'हा भारत माझा' - डॉ. अभय बंग

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 April, 2012 - 23:34

'हा भारत माझा' हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबाची कथा सांगणार्‍या या चित्रपटानं अण्णा हजारे, सुधा मूर्ती, अभय बंग, अनिल अवचट, आनंद नाडकर्णी, सुनीती. सु. र., विद्या बाळ अशा अनेक ज्येष्ठ समाजकारण्यांना भारावून टाकलं.

या चित्रपटाबद्दलचं डॉ. अभय बंग यांचं मनोगत...

dr-abhay-bang.jpeg

'हा भारत माझा'बद्दल सांगायचं झालं तर, सुमित्राताईनं आणि सुनीलनं अण्णा हजार्‍यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या निमित्तानं पूर्ण राष्ट्रीय पातळीवर जे देशात महाभारत घडतंय, तसंच एका कुटुंबातलं महाभारत, बाहेरच्या आंदोलनाचे त्या कुटुंबात उमटणारे पडसाद आणि खरं म्हणजे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काय महाभारत घडत होतं, हे फार सुंदर पकडलं आहे, असं मला वाटतं. हे सगळं खरंतर एका चित्रपटाच्या आवाक्यात पकडणं कठीण. राजकारण राष्ट्रीय पातळीवरही चालतं, कुटुंबामध्येही चालतं आणि व्यक्तीच्या पातळीला मनामध्येही चालतं. बाहेरच्या बदलाचे पडसाद व्यक्तीच्या मनात आणि जीवनात कसे उमटतात, याचीच कथा मांडल्यामुळे खरंतर ती प्रत्येकच माणसाची कथा होते. त्यामुळे त्या कथेचं, चित्रपटाचं सार्वत्रिकीकरण होऊन जातं.

भ्रष्टाचार हा फक्त राजकारणाच्या पातळीवर किंवा पैशाच्या पातळीवरच न राहता वर्तनातही दिसून येतोच. मोह हा छोट्या कालावधीसाठी प्रत्येकाला सोयिस्कर वाटतो. भ्रष्टाचाराचा मोह किंवा सोपा मार्ग घेण्याचा मोह प्रत्येकालाच होत असतो. म्हणूनच हा चित्रपट बघताना प्रत्येकाला असं वाटू शकतं की, 'अरे, हे तर माझंच प्रतिबिंब आहे, मलादेखील समोर पडद्यावर दाखवतायेत तसं वाटतं, माझ्याही मनात द्वंद्वं निर्माण होतात आणि मी सोयिस्कररीत्या शॉर्टकट घेऊ इच्छितो'. गांधीजींना एकदा विचारण्यात आलं, 'बापू, हे करावं की ते करावं, असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा नक्की काय करावं?' त्यावर गांधीजी म्हणाले, 'खूप सोपं आहे, जो कठीण मार्ग असेल तो सहसा बरोबर असतो'. आपल्या सगळ्यांनाच कठीण मार्ग सोडून सोपा, सोयिस्कर मार्ग निवडायला आवडतो आणि बहुतेक वेळा आपला मार्ग चुकतो. आता एक आहे, की प्रत्येक माणसाला क्षणोक्षणी मोहाशी लढत लावण्यापेक्षा जर काही सामाजिक आणि राजकीय नीतीनियम बनवता आले किंवा संस्कृती बनवता आली, की तीच मुळी भ्रष्टाचारविरोधी आहे, तर समाजाचं जीवन अधिक सुखकर होईल. कारण पदोपदी माणसाला भ्रष्टाचाराचा मोह दाखवायचा आणि शंभर कोटी माणसांनी क्षणोक्षणी स्वतःला भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवायचं, हे फार कठीण. म्हणून मग राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये सुधारणा होऊन असे नीतीनियम आणि हळूहळू संस्कृती बनायला हवी की ज्यात भ्रष्टाचाराला कमीतकमी वाव असेल.

मला वाटतं, की अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. ह्या आंदोलनाचा परिणाम फक्त तात्कालिक राहील का, हे आज सांगता येणं कठीणच. पण अशा प्रकारच्या आंदोलनांचं यशापयश तत्काळ परिणामांनी मोजताही येत नाही. मागे वळून तुलना न करता पाहिलं तर, गांधीजींची १९२०ची असहकार चळवळ, १९३०ची दांडीयात्रा, १९४२चं 'चले जाव' आंदोलन ही आंदोलनं अपयशी ठरली, असं त्यावेळी वाटलं होतं. त्यानंतर ताबडतोब स्वातंत्र्य नाहीच मिळालं. पण तरीही या सगळ्याचाच परिणाम होऊन इंग्रजी सत्ता कमजोर झाली, भारतीय लोकांचं बळ वाढलं आणि स्वातंत्र्य मिळालं. हे आंदोलन भ्रष्टाचारविरोधी आहे, पण माझ्या मते ते एका बाजूने राजकीय बदलासाठीही आहे, आणि हे प्रतिनिधीशाहीविरोधी आंदोलन आहे. निवडून आलेले प्रतिनिधी जेव्हा मोकाट सुटतात आणि लोकांना, मतदारांना ते उत्तरदायी राहत नाहीत, त्यांना लोकांच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी हे आंदोलन आहे आणि लोकशाही सुधारण्यासाठीचंही आंदोलन आहे. मी असं मानतो, की याच्या लौकिकदृष्ट्या यशामुळे किंवा अपयशामुळेही लोकशाही मजबूतच होणार आहे. हे फक्त भारतातच घडतंय असं नाही, तर २०११मध्ये जगभरात जणू लाट आली आणि नागरिकांनी जागोजागी राजकारण सुधारण्यासाठी, हुकुमशहांना सत्तेवरून उतरवण्यासाठी किंवा भांडवलशाही समाजपद्धती सुधारण्यासाठी उस्फूर्त आंदोलनं केली. जगभरात व्यवस्थेच्या बदलासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचा प्रवाह दिसतो आहे आणि भारतातही त्याचंच प्रतिबिंब आपण बघतो आहोत. मागण्या मान्य होतील किंवा नाही ते आज सांगता येणार नाही, पण या आंदोलनाचा लोकशाही बळकट करण्यासाठी आणि प्रतिनिधींचं वर्तन सुधारण्यासाठी निश्चितच उपयोग होईल.

'हा भारत माझा' हा माझ्या मते एक फार महत्त्वाचा चित्रपट आहे. भ्रष्टाचारमुक्त समाज, संस्कृती प्रत्यक्षात येण्याचं स्वप्न बाळगून असणार्‍या प्रत्येकानं तो पाहावा, असं मला वाटतं.

concept01-Hoarding.JPG

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता बघावाच लागणार, पर्यायच नाही!
राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये सुधारणा होऊन असे नीतीनियम आणि हळूहळू संस्कृती बनायला हवी की ज्यात भ्रष्टाचाराला कमीतकमी वाव असेल.>>> अचूक!

आता बघावाच लागणार, पर्यायच नाही! >>>>>>>>>>> +३
मा. प्रा. ना विनंती-- भारता बाहेरच्या प्रेक्षकांकरता हा चित्रपट बघायची काही सोय करता येऊ शकेल का ?

छान.

गांधीजींची १९२०ची असहकार चळवळ, १९३०ची दांडीयात्रा, १९४२चं 'चले जाव' आंदोलन ही आंदोलनं अपयशी ठरली, असं त्यावेळी वाटलं होतं. त्यानंतर ताबडतोब स्वातंत्र्य नाहीच मिळालं. पण तरीही या सगळ्याचाच परिणाम होऊन इंग्रजी सत्ता कमजोर झाली, भारतीय लोकांचं बळ वाढलं आणि स्वातंत्र्य मिळालं.

सुंदर आणि अचूक वर्णन.. 'त्या' दीर्घ आजाराच्यावेळी डॉक्टराना गांधीजींच्या विचारानीच प्रेरणा दिली. आता सारा देशच आजारी आहे. देशालाही अशीच प्रेरणा मिळो.

जागो 'मोहन' प्यारे!

>>आता एक आहे, की प्रत्येक माणसाला क्षणोक्षणी मोहाशी लढत लावण्यापेक्षा जर काही सामाजिक आणि राजकीय नीतीनियम बनवता आले किंवा संस्कृती बनवता आली, की तीच मुळी भ्रष्टाचारविरोधी आहे, तर समाजाचं जीवन अधिक सुखकर होईल. कारण पदोपदी माणसाला भ्रष्टाचाराचा मोह दाखवायचा आणि शंभर कोटी माणसांनी क्षणोक्षणी स्वतःला भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवायचं, हे फार कठीण. म्हणून मग राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये सुधारणा होऊन असे नीतीनियम आणि हळूहळू संस्कृती बनायला हवी की ज्यात भ्रष्टाचाराला कमीतकमी वाव असेल.>>
अभय जी,
अगदी मनापासून पटलं !
या सुधारणा होण्यासाठी संसदेच्या नियुक्त सभासदांमध्ये तुमच्यासारखे समाजाच्या सुखदु:खांशी समरस झालेले लोक पाहाण्याची आमची इच्छा! ती खासदारकीची कवच कुंडले व सुविधा तुमच्यासारख्यांना मिळण्याऐवजी नटनट्या, खेळाडूंना दिल्या जातात हे कधी बदलणार?

नट नट्या आणि खेळाडू सुद्धा आमच्यासारखेच आहेत... तुम्हाला कुणीच तुमच्यासारखे दिसत नाही, हा तुमचा दोष