डोक्याला शॉट

Submitted by कवठीचाफा on 15 May, 2012 - 22:55

"हॅलो, बीएसएनएल का ? "
" हो, बोला "
" अहो ब्रॉडबँड बंद पडलेय "
" तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"
" का हो ? "
" टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद
*****
" हॅलो, बीएसएनएल ? "
" दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत "
" काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"
" नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? "
" एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात "
" काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? "
" काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ?"
" बोला "
" तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना "
" हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी "
" मी तुमची काही मदत करू शकतो का ? "
" तुम्ही टेलिकॉम वाले का हो ? "
" नाही, पण मी थोडं सुचवू शकतो "
" सांगा की साहेब "
" तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो.... फुकटात "
खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ? "
" बोला "
" अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं तेवढं ..."
" अहो साहेब कशाला मस्करी करता ? मांजरी पाळल्यानं काय होणार आहे ? "
" अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल खात नाहीत "
" आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ? "
" कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ "
"च्यायला...... "खाSSड फोन बंद
*****
" हॅलो बीएसएनएल ? "
" हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार असाल तर.... "
" नाही हो, कुणी दिला होता का असला सल्ला ? "
" नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय आणि लोकांना मस्करी सुचते"
" तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ? "
" आँ, कसलं ओ कसलं ? "
" अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी "
" चालू आहेत प्रयत्न "
" मी सर्व्हिस देऊ का ? "
" काय करता आपण ? टेलिकॉम मध्ये आहात का ? "
" नाही हो, सर्पमित्र आहे " खाSSड फोन बंद
*****
" हॅलो बीएसएनएल का ? "
" तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? "
" का ? तुम्ही आहात ? "
" नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? "
" अहो नेट बंद आहे गेले चार दिवस "
" एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद पडलंय ते, काम चालू आहे"
" पण मी काय म्हणतो, "
" बोला "
" तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच शोधायची केबल "
" तुम्ही तेच कालचे का हो ? "
" नाही मी उंदीर मारायचं औषध विकतो एकदम जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही "
" ....... " खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" नेट चालू झालेय "
" मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे का हो ? "
" हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही "
" नाही त्याचं काय आहे ते नेट ..... "
" सांगितलं ना चालू झालंय "
" हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो "
" आयची.... "
*****
" हॅलो बीएसएनएल ? "
" आता नेट व्यवस्थित चालू आहे "
" ते माहीताय मला पण.. "
" पण काय ? "
" तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं "

हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे, त्याचं कनेक्शन बंद करण्यासाठी. मला भीती नाही मी बरेच जणांचे फोन वापरलेत.

गुलमोहर: 

कचा ________________________________/\________________________________ Rofl Rofl Rofl

बीएसएनएलचे लोक तक्रारनिवारणाचे फोन कधीपासून उचलायला लागले? Happy

कल्पनारंजन मस्त आहे पण Proud

Proud

ताजा ताजा अनुभव : शनि-रवि नेट गंडले होतेच. १९८ ला संगणक तक्रार नोंदवून घेतो त्यानुसार तक्रार केली. सोमवार पर्यंत तरी नेट ठप्पच! मग सोमवारी आमच्या भागाच्या टेलिफोन एक्स्चेंजला फोन केला. तिथे 'ब्रॉडबॅन्ड कम्प्लेन्ट...' असे शब्द उच्चारताच त्या कर्मचार्‍याने खाडखाड एक नंबर बोलून दाखवला व दुसर्‍या क्षणाला फोन बंद! कसाबसा तो नंबर घाईघाईत एका कागदावर लिहिला... तिथे फोन लावल्यावर पलीकडे फक्त रिंगच वाजतेय.... दिवसातून २०-२२ वेळा फोन लावला त्या नंबरला.... मग दुपारी उशीरा कधीतरी पलीकडच्या व्यक्तीने फोन उचलला. दोन तासात नेट सुरू होईल असे सांगण्यात आले......... आणि काय आश्चर्य!!! खरोखर दोन तासात नेट चालू! पुन्हा वर त्या माणसाचा नेट चालू झाले आहे ना हे विचारण्यासाठी फोन!! मला फक्त भोवळ यायचीच बाकी होती. कधी कधी(च) असा अनुभव येतो!

सध्या बीएसेनेल चे काय बिनसलेय कळत नाही... पण एरवी सुरळीत चालणारे नेट गेला महिनाभर त्रास देतंय!

कच्चा खाल्लास बीएसएनएल वाल्यांना कचा!

बीएसएनएल चे भ्रमण-ध्वनी आल्या नंतर अनेक वर्षं त्यांच्या नेटवर्कची अवस्था बिकट होती..तेव्हाचा एक कॉमन फुल फॉर्म आठवला, बीएसएनएल चा..बाहेर सारखा न्यावा लागतो! Lol

किस्सा कमालच! Lol Lol Lol

मजेशीर... खरोखरी केले असेल तर खरोखरीच बक्षीस द्यायला हवे.

तृष्णा आणि तुमचा अभिषेक - तुमचेही पराक्रम आवडले.

चांगलं जमलंय
फक्त

मी तुमची काही मदत करू शकतो का ?

याच्याऐवजी

मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? असं पाहिजे.

धन्यवाद मंडळी , सगळ्यांना, एकाच प्रतिसादात Happy
थोडासा बीझी असल्यानं, मिळालेल्या वेळात एव्हढं आभार प्रदर्शनच करता येण्यासारखं आहे. Happy
पुनश्च धन्यवाद सर्वांचेच तुम्ही वाचतात म्हणून मी आहे Happy

बीएसएनएलवर एकाच नंबरवर (भ्रमणध्वनी) फोन लावला असता फोन न लागण्याची तब्बल पाच कारणे एकाच दिवसात ऐकायला मिळाली:

(१) हा नंबर रेंज मधे नाही (औट ऑफ कवरेज एरिया)
(२) नेटवर्क कंजेश्चन
(३) आपण डायल केलेला नंबर पुन्हा तपासून बघा
(४) हा नंबर अस्तित्वात नाही
(५) हा नंबर तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

Pages