पुरुषासारखा पुरुष

Submitted by बेफ़िकीर on 11 May, 2012 - 02:53

ऊन वाढले तरीही सुहास चालतच होता. दुपारचे बारा वाजत आले होते. अनेक फोन येऊन गेले असतील असा विचार करून त्याने सायलेंटवर ठेवलेला सेल खिशातून काढून पाहिला. आठ मिस्ड कॉल्स, तीन मेसेजेस. त्यातले दोन कॉल्स कस्टमरचे, तीन साहेब किंवा सहकारी यांचे ऑफीसमधून आणि तीन कोणतेतरी माहीत नसलेल्या नंबर्सचे. मेसेजेस दोन्ही ऑफीसमधून. केव्हा येतोयस, उशीर का झालाय!

सर्व कॉल्स आणि मेसेजेसचे संदेश डिलीट करून सुहासने गर्दीकडे पाहिले. कोणाला काही नसणारच होते, पण तरी त्याला वाटले की निदान कोणीतरी तरी विचारेल की असा का फिरतोयस. नाही, कोणी विचारले नाही आणि सुहास पुन्हा खाली पाहून चालू लागला.

थोड्या वेळाने एका झाडाखाली उभा राहून त्याने खिशातून क्लासिक रेग्युलरचे लालभडक पाकीट काढले आणि इकडेतिकडे बघत आणि बावरत एक थोटुक पेटवले. भर उन्हातही तो झुरका त्याला आत्मविश्वास देऊन गेला. जग खड्यात गेले असा विचार करत सुहासने सरळ बैठकच मारली. फार तर काय? चांगला पोषाख घालून एक उच्च मध्यमवर्गीय तरुण रस्त्यावर खाली बसला आहे हे दृष्य पाहून लोक स्वतःचा एक क्षण वाया घालवतील आणि पुढे निघतील. पण मला कोणी इथून हालवू तर शकत नाही? नुसता बसलो तर काय झाले?

तरीही सुहास थोडासा बावरला आणि लोकांच्या नजरेचा अभ्यास करू लागला. पण ठीक होते. जरा पाहिल्यासारखे करत साले निघून जात होते आणि झाडाच्या मागे बसल्यावर तर तोही प्रश्न निकालात निघाला.

जरा एकांत मिळाल्यासारखे होताच सुहासचे विचारचक्र सवयीप्रमाणे सुरू झाले. सेल फोन तर त्याने ऑफच करून टाकला.

आणि थोटुक संपल्यावर दुसरी फ्रेश सिगारेट पेटवत त्याने पाय लांब केले आणि वर मान करून झाडाच्या पानांकडे पाहू लागला.

संवाद साधायचाच असला तर सुहास कोणाशीही बोलू शकायचा. हवेशी, जमीनीशी, झाडाशी, स्वतःशी, कोणाशीही.

तापलेले ऊन, झाडाची सळसळ, सावलीचे जेमतेम सुख आणि क्लासिक रेग्युलरचा झटका या चौघांशी सुहास बोलू लागला.

==================================

माझा अ‍ॅक्च्युअली प्रॉब्लेम काये माहितीय का? मला जग आणि त्यातली माणसे सहन होत नाहीत. प्रत्येकापासूनच मला प्रॉब्लेम आहे. ऑफीसमध्ये प्रॉब्लेम. राजकारण आहे, प्रमोशन होऊ नये म्हणून प्रयत्न आणि व्हावे म्हणून प्रयत्न. एकमेकांच्या चहाड्या, इमेल्स, कोणाच्या घरी कोण राहते तेही माहीत नाही. वर्षानुवर्षे शेजारी बसूनही गुड मॉर्निंग आणि 'कमिंग फॉ लंच' शिवाय बोलणे नाही. समोरासमोर बसून इमेल्स पाठवणे. साहेबाचे कान भरणे. का रे असे करता? तुमचे चांगले झाले तर मला काहीही वाटत नाही यार. मला असेही वाटत नाही की मला दर दोन वर्षांनी प्रमोशन मिळावे. मला फक्त शांतपणे जगायचंय. शांतता हवी आहे. दहा हजार कमी पगार द्या. नो इश्यूज. फक्त हैराण करू नका. झापू नका. हसू नका. चुगल्या नकोत. स्पर्धा नको. अरे आपण मस्त मित्र होऊ की? या रविवारी बायकापोरांना घेऊन गप्पा मारायला आमच्या घरी? नाश्ता, चहा? जरा धमाल येईल. पण तुम्ही येणार नाही.

माझ्या चुका का होतात कामात? कारण माझे लक्ष नसते. लक्ष का नसते? कारण बॉस झापेल याची भीती असते. त्याने झापले की काहीही उत्तर देता येत नाही. दिलेल्या प्रत्येक उत्तरावर तो अक्कल काढतो. असाईनमेन्ट्स का चुकल्या? कारण असिस्टंटला करायला सांगितल्या. मग त्याने केलेले काम चेक करण्याइतकीही काळजी नाही तुला? मग त्यालाच तुझ्या जागेवर का बसवू नये? तो होईल की ट्रेन वर्षभरात? म्हणजे बेसिक्सच तुम्ही लोक विसरताय. तुम्हाला मदतीला माणूस काय दिला, कंपनी उडत गेल्यासारखेच उधळलात. आता ओव्हरड्यूज दिसतायत त्याचे काय करू? मी अ‍ॅप्रूव्हल्स दिली तर ऑडिटर्सना तुम्ही उत्तर देणार का? म्हणजे जे किमान काम आहे तेही करत नाही आहात. ग्रोथ तर कुठल्याकुठे राहिली. तुम्हाला म्हणजे सिंहासनावर बसून फक्त ऑर्डरी सोडायची कामे द्यायला हवीत. म्हणजे तुमचेच काम तुम्ही केले नाहीत तर दुसर्‍याचे करून वर कधी जाल? प्लीज फॉर हेवन्स सेक मला यापुढे असे काहीही व्हायला नको आहे.

झालं झापून. सलग वीस वाक्ये. तरी हे किरकोळ होते. फक्त असाईनमेन्ट्स चुकल्या इतकेच. मागे तर एकदा प्राईसच चुकली. तेही असिस्टंटमुळेच. लेखी जाब मागीतला पन्नास फुटांवर आम्ही दोघे बसत असून. मग त्याचा सेक्रेटरी त्याच्या ईमेल्स ड्राफ्ट आणि सेन्ड करतो. मग काय झाले ते सैनीला सांगतो. मग सैनी त्याच्या ग्रूपमध्ये ते सांगून हासतो. मग ते सगळीकडे झाले की कोणीतरी सर्वांदेखत हासत थट्टेने विचारतो. काय जांभळे? एक्स्प्लनेशन दिलं का साहेबाला? तुमच्यायच्ची **! तुम्हाला काय घेणे का देणे आहे? साहेब तुम्हाला भोसडतो तेव्हा मी विचारतो का तेल लावून गेलावतात आत का ड्राय मारून घेतलीत?

चूक माझीच आहे. मान्य आहे. आय अ‍ॅम नॉट डिनायिंग अ‍ॅट ऑल. मी निल्याला विचारले नाही की चूक कशी काय केलीस? त्याने मला फाईल इमेल केलेली होती. विचारायलाही आला होता की सर एकदा चेक करता का? आपण म्हणजे क्षमाशील साईबाबा. केलंयस ना बरोबर? चेक करायला नकोय ना? तो आत्मविश्वासाने नको म्हणाला की आपण म्हणणार दे पाठवून. दहा दिवसांनी एजिंग सर्क्युलेट झालं की गावात नागडे फिरल्यासारखे वाटते. प्रत्येकाला माहीत असते, जांभळेचे डेटर्स घुसलेत. साहेब त्याची घेणार. अशा वेळी निल्याला काय बोलणार आपण? पण तरी समजा विचार केला की तो आपला असिस्टंट आहे तर झापू, तरी झापता येत नाही. म्हणजे त्याने एखादी अशी चूक केली की ज्यात माझी काही जबाबदारीच नाही आहे तरीही झापता येत नाही त्याला. का? कारण आपण मुखदुर्बळ. त्याला झापताना मनात हे येते की उद्या आपली काही चुकले तर आपल्यालाही असेच झापले जाईल. त्याची नोकरी आपण घेऊ शकत नाही पण आपली नोकरी साहेब घेऊ शकतो. मग त्याच्यासमोर अपमानीत व्हावे लागेल, त्यापेक्षा आजच त्याचा अपमान होणार नाही याचा प्रयत्न करू. मी काय इथे बाकीच्यांचा आदर जपायला आहे काय?

या सगळ्याचे मूळ कारण हे आहे की आपले कामात लक्षच नसते. असे नाही की आपटे जसा शेअर बाजाराची स्क्रीन समोर ठेवून काम करत असल्याचे भासवतो तसे आपले नाही. आदिती जशी नट्टापट्टा करून सर्वांना नेत्रसुख देत एक बाई आहे या नावाखाली शिव्या टाळते तसेही आपले नाही. बदलापूरकर साहेबाच्या केबीनमध्ये बसून तिथूनच फोनवर सगळी कामे करून प्रत्येक गोष्टीत साहेबाला इन्व्हॉल्व्ह केल्याचे दाखवून त्याला मान देतो तसे आपले नाही. सबनीस साहेबाच्या घरी पाणी भरतो आणि स्वतःच्या बायकोला साहेबाच्या बायकोशी घनिष्ट मैत्री करायला सांगतो तसे आपले नाही. अंजना पटेल कामात कधीही काहीही चूक करत नाही तसे आपले नाही. चित्रा 'मी अजून नवीन आहे' या सबबीखाली चुकांवर पांघरूण घालून घेते तसे आपले नाही. स्साला आपले कसेच नाही. पण आपल्यात असलेला प्रत्येक वाईट पैलू तेथील प्रत्येकात थोडा थोडा आहे. आपण साहेबाची लाल करून पाहिली. त्याने फटकारले. हिला साहेबाच्या मिसेसशी ओळख करून घे म्हणालो तर हिने उडवून लावले. आपले शरीर आदितीसारखे वळसेदार आणि गोरेपान नाही की नुसते बघून शिव्या देण्याचा विचार मनातून निघून जावा. आपल्याला बदलापूरकर जेवढा वेळ साहेबाच्या केबीनमध्ये काढतो तो तर राहूचदेत, केबीनमध्ये पाय ठेवायचीही हिम्मत होत नाही. नुसते साहेबाला आपली आठवण झाल्याचे कळले की हादरतो आपण. कोणतीतरी जुनी चूक निदर्शनास आलेली असणार आणि घ्या आता ठोकून पुढून मागून.

काहीच चांगले नाही? भडव्यांनो मग दहा दहा कॉल का देताय मला? का आलो नाही ऑफीसला म्हणून? आलो तरी एक शब्द नीट बोलत नाही ना तुम्ही? ते थ्री ईडियट्ससारखं पँट काढून साहेबाकडे पाठ करून वाकण्याची नोकरीय भेंचोद!

एस एल आर चं रिजेक्शन मी केलं? मी प्रॉडक्शनला आहे? आणि पर्चेसचा म्हाळगी मी सगळ्यांचे ऐकून घेतो हे माहीत असल्याने मी दिसल्यावर सगळ्यांदेखत म्हणाला जांभळे तुमचं लक्ष नाही दिसत. एस एल आर चं रिजेक्शन महाग पडणार तुम्हाला. आणि आपण कसेनुसे हासून का सटकलो? कारण बोललो असतो तर साहेबाच्याच कॉलनीत राहणार्‍या म्हाळगीने सकाळी जॉगिंगच्यावेळी साहेबाचे उगीचच कान भरले असते. जांभळे दिवसातून पाचदा पर्चेसला का येतो समजत नाही असे म्हणून. मी काय करणार? अ‍ॅडमीन बिल्डिंगमध्ये स्मोकिंग कुठे अलाऊड आहे?

बघावा का सेल ऑन करून एकदा? यू हॅड सेव्हन्टीन मिस्ड कॉल्स. यादी. नंबर. त्यात साहेबाच्या एक्स्टेंशनवरचे सहा. या लोकांनी घरीही फोन केलेला असेल. पण घरी कोण आहे म्हणा फोन उचलायला. त्यामुळे ऑफीसवाले टोट्ल वैतागलेले असतील. मी येऊन काय दिवे लावणार आहे म्हणाव? डी ओ तर निल्या आरामात बनवतो आता. डिसपॅच शेड्युल्स अंजना देते. मी हवाय कशाला?

मी कोणालाच का नको आहे? ऑफीस तर ऑफीस, पण घरीही का नकोय? मी ऑफीसमध्ये हे का सांगू शकत नाही की घरी अतिशय मनस्ताप असल्याने माझ्या कामात चुका होतात, कृपया मोठ्या मनाने सांभाळून घ्या. साले म्हणतील पुरुषासारखा पुरुष अन ऐकून घेतोस? हाकलून दे बायका पोरांना. मी असतो तर लाथ घातली असती. पुरुषासारखा पुरुष म्हणजे काय तिच्यायला? पुरुष म्हणजे काय सतत शूर, कर्तबगार, छाती पुढे काढून चालणारा, ज्याची भीती वाटेल असा, असाच असायला हवा का काय? तलवार वगैरे ठेवू का काय आता कंबरेला? बायको समोर आली की हिंस्त्र चेहरा करायला लागू का? की थोबाड फोडू मुलांचे? पुरुषासारखा पुरुष म्हणजे काय? मला समजतच नाही. बायकोचा भाऊ पोलिसात आहे. मोठा अधिकारी आहे. लग्नाला दोन वर्षे झाल्यावर एकदा भांडण झाले. मी तिला म्हणालो तू मला सारखी ह्याच्या त्याच्यावरून बोललीस तर बघ. डायरेक्ट भाऊच घरी आला दुसर्‍या दिवशी. म्हणे हॅरॅसमेन्टची अन डोमेस्टिक व्हायोलेन्स ची केस ठोकीन. बहिणीला कशाला उजवली मग? घरीच नाही होय ठेवायची? म्हणजे तुझ्या जीवावर तुझी बहिण माझ्याबरोबर राहताना माझ्यावर पावशेर ठेवून राहणार. आणि मी त्याला लग्न मानायचं. पुन्हा एकदा वाद झाले तेव्हा माहेरी निघून गेली. पुन्हा हा आला. दम देऊन गेला. मग मीही चवताळलो. मला काय स्वतःला लाईफ आहे की नाही? मी आणि माझी बायको पाहून घेऊ की? तू का सारखा मधे पडतोयस? आणि असे होणार असेल तर ती तिकडेच राहिलेली बरी म्हणालो तर ह्याने माझ्याच घरात बसून मलाच धमकी दिली. हातपाय मोडून ठेवेन म्हणाला. बायकांना स्वतःला समजत नाही का काहीच? की बुवा आपण सासरी आलो आहोत तर जरा जमवून घ्यावे. माहेर माहेर करून नाचू नये. ठीक आहे. आम्ही काय छळ करतोय काय? आम्हीही प्रेमच करतोय की तुमच्या घरच्यांवर. पण तुम्ही सतत माझ्यावरच डाफरणार, मी सतत ऐकूनच घ्यायचं आणि वर तुम्ही घरात काही करणार नाही. राणीसारख्या राहू पाहणार. मुलांचे लाड करणार. या वयात आम्ही कधी इतके हॉटेलिंग केलेले नव्हते. परस्पर माझ्या खिशातून दिडशे रुपये दोघांना देतेस तू आणि जाऊन खाऊन यायला सांगतेस, पार्सल आणायला सांगतेस. ठीक आहे ना? माझा आणि तुझा पैसा काय वेगळा आहे थोडीच? पण मला सांगितले असतेस तर मी घरातून पैसे घेऊन माझ्या खिशात ठेवले असते. अर्धा किलोमीटर हे धूड पेट्रोल पंपावर ढकलत नंतर एटीएमला चालत जावे लागले नसते. फोन करून विचारले तर म्हणे मुलांच्याबाबतीत मी बोललेले चालणार नाही. मुलांच्या बाबतीत कुठे बोलतोय? माझ्या बाबतीत बोलतोय. मला सांगायला काय झाले की कॅश मी घेतली आहे. असो. पण सारखेच भांडावेसे का वाटते अशा लोकांना? कोणीतरी पोलिसात आहे, कोणीतरी आर्मीत वगैरे आहे या जीवावर? बाकी बघायला जाल तर यांच्यात स्वतःची हिम्मत काही नाही. वाद झाला की दादाला सांगेन यावर यांचे बोलणे संपते.

मुलं तरी काय. बाप म्हणजे जीभ नसलेला असा एक मुका कामगार. येता जाता थट्टा. पुरुषासारख्या पुरुषाची. हा हा हा. थोबाड फोडलं की ही भांडायला येणार. स्वयंपाक करत नाही. त्याला बाई. सगळ्या कामांना दुसरी बाई. टीव्ही नवा आणा म्हणे. तेहतीस हजाराला आहे. या बायकांना लग्न करून का उरावर घ्यायचं? घरी ऑफीसची काळजी आणि ऑफीसमध्ये घरची. आजारपणे काढणे सोपे असेल. पण मनावरचा ताण?

हं! फोन ऑन केल्या केल्या साली रिंग वाजतीय.

"हॅलो? कोण??? दादा? बोला काय म्हणताय? मी इथे आहे आपला... तो हा रोड आहे ना?.. सेवेकरी मार्ग.. हां... झाडाखाली बसलोय बिड्या फुंकत... शिव्या का देताय?.. या या.. अवश्य या...तुमच्या बापाने तुम्हाला अक्कल शिकवली नाही... तुमच्या बहिणीलाही... "

हॅट साला. फोन ऑन केल्या केल्या या हरामखोराशी बोलावे लागले.. किती हे कॉल्स..बेचाळीस??? बेचाळीस कॉल्स??? काय झालंय काय एवढं??? सुहास जांभळे दोन तास दिसला नाही म्हणून एवढे कॉल्स??

सुहास जांभळे कधीच दिसला नाही तर सर्व मोबाईल कंपन्यांच्या उत्पन्नात घट होईल. कारण कोणीच कोणाला कॉल करणार नाही.

घरी शांतता असती तर ऑफीस एकट्याने गाजवले असते मी. काय एकेकाळी माझा परफॉर्मन्स असायचा. त्यामुळेच वर चढलो. आता इतका वर आहे की सारखा त्याचाच उल्लेख होतो. जांभळे द काईन्ड ऑफ लेव्हल यू आर अ‍ॅट अ‍ॅन्ड द पॅकेज अ‍ॅन्ड ऑल डझन्ट जस्टिफाय यूअर परफॉर्मन्स यार. खड्ड्यात जावो ते पॅकेज आणि ती लेव्हल. कसली लेव्हल? साधा डेप्युटी मॅनेजर. अशी काय मोठी लेव्हल आहे ही? कशाला सारखा उल्लेख करता माझ्या लेव्हलचा आणि पॅकेजचा? हे पॅकेज मिळवून मी घरात कोणाच्याही चेहर्‍यावर एक अभिमानाचे स्मितहास्य फुलवू शकलेलो नाही.

खडीसाखरेसारखाच दिसतो हा मेन्थॉलचा तुकडा. लहानपणी फार मजा यायची. चोरून सिगारेट ओढायची मित्रांबरोबर. मग तो वास जावा आणि घरच्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून सत्राशे साठ हॉल्स आणि क्लोरोमिंटच्या गोळ्या खायच्या. पण सिगारेटचा तो गरम गरम धूर नको व्हायचा म्हणून मग त्यावर थोडासा मेन्थॉलचा तुकडा. नुसता ठेवायचा नाही. ठेवून जाळायचा. आणि मग सिगारेट पेटवायची. गारीगार धूर. आह. मस्त वाटायचे. चला, आज अनेक वर्षांनी तेच पुन्हा करू.

ऑफीसचा ताण, घरची कटकट, अपेक्षांचे दुर्गम डोंगर, शिव्यांच्या लाटा, कुत्सित आणि छद्मी सुस्कार्‍यांची वादळे. सगळ्याअर एक जालीम उपाय. मेन्थॉल सिगारेटचा एक झुरका.

असे नाही की माझ्यापेक्षा दु:खी लोक जगात नाहीत. असे नाहीत की नोकरी गेलेले कोणी नाहीत. असे नाहीत ज्यांच्या घरी अजिबात कटकट नसते. सर्व प्रकारचे लोक असतात जगात. माझ्यापेक्षा हजार पटींनी दु:खी असतात.

पण माझा प्रश्नच वेगळा आहे. मला झुंजायचे नाही आहे. हे निगेटिव्ह धोरण नाहीच बरं का रे झाडा? नाहीतर तू लगेच म्हणशील आपल्या सावलीत बसलेला हा माणूस विचारांनीच हारलेला आहे. पण तसं नाहीये. माझे न झुंजण्याचे कारणच वेगळे आहे. मला झुंजायचे आहे ते अशा माणसांशी जी प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकपणे झुंजणार आहेत. धर्मयुद्ध असायला हवे ते. तुला माझा राग येतोय ना? व्यक्त कर. मला तुझा राग आला. मी व्यक्त करतो. मारामार्‍या करू. पण मी या जगात एकटा आहे हे पाहून आपल्या लोकांना जमवून मला धोक्याने नका मारू. तुम्ही सगळे तसे करता म्हणून मला झुंजायचे नाहीये. एकदा तरी बायको म्हणाली असती की तू कष्ट करून आम्हाला प्रेमाने सांभाळतोस याचा मला अभिमान आहे तर जग गाजवले असते मी. निदान करतोय ते करण्याची मजा आली असती. करतोय ते करण्याचे कारण मिळाले असते. घरी गेल्यावर मुलांचा आणि टीव्हीचा आवाज, हिचे सारखे माहेरी फोन, माझ्याशी कोणी बोलणारच नाही, माझे मी पान वाढून घ्यायचे आणि जेवण झाल्यावर बेसीनपाशी नेऊन ठेवायचे. सलग तीन दिवस तीच भाजी झाली तरी कोणी असे म्हणत नाही की दुसरी भाजी करूयात यार! बाबांना कंटाळा आला असेल. ऑफीस आणि घर यात आज कोठे अधिक मनस्ताप होईल याचा विचार करणे म्हणजे माझे अस्तित्व. ऑफीसमधल्यांनी तरी सांभाळून घ्यायला हवे ना? खच्चीकरणच केले पाहिजे का जो चुकला आहे त्याचे? एक चुकून, केवळ एक माणूसकी म्हणून किंवा जस्ट एक चेंज म्हणूनही तुमच्या तोंडातून कधीच असे का येत नाही की जांभळे, काय यार काय झालंय काय तुला? अं? काळजी करू नकोस यार मी आहे तुझा दोस्त. शिव्या सगळ्यांनाच बसतात. चल दोघे मिळून तुझे काम करून टाकू आणि मग माझे काम करायला जाऊ.

जगात केवळ एक माणूस आहोत या किमान धारणेनेही कोणी सुसंवादी का नसावे? कोणी परकेपणाच्या परिघाला भेदून आत का येऊ नये? आह! मस्त गार गार धूर आहे. छातीत बर्फाची लादी ठेवल्यासारखे वाटते आहे. दोन क्रूर माणसे माझे पाय आणि डोके धरून मला ताणत आहेत का? घरी सपोर्ट असता तर ऑफीसमध्ये मला काहीच वाटले नसते. साहेबाचा काय दोष? तो शिव्या देणारच की? दोष आपला आहे. 'पुरुषासारखे पुरुष' असूनही आपण घरात स्वतःसाठी आनंदाचा क्षण निर्माण करू शकत नाही.

चला, वेळ संपत चाललीय. हिचा दादा येऊन उभा राहील अचानक. माझं काय आहे माहितीय का झाडा? मला फक्त ताण नको आहे असं नाहीये. मला जे हवं आहे ते हे, की माझा आत्मविश्वासही फुलेल, मलाही बरे वाटेल, मलाही स्वतःचा पुरुषासारखा पुरुष असण्याचा अभिमान वाटेल असे कोणीतरी तरी काहीतरी करायला पाहिजे.

अनेकांपाशी गेलो रे मी. नाही असे नाही. तुझ्यासारखे कोणीच नव्हते, फक्त ऐकून घेणारे आणि सावली देणारे. ज्याच्याकडे जायचो तो त्याच्या स्वतःच्या वर्तुळात सुखी असायचा या एकाच कारणाने तो माझ्या वर्तुळात प्रवेशच करायचा नाही. अरे माझी मुलेसुद्धा. आई आणि मामा यापलीकडे त्यांना नातेवाईक माहीत नाहीत जणू की. मुलं मोठीच नकोत व्हायला. अक्कल आली की वेगळी वागायला लागतात. खरं तर मुलंच नकोत व्हायला. मुले असणे हा जितका मोठा आनंद आहे तितकेच मोठे दु:ख साले. गावठी कुत्र्यांची इमानदारीही जास्त असते.

तर मुद्दा असा की मी माझ्या मनस्थितीवर फुंकर घालतील या अपेक्षेने अनेकांच्याजवळ जायचा प्रयत्न केला. तात्कालीक आधार मिळालाही. पण त्यात 'तुझी गरज भागवत आहे' अशी भावना जास्त होती. माझे सगळे काही ऐकून मग हसायचे आणि म्हणायचे 'लेका पुरुषासारखा पुरुष तू'! लाथ मारशील तिथे पाणी काढशील की? बायकोला झाप जरा घरी जाऊन. साहेबाला सगळ्यांदेखत ऐकव म्हणाव नोकरीवर लाथ मारीन. असं करता येत नाही. साहेब कसाही असला तरी माणूअ चांगला आहे. त्याचा आदर ठेवायला आवडते आपल्याला. त्याची मानहानी होऊ नये असेच आपल्याला वाटते. बायको कशीही असली, मुले कशीही असली तरी आपलीच आहेत. नाही रागवावेसे वाटत. पण सहन नाही होत. अरे? हॉर्न वाजायला लागला की? दादा आला बहुतेक हिचा.

निघायला हवे आपल्याला. जगाच्या गांडीवर लाथ मारून. हरामखोरांच्या तोंडावर थुंकून आणि नाकावर टिच्चून. घे, घे ही पुडी. आह! रंग मस्त आहे. गिळ सुहास, गिळ! क्षणभर होतील वेदना, पण नंतर जो आनंद असेल, जी ताणविरहीत अवस्था असेल, जी शांतता असेल तिला तोड नाही यार.

फक्त बायको आणि पोरांची भेट व्हायला नको वर गेल्या गेल्या. होण्याची शक्यता आहे म्हणा. दोनच तासापूर्वी ते वरच्या प्रवासाला गेले आहेत. म्हणजे नरकाच्या दारावर भेट होणार. त्यांचा प्रवेश निर्विघ्नपणे होईल आणि मला शिव्या ऐकवक नरकात घेतील.

उद्याच्या पेपरमधली साली बातमी आज वाचायला मिळायला पाहिजे होती....

तिघांचा खून करून तरुणाची आत्महत्या

सेवेकरी रोडवरील समाधान अपार्टमेन्ट्समध्ये राहणार्‍या सुहास जांभळे या युवकाने आपल्या पत्नीचा व मुलांचा गळा दाबून खून केला व स्वतः विष खाऊन आत्महत्या केली.

चीअर्स! वन, लास्ट वन फॉर द रोड. द रोड टू हेल.

पुरुषासारखा पुरुष काय असतो ते समजेल जगाला......

===================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

भुक्कड चे काय झाले?
>>>>>>> भुक्कड ने बयोशी लग्न केले. तो शिकुन एका कंपनीत नोकरीस लागला. त्यांना दोन मुले झाली. पण बयो त्याच्याशी भांडु लागली. मुले अपमान करु लागली. आकाश पाहण्यास वेळ मिळेनासा झाला. त्याचे कामातले लक्ष उडाले. चुका होउ लागल्या. बॉस ओरडु लागला. तो खचला. हरला. नी मग एकेदिवशी त्याने आपल्या पत्नीचा व मुलांचा गळा दाबून खून केला व स्वतः विष खाऊन आत्महत्या केली. त्याचीच ही वरची कथा. आता पुन्हा विचारु नका भुक्कड कुठाय म्हणुन. Wink Lol

tyapexaa sanyaas ghevun himaalayaat gelaa asataa tar soppe jhaale nasate kaa ....lokaannaa tyaMchyaa style ne jagu dyaave aapaN svat:chyaa shhTaaIl ne jagaave ...

haay kaay naay kaay

चांगली लिहीलेय.

पुरुषासारखा पुरुष म्हणजे काय तिच्यायला? पुरुष म्हणजे काय सतत शूर, कर्तबगार, छाती पुढे काढून चालणारा, ज्याची भीती वाटेल असा, असाच असायला हवा का काय? तलवार वगैरे ठेवू का काय आता कंबरेला? बायको समोर आली की हिंस्त्र चेहरा करायला लागू का? की थोबाड फोडू मुलांचे? पुरुषासारखा पुरुष म्हणजे काय? मला समजतच नाही.
>> गुड वन.

बेफिजी....

कथा म्हणुन छान आहे... रादर माझा सारखे बरेच जण स्वतःला रिलेट करु शकतात सुहासशी...

प्रश्न आणि ताण उत्तम मांडलाय तुम्हि.. शेवटाला त्यावरचे सोल्युशन सापडेलकी काय असे वाटले होते तर अनपेक्षीत शेवट झाला... असो... Happy