खरंतर इथे मला मराठी, महाराष्ट्रातील अ मराठी लोकांच स्थलांतर आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारतातील भाषिक विविधता आणि प्रांतवाद ह्याचा विचार करायचा आहे. दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेच्या माध्यमातून ह्या विषयी आंदोलन केलं आणि बरच रणकंदन माजल होत. हा धुरळा आता खाली बसला आहे. विषय तसा मागे पडला असला तरी विचार करायला आपल्या मनात बरेच प्रश्न ठेवून गेला आहे.
ह्या प्रश्नाला अनेक बाजू आहेत. सर्व प्रथम हे मान्य करायला हव कि हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्या माहितीतील अनेक लोकांच आणि बऱ्याच (विशेषतः इंग्रजी) माध्यमांच तर ठाम मत आहे कि इथे मुळात कांही प्रश्नच नाही आणि हे शुद्ध राजकीय हेतूंनी प्रेरित कांड आहे. आपल्या देशातील माध्यमांवर (त्यातल्यात्यात इलेक्ट्रॉनिक) खर तर स्वतंत्रपणे लिहायला हव. कदाचित राज ठाकरेंचा हेतू फक्त राजकीय असू शकतो....किंवा तस नसेलही. पण ह्या विषयाचा अराजकीय दृष्टीने धांडोळा घेतला पाहिजे. राजकारणी लोकं ह्या विषयावर खोलात जाऊन विचार मांडत नाहीत हे एक वेळ समजू शकत पण ह्या विषयाबद्दल आपल्या सर्वसामान्य लोकांच काय मत आहे? का आपण हो-नाही-कदाचित ह्या त्रिकोणात अडकलोय? सामाजिक विज्ञानाच्या अभ्यासकांच काय मत आहे? सामाजकारणाने खरंतर राजकारणाची दिशा ठरवायला हवी पण बहुतेक उलट होतंय. संविधानात नागरिकांना स्थलांतर करण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे ह्या एका वाक्यात संपूर्ण विषयावर बोळा फिरवणे योग्य होणार नाही.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अमराठी लोकं स्थलांतर करतात. त्याची कारण अनेक आहेत - आपलं राज्य देशातील एक आघाडीचं राज्य आहे, इथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण, शहरीकरण झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे, कायदा सुव्यवस्था तुलनेने चांगली आहे. किमान स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या ४/५ दशका पर्यंत तरी नक्कीच हि परिस्थिती होती. मागच्या कांही वर्षात हे चित्र झपाट्याने बदलतंय. हे स्थलांतर मुंबईत सर्वाधिक होतं पण इतर शहरात पण हि संख्या लक्षणीय आहे उदा. पुणे, नागपूर, औरंगाबाद व जवळपास सर्व महत्वाची जिल्ह्याची शहरं. देशात काय इतरत्र अस स्थलांतर होत नाही का? होतं. पण वेगळी भाषा, संस्कृती, इतिहास असणाऱ्या लोकांच सर्वात ज्यास्त स्थलांतर महाराष्ट्रात होत. मध्य प्रदेशातून बिहार किंवा उत्तरप्रदेश, दिल्लीत स्थलांतर करणे आणि दिल्लीतून चेन्नईत स्थलांतर करणे वेगळं. राज्या-राज्यांमधली विविधता कमी अधिक प्रमाणात आहे. त्या अर्थानं अधिक विविधता असणारं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होत. मित्रांमध्ये चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते की अमराठी लोकांना महाराष्ट्रात यायला, राहायला आणि जमलं तर स्थायिक व्हायला आवडत. माझे मित्र कामानिमित्त चेन्नई कोचीला गेले तरी त्यांची पहिली पसंती मुंबई पुण्यालाच असते. ह्याचं अजून एक कारण म्हणजे असं स्थलांतर करणं सोप्प आणि सोयीच आहे.
म्हणून काय झालं, अस स्थलांतर रोखता येत नाही ... तस करण बेकायदेशीर होईल ... आपण सर्व भारताचे नागरिक आहोत .... हा काही प्रश्न होऊ शकत नाही. माझ्या अनेक मित्राचं मत. ते बरोबर आहेत. प्रश्न हे स्थलांतर नाही तर त्या नंतरचा आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित झालेली हि लोकं महाराष्ट्राच्या मूळ प्रवाहात इतक्या वर्षानंतर सुद्धा मिसळली नाहीत हे खर दुखण आहे. स्थलांतरितांचे वेगळे भाषिक, सांस्कृतिक गट महाराष्ट्रात आहेत, ते इथे रुजलेत, "भैया हात पाय पसरीच्या" चालीवर वाढीला लागलेत व त्याने महाराष्ट्रातच मराठी संस्कृती दुय्यम व हळू हळू अल्पसंख्यांक होत आहे. बऱ्याच मराठी लोकांच्या मनात हे खदखदत आहे. ह्यावर विचार व्हायला हवा. स्थलांतरितांनी मूळ संस्कृतीत मिसळायला हवं - हा संघर्ष कमी करण्यावर नामी उपाय आहे. परराज्यातून आलेल्या रेल्वे गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकाला फलाटावरच अस्खलित मराठी यायला पाहिजे अस मी म्हणणार नाही. स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीत हे कदाचित शक्य होणार नाही पण दुसरी पिढी मिश्र वळणाची आणि तिसरी व त्यानंतरच्या सर्व पिढ्या पूर्णपणे मराठी संस्कृतीला आपलं मानणाऱ्या बनणे आवश्यक आहे. इतक्या कि शिवाजी महाराज म्हणाल्या बरोबर आपसूक जय त्यांच्या मुखातून निघेल, ते घरी बाहेर मराठी बोलतील आणि स्वतःला गर्वाने मराठी सांगतील. दुर्दैवाने अस कांही घडल नाही हे खर. गुप्ते आणि गुप्ता हा फक्त अडनावांचा फरक असता तर तो सुदिन.
आता काही लोक चार दोन अपवाद दाखवतील व दिशाभूल करायचा प्रयत्न करतील. आज काल थोड कोणी काही बोलल किंवा काही चर्चा केली कि हि अपवादाची मात्रा देऊन बुद्धिभेद (विचकाच खरतर) करणारे आणि आपण पण कसे (अर्ध्या हळकुंडाने) पिवळे आहोत हे दाखवणारे इथे तिथे दिसतात. उगाच क ला अ ने भागायचं आणि ज्ञ बाकी सोयीस्कर दुर्लक्षायची. हि प्रवृत्ती अशीच राहिली तर उद्या, आज जातोय तितकाही भाग अ ने क ला जाणार नाही. असो.
महाराष्ट्रातल्या स्थलांतरितांनी मराठीला आपलं न बनवण्यामागे अनेक कारण आहेत. ह्यातलं पहिल सर्वात महत्वाच कारण म्हणजे अस काही करण आवश्यक आहे अस त्यांना वाटतच नाही. मी भारतीय आहे आणि महाराष्ट्र पण भारतातच आहे तेंव्हा मी माझ्या भाषिक, सांस्कृतिक ओळखीने राहीन व त्यात काही वावग आहे अस त्यांना वाटत नाही. नाही म्हणायला कृपाशंकर सिंह म्हणतात कि मराठीवर संकट आलं तर रक्त सांडणारे पहिले आम्हीच असू. अर्थात ते किती खोटं आहे हे मी वेगळं सांगायला नको. महात्मा फुले माहित नसलेले अबू आजमी महाराष्ट्राचे आमदार आहेत (मटा मध्ये बातमी वाचली होती), राजीव शुक्ला महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार आहेत (महाराष्ट्राच्या किती प्रश्नांबद्दल त्यांना जिव्हाळा आहे आणि त्यावर त्यांनी राज्यसभेत आवाज उठवला देव जाणे) कित्तेकांना संत ज्ञानेश्वर, तुकाराम माहित नाहीत, शिवाजी महाराज लुटमार करणारे होते अस काहींना वाटत, मराठी भावगीत आणि लोकगीत त्यांना परके आहेत, अभिमान वाटावा अश्या गोष्टींबद्दल त्यांना अभिमान नाही आणि चिंता वाटावी अश्या गोष्टींबद्दल त्यांना चिंता नाही. माझे कित्तेक मित्र परदेशस्थ ग्राहकांसमोर "विविधतेत एकता" गात असतात पण खरंतर त्यांना हि विविधता नकोशी असते आणि सगळं अमेरिकेसारख असत तर कित्ती बर झालं असत अस त्यांना वाटत. महाराष्ट्रातील अनेक गावात मराठी लोकांना गुजराती समाजाने एकजुटीने बाजारातून हद्दपार केले, गुजराती डॉक्टरांनी मराठी डॉक्टरांबद्दल अफवा पसरवल्या, अनेक उद्योगातून अमराठी लोक बढती व भरतीच्या वेळेस त्यांच्याच राज्यांच्या लोकांना पसंती देतात, एकत्र राहून एन केन प्रकारेण आपल्या लोकांच्या प्रभावात वाढ करत राहतात.
अस सगळ हे लोक सुखनैव इतकी वर्ष करू शकतायात म्हणून मराठीला आपलं मानण तर दूर उलट त्याबद्दल त्यांना काही साधा आदर सुद्धा राहिला नाही. मराठी खाद्यपदार्थ, शब्द, गाणी आणि शेवटी लोक - आधी माहिती नाही म्हणायचं मग माहिती असायला पाहिजे अस काही नाही अस म्हणायच मग माहिती असण्याच्या लायकीची नाहीत अस म्हणायच आणि शेवटी चक्क टिंगल करून हिणवायचं. राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर ह्या क्रमात चढत्या दिशेने वाढ झाली आहे अस मला तरी दिसतंय. जर मराठी शिवाय माझ काही अडत नसेल तर मग ती दुय्यमच झाली ना. वरच्या दिलेल्या क्रमात जशी वाढ होत गेली तशी मराठी भाषा, इतिहास, संस्कृती दुय्यम आणि डाउन मार्केट ठरली.
अजून दोन उदाहरणांचा उहापोह करणं मला आवश्यक वाटत - १) कौशल इनामदारांना मुंबईमध्ये सूटच्या दुकानात घाटी म्हणून हिणवल गेल होत. त्यानंतर त्यांनी मराठी अभिमान गीताची निर्मिती केली. ह्या उपक्रमात भाग घेतलेल्यांना हे ठाऊक असेल. २) बऱ्याच वर्षांपूर्वी विनय आपटेंनी शिवाजी महाराजांवर आधारित मालिका बनवली होती पण त्यांना शिवाजी बिकता नही म्हणून सांगितलं गेल होत. खुपते तिथे गुप्ते मध्ये त्यांनीच हि गोष्ट सांगितली होती. रीमा लागुनी सुद्धा हिंदीत मराठी म्हणून काम करताना प्रयास पडले अस सांगितलं होत. कदाचित मराठी बद्दल इतर प्रांतातल्या लोकांना आकस असेल व ते पण एक कारण असू शकेल पण त्यात मी अधिक खोलात जाऊ इच्छित नाही, ते विषयांतर होईल आणि वस्तुनिष्ठ पण असणार नाही.
काही लोक म्हणतील कि अहो त्यात काय? .... आपण थोड दुसऱ्यांच घ्यावं .... त्यांनी थोड आपलं घ्यावं ... संस्कृती अभिसरणातून ती अधिक उत्तम होत जाईल. साखरेचा पाक लावलेलं हे वाक्य बुद्धिभेद करायचं अजून एक नामी शस्त्र आहे. देवाण घेवाण उत्तम पण नक्की असं घडतंय? अस्सल मराठी ताटात एखादी दाल बाटी किंवा पनीर कढाई वगैरे समाविष्ट झालं तर चांगलच आहे पण ताटात कोल्हापुरी ठेचा सोडून सगळं काही बाहेरचं असेल तर ते ताट मराठी राहील का? (उगाच नाही मराठी खानावळ शोधावी लागत.) हे फक्त एक उदाहरण होत शब्दशः अर्थ घेवू नये. देवाण घेवाण ठीक पण शेवटी ती मराठी भाषा आणि संस्कृतीच राहिली पाहिजे. तस नाही झालं तर मग तेच - विविधता नष्ट सगळं एकसारख.
हा लेख वाचणाऱ्यांना अस वाटेल कि मला काही वाईट अनुभव आलेत आणि संतापून मी हा लेख लिहितो आहे. मी खरच सांगतो कि अस काही नाही. मी शक्यतो ह्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहतो. आपल्यातीलच काही लोकांना वाटते की परप्रांतीयांनी मराठीला डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही, थोडा आदर देणे पुरेसे आहे. मला व्यक्तीशः अस वाटत कि जर आपण मराठीला त्यांनी आपलस कराव अस म्हणालो तर किमान आदर तरी मिळेल. हे सगळ बाजूला जरी ठेवल तरी - आपल्या देशातील हि विविधता जपली जावी, भाषिक-सांस्कृतिक संघर्ष कमी व्हावा व स्थलांतरितांमुळेचे प्रश्न कमी व्हावे ह्या साठी त्यांनी स्थानिक संस्कृतीत मिसळणे अनिवार्य आहे.
असं सगळ घडायला अजून एक कारण म्हणजे आपण सर्व मराठी बंधू भगिनींनी ह्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. आपल्याच लोकांना कसा मराठी भाषेचा अभिमान नाही अस म्हणून हा मुद्दा इथे संपत नाही. थोड खोलात जाव लागेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांचे बलिदान देऊन आपण मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करून घेतली पण मला अस वाटत कि आपण खरतर तो लढा हारलो. लौकीकाप्रमाणे युद्धात जिंकून सुद्धा तहात हरल्या सारखे. मुंबई मिळाली तरी राष्ट्र का राज्य हा पेच / हि शंका / हा घोळ आपल्या समाजात टिकून राहिला. राज्याच्या बाजूने बोलल तर राष्ट्राद्रोहाची टोच मनाला लागते आणि राष्ट्राच्या बाजूने बोलल तर भाषा संस्कृतीला दुय्यम मानावं लागत ह्या विवंचनेत आपण अजूनही आहोत. मुंबई लढ्याच्या निमित्ताने ह्या विषयावर खोल मंथन होऊन काही एक कायम स्वरूपी तोडगा विचार किमान मराठी समाजाने तरी अवलंबायला पाहिजे होता. बरेच जण दोन टोकाच्या मध्ये तर काही लोक एखाद्या टोकावर आहेत. त्यावेळेस ह्या विषयाचा अजून तड लावला तर देशात आणखी फाळण्या होतील ह्या भीतीने ते सोडून दिल असावं. स्वातंत्र्याच्या वेळेस आणि नंतर आपण बऱ्याच गोष्टी भीतीतून केल्या ज्याचा आपल्या देशावर चुकीचा परिणाम झाला अस मला व्यक्तीशः वाटत.
परप्रांतातून आलेल्या लोकांनी इथली भाषा संस्कृती आपलीसी करावी ह्यासाठी आपण आग्रह धरला नाही व काही प्रयत्न सुद्धा केले नाहीत. सुरुवातीला कुतूहल म्हणून, नंतर आपल्याच देशातले आहेत म्हणून, त्यानंतर आगत्य म्हणून किंवा मी कसा राष्ट्र प्रेमी आहे हे दाखवायला म्हणून आणि हिंदी राष्ट्र भाषा आहे ह्या चुकीच्या समजुतीतून आपण हिंदी बोलत राहिलो. आपल्याला वाटल असेल जस मी हिंदी बोलतो तस तो हळू हळू मराठी शिकेल पण आत्ता आपल्या लक्षात येतंय कि तस काही झालं नाही. आत्ता तर ते म्हणतात कि तुम्हालाच हिंदी येते तर मग आम्हीं का मराठी शिका.
काही लोक म्हणतील कि लिपी देवनागरी असल्यामुळे हिंदी शिकणं सोप आहे व त्यामुळे आपण मराठीचा आग्रह धरू शकत नाही. जे कि दक्षिण भारतीयांच्या बाबतीत होत. (आपल्या लोकांची हिंदी पण एक स्वतंत्र विषय आहे म्हणा). पण मग सारख्या लिपीचा फायदा आपल्याला हिंदी शिकायला होतो तर मग तो त्यांना मराठी शिकताना पण व्हायला पाहिजे. उत्तर भारतीयांना तर हे गंगा उलटी वाहण्याचा प्रकार वाटेल. काहींना वाटत हिंदी मुळे आपल्या युवकांच्या नौकरीच प्रमाण वाढत. मला तरी तस दिसत नाही. उलट हिंदीला विरोध करणारे दक्षिण भारतीयच मला जिकडे तिकडे दिसतात. अगदी केंद्र सरकारी नौकऱ्यामध्ये पण. खरंतर साखरेचा पाक लावलेल्या ह्या सांस्कृतिक देवाण घेवाणीत आपला आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे हेच खर.
परप्रांतीयांनी आपल्या संस्कृतीत मिसळण्यासाठी भाषा हा अत्यावश्यक आणि प्रभावी उपाय आहे. पण तो पुरेसा नाही. कानावर सतत मराठी भाषा पडणे, मराठी सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होणे, मराठी शाळेतून मराठी इतिहास शिकणे, मराठी मित्र मंडळीत वावरणे अश्या अनेकविध मार्गांनी हे कराव लागेल. (अमेरिकेत गेलेले मराठी शेवटी कसे अमेरिकन होऊन जातात ते डोळ्यासमोर आणावे.) सध्या महाराष्ट्रातच नवीन मराठी शाळांना परवानगी नाही तेंव्हा परप्रांतीयांना काय सांगणार?
भाषेच्या अनुषंगाने इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो कि हिंदी आता जवळ जवळ महाराष्ट्राची सार्वजनिक भाषा झाली आहे. टॅक्सी चालक, ऑटो चालक, चणे फुटाणे विकणारा, सुरक्षा रक्षक, बरेच दुकानदार, ग्राहक आणि एकूणच परप्रांतीय एवढे वाढले आहेत कि आपण माहित नसलेली व्यक्ती हिंदीच आहे अस समजून सरळ हिंदीत सुरु करतो. म्हणजे परप्रांतीयांच्या कानावर मराठी पडणे तर दूर त्यांना मुळी सुद्धा मराठी ऐकण्याचा त्रास होऊ नये याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे. हे इतक्या धोकादायक पातळीवर आहे कि आत्ता तर थोड सुद्धा टापटीप दिसणाऱ्या बरोबर लोक सरळ हिंदीत सुरु करतात. मग समोरचा हिंदी असेल अस समजून आपण पण हिंदीत सुरु करतो. ह्याने दोन मराठी लोक महाराष्ट्रातच हिंदीत बोलत राहतात. माझ्या बाबतीत अस घडलंय. आता मी आधी सरळ मराठीतून उत्तर देतो. ह्यामूळे अजून एक होत ज्या परप्रांतीयाने मराठी शिकली असेल तो पण मराठीचा नाद सोडून देतो. मराठी चित्रपट मालिकांमध्ये पहा - त्रयस्त व्यक्ती सरळ अमराठी दाखवली जाते. मुंबई पुणे मुंबई चित्रपटात सिंहगडावरचा प्रसंग आठवा - जेंव्हा ती म्हणते कि मी कोणाशीही भांडू शकते तेंव्हा ती बाजूने जाण्याऱ्या माणसाशी हिंदीत भांडायला सुरु करते. हिंदीत का? म्हणजे त्रयस्त व्यक्ती हिंदी आहे हे गृहीत धरण्य इतपत परिस्थिती झाली आहे. दगडू शेठ गणपती मंदिराच्या बाजूला फळांचा रस विकणारा माणूस माझ्याशी असाच हिंदीत सुरु झाला. त्याला चांगला समजावला होता मी.
परप्रांतीय मराठी संस्कृतीत मिसळत नाहीत ह्याच अजून एक कारण म्हणजे मराठीची हि स्पर्धा फक्त हिंदीशी नाही तर इंग्रजीशी पण आहे. आर्थिक उदारीकरणा नंतर मराठी आणि अमराठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने अवलंबिली. माहिती तंत्रज्ञान, डॉट कॉम आणि बी पी ओ च्या ढग फुटी नंतर इंग्रजी बोलणाऱ्यांचे नाक्या नाक्या वर पेव फुटले. ह्याच्यातून असा समाज निर्माण झाला कि इंग्रजी शिवाय नौकरी नाही, यश नाही, काही खर नाही. इंग्रजी येईल ते शहाणे, हुशार, यशस्वी आणि न येणारे मागास. हे धृवी करणच भारत विरुद्ध इंडिया ला कारणीभूत आहे अस मला वाटत. ह्या सो कॉल्ड हाय फाय लोकांना कुठलीच भारतीय संस्कृती भाषा इतिहास आता उपयोगाच्या नाहीत व सरळ केराच्या टोपलीत टाकल्या पाहिजेत अस वाटत. अमेरिकेत कायमच स्थायिक झालेल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने मराठी संस्कृती सोडून स्थानिक संस्कृती, भाषा अनुसरली तर ते योग्य आहे पण इथे तर महाराष्ट्रातच अमेरिका वसू पहात आहे.
विवेकानंद म्हणाले होते तुम्ही आपला धर्म विसराल तर मिटून जाल. विवेकानंदांना धर्म म्हणजे कर्मकांड अभिप्रेत नसेल. मी तरी ह्याचा अर्थ असाच घेतो कि आपण जर आपली भाषा इतिहास ओळख संस्कृती विसरलो तर आपण कधीच पुढे पडू शकणार नाही. मी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता आहे. सांस्कृतिक राष्ट्रावादाशिवाय जगात विकसित झालेला एक तरी देश आहे का? मुळात राष्ट्र म्हणजे फक्त लोकांचा समूह नव्हे - संस्कृती तर डीएनए आहे राष्ट्राची. उद्या आपली संस्कृती टाकून आपण विकसित झालो तर ते काय कामाच - विकसित झाला असेल फक्त एक लोकांचा समूह - राष्ट्र आणि समाज तर नष्ट झाला असेल. गांधीजी म्हणाले होते खेड्यांकडे चला - प्रत्यक्षात खेड्याकडे नाही तर किमान आपल्या मुळांकडे चला असा अर्थ घेऊ. इथे तर आम्ही ती उखडून टाकत आहोत. बहुसंख्य लोकांची जी भाषा आहे तीच जर नष्ट झाली तर त्यांचा विकास कसा होणार.
ह्या लोकांना काय वाटत कि आपल्या देशातले सगळे इंग्रजी बोलायला लागले कि सर्व प्रश्न सुटतील? आफ्रिकेतल्या कित्तेक देशात सर्व लोक इंग्रजी बोलतात मग काय ते विकसित आहेत? आणि हे मुळातच अव्यवहार्य आहे. सर्वांना इंग्रजी शिकवण्या पेक्षा इंग्रजीतल ज्ञान आपल्या भाषेत आणल्यामुळे हे प्रश्न सुटतील. उच्च शिक्षित लोकांच्या सुरुवातीच्या पिढीतील लोकांनी हे करायला पाहिजे होत पण त्या पेक्षा आपण कसे इतरांपेक्षा वेगळे आणि आधुनिक आहोत ह्याच विचारात हे लोक मश्गुल राहिले.
का बर मी महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मराठीतून करू शकत? महाराष्ट्रात सर्व प्रकारच माध्यमिक, उच्च शिक्षण, संशोधन मराठीतून व्हायला पाहिजे. तसं झाल तर ते अधिक लोकांपर्यंत पोहंचेल , आपल्या समाजाला पाहिजे अस तंत्रज्ञान त्यातून निघेल, संशोधन वाढेल आणि नुसत परदेशातील ग्राहकांना सेवा देण्याबरोबर अधिक भरीव अस योगदान आपण देऊ शकू. वर उल्लेखलेली सांस्कृतिक देवाण घेवाण आतबट्ट्याची होणार नाही. सरकार म्हणतं विकास झालाय पण तो तळा गाळापर्यंत पोहंचला नाही. त्यासाठी बहुजन समाजाची भाषा वापरायला पाहिजे. इथे तर पहिली पासून इंग्रजी सुरु आहे. आपण तर अशी व्यवस्था करून ठेवली आहे कि बारावी नंतरच सर्व प्रकारच (कला मराठी सोडून) शिक्षण इंग्रजीत आहे. म्हणजे इंग्रजीशिवाय तुम्ही जगू शकणार नाही अशी व्यवस्था आहे. जपान मध्ये इंग्रजी नाही येत म्हणून कोणाच बिघडलय का? किंवा फ्रांसमध्ये, कोरिया, जर्मनी, रशिया. मग माझ्या महाराष्ट्रात मराठी येत पण इंग्रजी येत नाही म्हणून का बिघडाव? सुशिक्षित बरेच पालक आपल्या पाल्याला आज काल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. म्हणजे तो पाल्य शाळेत इंग्रजी शिकणार, मित्रांशी इंग्रजीत बोलणार, घरी आईला बाबांशी इंग्रजीत बोलणार, आज्जी आजोबांकडून कौतुक होणार - मग तो मोठा झाल्यावर आपल्या पाल्याला पण इंग्रजी शाळेत घालणार मग एक पिढी तयार होणार जी संपूर्णपणे इंग्रजीवर वाढलेली असेल. मग मराठी मरेल नाही तर काय? आपला पाल्य स्पर्धेच्या युगात मागे राहील ह्या भीतीने पालक अस करतात. अस सतत भीतीने गोष्टी करत राहिलो तर एक दिवस आपण मातीत जाऊ. संत तुकारामांची गाथा आपण रोज पाण्यात बुडवत आहोत. मराठी शाळांची परिस्थिती पण चिंतेचा स्वतंत्र विषय आहे.
सांस्कृतिक राष्ट्रवाद वगैरे अस काही नसत - जग फार पुढे चाललय - आता संगणकाचा जमाना आहे. माझे काही मित्र. माझे हे मित्र खरतर अमेरिकेच्या / पाश्चात्य सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळी पडतायत त्यांच्याच नकळत. संगणक आला म्हणून कुठल्या देशांनी आपली भाषा सोडली? उत्तर : "भारत". जपान चीन छोटे छोटे युरोपियन देश ह्यांनी संगणकात आपली भाषा वापरायला सुरुवात केली. माझा स्विस ग्राहक जर्मन मधून आउटलूक वापरतो. आम्ही तर मराठीच सोडली मराठीतून आउटलूक काय वापरणार.
मला माहिती आहे हे काही सोप काम नाही. आपल्याला कित्तेकदा पर्यायी मराठी शब्द आठवून सुद्धा सापडत नाहीत तिथे मराठीतून उच्च शिक्षण म्हणजे अवघड काम आहे. पण त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. २०-२५ वर्षानंतर कदाचित ते प्रयत्न फळाला येतील. पण मला हि दिशा महत्वाची वाटते. काही जण म्हणतील हे इंग्रजी हिंदी शब्द मराठीत नवीन भर आहे आणि ह्यांनी भाषा समृद्ध होते. मला तस नाही वाटत. add हा शब्द मराठीत भर आहे का? शब्द उच्चारल्या नंतर मेंदूत अर्थ स्पष्ट होतो तेंव्हा तो मराठी असतो का? मी भाषा शात्रज्ञ नाही पण मला तस वाटत नाही. हं कदाचित अजून काही वर्षानंतर हा शब्द पूर्णपणे मराठी वाटायला लागेल. तस पाहिलं तर मराठीत नवीन शब्दांची भर पडत नाही हेच खर. ऑक्सफर्ड जस नवीन शब्दांची भर घालून शब्दकोश काढतो तसं मराठीत नवीन शब्दांची भर पडली आहे का? स्वा. सावरकरांनी नवीन मराठी शब्दांची भर घातली होती त्यानंतर कोणी अस केल्याच ऐकिवात नाही. मुळात भाषेचा वापर कमी होत असेल, ती प्रवाही नसेल तर तिच्यात नवीन शब्दांची भर पडणार कशी. अमेरिकेतल्या अनेक चांगल्या विनोदी मालिकांमध्ये शब्दांची जादू, नवीन शब्दांची रचना, परिस्थितीत शब्दांच्या विशिष्ट मांडणीतून निर्माण होणारा विनोद पाहायला मिळतो. पुलं एकदा म्हणाले होते अत्र्यांच्या साहित्यातली मराठी भाषा हा डॉक्टरेट करण्याचा स्वतंत्र विषय आहे.
आता मात्र माझे मित्र फुटतात. महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कानडी राजस्थानात राजस्थानी भाषा चालतेय वाढतेय आणि अनिवार्य आहे...प्रत्येक राज्य आपल्या भाषा संस्कृतीने वाढतंय हि गोष्टच त्यांना पटत नाही ...म्हणजे आपण चक्क देशाची फाळणी करतोय अस त्यांना वाटत. एका मित्राला जेंव्हा मी सांगितला कि हिंदी राष्ट्र भाषा नाही, हिंदी आणि मराठीला संविधानात एकच दर्जा आहे तेंव्हा ते त्याला पटलं नाही. जेंव्हा संविधान दाखवलं मग पटलं, पण म्हणतो कसा - गेल्या साठ वर्षात आपण एक राष्ट्रभाषा बनवू शकलो नाही ....लाज वाटायला पाहिजे आपल्याला.
आपला देश एक खंडप्राय देश आहे, इथली एक एक राज्य स्वतंत्र देशाच्या क्षमतेची आहेत, तेंव्हा आपापल्या भाषा संस्कृतीच्या पायावर उभे राहून एकमेकांशी व बाहेरील देशांशी व्यापार उद्दीम करून ते विकसित होऊ शकतात आणि खरतर तेंव्हाच भारत पण विकसित होईल हे पटायला एवढ अवघड का आहे? आपली भाषा संस्कृती बाळगली तर ती देशाच्या व इतर राज्यांच्या विरोधात जाण्यासारखं आहे आणि मग देशाची फाळणी होईल ह्या भीतीत आणि भ्रमात आपण किती दिवस राहणार? विविधतेत एकता जे आपण म्हणतो ते कित्ती वरवरच आहे आणि आपल्यालाच त्यावर कसा विश्वास नाही हे ह्यानिमित्ताने कळत. भारत हा जगातील एक विलक्षण देश आहे जिथे एवढी विविधता आहे. हे वास्तव मान्य करू, हि विविधता टिकवू, वाढवू, आपापल्या राज्यात आपापली संस्कृती ह्या सोप्या तत्वाने त्यातील संघर्ष मिटवू आणि जेंव्हा एक एक राज्य आपल्या उच्चतम क्षमतेला पोहंचेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने भारत महान असेल हे पटायला का एवढ अवघड आहे? मग नाही आम्हाला राष्ट्र भाषा - कुठे बिघडलं...राष्ट्र भाषा नाही म्हणजे आमची एकता अखंडता धोक्यात येते? मी जर मराठी नसेल तर मी भारतीय राहू शकतो का? माझं भारतीय असणं माझ्या मराठी असण्याशी संलग्न आहे. मराठी, कानडी, गुजराती, बिहारी अश्या अनेकविध ओळखीतूनच भारतीय ओळख तयार होते. आपण वेगळे झालो तर संपलो हे आपण इतिहासातून शिकलोय. पण आपण भाषिक सांस्कृतिक मुस्कटदाबीने संघर्षाने एकत्र राहिलो तर मूळ उद्देश्यालाच हरताळ फसल्यासारख होईल.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुद्याकढे मी परत वळतो. आपल्या देशात संघराज्य व्यवस्था (Federal) केंद्राकडे झुकणारी आहे. आणखीन एका फाळणीच्या भीतीने तसं केल गेल होत. पण हि भीती अजूनही आपल्यात आहे हेच दिसत. हि भीती काढून टाकून आपण खऱ्या अर्थाने संघराज्य निर्माण केलं पाहिजे ज्यात वर उल्लेखिलेल्या विचारांचा अंतर्भाव असेल.
उठता बसता अमेरिकेची उदाहरण देणाऱ्या माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो कि अमेरिकेची संघराज्य व्यवस्था इतकी मूलगामी आहे कि त्यांच नावच मुळी अमेरिकी संघराज्य अस आहे. आपल्याही देशाच नाव भारतीय संघराज्य अस आहे पण आपल्याला प्रजासत्ताक असल्याचा इतका टेंभा आहे कि आपण संघराज्य आहोत हे विसरतो. अमेरीकेचे सार्वभौमत्व (ज्याला इंग्रजीत Sovereignity म्हणतात) ते त्यांच्या राज्यात विभागून आहे. म्हणजे अमेरिकेची राज्य सार्वभौम आहेत. त्यांना स्वताःच संविधान आहे आणि प्रत्येक राज्याच स्वताःच सर्वोच्च न्यायालय पण आहे. अर्थातच केंद्र सरकारच्या संविधान आणि कायद्या विरोधात राज्य सरकारांना जाता येत नाही. आपल्या कडे संयुक्त सूची बद्दल केंद्राला शेवटचा अधिकार दिलेला आहे तर अमेरिकेत संविधानात नमूद नसलेले अधिकार राज्य सरकारांसाठी राखीव ठेवलेले आहेत. अमेरिकेत रोजच्या जीवनाशी संबधित कायदे हे मुख्यत्वे करून राज्य सरकारांची आहेत.
मला वाटत मला काय म्हणायचं आहे ते मी मांडलय. तुम्ही जरूर आपले विचार अभिप्राय नोंदवा. कोणाकडे अधिक माहिती असल्यास अवश्य लिहा. कोणाला आवडला नसल्यास आणि वेगळा युक्तिवाद असेल तर ते हि जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
संदेश, आपला लेख चांगला आहे,
संदेश,
आपला लेख चांगला आहे, पण थोडा विस्कळीत वाटतो. आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते कळलंय. ती मराठी माणसाची कित्येक वर्षांपासूनची व्यथा आहे. पण ती शब्दांत नेमकेपणाने उतरली नाही (असं वाटतं).
असो.
आपल्या लेखात एक महत्त्वाचा मुद्दा अस्पर्शित राहिला आहे. तो म्हणजे मराठीद्वेष्टे शासकीय अधिकारी. अशी एक मोठी लॉबी मंत्रालयात कार्यरत आहे असं मी ऐकलंय. मराठी माध्यमाच्या नव्या शाळांना मान्यता नाकारण्यामागे हीच लॉबी आहे असंही ऐकलंय. या लॉबीचं काय करायला पाहिजे हे सांगणे नलगे.
असो.
आता थोडं इतर ठिकाणी बघूया. बंगळूरात हिंदी सर्रास बोलली जाऊ लागली आहे. कोणे एके काळी कन्नडशिवाय पान हलत नसे. चेन्नईमध्ये माझा एक मित्र राहतो. तो म्हणतो की चेन्नईत आता मूळ तमिळ लोक तुरळक होऊ लागलेत. उपरे वाढलेत. अगदी मयलापूरसारख्या चेन्नईच्या मध्यवर्ती भागातही हेच होतेय. चेन्नईत मूळचे तमिळ (तामिळनाडू) आणि केरळातून स्थायिक झालेले (मल्लूनाडू) असा छुपा संघर्ष आहेच. उत्तर प्रदेशातल्या वायव्य भागांत स्थलांतरितांचे प्रमाण बेसुमार वाढले. या भागाचा आता उत्तराखंड झाला आहे. आता तर तिथे 'बाहेरच्या' लोकांना जास्त भाव मिळू लागेल की काय अशी भीती आहे. कोलकत्यात (आणि एकंदर पश्चिम बंगालात) मारवाडी गट अतिशय सक्रिय आहे. स्थानिक बंगाली बाबूंना त्यांच्या क्षेत्रात प्रवेश नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले मराठी लोक बरेच सजग आहेत.
असो. आता मराठी भाषेकडे वळूया.
आजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषा ही इंग्रजीपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नसल्याची जाणीव अनेक मराठीजनांना होते आहे. त्यातले बहुसंख्य संगणकसाक्षर आहेत हे पथ्यावर पडते. भाषेवर प्रभुत्व असणे म्हणजे तिच्यात विचार अचूकपणे व्यक्त करण्याची हातोटी असणे होय. महाराष्ट्रात इंग्रजी केवळ पोटापाण्यासाठी आली तरी चालू शकते. त्यामुळे मराठीच्या भवितव्याबद्दल मलातरी शंका नाही. मराठीतून शिक्षण आणि पोटापाण्यापुरती (=कामचलाऊ) इंग्रजी हा आकृतिबंध पुरेसा आहे.
मात्र याच्या मागे प्रखर लोकेच्छाशक्ती उभी राहायला हवी. हाच आकृतिबंध इतर भाषांनी राबवला तर अन्यभाषिकांचा मराठीबद्दलचा आदर वाढेल. आज हिंदीभाषिक राज्यांत हिंदीत इंग्रजीची पराकोटीची भेसळ झालेली दिसून येते. यामागेही हिंदीद्वेष्ट्यांची लॉबी आहे. याअर्थी हिंदी मराठी भाईभाई म्हणायला हरकत नसावी. आपण जर महाराष्ट्रात (विशेषत: मुंबईत) मराठीचा आग्रह धरला तर हिंदी भाषिकांचे मन वळवायला आपसूकच एक आधार मिळेल.
मला जे वाटलं ते लिहिलं आहे. अधिकउणे लिहिल्यास क्षमा असावी.
आ.न.,
-गा.पै.
साधारण ९ कोटी लोकांची
साधारण ९ कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे आता मराठी कधी नामशेष वगरे होण्याचा धोका नाही. महाराष्ट्रातील फक्त महानगरांमध्ये व्यवहाराची भाषा मराठी न राहता हिंग्लिश झालेली आहे. यावर उपाय म्हणजे घराबाहेर दुकानात, हॉटेलमध्ये, मोबाईल मार्केटिंगवाल्यांशी मराठीतूनच बोलणे. मराठीचा आग्रह धरल्यावर व्यवसाय वा नोकरीसाठी इथे आलेल्यांना पोटापाण्यापुरती मराठी बोलावीच लागेल.
माझ्या ओळखीतले अनेक लोक त्याच्या घरी हिंदी, मारवाडी बोलतात पण मराठी पण अस्सलिखित बोलतात. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात.
लेख विचारपूर्वक लिहिला
लेख विचारपूर्वक लिहिला आहे.
खूप मुद्दे पटले. उ. दा. -
- मराठी खाद्यपदार्थ, शब्द, गाणी आणि शेवटी लोक - आधी माहिती नाही म्हणायचं मग माहिती असायला पाहिजे अस काही नाही अस म्हणायच.
- मुळात भाषेचा वापर कमी होत असेल, ती प्रवाही नसेल तर तिच्यात नवीन शब्दांची भर पडणार कशी.
काही मुद्दे पटले नाहीत. उ.दा. -
- महाराष्ट्रात सर्व प्रकारच माध्यमिक, उच्च शिक्षण, संशोधन मराठीतून व्हायला पाहिजे.
सर्व संशोधन मराठीतून हा अट्ठाहास आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण कदाचित मराठीमधून व्हावे हे पटेल.
- सर्वांना इंग्रजी शिकवण्या पेक्षा इंग्रजीतल ज्ञान आपल्या भाषेत आणल्यामुळे हे प्रश्न सुटतील. उच्च शिक्षित लोकांच्या सुरुवातीच्या पिढीतील लोकांनी हे करायला पाहिजे होत पण त्या पेक्षा आपण कसे इतरांपेक्षा वेगळे आणि आधुनिक आहोत ह्याच विचारात हे लोक मश्गुल राहिले.
आधिच्या पिढ्यानी बाकी खूप कार्य केले आहे. मराठिचा विरोध केला नाही.
काही मुद्दे बहु-अंगि आहेत.
- बहुसंख्य लोकांची जी भाषा आहे तीच जर नष्ट झाली तर त्यांचा विकास कसा होणार.
- मी जर मराठी नसेल तर मी भारतीय राहू शकतो का? माझं भारतीय असणं माझ्या मराठी असण्याशी संलग्न आहे. मराठी, कानडी, गुजराती, बिहारी अश्या अनेकविध ओळखीतूनच भारतीय ओळख तयार होते.
एक सूचना -
<<अस स्थलांतर रोकता येत नाही>> हे "अस स्थलांतर थांबवता येत नाही" असे कराल का?
आज अमीर खानची निखिल
आज अमीर खानची निखिल वागळ्यांनी मराठीतून मुलाखत घेतली. दीड वर्षाच्या लहान कालावधीत तो खूपच चांगला मराठी बोलायला शिकला आहे.
महाराष्ट्राची मुख्य भाषिक समस्या म्हणजे त्रिभाषा सूत्र आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याची थाप गेली ६०-६५ वर्षे काँग्रेसवाले मारत आहेत. त्यामुळे हिंदी सक्तीची असल्याने महाराष्ट्रात बहुतेकांना हिंदी येते व त्यामुळे इथले हिंदी भाषिक मराठी शिकण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. बंगाल व दक्षिणेतल्या राज्यात हिंदी ऐच्छिक असल्याने हिंदी भाषिकांना तिथली स्थानिक भाषा शिकावी लागते. त्या राज्यात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याची थाप कधीही पचली नाही. हिंदी भाषिक राज्यात त्रिभाषा सूत्र नसून द्विभाषा सूत्र असल्याने ते इतर कोणतीही भारतीय भाषा शिकत नाहीत. त्यांना सुद्धा हिंदीव्यतिरिक्त एक भारतीय भाषा शिकणे सक्तीचे केले पाहिजे किंवा महाराष्ट्रातून हिंदी भाषा ऐच्छिक ठेवली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याची जबाबदारी फक्त महाराष्ट्राचीच असू नये.
आपल्याकडेही हिंदी ऐच्चिकच
आपल्याकडेही हिंदी ऐच्चिकच आहे... ज्याना पूर्ण संस्कृत असते त्याना कुठे हिंदी असते? द्वितिय भाषा या लिस्ट मध्ये हिंदी, संस्कृत, शिवाय अजुनही किती तरी भाषा असतात.. तुमचे दहावीचे मार्क लिस्ट असेल तर त्याच्या मागे द्वितीय भाषीत येणर्या भाषा आणि त्यांचे कोड असतात, ते वाचा. आता इतक्या भाष्हा शिकवायची सोय होऊ शकत नाही, म्हणून हिंदी, संस्कृत, ५०-५० असे ऑप्शन लोक निवडतात.. पण तुमची इच्छा असेल तर स्वतः अभ्यास करुन दुसर्या एखाद्या भाषेची निवडही तुम्ही करु शकता.. हिंदीची सक्ती नाही. तुम्ही द्वितीय भाषा म्हणून संस्कृत, कन्नड कुठलीही भाष्हा घेऊ शकता.. सरकार तुमच्या उरावर बसलेले नाही हिंदीच घ्या म्हणून. तुम्हाला हिंदी ऐवजी कन्नड, मल्याळम , ऊर्दू शिकणं जास्त फायद्याचे वाटत असेल तर तुमच्या बुद्धीला माझे दंडवत ! पण तुम्ही ते करु शकता..
इतर ठिकाणी २ च भाषा शिकवतात का हे माहीत नाही, पण बहुदा तसे नसावे.. ३ भाषा पॅटर्न हा बहुदा देशभर आहे.. इतर राज्यात असनारे लोक यावर प्रकाश टाकू शकतील. पण बाकीच्याना २ च भाषा शिकवतात म्हणून आम्हीही २ च शिकणार, हा मात्र आत्मघातकी असा प्रचंड मोठा विनोद आहे.
हे कर्नाटकचे टाइम टेबल... http://mycollege.in/timetables/karnataka-ssc-exam-timetable.php यातही ३ भाषा आहेत. हे झारखंड.. http://www.jharkhandeducation.net/Exam-Schedules/index.aspx यातही ३ भाषा आहेत.
शाळेत हिंदी शिकवतात म्हनून मराठी पोरं हिंदी बोलायला शिकतात, हा तर अजुन मोठा विनोद.. पाचवीला जायच्या आधीच पोरं टी व्ही आणि सिनेमे बघून आणि गाणी ऐकून हिंदी शिकतात... ८-१० ही ३ वर्षे पुस्तकी संस्कार रहातात. पण नंतर मेडियाचेच संस्कार हिंदी बाबत अधिक होतात.. हिंदी येण्याला केवळ शाळा जबाबदार असती तर ज्यांचे १०० मार्कांचे संस्कृत असते ती पोरं हिंदी कशी बोलतात?
का त्याना काँग्रेसवाले स्वप्नात दृष्टांत देऊन हिंदी शिकवतात ?
सारांश, शाळेत हिंदी नाही शिकले तरी मराठी लोक हिंदी बोलायला आणि लिहायला ( लिपी एकच असल्याने) शिकतातच..
शाळेत २ च भाषा जरी केल्या तरी मराठी आदमी को हिंदी बोलना आयेगाच!
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याची थाप गेली ६०-६५ वर्षे काँग्रेसवाले मारत आहेत.
यात थाप काय आहे? माझ्या गल्लीचे नाव ब्राह्मणपुरी आहे..( खरोखरच आहे.. ) . याचा अर्थ प्रत्येक घरात त्याच जातीच माणूस असतो, असा त्यातून अर्थ होतो का? जास्तीत जास्त लोक ( एकेकाळी) होते, म्हणून ते नाव.. तसेच राष्ट्रभाषा या शब्दाचा अर्थ देशात जास्त लोकांकडून बोलली जाणारी, इतकाच अर्थ अभिप्रेत आहे.. कायद्यानुसार हिंदी ही सर्व भाषांपैकी आणि सर्व भाषांसारखीच एक आहे. महाराष्ट्रातही इतर अनेक द्वितीय भाषांपैकी एक आहे. त्यात कसलीही सक्ती नाही.
कोरिया, जपान ई. देशांना
कोरिया, जपान ई. देशांना इंग्रजी न आल्यामुळे तिथली पिढी आज बाहेरच्या जगात वावरताना तेवढी आत्मविश्वासपूर्ण नाहीये. या उलट, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे भारतातील युवक जगात कुठेही जाऊन आत्मविश्वासाने वावरू शकतो.
हा एक मुद्दा सोडला तर बाकी सगळे पटले आणि नक्कीच विचार करायला लावणारे आहेत हे प्रश्न....
तो म्हणजे मराठीद्वेष्टे
तो म्हणजे मराठीद्वेष्टे शासकीय अधिकारी. अशी एक मोठी लॉबी मंत्रालयात कार्यरत आहे असं मी ऐकलंय.
काय सांगता? कमालच आहे या माणसाची . इथे गळा काढायचा मुंबई मंत्रालयात मराठी माणुस नाही म्हणून.. आणि तिकडे सचिनला राज्यसभेत स्म्धी मिळतेय तर तिथे खुस्पटं काढायची अती लोकप्रिय मानूस राज्यसभेत कशाला म्हणून.. गंमतच सगळी!
जामोप्या, >> इथे गळा काढायचा
जामोप्या,
>> इथे गळा काढायचा मुंबई मंत्रालयात मराठी माणुस नाही म्हणून.. आणि तिकडे सचिनला राज्यसभेत
>> स्म्धी मिळतेय तर तिथे खुस्पटं काढायची
आहेच मुळी गंमत! सचिन राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त झाल्याने मराठीचा उत्कर्ष साधला जाईल हे विधान खरोखरच गंमतीशीर आहे.
आ.न.,
-गा.पै.
मराठी माध्यमाच्या नव्या
मराठी माध्यमाच्या नव्या शाळांना मान्यता नाकारण्यामागे हीच लॉबी आहे असंही ऐकलंय
मराठी माध्यमाच्या आहेत त्या शाळातच पुरेसा पट नाही. ( म्हणून बोगस पट दाखवतात, ज्याची गेल्या वर्षीच तपास णी झाली) नव्या शाळाना मान्यता न देण्यात हे कारण असावे.. एखाद्याला मराठी माध्यमात शिकायचे आहे आणि त्याला प्रवेश कुठेच मिळाला नाही असे होत नाही.
एक वार्ता ! तो सचिनच्या
एक वार्ता ! तो सचिनच्या नियुक्ती बद्दलचा लेख आताच डिलिट झालेला दिसतोय बरं का ? कांहींना 'जितं मया'ची खुषी !
तेव्हां त्या लिखाणाचा उल्लेख या लेखाच्या प्रतिसादात करून आता काय उपयोग? पण कांहींच्या स्मरणातून तो जाणार नाही असे दिसते. धागे डिलीट केले म्हणून त्यात मांडलेला विचार डिलीट कसा करणार? मी मांडलेला मुद्दा माध्यमांमधील चर्चेतून , वर्तमानपत्रांमधून खूप लोकांनी मांडला आहे आणि त्यात मोठे विचारवंतही आहेत. हे झाले थोडे अवांतर.
सर्वांनी महाराष्ट्रातील लोकांशी शक्यतो मराठीतून बोलले तर इतरभाषिकही मराठीतून बोलायला लागतील असा उपाय दुसर्या एका लेखावर अनेकांनी मांडला होता. तो
योग्यही होता पण मुळात मराठी माणसालाच तशी सवय नसेल तर इतर कशाला काळजी करतिल?
मी मांडलेला मुद्दा
मी मांडलेला मुद्दा माध्यमांमधील चर्चेतून , वर्तमानपत्रांमधून खूप लोकांनी मांडला आहे
जगाची लोकसंख्या करोडोत आहे. कुणीही काहीही लिहिले की त्याला सपोर्ट करणारा कुणीतरी असतोच.
(१) इतरांच्यात आहे तशी मुळात
(१) इतरांच्यात आहे तशी मुळात आपल्यात एकीच नाही. खरं दुखणं हे आहे.
एका मारवाडी दुकानदाराला मराठी येत नाही म्हणून शंभर गिर्हाइकं त्याच्याशी हिंदीत बोलतील, पण त्याला मराठी शिकायला/बोलायला भाग पाडणार नाहीत ही अवस्था आहे.
मराठी व्यावसायिकाने मराठी मुलांनाच नोकरीवर ठेवण्याचं धोरण का राबवू नये? उमेदवार लायक असावा हे मान्य, पण तो फक्त मराठीच असावा. हे किती ठिकाणी दिसतं?
(२) आपणच आपल्याशी मराठीत बोलत नाही.
माझं नाव जॉब कार्डावर वाचून देखील पुण्यातल्या एका प्रसिद्ध आस्थापनातील काउंटर पलिकडे बसलेला एक मराठी कर्मचारी माझ्याशी पहिलं वाक्य हिंदीतून बोलला. मी "तुम्ही मराठी आहात ना?" असं म्हटल्यावर ओशाळल्यागत चेहरा करुन काहीतरी बोलून त्याने वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
मग कुणी कितीही पक्ष काढले आणि आंदोलनं केली तर त्याचा काय डोंबल उजेड पडणार? आणि इतर प्रांतातल्या लोकांनी ही मराठी संस्कृती आणि भाषा आपली मानली नाही असा गळा काढून काय उपयोग? आपल्या मनोवृत्तीत बदल होणे आवश्यक.
जोशी आडनाव गुजरात, यु पी
जोशी आडनाव गुजरात, यु पी इथेही असते.
नाव म्हणजे संपूर्ण नाव. आणि
नाव म्हणजे संपूर्ण नाव. आणि पुण्यात (महाराष्ट्रात) म्हटल्यावर त्याने सर्वप्रथम मराठीतच बोलायला हवं. समोरच्याला नाहि समजलं तर हिंदी/इंग्रजी इतर पर्याय आहेतच.
पब्लिकांनो, मी स्वतंत्र लेख
पब्लिकांनो,
मी स्वतंत्र लेख लिहिणार यावर.
आपल्याला बरेच काही पटले नाही.
सांगोपांग विचार केला गेला असे का कुणास ठाऊक पण वाटतच नाही.
(No subject)
लेख बराच मोठा आहे. संपूर्ण
लेख बराच मोठा आहे. संपूर्ण वाचता आलेला नाही. वाचला त्याबद्दल :
१) "अस स्थलांतर रोकता येत नाही." : ठळक केलेला शब्द मराठी भाषेतील आहे काय?
२) महाराष्ट्रातील अमराठी भाषिकांकडून मराठीतून बोलण्याची, त्यांनी मराठी संस्कृती अंगिकारण्याच्या गरजेपेक्षा मुळात शहरांतील मराठी लोकांनाच याची किती गरज आहे ते पहावे. मी महाराष्ट्रीयन आहे असे म्हणणार्याला मराठी कसे म्हणावे?
३) शासकीय अधिकारी आणि राजकारण्यांमुळे मराठी भाषांना परवानगी मिळत नाही असे आपण लिहिले आहे. हे खरे असेलही. पण आहेत त्या मराठी शाळा(मराठी भाषिकांची वस्ती बहुसंख्येने असलेल्या भागातील मराठी माध्यमाच्या शाळाही) बंद पडत चालल्या आहेत त्याचे कारण काय असावे?
रोखता येत नाही... हे मात्र
रोखता येत नाही... हे मात्र मराठीच आहे.
हा लेख वाचल्याबद्दल आणि
हा लेख वाचल्याबद्दल आणि अभिप्राय नोंदवल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मला सविस्तर प्रतिक्रिया लिहिण्यास कामात व्यस्त असल्यामुळे उशीर होत आहे. क्षमस्व. "रोखता" असा बदल केला आहे.
- सं.देश.
सं.देश, लेख
सं.देश,
लेख आवडला.
>स्थलांतरितांनी मूळ संस्कृतीत मिसळायला हवं - हा संघर्ष कमी करण्यावर नामी उपाय आहे>
>त्रयस्त व्यक्ती हिंदी आहे हे गृहीत धरण्य इतपत परिस्थिती झाली आहे>
अनुमोदन.
>का बर मी महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मराठीतून करू शकत? महाराष्ट्रात सर्व प्रकारच माध्यमिक, उच्च शिक्षण, संशोधन मराठीतून व्हायला पाहिजे> नाही पटलं.
>जपान चीन छोटे छोटे युरोपियन देश ह्यांनी संगणकात आपली भाषा वापरायला सुरुवात केली> ह्याचा त्यांना तोटा पण होतोय.
जगाच्या व्यापाराची भाषा इंग्रजी आहे हे नाकारता येत नाही. आणि भारतीय लोकांना ती नीट बोलता येते म्हणून त्यांना इतर देशाच्या (चीन, जपान) लोकांपेक्षा जास्त संधी मिळतात ही वस्तुस्थिती आहे. (दुर्योधन ह्यांना अनुमोदन)
मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो. अजूनही जमेल तेव्हा मराठीच बोलतो, लिहितो. पण उच्च शिक्षणासाठी बाहेर देशी गेल्यावर असं लक्षात आलं कि मी विचार मराठीतून करत असल्यामुळे अभ्यास करताना वाचलेलं इंग्रजी आधी मराठीत रुपांतरीत करायचं आणि मग समजून लक्षात ठेवायचं असा दोन टप्प्यांचा प्रवास असायचा. माझे इतर मित्र जे इंग्रजी माधमातून शिकले त्यांना हा त्रास नव्हता. बोलतानाही हेच होत होतं / अजूनही बर्याचदा होतं. माझी 'मूळं' मराठी असूनही दहावी नंतर माझं शिक्षण इंग्रजीतून झालेलं असल्यामुळे नंतरचा प्रवास तसा सोपा झाला. पण दहावी नंतरही मराठीतून शिकलो असतो तर अजून जास्त खडतर झाला असता.
मराठी आपली मायबोली आहे आणि आपली संस्कृती, इतिहास तिच्यामुळे आपल्याला जवळचा आहे. तिला नामषेश होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहेच. इतर भाषा, संस्कृतींशी ओळख झाल्यावरही तिला न विसरणं हे महत्वाचं.
जाता जाता - आपल्या लेखात 'नौकरी' बदलून नोकरी कराल का? आणि 'कित्तेकदा' बदलून कित्येकदा कराल का?
>>इथे गळा काढायचा मुंबई
>>इथे गळा काढायचा मुंबई मंत्रालयात मराठी माणुस नाही म्हणून.. आणि तिकडे सचिनला राज्यसभेत स्म्धी मिळतेय तर तिथे खुस्पटं काढायची अती लोकप्रिय मानूस राज्यसभेत कशाला म्हणून.. गंमतच सगळी!<<
सचिनच्या नियुक्तीबद्द्ल आक्षेप का? हा अगदी स्वतंत्र मुद्दा होता. तेथे मराठी अमराठी हा मुद्दाच नव्हता. येथील भाषेबाबतच्या चर्चेचा आणि त्या चर्चेचा संबंध काय? पण येथे कांहीजण मुद्दा भरकटवून
चर्चेचा उकिरडा करायच्या हेतूनेच येतात आणि यशस्वी देखील होतात. त्यापैकी अनेकांची माहिती स्वत:विषयी कोठलीही माहिती न देणारीच असते आणि तरीही चर्चेचा उकिरडा करूनही ते टिकून राहातात हे दुर्दैव!
मराठी माणसेच मराठी माणसाचा
मराठी माणसेच मराठी माणसाचा पाय ओढ्तात.. मग तिथे कुणीतरी दुसरा येतो.
त्यापैकी अनेकांची माहिती स्वत:विषयी कोठलीही माहिती न देणारीच असते आणि तरीही चर्चेचा उकिरडा करूनही ते टिकून राहातात हे दुर्दैव!
काय करणार खाजगी माहिती घेऊन ? सगळी माहिती देऊनही डिलिट झालेले आय डी मला माहीत आहेत.
मित्रहो, महाजालावर लिहिण्याचा
मित्रहो,
महाजालावर लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तेंव्हा शुद्धलिखाणाच्या काही चुका व एकूणच शब्दात विचार मांडण्यात कमतरता राहिली असू शकते. शिवाय त्यात कोठे थोडी असंबद्धता असल्यास त्याला विचारांची उत्स्फूर्तता कारणीभूत आहे.
बेफिकीर ह्यांचा लेख आत्ता वाचावयास उपलब्ध नाही (का ते मला ठाऊक नाही), पण बर्याच जणांनी तो वाचला असेल. त्या लेखाला काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी ह्या विचारात मी होतो. रीटा, लिंबूटिंबु आणि इतर काही जणांनी मार्मिक उत्तर दिली होती, त्याला मी अनुमोदन देतो. मला एवढच म्हणायचय कि विचारांना उत्तर देण शक्य आहे पण 'मरेल तर मरु द्या' ह्या वृत्तीला काय उत्तर देणार?
काहींना हा प्रश्न इतक्या तीव्रतेचा वाटत नाही, ते आशावादी आहेत. मला फार आशादायक परिस्थिती वाटत नाही. 'मराठी आता मरणार नाही' ह्या आत्ममग्न विचारात आपण राहिलो तर परिस्थिती अधिक बिकट होईल. स्वानुभव महत्वाचे आहेत पण सर्वच सामाजिक प्रश्नांवर आपण स्वानुभवावरून मत नाही बनवू शकत. येऊ / होऊ घातलेला बदल जो समाज लवकर टिपतो व त्याला तोंड द्यायला सिद्ध होतो तोच टिकतो - डार्विन. तेंव्हा प्रत्येकाला झळ पोहंचे पर्यंत नको वाट पाहायला. दुसर अस कि मराठी भाषा नाही मारणार पण मुळात प्रश्न आहे तो मराठी भाषा आणि भाषिक ह्याचं स्थान / महत्व काय असेल?
अनेकांना माझी मत पटली पण कोणालाही मी इंग्रजीबद्दल मांडलेली मत आवडली नाहीत. त्याबद्दल विस्ताराने.
सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो कि मी जेंव्हा मराठी असा शब्दप्रयोग करतो तेंव्हा मला फक्त भाषा अभिप्रेत नसते तर भाषा, समाज, महाराष्ट्र, संस्कृती, इतिहास अस अपेक्षित असत. राष्ट्र म्हणजे काही जमिनीचा तुकडा व त्यावर राहणारे हाडा मासाचे प्राणी नव्हेत. उगाच नाही आपल्या राज्यच नाव महा'राष्ट्र ' आहे.
हिंदीला विरोध आणि इंग्रजीला समर्थन पक्षपातीपणाच ठरेल. त्या अर्थी हिंदी आणि इंग्रजी सारख्याच, उलट हिंदी जवळची. भारतीय भाषांच्या भांडणात इंग्रजीच महत्व वाढत. मी जेंव्हा युरो देशात फिरलो तेंव्हा बाजारात वस्तूंवर सर्व युरो देशांच्या भाषांमध्ये माहिती लिहिलेली पहिली पण इंग्रजीत लिहिलेलं नसायचं. आपल्या देशात राष्ट्र भाषा असू शकत नाही तेंव्हा आपल्या राज्यात राज्य भाषा आणि आपल्या देशात आपल्या देशाच्या सर्व भाषा अस सूत्र खरतर असायला पाहीजे. कोणीही आपल्या राज्यात दुसर्या राज्याची भाषा सर्वमान्य करणार नाही पण सर्व राज्य सर्व भारतीय भाषा सोडून इंग्रजी स्वीकारतील. हे म्हणजे शेतीचा माल भावाला नाही मिळाला पाहिजे मग भलेही तो सडून वाटोळे का होईना? जस महाराष्ट्रात एकजूट नाही हे मराठीच्या र्हासाला कारणीभूत आहे तस देशात एकजूट नाही हे भारतीय भाषांच्या र्हासाला कारणीभूत आहे.
माझ्या मनात शंका नाही कि जो धोका मराठीला हिंदीकडून आहे तो इंग्रजीकडून पण आहे. खरतर तो अधिक भीषण आहे कारण इथे स्वकीयच मराठी सोडून इंग्रजी अपलीसी करायला निघाले आहेत. जस मी म्हणालो हिंदी महाराष्ट्राची सार्वजनिक भाषा झाली आहे तसेच इंग्रजी हि उच्च - शिक्षित, मध्यमवर्गाची व श्रीमंतांची भाषा झाली आहे. इंग्रजी माध्यमातून सर्व शिक्षण झालेल्या 5-6 पिढ्या जेंव्हा बाहेर पडतील तेंव्हा मराठी घरापुरती / कुटुंबापुरती मर्यादित झाली असेल. माझ्या चुलत भावाला (सेमी इंग्रजी) आनंद भाटे पेक्षा एकोन ची इंग्रजी गाणी जवळची वाटतात. इंग्रजीच समर्थन मराठीच मरण उद्यावर ढकलण्यासारख आहे.
दुसर अस कि मराठी भाषेबाबत आपल नक्की उद्दिष्ट काय? मला मराठी भाषा फक्त जगवायची / टिकवायची नाही तर तिला व्यापाराची / ज्ञानाची भाषा बनवायची आहे. ती अमृताहुनी पैजा जिंकणारी आहे - एकविसाव्या शतकात सुद्धा. भाषेचा विकास आणि भाषिकांचा विकास हातात हात घालून होतो. न हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी खेळायचय. फक्त जागविण्याच उद्दिष्ट असेल तर ती जगेल पण मरणाची तलवार कायम डोक्यावर असेल.
चौकट राजा, दुर्योधन म्हणाले कि चीन, जपान, कोरिया इ. देशांच्या लोकांना जगात आत्मविश्वासाने वावरता येत नाही, इंग्रजीची कास न धरल्यामुळे. प्रथम - त्यामुळे त्याचं काही आडल नाही. त्यांचा जगाशी व्यापार आपल्या पेक्षा ज्यास्त आहे. आणि एकूणच आर्थिक-सामाजिक विकास चांगला आहे (अपवाद चीन - त्या वाटेवर आहे पण अजून पोहंचला नाही). दुसर - सर्वाना जगात वावरायची खरच गरज नाही. माहिती तंत्रज्ञान, त्यावर आधारित उद्योग आणि कदाचित आपण सर्व महाजालावरील - ह्यांचा जगाशी संबंध येतो अस गृहीत धरू. पण हि संख्या एकूण लोकसंखेच्या पाच टक्के पण नसेल. शतकरी, शेतीवर आधारित उद्योगात काम करणारे, शिक्षण क्षेत्र, वित्तीय पुरवठा, लघु आणि मध्यम उद्योग, स्थानिक सरकारी कार्यालयातील कर्मचारी, पत्रकार, कलाकार इत्यादी अनेकांना नाही लागत जगात वावरायला. ज्यांचा संबंध येतो त्यांनी अवश्य शिकावी इंग्रजी आणि बनाव बहु-भाषिक पण सर्वांना का अनिवार्य?
इंग्रजीशिवाय (स्थानिक भाषेत ) ज्या अस्थापना / व्यवहार चालतात त्यांचा विकास होत नाही म्हणून त्यांचा आदर सन्मान नाही म्हणून त्यांची भाषा / संस्कृती उपयोगाच्या नाहीत. पाच टक्के इंग्रजीत बोलणार्यांची आर्थिक संपन्नता दिसते व त्यामुळे इंग्रजी भाषा व पाश्चात्य संस्कृतीला मान सन्मान. मग आपण त्यांच अंधानुकरण सुद्धा करू शकतो. अश्याप्रकारे भाषेचा विकास आणि भाषिकांचा विकास ह्याचा जवळचा संबंध आहे. आपण पाच टक्क्यांनी बहुसंख्यांचा विचार करायला पाहीजे. नाहीतर भारत वि इंडिया, श्रीमंत वि गरीब हि दरी वाढत जाईल आणि खरा विकास होणार नाही. इंग्रजीची कास धरून जगात वावरण्याने काहींचा विकास होतो पण देशाचा होऊ शकत नाही अस माझ मत आहे. वादासाठी गृहीत जरी धरल तरी संपूर्ण समाजाने इंग्रजी शिकून जगात वावरणे अव्यवहार्य आहे.
सेवांच्या निर्यातीवर प्रामुख्याने अवलंबून असलेला अर्थव्यवस्थेचा विकास देशासाठी चांगला नाही अस माझ मत आहे. मी पण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो पण देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला तर हा भासमान विकास आहे अस वाटत. पश्चात्य व इंग्रजी बोलणारे विकसित म्हणून आम्ही इंग्रजी अंगि काराण्याने विकसित नाही होणार. तर विकसित होण्यामागे त्यांचा काय विचार होता, काय ज्ञान आहे ते आम्हाला जाणून घेऊन आमच्या भाषेत, आमच्या मुल्यव्यवस्थेवर, आमच्या वैचारिक चौकटीत बसवून ते आम्हाला बाणवल पाहिजे (पुलंनि मराठीतच उत्तमोत्तम साहित्य निर्माण केल, इंग्रजी वाचल तरी). उदाहरण रेनेसांचा (नवजागृतिचा) विचार. लोकांना मी साम्यवादी, समाजवादी आणि भांडवलशाहि विरोधक वाटेल . पण तस नाही. मी जागतिकीकरण, भांडवलावर आधारित बाजाराचा समर्थक आहे. पण संतुलन आवश्यक आहे, निर्यातीवर अवलंबून राहणे योग्य नाही. जो दुसर्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. देशांतर्गत व्यापारवृद्धी आवश्यक आहे.
महात्मा गांधीजींना ते कळल होत, म्हणून ते स्वातंत्र्याच्या वेळेस खेड्याकडे चला, गावांचा विकास करा, शेवटच्या माणसाचा विचार करा अस म्हणत होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने व नंतरच्या सर्व राजकीय पक्षांनी सत्तेच राजकारण केल आणि गांधीजींचे पुतळे उभारून त्यांच नाव तेवढ रस्त्यांना दिल.
ह्या लेखाच्या अनुषंगाने विचार करताना हा नवाच मुद्दा हातात लागला. आपण विकास झाला पाहिजे म्हणतो पण नक्की विकासाच्या आमच्या काय कल्पना आहेत? ह्यावर अधिक माहिती काढली पाहिजे, अजून विचार केला पाहिजे .... बघू जमल तर पुढचा लेख ह्या विषयावर लिहीन - "माहिती तंत्रज्ञान क्रांती - किती खरी किती खोटी - महाराष्ट्राच्या विकासाच्या माझ्या कल्पना".
नेहमी प्रमाणे आपल्या अभिप्रायांच्या प्रतिक्षेत.
आधीच उशीर झाल्यामुळे हे लिखाण लगेचच प्रदर्शित करत आहे. शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या चुका लवकरात लवकर दुरुस्त करेन .
जय हिंद! जय महाराष्ट्र!
कोणीही आपल्या राज्यात दुसर्या
कोणीही आपल्या राज्यात दुसर्या राज्याची भाषा सर्वमान्य करणार नाही पण सर्व राज्य सर्व भारतीय भाषा सोडून इंग्रजी स्वीकारतील.
हे आपल्याकडे कदाचित अपरिहार्य गरज म्हणून झालेले आहे.. मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या वस्तुचे उत्पादन सेंट्रलाइज पद्धतीने कुठेतरी एक दोन ठिकाणी करतात. मग तोमाल देशभर पुरवला जातो.. आता भारतात २४ भाषा आहेत म्हणून एखाद्या साबणाच्या कंपनीने २४ लेबले छापून घ्यायची का? आणि मग तो माल ज्या त्या राज्याला पाठवायचा का? त्यात एखादी कंपनी आंतराष्ट्रीय बाजारातही माल विकत असेल तर त्यानी खास इंग्रजीत पुन्हा लेबलं चापायची का? अगदी लोकल लेवलच्या छोट्या कंपन्या असतील, तर त्यावर त्या त्या राज्यातील भाषेतून लेबले मिळू शकतात.. मोठ्या कंपन्याना हे कसे शक्य आहे? त्यामुळ त्यानी हिंदी आणि इंग्रजी हे पर्याय स्वीकारले आणि या भाषा व्यापाराच्या 'राष्ट्रभाषा ' झाल्या.
तुमचा विचार तुम्ही आधी अमलत आणून दाखवा.. कुठलं तरी एक उत्पादन करायला शिका, त्याच्यावर २४ भाषातून लेबलं लावून देशभर तो माल विकून दाखवा.. मग तुमचं उदाहरण दाखवून आपण टाटा, अंबानी, बिर्ला याना सुधरवण्यासाठी नक्की प्रयत्न करु नै का?
शिवाय आता इंग्रजीला परकी भाषा का मानायची? सरकारने अधिकृत भाषेच्या यादीत इंग्रजीदेखील घातली आहेच की. शर्ट पँट याना आज परकीय मानता का? का नाही धोतर बंडी वापरत? स्वतःला सोयीचे होईल ते निमूटपणे स्वीकारायचे आणि कुठल्या तरी मुद्द्याला राजकीय प्रेरणेने विरोध करायचा, हे ढोंग कशासाठी?
उद्योग, स्थानिक सरकारी कार्यालयातील कर्मचारी, पत्रकार, कलाकार इत्यादी अनेकांना नाही लागत जगात वावरायला. ज्यांचा संबंध येतो त्यांनी अवश्य शिकावी इंग्रजी आणि बनाव बहु-भाषिक पण सर्वांना का अनिवार्य?
हास्यास्पद मुद्दा. आपला भविष्यात इंग्रजीशी संबंध येईल किंवा नाही हे आधी कसं समजणार? तुम्ही पाचवीत असताना तुम्हाला माहीत होतं का की तुम्ही युरोपात जाणार आहात ते? शिकण्याचं वय असतं सहा ते अठरा.. सजग होऊन काम करायला वय येतं २५... मग २५ वर्षाचा झाल्यावर एखादाला परदेशी नोकरी किंवा व्यवसायत परदेशी कस्टमर मिलाल्यावर मग ए बी सी डी शिकायला सुरुवात करायची की काय???
मुळात हा तुमचा लेख आला तेंव्हाच तुम्ही कुठं असता हा प्रश्न माझ्या डोक्यात आला होताच. पण तसे विचारले असते तर ती ढृष्टता ठरली असती.. मायबोलीचे हे वैशिष्ट्यच आहे.. इथे हिंदुत्व, अमूक धर्म कसा वाईट, हिंदुनो जागे व्हा असले लेख लिहिणारा हमखास दुबईत बसून दिनार मिळवत असतो.. काँग्रेस किती वाईट आहे यावर तावतावने लिहिणारा स्वतः ल्म्डनमध्ये बसलेला असतो तो कधी कुठल्या निवडणुकीला मतदानही करत नसतो.. मात्रूभाषा , मराठी यावर लिहिणारे आणि त्यांचे घरचे लोक हमखास इंग्रजी माध्यतातच शिकतात.. आम्ही आधुनिक जगाबरोबर राहून पैसा मिळवत बसतो, तुम्ही क्रांतीची ज्योत तेवती ठेवा.. हा सगळा असला मामला असतो.. इंग्रजी शिकू नका, निर्यात करु नका .... हॉरिबल!
>>काय करणार खाजगी माहिती घेऊन
>>काय करणार खाजगी माहिती घेऊन ? सगळी माहिती देऊनही डिलिट झालेले आय डी मला माहीत आहेत.<<
@जा मो प्या
हा आयडी त्यामुळेच डिलीट झालाय वाटते!
हो! तोच. पण मी हिंदु असल्याने
हो! तोच. पण मी हिंदु असल्याने मला पुनर्जन्म आहे..
आता त्या आयडीचा कर्मविपाक या आय डी ला लागू होतो का ते माहीत नाही.
पण खरं तर माझा हाच आय डी जुना आहे. त्याला २ वर्षे झाली होती, याला ६-७ .. त्यामुळे मी आपोआपच सिनियर झालो. 
भारतात हिंदी बोलणारे जास्त
भारतात हिंदी बोलणारे जास्त आहेत या निकषावर "हिंदी" ही आपली राष्ट्रभाषा असू शकते . . . ,
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर आपला राष्ट्रीय पक्षी . . . मोरा ऐवजी कावळा हवा . . . !!
(हे थोपुवर सापडले)
राष्ट्रीय पक्षी हा देशाने
राष्ट्रीय पक्षी हा देशाने जाहीर केलेला असतो. राष्ट्रभाषा राष्ट्राने , कायद्याने जाहीर केलेली नाही.. गावातल्या जुन्या संस्थानिकाला लोक प्रेमाने राजे, सरकार म्हणतात, हा तसा प्रकार आहे. तुम्हाला नसेल म्हणायचे तर म्हणू नका. ज्याना म्हणायचे ते म्हणतील.
स्मायली चुकला जामोप्या हा
स्मायली चुकला जामोप्या
युरो देशांमध्ये भाषांसाठी
युरो देशांमध्ये भाषांसाठी भांडणं होऊन इंग्रजीला फायदा झाला अस होत नाही हे दाखवण्यासाठी मी ते उदाहरण दिल होत. हे देश आकारानी आणि लोकसंखेच्या दृष्टीनी आपल्या राज्यांपेक्षा लहान आहेत तरी आपल्या देश्यात आपलि भाषा आणि युरो मध्ये युरो देशांच्या भाषा हे सूत्र ते पाळ तात. मोठ्या उद्योगांची वितरण व आवेष्टन (खांडबहाले.कॉम) प्रणाली सुविकसित असते तेंव्हा कोणत्या राज्यात किती आणि कोणता माल पाठवायचा आहे हे ठरवून त्या प्रमाणे त्या राज्यासाठीच आवेष्टन घालून माल वितरीत करणे अशक्य नसावे. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.
तुमचा हा आरोप मला मान्य आहे. तुमच्या सदिच्छेने / आशीर्वादाने अस काही करण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल.
इंग्रजीचा उगम भारतीय नाही आणि भारतातल्या बहुसंख्यांना इंग्रजी येत नाही हा मुद्दा आहे. इंग्रजी मधील अनेक चांगल्या गोष्टी, ज्ञान, माहिती आपण आत्मसात करून ते आपण आपल्या भाषेत आणल पाहिजे अस म्हणालो मी. तेंव्हा सर्व पाश्चात्य गोष्टींना मी विरोध करतो अस नव्हे. माझ्याही भाषेत ते ज्ञान, ती माहिती यावी, माझ्याही भाषिकांना ते कळावे आणि माझीही भाषा इंग्रजीच्या तोडीस तोड व्हावी हि इच्छा आहे.
सर्वांचा इंग्रजीशी संबंध येत नसतानाही आपण सर्वांना इंग्रजी शाकावातोच ना? शिवाय मग काय आपण ज्या वेळेस जो देश प्रगत असेल त्यांची जी भाषा असेल ती आत्मसात करणार कि कधी आमचीही भाषा प्रभावी असावी इतरांना पण ती शिकाविसी वाटावी अस काही करणार. आज हे हास्यास्पद वाटतंय कारण फार कमी क्षेत्र अशी आहेत जिथे इंग्रजी शिवाय चांगल काम करून पैसा व नाव कमावता येईल. जेंव्हा अश्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध होतील तेंव्हा हा विरोध मावळेल.
माझा खरा मुद्दा अग्रक्रमाचा होता. जागतिक होण्याच्या नादात आपण स्थानिक भान विसरतोय कि काय अस मला वाटतंय. आधी स्थानिक मग जागतिक, आधी घर मग राज्य, मग देश, मग जग. आपला अग्रक्रम काय असावा. लेहमन ब्रदरच्या आधी ज्या डझन भर जिल्हा सहकारी बॅंका बूडतायेत ते महत्वाच.
मी महाराष्ट्रात असतो. पुण्यात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्यामुळे काही महिने अमेरिका व युरोपात जाण्याचा योग आला. अमेरिकेत दीर्घ मुदतीकरिता राहण्याची संधी सोडून स्व-इच्छेने वापस आलो. माझ्या पारपत्रावर "भारत गणराज्य" असेच लिहिलेलं असावा अशी माझी इच्छा आहे. माझ आणि माझ्या घरच्याचं शिक्षण मराठी माध्यमातूनच झाल आहे. मला कुठलीही राजकीय प्रेरणा नाही. माझी प्रेरणा वर दिलीच आहे. मुळात आडातच (समाजात) नाही ते पोहऱ्यात (राजकारणात ) कुठून येणार तेंव्हा कुठल्या एका राजकिय पक्षाचा समर्थक नाही मी.
निर्यात करू नका अस नाही म्हणालो मी तर निर्यातीवर अर्थव्यवस्थेची वाढ अवलंबून असणे योग्य नाही अस म्हणालो मी.
धन्यवाद!
Pages