कॅब चालवणारा 'ओबा'

Submitted by आशयगुणे on 4 May, 2012 - 13:50

२०११ सालच्या उन्हाळ्याची ( summer ) सुरुवात मी ऑस्टिन ह्या टेक्सास मधल्या शहरी जाऊन केली. निमित्त होतं एका संगीत मैफलीचं. ह्या मैफलीने माझे काही महिन्यांपासूनच लक्ष वेधून घेतले होते. जानेवारी महिन्यात मला ह्याबद्दल बातमी मिळाली होती आणि तेव्हाच 'काहीही झालं तरी आपण जायचंच' हे मी ठरवून टाकलं होतं. तारीख होती १ मे. तीन महिने होते माझ्याकडे. तिकीट आधी काढायचे आणि ह्या तीन महिन्यात तो खर्च वसूल करायचा असं ठरलं. पहिल्या रांगेत बसायचे तिकीट तब्बल शंभर डॉलर होतं. पण ही संधी मला सोडायची नव्हती. झालं तर मग....काढलं तिकीट. त्यानंतर 'cost cutting ' सुरु! स्वस्त दराचे खाद्य-पदार्थ घरी आण...माफक 'grocery ' मध्ये जेवण-खाण आटोपणे, महिन्यातील अनावश्यक खर्च कमी कर ही सुरुवात झाली. माझ्या सुदैवाने 'chase bank ' ने एक योजना ग्राहकांसमोर आणली होती. त्यांच्या बँकेत 'saving account ' उघडले की ते १०० डॉलर देणार होते. ( अट एवढीच की पुढील निदान ४ महिने ते खाते तुम्ही वापरले पाहिजे). माझ्या तिकीटाची सोय तर झाली! आता माझ्या शहरापासून ( san -antonio ) ते ऑस्टिन आणि परतीचा बस प्रवास आणि ऑस्टिन शहरात फिरायचा आणि खायचा-प्यायचा खर्च हा जमवायचा होता. त्यासाठी मी काम करत असलेल्या मॉटेल मध्ये ज्यादा तास ( extra hours ) करायचे ठरले. आणि शेवटी ती रक्कम एकदा बाजूला काढून ठेवण्यात आली. पण एवढा खटाटोप कशासाठी? उत्तर एकच - ती मैफल होती पं. शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसैन ह्यांची. त्या वर्षी त्यांच्या अमेरिका-दौरयातली टेक्सास मधील एकमेव मैफल! आणि ह्या कलाकार मंडळींसाठी २०० मैल दूर ऑस्टिन काय तर उत्तर ध्रुवावर देखील जायची माझी तयारी आहे. असो, ह्या जागेच्या मर्यादेची मला जाणीव आहे त्यामुळे ह्या कलाकारांचे गुणवर्णन करायचे मी टाळतो! Wink
पण ह्या दिवसाची अजून एक छान आठवण मनात आहे. ती म्हणजे मला भेटलेल्या एका वल्लीची. ती वल्ली म्हणजे ओबा( हे त्याचे नाव आहे )! हा माणूस ऑस्टिनला राहणारा एक कॅब-चालवणारा. ऑस्टिन बस-स्थानक ( greyhound bus station ) पासून मैफलीच्या हॉल पर्यंत मला सोडणारा हा कॅब-चालक. आणि त्या छोट्या प्रवासात स्वतःची संघर्षमय पण निश्चयी कहाणी सांगणारा ओबा
ऑस्टिनला दुपारी १ च्या दरम्यान पोचलो. बस स्थानक हे मुख्य शहराच्या जरा बाहेरच्या बाजूला असल्यामुळे जेवण-खाण करण्यासाठी शहरात जायचे ठरवले. जवळच एक 'yellow cab ' दिसली. त्यात एक अगदी बारीक व्यक्ती सिगारेट ओढत बसली होती. एका हातात पेपर आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन तो कुणाशी तरी जोर-जोरात बोलत होता. चेहऱ्यावर एक प्रकारची सुस्तता रविवार दुपार असल्याची साक्ष पटवून देत होती. मी त्याला sixth street ला घेऊन जायला सांगितलं. मला ( आणि ऑस्टिन बाहेरच्या साऱ्या जगाला) तिथली ही एकच जागा माहिती आहे. Wink आणि तिथल्या जवळच्या एका भारतीय हॉटेलात मला सोडायला सांगितले. आणि इथून आमचे संभाषण सुरु झाले.
" तुम्ही भारतीय आहात?" "हो", मी उत्तर दिले.
"मी बऱ्याच भारतीयांना ह्या हॉटेलात सोडले आहे. तुम्हाला पण आवडेल. माझे बरेच भारतीय मित्र आहेत. काही माझे मित्र आहेत....काही माझ्या मित्रांचे मित्र आहेत." त्याने मला एका हॉटेलबद्दल सांगितले. तो संभाषणास उत्सुक वाटला मला. मी तरी कशाला थांबतोय. सामान्य माणसाशी गप्पा मारायला, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला, त्यांची भाषा ऐकायला आपण नेहमीच उत्सुक!
" वा! ह्यातले बरेच ऑस्टिन विद्यापीठातले विद्यार्थी असतील. मग...कसा अनुभव आला तुला माझ्या देशातल्या लोकांचा? चांगला आला ना?" मी मजेत विचारले.
" हो सर...चांगलेच असतात ते. नेहमी समूहात फिरतात. एकत्र राहतात.( एका देशातले आम्ही....आमच्याच राज्यातील लोकांमध्ये एकत्र असतो हे त्याला बिचाऱ्याला कसं कळणार म्हणा... ) पण एक गोष्ट सांगतो......राग मानू नका....तुम्ही लोक आणि चाइनीज़....आम्हाला टीप मात्र देत नाही. आपल्याकडे टीपची संस्कृती नाही....पण इकडे तशी पद्धत आहे. टीप हे आमच्या उत्पन्नाचे एक मुख्य साधन आहे."
हा मला उद्देशून तर बोलत नव्हता? ऑस्टिनमध्ये एकटा कॅबने फिरणारा मुलगा .....ह्याच्याकडे तर भरपूर पैसे असतील...असं तर नाही वाटला त्याला? पण मी हे पैसे (डॉलर्स) किती कंजूसपणा करुन कमावले हे कुठे माहिती होते त्याला? माझ्या मनात हे विचार येऊ लागले. मी त्याच्याकडे बघून किंचित हसलो. अजून काय करू शकणार होतो मी?
कॅब जशी पुढे जात होती तशी 'Texan countryside ' ची झलक दिसत होती. आम्ही ऑस्टिनच्या बाहेरच होतो अजून. त्यामुळे शहराच्या बाहेर असलेली ती प्रचंड परंतु रिकामी आणि उदासीनता दर्शवणारी countryside होतीच. मधून मधून एखादे 'McDonalds ' आमंत्रण देत होते....एखादे IHOP होते. एखादे 'gas station होते. मॉटेल होती. आणि फुटा-फुटावर अनेक प्रकारच्या जाहिराती दर्शवणारे ते गगनचुंबी खांब. टेक्सासचीच खासियत असलेलं 'Whataburger ' सुद्धा होतं. मी माझे पाकीट उघडले आणि आपल्याकडे तेवढी 'cash ' नाही हे मला लक्षात आलं.
" मी तुला डेबिट कार्डने पे करू का?" मी त्याला विचारले.
" चालेल. पण मी तुम्हाला कॅशने पैसे द्यायला सांगीन. कारण कार्ड वापरले प्रत्येक 'swipe ' चे कार्ड कंपनी आमच्याकडून भाडे घेते. ह्या कंपन्या खूप लुटतात आम्हाला."
मला कुठेतरी त्याच्या बोलण्यात सच्चेपणा जाणवला. पण तेवढी कॅश नसल्यामुळे मला कार्ड वापरायला लागणार होते. ऑस्टिन शहर ( downtown ) आता हळू हळू आपले दर्शन देत होते. रस्ते रुंद झाले. रस्त्यावर 'exit boards ' दिसू लागले. मोठ-मोठ्या इमारती दिसणे सुरु झाले. आसपासच्या शेतीची जागा आता उंच इमारतींनी घेतली होती. आणि काही क्षणात आम्ही गाड्या, लोकं, इमारती, हॉटेलं, क्लब्स, बसेस अशा शहरी वातावरणात येऊन पोचलो.
"तुला पुढे कुठे जायचे आहे?" भारतीय हॉटेलच्या बाहेर कॅब उभी करताना ओबाने मला विचारले. मी एवढ्या लांबून ऑस्टिनला फक्त एका भारतीय हॉटेलात जेवायला नव्हतो आलो हे त्याच्या ध्यानात आलेच असणार. माझे जेवण झाल्यावर तिकडे देखील सोडायचा प्रस्ताव ओबाने माझ्यापुढे ठेवला. एकतर कार्यक्रमाला कधी एकदा पोचतो आहे असं झालं होतं. आणि एक तास आधी हॉलवर उपस्थित राहायला सांगितल्यामुळे मला 'कुठली बस पकडू' इथून तयारी करायची नव्हती. म्हणूनच ओबाचा पर्याय संयुक्तिक वाटला मला. मी त्याचा नंबर घेतला आणि तेव्हाच मला त्याचे नाव समजले.
त्यादिवशी रविवार असल्यामुळे त्या भारतीय हॉटेलात दर रविवार प्रमाणे १० डॉलर unlimited असा बुफे होता. जेवणात प्रचंड सोडा घालून आपल्याला तहान लागायला लावणारा तो बेत ...आणि १० डॉलरच्या हिशोबाने आपल्याला 'unlimited ' च्या नावाखाली खूप 'limited ' खायला लावणारा तो बेत! Wink हॉटेलची 'waitress ' ही तिथल्या विद्यापीठात शिकत असलेली आणि बाहेर स्वतःचा खर्च भागवण्यासाठी काम करणारी ( माझ्यासारखीच!) एक भारतीय विद्यार्थिनी होती हे मी तिच्या चेहऱ्यावरच्या भावांच्या 'अभावाने' ओळखले! आपण ज्याला पाणी वाढतोय तो मेला त्याच्या शहरी असाच कुणाला तरी वाढत असणार असा स्पष्ट भाव तिच्या चेहऱ्यावर होता. असो, जेवलो मात्र पोटभर आणि ओबला फोन लावला, ५ मिनटात ओबा आला.
" आपण वेगळ्या रस्त्याने जाऊ. नेहमीच्या रस्त्याने गेलो तर 'toll ' भरायला लागेल. आणि इकडे driver लाच टोल भरावा लागतो. कॅब-कंपनी आम्हाला त्याबद्दल काहीच सवलती देत नाही." ओबला मी त्याआधी 'Chase Bank च्या ATM जवळ थांबायला सांगितले. कॅश काढून घेतली. ओबाला ह्यावेळेस कॅश द्यायची होती आणि मला देखील थोडी पाकिटात जमा करायची होती. माझा हा उद्योग करुन झाल्यावर ओबाने कॅबचा 'meter ' सुरु केला. मला त्याच्या ह्या वागण्याचे आश्चर्य आणि कौतुक दोन्ही वाटले.
बाकी अमेरिकेत सुद्धा आपल्यासारखीच लोकं 'टोल'ने त्रासली आहेत ह्या गोष्टीचा एक आपुलकी दर्शवणारा आनंद मात्र मला झाला!
" हे टेक्सास मधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. इथे बरीच लोकं शिकायला येतात. इकडे एक चांगलं आहे. लोक सोमवार ते शुक्रवार अभ्यास करतात आणि शनिवार-रविवार इकडे 'sixth street ' वर दारू पितात आणि पार्टी करतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना इकडे शिकायला यायचं असतं", ओबा एका विद्यार्थ्याच्या उत्साहात हे सारे सांगत होता. " तू जातोस की नाही पार्टी करायला?" मी सहज विचारलं.
" कधी कधी जातो. पण आपल्याला फेमिली आहे ना. आपल्या लोकांना सांभाळायचं असतं ना. सारखी सारखी पार्टी करणं आपल्याला परवडत नाही", तो म्हणाला. त्याने पुढे गाईडगिरी सुरूच ठेवली. " ही मुख्य लायब्ररी आहे. प्रत्येक इमारतीत एक वेगळी लायब्ररी आहेच. पण ही त्या सर्वांची 'headquarter ' आहे. इथे साऱ्या प्रकारची पुस्तकं मिळतात." अमेरिकेतील लायब्ररीबद्दल मला कमालीच आदर आहे. अर्थात जेव्हा मी पहिले माझ्या विद्यापीठाच्या लायब्ररीत गेलो आणि तिथल्या ग्रंथपाल ( librarian ) बाईंना हसताना बघितले त्या क्षणापासून तो आदर उत्पन्न झाला आहे. कारण librarian आणि चक्क हसणं? पुढे पुस्तक मिळो वा ना मिळो...आपला आदर वाढायला एवढे कारण पुरेसे होते. Wink पुढे विद्यापीठाचीच एक बस कमी वेगाने जात असल्याने आम्ही त्याच्या मागोमाग तेवढ्याच कमी वेगाने जात होतो. आणि त्यामुळे तो प्रचंड 'campus ' मला नित बघता येत होता. ओबाने इतर इमारतींबद्दल माहिती सांगणं सुरूच ठेवलं. " इथे प्रवेश मिळवण्यासाठी खूप मोठा 'cut -off असतो", असं जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा मला माझ्या मर्यादेची जाणीव झाली आणि campus चे दर्शन घेणं एवढाच हेतू मी ठेवला. Wink
थोड्यावेळाने शहर मागे टाकले गेले आणि परत आम्ही highway वर आलो. ओबाने मला मी ऑस्टिनला का आलो आहे असं विचारलं. मी देखील कार्यक्रमाचे कारण सांगितले. त्याने लगेच कुठले कलाकार वगेरे विचारून घेतले. मी देखील त्याच्या ज्ञानात थोडासा भर घालायचा प्रयत्न केला आणि कलाकारंची थोडी माहिती त्याला दिली. " मी बऱ्याच भारतीय लोकांना कार्यक्रमच्या ठिकाणी सोडले आहे. तुमचा ह्या शहरात बराच सांस्कृतिक राबता आहे. आणि ह्या शहरात बरेच भारतीय देखील आहेत", तो म्हणाला.
"तू कुठून आला आहेस? इथलाच आहेस का?"
" नाही. मी आफ्रिका मधून आलो आहे. तुम्ही गिनी ह्या देशाचे नाव ऐकले आहे का?"
मी होकारार्थी उत्तर दिले. " मी जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी ह्या देशात आलो. शिकायसाठी आलो होतो. काही वर्ष Phoenix मध्ये काढली आणि त्यानंतर फिलाडेल्फियाला. त्यानंतर मी डेनवरला कामानिमित्त होतो...एका कंपनीत. पण ह्या मंदीमुळे कंपनी बंद पडली. मला नोकरीतून काढण्यात आले. तेव्हापासून कॅब चालवतो आहे."
इलेक्ट्रोनिक मीटर वरती मला माझे वाढणारे बिल अधून मधून दिसत होते. माझे बिल ४०-५० च्या घरात जाणार असा अंदाज मला आला. आणि मी एक सहज प्रश्न केला, " कॅब चालवून बऱ्यापैकी कमाई होत असेल ना तुझी?"
" नाही. आमचा कॅब कंपनीशी करार झालेला आहे. आम्हाला आठवड्याचे ५०० डॉलर त्यांना द्यायला लागतात. त्याच्यावर जी काही कमी असेल ती आमची. आता तूच विचार कर ....आपला महिन्याचा खर्च किती होतो. माझे २००० डॉलर कंपनीला द्यायचे म्हणून दर महिन्याला जातात. घराला आणि परिवाराला सांभाळणे खूप कठीण आहे."
" हा इकडच्या भांडवलशाहीचा परिणाम आहे का?" मी सहजच विचारले.
" हो. इकडे सामान्य जनता अजिबात भांडवलशाही 'prefer' करत नाही. तुला माहिती आहे....इकडे जेव्हा ओबामा राष्ट्रपतीपदाचा प्रचार करीत होता तेव्हा त्याच्या विरोधात असे पसरवले गेले की हा 'समाजवादी' आहे. पण जेव्हा असे पसरवले गेले तेव्हा लोकांचा त्याला मत द्यायचा 'ट्रेंड' वाढला. ह्यावरून बघ ना....लोकांना भांडवलशाही नको आहे." आश्चर्याची गोष्ट ही होती की प्रसिद्ध documenatary मकर मायकल मूर ने त्याच्या ' Capitalism - a love story ' ह्या documentary मध्ये हाच मुद्दा उपस्थित केला आहे. " हा देश बाहेरून आलेल्या लोकांचा आहे. इकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसे नसणाऱ्या लोकांकडून काम करुन घेतात आणि त्यांचे शोषण करतात. हा देश ह्याच साऱ्या तत्वांवर चालतो", तो पुढे म्हणाला. " ही सिस्टम कामगार लोकांसाठी एकदम बेकार आहे!"
"मग तू पुढे काय करणार आहेस?" हॉल जवळ येताच मी त्याला विचारले. " मला पुढे गिनी आणि अमेरिका मध्ये आयात- निर्यातीचा धंदा करायचा आहे. आता त्यासाठीच भांडवल जमवतो आहे. पण मी इकडे नाही राहणार. थंड-हवेच्या राज्यात जाईन. मला इथला उकाडा नाही आवडत. पण मी इथल्या लोकांसारखा नाही. मला माझ्या फेमिली बरोबर राहायचं आहे. आपण सारे असाच विचार करतो!" आम्ही आता हॉलच्या अगदी जवळ आलो होतो. गाडीतून उतरून हॉलच्या दिशेने चालत जाणारे झब्बा-लेंगा घातलेले पुरुष आणि रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या आणि चेहऱ्यावर रंग बरबटलेल्या स्त्रिया आता दिसू लागल्या होत्या. मनात पंडितजी कुठला राग वाजवतील अगर उस्ताद कुठला तुकडा वाजवेल हे विचार आता घर करू लागले होते. मी पाकिटातून पैसे काढत होतो तेव्हा ओबा माझ्यासाठी एक सल्ला घेऊन तयार होता.
" आज तुला तुझ्या देशातील बरेच लोक इथे दिसतील. त्यांच्याशी बोल. संकोच ठेवू नकोस मनात. ओळख वाढव. तुला उद्या नोकरी शोधताना ह्या सर्व ओळखींचा फायदा होईल.ह्या देशात सगळं ओळखीने चालतं. Enjoy the concert !" मी त्याला कॅश दिली ...आणि अर्थात टीप देखील. 'ह्याला नोकरी मिळाली....मला नाही' असं म्हणणारी लोकं आजू-बाजूला असताना स्वतःची नोकरी जाऊन देखील मला एक चांगला सल्ला देणारा ओबा मला त्याक्षणी खूप भावला. असे अनुभव आले की तुमचा दिवस फार छान जातो. एका वेगळ्या व्यक्तिमत्वाशी झालेल्या गप्पा मला आनंद देऊन तर गेल्याच पण ह्या देशात ( आणि ह्याचा अर्थ एकंदर जगातच ) कामगारांची परिस्थिती तशीच तर आहे, हा विचार मनाला छेद देऊन देखील गेला!
मला ओबा कामगार दिन ( १ मे) असल्याच्या दिवशी भेटला. ह्याला योगायोग समजू की साक्षात्कार?

- आशय गुणे Happy

माझे इतर लिखाण :
http://www.relatingtheunrelated.blogspot.in/
http://www.innercirclemates.com/

गुलमोहर: 

आशय मी बहुतेक तुमचे लेख वाचलेले आहेत. आजच ओबा हे व्याक्तीचीत्रण सुधा मस्त जमून आले आहे. खरच छान लिहिता.

हॉटेल आणि मॉटेल च्या कामाचा उल्लेख करून University मधल्या दिवसांची आठवण करून दिलीत.

धन्यवाद गामा पैलवान! मला साधीच व्यक्तिमत्व जास्त भावतात.....सामान्य माणूस हा जगाच्या पाठीवर एकच आहे...हे सूत्र मानून माणूस न्याहाळण्यात एक वेगळाच आनंद आहे! Happy

Back to top