संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
आई शाळेत जाते
आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुढे शिकायचे झाले तर इच्छा तिथे मार्ग हे बहुतेक वेळा खरे ठरते. असं जरी असलं तरी लग्न, मुलं झाल्यावर ही तशी जवळ असणारी शिक्षणाची वाट तशी परकी होत जाते. काही जणी मात्र लग्न, मुलं झाल्यावर सुद्धा ह्या तश्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाटेवर पाऊल टाकतात. लग्नाआधी शिकण्याचा आणि सांसारिक जबाबदार्या असतानाचा अनुभव हा अनेक पातळीवर वेगळा. वय वेगळं, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा, जबाबदार्या वेगळ्या, आजूबाजूची परिस्थिती वेगळी ...कसा घडतो ह्या वाटेवरचा प्रवास ?
कोवळ्या वयात शिकतांना जीवनाचा मुख्य प्रवाहच मुळी शिक्षण असतो. मातृत्वाची मोठी जबाबदारी पेलताना शिक्षण घेणे हे प्रवाहाविरुद्ध पोहणेही ठरु शकते. शाळा-कॉलेजातलं मुक्त आयुष्य, मित्रमैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यांवर प्रापंचिक जबाबदार्यांसकट शिक्षण घेताना आपल्याला भेटतात का? मुळात त्यांची गरज/उणीव भासते कां? वय वाढल्यामुळे वाढलेला अनुभव, शहाणपण ह्यांचा अभ्यास करताना जास्त फायदा होतो का ? सहाध्यायींविषयी वाटणारी स्पर्धेची भावना कमी होते की जास्त ? मुलांचे व्याप, अभ्यास सांभाळताना वेळेचे नियोजन कसे करता ? अभ्यासासाठी मनाची एकाग्रता कशी साधता ह्यासारखे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात.
आपल्यापैकी अनेकांना मोठेपणी शाळेत गेलेल्या 'मुली' माहित असतील. अनेक सदस्या स्वतःच संसारात पडल्यानंतर, मुले झाल्यानंतर पुन्हा 'शाळेत' गेल्या असतील. मुलाबाळांच्या साथीने अभ्यास करतानाचे, परीक्षा देतानाचे अनुभव, मोठेपणी शाळेत भेटलेले मित्रमैत्रिणी आणि एकूण आपल्या या नव्या शिक्षणाने आपल्यातच घडलेला बदल हे सगळेच जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.
ह्या धाग्यावर तुम्ही स्वतःचे अनुभव लिहू शकता. त्याचबरोबर ज्यांनी आपली बायको, आई, मुलगी, मैत्रिण किंवा ओळखीतल्या कुठल्याही आईची शिक्षणासाठीची धडपड पाहिली असेल त्यांनीही अशा आयांबद्दल लिहावे असे आम्हाला वाटते.
ह्या आया कौतुकास पात्र तर निश्चितच आहेत पण शिकण्याची इच्छा पूर्ण न करता आलेल्या एका जरी स्त्रीला ह्यातून मानसिक बळ, जिद्द मिळाली तर ह्या धाग्याचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.
वाचूया, शाळेत जाणार्या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव.
-संयुक्ता व्यवस्थापन
शिक्षणाचा ध्यास घेतलेली आई मी
शिक्षणाचा ध्यास घेतलेली आई मी अगदी जवळून पाहिली आहे! ती माझीच आई आहे. आणि तिचा शिकण्याचा विषय संगीत असल्याने आज पंचाहत्तराव्या वर्षीही ती शिकतच आहे.
माझी आई पुण्याच्या अहिल्यादेवी शाळेत शिकली. मॅट्रिक झाल्या झाल्या तिचं लग्न करून दिलं आमच्या
आजोबांनी. तिला गाण्याची प्रचंड आवड होती आणि गतीही होती. गाण्याचा वारसा तिला कीर्तनकार आजोबांकडूनच मिळाला. पण तिला गाण्याची किंवा गाणं ऐकण्यासही बंदी होती. शेजारच्या इमारतीत कोणीतरी गीत रामायणाची गाणी लावली की ती चोरून ऐकायची आणि पाठ करायची. किंवा तिच्या एका मावसबहिणीकडे जाऊन गाणी ऐकायची. वयाच्या सोळाव्यावर्षी या मावसबहिणीला सोबत म्हणून आई रेडियोस्टेशनवर गेली. आजीने तिच्याजवळचे पैसे चुपचाप तिला दिले. त्या मावसबहिणीबरोबर हिनं रेडियोवर ऑडिशन दिली. आणि ऑडिशन पासही झाली. लगेचच तिचं लग्न झालं. सासरी तिच्या गाण्याचं खूप कौतुक झालं. ती पहिल्या रेडियोवरच्या कार्यक्रमाला माझ्या आजोबांबरोबर [वडिलांचे वडिल] गेली आणि आमचे आजोबा तिचं गाणं ऐकता ऐकता आनंदानं रडले. लग्न झाल्यामुळे पुढील शिक्षण जरी बंद झालं तरी गाण्याला प्रोत्साहन मिळालं. हेच तिच्या वडिलांकडे शक्य नव्हतं!
दिवसें दिवस तिला शिक्षणाची आस लागून राहिली होती. मग आम्ही चार भावंडं लहान असताना [सगळ्यात धाकटी बहिण अंदाजे अडिच वर्षांची होती.] तिनं कॉलेजच्या शिक्षणाला सुरुवात केली.
कॉलेज शिक्षण तिनं बाहेरून घ्यायचं ठरवलं. कॉलेजच्या अभ्यासाच्या विषयांसाठी तिनं संध्याकाळचा क्लास जॉइन केला. आणि शास्त्रीयसंगीत हा विषय फाटक गुरुजींकडे जाऊन शिकू लागली.
त्यात आमची शालेय शिक्षणं, आजारपणं,आलंगेलं,पै-पाहुणा कसं केलं तिनं कोणास ठाऊक? आमची वयं लहान असल्यामुळे आम्ही तिला काही मदत करत नव्हतो. वडिल मात्र तिला कधी कधी नोटस काढून देत असत. चार वर्षांत ती बी.ए. झाली. प्रथम श्रेणीत. तिला स्कॉलरशीपही मिळाली. मग तिनं एम्.ए. कॉलेजमधे जाऊन केलं. त्यावेळी माझी मोठी बहिण एस.एस्.सी. ला होती. एम.ए. करता करता ती सुगम संगीत शिकत होती...गात होती. काही संगीतकारांकडून तिनं त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना शिकून घेतल्या. रेडियोवर शास्त्रीय आणि सुगमसंगीताचे कार्यक्रमही सुरु झाले तिचे. एम.ए. करत असताना श्रुती सडोलीकर, शुभा जोशी तिच्या सहाध्यायी होत्या. त्यांनाही खूप कौतुक होतं तिचं. कॉलेज मधल्या प्राध्यापिका मीनाक्षी मुडबिद्री, सरला भिडे या देखील तिला खास मार्गदर्शन करत होत्या. एम.ए. नंतर
तिनं नव्याने सुरु झालेला '' मैफिलीचे संगीत'' हा दोन वर्षांचा अभ्यासक्रमही पुरा केला.
नंतर संसार सांभाळत बरेच गाण्याचे कार्यक्रमही केले. तेव्हा तबल्याचे मशिन नव्हते. तबलजी रानडेकाका घरी यायचे आणि मग ती रियाज करायची. तिला अनेक स्पर्धांमधून पारितोषिकेही मिळाली.
तेव्हा पासून आजपर्यंत शिकतच आहे. काही नवं ऐकलं की ती लगेच ते ग्रहण करते. त्याचं नोटेशन काढून ठेवते. काही वर्षांपूर्वी मला पं पद्मा तळवलकर यांच्याकडे शिकण्याचा योग आला. तिथे मी शिकलेल्या बंदिषी,तराणे, काही राग ती लहान मुलीसारखी उत्सुक होऊन माझ्याकडून शिकायची. रेकॉर्ड करून घ्यायची. तिने स्वतः अनेक बंदिषी रचल्या आहेत, अनेक चाली दिल्या आहेत.
तिच्याकडून वारसा आल्यामुळे म्हणा,किंवा कधी गरज म्हणून मी नव्या रचना केल्या की तिला ऐकवते.
ती लगेच शिकून घेते आणि रियाजात गायला घेते. आणि मला कळवते.
तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती प्रचंड सृजनशील आहे. राग विस्तारात तिला खूप सुचत असतं. आणि सुगम संगीत, नाट्यसंगीत, भजनं गाताना ती खूप वाढवून गाऊ शकते.
तिची शिकण्याची आस,प्रचंड धडपड, मेहनत हे मी बघत आली आहे. त्यातलं १०/२० टक्के मिळालं मला तरी मी आभारी होईन परमेश्वराची.
आता ती पंचाहत्तर वर्षे पुरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिला कॅन्सर झाला होता. पण देवाच्या कृपेनं ती सही सलामत बाहेर पडली त्यातून.[ तिची मनःशांती जराही ढळली नव्हती आणि दुखण्याचा पण जराही बाऊ केला नाही तिनं. आम्हालाच ताण आला होता!] आता परत नेहमीप्रमाणे छान हसत आणि हो. गात गात जगायला लागली आहे.
आज मातृदिनाबद्दल तिला सांष्टांग दंडवत!
छानच लिहिलं आहे अनिताताई.
छानच लिहिलं आहे अनिताताई.
मस्तच अनिताताई! तुमच्या
मस्तच अनिताताई! तुमच्या मातेचे खूप कौतुक वाटले.
अनिताताई, आपल्या आईचं खरंच
अनिताताई, आपल्या आईचं खरंच कौतुक. परिस्थितीला वाकवून पुढे शिकण्याच्या या जिद्दीला सलाम!
अनिताताई, ग्रेट आहेत आपल्या
अनिताताई, ग्रेट आहेत आपल्या आई. त्यांना, त्यांच्या जिद्दीला लाख लाख सलाम...
अनिताताई, तुमच्या आईंच्या
अनिताताई,
तुमच्या आईंच्या जिद्दीला, चिकाटीला आणि कष्टांना मनापासून दंडवत. खूप खूप कौतुक वाटले वाचून.
आई, अतिशय सुरेख लिहिलं आहेस.
आई, अतिशय सुरेख लिहिलं आहेस. आता हे आजीला वाचून दाखव. ती हसेल आणि 'कुठलं तरी नवीन गाणं करायला घेतलं पाहिजे आता.' असं म्हणून उत्साहाने गायला बसेल
माझ्या आईनेही तिचं गाण्यातलं एम.ए. लग्नानंतरच पूर्ण केलं आहे. एम.ए.च्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेला तिला कडक डोहाळे लागले होते. पोटात पाणीही ठरत नव्हते. केवळ एक ग्लुकोजचं बिस्कीट खाऊन तिने परीक्षा दिली. परीक्षेचा भाग म्हणून कॉन्सर्ट असते ती ही ह्याच अवस्थेत दिली. दुसर्या वर्षी मी पाच-सहा महिन्यांची होते आणि नेमकं तिच्या परीक्षेच्या वेळी आजारपण काढलं. तरीही तिने उत्तम मार्कांनी, प्रथमश्रेणीत एम.ए. पूर्ण केलं. बीए ला विद्यापीठांच्या सगळ्या शाखांमधून दुसरी आल्यामुळे तिला दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. एम.ए. पार्ट १ त्या स्कॉलरशिपवर झालं पण एम.ए. पार्ट टू ला मातृत्वाच्या जबाबदारीमुळे तिला बाहेरुन परीक्षा द्यावी लागली साहजिकच मानाच्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावं लागलं. तिला त्याचं काहीच वाटत नाही, मला मात्र वाईट वाटतं
तिच्या शाळेत जाण्याचा दुसरा भाग सुरु झाला तो मी बारावीत असताना. ह्यावेळी रुढार्थाने कॉलेजची डिग्री नाही पण पद्माताईंकडे शिकणं हा गुरुकुल पद्धतीचाच एक भाग होता. आठवड्यातून दोनदा आखून दिलेले दोन तास असा तो गाण्याचा क्लास नव्हता. त्या म्हणतील, त्यांना वेळ असेल तेव्हा आणि तितके तास तिथे जायचं. सकाळी साडेसातपासून रात्री आठपर्यंत कधीही.
मिळणारं शिक्षण अतिशय मौल्यवान होतं पण अर्थातच त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागायचे. पद्माताईंकडे एका वेळी एकच राग असं काही नसायचं. त्या रियाझाला जे घेतील ते शिकायचं. आत्तापर्यंत शिकलेल्या गायकीपेक्षा त्यांची गायकी, लगाव सर्वस्वी वेगळा, कठीण. तो गळ्यावर चढवणेही कर्मकठीण. मला आठवतंय, आई दुपारी बारा-साडेबाराला घरी आली की ताबडतोब शिकवलेल्या बंदिशीचं नोटेशन, आलाप गुणगुणत आठवून आठवून वहीत उतरवून घ्यायची. तिने एवढे कष्ट करुन घेतलेलं शिक्षण ती तिच्या विद्यार्थ्यांना मात्र ( आमच्यासकट ) कायमच स्पूनफिडिंग केल्यासारखं उदार मनाने देत आलीये. शिवाय प्रापंचिक जबाबदार्या होत्याच. त्या सहा-सात वर्षांत आईने एकदाही आमच्याकडून कुठल्याही कामाची अपेक्षा केली नाही. तिची अपेक्षा फक्त एवढीच की ती नवीन जे काही शिकून आलीय ते आम्ही लवकरात लवकर तिच्याकडून घ्यावं
आजच तिला मदर्स डेच्या शुभेच्छा द्यायला फोन केला तर म्हणाली की आपला रोजच मदर्स डे असतो. वेगळ्या शुभेच्छांची गरजच वाटत नाही. ते ही खरंच आहे म्हणा
आज इथे हे लिहायची संधी मिळाली त्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानते
अनिताताई, खुप छान लिहीलं आहे
अनिताताई, खुप छान लिहीलं आहे तुम्ही.
अगो, अनिताताई तुझी आई आहे हे मला माहीतच नव्हते. छान लिहीले आहेस. दोन पिढ्यांनी स्वतःच्या आईविषयी लिहीलेले ( ते ही इंटरनेटसारख्या माध्यमात ) वाचुन गंमत वाटली, छान वाटले. ( आणि इंटरनेट आता बरेच जुने जाणते माध्यम होऊ लागले हेही जाणवले)
अनिताताईंच्या आई आणि अगोच्या
अनिताताईंच्या आई आणि अगोच्या आई दोघींचे पण खुप कौतुक वाटले.
दोन पिढ्यांनी स्वतःच्या आईविषयी लिहीलेले ( ते ही इंटरनेटसारख्या माध्यमात ) वाचुन गंमत वाटली, छान वाटले.
>>+१
वा अगो. तुही खूप छान
वा अगो. तुही खूप छान लिहिलंयस. आईचा वारसा अनिताताईंनीही पुढे सुरू ठेवलाय. दोन पिढ्यांनी आपल्या आईबद्दल इथे कृतज्ञता व्यक्त केली हे बघून खूप मस्त वाटतंय.
आता लिहिल्यावर सावलीनं लिहिलेलं वाचलं. सावली +१
अनिताताई आणि अगो, खूपच छान
अनिताताई आणि अगो, खूपच छान लिहिलय दोघींनी
सावली +१
अगो, आजी आणि आईकडून केवढा
अगो, आजी आणि आईकडून केवढा मोठ्ठा वारसा मिळाला आहे ग तुला.
आनिताताई आणि अगो दोघींनी छान लिहिलं आहेत. मातृदिनाची ही आगळी- वेगळी भेट केवढी स्तुत्य आहे.
अनिताताई आणि अगो, किती सुंदर
अनिताताई आणि अगो, किती सुंदर लिहीलं आहेत तुम्ही दोघींनी
सावली +१
मातृदिनाची ही आगळी- वेगळी भेट केवढी स्तुत्य आहे<<, + १
धन्यवाद संयुक्ता
आनिताताई आणि अगो खुप छान
आनिताताई आणि अगो खुप छान लिहीलेय..मस्त वाटले वाचुन
अनिताताई , अगो खुप छान
अनिताताई , अगो खुप छान लिहिलतं.
दोन पिढ्या मायबोलीवर बघुन खुप छान वाटलं.
सगळ्या मायबोलीकरणींना मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !
अनिता मावशी , अगो छान
अनिता मावशी , अगो छान लिहीलंत.
मी पण रुमाल टाकून ठेवते. लवकरात लवकर लिहायचा प्रयत्न करेन.
आई बद्दल लिहायलाच हवे असे
आई बद्दल लिहायलाच हवे असे वरील धाग्याचे नाव वाचून वाटले ..
मी ५ वर्षाची आणि भावू १ वर्षाचा असताना मतीमंद मुलांच्या साठी असलेले ट्रेनिंग करायला गेलेली ..नोकरी मध्ये आवश्यकता होती ह्या ट्रेनिंग ची.
मी आई च्या सासरी तर भाऊ माहेरी..आणि पप्पा नासिक ला नोकरी मुळे.
पुण्याला चुलत बहिणीच्या घरी राहून तिने ट्रेनिंग पूर्ण केले . सुट्टीमध्ये घरी आल तेव्हा लहान भाऊ मामीला आई म्हणत होता..आई ला तर रडूच आले ..तेव्हा आज काल सारखा फोन पण न्हवता घरात.किती अवघड गेले असेल न .
हातात कमी पैसे असले तरी कोणाकडे कधी रिकाम्या हाताने जायचे नाही हि शिकवण तिचीच! रंगीत खडू ,कंपास असे काही बाही ती मावशीच्या मुलांना न्यायची.
ट्रेनिंग करून आल्यावर पण अडचणी संपल्या न्हवत्या.कारण नासिक मध्ये मतीमंद मुलांसाठी असणारी ती पहिली शाळा होती .४ शिक्षिका १ मुख्याध्यापिका एका छोट्याश्या जागेत शाळा सुरु झाली .सुरुवातीला मुले पण शोधून आणली होती .
मी माझ्या शाळेतून चालत तिच्या शाळेपर्यंत जायची ,मग आम्ही भावाला पाळणाघरातून घेवून घरी जायचो.बस मध्ये खूप लोटा लोटी व्हायची म्हणून आई ने गाडी म्हणजे M 50 घ्यायचे ठरवले.घर दूर होते तर ती ओढणीत बांधायची आम्हाला ..
थोड्या वेळाने आम्ही डुलक्या घ्यायचो तर चिमटी पण काढायची ती ..आता आठवले तर दिव्यच वाटते मला ते. तेव्हा आपलीच आई गाडी चालवते याची मजा वाटायची मला .
सगळ्यांना मदत करायला कायम तयार असायची .पेपर मधल्या जाहिराती शोधून दाखवायची व कोर्स बद्दल माहिती द्यायची.शाळेत पण मुले बाई आल्या बाई आल्या म्हणायचे ..तू आमच्या बाईंची मुलगी आहे का ?विचारायचे तेव्हा कोण अभिमान वाटायचा! आई आम्हाला नेहेमी सांगायची ह्यांना वेडे म्हणून नका ,ते special child आहेत.त्यांना कसे लिहायला ,वाचायला ,थोडेफार काम करायला कसे शिकवता येईल याकडेच तिचे लक्ष्य असायचे.
शाळा करता करता तिचे आमच्या अभ्यासावर पण लक्ष्य असायचे .अभ्यासाबरोबर मला गाण्याच्या क्लास ला घातले होते.मला तेव्हा फारसे आवडायचे नाही ३ परीक्षा पण दिल्या .पण आता जाणवते कि त्याने गाण्याचा कान आला आहे.खूप पैसे नसायचे गाठीला तरी ती जवळपास लायब्ररी नेहेमी शोधायची व आम्हाला पण न्यायची ..आम्ही छोट्यांची पुस्तके घ्यायचो.हो वाचनाची आवड पण तिच्याकडून आलेली ..
एकदा आठवते शाळेच्या कायर्क्रमासाठी पांढरा फ्रॉक हवा होता ..तो माझ्याकडे न्हवता ..आम्ही एका दूरच्या मावशीकडे गेलो होतो विचारायला पण न्हवता मिळाला !
मग दुसर्यादिवशी आई ने आणून दिला होता तो फ्रॉक.त्याचे महत्व तेव्हा कळले नाही ते आत्ता कळते आहे.परीक्षेला पण जवळ बसून हवे नको बघायची.हे सर्व करता करता मन लावून मुलांना शिकवणे ,पालकांच्या अडचणी सोडवणे सुरूच होते.आई काहीतरी वेगळे कार्य करते आहे हे समजून तेव्हाही अभिमान वाटायचा आणि आताही वाटतो!
कॉलेज ला होतो तेव्हा पण कधी आईच्या शाळेची आजोळ सहल असायची कधी कधी ट्रेनिंग ला हैदराबाद ,मुंबई ला पण जावे लागायचे. आम्ही भावंडे कधी कधी रुसायचो ,आई तू शाळेसाठी busy असते ,तीच तुझी मुले आहेत असे म्हणायचो तर हसून म्हणायची हो ती पण माझी मुले आहेत.
२००५ मध्ये राष्ट्रपती कलाम ह्यांच्या कडून तिला "आदर्श शिक्षिका" पुरस्कार मिळाला तेव्हा आम्ही सगळे दिल्लीला गेलो होतो तेव्हा कोण अभिमान वाटला होता .आजीच्या ,मामाच्या डोळ्यातील पाणीच सर्व काही सांगून गेले!
भांडे वाल्यामावशी बरोबर पण प्रेमाने वागायची म्हणायची ,हातावर पोटे असतात ग ह्यांची ,त्यांचा पगार नेहेमी वेळेवर झाला पाहिजे.स्वतः बरोबर तिचा पण चहा करायला सांगायची ..माणसे जोडायचे शिक्षण पण असेच मिळत गेले.कुठे कुरकुर नसल्याने त्या मावशी पण आमच्या कडे खुश असायच्या.
हो खूप साधी आणि सोपी वाटेल अशी गोष्ट..पण सगळ्यांना जमते असे नाही हे बाहेर पाहिल्यावर उमगत गेले.
स्वतःच्या दुनियेत राजा आहे ती! मागच्या वर्षी रिटायर झाली.पण स्वस्थ बसायला तयार नाही.मधून मधुन शाळेत जावून येते. मुलांचे डॉक्टर व एक दोन शिक्षिका यांच्या मदतीने autistic मुलांसाठी एक तपासणी केंद्र सुरु करायची योजना सुरु आहे सध्या!
"प्रबोधिनी "नावाच्या रोपट्याचा आज जो काही वृक्ष झाला त्या मागे जे हात होते त्यात आपली आई पण होती याचा नितांत अभिमान वा आदर आहे.
ही कहाणी आहे शिक्षणाचा ध्यास
ही कहाणी आहे शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या माझ्या जिद्दी आईची. आणी तिच्यापाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या बाबांची. दोघांनीही एकमेकांच्या साथीने शून्यातून विश्व निर्माण केलंय. आईचं शिक्षण ही कधी त्यांच्या संसाराची निकड होती आणी त्यानंतर खूप वर्षांनी स्वप्नपूर्तीसाठीचा आईचा तो ध्यास होता.
माझे आई बाबा आर्थिक दृष्ट्या अत्यंत सामान्य कुटुंबातून आले. आई चार भावंडातलं दुसरं अपत्य. तीन बहिणी आणी एक भाऊ.. एकुलत्या एका मुलाचे अगदी कोड कौतुक होते घरात. ६५ वर्षांपूर्वीचा काळ..आजोबांची आर्मीतली फिरतीची नोकरी होती. त्यामुळे २-३ वर्षांत गाव बदलायचं. मिळेल ती शाळा. कधी हिंदी मिडीयम कधी मराठी अशी गत. पण जात्याच ही मुलं हुशार होती. पण मुलींनी जुजबी पुरतं शिक्षण घ्यावं आणी आपापल्या घरी निघून जावं. त्यामुळे दहावी पर्यंत शिकवलं म्हणजे डोक्यावरून पाणी. मामा पुढे सीओईपी ला गेला. त्याच्या क्षेत्रात त्याने खूप मोठी पदे भूषवली. मुलींची मात्र दहावी झाल्यावर दोन चार वर्षांत सासरी पाठवणी.
बाबा सहा भावंडांमधे मोठे. त्यात आजोबांनी कधीच धड नोकरी केली नाही. पणजोबांनी जोडलेली लक्ष्मी हळूहळू मोडीत निघत होती तर कधी चोरांनी कार्यभाग साधलेला. त्यामुळे मोठा मुलगा मॅट्रिक झाल्या झाल्या आजोबांनी त्याला मुंबईत धाडला." मामा कडे जा..तो चिकटवेल कुठेतरी..आता ह्यापुढे तूच हे घर चालव.."
बाबांना खरंच मामाने म्युन्सिपाल्टीत चिकटवलं आणी तेव्हापासून दर महिन्याला वह्या, पेनं, पायजम्याची कापडं, संसारोपयोगी वस्तू एक नाअनेक वस्तूंची गाठोडी दर महिन्या दोन महिन्यात मुंबईहून रवाना होत.
नात्यातल्या ओळखीतून आई बाबांचं लग्न ठरलं आणी झालं. आजी ज्योतिषी होती. ही मुलगी माझ्या कुटुंबाचं भविष्य पालटेल म्हणून आईला पसंत केलं होतं तिने.
लग्नानंतर एवढं मोठं खटलं पाहून आई हबकलीच होती. दर थोड्या महिन्यांनी पाचपैकी एखादा दीर मुंबईत भविष्य आजमावायला, कधी शिक्षणासाठी तर कधी वडलांशी मतभेद झाले म्हणून येऊन राही.स्वतःचं वाढतं कुटुंब आणी सासू सासर्यांच्या पूर्ण संसाराचा भार एका खांबावर किती पेलणार??? त्यावेळी पहिल्यांदा आईने शिक्षणासाठी पाऊल उचललं. पदरात पाच वर्षांचा मुलगा असताना डी.एड. करायचा निर्णय घेतला. त्या दोन वर्षात डोंबीवलीहून सोमय्याला ये जा करायची रोज. त्यातच दुसर्यांदा गरोदर राहिली. आणी त्या गरोदरपणात डी.एड. संपवलंही. पुढे काहीच महिन्यांत तिलाही मुंबई महापालिकेत शिक्षीकेची नोकरी मिळाली. मी तेव्हा ५-६ महिन्यांची असेन.
यथावकाश आई बाबांनी सर्व काकांची शिक्षणं, लग्नं स्वतः पुढाकार घेऊन पार पाडली. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. काही वर्षं अशी गेली आणी डिग्री घ्यायचं अपूरं राहिलेलं स्वप्न परत आईच्या मनात रुंजी घालू लागलं.मी दहावीत होते आणी माझा मोठा भाऊ ईंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला. त्या वर्षी आईने पण तिची एक्स्टर्नल बी.ए.ची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली. स्वतःची नोकरी, घरकाम (घरकामाला तिने कधीही बाई ठेवली नाही.),दर शनिवारची एस.एन.डी.टी. मधली लेक्चर्स, आणी नियमीत पहाटे चारला उठून अभ्यास हे कटाक्षाने कुणाचीही मदत न घेता तिने पार पाडलं. त्यावर्षी माझा दहावीचा , भावाचा ईंजिनियरिंगचा आणी आईचा बी.ए.चा अशा तीन रिझल्ट्सचे पेढे वाटले आम्ही. एक गंमतीशीर प्रसंग आठवतोय. मी आणी माझा भाऊ बाहेरच्या खोलीत टी.व्ही. बघत होतो.ईतक्यात कुणीतरी घरात डोकावलं आणी विचारलं "कायरे आई कुठेय?" आणी आम्ही सांगितलं " आईना , आत अभ्यास करतेय." पुढे माझ्या बारावीच्या वेळी आईने ह्याच जिद्दीने एम.ए. पूर्ण केलं. तिच्या जिद्दीचं, चिकाटीचं कौतूक करावं तेवढं थोडंय. ह्या सर्व प्रवासात बाबा पण तिच्यापाठी भक्कम आधार देऊन उभे होते. कधीही कुठलेही इगो क्लॅशेस नाहीत. तुम्हा सर्वांच्या नावामागे माझंच नाव लावता ना मग तुमच्या डिग्र्या त्या माझ्याच की असं मिश्किलपणे म्हणत.
आज मी आई झालेय आणी माझ्यावर वेळ आली आहे शाळेत जायची. पण माझी जिद्द बरेचदा तोकडी पडते. तेव्हा हीच माझी आई मला दूरदेशी बसून प्रोत्साहन देते. माझ्यात हुरूप भरते. आई झाली आहेस, बालसंगोपन करते आहेस पण स्वत्व विसरू नकोस. तुझं ध्येय तुला गाठायचंय. वाट मधेच सोडू नकोस. हेच तिचं सांगणं असतं. आईच्या शिक्षणाची वाट अवघड होती. तिने ती अथक प्रयत्नांनी सुघड केली. आम्हा भावंडांना नेहेमी उच्च शिक्षणासाठी प्रेरीत केलं आणी आम्ही यशस्वी झाल्यावर नेहेमीच कौतुकाने ऊर भरून आला तिचा.
आज संयुक्ता मुळे माझ्या आईची तुम्हा सर्वांना ओळख करून देता आली त्यामुळे संयुक्ताचे लक्ष लक्ष आभार. मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!
अगो, अनिताताई, स्वराली, खुप
अगो, अनिताताई, स्वराली, खुप छान लिहीलय तुम्ही आईबद्दल!
अनिताताई, तुम्हाला आणि आजीला शत:शः प्रणाम!
स्वराली, काकुंना दंडवत! डॉ. कलामांच्या हस्ते सत्कार म्हणजे ग्रेटच!
त्यांच्या शाळेचं नांव काय? (माई लेले का?)
सगळ्यांनीच छान लिहीलंय.
सगळ्यांनीच छान लिहीलंय.
सुरेख लिहिलं आहे सगळ्यांनी.
सुरेख लिहिलं आहे सगळ्यांनी. ह्या माऊल्यांची जिद्द पाहून, स्वतःची जिद्द किती तोकडी पडते ह्याची जाणीव होते.
अनिताताई तुमच्या आईंबद्दल
अनिताताई तुमच्या आईंबद्दल वाचून छान वाटले! तुम्हीही मस्त लिहीले आहे..
अगो, तू देखील लिहीलेले मला फार आवडले.. तुझी पोस्ट वाचताना वाटले काही वर्षांनी अरूष लिहील त्याच्या आईबद्दल!
स्वराली, बेस्ट मुहूर्त मिळाला की लिहायला! मस्त लिहीले आहेस! केव्हढी जिद्द, चिकाटी व मनोनिग्रह लागत असेल हे सर्व करताना! सलाम काकूंना! त्यात कलामांकडून पुरस्कार म्हणजे भारीच!
प्रॅडी !! अमेझिंग वाटले वाचून! मलाही जिद्द मिळाली थोडी. जबरदस्त!
आया ग्रेट असतात खरंच! आता आई झाल्यावर वाटते मी माझ्या आईसारखी कधी होणार!
अनिता तुझ्या आईला दंडवत! आणि
अनिता तुझ्या आईला दंडवत! आणि मी तुला जेवढी काही ओळखते,(अगोची आणि जयंतीची आई हीही तुझं इथलं एक अॅडिशनल क्वलिफिकेशन!) त्यावरून मला माहिती होतं तुझ्या लेकी लिहिणार तुझ्याबद्दल!
स्वराली आणि प्रॅडी...........तुमच्याही आयांबद्दल वाचून खूप आनंद झाला.
प्रॅडी, ग्रेटच! किती जिद्दीने
प्रॅडी, ग्रेटच! किती जिद्दीने आईने शिक्षण केलं! खुपच कौतुकास्पद!
सर्वांनीच खूप सुंदर लिहिलंय
सर्वांनीच खूप सुंदर लिहिलंय
अनिताताई आणि अगो - मायलेकी, हा एक सुखद धक्का !!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आईच्या जिद्दीची कहाणी सांगण्याची संधी दिली म्हणून संयुक्ताचे खूप आभार.
स्वराली , मतीमंद मुलांसाठी झटून काम करणा-या तुझ्या आईबद्दल वाचताना डोळे पाण्यानं भरून आलेत.
चांगल्या संस्कारांची मोठीच शिदोरी मिळालीय तुम्हाला. आणि कलामांच्या हस्ते पुरस्कार मिळवणा-या
या थोर आईला माझे दंडवत.
प्रॅडी , खूप छान वाटलं तुझ्या आईबद्दल वाचून. सगळ्यांसाठी कष्ट उपसून ,सगळ्या जबाबदा-या पार पाडत शिक्षण घेतलं. ग्रेटच. खूप प्रेरणादायक आहे हे सर्वांसाठीच.
मानुषी , मारणा-याचा हात धरता
मानुषी , मारणा-याचा हात धरता येतो. बोलणा-याचं तोंड धरता येत नाही आणि लिहिणा-याचाही हात धरता येत नाही!!
या सार्या धडपड्या आईंना वंदन
या सार्या धडपड्या आईंना वंदन करावेसे वाटते.
अनिता हो गं बाई!. हे खरं आहे.
अनिता हो गं बाई!. हे खरं आहे. पण मी सीरियसली लिहिलंय. मुलं मोठी(सर्वार्थाने) झाली की ही अमकी तमकीची आई बरं का? अशी जेव्हा त्या आईला ओळख मिळते तेव्हा ते अॅडेड क्वालिफिकेशनच नाही का(विथ हर ओन क्वलिफिकेशन्स!)?
ओक्के....इथे मुलांनी आईबद्दलच
ओक्के....इथे मुलांनी आईबद्दलच लिहायचं का? मी स्वता: जर काही माझ्या मुलांबरोबर शिकले असेल तर ते मी लिहू शकते का?
Pages