"कुठे?"

"बॅन्केतच... ती एकदोनदा आली होती..."

"तिचे खाते आहे??"

"नाही... अनयालाच भेटायला आली होती..."

"त्यांच्या मैत्रीबाबत काही माहितीय तुमच्यापैकी कोणाला?"

सर्वांनीच नकारार्थी माना हालवल्या... एकंदर सर्वांचेच म्हणणे पडले की चाळीस हजार ही काही आत्महत्या करण्यासारखी रक्कमही नव्हती आणि तलवारच काय पण कोणीच अनयाला फार लागेल असे बोलले नव्हते... मात्र तलवार चिडलेले होते आणि रिपे करा म्हणाले होते हे सर्वांनी मान्य केले...

तात्पुरते सर्वांना जायला सांगून नग्मा पुन्हा परीला ठेवलेल्या खोलीत आली...

तोवर होस्टेलच्या मेट्रन मीनल शहा आल्याचे समजल्यामुळे नग्मा त्यांना भेटायला गेली...

"मिसेस शहा.. मयताचे वर्तन कसे होते???"

"आय अ‍ॅम रिअली शॉक्ड मॅडम... हे काय झाले?? अहो इतकी चांगली होती ती... देवधर्म आवडायचा तिला..."

"तिचे काही खास शौक???"

"छे... काहीच नाही.. आपले काम बरे आणि आपण बर्‍या..."

"येण्याजाण्याची वेळ पाळणे??"

"अगदी नियमीत वेळेवर असायची..."

"बॉय फ्रेन्ड??"

"मॅडम... या मुलींचे प्रत्येकीचे कोण ना कोण असतेच... अर्थात आम्ही त्यात एक संस्था म्हणून आमच्या अखत्यारीत विषय येईतोवर पडूही शकत नाही... पण... अनयाचा एक मित्र आहे... तो आत्ता तासात पोचेल दिल्लीहून फ्लाईटने मॅडम..."

"कशाप्रकारचा मित्र आहे तो???"

"ते लग्नच करणार होते... तिच्या घरीही माहीत आहे..."

"ते दोघे सारखे भेटायचे???"

"माहीत नाही.. पण तो काही वेळा तिला सोडायला यायचा...अर्थात... सगळ्या मुलींना हे माहीत होते..."

"तुमच्या होस्टेलमध्ये पूर्वी काही... काही क्राईम वगैरे..."

"ओह अजिबातच नाही... काहीच नाही..."

"कोणी मुली...... अ‍ॅडिक्शन्स वगैरे..."

"छे छे.... "

"काही... इतर प्रकार..."

"लाईक???"

"कोणी प्रॉस वगैरे? ??"

"इम्पॉसिबल.."

"काही गुन्हेगारांशी कोणाचा संबंध??"

"शक्यच नव्हता..."

"पॉयझन मिळण्याची काही शक्यता???"

"एक मिनिट मॅडम... आमची एक असोदा म्हणून बाई आहे... तिला काहीतरी सांगायचंय..."

असोदाला आत बोलावण्यात आले...

"तुझं नांव काय?"

"असोदा.. म्हणजे यशोदाय.."

"काय करतेस तू होस्टेलवर??"

"मी काउंटरवर असते... कोणाला बिस्कीट दूध... चहावगैरे लागलं तर मी देते आणि पैसे जमा करते..."

"तुला काय सांगायचंय??"

"मॅडम... एकदा.. परीताई आणि अनया मॅडमचे खूप जोरात भांडण झाले होते... "

"नेहमी व्हायचे???"

"अं.. म्हणजे तशा कुरबुरी सगळ्याच मुलींच्या आपापसात व्हायच्या.. तशाच याही दोघींच्या व्हायच्या... अगदी आठवडा आठवडा बोलायच्या नाहीत... वेगवेगळ्या वेळी येऊण जेवायच्या वगैरे... पण नंतर एक व्हायच्या.."

"मग त्या दिवशीच्या भांडणात काय विशेष होतं???"

" त्या दिवशीचं भांडण जरा वेगळंच होतं मॅडम.."

"का?"

"त्या दिवशी परीताईंनी सर्वांदेखत अनया मॅडमना ढकलून दिले..."

"पण का?"

"भांडण झालं म्हणून..."

"पण भांडण का झालं???"

"मला काही कळलं नाही... फक्त परीताई इतकंच म्हणाल्या की तू असे करशील असे वाटले नव्हते..."

"काय करशील असे???"

"नाही माहीत..."

"पण बाकीच्या मुलींना तर माहीत असेल ना???"

"नाही... खोदून खोदून सगळ्या विचारत होत्या... पण या दोघी न बोलता वर निघून गेल्या.. दोन दिवसांनी पुन्हा बोलत होत्या..."

"होस्टेलमध्ये कधी काही चोरी वगैरे???"

"नाही मॅडम..."

"मला एक सांग असोदा... मेसमध्ये तू नेहमी सगळ्यांना बघत असशील ना?"

"हो"

"अनयाशी इतर कोणाचं भांडण किंवा तिच्याबाबत तिच्यापाठी कोणाची काही चर्चा???"

"नाही.. बाकी कोणाशी भांडण तर अजिबातच नाही.."

"शहनाझ ही मुलगी कशीय???"

"कोण शहनाझ मॅडम??"

"अनयाची रूममेट????"

"प्रार्थनाताई.. परी म्हणतात त्यांना..."

"हं... परी स्वर्गात असते म्हणतात... ही तर नरकातून आलेली दिसते..."

"छे छे.. असे काहीच नाही मॅडम... त्या दोघी तशा फार चांगल्या मैत्रिणी होत्या..."

"काल दोघी जेवायला आल्या होत्या?"

"हो? आल्यावत्या की.."

"तेव्हा त्यांच्यात काही बोलणं वगैरे???"

"बरोबर... तेही माझ्या लक्षात आलं होतं मॅडम... काल त्या दोघी फारसे कोणाशीच बोलत नव्हत्या... खरे तर परीताई सगळ्यांशी हसत खेळतच जेवायच्या... कित्येकदा वेळ संपली तरी त्यांचे जेवण व्हायचे असायचे... अनया मॅडम मात्र जेवण संपवून परीताईंचे जेवण होईपर्यंत थांबायच्या.. पण काल दोघीही कोणाशीही बोलल्याच नाहीत..."

"तू विचारलं नाहीस त्यांना?? की आज काय झालंय???"

"नाही.. मी नाही पडायची या मुलींमध्ये कधी..."

"का? काही विशेष?"

"तसं काही नाही... नको वाटायचं..."

"का पण??"

"म्हणजे मॅडम... सगळ्या चांगल्या घरातल्या... आमच्यापेक्षा पैसेवाल्या.. मग उगीच कधीतरी अपमान होणार.. कोणीतरी काहीतरी बोलणार... आणि आपण वाईट ठरणार..."

"बाकी काही...काही प्रकरणं होस्टेलमध्ये???"

"कसली प्रकरणं?"

"कसलीही.. जे तुला सांगावेसे वाटत आहे.. या आत्महत्येशी संबंध नसलेलेही..."

"काहीच नाही मॅडम..."

"ठीक आहे.. जा तुम्ही लोक... नंतर परत बोलावू किंवा भेटायला येऊ..."

नग्मा परत परीला भेटायला आत आली...

आली ती सरळ परीची मान गदागदा हालवत म्हणाली...

"तुझे आणि तिचे काय भांडण झाले होते??? एकदा तू तिला ढकलून दिले होतेस सगळ्यांसमोर ते??"

"तिनी... तिनी पत्र लिहिले होते मेट्रनना... की ही मुलगी मॉडेलिंगच्या नावाखाली काहीतरी वेगळेच करत असावी असे वाटते....."

"काय????? मग हे मेट्रनना माहीत नाही???"

"नाही.. ते पत्र मला आधीच मिळाले... तिने ते लपवून ठेवलेले मला मिळाले.. तेव्हा ती जेवायला खाली गेली होती... म्हणून मी रागारागात खाली गेले आणि तिला ढकलले..."

" परीराणी... आता खरं खरं उत्तर द्यायचं... तू धंदा करतेस बाहेर???"

अर्थातच परी नकारार्थी मान हालवत जोरजोरात रडू लागली..... तिला तो अपमान सहन झाला नाही...

नग्माला इतके पटले की ही मुलगी तसली असणे शक्य नसावे..

"ते पत्र कुठंय??"

"फाडलं मी ते... तेव्हाच..."

नग्मा वैतागून बाजूला झाली आणि विचार करू लागली.. चाळीस हजाराचा फ्रॉड झाला म्हणून आत्महत्या करावी असे वाटण्यासारखी अनया मुलगी नव्हतीच.. ह्या दोघींमध्ये काहीतरी भयानक प्रॉब्लेम असला पाहिजे..

.. आणि तेवढ्यात चक्रावणारी माहिती मिळाली...

परी, अनया आणि अनयाचा मित्र जय या तिघांच्याही फोन रेकॉर्ड्समध्ये एक गोची होती... ती म्हणजे परी आणि जयचे काही कॉल्स होते... त्या कॉल्सचे टायमिंग फार विचित्र होते... कधी रात्री बारा वाजता.. तर कधी पहाटे पाच नंतर... आणि हे कॉल्स जाणवण्याइतक्या संख्येचे नसले तरी आठवड्यातून एखादा तरी कॉल होताच.. आणि एस एम एस ची रेकॉर्ड्स तर हे सांगत होती की जय आणि परी एकमेकांना बर्‍यापैकीवेळा मेसेजेस करत होते... आणि ही रेकॉर्ड्स गेल्या सहा महिन्यातील असल्यामुळे नग्माने आणखी मागची रेकॉर्ड्स मागवायला सांगितली..

नग्माला सगळा प्रकार समजून चुकला.. जय ठरवून दिल्लीला जाणार.. जाण्यापूर्वी अनयाकडचे पैसे घरासाठी म्हणून घेणार... प्रत्यक्षात प्रेम परीवर करणार... परीचेही त्याच्यावर प्रेम असणार... आणि दोघे मिळून बिचार्‍या अनयाचा काटा काढणार.. आता परीला 'आत' घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते..

परीने चौकीवर आल्यापासून पाण्याचा घोट घेतलेला नव्हता.. त्चा मित्र अजित तर आतही येऊ शकत नव्हता.. परीचा फोन नग्माच्या लोकांच्या ताब्यात असल्याने तो परीशी संपर्कही करू शकत नव्हता... असल्या विचित्र परिस्थितीत नग्माने परीला खर्‍या अर्थाने पोलिसी हिसका दाखवायला सुरुवात केली.. नग्माच्या हाताचे फटकेही इतके मजबूत होते की केनची गरजच नव्हती... किंकाळीही फुटत नव्हती परीच्या तोंडातून.. ती नुसतीच जमीनीवर वळवळत पडलेली होती...

"हरामी... बोल... त्या अनयाच्या मित्रावर लाईन मारतेस ना तू??"

त्याही परिस्थितीत परीने संतापून नाही असे सांगितल्यावर तिला आणखी फटके मिळाले..

"रंडे.... तुझे धंदे त्या अनयाला समजले म्हणून तर तुमच्यात भांडण झाले होते ना???"

"नाही... नाही... "

"हे बघ... हे बघ हे... हे निळे केलेले कॉल डिटेल्स... हे तुझे कॉल आहेत त्या जयला...."

परी हादरून बघतच बसली... बिल तिच्या नंबरचे होते.. त्यावरून केलेले कॉल जयला गेलेले होते... तिच्या डोक्यात प्रकाश पडला...

"अहो... अहो हे कॉल अनयाच करायची.. तिचा बॅलन्स वगैरे कमी असला की ती माझा सेल घ्यायची त्याच्याशी बोलायला.. मी कशाला त्याच्याशी बोलू ??? माझा काय संबंधय का? मी त्याला महिनोनमहिने पाहायचे पण नाही..."

एक मात्र होतं... स्पष्टिकरण देतानाचा परीचा चेहरा नग्माला निरागस वाटत होता... बहुतेक ही केस सामान्य आत्महत्येची आहे हे शिक्कामोर्तब होणारच होतं... तेवढ्यात बातमी आली की जय लॅन्ड झालेला आहे..

झालं... नग्मा जाऊन स्वतःच्या सीटवर अशा प्रकारे बसली की तिला एन्ट्रन्स आणि एन्ट्रन्सच्या लहान हॉलमध्ये बसलेला अजित दिसत राहील. अजितची मात्र तिच्याकडे पाठ राहील.. आणि जय आल्यावर त्या दोघांची नजरानजर होते की नाही हे नग्माला दिसेल...

पण अजित आत तिला भेटायला यायचा प्रयत्न करू लागला तसे त्याला अजून काही वेळ थांबावे लागेल असे सांगण्यात आले..

प्रश्न फक्त एकच होता नग्माच्या मनात... चाळीस हजारासाठी अनया आत्महत्या करेल की आणखी कुठल्या कारणासाठी??? असे तर नसेल की ते कारण आणि ती चाळीस हजाराची अफरातफर योगायोगाने एकाच दिवशी झाली इतकंच??? या चौघांमध्ये प्रेमाचा एखादा त्रिकोण असणे नाकारता येणार नाही... परीच्या सेलवरून जर अनया जयला कॉल करत असेल तर ते अशाच वेळी का करेल जेव्हा बाकीचे जग झोपलेले असते??? एखाद दिवशी संध्याकाळी आठचा कॉल तिच्या सेलफोनवरून का नाही आहे???

की चाळीस हजार घेऊन अनया पळून जाणार होती दिल्लीला? पण झडतीत नाही पैसे मिळाले नाही कुठली तिकिटे?? अजितचा सेल फोन घेऊन रेकॉर्ड्स बघूच ..

अजितचे रेकॉर्ड जस्ट येऊन पडले होते... दोन कॉन्स्टेबल्स ते तपासत होते.. नवल म्हणजे त्यात अजित आणि अनया असे एकही कॉम्बिनेशन नव्हते... अजित आणि जय असेही नव्हते.. अजित आणि अर्थातच परी असे मात्र असंख्य कॉल्स, मेसेजेस होते... जवळपास ऐंशी टक्के तेच होते.. म्हणजे अजित क्लीन असावा...

म्हणजे त्रिकोण झाला जय, अनया आणि परी. किंवा परी, अनया आणि अनयाने केलेली अफरातफर. किंवा परी, अनया आणि काहीतरी तिसरेच. जे परीला नको होते. जर परीचा सेल वापरून अनया जयला फोन करायची तर बिलात काहीही येऊ नये म्हणून तिचाच सेल वापरून अजितलाही फोन करत असेल का? परीच्या नकळत? परी क्लीअर नाहीये. एवढे नक्की. एक तर फार पोचलेली तरी आहे किंवा त्याहून जास्त पोचलेली तरी आहे. बावळट नाहीये. विषप्रयोग झालेला माणूस शेजारी आहे हे बारा बारा वाजता झोपणार्‍या पोरीला समजत नाही होय?

जय आला.

नग्मा पापणीही न लववता करारी नजरेने जयच्या चेहर्‍याकडे पाहात होती. तिला आश्चर्यच वाटले. अजितला पाहूनही विशेष काही भाव न दाखवता जय आतल्या काउंटरपाशी आला. याचाच अर्थ जय आणि अजित एकमेकांना ओळखतच नव्हते. म्हणजे अजित अजूनच क्लीअर होत होता. तो इनोसन्ट होता याबाबत नग्माला खात्री पटली.

जय आला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला पाणी वगैरे देण्यात आले. त्याची तिकीटे, दिल्लीच्या निवासाची डिटेल्स वगैरे तपासण्यात आले.

आता जयची चौकशी सुरू झाली.

"तुमचे प्रेम कधी जमले?"

"दोन वर्षांपूर्वी... माझे तिच्या बॅन्केत खाते होते... आम्ही बोलायचो.. मग नंबर्स एक्श्चेंज केले.. मग संपर्क वाढू लागला... "

"तुम्ही लग्न नाही केलेत??"

"मला घर घ्यायचे होते... ते आम्ही बूक केलेले होते.. एक लाख साठ हजार मी भरले.... चाळीस हजार अनयाने दिले होते... "

चाळीस हजार!

नग्माच्या डोक्यात वादळ उठले. चाळीस हजाराचा संबंध हा आहे तर. अच्छा अच्छा. चेहर्‍यावर काहीही न दाखवता तिने विचारले..

"ते चाळीस हजार तिने तुम्हाला कधी दिले??? "

"काल दुपारी माझ्या खात्यात भरले..."

" क्रेडिट मिळाले?"

"होय.. संध्याकाळी क्लीअर झाले.."

"तुमचे खाते अजून त्या बॅन्केत आहे??"

"नाही.. स्टेट बॅन्केत आहे... तिने त्या अकाऊंटला भरले.. "

"हे पैसे तिच्याकडे कुठून आले???"

"आय हॅव नो आयडिया.. पण तिच्याकडे पैसे असणारच की... तीन चार वर्षं सर्व्हिस झालेली होती तिची..."

"तिचे स्वतःचे अकाऊंट कुठे कुठे आहे माहीत आहे तुम्हाला?"

"कॉसमॉस आणि बॅन्क ऑफ बरोडा..."

"काल कॅश भरली???"

"हो..."

"की चेक??"

"कॅश.."

"तुम्ही विचारले नाहीत कॅश का भरली म्हणून?"

"मीच कॅश भर म्हणालो होतो.. चेक आला की उत्तरे द्यावी लागतात..."

"कॅशला नाही द्यावी लागत???"

"सॉरी.. मला तसे नव्हते म्हणायचे... "

"तुमचा इन्कम टॅक्स क्लीअर आहे???"

"ऑफकोर्स.. कंपनीच भरते... अ‍ॅट सोर्स डिडक्शन..."

"फॉर्म सिक्स्टीन???"

"घरी आहेत..."

"तुमच्या घरी कोण कोण आहे??"

"फक्त वडील.. आई गेली..."

"भाऊ बहिण??"

"मी एकटाच आहे..."

"वडिलांना अनया हे स्थळ पसंत होतं?"

"पूर्णपणे.. "

"अनयाकडे तुम्ही पसंत होतात?? "

"ते लोक तर लग्नाची घाई करत होते आम्हाला.. इन फॅक्ट मीही घाई करत होतो..."

"मला एक सांगा.. अनयाच्या आयुष्यात काही गंभीर अडचणी आल्याचे तुम्हाला माहीत आहे??"

"अडचणी?? नाही?? का?"

"तिने आत्महत्या का करावी? तुम्हाला काय वाटते??"

पुन्हा जयच्या डोळ्यात पाणी आले. गहिवरल्या स्वरात तो म्हणाला..

"खरच नाही माहिती.. आता तिच्या घरचे येतील दोन तासांनी... त्यांना काही माहितीय का बघुयात..."

"मिस्टर जय... ९७५०९८०६५४ हा नंबर कोणाचाय?"

"का?"

"उत्तर द्या...."

"एक मिनिट... मी डायलच करतो... ९७५०??? ९... ८०... ६.. ५४.. ओह... प्रार्थना.."

"कोण प्रार्थना?"

"परी.. तिची रूममेट.."

"तुम्ही तिला ओळखता?"

"अर्थातच.. आम्ही खूपदा बोलायचो... विषय अनयाच असायचा.. "

नग्माच्या डोक्यात अलार्म वाजला. परी इज लायिंग. निखळ असत्य बोलतीय ती.

"जय साहेब.. परी... परीच्या मनात... अनयाबाबत काय विचार होते???"

"तिची अनयाशी भांडणे व्हायची.. पण तशा मैत्रिणी होत्या... "

"भांडणे व्हायची पण मैत्रिणी होत्या म्हणजे?? "

"अनया बेसिकली तापट होती डोक्याने.. "

"पण होस्टेलचा स्टाफ सांगतो की ती शांत होती???"

"नाही.. तसे दाखवायची ती.. ती गोळ्या घ्यायची.. मनःस्वास्थ्याच्या..."

"इन्टरेस्टिंग.. तुमचे नाही भांडण व्हायचे तिच्याशी???"

"नेव्हर... ती माझ्याशी मात्र एकदाही भांडली नाही... मात्र त्या दोघींची भांडणे मी सोडवायचो"

"हे जरा खुपतंय नाही? एक अत्यंत भांडकुदळ, मनःस्वास्थ्यासाठी गोळ्या घेणारी मुलगी तिच्या प्रियकराशी एकदाही भांडत नाही आणि तिच्या मैत्रिणीशी तिची झालेली भांडणे प्रियकर सोडवतो???"

"हा हा हा... खरे तर मला आत्ता या प्रश्नांचे हसू येते आहे... पण त्यामुळे दु:ख क्षणभर दूर जात आहे हेही खरे.. "

"प्लीज अ‍ॅन्सर द क्वेश्चन..."

"वेल.. त्या दोघींची भांडणे बायकी स्वरुपाची... हिने आज असे केले.. तिने आज तसे केले स्वरुपाची असायची.. दोघी मला फोन करायच्या... आणि चक्क एकमेकींसमोरच... "

"यू वेअर सो पॉप्यूलर..."

"नाही... मला दोघीही मित्र समजायच्या..."

"समजायच्या... हंहं..."

"म्हणजे????"

"की दोघीही प्रियकर समजायच्या???"

"मॅडम इन्स्पेक्टर... प्लीज... वाटेल ते बोलू नका..."

"एक सांगा.. अनयाच्या फोनचा बॅलन्स संपला म्हणून ती बोलली नाही असे कधी व्हायचे?"

"अनेकदा.. बावळटला मी सांगायचो पोस्टपेड घे.. "

"मग ती काय करायची???"

"त्या दिवशी मेसेज पाठवायची गुड नाईट लो बॅलन्स... आणि झोपायची.."

"आणि मग परी फोन करायची..."

"व्हॉट आर यू कमिंग अ‍ॅट??? परी मला तिच्यासमोर वाट्टेल तेव्हा फोन करायची..."

" फक्त भांडणे झाली तरच???"

"नाही.. एरवीही... हिला जरा फिरायला घेऊन जात जा... बोअर करत बसते मला... वगैरे..."

"आणि अजित हा माणूस कसा वाटतो तुम्हाला...??"

"अजित आणि मी कधी भेटलोच नाही... पण तो परीचा चांगला मित्र असावा.. अनया म्हणायची तसे..."

"आत्महत्या करायला काय कारण असावे? "

"आय ... आय रिअली डोन्ट नो... ईव्हन आय वॉन्ट टू नो..."

"त्या दोघींची भांडणे???"

"शक्यच नाही... "

"मग??"

"माहीत नाही..."

"अनयाने ते चाळीस हजार कुठून चोरले तर नाहीत???"

"काय बोलताय तुम्ही???"

" दिल्लीला का गेला होतात?"

"प्रॉडक्ट ट्रायल"

"कंपनी?"

"ल्युरा मॅग्नेट्स"

"काय करतात?"

"मॅग्नेट्स... लार्ज प्लॅन्ट्ससाठीचे.."

"तुमचा रोल..."

"सर्व्हीस"

"ट्रॅव्हलिंग कितीय?"

"अल्मोस्ट महिन्यातून अंधरा दिवस..."

"मेट्रोज?"

"वेल.. खरे तर मोठे प्लॅन्ट्स असतात तिथे... पण या वेळी दिल्लीलाच तो प्लॅन्ट होता.. तो लहान प्लॅन्ट आहे.."

"घर कुठे आहे?"

"मिनर्व्हा मार्केट"

"जुनं की नवं?"

"जुनं... नवं शेषाद्री रोड"

"फ्लॅट?"

"टू बी एच के"

"वडीलही येणार होते राहायला?"

"ऑफकोर्स"

"फ्लॅटचा ताबा कधी मिळणार ?"

"आठ महिन्यांनी"

"अनयाने आत्महत्येचे सुतोवाचही केले नव्हते?"

"सुतोवाच? सुतोवाच कसले? केले असते तर मी धावून आलो असतो... आय अ‍ॅम शॉक्ड"

"फ्रॉड करण्याची तिची मानसिकता होती?"

"नेव्हर"

"तिचा इतर कोणी मित्र , प्रियकर असण्याची शक्यता"

"इम्पॉसिबल"

"परीच्याच सेलवरून ती अजितशी बोलत असली तर?"

"कशाला?"

"रोमॅन्टिक गप्पा मारायला"

" यू आर इन्सल्टिंग हर"

"लूक्स लाईक.. पण तुम्हालाही काही नक्की माहीत नाहीये..."

"मला नाही वाटत तसं..."

"ती अजितला ओळखायची???"

"अर्थातच.. मीही ऐकून आहे त्याला तर??"

" तुमच्या फोन बिलमध्ये तुम्ही केलेले आऊट गोईंग कॉल्स परीच्या सेल्वर गेले आहेत"

" अनया मला त्यावरून मिस्ड कॉल्स द्यायची काही वेळा... "

"अनयाच्या अनुपस्थितीत तुम्ही परीशी कधीच बोलला नाहीत?"

"अनेकदा बोललो, पण ते कॉल्स अनयाचा नंबर लागत नसला तर चौकशीसाठी केलेले होते..."

"परीमध्ये अशी कोणती गोष्ट चांगली होती अनयापेक्षा, जी तुम्हाला आवडायची?"

"आय मीन.. परी स्वभावानेच अतिशय हसतमुख, खेळकर होती..."

"होती म्हणजे?"

"आहे"

"मग तिने अनयाला का मारले?"

"तिने मारले????"

"मग कोण मारणार? इतका छान नवरा आहे, नवे घर होत आहे, पगार चांगला आहे दोघांचा, अशा व्यक्तीने वीष का घ्यावे?"

"मला तेच समजून घ्यायचे आहे"

"परी कुठली?"

"मला तिचे गाव वगैरे नाही माहीत..."

"ती काय करते?"

"मॉडेलिंग"

"अनयापेक्षा सुंदर आहे..."

"आहे.. हे मान्य आहे..."

"आणि हसतमुख आणि खेळकरही आहे..."

"हो..."

"कोणालाही आवडेल अशीच..."

"माझे अनयाशिवाय कोनावरही प्रेम नव्हते..."

"आणि तुमच्यावर अनयाशिवाय एखाद्याचे असू शकेल हे तुम्हाला मान्य आहे..."

"का असू शकेल???"

"का नसू शकेल??? तुम्ही चांगले हसतमुख, खेळकर असाल, करीअर चांगले आहे, मैत्रिणीने गटवलेला आहे, अशी मत्रिण जिच्याशी आपली सारखी भांडणे होतात.. तिच्यावर सूड म्हणून त्याला आपल्याकडे खेचायचा.. मग गोड गोड बोलायचे... मैत्रिणीच्या तक्रारी करतीय असे दाखवून स्वतःचे लाडे लाडे बोलायचे... अगदी निकोप स्वभावाची मैत्री आहे हे दाखवण्यासाठी मुद्दाम मैत्रिणीसमोर बोलायचे.... तिचा बॅलन्स संपला की मुद्दाम स्वतःचा सेल ऑफर करायचा... वेगवेगळ्या वेळी आणि अवेळी बोलायचे.. "

"हे मात्र... एक प्रकारे खरे आहे... "

"काय?"

"की मला एक दोनदा असे वाटले होते की परीने मला... मुद्दाम फोन केला असावा..."

"मुद्दाम म्हणजे???"

"काहीच कारण नसताना... उगीचच...."

" आणि तुम्हाला ते तसे करणे आवडले..."

"वेल.. एक इतकी सुंदर मॉडेल स्वतःहून फोन करत असेल तर ते न आवडण्याइतका मी अरसिक नव्हे"

"तुमची सेश्युअल रिलेशन्स होती???"

".........."

"मिस्टर जय??????"

"होय... एक दोनदा आली होती..."

"दोघींशी???"

"इन्स्पेक्टर प्लीज... कॅन यू स्टॉप क्वेश्चनिंग लाईक दॅट???"

"हा प्लॅन कसा तयार झाला असावा? अनयाला मारण्याचा..."

"पण ती मारली गेली आहे का?"

"कोणत्या कारणाखाली तिने आत्महत्या करावी? तिच्या ग्लासवर तर परीचे ठसे आहेत..."

"यू मीन... यू मीन तिच्या ग्लासमध्ये परीने.... पॉयझन????"

"उगीच स्वतःचा ग्लास तिथेच असताना दुसर्‍याचा ग्लास कोण कशाला हातात घेईल???"

"पण का???"

"मार्गातला काटा काढण्यासाठी..."

"कुठला मार्ग???"

"तुम्हाला प्राप्त करण्याचा..."

"छे"

"मिस्टर जय.. मला एक सांगा... परीच्या सेलफोनवरून अनया गप्पा मारायची हे तुम्ही कसे सिद्ध कराल?"

"कसे काय सिद्ध करता येईल ते आता? अनया असती तर तिने कबूल केले असते...."

" तुम्ही अजितला हे सांगितलेत का?"

"काय?"

"की अनया गेली?"

"अजित मला माहीतच नाहीये... त्याचा नंबर वगैरे... आणि त्याला का सांगू???"

"कदाचित त्याला ती बातमी आवडेलही..."

"परी कुठे आहे मॅडम??"

"पर्‍या स्वर्गात असतात... हा नरक आहे... "

"मला... मी.. जाऊ का?"

"तुम्ही का आला होतात हे सांगाल का?"

"म्हणजे???"

"आम्ही तुम्हाला येथे हजर व्हा म्हणालोच नव्हतो... तुम्ही आलात कशासाठी???"

"काही शोध लागलाय का हे पाहायला???"

"खुन्याचा?"

"हं..."

"म्हणजे खून झालाय?"

"च्च... म्हणजे जे काही झालंय ते का झालंय ते पाहायला... "

"ठीक आहे.. तुम्ही निघा.. शहरातच थांबा... काय?"

"येस मॅम..."

जय जाताच दहाव्या मिनिटाला नग्माने ही माहिती मिळवली की कॉसमॉस आणि बरोडा यातील कुठल्याच खात्यातून अनयाने चाळीस हजार ही रक्कम काढलेली नसून इन फॅक्ट दोन्ही खात्यात मिळून तिच्याकडे फक्त तेवीस हजार रुपये होते... मात्र... गेल्याच महिन्यात एक चाळीस हजाराचा चेक तिच्या खात्यातून जयच्या खात्यात गेल्याचे स्पष्ट दिसत होते... म्हणजेच... अनया आणि जय... दोघेही खोटे बोलत होते... जयला चाळीस नाहीत तर अनयाकडून एकूण ऐंशी हजार मिळाले होते आणि अनयाने काल चाळीस हजार खरच ढापलेले होते..

गुंता तुफान वाढत चाललेला होता... कोण गुंतलेले आहे आणि का हे समजेनासे झालेले होते...

जी अनया आपल्या होणार्‍या घरासाठी बिनदिक्कत चाळीस हजार उचलते... ती त्याचसाठी आत्महत्या करण्याऐवजी दुसर्‍या दिवशी जाऊन ते पैसे परत देऊन टाकू शकली असती... म्हणू शकली असती की चुकून पर्सच्या एका वेगळ्याच कप्प्यात राहिले होते.. काहीही म्हणू शकली असती...

अजितला आत बोलावण्यात आले.. अजित काहीच बोलू शकला नाही.. त्याला कशाची काही कल्पनाच नाही असे दिसले... फक्त परीला सोडा एवढी विनंती केली त्याने.. त्यावर चौकशी झाल्यावर योग्य ती अ‍ॅक्शन घेतली जाईल असे त्याला सांगण्यात आले....

सर्व काटे फिरून फिरून परीवरचह येऊन थांबत होते.. तिचा समाचार घेण्यासाठी नग्मा पुन्हा आत आली..

परीला बहुतेक पाणी आणि चहा वगैरे देण्यात आला असावा... ही दया कोणी आणि का दाखवली हे विचारून नग्माने आधी त्या माणसाचाच समाचार घेतला...

वरून येत असलेल्या फोन कॉल्सना तिने प्रकरण आत्महत्येचेच असावे असे सांगून टाकले होते व मोकळी झाली होती... ती स्वत:च जर खून आहे म्हणाली असती तर तिच्या डोक्यावरचे ऑफीसर्स दहाव्या मिनिटाला तिथे तळ टाकून बसले असते... स्वतःच ताबा घेतला असता त्यांनी केसचा... नग्मावर नसते सोडले सर्व काही...

परीवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि दोन स्टाफ सर्वांची फोन रेकॉर्ड्स तपासून प्रत्येक नंबरवर कॉल करून त्या माणसाचे नाव आणि पार्श्वभूमी विचारू लागली. आत्महत्या काल झाली म्हणून कालच्या नंबर्सवर भर दिला गेला. परिणाम असा झाला की जय आणी अजितला केलेले कॉल्स आणि एसेमेस सोडले तर बाकीचे काही कॉल्स हे आपापल्या वेगवेगळ्या कारणांसाठी केले गेलेले होते... पण अझर बेग नावाच्या हवालदाराला एक कॉल रिसीव्ह करणारा म्हणाला की आत्ताच तर तुम्ही मला फोन केला होतात.. परत कशाला तेच तेच विचारताय.. त्याचे नांव होते मेहर... अझर बेगने सहज म्हणून तपासले तर त्याच्या सेलवरून त्या मेहरला झालेला हा पहिलाच कॉल होता.. मग तो मेहर दोन कॉल आले असे का म्हणतोय म्हणून अझरने दुसर्‍या कॉन्स्टेबलला विचारले तर...

... नेमका... त्याच नंबरवर... अनयाच्या नंबरवरूनही कॉल गेलेला असल्याने त्या कॉन्स्टेबलनेही मेहरचा नंबर फिरवलेला होता...

शंका दाट झाल्यामुळे मेहर कोण आहे हे पुन्हा तपासले गेले व मेहरला तातडीने चौकीवर बोलावले गेले...

मेहरच्या जबाबामुळे एक भयंकर उलगडा झाला..

... मेहर हा मॉडेल्स पुरवणारा माणुस होता.... त्याला अचानक घबाड मिळावे तसे एका मोठ्या कंपनीकडून मॉडेल्सचे काँट्रॅक्ट मिळाले होते... हे बहुधा त्याने परीला आणि परीने आनंदात अनयाला सांगितले असावे..

दोघी रूमवर राहायला आल्या होत्या तेव्हाच्या काळात अनयानेही मॉडेलिंगमध्ये एक अटेंप्ट केल्याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे हे मेहर शपथेवर सांगत होता... अनयाने मेहरचा नंबर मिळवून मेहरला बरेच दिवसांपूर्वी कॉल केला होता आणि तिच्या चक्क टेस्ट्स झाल्या होत्या... हे परीला कळून द्यायचे नाही असे तिने मेहरला बजावलेले होते... असूया.. पण ऐनवेळी... असे कॉन्ट्रॅक्ट... ज्यात एकदा सिलेक्ट झालेली पोरगी पुन्हा मागे वळून पाहणारच नाही हे नक्की होते... मेहरला मिळाले असले तरी परी त्यात सिलेक्ट झाली होती...

परीऐवजी मला घुसड हे सांगूनही मेहर ऐकत तर नव्हताच... वर अनयाला म्हणत होता की तुझ्या मैत्रिणीबाबत तू असे कसे काय बोलतीयस... त्यावर रागाचा पारा प्रचंड चढलेल्या अनयाने उत्तर दिले होते की मी नसले तर तुझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये परीही नसेल.. इन फॅक्ट.. परी जगातच राहणार नाही असे सांगून अनया परतलेली होती..

विष तिने परीच्या ग्लासमध्ये घातलेले होते... पण तेवढ्यात जयचा फोन आल्यामुळे तो रिसीव्ह करतानाच परी टेबलपाशी पुस्तक घ्यायला गेली होती आणि तिने चुकून ग्लासेसची पोझिशनच बदलून टाकलेली होती...

अफरातफरीचा प्रकार मात्र निराळा होता.. ते पैसे तिने खरे तर मेहरला देण्यासाठी ढापले होते... पण मेहरने तिला स्पष्ट सांगितले की पैसे देणारी आहेस म्हणून आत येशील असे नाही.. मग तिने ते पैसे जयच्या खात्यात भरून त्याला खुष करून टाकले होते.. ते पैसे बॅन्केला कसे आणि कधी परत द्यायचे हे तिचे नक्की नसले तरी ती ते परत देऊ शकणार होती हे नक्कीच..

परी दूध प्यायली की अनया तिच्याकडे बघत बसणार होती... पण आपण दूध पिऊन आता झोपलो आहोत आणि जागण्याच्या मूडमध्ये नाही आहोत असे दाखवले की परी लवकर दूध पिऊन टाकेल असे वाटल्याने तिने आपला ग्लास तोंडाला लावला... अफरातफरीच्या बातमीने वैतागलेल्या परीनेही तेव्हाच दूध पिऊन टाकले आणि झोपून गेली...

मृत्यूचा उलगडा झालेला होता.....

==========================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफिकीर, मस्त कथा आहे. मात्र उलगडा पात्रांना कसा कळणार? पात्रांपैकी कोणाला हा उलगडा ध्यानात येणार....नगमाला?
आ.न.,
-गा.पै.

गामा साहेब आणि चंचल,

सहमत आहे, ते उलगडा झाल्याचेही संवादांमधून सिद्ध करायला हवे होते

सर्वांचे प्रतिसादासाठी आभार

-'बेफिकीर'!

छान आहे..
पण "परी इज लायिंग" ... "अनया आणि जय... दोघेही खोटे बोलत होते" >>> अनयाचं कळालं, पण परी आणि जय का खोटं बोलत होते?

शेवटच्या काही क्षणांपर्यत कथानकात खिळवून ठेवलेत... Happy

पण ते उलगड्याबाबत मात्र वरच्या प्रतिसादांशी सहमत... हा अंदाज कोणी लावला हे दाखवायला हवे होते...
तसेच जर ते सिद्ध ही करायचे असेल तर अनयाने कुठूनतरी विष मिळवले होते हा ट्रॅक घुसवल्याशिवाय ठामपणे असे ते सिद्ध नाही होऊ शकत.. पण कथेचा विचार करता उलगडा होणेही पुरेसे असावे..

बाकी, आधीचे एवढे चांगल्या लिंकने वाचल्यावर उगाच तेवढे आटोपते घेतल्यासारखे वाटले..

Pages