डोक्याला शॉट

Submitted by कवठीचाफा on 15 May, 2012 - 22:55

"हॅलो, बीएसएनएल का ? "
" हो, बोला "
" अहो ब्रॉडबँड बंद पडलेय "
" तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"
" का हो ? "
" टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद
*****
" हॅलो, बीएसएनएल ? "
" दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत "
" काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"
" नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? "
" एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात "
" काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? "
" काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ?"
" बोला "
" तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना "
" हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी "
" मी तुमची काही मदत करू शकतो का ? "
" तुम्ही टेलिकॉम वाले का हो ? "
" नाही, पण मी थोडं सुचवू शकतो "
" सांगा की साहेब "
" तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो.... फुकटात "
खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ? "
" बोला "
" अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं तेवढं ..."
" अहो साहेब कशाला मस्करी करता ? मांजरी पाळल्यानं काय होणार आहे ? "
" अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल खात नाहीत "
" आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ? "
" कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ "
"च्यायला...... "खाSSड फोन बंद
*****
" हॅलो बीएसएनएल ? "
" हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार असाल तर.... "
" नाही हो, कुणी दिला होता का असला सल्ला ? "
" नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय आणि लोकांना मस्करी सुचते"
" तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ? "
" आँ, कसलं ओ कसलं ? "
" अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी "
" चालू आहेत प्रयत्न "
" मी सर्व्हिस देऊ का ? "
" काय करता आपण ? टेलिकॉम मध्ये आहात का ? "
" नाही हो, सर्पमित्र आहे " खाSSड फोन बंद
*****
" हॅलो बीएसएनएल का ? "
" तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? "
" का ? तुम्ही आहात ? "
" नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? "
" अहो नेट बंद आहे गेले चार दिवस "
" एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद पडलंय ते, काम चालू आहे"
" पण मी काय म्हणतो, "
" बोला "
" तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच शोधायची केबल "
" तुम्ही तेच कालचे का हो ? "
" नाही मी उंदीर मारायचं औषध विकतो एकदम जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही "
" ....... " खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" नेट चालू झालेय "
" मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे का हो ? "
" हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही "
" नाही त्याचं काय आहे ते नेट ..... "
" सांगितलं ना चालू झालंय "
" हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो "
" आयची.... "
*****
" हॅलो बीएसएनएल ? "
" आता नेट व्यवस्थित चालू आहे "
" ते माहीताय मला पण.. "
" पण काय ? "
" तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं "

हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे, त्याचं कनेक्शन बंद करण्यासाठी. मला भीती नाही मी बरेच जणांचे फोन वापरलेत.

गुलमोहर: 

Lol

सुपर्ब...................
मज्जा आली सकाळ सकाळ आज..........
पु.ले.शु.
असले उद्योग आम्ही लहान पणी करायचो तो किस्सा आठवला, तेव्हा केबल वर एक अ‍ॅड यायची. समस्या हल्ल, तुरंत समाधान. उस्त्ताद बाबा शमीम बंगाली. फोन करा भविष्य बद्ला. नंबर आहे २४१#####. मग तेव्हा घरोघरी मोबाईलफोन नव्हते. आमच्या घरी कॅओड्लेस होता तो फक्त बाबा वापरायचे. खाऊला मात्र भरपुर पैसे मिळायचे. मग सगळा शेजारचा कंपु मिळुन पि.सी.ओ. वर धाड टाकायचो. आणि आपल्या फेव. उस्त्ताद बाबा शमीम बंगाली २४१##### ला फोन करायचो. दरवेळी आवाज बदलुन बोलणारी मीच असायची, कारण पैसे माझ्या खाऊचे असायचे ना.? बोलण्याचे विषय. १. मला ना आमच्या गल्लीत पैंजणांचा आवाज येतोय. २. मला सफेद साडी वाली बाई दिसते. ३. मला मानकाप्या दिसतो टेरेस वर त्याला ना मानच नसते. ४. मला ना बाहेरची नड आहे. ( आजुबाजुसुन एकलेली गोष्ट). इत्यादि. इत्यादि.
मग त्या लोकांचा पलिकडुन आवाज यायचा. कोई बच्चे है. आपके मम्मी पापा को लेके आ जाओ. अरे कोई रोझ परेशान कर रहा है. मग आम्ही फोन ठेवुन द्यायचो. पण हे सगळ करुन झाल्यावर खुप मज्जा यायची. ब्लॅंक फोन करणे हा माझा तेव्हा छंद होता.

हा हा हा झकास.. Lol

मागे ३-४ वर्षांपूर्वी मी आणि माझा मित्र मोबाईल सर्विस प्रोवाईडर किंवा क्रेडीट कार्डवाल्यांचे उगाच डोके खायला फोन यायचे त्यांना जाम पकवायचो.. खास करून कोणी हिंदी-ईंग्लिशमध्ये बोलत असेल तर त्याला सरळ तेव्हा फॉर्मला असलेल्या एका राजकीय पक्षाची धमकी देऊन मराठीत बोलायला लावायचो..

मुलगी समोर असली तर मॅडम तुमचा आवाज गोड आहे ही कॉमेंट हमखास.. माझ्या मित्राने तर एका मुलीचा नंबरही मिळवला होता आणि ती पुढेही त्याला स्वता गप्पा मारायला फोन करायची.. त्यांना फ्री ना.. मी देखील बोलण्यात बराच हुशार होतो.. पण हे मुलींचे नाही जमले बाबा...

असो.. बरेच काही किस्से आहेत असे.. कधी संकलित केले तर नक्की शेअर करेन...
पण आज त्या आठवणी जाग्या केल्यास रे चाफ्या.. धन्यवाद.. Happy

Rofl
एका रात्रीत लिहिलस पण ???
उगाच नाही तुला मी सेलेब्रिटी म्हणतं Wink
काल मी घरात एकटीच हे सगळं आठवुन आठवुन हसत होते आणि मी नेमकं का हसतेय ते मला नीट शब्दात सांगता येत नव्हतं. आता आईला वाचुन दाखवलं आणि आता तीची पण हाहापुवा Lol

जबरी लिहीलेय.
एकदा पौड रोड चे नेट खूपच खूप दिवस बंद पडल्यावर मी त्यांच्या ऑफिसात जाऊन नक्की प्रॉब्लेम सांगा, दाखवा असे म्हटल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या केबल्स ठेवलेल्या सेक्शन मधे नेले. तिथे इतक्या प्रचंड प्रमाणात केबल्स होत्या (लाखो असतील) आणि बिचार्‍यानी इतके व्यवस्थित मॅनेज केले होते तरी प्रमाणच इतके प्रचंड असल्याने पटापट आमचे प्रॉब्लेम्स सोडवणे त्यांना शक्य नाही हे कळलेच आणि त्या बिचार्‍यांची दया आली. शांतपणे थोडे दिवस वाट पाहून फोटॉन घेऊन टाकले. Happy

Pages