सावज !

Submitted by कवठीचाफा on 15 April, 2012 - 11:17

`स्नायपर शिंदे शुद्धीवर आलाय ताबडतोब हेड ऑफिसला पोहोचणे'
हातातल्या त्या तारेचा आशय नक्की मला कळतोय तोच असल्याची मी चार-चारदा खात्री करून घेतली. अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसणं सोपं वाटत नव्हतं.

गेल्या दशकातलीच गोष्ट आहे ही,
आसामच्या जंगलात नाईलाजास्तव सैन्य तैनात करावं लागलं होतं, एकमेव कारण बोडो अतिरेकी.
सुरुवातीला वाटलं त्यापेक्षा जास्त उपद्रव द्यायला त्यांनी एव्हाना सुरुवात केली होती, भले भले ऑफिसर्स त्यांच्या घातपाती कारवायांना बळी पडत होते. आसामच जंगल म्हणजे काळ बनलं होतं आणि अश्यावेळेस मी माझ्या साथीदारांसह तिथे तैनात केल्या गेलो होतो. साथीदार हा उल्लेख एव्हढ्याचसाठी की मला माझी रेजिमेंट वगैरेचे डिटेल्स देता येणं शक्य नाहीये.
आम्हाला बेसकँपवर सोडायला आलेली कंपनी परत गेल्यानंतरचा काळ आम्ही अजिबात वाया घालवला नाही. बेसकँपची सुरक्षा आणि बाकी गस्तीची कामं तिथे असलेल्या आधीच्या लोकांकडे कायम राहणार होती, आमचा तिथे जायचा एकमेव उद्देश प्रतिहल्ला हाच होता.
इथे गरज म्हणून आमच्याबद्दल नेमकीच माहिती देतोय. मी धरून सतराजण असलेल्या या टीममध्ये वेचून काढलेले स्नायपर्स होते.
स्नायपर म्हणजे सैन्याचं एक प्रभावी शस्त्र, मोक्याची जागा धरून लांब पल्ल्याच्या रायफल्स मधून टिपून टिपून शत्रू मारणारे, वेळप्रसंगी एकट्याच्या जिवावर समोरच्या सबंध तुकडीला थोपवून धरण्याची क्षमता असलेले सैनिक. हे म्हणजे मोघम दिलेलं वर्णन झालं एका चांगल्या स्नायपरच्या अंगात याहीपेक्षा अनेक गुण असावे लागतात आणि आम्हा सतराजणांकडे ते होते.
आजूबाजूला पाऊल टाकताना दहा वेळा विचार करावा अशी परिस्थिती असताना त्या भागाचं बारकाईनं निरीक्षण करण्यात आम्ही कित्येक तास घालवले होते. एक एक स्नायपर मोलाचा होता, ` कुठेही बस आणि घाल गोळ्या' असलं तंत्र इथे चालत नाही. मोजक्याच पण महत्त्वाच्या अश्या सहा जागा आम्ही टिपल्या होत्या. काळोख दाटायला लागताच भलत्याच ठिकाणी गोळीबार आणि ब्लास्टींग करून आम्ही सहाही जणांना कव्हर दिलं आणि सगळे आपापल्या जागांवर पोहोचले, किमान तीन दिवस तरी आता त्यांच्या जागा बदलणार नव्हत्या की ते परत बेसकँपकडे येणार नव्हते.
योजना चांगलीच काम करून गेली मोजक्या दोन दिवसांत मोजून सत्तावीस अतिरेक्यांचे बळी पडले. एरव्ही जंगलाची चांगली माहिती असलेले अतिरेकी सैन्यावर कुरघोडी करत असताना त्यांच्यावर डाव उलटला होता. एकतर आमचे स्नायपर्स सहजासहजी नजरेत येणार्‍या जागी नव्हतेच आणि त्यातून एक सरावलेला स्नायपर आपली उपस्थिती कशी लपवायची हे चांगलंच जाणतो, त्यांच्या रायफल्सनाही खास फिल्टर्स असल्यानं त्यातून उडणार्‍या गोळीबरोबर निघणारा प्रकाश डोळ्यांना दिसत नव्हता, त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की जरी चुकून एखाद्याची जागा कळलीच तरी त्याच्या लांब पल्ल्याच्या स्नायपर रायफलच्या टप्प्याबाहेर राहून साध्या असॉल्ट रायफल्सनी त्याला टिपणं अशक्यप्राय होतं. विखरून ठेवलेले स्नायपर्स अश्या जागी होते की आपोआप ते एकमेकांनाही कव्हर करत होते त्यामुळे जवळपास ती फळी अभेद्य होती.
तिसर्‍या दिवसाच्या अखेरीस अंधार्‍या अवकाशातून सहाही जण अलगद बेसकँपवर येऊन पोहोचले. एव्हाना शत्रूला बर्‍यापैकी दणका मिळाल्यानं पुढच्या रिंगणात स्नायपर्स ठेवायला काहीच हरकत नव्हती. पुन्हा एकदा टेहळणी आणि पुन्हा एकदा नव्या दमाचे स्नायपर, गेल्या वेळच्या आघातामुळे गस्तीपथक बर्‍यापैकी पुढे सरकू शकत होतं त्याचाच फायदा घेत नवे स्नायपर पेरल्या जात होते.
इथेच आमच्यातला पहिला बळी गेला.
डोंगरातल्या दाट झुडपात लपलेली ती कपार आम्हाला सापडली. वर तासून काढल्यासारखा उभा कडा आणि समोरच्या बाजूने नजरेच्या टप्प्यात येणारा प्रदेश. इथे जर एखादा स्नायपर दडला तर त्याला उडवण्यासाठी विमानदलाचीच मदत घ्यावी लागणार होती आणि अतिरेक्यांकडे तेवढी सोय नव्हती.
माझे आठ स्नायपर्स मोक्याच्या ठिकाणी दडवून आम्ही परत बेसकँपला आलो पुढचे दोन दिवस फक्त अतिरेक्यांचे मुडदे मोजण्यात जातील याची पूर्णं खात्री होती.
एकच दिवस शांततेत गेला.
भर पहाटेची वेळ असेल ती, गोळ्यांच्या दणदणाटानं कँप हादरला, गेल्या काही दिवसांत असे आवाज सहसा न ऐकू आल्यानं कँपवरची सगळीच मंडळी दचकून उठली. आवाज दूरून येत असला तरी असॉल्ट रायफल्सचाच होता कारण स्नायपर रायफल्सचा आवाज इतक्या दूर तर सोडाच साधा फर्लांगभरही ऐकू येत नाही.
विचार करायला वेळ मिळतो न मिळतो तोच गस्ती तुकडीतले लोक कुणाला तरी धरून आणताना दिसले. कँपवरच्या अंधुक उजेडात तो सेन आहे हेच कळायला वेळ लागला.
सेन, हाच त्या कपारीत दडवलेला माझा स्नायपर.
सेनची अवस्था वाईट होती दोन्ही बाजूने दोघांनी आधार दिला असूनही त्याचा देह खाली लोंबत होता, डोळ्यातली बुबुळं पार नसल्यासारखे डोळे पांढरे पडले होते.
जास्त चौकशी करता असं कळलं की सेन अचानक अंधारातून धावत आला, त्याला पाहिल्यामुळे कदाचित गोळीबार झाला पण तो रेंजच्या बाहेर असल्याने सुखरूप राहिला. होणार्‍या गोळीबाराला प्रत्युत्तर देत गस्ती पथकातल्या सैनिकांनी त्याला कँपवर आणला. सेनच्या अंगावर मामुली खरचटण्याखेरीज कोणतीच जखम दिसत नव्हती मग त्याची अशी अवस्था का व्हावी? कँपवरच्या डॉक्टरने त्याला सिडेटीव्ह देऊन झोपवला खरा पण तरीही तो अधुनमधुन दचकत चुळबुळत राहिला.
त्या नंतरचे दोन दिवस सेनला बहुतेकवेळा सिडेटिव्हखाली ठेवावं लागलं त्यातूनही तो बरळत होता
" नाही... नको, नाही सहन होत आता..... " असंच बरंच काही.
तिसर्‍या दिवशी मध्यरात्री सेन गेला, गेला म्हणजे सहज मृत्यू तर नक्कीच नव्हता त्याच्या नाकातून तोंडातून कानातून रक्ताचे ओघळ बाहेर आले आणि तो मेला. तपासणीत तरी हृदय बंद पडल्यानं मृत्यू इतकंच कळलं पण ते त्याहीपेक्षा जास्त काहीतरी होतं हे डॉक्टरच काय पण कँपवरच्या प्रत्येक माणसाला कळून चुकलेलं.
याच गडबडीत कधीतरी स्नायपर्स बदलल्या गेले आधीच्या स्नायपर्सच्या जागी नवे आठ स्नायपर्स अधिक सूचना न मिळाल्यानं आधीच्या स्नायपर्सच्याच जागा त्यांनी घेतल्या.

सेनच्या त्या भयावह मृत्यूला काही दिवस लोटले, त्याचा मृतदेहही परतीच्या मार्गाला लागला होता. मधल्या काळात त्या कपारीत दोन दिवस काढलेला रामसींग धडधाकट परत आला त्यामुळे झाल्या प्रकाराशी त्या कपारीचा संबंध कुणीच जोडला नाही.

अतिरेकी थोडेफार मागे रेटल्या गेल्यामुळे थोडी शांतता मिळत होती नवी व्यूहरचना करताना त्या कपारीत स्नायपर ठेवायच्या कल्पनेचा जराही पुनर्विचार करायची गरज भासली नाही.
तिथे दुसरी चूक झाली.
आधीही म्हटल्याप्रमाणे सगळे स्नायपर्स एकमेकांना कव्हर देतील अशी रचना असल्यानं ते लक्षात आलं. थोडी रिस्क घेऊनच गस्तीपथकाला एका स्नायपरनं निरोप दिला ` कपारीत असलेल्या नाईककडून कोणतीच हालचाल दिसत नव्हती'.
दिवस उजाडेपर्यंत थांबून आम्ही जुन्या पथकाला आणखी जोड देत जास्तीचं गस्तपथक जंगलात थोडं आत घुसवलं आणि त्या कपारीपर्यंत पोहोचून नाईकची खबर आणायला सांगितली उत्तर म्हणून गेलेल्या पथकानं नाईकचा मृतदेहच आणला. कानातून नाकातून आलेलं रक्त सुकलेला पांढर्‍या पडलेल्या चेहर्‍याचा मृतदेह, सेनची अवस्था शेवटी अगदी अशीच झाली होती.

बेसवरच वातावरण त्या दिवशी एकदम सुन्न होतं. अत्यंत उपयोगी म्हणून शोधलेली जागा काही ठीक दिसत नव्हती. तिथे यापुढे एकही स्नायपर न ठेवण्याचा निर्णय मी जाहीर केला. इथेच शिंदेचा संबंध आला,
शिंदे म्हणजे एक रत्नच होतं, जगात अशी एकच गोष्ट होती ज्याला तो घाबरत होता, त्याचं ग्रामदैवत विरोबा. कायम त्याच्या तोंडात ते नांव असायचंच, त्यानं विरोबाची आण घेतली की समजावं शिंदे खोटं बोलत नाहीये, आपल्यामागे विरोबा असल्याची त्याची इतकी श्रद्धा होती की त्या कवचाखाली तो वाट्टेल ती साहसं करायचा.
शिंदेनं त्या कपारीत जाण्याची तयारी दर्शवली आणि काही केल्या तो ऐकेना!
नाईलाजास्तव त्याला तिथे तैनात होण्याची परवानगी द्यावी लागली, एक आशा अशीही होती की कदाचित बाकी दोघांपेक्षा शिंदे जास्त कणखर असल्यानं ती जागा तोच योग्यप्रकारे सांभाळू शकेल आणि आतापर्यंतची आमची भीती निष्फळ ठरेल. दुसर्‍याच रात्री शिंदे त्या कपारीकडे रवाना झाला.
.
त्यानंतर दोन दिवसांनी शिंदे सापडला आणि तिथून तो आज शुद्धीवर येत होता.
मध्यंतरीच्या काळात बरीच घडामोड झाली होती.
दहशतवाद्यांच्या कारवायांचा बीमोड करून आम्ही परत आलेल्याला जवळपास दीड वर्ष पूर्णं होत आलं होतं. माझी बदली फील्डवरच्या प्रत्यक्ष कामगिरीवरून आता वेगळ्या कामावर झाली होती. सध्या मानसिक चाचणी करणं हेच माझं काम होतं, मग ते संशयित हेर असोत किंवा आपलेच परकीय प्रांतातून दीर्घकाळ सेवा बजावून आलेले सैनिक असोत. सहज बोलता बोलता त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन त्याचा रिपोर्ट कळवणं इतकंच माझ्या कामाचं स्वरूप होतं.
मला पाहताच शिंदेनं मला ओळखलं आणि मी हळू हळू शिंदेची मनस्थिती चाचपडायला सुरुवात केली.
जुजबी प्रश्नांनंतर शिंदेनं त्याच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचं वर्णन सांगायला सुरुवात केली.
*******
"साहेब, ती कपार सुरुवातीला दिसली तितकी उथळ नाहीये. त्या दिवशी जेव्हा मी त्या जागी तैनात झालो त्यानंतर आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेतानाच मला त्या कपारीच्या कोपर्‍यातल्या एका संशयास्पद भेगेनं जास्त सावध केलं.
माझ्याजवळचे खाद्यपदार्थांचे डबे जसे जसे रिकामे होत गेले तसे तसे मी त्या भेगेच्या आजूबाजूला रचत गेलो, अपेक्षा ही होती की जर तिथून कुणी कपारीकडे यायचा प्रयत्न केला तर डब्यांचा आवाज होऊन मी सावध व्हावा. वेळ किती गेला माहीत नाही पण ती रात्र होती हे निश्चित, धडाधड आवाज करत तिथे रचलेले डबे पडले आणि मी सावध झालो. हातातली रायफल सोडून कमरेचं रिव्हॉल्वर हातात घेतलं आणि तयारीत राहिलो, पण बराच वेळ काहीच घडलं नाही, मी त्या बाजूचं लक्ष हटवण्याचा निर्णय घेतला पण त्या आधी एकदा बारकाईनं पाहावं म्हणून त्या भेगेकडे वाकलो.
तीव्र दर्प होता तो! कसलातरी अतिशय तीव्र असलेला वास नाकात शिरला एकदम उलटी सारखी भावना झाली पण मी सावरलो. आधी न जाणवलेली एक गोष्ट या वेळी मला प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे वाटत होती तितकी ती भेग अरुंद नव्हती, आरामात एक माणूस आत शिरू शकेल इतपत जागा दिसत होती. क्षणभर विचार केला ज्या मुख्य कामासाठी मी आलोय तिकडे दुर्लक्ष होतेय, पण खबरदारी ही घ्यायलाच हवी होती म्हणून मी आत उतरण्याचा निर्णय घेतला, उजव्या हातातल्या रिव्हॉल्वरचा सेफ्टी कॅच ओपन होताच.
तोंडाजवळ अरुंद असलेल्या एका गुहेसारख्या रस्त्याशी ती वाट मिळत होती. मघापासून न जाणवलेला एक निळसर प्रकाश आत भरून राहिलेला दिसत होता. आजूबाजूच्या त्या दगडी भिंती चांगल्याच खडबडीत होत्या आत उतरतानाच अंग बर्‍याच ठिकाणी खरचटून रक्ताचे थेंब आले होते.
जमेल तसा त्या निळसर प्रकाशात पुढे सरकत राहिलो, एव्हाना भुयाराची उंचीही वाढायला लागली होती, मघाचा तो दर्प अजूनही जाणवत होताच पण त्याची सवय होऊन गेली होती.
खडबडीत भिंतींचा आधार घेत पुढे सरकताना हे ही जाणवत होतं की आजूबाजूचा तो निळसर प्रकाश आता वाढायला लागलेला आहे. किती चाललो? माहीत नाही, माझा प्रवास डोंगराच्या वरच्या दिशेनं होत होता की खालच्या दिशेनं? माहीत नाही. मी मात्र पुढे सरकतच होतो.
अचानक एका वळणानंतर रस्ता एका विस्तीर्ण दगडी कोरीवकाम असलेल्या जागेत संपल्याची जाणीव झाली. तीथं तर तो निळा प्रकाश गच्च भरलेला होता. मध्यभागी धडधडणारं अग्निकुंड त्यात भयाण पिवळ्या अनियमित प्रकाशानं भर टाकत होतं. त्या पिवळ्या प्रकाशात आजूबाजूच्या दगडी भिंतींवर ओलसरपणामुळे आलेला शेवाळाचा हिरवट रंग जाणवत होता. समोरच त्या अग्निकुंडाच्या शेजारी असणारी एक सपाट शिळा, तिच्या पायथ्याकडून कुंडाकडे जाणारा दगडी ओहोळ, एखादी बळी देण्याची वेदी असावी तसं दिसत होतं सगळं
कोण असेल इथे? कुणीतरी असल्याखेरीज हे असं धडधडतं अग्निकुंड इथे असूच शकणार नाही. मनात विचार आला आणि मी जरा जास्तच सावध झालो. मानेची फारशी हालचाल न करता नजरेच्या टप्प्यात जास्तीतजास्त भाग ठेवत मी एका बाजूला सरकत होतो. एक जाणीव मात्र पक्की होती मी इथे एकटा नक्की नव्हतो, कुणाचंतरी माझ्यावर लक्ष होतं. दिसत नसले तरी माझ्यावर रोखलेल्या डोळ्यांची मला जाणीव होत होती. कोण असावं ते? कुणी आदिवासी तर नसतील? की अतिरेकी संघटनेचंच हे एखादं गुप्त केंद्र होतं? दुसरा विचार मनात येताच मी जास्तीच्या गोळ्या बरोबर असल्याची खात्री करून घेतली.
माझ्या सावध पावित्र्याची बहुदा त्या न दिसणार्‍या शत्रूला जाणीव झाली असावी, मघापासून शांत असलेलं वातावरण एकदम ढवळून निघत असल्यासारखं वाटत होतं, समोरचं अग्निकुंडही आता जास्त जोरात उफाळलं. माझ्या सर्वच बाजूंनी माझ्यावर नजरा रोखल्याची जाणीव मला जास्त प्रकर्षानं व्हायला लागली. हवेत आत्तापर्यंत न जाणवणारा एक कुबट दर्प जाणवायला लागला.
समोरचा प्रकाश हालल्यामुळे म्हणा किंवा आणखी कशानं म्हणा माझी नजर आजूबाजूच्या दगडी भिंतींकडे गेली, बाप रे.. मघा दगडाच्या कठोर वाटणार्‍या भिंती आता रबरासारख्या लवचीक होत असल्यासारख्या दिसत होत्या आणि रबरावर दाब दिल्यानंतर जश्या त्याच्यावर प्रतिकृती दिसतात तश्या त्या लवचीक बनत चाललेल्या भिंतीपलीकडून चेहर्‍यांचे साचे दिसायला लागले होते. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतके हिडीस आणि भयंकर.
क्षणभर काहीच सुचेना, त्यानंतर मनात पहिला विचार आला तो तिथून पळ काढण्याचा. एखादं पाऊल मागे घेतलंही असेल मी, कठोर आवाजात हाक आली पाटीवर पेन्सिल घासल्यावर कसा अंगावर शहारा येतो तसा आवाज होता तो. आवाज असं म्हणता येणार नाही कारण मी ते नक्की कानांनी ऐकलं की शब्द नुसतेच मनात उमटले ते मलाही आठवत नाही.
तो.. तो मला बोलावत होता, त्या धगधगत्या अग्निकुंडाकडे बोलावत होता. त्यानंतर किती वेळ मी जाणीवे पलीकडे होतो माहीत नाही पण त्या कुंडाशेजारच्या वेदीवर झोपलेल्या अवस्थेत मला जाग आली. एकच क्षण लागला असेल मला मी कुठे आहे याची जाणीव व्हायला, पण आजूबाजूच्या वातावरणात चांगलाच फरक पडलेला दिसत होता.
त्या ठिकाणची हवा एखाद्या भट्टीसारखी तापलेली वाटत होती. मघा भिंतीपलीकडून खोलीत येण्याचा प्रयत्न करणारे ते अमानवी चेहरे आता पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत होते. मधूनच त्यातल्या काहींच्या खांद्यांचे, छातीच्या भागाचे ठसे त्या ताणलेल्या भिंतींवर दिसत होते.
किती वेळ लागणार होता त्यांना ती बंधनं पार करून त्या खोलीत यायला? काही मिनिटं? मग कदाचित ते त्या खोलीत येणार होते, शेकडोंच्या संख्येने आणि मग माझा.........
माझ्याकडे तितकाच वेळ होता, मनावर पडत असलेली बंधनं झुगारून शरीरातलं सगळं अवसान एकत्र आणून विरोबाचं नांव घेतलं आणि जीव घेऊन पळत सुटलो.
कोणत्या दिशेला? किती वेळ? याचं काहीच भान राहिलं नव्हतं. श्वास घ्यायलाही न थांबता मी धावत होतो. मागे न पाहताही मला जाणवत होतं पायांच्या कित्येक जोड्या माझा पाठलाग करत होत्या.
अखेर एकदाची मला त्या कपारीची कडा दिसायला लागली, पाठलाग करणार्‍या पावलांचे आवाजही जवळ यायला लागले. मनोमन पुन्हा एकदा विरोबाचं नांव घेतलं आणि त्या कपारीबाहेर अंग झोकून दिलं.
त्यानंतर मला आत्ता जाग येतेय.
तुम्हाला एक सांगतो साहेब तिथे जे काही आहे ते फार भयानक आहे त्यानंच आपल्या सेन आणि नाईकचा बळी घेतला. माझ्यावर विरोबाची कृपा होती म्हणूनच मी वाचलो. "

शिंदेनं त्याचं कथन पूर्ण केलं, आतापर्यंत मी त्याला एकदाही थांबवलं नाही. अखेरची काही मिनिटं माझा श्वास नक्कीच जोरात चालू होता. शेवटी स्वतः:वर ताबा मिळवत मी शिंदेला हाक मारली.
" शिंदे, इकडे बघ, माझ्याकडे बघ " माझ्या आवाजातल्या जरबेमुळे शिंदेची नजर आपोआपच माझ्या नजरेत मिसळली गेली, क्षणात त्याच्या चेहर्‍यावरचा सुटकेचा सगळाच आनंद मावळत तिथे भिती पसरायला लागली, क्षणोक्षणी ती वाढतच गेली आणि अखेर त्याचं शरीर एका बाजूला कलंडलं.
शिंदे खरोखरच मृत झाल्याची मी खात्री करून घेतली आणि ऑर्डर्लीला हाक मारली.
शिंदेच्या आधीच कमकुवत झालेल्या शरीराने आणि त्यातच त्याने जुन्या अपघाताचा परिणाम म्हणून त्याच्या हृदयावर ताण पडून त्याचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट बनवून मी परत जायला निघालो. गाडी अर्थातच ऑर्डर्ली चालवत असल्यानं मला विचार करायला मोकळीक होती.
शिंदेच्या मृत्युसमयी त्यानं काय पाहिलं असेल याची मला पूर्णं जाणीव होती. बिनचेहर्‍याचा लाव्हारसावरच्या या तडकलेल्या काजळीसारखा दिसणारा डोळ्यांचा विखार. ज्यात शिंदेची अस्मिता खोल खोल ओढल्या गेली, मला तो नवीन नाही, मी आधीही तो पाहिलाय.
त्याच गुहेत, शिंदेच्या नंतर त्या जागी मी गेलो होतो आणि परतही आलो होतो.
शिंदे कदाचित वाचला असता जर.....
त्यानं त्याच्या त्या देवाचं नांव घेतलं नसतं तर..... मग सावकाश मी त्याला आमच्यातलाच एक करून घेतला असता जसा आता रामसींग आहे.
माझ्या मनातले विचार ओळखल्यासारखा रामसींग गाडी चालवता चालवता माझ्याकडे वळला आणि आपल्या चकाकत्या लालसर बुबुळांच्या काळपट डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं.
आमचं काम असंच चालू राहणार होतं जोपर्यंत त्यांचं वर्चस्व या जगावर येत नाही तो पर्यंत.

गुलमोहर: 

भारीये.

त्याच गुहेत, शिंदेच्या नंतर त्या जागी मी गेलो होतो आणि परतही आलो होतो.
शिंदे कदाचित वाचला असता जर.....
त्यानं त्याच्या त्या देवाचं नांव घेतलं नसतं तर..... मग सावकाश मी त्याला आमच्यातलाच एक करून घेतला असता जसा आता रामसींग आहे.
इथे थोडी गडबड वाटतेय. रामसिंग शिंदेच्या आधी कपारीत राहीला होता आणि निवेदक शिंदेनंतर. तसं असेल तर " मग सावकाश मी त्याला आमच्यातलाच एक करून घेतला असता जसा आता रामसींग आहे." हे चुकीचं झालं ना?

हे चुकीचं झालं ना?
>>>
चिंगे,

अगं बरोबर आहे ते!
पहिले सेन, मग रामसिंग, मग नाईक आणि मग स्वतः सूत्रधार अशा क्रमाने ते कपारीत गेले होते.

हे वाचः
मधल्या काळात त्या कपारीत दोन दिवस काढलेला रामसींग धडधाकट परत आला त्यामुळे झाल्या प्रकाराशी त्या कपारीचा संबंध कुणीच जोडला नाही.

रामसिंग त्यांच्यातला एक झाल्याने धडधाकट परत आला.

निंबे, ते कळलं मला म्हणुन्च "मग सावकाश मी त्याला आमच्यातलाच एक करून घेतला असता जसा आता रामसींग आहे." हे वाक्य मला ठीक वाटत नाहीये.माझ्यामते, वरच्या वाक्यातुन सुत्रधाराने रामसिंगला त्यांच्यातला एक करुन घेतलं असा अर्थ लागतोय. पण प्रत्यक्षात आधी रामसिंग बदलला आणि नंतर सुत्रधार.
असो. अजुन जास्त चिवडायला नको. बाकी कथा मस्तच आहे. Happy

चिंगी .......... सुत्रधार आधीच झालेला......... ते अप्रत्यक्ष आहे... नंतर तो दुसर्यांदा गेला ...ते प्रत्यक्ष आहे...

चिंगी .......... सुत्रधार आधीच झालेला......... ते अप्रत्यक्ष आहे... नंतर तो दुसर्यांदा गेला ...ते प्रत्यक्ष आहे...
>>>
माझा ही हाच समज झाला कथा वाचताना. असो. लेखकु देतील नंतर स्पष्टीकरण. Happy

गूढ कथा निघाली शेवटी... (गूढकथाच आहे ना? की मला कळली नाहीय?)
अतिरेक्यांविरुध्दच्या चकमकीच्या प्रत्यक्ष अनुभवाचं काहीतरी वर्णन असेल म्हणून वाचत गेले...
मी कधीच रमत नाही या प्रकारच्या लेखनात Sad

चिंगी .......... सुत्रधार आधीच झालेला......... ते अप्रत्यक्ष आहे... नंतर तो दुसर्यांदा गेला ...ते प्रत्यक्ष आहे...>> ह्म्म. ते अप्रत्यक्ष प्रकार कुठे ध्वनित होतोय बरे?
"त्याच गुहेत, शिंदेच्या नंतर त्या जागी मी गेलो होतो आणि परतही आलो होतो." "मग सावकाश मी त्याला आमच्यातलाच एक करून घेतला असता जसा आता रामसींग आहे." हे वाक्य मला ठीक वाटत नाहीये.माझ्यामते, वरच्या वाक्यातुन सुत्रधाराने रामसिंगला त्यांच्यातला एक करुन घेतलं असा अर्थ लागतोय. पण प्रत्यक्षात आधी रामसिंग बदलला आणि नंतर सुत्रधार. पण पहिल्या वाक्यात तर रामसिंग आधी बदलतोय. ही गड्बड होतेय असं मला वाटले बुवा.
बघा पटतयं का?
शिंदेच्या नंतर हे शब्द वगळले तर बाकी परफेक्ट फिट बसतंय.. एकतर सुत्रधार पहिल्यांदा जागा शोधताना तिकडे गेला किंवा सेनच्या मॄत्यनंतर .. त्यांच्यातलाच झाला व म्हणुन त्याने एकाएकाला तिथे पाठवायला सुरवात केली "आमचं काम असंच चालू राहणार होतं जोपर्यंत त्यांचं वर्चस्व या जगावर येत नाही तो पर्यंत." या उद्देशाने. वाचलेले वाचले बाकीचे मॄत्युमुखी. अर्थात हे माझं आकलन आहे.

आता खरंच पुरे. बाकी लेखकाला ठरवु देत. मी कुसपट काढतेय की काय असं वाटतंय. Uhoh

उशीरा आभार मानतोय त्याबद्दल माफ करा मंडळ Happy
सगळ्यांनाच एका पोष्ट मध्ये धन्यवाद.
चिंगी : निरीक्षण एकदम मस्त आहे, धन्यवाद पण धडधाकट परत आलेला रामसींग म्हणजे `त्याला काहीच अनुभव आला नाही म्हणून' मी हे गृहीतक धरलं होतं, असो त्या दोन शब्दांना व्हाईटनर लावता येतो का ते पहातो Happy

Pages