खरंतर इथे मला मराठी, महाराष्ट्रातील अ मराठी लोकांच स्थलांतर आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारतातील भाषिक विविधता आणि प्रांतवाद ह्याचा विचार करायचा आहे. दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेच्या माध्यमातून ह्या विषयी आंदोलन केलं आणि बरच रणकंदन माजल होत. हा धुरळा आता खाली बसला आहे. विषय तसा मागे पडला असला तरी विचार करायला आपल्या मनात बरेच प्रश्न ठेवून गेला आहे.
ह्या प्रश्नाला अनेक बाजू आहेत. सर्व प्रथम हे मान्य करायला हव कि हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्या माहितीतील अनेक लोकांच आणि बऱ्याच (विशेषतः इंग्रजी) माध्यमांच तर ठाम मत आहे कि इथे मुळात कांही प्रश्नच नाही आणि हे शुद्ध राजकीय हेतूंनी प्रेरित कांड आहे. आपल्या देशातील माध्यमांवर (त्यातल्यात्यात इलेक्ट्रॉनिक) खर तर स्वतंत्रपणे लिहायला हव. कदाचित राज ठाकरेंचा हेतू फक्त राजकीय असू शकतो....किंवा तस नसेलही. पण ह्या विषयाचा अराजकीय दृष्टीने धांडोळा घेतला पाहिजे. राजकारणी लोकं ह्या विषयावर खोलात जाऊन विचार मांडत नाहीत हे एक वेळ समजू शकत पण ह्या विषयाबद्दल आपल्या सर्वसामान्य लोकांच काय मत आहे? का आपण हो-नाही-कदाचित ह्या त्रिकोणात अडकलोय? सामाजिक विज्ञानाच्या अभ्यासकांच काय मत आहे? सामाजकारणाने खरंतर राजकारणाची दिशा ठरवायला हवी पण बहुतेक उलट होतंय. संविधानात नागरिकांना स्थलांतर करण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे ह्या एका वाक्यात संपूर्ण विषयावर बोळा फिरवणे योग्य होणार नाही.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अमराठी लोकं स्थलांतर करतात. त्याची कारण अनेक आहेत - आपलं राज्य देशातील एक आघाडीचं राज्य आहे, इथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण, शहरीकरण झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे, कायदा सुव्यवस्था तुलनेने चांगली आहे. किमान स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या ४/५ दशका पर्यंत तरी नक्कीच हि परिस्थिती होती. मागच्या कांही वर्षात हे चित्र झपाट्याने बदलतंय. हे स्थलांतर मुंबईत सर्वाधिक होतं पण इतर शहरात पण हि संख्या लक्षणीय आहे उदा. पुणे, नागपूर, औरंगाबाद व जवळपास सर्व महत्वाची जिल्ह्याची शहरं. देशात काय इतरत्र अस स्थलांतर होत नाही का? होतं. पण वेगळी भाषा, संस्कृती, इतिहास असणाऱ्या लोकांच सर्वात ज्यास्त स्थलांतर महाराष्ट्रात होत. मध्य प्रदेशातून बिहार किंवा उत्तरप्रदेश, दिल्लीत स्थलांतर करणे आणि दिल्लीतून चेन्नईत स्थलांतर करणे वेगळं. राज्या-राज्यांमधली विविधता कमी अधिक प्रमाणात आहे. त्या अर्थानं अधिक विविधता असणारं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होत. मित्रांमध्ये चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते की अमराठी लोकांना महाराष्ट्रात यायला, राहायला आणि जमलं तर स्थायिक व्हायला आवडत. माझे मित्र कामानिमित्त चेन्नई कोचीला गेले तरी त्यांची पहिली पसंती मुंबई पुण्यालाच असते. ह्याचं अजून एक कारण म्हणजे असं स्थलांतर करणं सोप्प आणि सोयीच आहे.
म्हणून काय झालं, अस स्थलांतर रोखता येत नाही ... तस करण बेकायदेशीर होईल ... आपण सर्व भारताचे नागरिक आहोत .... हा काही प्रश्न होऊ शकत नाही. माझ्या अनेक मित्राचं मत. ते बरोबर आहेत. प्रश्न हे स्थलांतर नाही तर त्या नंतरचा आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित झालेली हि लोकं महाराष्ट्राच्या मूळ प्रवाहात इतक्या वर्षानंतर सुद्धा मिसळली नाहीत हे खर दुखण आहे. स्थलांतरितांचे वेगळे भाषिक, सांस्कृतिक गट महाराष्ट्रात आहेत, ते इथे रुजलेत, "भैया हात पाय पसरीच्या" चालीवर वाढीला लागलेत व त्याने महाराष्ट्रातच मराठी संस्कृती दुय्यम व हळू हळू अल्पसंख्यांक होत आहे. बऱ्याच मराठी लोकांच्या मनात हे खदखदत आहे. ह्यावर विचार व्हायला हवा. स्थलांतरितांनी मूळ संस्कृतीत मिसळायला हवं - हा संघर्ष कमी करण्यावर नामी उपाय आहे. परराज्यातून आलेल्या रेल्वे गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकाला फलाटावरच अस्खलित मराठी यायला पाहिजे अस मी म्हणणार नाही. स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीत हे कदाचित शक्य होणार नाही पण दुसरी पिढी मिश्र वळणाची आणि तिसरी व त्यानंतरच्या सर्व पिढ्या पूर्णपणे मराठी संस्कृतीला आपलं मानणाऱ्या बनणे आवश्यक आहे. इतक्या कि शिवाजी महाराज म्हणाल्या बरोबर आपसूक जय त्यांच्या मुखातून निघेल, ते घरी बाहेर मराठी बोलतील आणि स्वतःला गर्वाने मराठी सांगतील. दुर्दैवाने अस कांही घडल नाही हे खर. गुप्ते आणि गुप्ता हा फक्त अडनावांचा फरक असता तर तो सुदिन.
आता काही लोक चार दोन अपवाद दाखवतील व दिशाभूल करायचा प्रयत्न करतील. आज काल थोड कोणी काही बोलल किंवा काही चर्चा केली कि हि अपवादाची मात्रा देऊन बुद्धिभेद (विचकाच खरतर) करणारे आणि आपण पण कसे (अर्ध्या हळकुंडाने) पिवळे आहोत हे दाखवणारे इथे तिथे दिसतात. उगाच क ला अ ने भागायचं आणि ज्ञ बाकी सोयीस्कर दुर्लक्षायची. हि प्रवृत्ती अशीच राहिली तर उद्या, आज जातोय तितकाही भाग अ ने क ला जाणार नाही. असो.
महाराष्ट्रातल्या स्थलांतरितांनी मराठीला आपलं न बनवण्यामागे अनेक कारण आहेत. ह्यातलं पहिल सर्वात महत्वाच कारण म्हणजे अस काही करण आवश्यक आहे अस त्यांना वाटतच नाही. मी भारतीय आहे आणि महाराष्ट्र पण भारतातच आहे तेंव्हा मी माझ्या भाषिक, सांस्कृतिक ओळखीने राहीन व त्यात काही वावग आहे अस त्यांना वाटत नाही. नाही म्हणायला कृपाशंकर सिंह म्हणतात कि मराठीवर संकट आलं तर रक्त सांडणारे पहिले आम्हीच असू. अर्थात ते किती खोटं आहे हे मी वेगळं सांगायला नको. महात्मा फुले माहित नसलेले अबू आजमी महाराष्ट्राचे आमदार आहेत (मटा मध्ये बातमी वाचली होती), राजीव शुक्ला महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार आहेत (महाराष्ट्राच्या किती प्रश्नांबद्दल त्यांना जिव्हाळा आहे आणि त्यावर त्यांनी राज्यसभेत आवाज उठवला देव जाणे) कित्तेकांना संत ज्ञानेश्वर, तुकाराम माहित नाहीत, शिवाजी महाराज लुटमार करणारे होते अस काहींना वाटत, मराठी भावगीत आणि लोकगीत त्यांना परके आहेत, अभिमान वाटावा अश्या गोष्टींबद्दल त्यांना अभिमान नाही आणि चिंता वाटावी अश्या गोष्टींबद्दल त्यांना चिंता नाही. माझे कित्तेक मित्र परदेशस्थ ग्राहकांसमोर "विविधतेत एकता" गात असतात पण खरंतर त्यांना हि विविधता नकोशी असते आणि सगळं अमेरिकेसारख असत तर कित्ती बर झालं असत अस त्यांना वाटत. महाराष्ट्रातील अनेक गावात मराठी लोकांना गुजराती समाजाने एकजुटीने बाजारातून हद्दपार केले, गुजराती डॉक्टरांनी मराठी डॉक्टरांबद्दल अफवा पसरवल्या, अनेक उद्योगातून अमराठी लोक बढती व भरतीच्या वेळेस त्यांच्याच राज्यांच्या लोकांना पसंती देतात, एकत्र राहून एन केन प्रकारेण आपल्या लोकांच्या प्रभावात वाढ करत राहतात.
अस सगळ हे लोक सुखनैव इतकी वर्ष करू शकतायात म्हणून मराठीला आपलं मानण तर दूर उलट त्याबद्दल त्यांना काही साधा आदर सुद्धा राहिला नाही. मराठी खाद्यपदार्थ, शब्द, गाणी आणि शेवटी लोक - आधी माहिती नाही म्हणायचं मग माहिती असायला पाहिजे अस काही नाही अस म्हणायच मग माहिती असण्याच्या लायकीची नाहीत अस म्हणायच आणि शेवटी चक्क टिंगल करून हिणवायचं. राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर ह्या क्रमात चढत्या दिशेने वाढ झाली आहे अस मला तरी दिसतंय. जर मराठी शिवाय माझ काही अडत नसेल तर मग ती दुय्यमच झाली ना. वरच्या दिलेल्या क्रमात जशी वाढ होत गेली तशी मराठी भाषा, इतिहास, संस्कृती दुय्यम आणि डाउन मार्केट ठरली.
अजून दोन उदाहरणांचा उहापोह करणं मला आवश्यक वाटत - १) कौशल इनामदारांना मुंबईमध्ये सूटच्या दुकानात घाटी म्हणून हिणवल गेल होत. त्यानंतर त्यांनी मराठी अभिमान गीताची निर्मिती केली. ह्या उपक्रमात भाग घेतलेल्यांना हे ठाऊक असेल. २) बऱ्याच वर्षांपूर्वी विनय आपटेंनी शिवाजी महाराजांवर आधारित मालिका बनवली होती पण त्यांना शिवाजी बिकता नही म्हणून सांगितलं गेल होत. खुपते तिथे गुप्ते मध्ये त्यांनीच हि गोष्ट सांगितली होती. रीमा लागुनी सुद्धा हिंदीत मराठी म्हणून काम करताना प्रयास पडले अस सांगितलं होत. कदाचित मराठी बद्दल इतर प्रांतातल्या लोकांना आकस असेल व ते पण एक कारण असू शकेल पण त्यात मी अधिक खोलात जाऊ इच्छित नाही, ते विषयांतर होईल आणि वस्तुनिष्ठ पण असणार नाही.
काही लोक म्हणतील कि अहो त्यात काय? .... आपण थोड दुसऱ्यांच घ्यावं .... त्यांनी थोड आपलं घ्यावं ... संस्कृती अभिसरणातून ती अधिक उत्तम होत जाईल. साखरेचा पाक लावलेलं हे वाक्य बुद्धिभेद करायचं अजून एक नामी शस्त्र आहे. देवाण घेवाण उत्तम पण नक्की असं घडतंय? अस्सल मराठी ताटात एखादी दाल बाटी किंवा पनीर कढाई वगैरे समाविष्ट झालं तर चांगलच आहे पण ताटात कोल्हापुरी ठेचा सोडून सगळं काही बाहेरचं असेल तर ते ताट मराठी राहील का? (उगाच नाही मराठी खानावळ शोधावी लागत.) हे फक्त एक उदाहरण होत शब्दशः अर्थ घेवू नये. देवाण घेवाण ठीक पण शेवटी ती मराठी भाषा आणि संस्कृतीच राहिली पाहिजे. तस नाही झालं तर मग तेच - विविधता नष्ट सगळं एकसारख.
हा लेख वाचणाऱ्यांना अस वाटेल कि मला काही वाईट अनुभव आलेत आणि संतापून मी हा लेख लिहितो आहे. मी खरच सांगतो कि अस काही नाही. मी शक्यतो ह्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहतो. आपल्यातीलच काही लोकांना वाटते की परप्रांतीयांनी मराठीला डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही, थोडा आदर देणे पुरेसे आहे. मला व्यक्तीशः अस वाटत कि जर आपण मराठीला त्यांनी आपलस कराव अस म्हणालो तर किमान आदर तरी मिळेल. हे सगळ बाजूला जरी ठेवल तरी - आपल्या देशातील हि विविधता जपली जावी, भाषिक-सांस्कृतिक संघर्ष कमी व्हावा व स्थलांतरितांमुळेचे प्रश्न कमी व्हावे ह्या साठी त्यांनी स्थानिक संस्कृतीत मिसळणे अनिवार्य आहे.
असं सगळ घडायला अजून एक कारण म्हणजे आपण सर्व मराठी बंधू भगिनींनी ह्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. आपल्याच लोकांना कसा मराठी भाषेचा अभिमान नाही अस म्हणून हा मुद्दा इथे संपत नाही. थोड खोलात जाव लागेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांचे बलिदान देऊन आपण मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करून घेतली पण मला अस वाटत कि आपण खरतर तो लढा हारलो. लौकीकाप्रमाणे युद्धात जिंकून सुद्धा तहात हरल्या सारखे. मुंबई मिळाली तरी राष्ट्र का राज्य हा पेच / हि शंका / हा घोळ आपल्या समाजात टिकून राहिला. राज्याच्या बाजूने बोलल तर राष्ट्राद्रोहाची टोच मनाला लागते आणि राष्ट्राच्या बाजूने बोलल तर भाषा संस्कृतीला दुय्यम मानावं लागत ह्या विवंचनेत आपण अजूनही आहोत. मुंबई लढ्याच्या निमित्ताने ह्या विषयावर खोल मंथन होऊन काही एक कायम स्वरूपी तोडगा विचार किमान मराठी समाजाने तरी अवलंबायला पाहिजे होता. बरेच जण दोन टोकाच्या मध्ये तर काही लोक एखाद्या टोकावर आहेत. त्यावेळेस ह्या विषयाचा अजून तड लावला तर देशात आणखी फाळण्या होतील ह्या भीतीने ते सोडून दिल असावं. स्वातंत्र्याच्या वेळेस आणि नंतर आपण बऱ्याच गोष्टी भीतीतून केल्या ज्याचा आपल्या देशावर चुकीचा परिणाम झाला अस मला व्यक्तीशः वाटत.
परप्रांतातून आलेल्या लोकांनी इथली भाषा संस्कृती आपलीसी करावी ह्यासाठी आपण आग्रह धरला नाही व काही प्रयत्न सुद्धा केले नाहीत. सुरुवातीला कुतूहल म्हणून, नंतर आपल्याच देशातले आहेत म्हणून, त्यानंतर आगत्य म्हणून किंवा मी कसा राष्ट्र प्रेमी आहे हे दाखवायला म्हणून आणि हिंदी राष्ट्र भाषा आहे ह्या चुकीच्या समजुतीतून आपण हिंदी बोलत राहिलो. आपल्याला वाटल असेल जस मी हिंदी बोलतो तस तो हळू हळू मराठी शिकेल पण आत्ता आपल्या लक्षात येतंय कि तस काही झालं नाही. आत्ता तर ते म्हणतात कि तुम्हालाच हिंदी येते तर मग आम्हीं का मराठी शिका.
काही लोक म्हणतील कि लिपी देवनागरी असल्यामुळे हिंदी शिकणं सोप आहे व त्यामुळे आपण मराठीचा आग्रह धरू शकत नाही. जे कि दक्षिण भारतीयांच्या बाबतीत होत. (आपल्या लोकांची हिंदी पण एक स्वतंत्र विषय आहे म्हणा). पण मग सारख्या लिपीचा फायदा आपल्याला हिंदी शिकायला होतो तर मग तो त्यांना मराठी शिकताना पण व्हायला पाहिजे. उत्तर भारतीयांना तर हे गंगा उलटी वाहण्याचा प्रकार वाटेल. काहींना वाटत हिंदी मुळे आपल्या युवकांच्या नौकरीच प्रमाण वाढत. मला तरी तस दिसत नाही. उलट हिंदीला विरोध करणारे दक्षिण भारतीयच मला जिकडे तिकडे दिसतात. अगदी केंद्र सरकारी नौकऱ्यामध्ये पण. खरंतर साखरेचा पाक लावलेल्या ह्या सांस्कृतिक देवाण घेवाणीत आपला आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे हेच खर.
परप्रांतीयांनी आपल्या संस्कृतीत मिसळण्यासाठी भाषा हा अत्यावश्यक आणि प्रभावी उपाय आहे. पण तो पुरेसा नाही. कानावर सतत मराठी भाषा पडणे, मराठी सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होणे, मराठी शाळेतून मराठी इतिहास शिकणे, मराठी मित्र मंडळीत वावरणे अश्या अनेकविध मार्गांनी हे कराव लागेल. (अमेरिकेत गेलेले मराठी शेवटी कसे अमेरिकन होऊन जातात ते डोळ्यासमोर आणावे.) सध्या महाराष्ट्रातच नवीन मराठी शाळांना परवानगी नाही तेंव्हा परप्रांतीयांना काय सांगणार?
भाषेच्या अनुषंगाने इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो कि हिंदी आता जवळ जवळ महाराष्ट्राची सार्वजनिक भाषा झाली आहे. टॅक्सी चालक, ऑटो चालक, चणे फुटाणे विकणारा, सुरक्षा रक्षक, बरेच दुकानदार, ग्राहक आणि एकूणच परप्रांतीय एवढे वाढले आहेत कि आपण माहित नसलेली व्यक्ती हिंदीच आहे अस समजून सरळ हिंदीत सुरु करतो. म्हणजे परप्रांतीयांच्या कानावर मराठी पडणे तर दूर त्यांना मुळी सुद्धा मराठी ऐकण्याचा त्रास होऊ नये याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे. हे इतक्या धोकादायक पातळीवर आहे कि आत्ता तर थोड सुद्धा टापटीप दिसणाऱ्या बरोबर लोक सरळ हिंदीत सुरु करतात. मग समोरचा हिंदी असेल अस समजून आपण पण हिंदीत सुरु करतो. ह्याने दोन मराठी लोक महाराष्ट्रातच हिंदीत बोलत राहतात. माझ्या बाबतीत अस घडलंय. आता मी आधी सरळ मराठीतून उत्तर देतो. ह्यामूळे अजून एक होत ज्या परप्रांतीयाने मराठी शिकली असेल तो पण मराठीचा नाद सोडून देतो. मराठी चित्रपट मालिकांमध्ये पहा - त्रयस्त व्यक्ती सरळ अमराठी दाखवली जाते. मुंबई पुणे मुंबई चित्रपटात सिंहगडावरचा प्रसंग आठवा - जेंव्हा ती म्हणते कि मी कोणाशीही भांडू शकते तेंव्हा ती बाजूने जाण्याऱ्या माणसाशी हिंदीत भांडायला सुरु करते. हिंदीत का? म्हणजे त्रयस्त व्यक्ती हिंदी आहे हे गृहीत धरण्य इतपत परिस्थिती झाली आहे. दगडू शेठ गणपती मंदिराच्या बाजूला फळांचा रस विकणारा माणूस माझ्याशी असाच हिंदीत सुरु झाला. त्याला चांगला समजावला होता मी.
परप्रांतीय मराठी संस्कृतीत मिसळत नाहीत ह्याच अजून एक कारण म्हणजे मराठीची हि स्पर्धा फक्त हिंदीशी नाही तर इंग्रजीशी पण आहे. आर्थिक उदारीकरणा नंतर मराठी आणि अमराठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने अवलंबिली. माहिती तंत्रज्ञान, डॉट कॉम आणि बी पी ओ च्या ढग फुटी नंतर इंग्रजी बोलणाऱ्यांचे नाक्या नाक्या वर पेव फुटले. ह्याच्यातून असा समाज निर्माण झाला कि इंग्रजी शिवाय नौकरी नाही, यश नाही, काही खर नाही. इंग्रजी येईल ते शहाणे, हुशार, यशस्वी आणि न येणारे मागास. हे धृवी करणच भारत विरुद्ध इंडिया ला कारणीभूत आहे अस मला वाटत. ह्या सो कॉल्ड हाय फाय लोकांना कुठलीच भारतीय संस्कृती भाषा इतिहास आता उपयोगाच्या नाहीत व सरळ केराच्या टोपलीत टाकल्या पाहिजेत अस वाटत. अमेरिकेत कायमच स्थायिक झालेल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने मराठी संस्कृती सोडून स्थानिक संस्कृती, भाषा अनुसरली तर ते योग्य आहे पण इथे तर महाराष्ट्रातच अमेरिका वसू पहात आहे.
विवेकानंद म्हणाले होते तुम्ही आपला धर्म विसराल तर मिटून जाल. विवेकानंदांना धर्म म्हणजे कर्मकांड अभिप्रेत नसेल. मी तरी ह्याचा अर्थ असाच घेतो कि आपण जर आपली भाषा इतिहास ओळख संस्कृती विसरलो तर आपण कधीच पुढे पडू शकणार नाही. मी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता आहे. सांस्कृतिक राष्ट्रावादाशिवाय जगात विकसित झालेला एक तरी देश आहे का? मुळात राष्ट्र म्हणजे फक्त लोकांचा समूह नव्हे - संस्कृती तर डीएनए आहे राष्ट्राची. उद्या आपली संस्कृती टाकून आपण विकसित झालो तर ते काय कामाच - विकसित झाला असेल फक्त एक लोकांचा समूह - राष्ट्र आणि समाज तर नष्ट झाला असेल. गांधीजी म्हणाले होते खेड्यांकडे चला - प्रत्यक्षात खेड्याकडे नाही तर किमान आपल्या मुळांकडे चला असा अर्थ घेऊ. इथे तर आम्ही ती उखडून टाकत आहोत. बहुसंख्य लोकांची जी भाषा आहे तीच जर नष्ट झाली तर त्यांचा विकास कसा होणार.
ह्या लोकांना काय वाटत कि आपल्या देशातले सगळे इंग्रजी बोलायला लागले कि सर्व प्रश्न सुटतील? आफ्रिकेतल्या कित्तेक देशात सर्व लोक इंग्रजी बोलतात मग काय ते विकसित आहेत? आणि हे मुळातच अव्यवहार्य आहे. सर्वांना इंग्रजी शिकवण्या पेक्षा इंग्रजीतल ज्ञान आपल्या भाषेत आणल्यामुळे हे प्रश्न सुटतील. उच्च शिक्षित लोकांच्या सुरुवातीच्या पिढीतील लोकांनी हे करायला पाहिजे होत पण त्या पेक्षा आपण कसे इतरांपेक्षा वेगळे आणि आधुनिक आहोत ह्याच विचारात हे लोक मश्गुल राहिले.
का बर मी महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मराठीतून करू शकत? महाराष्ट्रात सर्व प्रकारच माध्यमिक, उच्च शिक्षण, संशोधन मराठीतून व्हायला पाहिजे. तसं झाल तर ते अधिक लोकांपर्यंत पोहंचेल , आपल्या समाजाला पाहिजे अस तंत्रज्ञान त्यातून निघेल, संशोधन वाढेल आणि नुसत परदेशातील ग्राहकांना सेवा देण्याबरोबर अधिक भरीव अस योगदान आपण देऊ शकू. वर उल्लेखलेली सांस्कृतिक देवाण घेवाण आतबट्ट्याची होणार नाही. सरकार म्हणतं विकास झालाय पण तो तळा गाळापर्यंत पोहंचला नाही. त्यासाठी बहुजन समाजाची भाषा वापरायला पाहिजे. इथे तर पहिली पासून इंग्रजी सुरु आहे. आपण तर अशी व्यवस्था करून ठेवली आहे कि बारावी नंतरच सर्व प्रकारच (कला मराठी सोडून) शिक्षण इंग्रजीत आहे. म्हणजे इंग्रजीशिवाय तुम्ही जगू शकणार नाही अशी व्यवस्था आहे. जपान मध्ये इंग्रजी नाही येत म्हणून कोणाच बिघडलय का? किंवा फ्रांसमध्ये, कोरिया, जर्मनी, रशिया. मग माझ्या महाराष्ट्रात मराठी येत पण इंग्रजी येत नाही म्हणून का बिघडाव? सुशिक्षित बरेच पालक आपल्या पाल्याला आज काल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. म्हणजे तो पाल्य शाळेत इंग्रजी शिकणार, मित्रांशी इंग्रजीत बोलणार, घरी आईला बाबांशी इंग्रजीत बोलणार, आज्जी आजोबांकडून कौतुक होणार - मग तो मोठा झाल्यावर आपल्या पाल्याला पण इंग्रजी शाळेत घालणार मग एक पिढी तयार होणार जी संपूर्णपणे इंग्रजीवर वाढलेली असेल. मग मराठी मरेल नाही तर काय? आपला पाल्य स्पर्धेच्या युगात मागे राहील ह्या भीतीने पालक अस करतात. अस सतत भीतीने गोष्टी करत राहिलो तर एक दिवस आपण मातीत जाऊ. संत तुकारामांची गाथा आपण रोज पाण्यात बुडवत आहोत. मराठी शाळांची परिस्थिती पण चिंतेचा स्वतंत्र विषय आहे.
सांस्कृतिक राष्ट्रवाद वगैरे अस काही नसत - जग फार पुढे चाललय - आता संगणकाचा जमाना आहे. माझे काही मित्र. माझे हे मित्र खरतर अमेरिकेच्या / पाश्चात्य सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळी पडतायत त्यांच्याच नकळत. संगणक आला म्हणून कुठल्या देशांनी आपली भाषा सोडली? उत्तर : "भारत". जपान चीन छोटे छोटे युरोपियन देश ह्यांनी संगणकात आपली भाषा वापरायला सुरुवात केली. माझा स्विस ग्राहक जर्मन मधून आउटलूक वापरतो. आम्ही तर मराठीच सोडली मराठीतून आउटलूक काय वापरणार.
मला माहिती आहे हे काही सोप काम नाही. आपल्याला कित्तेकदा पर्यायी मराठी शब्द आठवून सुद्धा सापडत नाहीत तिथे मराठीतून उच्च शिक्षण म्हणजे अवघड काम आहे. पण त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. २०-२५ वर्षानंतर कदाचित ते प्रयत्न फळाला येतील. पण मला हि दिशा महत्वाची वाटते. काही जण म्हणतील हे इंग्रजी हिंदी शब्द मराठीत नवीन भर आहे आणि ह्यांनी भाषा समृद्ध होते. मला तस नाही वाटत. add हा शब्द मराठीत भर आहे का? शब्द उच्चारल्या नंतर मेंदूत अर्थ स्पष्ट होतो तेंव्हा तो मराठी असतो का? मी भाषा शात्रज्ञ नाही पण मला तस वाटत नाही. हं कदाचित अजून काही वर्षानंतर हा शब्द पूर्णपणे मराठी वाटायला लागेल. तस पाहिलं तर मराठीत नवीन शब्दांची भर पडत नाही हेच खर. ऑक्सफर्ड जस नवीन शब्दांची भर घालून शब्दकोश काढतो तसं मराठीत नवीन शब्दांची भर पडली आहे का? स्वा. सावरकरांनी नवीन मराठी शब्दांची भर घातली होती त्यानंतर कोणी अस केल्याच ऐकिवात नाही. मुळात भाषेचा वापर कमी होत असेल, ती प्रवाही नसेल तर तिच्यात नवीन शब्दांची भर पडणार कशी. अमेरिकेतल्या अनेक चांगल्या विनोदी मालिकांमध्ये शब्दांची जादू, नवीन शब्दांची रचना, परिस्थितीत शब्दांच्या विशिष्ट मांडणीतून निर्माण होणारा विनोद पाहायला मिळतो. पुलं एकदा म्हणाले होते अत्र्यांच्या साहित्यातली मराठी भाषा हा डॉक्टरेट करण्याचा स्वतंत्र विषय आहे.
आता मात्र माझे मित्र फुटतात. महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कानडी राजस्थानात राजस्थानी भाषा चालतेय वाढतेय आणि अनिवार्य आहे...प्रत्येक राज्य आपल्या भाषा संस्कृतीने वाढतंय हि गोष्टच त्यांना पटत नाही ...म्हणजे आपण चक्क देशाची फाळणी करतोय अस त्यांना वाटत. एका मित्राला जेंव्हा मी सांगितला कि हिंदी राष्ट्र भाषा नाही, हिंदी आणि मराठीला संविधानात एकच दर्जा आहे तेंव्हा ते त्याला पटलं नाही. जेंव्हा संविधान दाखवलं मग पटलं, पण म्हणतो कसा - गेल्या साठ वर्षात आपण एक राष्ट्रभाषा बनवू शकलो नाही ....लाज वाटायला पाहिजे आपल्याला.
आपला देश एक खंडप्राय देश आहे, इथली एक एक राज्य स्वतंत्र देशाच्या क्षमतेची आहेत, तेंव्हा आपापल्या भाषा संस्कृतीच्या पायावर उभे राहून एकमेकांशी व बाहेरील देशांशी व्यापार उद्दीम करून ते विकसित होऊ शकतात आणि खरतर तेंव्हाच भारत पण विकसित होईल हे पटायला एवढ अवघड का आहे? आपली भाषा संस्कृती बाळगली तर ती देशाच्या व इतर राज्यांच्या विरोधात जाण्यासारखं आहे आणि मग देशाची फाळणी होईल ह्या भीतीत आणि भ्रमात आपण किती दिवस राहणार? विविधतेत एकता जे आपण म्हणतो ते कित्ती वरवरच आहे आणि आपल्यालाच त्यावर कसा विश्वास नाही हे ह्यानिमित्ताने कळत. भारत हा जगातील एक विलक्षण देश आहे जिथे एवढी विविधता आहे. हे वास्तव मान्य करू, हि विविधता टिकवू, वाढवू, आपापल्या राज्यात आपापली संस्कृती ह्या सोप्या तत्वाने त्यातील संघर्ष मिटवू आणि जेंव्हा एक एक राज्य आपल्या उच्चतम क्षमतेला पोहंचेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने भारत महान असेल हे पटायला का एवढ अवघड आहे? मग नाही आम्हाला राष्ट्र भाषा - कुठे बिघडलं...राष्ट्र भाषा नाही म्हणजे आमची एकता अखंडता धोक्यात येते? मी जर मराठी नसेल तर मी भारतीय राहू शकतो का? माझं भारतीय असणं माझ्या मराठी असण्याशी संलग्न आहे. मराठी, कानडी, गुजराती, बिहारी अश्या अनेकविध ओळखीतूनच भारतीय ओळख तयार होते. आपण वेगळे झालो तर संपलो हे आपण इतिहासातून शिकलोय. पण आपण भाषिक सांस्कृतिक मुस्कटदाबीने संघर्षाने एकत्र राहिलो तर मूळ उद्देश्यालाच हरताळ फसल्यासारख होईल.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुद्याकढे मी परत वळतो. आपल्या देशात संघराज्य व्यवस्था (Federal) केंद्राकडे झुकणारी आहे. आणखीन एका फाळणीच्या भीतीने तसं केल गेल होत. पण हि भीती अजूनही आपल्यात आहे हेच दिसत. हि भीती काढून टाकून आपण खऱ्या अर्थाने संघराज्य निर्माण केलं पाहिजे ज्यात वर उल्लेखिलेल्या विचारांचा अंतर्भाव असेल.
उठता बसता अमेरिकेची उदाहरण देणाऱ्या माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो कि अमेरिकेची संघराज्य व्यवस्था इतकी मूलगामी आहे कि त्यांच नावच मुळी अमेरिकी संघराज्य अस आहे. आपल्याही देशाच नाव भारतीय संघराज्य अस आहे पण आपल्याला प्रजासत्ताक असल्याचा इतका टेंभा आहे कि आपण संघराज्य आहोत हे विसरतो. अमेरीकेचे सार्वभौमत्व (ज्याला इंग्रजीत Sovereignity म्हणतात) ते त्यांच्या राज्यात विभागून आहे. म्हणजे अमेरिकेची राज्य सार्वभौम आहेत. त्यांना स्वताःच संविधान आहे आणि प्रत्येक राज्याच स्वताःच सर्वोच्च न्यायालय पण आहे. अर्थातच केंद्र सरकारच्या संविधान आणि कायद्या विरोधात राज्य सरकारांना जाता येत नाही. आपल्या कडे संयुक्त सूची बद्दल केंद्राला शेवटचा अधिकार दिलेला आहे तर अमेरिकेत संविधानात नमूद नसलेले अधिकार राज्य सरकारांसाठी राखीव ठेवलेले आहेत. अमेरिकेत रोजच्या जीवनाशी संबधित कायदे हे मुख्यत्वे करून राज्य सरकारांची आहेत.
मला वाटत मला काय म्हणायचं आहे ते मी मांडलय. तुम्ही जरूर आपले विचार अभिप्राय नोंदवा. कोणाकडे अधिक माहिती असल्यास अवश्य लिहा. कोणाला आवडला नसल्यास आणि वेगळा युक्तिवाद असेल तर ते हि जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
नाही, मी शब्दकोशातला अर्थ
नाही, मी शब्दकोशातला अर्थ सांगत होतो.
इंजिनला यंत्र म्हणतात ना>> >>
इंजिनला यंत्र म्हणतात ना>> >> संयंत्र !
संयंत्र? संयंत्र वाटत नाही,
संयंत्र?
संयंत्र वाटत नाही, त्या शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळा आहे एवढे माहीत आहे आणि मशीनरीशी किंवा प्लॅन्टशी संबंधित आहे हेही माहीत आहे
>>> अहमदनगरला औरंगजेब होता
>>> अहमदनगरला औरंगजेब होता आणि सोलापूरखाली आदिलशाह
अशा रीतीने हिंदी सर्वत्र बोलली जात असणे हेही त्यामागचे (हिंदी सिलॅबसमध्ये असण्याचे) कारण आहे.
आंध्रप्रदेशात अनेक शतके कुतुबशाही होती आणि कर्नाटकात आदिलशाही. पण त्या राज्यांनी हिंदी हा विषय ऐच्छिक ठेवला आहे. महाराष्ट्रात मात्र १९४७ नंतर त्रिभाषा सूत्र स्वीकारून हिंदी सक्तीची केली आहे.
>>>> एक दिवस अचानक उठून तुम्ही (म्हणजे सरकार) भाषिक निर्णय घेऊ शकत नाही. अनेकजण वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत असतात. महाराष्ट्रात 'अमराठी' लोक आज वाढलेले असतील, पण ते मुळातच 'बडी तादात' से आहेत. (की तादाद?). जाल तेथे अमराठी माणसे पिढ्यानपिढ्या राहात आहेत.
हिंदी शिकणे पूर्णपणे थांबविणे शक्य नाही. पण निदान हिंदी विषय हा सक्तीचा न ठेवता ऐच्छिक ठेवला जाऊ शकतो. ज्यांना हिंदी शिकायचे असेल त्यांनी शिकावे, ज्यांना हिंदी नको आहे त्यांच्यासाठी चित्रकला, संगणकशास्त्र, जर्मन/फ्रेंच सारख्या परकीय भाषा, संस्कृत, अर्थशास्त्र अशांसारखे पर्यायी विषय असावेत. सध्या महाराष्ट्रात ७ वी पर्यंत हिंदी शिकावीच लागते. ८ वी पासून १०० गुणांचे संस्कृत, ५०-५० हिंदी-संस्कृत किंवा १०० गुणांचे हिंदी यापैकी कोणतातरी एक पर्याय घ्यावाच लागतो. अनेक शाळांमध्ये मराठी ऐच्छिक व हिंदी सक्तीची असा अभ्यासक्रम आहे. त्याऐवजी मराठी सक्तीची व हिंदी ऐच्छिक असा पर्याय हवा. किंबहुना मातृभाषेची सक्ती व हिंदी ऐच्छिक अशा अभ्यासक्रमामुळेच दक्षिणेत, बंगालमध्ये मातृभाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
१०० गुणांचे हिंदी ही एक
१०० गुणांचे हिंदी ही एक शिक्षा आहे
१) शिक्षणतज्ञांच्या मते तीन
१) शिक्षणतज्ञांच्या मते तीन भाषा बहुतांश लहान मुले विनासायास शिकू शकतात.
२) त्रिभाषिक सूत्र प्रथम १९६१ साली आले. इथे पान २० पहा.
३) त्रैभाषिक सूत्रानुसार विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मातृभाषेचा अभ्यास करावा.
हिंदी भाषिक राज्यांत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून इंग्रजी किंवा एक अन्य आधुनिक भारतीय भाषा शिकाव्यात असे अपेक्षित आहे. अ-हिंदी राज्यांत द्वितीय भाषा हिंदी/इंग्रजी, तृतीय भाषा इंग्रजी किंवा एक आधुनिक भारतीय भाषा शिकणे अपेक्षित आहे.(संस्कृतच्या आधुनिक स्वरूपाला आधुनिक मराठी भाषा म्हणून मान्यता आहे.) महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, ओदिशा यांनी त्रिभाषा सूत्र अंमलात आणले. तामिळनाडू वगळता अन्य एखाद्या राज्याने या सूत्राला विरोध केल्याचे आढळले नाही.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, संस्कृत (१०० गुणांचे) हे विषय शालान्त परीक्षेसाठी निवडता येतात. अगदी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही १०० गुणांचे संस्कृत शिकता येते.
Engineering म्हणजे
Engineering म्हणजे अभियांत्रिकी. म्हणजे मग Engine म्हणजे अभियंत्र असा शब्द आहे. चर्चा फारच रंगली आहे इथली.
एक गम्मत सांगतो. माझी आई निरक्षर आहे. ती पुर्वी १०० टक्के मराठीतून बोलायची. हल्ली ती पण Depend, letter, call, type, book, story, risk, face असे बरेच ईंग्रजी शब्द वापरते. तिला हे शब्द कसे कुठून माहिती पडले मला नवल वाटते आहे. ती आता माझ्याबरोबर सिंगापुरला आली आहे पहिल्यांदाच. तिच्यात झालेला हा बदल मी रोज बघतो आहे. मला आज ऑफीसमधे जाताना ok bye म्हणाली. मी स्वतः जवळपास १००% मराठीतूनच बोलतो. शिवाय आम्ही विदर्भातले आहोत. विदर्भात ईंग्रजी इतकी चालत नाही.
भरत, तुम्ही एवढे खरडलेत, पण
भरत,
या लोकानी ऑप्शनल या शब्दाचा अर्थ जो जे वांछील तो ते लाहो असा फारच व्यापक घेतलेला दिसतोय !
तुम्ही एवढे खरडलेत, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.. एखाद दुसरे राज्य वगळता सर्व राज्यात तीन भाषा शिकवल्या जातात हे मी वारंवार लिहिले आहे. विविध राज्यातल्या दहावीच्या परीक्षेचे टाइम टेबलच्या लिंकही दिल्या आहेत ज्यात तीन भाषांचा उल्लेख आहे. पण इतकं करुनही यु पी बिहार कर्नाटकात तीन भाषा शिकत नाहीत , म्हणून आंधळ्या लोकांचा थयथयाट चालूच आहे.. हिंदी ऑप्शनल ठेवा म्हणे ! आणि त्याला पर्यायी ऑप्शन काय? तर चित्रकला, संगणक, अर्थशास्त्र!! उद्या एखादा बागकाम, मल्लविद्या आणि भरतकाम असेही ऑप्शन मागेल.. आणखी एखादा चित्रकला, संगणक, अर्थशास्त्र, बागकाम, मल्लविद्या, भरतकाम... हेच माझे सहा विषय! असेही म्हणेल
तुमच्या त्या रिपोर्तमध्ये एक वाक्य आहे. Bilingual children not only have control over several ifferent languages but they are also academically more creative and socially more tolerant. आमची संस्कृती बुडते, दुसर्या राज्यातले लोक इथे येऊन वस्ती करतात, म्हणून हिंदी नको अशी कारणे देणार्या लोकाना पाहिलं की ठळक केलेले शब्द खरे असल्याची प्रचिती येते.
हो जामोप्या. हिंदी ऑप्शनलच
हो जामोप्या. हिंदी ऑप्शनलच आहे. संपूर्ण संस्कृत घ्यायची सोय आहे की. पण इंग्रजी आणि फ्रेंच भाषा हव्या असतील. मुळात त्रिभाषा सूत्रातले मातृभाषेतून शिक्षण हेच पाळायचे नाही आहे. मराठी भाषासुद्धा स्वतः शिकण्या बोलण्यापेक्षा हिंदीभाषिकांनी त्या बोलाव्यात यावर भर आहे. मुंबईतले गुजराती व्यापारी अगदी न सांगता मराठी बोलतात. महाराष्ट्रातल्या दक्षिण भारतीयांना कोणी म्हणणार आहे का की मराठीत बोला? उलट त्यांच्याशी आपणच फाडफाड इंग्लिश झाडू.
ज्या हिंदी भाषिकांकडून आपण हिंदीची अपेक्षा धरतोय त्यातले बहुसंख्य शरीरश्रम करून पोट भरणारे असतात. आमच्याकडे आलेला उत्तरप्रदेशीय रंगारी (वय वर्षे २४) निरक्षर होता. त्याला त्याचा क्लाएंट पत्ता फोनवर पत्ता सांगत होता, तो त्याने मला लिहून घ्यायला सांगितला. मग मी त्याला तो पत्ता वाचून दाखवत होतो (माझे दिव्य अक्षर त्याला कळेल की नाही ही काळजी) तर तो म्हणाला मला लिहिता वाचता येत नाही, मी हा कागद दाखवीत पत्ता विचारत जाणार. नोटा, पैसे मोजायचे आणि मोबाइल वापरायचे तंत्र त्याने कसे साधले याचे मला कोडे आहे. बरं; कामासाठी तो पार केरळपर्यंत जाऊन आला होता.
राष्ट्रीय एकात्मता, फुटीरतावाद आणि काय काय.....
>>बरं; कामासाठी तो पार
>>बरं; कामासाठी तो पार केरळपर्यंत जाऊन आला होता.
>>> हिंदी ऑप्शनलच आहे. हिंदी
>>> हिंदी ऑप्शनलच आहे.
हिंदी ऑप्शनला आहे ती ८ वी पासून. ५ वी ते ७ वी १०० गुणांची हिंदी सक्तीची आहे.
>>> >>बरं; कामासाठी तो पार केरळपर्यंत जाऊन आला होता.
या एका वाक्यातून बरंच काही सिद्ध होतंय.
>>> तामिळनाडू वगळता अन्य एखाद्या राज्याने या सूत्राला विरोध केल्याचे आढळले नाही.
फक्त तामिळनाडू नव्हे तर केरळ, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक, प. बंगाल अशा अनेक राज्यात हिंदी हा विषय सक्तीने शिकावा लागत नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी तो शिकावा, ज्यांना हिंदी नाही शिकायची त्यांनी त्या विषयाला असलेला पर्यायी विषय शिकावा. हेच धोरण महाराष्ट्रात असले पाहिजे.
जाऊन आला, म्हणजे निराश होऊन
जाऊन आला, म्हणजे निराश होऊन परत आला असे नाही तर तिथे कंत्राटदारासोबत एका कामासाठी गेला होता.
हो जसं त्याचं महाराष्ट्रात मराठीवाचून काही अडलं नाही तसं केरळात मल्याळम येत नसल्याने अडले नाही. त्याचे काम भिंतींना रंग देणे हे आहे. केरळी लोकांना ते त्याच्याकडून व्यवस्थित करून घेता आले.
http://www.scert.kerala.gov.i
http://www.scert.kerala.gov.in/2011pdf/kcf_final1.pdf
पान ३९ पहा.
The
educational policy of post-independent India is based on three-language formula. It is suggested that in Hindi speaking regions, Hindi, English and one of the South Indian languages are to be taught. In non-Hindi regions, along with regional language, English and Hindi are to be taught. Kerala
Kerala has effectively implemented the three-language formula. Along with the three-language formula, there is also opportunity in the state to
learn Arabic, Sanskrit and Urdu from the primary level itself. This has been of great advantage to the learners of the state.
मास्तुरे तुम्हाला हिंदी नको
मास्तुरे तुम्हाला हिंदी नको असेल तर तीही सोय आहे..
ऊर्दू किंवा कन्नड ( किंवा गुजराती किंवा इतर कोणतीही) माध्यमाच्या शाळेत जा. दुसरी भाषा मराठी, तिसरी इंग्रजी.
तुम्हाला पाऊस नको असेल तर तुमच्यापुरता रेनकोट किंवा छत्री वापरा.. पण तुम्ही सगळे ढगच काढून टाका, संपूर्ण राज्यालाच आच्छादन घाला अशा मागण्या केल्या तर हास्यास्पद दिसेल. तुम्हाला हिंदी नको म्हणून चित्रकला, भरतकाम, संगणक, मल्लविद्या, बागकाम... असे तुम्हाला सतराशे साठ ऑप्शन पाहिजेत... असे केले तर शाळेत पोरांपेक्षा मास्तरांचीच संख्या जास्त होऊन जाईल.
>>> It is suggested that in
>>> It is suggested that in Hindi speaking regions, Hindi, English and one of the South Indian languages are to be taught.
उ.प्र., बिहार इ. हिंदीभाषिक राज्यांमध्ये मध्ये हिंदी व इंग्लिश व्यतिरिक्त तामिळ, मल्याळम्, कन्नड, तेलगू या चार दाक्षिणात्य भाषांपैकी कोणती भाषा सक्तीने शिकावी लागते ते सांगा बरं. वरीलपैकी कोणतीही भाषा उ.प्र., बिहार मध्ये सक्तीने शिकावी लागत नाही. या भाषा दुसर्या विषयांना पर्यायी असू शकतील, पण या ४ पैकी कोणतीतरी एक भाषा शिकलीच पाहिजे अशी तिथे सक्ती नाही.
महाराष्ट्रात उलटे चित्र आहे. ५ वी ते ७ वी हिंदी शिकावीच लागते. त्याला पर्याय नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला हिंदी न शिकता ७ वी उत्तीर्ण होता येणार नाही. ८ वी पासून संस्कृतचा पर्याय आहे.
वरील वाक्यात "suggested" हा शब्द महत्त्वाचा आहे. वरील वाक्य फक्त मार्गदर्शक स्वरूपाचे आहे. तसा नियम किंवा कायदा नाही. ती फक्त सूचना आहे. सूचना पाळली नाही तरी चालते. पाळली तर आनंदच आहे, पण पाळली नाही तर तो गुन्हा नाही. त्यामुळे हिंदीभाषिक राज्ये ही सूचना धाब्यावर बसवून भारतातली इतर कोणतीही भाषा सक्तीने शिकवत नाहीत. तसेच दाक्षिणात्य राज्ये स्वत:ची मातृभाषा व इंग्लिश व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेची सक्ति करत नाहीत. महाराष्ट्राने ही सूचना प्रत्यक्ष परमेश्वराची आज्ञा समजून हिंदी इथल्या लोकांच्या डोक्यावर लादली आहे.
पाळली तर आनंदच आहे, हो. सगळे
पाळली तर आनंदच आहे,
हो. सगळे हिंदी शिकून आनंदातच आहेत.. तुमचे पोट सदाचेच दुखरे आहे. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तर आनंदात रहाणार नाही.
http://mycollege.in/timetables/bihar-ssc-exam-timetable.php
बिहारातल्या लोकाना मैथिली, उर्दू, बेंगाली, संस्कृत, अरबी, फारसी आणि भोजपुरी हे पर्याय आहेत. त्यातील सर्वाना सोयीस्कर होतील असे पर्याय ते निवडतात.
तुम्हाला बहुतेक ते लोक मराठी शिकत नाहीत ही पोटदुखी असणार.
हे त्रिभाषा सूत्र सगळ्या
हे त्रिभाषा सूत्र सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतच ठरवले गेले होते.
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी ते सूत्र अंमलात आणून राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपण कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले. हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल, पण भारताच्या संघीय कारभारासाठी राजभाषा तर आहे. भारतातील राज्ये ही स्वतंत्र राष्ट्रे नसून भारतीय संघराज्याचे भाग आहेत. तेव्हा वेगवेगळ्या राज्यांतील लोकांनी आपली राजभाषा शिकणे हे उचितच आहे.
हा अतिशय सरळ प्रतिसाद झाला
हा अतिशय सरळ प्रतिसाद झाला
बाकी चालू द्या. कर्नाटकात तरी
बाकी चालू द्या.
कर्नाटकात तरी तीन भाषा बालवाडीपासून शिकाव्या लागतात (इंग्रजी अणि कन्नड दोन्ही माध्यमाच्या शाळेत)
ज्युनिअर आणि सिनीयर केजीत टप्प्याटप्प्याने अक्षर ओळख आणि मग लिपी शिकवतात.
सुरूवातीला मला माझ्या बाळाला इतक्या भाषा लिहायला शिकवणे अवघड वाटले होते. पण आजूबाजूची मुले शिकत आहेत म्हणजे तो ही शिकेल.
काही वर्षांपूर्वी कर्नाटकात इंग्रजी माध्यमात शिकणार्या मुलांना कानडी पूर्ण वगळता येत होती.
टिव्हीमुळे हिंदी येतेय आणि शिकल्यामुळे इंग्रजी येतेय पण कानडी फक्त बोलता येतेय लिहिता येत नाही अशी इथल्या माझ्या पीढीची अवस्था आहे (२५ ते ३५ वय.)
नविन मुलांना वाचता येतेय कानडी पण आठवीपासून विसरतातच.
परवा मला ४ दिवस क्लिनिक बंद राहील हि सूचना कानडीत लिहायला कोण सापडत नव्हतं.
केमिस्टला इंग्रजीत शिकल्याने कानडी लिहिता येत नाही आणि नर्सेसना शुद्ध कानडी येत नाही त्यामुळे ''मॅडमाचो क्लिनिक चार दिवस बंद र्हवतला' अशा टाईपचं काहीतरी कानडी लिहून देत होते.
त्यापेक्षा महाराष्ट्रात मराठीचे बरे दिवस आहेत असं म्हणायला लागेल.
अर्थात भाषेचा व्यर्थ अभिमान नसला तरी मराठीचे संगोपन किमान महाराष्ट्रात व्हावे असे वाटतेच.
आणि शेवटी कितीही झालं तरी बाळाने "आई" अशी हाक मारल्यावरच जिवाचे समाधान होते हे खरेय. अर्थात हा सवयीचा आणि संस्कारांचा भाग आहेच पण तरीही...
धन्यवाद सती, चर्चा जरा वळणारी
धन्यवाद सती, चर्चा जरा वळणारी येईल ही अपेक्षा. माझा मुद्दा पण हाच होता की हा प्रश्न फक्त मराठीचा नाहीये. मुळातच भारताची रचना अशी आहे की स्थानिक भाषांना हळूहळू आर्थिक व्यावाहारास वाव कमी मिळेल. जे आत्ता तुम्ही कर्नाटकात बघता आहात तेच आपल्याकडे अजून ७-८ वर्षात बघायला मिळेल. बोलता आणि वाचता येते पण लिहिता येत नाही. आणि कोणाकडेही ठोस असा मार्ग नाहीये जेणेकरून भाषा जगेल. आर्थिक गोष्टी जोपर्यंत भाषेत होत नाहीत तोपर्यंत भवितव्य सुधारणे कठीण आहे.
>>> हे त्रिभाषा सूत्र सगळ्या
>>> हे त्रिभाषा सूत्र सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतच ठरवले गेले होते. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी ते सूत्र अंमलात आणून राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपण कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले.
महाराष्ट्रात हिंदीची सरसकट सर्वांना सक्ती करण्याऐवजी ऐच्छिक केल्याने राष्ट्रीय एकात्मता कशी धोक्यात येईल?
ज्या राज्यांनी हिंदी सक्तीची न करता ऐच्छिक केली आहे, त्यांच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे का?
ज्या राज्यांनी हिंदी सक्तीची न करता ऐच्छिक केली आहे, ती राज्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी कटीबद्ध नाहीत असे समजता येईल का?
हे त्रिभाषा सूत्र सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेतच ठरवले गेले होते, पण काही राज्ये ते अजूनही पाळत नाहीत. त्यात त्यांचे काहीही नुकसान झालेले दिसत नाही. ते न पाळल्यामुळे त्या राज्यात स्थानिक भाषा वापरावीच लागते. महाराष्ट्राने ते पाळून काहीही फायदा झालेला दिसत नाही. उलट हिंदीच्या आक्रमणामुळे मराठीची पिछेहाट होऊ लागली आहे.
असे केले तर शाळेत पोरांपेक्षा
असे केले तर शाळेत पोरांपेक्षा मास्तरांचीच संख्या जास्त होऊन जाईल.>>>>>>
एखादी भाषा सक्तीची केल्याने
एखादी भाषा सक्तीची केल्याने राष्ट्रीय एकात्मता साधता येते हे विधान शिशुविहार मधे सुद्धा कुणी करु धजावणार नाही
Bilingual children not only
Bilingual children not only have control over several ifferent languages but they are also academically more creative and socially more tolerant.
हे वाक्य शिशु विहारातले नाही. संशोधनातून आलेले सत्य आहे.
रिपोर्ट मधलं एक हे निरिक्षण
रिपोर्ट मधलं एक हे निरिक्षण आहे.
अनेक भाषा शिकेलेली मुलं tolerant का काय ती असतातच असे नव्हे.
आणि एकच भाषा शिकलेली मुलं लगेच intolerant होतातच असे नव्हे.
असो.
सत्य आहे तेच डोळ्याला दिसणार
सत्य आहे तेच डोळ्याला दिसणार ना?
परिणामतः मायबोलीवरील दोन
परिणामतः मायबोलीवरील दोन प्रतिपक्षांचे नित्य वाद सुरू झाले
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती केल्याने अशी विनोदी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते.
http://www.maayboli.com/node/12145
>>> एखादी भाषा सक्तीची
>>> एखादी भाषा सक्तीची केल्याने राष्ट्रीय एकात्मता साधता येते हे विधान शिशुविहार मधे सुद्धा कुणी करु धजावणार नाही
+१
पूर्व पाकिस्तान अखंड पाकिस्तानमधून फुटुन निघण्यास इतर अनेक कारणांबरोबर बांगला भाषिकांवर केलेली उर्दूची सक्ती हे देखील एक कारण आहे.
शाळेत भाषा शिकवतात म्हणून लोक
शाळेत भाषा शिकवतात म्हणून लोक ती भाषा बोलतात, हे मास्तुरेंचे तत्वज्ञान अगाधच आहे. तसे असेल तर महाराश्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच स्टँडर्ड सदाशिव पेठी मराठी भाषेत अभ्यासक्रम असतो. मग संपूर्ण महाराष्ट्रात एकच सदाशिव पेठी मराठी का बोलली जात नाही? लोक कोकणी, अहिराणी अशा भाषा का बोलतात? शळेत जर सदाशिव पेठी मराठीत दहा वर्षे घोकमपटी चालते तर कोकणातले लोक कोकणी का / कसे बोलतात? त्याना कोकणी कोणत्या शाळेत शिकवले जाते? शाळेत तर तसे संस्कृतही शिकवतात.. मग मराठी लोक आपापसात संस्कृत का बोलत नाहीत? ज्या भाषेला कमर्शियल वॅल्यु आहे किंवा आपल्या अवती भवती बोलली जाते ती टिकून रहाते. लोक त्या भाषा आपोआप शिकतात आणिवापरतात, शाळेत शिकवा किंवा न शिकवा.
Pages