चंदेरी धबधब्यांची माळ अर्थात Silver Falls State Park. अमेरिकेच्या उत्तर्-पश्चिम भागातील ऑरिगन राज्यात हे स्टेट पार्क आहे. पोर्टलँड या शहरापासून अंदाजे दीड तासाच्या अंतरात हे ठिकाण येते. निसर्गाने उदंड हस्ते लयलूट केलेली एक देखणी जागा. दहा सुंदर धबधब्यांचा नजारा आणि डोळ्यांना थंडावा देणारी हिरवीगार शाल. परवाच एप्रिलमधल्या शेवटच्या विकांताला २ दिवस तिथे कॅम्पिन्ग ला गेलो होतो. त्याचा हा प्रचि वृत्तांत. काही प्रचि मी तर काही नवर्याने काढली आहेत.
हे पार्क खूप जुने आहे. अंदाजे ९००० एकरात पसरले असून प्रचंड मोठी डग्लस फरची झाडे सर्वत्र दिसतात. यातील काही झाडे १०० पेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत.
प्रचि १
दहा धबधब्यांची ट्रेल हा येथील महत्त्वाचा पर्यटन भाग असला तरी कॅम्पिन्ग, एका दिवसाची सहल, उन्हाळ्यात लहान मुलांसाठी जुनिअर रेंजर कॅम्प, घोडेस्वारांचा कॅम्प, इ. अनेक गोष्टी करता येतात. पार्कच्या अगदी जवळ वस्ती फारशी नाही त्यामुळे मुक्कामाला जाताना अन्न, पाणी, अंथरूण-पांघरूण, औषधे, कॅम्पफायरचे सामान, हे सर्व नेहमीचे सामान नीट घेऊन जावे. आम्ही बर्यापैकी "राजेशाही" कॅम्पिन्ग करतो. राजेशाही अशासाठी की लहान मुलीसोबत मला तंबू ठोकून राहायला जरा भीतीच वाटते. ऑरिगन मधला बारामाही पडणारा पाऊस, काही सरपट्णारे प्राणी, आणि अन्नाच्या वासाने रात्री येणारी जनावरे यापासून संरक्षण म्हणून आम्ही लाकडी केबीन आरक्षित करून राहतो. हे हॉटेल सारखे अगदी आरामदायी नसते. पण विजेचा दिवा असतो. काही ठिकाणी केबीन मधेच लहान नहाणीघरची सोय असते. पण बहुतेक ठिकाणी चार लाकडी भिंती, लाकडी जमीन, आणि डोक्यावर छप्पर असते. नंबर १ आणि २ साठी, आंघोळीसाठी कॉमन सोय असते. पण ती बर्याच ठिकाणी आधुनिक असते. होल वावर इज अवर किंवा भारतातल्या लोटा परेड सारखी नाही.
प्रचि २
ही आमची केबीन.
शुक्रवारच्या रात्री मुक्कामाला गेलो. रात्री गेल्यावर केबीनमधे सामान नीट लावले. बाहेर जरासं भुरभुरत होतं म्हणून त्या रात्री कॅम्पफायरभोवती बसायचा मोह टाळला. पण दुसरे दिवशी सकाळी छान उजाडले होते. लगेच शेकोटी भोवती येउन बसलो.
प्रचि ३
मग तिथेच चहा, नाश्ट्याची तयारी सुरु केली.
प्रचि ४ (from cell)
वाफाळणारा टोस्ट आणि गरमागरम मसाला चहा.
प्रचि ५
चला पटकन घ्या.
प्रचि ६
आता आवरून भटकंती सुरु करुया. ही साऊथ फॉल्सच्या दिशेने जाणारी वाट.
प्रचि ७
हा आहे आमचा लाडका साऊथ फॉल्स (उंची १७७ फूट). याच्यामागून ट्रेल जाते. खूप निसरडी आणि बर्यापैकी धोकादायक वाटत असली तरी जाताना खूप मजा येते. लहान मुलांना घट्ट पकडावे लागते. आता माझी मुलगी ८ वर्षाची आहे पण हा ट्रेक आम्ही ती ३ वर्षांची असल्यापासुन करतो. तेव्हा जास्त काळजी घ्यावी लागे.
धबधब्यामागे गेलं की पाण्याचे तुषार अंगावर उडतात. मस्त फील असतो तो.
प्रचि ८
धबधब्याचे सौंदर्य न्याहाळताना नवरा आणि माझी लेक. फोटोत मागे जो पांढरट ठिपका दिसतोय ती माणसे आहेत.
प्रचि ९
हा तोच फॉल्स पण ट्रेल पार करून खाली गेल्यावर.
प्रचि १०
मग प्रवाहाच्या काठाकाठाने आपला प्रवास सुरु होतो पुढे जवळजवळ ८ मैल.
प्रचि ११
वाटेत अशी गच्च हिरवाई भेटते.
प्रचि १२
पुढे लोअर साऊथ फॉल्सला बरेच उतरावे लागते. तेव्हा या पायर्या आहेतच.
प्रचि १३
मग येतो लोअर साऊथ फॉल्स (उंची ९३ फूट)
प्रचि १४
या धबधब्याच्यापण मागे जाता येते. बघा येणार का?
प्रचि १५
कसं फसवलं!! हे प्रचि थोडं फसवं आलंय. ही आहे खरी वाट. पण तिथून जाताना पाण्याचा प्रचंड आवाज आणि अंगावर उडणारे थेंब (भिजवणार्या धारा म्हणायला पाहिजे) यामुळे भान हरपते. निसर्गाचं एक रौद्र पण लोभस रुप दिसते.
प्रचि १६
चला आणखी पुढे. आता थोडं अंतर चालून गेलात की ओळीने ३-४ धबधबे थोड्या थोड्या अंतरात दिसतील.
हा लोअर नॉर्थ फॉल्स - उंची - ३० फूट
प्रचि १७
हे आवळेजावळे - ट्विन फॉल्स - उंची - ३० फूट
प्रचि १८
हा आहे दुहेरी किंवा डबल फॉल्स - उजवीकडे एक छोटुसा धबधबा दिस्तोय का? या दोन्हीची मिळून उंची आहे १७८ फूट.
प्रचि १९
मग येतो हा मिडल नॉर्थ १०६ उंचीचा आणि रपारपा पडणारा. जवळचा माणूस काय बोलतोय हे पण समजत नाही.
प्रचि २०
प्रचि २१
मग काही अशा वाटा येतील.
प्रचि २२
काही ठिकाणी असं स्वच्छ, निर्मळ पाणी दिसेल.
प्रचि २३
आणि मग मुख्य ट्रेल पासून एक फाटा लांबवरच्या नॉर्थ फॉल्स कडे जाईल आणि एक फाटा फक्त हिवाळ्याच्या आसपास कोसळणार्या विंटर फॉल्स कडे जाईल. नॉर्थ फॉल्स कडे जाऊन आल्यावर परत याच वाटेने विंटर फॉल्स कडे जाउया.
हा नॉर्थ फॉल्स (उंची - १३६ फूट) ट्रेल याच्यामागून पण जाते. पण अगदी लागून नाही. छान रुंद अशी वाट आहे. पण वरून धो धो कोसळणार्याचा दरारा जाणवतो.
प्रचि २४
या फॉल्सपासुन १/३ मैलावर अप्पर नॉर्थ फॉल्स (६५ फूट उंच) आहे. तो प्रचि काढण्यासाठी अप्रतिम आहे.
प्रचि २५
मग परत वळून आधीच्या वाटेवर या. क्षणभर विश्रांती घेउया.
प्रचि २६
आता विंटर फॉल्स बघुया. उन्हाळ्यात हा पार आटून जातो.
प्रचि २७
धबधब्यांची उंची कंसात दिली आहे. धबधब्याची नावे अगदीच रुक्ष आहेत. कदाचित त्या त्या ठिकाणानुसार असल्याने लक्षात ठेवण्यास सोपे. पण मला तर वाटले की धबधब्याच्या रुपानुसार रौद्रप्रपात, धुवांधार, आनंदवर्षा अशी छान छान नावे देता आली असती.
येथील कॅम्पग्राउंड बर्यापैकी गजबजलेले असते. तरीही अगदी स्वच्छ आणि निसर्गाला पूर्णपणे जपणारी व्यवस्था आहे.
प्रचि २८
परतीच्या वाटेवर लांबून म्हणजे पार स्टेटरोड्वरून रुबाबदार दर्शन देणारा हा नॉर्थ फॉल्स. कामाचा शिणवटा घालवून नवा उत्साह देणारा हा विकांत हवाहवासा वाटत होता.
प्रचि २९
-----------------------------------------------------------------------------
टीपः आतापर्यन्त मायबोलीवर प्रतिसाद देण्याइतपतच लेखन केले आहे. तरी काही चुका असतील तर अवश्य कळवाव्या.
मोजक पण चांगले केलं वर्णन आणि
मोजक पण चांगले केलं वर्णन आणि नवीन ठिकाण म्हणून खूपच छान!
अतिशय सुंदर.... खुप आवडले...
अतिशय सुंदर....
खुप आवडले...
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार. विकेंडला सवडीने मोठे फोटो पिकासावर टाकून इथे लिंक देइन. आणि पुढच्यावेळी पण त्याच पध्दतीने मोठी प्रचि देत जाईन.
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत.
खुप छान.......तुमचे तिघांचे
खुप छान.......तुमचे तिघांचे समोरुन फोटो अजुन आवडले असते. असतिल तर पाटवा प्लिज.
धनश्री, खुपच सुंदर .... फोटो
धनश्री, खुपच सुंदर .... फोटो आणि वर्णन पण छान दिले आहेस...:)
मस्त आहेत फॉल्स. तुम्ही
मस्त आहेत फॉल्स. तुम्ही दिलेली नावं आवडली
धनश्री, फोटो आणि लिखाण दोन्ही
धनश्री, फोटो आणि लिखाण दोन्ही मस्त !
खूप मस्त ठीकाण आहे
खूप मस्त ठीकाण आहे हे......फोटोही फार मस्त!
खुपच सुंदर , होल वावर , लोटा
खुपच सुंदर ,
होल वावर , लोटा परेड कितीतरी वर्षांनी हे शब्द ऐकले / वाचले
खरचं वर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मोठे फोटो दिले तर बघायला अजुन मजा येईल.
छान छान
छान छान
हे इतकं सुरेख लिखाण आणि फोटो
हे इतकं सुरेख लिखाण आणि फोटो माझ्याकडून कसे काय मिस झाले माहित नाही.
मस्तच एकदम
फारच आवडलं हे
छान !!
छान !!
खूपच सुंदर फोटो आणि वर्णन.
खूपच सुंदर फोटो आणि वर्णन. झकास.
मंडळी, मोठी प्रचि टाकण्यासाठी
मंडळी, मोठी प्रचि टाकण्यासाठी आज वेळ झाला.
सर्वांचे आभार.
धनश्री , सुरेख !!
धनश्री , सुरेख !!
मस्त
मस्त
मस्तच...
मस्तच...
धनश्री, मस्तच लिखाण आणि सुंदर
धनश्री, मस्तच लिखाण आणि सुंदर फोटो.
एकदा ट्रिप ठरवावी वाटते आहे, आता पुढच्या समर मध्ये ठरवता येईल.
छान आहेत फोटो व वर्णन.
छान आहेत फोटो व वर्णन. धनश्री, तुम्ही ८ मैल चाललात का हे सर्व पहाताना?
धनश्री, मस्त आलेत फोटो. आम्ही
धनश्री, मस्त आलेत फोटो. आम्ही पण कॅम्पींगला जातो..तुझी शेगडी आवडली. कुठे घेतलीस? माझ्याकडे एकच बर्नरची आहे. दुसरी कोळशाची भारतातुन आणलेली आहे. त्यावर जेवण बनवते.
मस्त लिखाण धने. आणि अप्रतिम
मस्त लिखाण धने. आणि अप्रतिम प्रचि. डोळे निवले अगदी.
मी कसे काय मिसले होते कोणास ठावुक?
मस्त फोटो आणि वर्णन हे इतकं
मस्त फोटो आणि वर्णन

हे इतकं सुरेख लिखाण आणि फोटो माझ्याकडून कसे काय मिस झाले माहित नाही.>>>>>>>>हो ना. मी पण आजच बघतेय.
सुंदरच धबधबे आहेत. एवढे
सुंदरच धबधबे आहेत. एवढे सुंदर धबधबे असून देखील विशेष म्हणजे हौशी पर्यटकांची गर्दी कुठेही दिसत नाही. छानच आहे.
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
सर्वांचे पुनश्च आभार.
सर्वांचे पुनश्च आभार.
@सुनिधी - >>धनश्री, तुम्ही ८ मैल चाललात का हे सर्व पहाताना? >> आहो-जाहो नको ग.
आणि हो संपूर्ण ट्रेक चालत करतो आम्ही. माझी लेक अगदी लहान असताना तिला खांद्यावर घेऊन केलाय हा ट्रेक. मग ती जशी मोठी होत होती तसे तिच्या कलाकलाने घेत ५-६ तास फिरत, खात-पित केला. आता अलीकडे ३-३.५ तासात आम्ही तिघे पूर्ण करू शकतो.
तसही कारने फक्त ३ धबधबे करता येतात मेन हायवे पासून. बाकीचे सगळे जंगलाच्या आतल्या भागात आहेत.
@विद्याक - ही शेगडी मी अॅमेझॉन वर घेतली. डायरेक्ट फायर पिटवर पण स्वयंपाक केला आहे. फिश-भाज्या इ. अॅल्युमिनमच्या ट्रे मधे ग्रील करू शकतो. काही प्राथमिक तयारी घरी करून न्यायची - मुगाच्या खिचडीची फोडणी + डाळ-तांदूळ परतून, उप्पीटची तयारी मग पाणी उकळून १० मि त गरम जेवण तयार.
@मुग्धानंद - धन्स गं सखे. काय म्हणते?
अरे मी प्रतिसाद नाही दिलाय
अरे मी प्रतिसाद नाही दिलाय इथे?!
फोटो मस्तच आहेत!! किती छान वाटत असेल तिथे..
वॉव्,मस्तच गं धनश्री!!!!
वॉव्,मस्तच गं धनश्री!!!!
धन्स धनश्री. मी पण फायर पिटवर
धन्स धनश्री. मी पण फायर पिटवर जेवण केले आहे, अगदी आमच्या सुरुवातीच्या पहिल्या २-३ कॅम्पिंगला.
मग एकदा भारतवारीमधे तिथुन एक शेगडी आणली. एकदम छान आहे ती शेगडी. त्यावर केलेले चिकन तर इतके मस्त होते कि विचारु नकोस. पण सकाळच्या ब्रेकफास्ट साठी तुझी शेगडी छानच आहे. मुगाचीखिचडी,उप्पीटाची आयडीयाही मस्त आहे. मी घरुन निघताना चिकन मेरीनेट करुन नेते. आले+लसुण याचे जास्तीचे वाटण नेते. जर फिश मिळाला तर तो ग्रील करते.
Pages