खटला.....भाग-४ अंतीम

Submitted by jayantckulkarni on 14 May, 2012 - 23:28

“हंऽऽऽऽ म्हणजे तू पोलिसांकडे जाणारच नव्हती तर......” मी म्हणालो.
वॅनिटा खाली बघत गप्प राहिली.
“इथे न्याय मिळेल असे वाटले होते मला.” वॅनिटा म्हणाली.
त्याच क्षणी मला मिलानचा न्यायालयाचा हा नवीन प्रयोग किती गुंतागुंतीचा आणि अवघड आहे ते कळून चुकले........

पुढे.....................

“विलफ्रेड अर्ना, लार्क थाईन्सचा तू विचारपूर्वक आणि शांत डोक्याने हत्या केली हा आरोप तुला मान्य आहे का ? “ मी जरा जादाचा शहाणपणा दाखवून म्हटले ज्याची नंतर मलाच लाज वाटली.

खटला चालू होऊन आता चार तास उलटून गेले होते. आम्ही तो गुन्हा, आरोपी आणि आम्हाला समजेल तसा कायदा या सगळ्यावर साधक बाधक चर्चा केली होती. सिला सॅंडर्स अजूनही आमच्या बरोबर होती. तिचे वय बघता तिचे कौतूक करावे तेवढे कमीच होते. रेग्गी निघाला होता व त्याला या प्रयोगाबद्दल अनेक शंका होत्या तरीपण तो थांबला होता. मिलो स्टोनला या वस्तीची लाज वाटायची तरीही तो थांबला होता. काय कारण असावे बरे ?........

या खटल्याच्या पहिल्या भागाचा शेवट आता आमच्या दृष्टिक्षेपात होता.
“हो ! मला मान्य आहे” विलफ्रेड ताठ होत आणि त्या न्यायाधिशांच्या वर्तूळाकडे बघत म्हणाला. हा खटला या प्रयोगाचा पहिला खटला होता. गंमत म्हणजे या नंतर जे अनेक खटले चालवले गेले त्यात भाग घेणार्‍या न्यायाधीशांच्या चमूला “न्यायवर्तूळ” असेच नाव पडले.
“मला आरोप मान्य आहे. मी त्याला त्याच्या खोलीत ठार केले. मी या मुलीलाही ठार मारणार होतो. मी चिडलो होतो पण मी काय करतो आहे याची मला पूर्ण जाणीव होती. हो ! मी मारले त्याला. तो मरेतोपर्यंत मीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या.”
“तुला जर गुन्हा मान्य असेल तर तुला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ, का आमचा न्याय तुला मान्य होईल ? हेही तुला सांगावे लागेल” मिलो म्हणाला.
“तुमचा न्याय !” विलफ्रेडने ठामपणे सांगितले. आत्तापर्यंत खाली मान घालून बसणारा विलफ्रेड, थरथर कापणारा विलफ्रेड, त्याच्या अंगात एवढी शक्ती कुठून आली कोणास ठाऊक !
“आम्ही तुला दोषी ठरवून शिक्षा ठोठवली तर ?” मी विचारले.
“चालेल”
“तुला त्यांनी मृत्यूदंड दिला तर ?” बेल्सने विचारले.
विलफ्रेडने ज्या माणसाने त्याच्या पुतणीला कोकेन विकले होते त्याच्याकडे रोखून बघितले पण तो काहीच बोलला नाही.
आता पहाटेचे दोन वाजले होते पण कोणाच्या चेहर्‍यावर दमल्याचा वा कंटाळल्याचा भाव दिसत नव्हता.
“चला मग आता मतदान घेऊ” मी म्हणालो.
“त्याच्या अगोदर मला हे मतदान कसे होणार हे समजावून सांगा. म्हणजे तो दोषी आहे हे कसे समजणार ?” मिलो म्हणाला.
“अरेच्च्या मते मोजली की कळेल ना ते ! “
“पण समजा कोणाला तो निर्दोष आहे असे वाटले तर ?”
“९ किंवा ९ पेक्षा जास्त मते तो दोषी आहे या बाजूने पडली तर तो दोषी आहे हे ठरवायला काहीच हरकत नाही. यात कोणाला काही शंका आणि वेगळे मत मांडायचे आहे ?”
मला वाटले होते की एंजेला काहीतरी मत मांडेल पण ती काही बोलली नाही. माझ्याकडे बघत तिने तिचा ओठ मुडपला पण गप्प बसली.
“सिला ?”
“दोषी”
“मिलो ?”
“दोषी”
टोनी.....रेग्गी.....केन्या.... एंजेला..... बेल्स...वॅनिटा....मिलान.... जिना....
“दोषी” ते सगळे एकदम म्हणाले.
“दोषी ! माझेही तेच मत आहे.” मी म्हणालो.
“विलफ्रेड दोषी आहे या बाबतीत सगळ्यांचे एकमत झाले आहे. आता या अपराधाची शिक्षा काय हे ठरवायचे काम बाकी आहे” मी म्हणालो.
“मला वाटते आता त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेले बरे. त्यांच्याकडे तुरूंग आणि इतर व्यवस्था आहेत. आपण काय त्याला त्याच्या खोलीत कोंडणार आहोत का ?” बेल्स ने विचारले.
त्याच्याकडे दुर्लक्ष करून मिलान म्हणाला
“वॅनिटा”
“काय ?”
या सगळ्याचा ताण तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. डोळ्याखालची वर्तुळे आता अधिक स्पष्ट दिसत होती. ती बिचारी इतकी मरगळून गेली होती की एंजेलाच्या मदतीशिवाय ती सरळ बसूही शकत नव्हती.

मी मात्र माझ्या या मित्राच्या मुलीत गुंतत चाललो होतो अशी मला शंका यायला लागली होती. मला ती पूर्वी लहान वाटायची पण आता मला ती माझ्याच वयोगटातील असल्याचा साक्षात्कार झाला. विशेषत: तिने ज्या प्रकारे पोलिसांना हाताळले होते त्यावरून तर निश्चितच. एका रात्रीत माझ्या मनातील तिची लहान मुलीची छबी मोठी होऊन तिची एक आकर्षक स्त्री झाली होती. कमाल आहे.....

“काय शिक्षा असावी असे तुला वाटते ? मी वॅनिटाला विचारले.
“मला नको विचारूस”
“पण तुला हे सगळे अगोदरच माहीत होते”
“तो दोषी आहे पण तो रागाने आतून पेटलाही होता. ते मला आत्ताच समजले आहे. तो आतून किती दुखावला गेला आहे हे मला कळतंय. लार्क कधी कधी कोकेनच्या आहारी जाऊन माझ्या आईलाही मारायचा. ममा जीना म्हणते आहे ते बरोबर आहे. त्याने माझ्या आईलाही धंद्याला लावले होते आणि जोसीलाही. मि अर्ना रागाने वेडा होईल नाहीतर काय. त्याने माझ्या होणार्‍या बाळाच्या वडिलांना मारले आहे पण त्याचा अर्थ त्यानेही मरायला पाहिजे असा होत नाही.” वॅनिटा म्हणाली. मी तिच्याकडे आश्चर्याने पहातच राहिलो.
“रेग्गी, तुझे काय मत आहे ?” मी त्या बिल्डरला विचारले. “तू येथे आलास, का आलास, आणि थांबलास हेच आश्चर्य आहे. तुझा निर्णय काय आहे ?”
“बॉबी, तू कॉलेजला गेला म्हणून स्वत:ला फार शहाणा समजू नकोस. तुला इथले XX काही माहीत नाही. सिम्स म्हणाला. “विलफ्रेडला मी शाळेपासून ओळखतोय. आम्ही बास्केटबॉल एकत्र खेळायचो. मी आणि त्याची बहीण, आम्ही एके काळी लग्न करणार होतो. त्यामुळे मिलान जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही. हे सगळे गैर आहे. खरे हे प्रकरण कायद्याने हाताळले पाहिजे. पण सिला म्हणतोय तेही बरोबर आहे. कायदा ते काम करत नाही हेही खरे आहे. माझे वेगळे मत मांडले आहे पण तुमची मते सामान्य माणसाहून वेगळी आहेत हे तुम्हाला कळावे म्हणून मी ते मांडले असे समजा”
“तू त्याचा एवढा जवळचा मित्र आहेस तर तू तो निर्दोष आहे असे का म्हणाला नाहीस ? टोनीने विचारले.
“आम्ही काही जिवलग मित्र नाही. आमची आपली तोंडओळख आहे. आम्ही कित्येक दिवसात एकामेकांशी बोललेलो पण नाही. मी त्याला दोषी ठरवले यावे मुख्य कारण आहे ते त्यानेच सांगितले म्हणून. दुसरे म्हणजे त्याच्याकडे लार्कला मारायला ठोस कारण होते, नाही असे नाही, पण त्यामुळे तो खुनाच्या आरोपात निर्दोष म्हणता येणार नाही”

केन्याचे बाळ आता तिच्या पायापाशी एका उशीवर मस्त झोपले होते.

“अजून कोणाला काही सांगायचे आहे ?”
“जशास तसे हाच न्याय मला वाटते ठीक राहिल” मिलो म्हणाला. सिला आणि जिनाने मान डोलावली.
विलफ्रेडने शुन्यात नजर लावली होती जणू काही त्याने हे ऐकलेच नव्हते. मला त्या विचारानेच मला गलबलून आले. एंजेलाने माझ्याकडे आव्हानात्मक नजरेने बघितले.
“नाही ! ते चुक आहे !” एंजेला एकदम ओरडली.
“का बरे ? त्यानेतर त्याचा गुन्हा कबूल केला आहे”. एंथनी म्हणाला. “त्याच्या हातून तो काही चुकून घडलेला नाही.”
“पण तुम्ही या अगोदरच लार्कवर खटला का नाही चालवला ते सांगा” तिने आपले मत मांडले.”ते केले असतेत तर लोसेट्टेचाही जीव वाचला असता आणि लार्कही मेला नसता आणि हा तिसरा माणूस मरणाच्या दारात उभा राहिला नसता”.
“आपण भुतकाळात घडलेल्या गोष्टींबाबत काही करू शकत नाही बेटा !” मिलान त्याच्या मुलीला म्हणाला. “आजचे बोल !”
“डॅडी हा अजून एक खून होईल”
“विलफ्रेड, तू या न्यायालयाचा निर्णय मानशील ?” मी त्याला विचारले.
“हो ! निश्चित !”
“ मग तुला मृत्यूदंड द्यायच्या ठरावाला मी अनुमोदन देत या टेबलावर मांडतोय.. कितीजणांना मान्य आहे हे ?”
सिला, मिलो, जिना, केन्या, मिलान आणि रेग्गीने माना डोलावल्या.
“विरोधी मत ?” मी विचारले.
“मी” एंजेला म्हणाली. उरलेल्यांनी गप्पच रहायचे पसंत केले.
मी तो ठराव परत मतदानाला टाकला पण निर्णय तोच आला.
“८ विरूद्ध १. त्याला मृत्यूदंड कसा द्यायचा हे आता ठरवावे लागेल” मी म्हणालो..................


“आणि त्या बाळाचे काय ?” एंजेलाने जमलेल्या सगळ्यांना विचारले.
“त्याचे काय ?” मिलान म्हणाला.
“मि. अर्नाने त्या बाळाच्या बापाला मारले. त्याचा काय गुन्हा ? त्याची जबाबदारी अर्नाची नाही का ?”
सगळे स्तब्ध झाले आणि आमच्यात एकदम शांतता पसरली.

मी जिच्या जवळ जवळ प्रेमात पडलो होतो तिच्याकडून आलेल्या या प्रश्नाने सगळ्यांची तारांबळ उडाली सगळेजण ताठ बसले आणि लक्ष देऊन एकू लागले.

“त्या बाळाचा हक्क ? त्याची भरपाई कोण करणार ?” मिलोने विचारले.
आरोपीने बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनात. त्याने त्याची मान हलवली पण नाही.... त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता.
“त्याच्याकडे पैसा नाही तर तो काय भरपाई देणार ? रेग्गीने सत्य परिस्थिती सांगितली.
“त्याला जर आपण जिवंत ठेवले व काम करू दिले तर तो पैसे देऊ शकेल.” एंजेला म्हणाली. “त्याची शिक्षा आपण बदलू शकतो. त्याला मृत्यू ऐवजी आपण जन्मठेप देऊ शकतो आणि आयुष्यभर या बाळासाठी पैसे कमवायला सांगू शकतो”
“ही काय शिक्षा आहे ? त्याने एका माणसाला ठार मारले आहे आणि आपण त्याला सांगणार की तू परत कामावर जा ! व्वा !” बेल्स वैतागून म्हणाला.
“आपण येथे न्याय द्यायला जमलोय, सूड घेण्यासाठी नाही. पोर्टर म्हणाला. “ विचार केला तर आपण सगळे, पोलिसही दोषी आहोत. नाहीतर हे सगळे झालेच नसते. आता झालेच आहे तर सर्वांचा विचार करणेच बरोबर आहे. चूका दुरूस्त करायचा पयत्न करायला काय हरकत आहे”
बेल्स त्याच्याकडे डोळे फाडून बघायला लागला आणि शेवटी गप्प बसला.
त्याची ती अवस्था बघून माझ्याही चेहर्‍यावर स्मीत झळकून गेले असावे.
“केन्या तुझे काय म्हणणे आहे ?” मी विचारले.
तिने विचार करून उत्तर दिले “त्याने त्या मुलाचा खून केला. कशावरून तो हे परत करणार नाही ? समजा त्याचे परत डोके फिरले आणि त्याने या बेल्सचा मुडदा पाडला तर ? आता त्याला बेल्सही जोस्सीला कोकेन विकत होता हे माहिती आहे”
“एक विसरू नकोस त्याने मरायचीही तयारी दाखवली आहे” जिना म्हणाली.
“पण समजा आता त्याला आपण सोडले आणि काही दिवस तो शांत राहिला आणि परत त्याचा राग उफाळून आला तर ?” केन्याने विचारले.
“मि. अर्ना, तुला मला मारयचंय का ?” बेल्सने विचारले.
“नाही” विलफ्रेड पुटपुटला. “ मी असले काहीही परत करणार नाही. माझे डोके फिरले होते त्यावेळी. बाकी काही नाही”
“तो जर वॅनच्या बाळासाठी कष्ट करणार असेल तर मी माझे मत त्याच्या परड्यात टाकतो. मी काही त्याला घाबरत नाही” बेल्स म्हणाला.
एक केन्या सोडून सगळ्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
“बेल्स तू म्हणतोस ते आत्ता ठीक आहे. पण समजा तू परत कंगाल झालास आणि परत कोकेन विकायला लागलास आणि विलफ्रेडने तुला एखाद्या मुलीला धंद्याला लावताना बघितले तर तो काय करेल असे वाटते तुला ? केन्या म्हणाली. तिला अजून खात्री वाटत नव्हती
“मी बेल्सला नोकरी देतो. बस्स? बेल्स, करशील का माझ्याकडे नोकरी ?” रेग्गी म्हणाला.
सगळेजण बेल्सच्या उत्तराची वाट बघत त्याच्याकडे पाहू लागले. जणू काय या सगळ्यावर त्याची नोकरी हाच उपाय होता.
“हंऽऽऽऽऽ ठीक आहे जर मि. अर्नाचे प्राण आणि वॅनचे बाळ वाचणार असतील तर मी तुझ्याकडे नोकरी करेन” बेल्स म्हणाला.
“आणि वॅनीटा, तू माझ्याकडे येऊन रहा” जीना म्हणाली. माझ्याकडे एक छोटी खोली रिकामीच असते. तुझी आई बरी होऊन येईतोपर्यंत तू ती वापर.” जिना म्हणाली.

विलफ्रेड इकडे तिकडे बघत होता. त्याला काय चालले आहे हेच कळत नव्हते. अचानक सगळ्यांचे लक्ष त्याच्यावरून वॅनच्या बाळावर केंद्रीत झाले होते.

“थोडक्यात मला जगायचे असेल तर वॅनला पैसे द्यावे लागतील. बरोबर ना ?” त्याने विचारले.
“हो ! बरोबर ! मान्य आहे का तुला हे ?” मी विचारले.
माझ्याकडे बघत असतानाच त्याला कळाले की काय चालले आहे ते. दुसर्‍याच क्षणी त्याने मान डोलवली.
“यावर मतदान घेऊ या. ज्याला ही कल्पना मान्य आहे त्याने म्हणावे “येऽऽऽ !”
वॅनिटासकट सगळ्यांनीच त्याला प्रतिसाद दिला.
“चला !” पोर्टरने सुटकेचा निश्वास टाकला. मी पॅरोलवर असताना अशा खोलीत या प्रकरणार भाग घेतला हे जर बाहेर नुसते कळले तरी, विलफ्रेड तुला लार्कला मारायला जेवढा वेळ लागला ना त्यापेक्षा कमी वेळात मी परत तुरूंगात जाऊन पडेन. कळल का !
“हो ! बरोबर. कायदा, लार्क जेव्हा खुलेआम कोकेन विकत होता तेव्हा आंधळा होता. पोलिसांना तेथील वेश्या आणि कोकेनचे दलाल दिसत नाहीत पण त्यांना आपण मात्र लगेचच दिसू. येथे हजर असलेल्या स्त्री पुरूषांनी कायदा हातात घेतला हे त्यांना समजल्यावर आपल्याला अटक व्हायला काय वेळ ? त्या वेळी मात्र ते त्यांची कार्यक्षमता दाखवतील. जेथे त्यांनी काहीच हालचाल केली नाही त्या प्रकरणात आपण न्याय केला म्हणून आपल्याला ते तुरूंगात घालतील”. मिलान उद्वेगाने म्हणाला.
“म्हणून आज आपल्याला सर्वांना एक शपथ घ्यावी लागेल की आजच्या रात्री काही झालेच नाही”. मी म्हणालो.
“आपल्याला परत भेटायला लागले तर ? समजा जी ६ मधे परत एखादा कोकेनवाला रहायला आला तर ?” रेग्गीने रास्त शंका विचारली
“जर त्याने आपला निकाल मानला नाही तर आपल्याला एकजूटीने त्याच्या विरूद्ध उभे रहावे लागेल. खाली धोबीखन्यात आपण भेटू आणि ठरवू आपल्याला कायदा कुठे उपयोगी आहे आणि कुठे नाही. शेवटी कायदा आपल्यासाठी आहे.” मी म्हणालो.
“जर एखादा गुन्हेगार आपल्याकडे न्याय मागायला आला तर आपण तो त्याला देऊ. जर तो दयेची भीक मागायला आला तर आपण भेटून काय करायचे ते ठरवू”
“हे जरा अतीच होते आहे” मिलो म्हणाला.
पण कोणी त्याच्याशी वाद घातला नाही.
“वॅनचे काय करायचे ?” बेल्सने विचारले.
“मी ममा जीनाबरोबर राहेन. जोपर्यंत माझी आई बरी होऊन येत नाही तोपर्यंत तरी.”
“या पिस्तूलाचं काय करायचं” केन्याने विचारले.
“त्याचे काय करायचे ते आपण मिलानकडे सोपवू या आणि परत त्याचा विषय नको” मी म्हणालो.

बरोबर वेळ सांगायची झाली तर तेव्हा बरोबर पहाटेचे तीन वाजून सात मिनीटे झाली होती. सगळे आपापल्या घरी गेले आणि बहुदा झोपले असावेत. विलफ्रेड त्याच्या एकांतात परतला बहुदा त्याने काय केले याच्यावर तो विचार करत असावा. मिलोने सिलाला तिच्या घरी सोडले आणि टोनी आणि जीना नेहमीप्रमाणे बरोबर गेले तर मी केन्या आणि तिच्या बाळाला घरी सोडले आणि परत मिलानच्या घरी आलो.

एंजेलिना वाट बघत उभी होती. मी आत गेल्यावर ती मला बिलगली आणि तिने माझे एक ओझरते चुंबन घेतले. मी पण तेच करणार तेवढ्यात मिलानचा खाकरल्याचा आवाज आला आणि आम्ही बाजूला झालो. तो तेथेच विलफ्रेडचे पिस्तूल हातात घेऊन उभा होता.

मिलानने हसत ते भरलेले पिस्तूल माझ्यावर रोखले आणि मला त्या खटल्याच्या खोलीत जायची खूण केली.
“समजा आपल्याल त्याला मारावे लागले असते तर आपण काय केले असते ?” मिलोने विचारले.
“मला वाटते पहिल्यांदा आपण त्याला आत्महत्येची संधी दिली असती. समजा त्याला तो तयार झाला नसता तर आरोपीचा वकील म्हणून मी आणि फिर्यादीचा वकील म्हणून तू, असे आपल्या दोघांना ते करावे लागले असते”.
“मला वाटते केव्हा ना केव्हा तरी पोलिस आपल्याला पकडतीलच” मिलान म्हणाला.
मी ही त्याची नक्कल करत म्हणालो “पण तेच कायदेशीर आहे”
“पण ते पकडून काय करणार ?’ मिलान म्हणाला
“माझा एक मित्र आहे मार्क्विस नावाचा त्याला नवीन नवीन वाक्ये रचायचा छंद आहे. तो नेहमी म्हणतो ’ब्लॅक माणूस नेहमीच स्वत: बरोबर बेड्या वागवतो जणू काही त्या सोन्याच्याच आहेत. या बेड्या त्याने तोडल्या तर त्याला सरळ उभे रहात येईल असे तो नेहमी म्हणायचा. मग त्याच्या आयुष्यात काहीतरी फरक पडेल”.
“पडलाय का आपल्यात तो ?” मिलानने विचारले.
“वॅनीटाला घर मिळाले, बेल्सला नोकरी. विलफ्रेडचा जीव वाचला. कायदा आपले संरक्षण करतो या भमातून आपण बाहेर पडलो हे सगळ्यात महत्वाचे !”
मिलानने एक मंद स्मीत केले आणि ते पिस्तूल उचलले.
“आता एंजेलाबद्दल” मिलान म्हणाला. माझ्या छातीतील ह्रदयाची धडधड वाढलेली मला जाणवू लागली. मी माझ्या सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली.
“”दोन महिन्यात ती १८ पूर्ण करेल” माझ्यावर पिस्तूल रोखून तो म्हणाला “आता तुला तिच्याशी लग्न करायचे असेल तर मी तुला गोळी मारणार नाही”...असे म्हणून त्याने ते पिस्तूल माझ्या हातात दिले आणि आम्ही दोघे मोठयाने हसलो.

१०
विलफ्रेडला अटक झाली पण त्याच्या विरूद्ध कसलाच पुरावा मिळाला नाही. वॅनिटाने शपथपूर्वक ती तेथे नव्हती हे सांगितले आणि ममा जीनाने ती त्या रात्री ती तिच्या बरोबर झोपली होती अशी साक्ष दिली. विलफ्रेड त्यांना भेटायला त्या रात्री त्यांच्याकडे आला होता हेही त्या दोघींनी शपथपूर्वक सांगितले.

ते पिस्तूल मी सिलाला दिले आणि जर विलफ्रेडने पुढे वॅनिटाच्या बाळाला पैसे नाकारले तर तिने ते पोलिसांना खुशाल द्यावे असे सांगितले.

त्या दिवसापासून आमच्या वस्तीत बरेच बदल घडत गेले. कुठल्याही कोकेनवाल्याला येथे बस्तान बसवता आलेले नाही आणि पोलिसांच्या आता धाडीही पूर्वीसारख्या पडत नाहीत अर्थात गुन्हेगारीचे प्रमाणही कमी झाले आहे.

एंजेलाने आणि मी काही काळ एकत्र रहायचा प्रयत्न केला पण आमचे काही जमले नाही. आम्ही अजूनही एक चांगले सच्चे मित्र आहोत. तीही पुढे शिक्षिका होण्यासाठी आक्राला गेली. मी तिच्या मुलाचा गॉडफादर आहे. मधे एकदा ती सिलाच्या अंत्यविधीच्या वेळी भेटली होती.

अर्थात कधी अधेमधे भेट होती जेव्हा मिलान तिला “न्यायवर्तुळात” न्याय द्यायला बसवतो तेव्हा...

पण क्वचितच !

समाप्त.
मुळ लेखक : वॉल्टर मोस्ले.

जयंत कुलकर्णी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

chan

उत्तम अनुवाद. काही ठीकाणी भाषांतर जाणवते (उ. दा. अर्थात कधी अधेमधे भेट होती जेव्हा मिलान तिला “न्यायवर्तुळात” न्याय द्यायला बसवतो तेव्हा...) पण अंगावर येत नाही.

आवडले, अधिक अनुवाद आवडतील...