च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!
यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!
माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?
विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.
मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?
काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.
मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.
मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.
मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.
अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.
अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?
अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.
अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.
ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.
तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.
येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.
मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.
नाही मी कामातील शिस्तीबद्दल
नाही मी कामातील शिस्तीबद्दल नव्हते विचारले. त्या त्या लोकांच्या कामाबद्दल आणि वर्क लाईफ बॅलन्स बद्दल असलेल्या "जनरल पब्लिक इमेज" बद्दल.
बाकी सार्वत्रिकीकरण चुकीचे, कंपनीच्या प्रमाणे हे बदलते वगैरे कॅव्हिअॅट्स मान्य आहेतच
चांगली चर्चा चालू आहे..
चांगली चर्चा चालू आहे..
नताशा, नसते गं सेफ्टी नेट >>
नताशा, नसते गं सेफ्टी नेट >> मलाही तेच म्हणायचं होतं. हां, दर महिन्याला ठराविक पगार मिळतो हे स्थैर्य आहेच.
पण माझा मुद्दा हा आहे की आर्थिक स्थैर्य आणि आवडीचं काम/कामातले नाविन्य/पर्सनल गोल्ससाठी वेळ इ. गोष्टी या नेहमी either or च असतात असं भारतात तरी समजल्या जातं. वरती अनेक पोस्टस चा हाच सूर दिसून येईल. (उदा. सॉफ्टवेअरवाल्यांचे फार कवतिक करायची प्रथाच आहे.त्यांचे बरेच प्रश्न अगदी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स टाईप असतात. किंवा अरे एवढा प्रॉब्लेम आहे तर द्या नकार, सोडा नोकर्या. करा फ्रिलान्सिंग जे तुमच्यामते सोपे असते. पण मग ते आर्थिक स्थैर्य सोडायची तयारी नसते ना? ) सध्या असं आहे हे खरंच (आणि तोच प्रॉब्लेम आहे) पण असं नेहमीच हे किंवा तेच निवडावं लागावं असं काही नाही. दोन्ही एकत्र शक्य होऊ शकतात, फक्त त्या मॅच्युअर स्टेजला भारतीय कॉर्पोरेट अजून आलेलं नाही.
उदा. कॉर्पोरेट करियर मधून सबॅटिकल घेऊन किंवा पार्ट टाइम काम करुन आपल्या आयुष्ञाच्या महत्वाच्या गोल्सना वेळ देण्यासाठी आयुष्याचे प्लॅनिंग करणे इ. विषयावर इंग्रजीत गठ्ठ्याने ब्लॉग्ज आहेत.
मला स्वतःला (आणि माझ्या बर्याच मित्र मैत्रिणींनाही) असं वाटतं की समजा कंपनी मला दिवसाचे ८ तास काम करण्याचे १००००रु महिना देते. प्रत्यक्षात मी अॅव्हरेज १२-१४ तास ऑफिस आणि संबंधी कामात घालवते (विकेंड धरुन). जर कंपनीने मला दिवसाचे ४तास काम करु दिले अन पगारही अर्धा केला तरी मला चालेल. प्रत्यक्ष कामही ४ तासच करणार. मग उरलेल्या ४ तास मी मला हव्या त्या मार्गाने घालवेन. हवं तर दुसर्याच नव्या क्षेत्रात तसाच पार्ट-टाइम जॉब करेन (तिथे मला बहुधा ४ तासाचे २००० रु च महिना मिळतील, पण मला ते चालेल.) किंवा मी माझ्या आवडीच्या विषयात कन्सल्टिंग करेन किंवा कोचिंग क्लासेस काढेन किंवा संगीत शिकेन. ही फ्लेक्सिबिलिटी मला कधी मिळेल का हा प्रश्न आहे. मी वाट बघतेय.
चर्चा मस्त चालू आहे. रेव्यु
चर्चा मस्त चालू आहे. रेव्यु आणि मास्तुरेंनी खरंच खूप प्रेरणादायी लिहिले आहे.
फक्त मला एकंच वाटते की चर्चा प्रत्येक पोस्टगणिक 'स्टेप बॅक' चेंज कडे जात आहे. मान्य आहे तो ही मुद्दा सकारात्मकदृष्ट्या 'चेंज ईन लाईफ' जस्टीफाय करणाराच आहे पण धाग्याचे स्पष्टीकरण वाचून मला 'स्टेप फॉरवर्ड' चेंज बद्दल चर्चा करायची आहे असे वाटले.
अजून कुणाला असं वाटतंय का? माझं निरिक्षण चुकीचं ही असू शकेल.
रेव्यु, छान वाटलं तुमचा अनुभव
रेव्यु, छान वाटलं तुमचा अनुभव वाचून.
१५००० पगारात महिना भागत नाही
१५००० पगारात महिना भागत नाही हे वाचून मला धक्का बसला आहे. खरोखर. आमच्या काळी आम्ही ५के वर सुरुवात करुन ८के वर पोचलो तेव्हा खूप भारी वाटायचं. खर्च वजा करता बचत-बिचत व्हायची त्या पगारातुन.
बाकी चर्चा चांगली सुरु आहे.
फारेंड,नताशा चांगली पोस्ट.
फारेंड,नताशा चांगली पोस्ट.
फक्त त्या मॅच्युअर स्टेजला भारतीय कॉर्पोरेट अजून आलेलं नाही. >>अगदी.
सॉफ्टवेअरवाल्यांचे फार कवतिक करायची प्रथाच आहे.त्यांचे बरेच प्रश्न अगदी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स टाईप असतात. किंवा अरे एवढा प्रॉब्लेम आहे तर द्या नकार, सोडा नोकर्या. करा फ्रिलान्सिंग जे तुमच्यामते सोपे असते. पण मग ते आर्थिक स्थैर्य सोडायची तयारी नसते ना? >> बापरे. इतका का राग?सॉफ्टवेअर, बँकिंग म्हणजे आख्खा कॉर्पोरेट सेक्टर नव्हे. अगदी कुठल्याही इंडस्ट्रीमधल्या सेल्स/मार्केटिंग्वाल्याचेही हाल असेच असतातच की.
>>नोकर्यांमधे वेळाअवेळांचा
>>नोकर्यांमधे वेळाअवेळांचा मुद्दा अगणित वेळा ऐकलाय
नोकरी म्हणजे सहसा दिवसाला ७ ते ९ तासाचे काम आणि तेव्हढा पगार. जर जास्त वेळ काम करून घेतले तर उदा सरकारी नोकरीत ओवरटाईम देणे अपेक्षित असते. आयटी आणि इतर खाजगी उद्योगात ती प्रथा नाही. अडीनडीला जास्त वेळ काम करणे अपेक्षित असते. ते नेहमीचेच झाले की त्याची तक्रार होते. जर असे आयुष्यभराचे काम करायचे असते तर मग स्वतःचे स्वतः काही केले असते. नोकरी करायची ठरवली म्हणजे दिवसाच्या त्या ९ तासांव्यतिरिक्त वेळ आपला असायला हवा हे गृहितक आहे. उलटे नाही.
पायर्या चढून वर जाऊ तसतसे नोकरीतही स्वतःचा उद्योग असल्यासारखे होत जाते. आपली जबाबदारी वाढली की कामाच्या वेळाही अनियमित होऊ शकतात. त्यासाठीच, नियोजनाची शिस्त असायला हवी असे मला वाटते.
बाकी चमनच्या मुद्द्याचा विचार करते आहे. की फॉरवर्ड म्हणजे नक्की काय.
मृदुला>>> तुम्ही तुमच्या
मृदुला>>> तुम्ही तुमच्या प्रतिसादात जे लिहिलं आहे त्याप्रमाणे
मग उरलेल्या ४ तास मी मला हव्या त्या मार्गाने घालवेन. हवं तर दुसर्याच नव्या क्षेत्रात तसाच पार्ट-टाइम जॉब करेन (तिथे मला बहुधा ४ तासाचे २००० रु च महिना मिळतील, पण मला ते चालेल.) किंवा मी माझ्या आवडीच्या विषयात कन्सल्टिंग करेन किंवा कोचिंग क्लासेस काढेन किंवा संगीत शिकेन. >>> ह्यालाच मी 'स्टेप बॅक' चेंज असं म्हणेन. म्हणजे त्यात हार किंवा पराभव आहे असा आजिबात अर्थ नाही.
तर त्याचा अर्थ 'मी आहे तिथे ठीक आहे आणि तिथलीच थोडी जबाबदारी, काम, डीवोशन कमी करून थोडा वेळ काढून मला माझ्या मनाला आवडणार्या काही गोष्टी करायला आवडतील असा सूर आहे.
पण ह्या धागा ऊघडणार्याने लिहिलेली उदाहरणं पाहिली तर ती बहूतेक सगळी एक डेफिनाईट गोल डोक्यात ठेऊन सध्याची परिस्थिती आहे तशी अॅक्सेप्ट करून त्यात मला हवे तसे आणि तसेच बदल घडवून फक्त अआणि फक्त तो गोल अचिव करण्यासाठी करायच्या प्रयत्नांबद्दलची आहे असे मला वाटते. थोडक्यात पॅराडाईम शिफ्ट करण्यासाठी मेहनत घेणारे स्ट्रगलर किंवा अॅस्पिरंटस.
वर झालेल्या चर्चेतून सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजीच जास्त दिसतेय, पण 'हे माझे ऊद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आत्तापर्यंत मी हे प्रयत्न केले आहेत आणि हे करणार आहे. ह्या अडचणी आहेत आणि हे ऊपाय मी करणार आहे, मी ह्या चुका केल्या आणि हे अगदी बरोबर केले' असं अगदीच कोणीतरी लिहिलं आहे. तेही अतिशय त्रोटक.
रेव्यु आणि मास्तुरेंनी जे लिहिलं ते प्रेरणादायी नक्कीच आहे पण तो त्यांनी त्यांच्या वय आणि परिस्थितीला अनुसरून जाणीवपूर्वक घडवून आणलेला बदल आहे.
मला ह्या गोष्टींचा कंटाळा आलाय किंवा ह्यात मजा वाटत नाही किंवा आता ही गोष्टं करण्याने मला वैताग येतोय असे न म्हणता मला ही स्पेसिफिक गोष्टं अचिव करायची आहे आणि त्यासाठी मी ..... असे लिहिणारा वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती.
>> मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना
>> मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी
ह्याबद्दल का? समजले मग.
नताशाने लिहिलेले
>> ४ तासाचे २००० रु च महिना
आणि धाग्याच्या सुरुवातीला लिहिलेले
>>थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप
हे एकाच मार्गाचे आहे असे मला वाटते.
>> मला ही स्पेसिफिक गोष्टं अचिव करायची आहे आणि त्यासाठी मी
याच्याशी सहमत. रेव्यु आणि मास्तुरे यांनी तसेच लिहिले आहे असे मला वाटले. की स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल परत मिळवायचा आहे आणि त्यासाठी मी ..
पण तो त्यांनी त्यांच्या वय
पण तो त्यांनी त्यांच्या वय आणि परिस्थितीला अनुसरून जाणीवपूर्वक घडवून आणलेला बदल आहे.>>>> हे पुर्ण सत्य असेल असे मला वाटत नाही.
१५००० पगारात महिना भागत नाही हे वाचून मला धक्का बसला आहे.>>> हीच ग्यानबाची मेख आहे. मला वाटते कि प्रत्येकाला किती पैसे पाहिजे आहेत ते समजले तर ९९% गणित सुटते. ही रॅट रेस मुख्यतः त्यासाठीच आहे. (कदचित थोडीफार लोकं जॉब सॅटीस्फॅक्श्न साठीदेखिल रॅटरेस मध्ये असतील).
मी जेंव्हा अमेरिकेत गेलो तेंन्व्हा पहिले ६ महिने कायमचे तेथेच कसे रहाता येइल, यावर एका मित्राचे बोल एकुन त्यासाठीच तयारी करायला सुरवात केली. पण लगेच लक्षात आले, कि मी इथे कायमचा राहु शकत नाही. मग परत यायचा निर्णय झाला. तेंन्व्हा वाटायचे कि आता एखाद्या एम. एन. सी. मध्ये आरामात जॉब लागेल. आणि एखाद्या मेट्रो सि टी मध्ये रहावे लागेल.
जेंव्हा रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचले, त्यतली रिच्नेस ची डेफिनिशन खुपच आवडली. भरपुर पैसे मिळवुन भरपुर खर्च करणे, (म्हणजे खर्च भरपुर होतो म्हणुन खुप पैसे मिळवणे) यात आजिबात अडकायचे नाही असे ठरवले. महिण्याचा खर्च काही न करता जेवढे उत्पन्न येते (सध्यातरी बँकेतील व्याज ) तेव्हड्यात भागवायचे नक्की केले आणि परत आलो.
दुसरी गोष्ट मला काय काय करायला आवडते याचा विचार केला. मग त्यात एक गोष्ट समजली ती म्हणजे ८ ते १२ च्या मुलांना गणित आणि सायन्स शिकवणे (फुकट, अर्थार्जना साठी नव्हे). आता मोठ्या कं. नोकरी करुन हे जमण्यासारखे वाटले नव्हते. शेती आणि पशुपालन हे दुसरे आवडते क्षेत्र.
मग ठरवले कि गावाकडेच रहायचे त्याशिवाय हे शक्य होणार नाही. मग परत आल्यानंतर गावाकडे राहुन ई. कॉलेज जॉइन केले. (सहा महिण्यापुर्वी). आता या वर्षात तरी हळुहळु जसा प्लान केला होता तसे होताना दिसत आहे. ४२ व्या वर्षी रिटायरमेंट घेता यावी असा प्लान चालु आहे. (म्हणजे पैशासाठी काम करणे थांबवणे).
पैशाचे गणित एकदाका सुटले, कि क्षेत्र कोणतेही असो ... काम अगदी फ्रिलान्सिंग
बेसिक गोष्ट एकच, जे आवडते तेच करायचे, at any cost आणि निवांत जगायचे.
छान चर्चा. अनुभव - सॉफ्टवेयर
छान चर्चा.
अनुभव - सॉफ्टवेयर मधे असल्याने त्याचाच. पंधरा वर्षापुर्वी जेव्हा प्रोजेक्टचा एखादा भाग पुर्ण करायला लागणारा अंदाजे वेळ क्लायंट विचारायचे तेव्हा कंपन्या लागणार्या वेळापेक्षा दुप्पट तरी सांगायचे आणि तितका जास्त फायदा कमवायचे, टीममधे पुरेशी माणसे कामाला असत.
हल्ली उलटे झाले आहे, क्लायंट ला जितका वेळ प्रोजेक्ट पुर्ण करायला लागु शकेल (खरा वेळ) त्याच्या निम्म्या वेळात निम्म्या माणसांनाच टीममधे ठेऊन काम पुर्ण करुन हवे असते. मग होते काय की ते काम पुर्ण करुन देणार्या कंपन्याचे डायरेक्टर्स ते सहज मान्य करतात व टीम ला फक्त आदेश देतात. ते काम पुर्ण होणे शक्य नसले, किंवा पुर्ण करण्यासाठी टीम मरत आहे हे दिसत असले तरी त्यांना बर्याचदा काही पडलेले नसते कारण त्यांना फक्त क्वार्टर-एंड च्या रेवेन्यु चे आकडे दिसत असतात, कमी माणसात जास्तीतजास्त काम पुर्ण करुन वाचवलेल्या पैशातुन मिळणारा जास्त बोनस दिसत असतो.
मंदीमुळे आधीच कामावरुन माणसे गठ्ठ्याने कमी केलेली असतात मग उरलेल्या तुटपुंज्या लोकांवर ढोरमेहनतीचे काम येते. टीममधे माणसे कमी पडत असतील तरी बोनसवर टपलेल्या वरच्या लोकांना नवीन लोक आणायची इच्छा फार नसते कारण त्यांना आणुन त्यांच्यासाठी बजेटमधले पैसा सोडायची तयारी कमी असते (कारण बोनस कमी होणार). टीममधे कोणाला ह्यावर तक्रार करायचे तरी अवघड कारण त्यांच्या जागेवर आत यायला १० काय १०० माणसे तयार असतातच त्यामुळे टीममधील लोकांना पण पावले जपुन उचलावी लागतात. असे डेडलॉक/दुष्टचक्र झाले आहे. त्यातुन फटकन बाहेर पडायचे तर निदान पुढील सहा-बारा महिन्याची बेगमी करावी व मगच निर्णय घ्यावा म्हणजे तोवर दुसरे काही सुरु करता येईल. आले मनात दिले सोडुन असे करता आले तर उत्तमच पण जास्तकरुन तसे करता येत नाही.
तुम्ही उत्कृष्ट असलात तरी हल्ली दुसरी नोकरी पायघड्या पसरुन समोर येत नाही, इतके सहज नाहिये ते, खुप वाट पहावी लागते कारण कमी नोकर्या पैदा होत आहेत व जुनी माणसे सहजासहजी सोडुन जात नाहीत.
सध्यातरी असेच जास्त पाहिले आहे, अपवाद असतील तर चांगली गोष्ट आहे.
>>अग महत्त्वाकाम्क्षा असेल तर
>>अग महत्त्वाकाम्क्षा असेल तर ठीक, पण बरेचदा लोक पीअर प्रेशर, पळाव लागत, व्यवसायची गरज, बॉसन दिलेल प्रेशर असल्या कारणान पळत रहातात>><< +१
जेव्हा महत्वकांक्षा असते तेव्हा "नकळतच" आपण रॅटरेस मध्ये ओढलो जातो. म्हणजे मला माझा उद्योग चांगला करायचा आहे, वाढवायचा आहे, लोकांपर्यंत पोहोचायचे आहे नवे प्रॉडक्ट घेवून. पण बाजारात आधीच एक प्रॉड्क्ट आहे मग मला आणखे नावीन काहितरी बदल करून लोकांसमोर प्रॉडक्ट आणले पाहिजे. मग हे चक्र चालून रहाते.... असे वाटते.
सुनिधीची डेडलॉक/दुष्टचक्र
सुनिधीची डेडलॉक/दुष्टचक्र पोस्ट वाचली. इतरही सगळ्या पोस्टी वाचल्या. अचानक एक निराळाच (आणि कदाचित भलताच) विचार मनात डोकावला, की अखेर या सगळ्याच्या मुळाशी लोकसंख्येचा स्फोट हे कारण आहे का?
फारेंडा, अनुमोदन सगळ्याच
फारेंडा, अनुमोदन सगळ्याच पोस्टींना, विशेषतः चर्चा रुळावर आणणार्या पोस्टीला!!!!
निवांत पाटील म्हणतात ते बरोबर आहे. पैसा किती यापेक्षा कशासाठी हे महत्वाचे. प्रत्येकाने आपल्याला सर्वात हवीहवी अशी 'लाईफस्टाईल' कोणती याचे उत्तर पक्के ठेवावे आणि त्यासाठी आवश्यक असलेला पैसा मिळवण्यासाठी जरुर प्रयत्न करावा. उदा. मला पाहिजे ते पुस्तक त्याच्या किंमतीचा विचार न करता तात्काळ विकत घेता येणे ही श्रीमंत लाईफस्टाइलची माझी, आजची व्याख्या. त्यासाठी आवश्यक पैसा मिळण्यासाठी जेवढे काम करावे लागेल ते करायची तयारी आहे.
माझ्या वडीलांचे उदाहरण देऊ इच्छीतो- ते आधी मेडीकल कॉलेजमधे लेक्चरर होते, त्याचा कंटाळा आला म्हणून ती अत्यंत सुरक्षित सरकारी नोकरी सोडून एका आडगावातील चॅरिटेबल संस्थेच्या हॉस्पिटलात २५ वर्षे शब्दशः रुग्ण्सेवा केली. पण हे सगळं त्यांना मजा येत होती या एकाच कारणाने. १० वर्षाखाली त्याचाही कंटाळा आला म्हणून सोलापूरात परत येऊन प्रॅक्टीस सुरु केली. दोन्ही निर्णयानां नातेवाईक-मित्र सर्वांनीच विरोध केला. पण शेवटी ते बरोबर ठरले. स्वतःच्या मनाला समाधान वाटेल तेच काम ते करु शकले, अजूनही करताहेत.
चांगली चर्चा ! निवांत पाटील ,
चांगली चर्चा ! निवांत पाटील , आगाऊ पोस्टी पटल्या अगदी ! आगाऊ , वडिलांचे उदाहरण खूप काही शिकवून जाणारे आहे खरंच !
सुनिधी आणि निवांत पाटील यांनी
सुनिधी आणि निवांत पाटील यांनी छान मुद्दे मांडले आहेत. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत
करिअरिस्ट मी, या सदरात छान अनुभव मांडलेले आहेत. अवश्य वाचा.
ललिताचा मुद्दा पण योग्यच आहे. रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस कमीच होत जाणार आहेत, आणि स्पर्धा पण वाढणार आहेच. आता वेगळी क्षेत्रं शोधणं गरजेचं आहे.
तिच तिच शहरे, देश यापेक्षा वेगळा विचार करणे गरजेचे आहे.
फारेंडा, अनुमोदन आगाऊ, मस्त
फारेंडा, अनुमोदन
आगाऊ, मस्त उदाहरण! आपल्याला नक्की कोणती लाईफस्टाईल हवी हे ठरवता आलं पाहिजे. कुठं थांबायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे.
लोकसंख्येचा स्फोट हे कारण आहेच पण मुळात लोभीपणा हेही कारण नाही का?
सुनिधी, छान पोस्ट. निवांत-
सुनिधी, छान पोस्ट.
निवांत- इंट्रेस्टिंग आहे तुमचा अनुभव.
चेंज का हवा असतो त्यासाठी
चेंज का हवा असतो त्यासाठी बरीच कारणे असू शकतात.
१. वयाच्या १६-१७ वर्षी मुलांना करीअर पाथ निवडावा लागतो. त्यावेळी आपल्याला खरच काय आवडतं किंवा आवडू शकेल ह्याची निश्चीत जाणीव नसते.
२. करिअर निवडतांना आवडीपेक्षा पैसा, मान मरातब कशात जास्त मिळेल त्यानुसार करिअर निवडलं जातं
३. करिअर चेंज करता खूपच लिमिटेड ऑप्शन्स उपलब्ध असतात. त्यामुळे मनात असून करता येतच असं नाही. नवीन करिअर करताना परत ज्युनिअर पोझिशन स्विकारताना मानसिक स्थिती खंबीर असणं आवश्यक असतं.
४. काहितरी मिळवण्यासाठी काही तरी गमवावं लागतं हेपण तेवढच खर आहे. नेहेमीच win-win situation असेलच असं नाही.
५. घरचा सपोर्ट घरच्या जबाबदार्या आणि आर्थीक स्थिती ह्यावर अवलंबून असतो.
करिअर सोबत आपली आवडती हॉबी जपणं हे खरच खूप महत्वाच आहे. जसं गाणं, वाचन, समाजसेवा, शक्य असेल तेंव्हा छोट्या छोट्या ट्रिप्स, कलामंडळ, वाचन क्लब वगैरे.
रेव्यू व मास्तुरे यांची
रेव्यू व मास्तुरे यांची उदाहरणे अत्यंत चांगली आहेत. पण माझ्या मते (आणि वरती चमन की कोणीतरी उल्लेख केल्याप्रमाणे) ती 'स्केल बॅक' ची वाटतात. म्हणजे एका स्टेज नंतर आता आधीच्या प्रेशर जॉब मधे काम करायचे नाही, काम कमी/वेगळे-पैसे कमी चालेल पण जे करतोय त्यात आनंद वाटला पाहिजे, ताण वाटला नाही पाहिजे - अशी आहेत.
असे काही निर्णय - तिशीत/चाळिशीच्या सुरूवातीस असलेले लोक घेऊ शकतील का? शकत असतील तर काय विचार करावा याबद्दल कोणी लिहू शकले तर वाचायला आवडेल.
तसेच इतरांपैकी:
१. कोणी आपण जे करतोय त्यापेक्षा आपल्याला वेगळे काही करता येइल का याबद्दल गंभीर विचार केला आहे? म्हणजे आपण जे काम करतोय त्यापेक्षा वेगळे काम सुरूवातीला वरवर विचार करताना खूप चांगले वाटते. पण त्याबद्दल त्या क्षेत्रातील लोकांशी बोलल्यावर सध्याच्या स्थितीत ज्या गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात त्या दुसर्या क्षेत्रात धरता येतीलच असे नाही हे लक्षात येते. किंवा तेथील काही बंधने/आव्हाने लक्षात येतात. नंतर जो निर्णय असतो तो "Informed decision" असतो. या स्टेज पर्यंत काही लोक नक्की गेलेले असतील
२. पहिली नोकरी तशीच चालू ठेवून दुसरे काही चालू करण्याचा प्रयत्न - त्यातून सुरूवातीला थोडे पण नंतर बर्यापैकी पैसे मिळतील असा - कोणी करत आहे काय?
३. प्रेशर्/रॅट रेस हा मुख्य प्रश्न नाही पण केवळ करतोय ते काम बदलावे असे कोणी केलेले आहे काय? म्हणजे एका स्पर्धात्मक नोकरीतून वेगळ्या पण स्पर्धात्मकच नोकरीत जाणे वगैरे. हा ही एक बदलच आहे.
अशा लोकांचे अनुभव वाचायला आवडतील.
उत्तम विषयावर सुरेख चर्चा
उत्तम विषयावर सुरेख चर्चा चालू आहे. वाचतेय.
एक्झाक्टली फारेंड..... मला जे
एक्झाक्टली फारेंड..... मला जे म्हणायचे होते ते तू अगदी बर्रोब्बर पकडलेस.
सध्याच्या कामाच्या जागेची परिस्थिती रॅटरेस, प्रेशर, कामाच्या वेळा, पॉलिटिक्स हे ज्या कामात नाहीये असे जगाच्या पाठीवर कुठेतरी शक्य आहे का? अहो समाजसेवेसारख्या विनामोबदला कामातसुद्धा प्रेशर, कामाच्या वेळा, पॉलिटिक्स अगदी जिवाला धोका हे सगळे असतेच आणि आपण त्याबद्दल कितीही गळे काढले किंवा राग राग केला तरी परिस्थिती बदलत नाही.
सीप्झच्या गेटबाहेर आजच्या दिवसापुरते तरी काम मिळावे म्हणून बेस्ट मधून ऊतरून रांगा लावलेले डायमंड फॅक्टरी वर्कर काय किंवा त्याच सीप्झच्या गेटच्या आत सिटी बंकेचा १ मिलिअन डॉलर चा प्रोजेक्ट पदरात पाडून घेण्यासाठी प्रेझेंटेशन तयार करणारा पोलारिस किंवा टीसीएस चा होंडा सिटी घेऊन ऑफिसला येणारा मॅनेजर काय? प्रेशर आणि रॅटरेस कुणाला चुकलीये?
मँकेंझीमध्ये काम करणार्या वार्टन एमबीए पासून भुदरगड बुद्रूक सहकारी पतसंस्थेत काम करणार्या लिपिकापर्यंत आणि शेवरॉनच्या ऑयल एक्स्प्लोरेशन प्लँटच्या मॅनेजर पासून कुटुंबपरंपरागत तेलाचा घाणा चालवणार्या तेल्यापर्यंत सगळेच दिवस ऊगवल्यापासून मावळेपर्यंत कैकच्या कैक मानसिक मॅराथॉन रेस रोजच पळतायेत.
पण ट्रॅक चेंज करू पाहणारा (करू करू म्हणणारा नव्हे) कोणी 'माय का लाल' आहे का ?
मला तरी वाटते प्रश्न असा आहे की तुम्हाला काय हवंय? तुमचे ध्येय काय आहे? त्या ध्येयाच्या मार्गावर प्रवास करण्यासाठीची तुमची योजना काय आहे ? तयारी कितपत आहे? धोके कुठचे दिसतायेत? मदत काय हवी आहे? दुसर्यांना मदत करण्याची तयारी आहे का? तुम्ही दुसर्यांसाठी प्रेरणा, ऊदाहरण बनू शकता का? कुणाला दिशा दाखवू शकता का?
आगाऊ, मस्त उदाहरण! आपल्याला नक्की कोणती लाईफस्टाईल हवी हे ठरवता आलं पाहिजे. कुठं थांबायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. >>> आयडू, चर्चा खरंच थांबण्याबद्दल करायची आहे का? की मुसंडी मारून अजून पुढे जाण्याबद्दल करायची आहे?
गो बिग ऑर गो होम.
ही चर्चा 'आय नीड अ चेंज' ऐवजी 'आय नीड अ ब्रेक' अशी जातेय पाहून आता हा धागा ऑप्शनला टाकावा असे वाटले पण एका चांगल्या धाग्याची गाडी रूळावर यावी असे मनापासून वाटत आहे आणि आपले म्हणणे पुन्हा एकदा सांगून पहावे म्हणून भाषेच्या बाबतीत हात थोडा सैल सोडला.
आर्च, फारेण्ड आणि चमन - चर्चा
आर्च, फारेण्ड आणि चमन - चर्चा व्यवस्थित रुळावर आणल्याबद्दल आणि इथे 'ब्रेक' पेक्षा 'चेंज' वर रोख वळवणे जास्त गरजेचे आहे हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!
ही चर्चा 'आय नीड अ चेंज' ऐवजी
ही चर्चा 'आय नीड अ चेंज' ऐवजी 'आय नीड अ ब्रेक' >>>> मला वाटते ब्रेक, स्केल बॅक , अल्प संतुष्ट्पणा, महत्वकांक्षा नसणे या गोष्टी बर्याच वेगळ्या आहेत. एकच काम करुन करुन रुटीन होउन त्याचा कंटाळा येणे आणि ब्रेक्ची गरज भासणे ही सुध्हा वेगळी गोष्ट आहे.
असे काही निर्णय - तिशीत/चाळिशीच्या सुरूवातीस असलेले लोक घेऊ शकतील का?>>>> हो.
करिअर चेंज करता खूपच लिमिटेड ऑप्शन्स उपलब्ध असतात.>>>>
वरचा माझा अनुभव फारच त्रोटक पणे मांडला गेलाय. सगळा धागा वाचुन झाल्यावर मला असे वाटले कि हे सगळे 'आय नीड अ चेंज' "इन अॅटीट्युड " यासाठी लिहलय. मी ८ महिण्यांपुर्वी प्रत्येक उपलब्ध नोकरीच्या संधीसाठी कोणता द्रुष्टीकोन ठेवुन काम करायला लागेल याचा बराच विचार केला. तेंव्हा असं वाटलं कि आताचा जो प्लान केला आहे तो माझ्यासाठी योग्य आहे. (सध्यातरी असं वाटतयं). सध्याच्या परिस्थितीमध्ये काहि जॉब्स साठी कंप्लिट वेगळा अॅटीट्युड लागतो (जसा वर बर्याच जणांनी वर्णन केला आहे). मग हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे कि कोणत्या गाडीत बसायचे आहे. माझ्या सध्याच्या जॉब मध्ये सुध्हा रॅटरेस मध्ये अडकु शकतो, पण अडकायलाच पाहिजे असं काय नाहिय.
सध्याचे उत्पन्न हे अगोदर्च्या उत्पन्नाच्या मानाने खुपच कमी आहे, पण जेव्हढे लागते त्यासाठी पुरेसे आहे आणि अजुन मी (अर्ली ) तिशीतच आहे.
आणि हो निवांत म्हणजे आळ्शी नव्हे
अजुन एक महत्वाचे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या पुढच्या पिढीवर नक्किच परिणाम होतो. शेवटी आपण त्यांच्यासाठी काय अॅटीट्युड (वारसा) देतो हेच महत्वाचे. Transfer of Thought Process.
नाही पटले चमन/फारेंड चेंज
नाही पटले चमन/फारेंड
चेंज लिनियरच असायला हवा असे नाही. धागाकर्त्यानेही ' पॅराडाईम शिफ्ट' बाबतच लिहीले आहे. पण ठिकाय तू म्हणतोस त्या प्रकारच्या चेंजवरही बोलायला हवेच.
आणि कोणीतरी रेषाच बदलली म्हणुन 'बॅकवर्ड' चेंज असे वाटत नाही. इटस फाईन. जगातल्या सगळ्या entrepreneurs ने असे तथाकथित 'फॉरवर्ड नसणारे बदल' केले आहेत की.
ताण सगळ्यांना असतात याला अनुमोदन.
आणि चमन, थोडेसे uptight वाटतेय रे. करावा लागला म्हणुनच केवळ चेंज न करणे तर जाणीवपूर्वक करणे. हे म्हणजे लग्न करताना ठरवून पारखुन, पूर्ण प्रेमाने, पुर्ण कमिटमेंटने करणार्या लोकांनी लिहा, पण लग्न झालं आणि आता ते उत्तम प्रकारे निभावतोय असे नको.. असे काहीतरी वाटले. माझे म्हणणे, कारणे काही का असेना, तो बदल केला हे महत्त्वाचे. आणि ट्रॅकचेंज ला लागणारी दूरदृष्टी, पॅशन, विचारांची स्पष्टता किती लोकांकडे असते? फारतर ३%. सगळे 'ट्रायल अँड टेरर', संधी आणि लक बेसिसवर चालू असते.
पुन्हा त्या 'मंक व्हु सोल्ड हिज फेरारी' पर्यंत आलो की आपण.
असो पण. तुम्ही म्हणताय त्याप्रकारची उदाहरणे आहेत. लिहावे की नाही ते ठरत नाहीये.
अॅटीट्युड (वारसा)- >>> हे पटले निवांत.
रैना, तुला अडचण नसेल वाटत तर
रैना, तुला अडचण नसेल वाटत तर जरूर लिही.
मी स्केल बॅक केवळ त्या दोन उदाहरणांसाठी म्हणालो. आणि ते ही मला तसे वाटले एवढेच. जे इतर लोक असा बदल करतील ती सगळी स्केल बॅकची उदाहरणे असतील असे नाही.
>>> असे काही निर्णय -
>>> असे काही निर्णय - तिशीत/चाळिशीच्या सुरूवातीस असलेले लोक घेऊ शकतील का? शकत असतील तर काय विचार करावा याबद्दल कोणी लिहू शकले तर वाचायला आवडेल.
तिशीतलं माहिती नाही, पण चाळीशीच्या सुरवातीला/मध्याला असा निर्णय घेतलेले काही जण मला माहिती आहेत. पसिद्ध लेखक संजय भास्कर जोशी हे एक उदाहरण. त्यांनी वयाच्या ४३ व्या वर्षी आयडिया सेल्युलर चा जॉब कायमचा सोडून (तिथे ते खूपच वरच्या जागेवर होते) पूर्ण वेळ लेखन करायला सुरूवात केली. माझ्या ओळखीतल्या ४-५ जणांनी ४३ ते ४५ या वयोगटात पूर्ण निवृत्ती स्वीकारून आता स्वतःच्या आवडीचे काम करतात. अर्थात यातले संजय जोशी सोडून इतर सर्व जण आयटीतले आहेत.
वाचतोय. बदलाच्या प्रक्रियेतून
वाचतोय. बदलाच्या प्रक्रियेतून जातोयही. अजून लिहिण्यासारखे काही झालेले नाही. लवकरच होईल अशी आशा आणि प्रयत्न आहेत.
अनेक पैलू आहेत. न आवडलेल्या कामात अडकणे, काम हेच आयुष्य होऊन राहणे, साचलेपणा येणे. सगळ्यांनीच छान लिहिले आहे. चमन आणि आर्च विशेष.
कधीतरी वाचलेले, पटलेले तरीही वळावता न आलेले :
Your job is only a part of your life; it's not our life.
मी लिहू का? माझा नाही पण
मी लिहू का?
माझा नाही पण सतिशचा- माझ्या नवर्याचा अनुभव आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी दहावीला चांगले मार्क्स मिळाले म्हणून तो डिप्लोमाला गेला. तिथे त्याला कॉम्प्युटरची सीट मिळाली नाही म्हणून ईंजिनीअरिंगला गेला. अर्थात तीनही वर्षं चांगल्या मार्काने पास झाल्यावर डिग्रीला जायची चांगली संधी होती. पण त्याला एन्रॉनची चांगल्या पगाराची नोकरी चालून आली. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तेरा हजार म्हणजे भुरळ पडली नसती तर नवल. पण दोन वर्षे नोकरी केल्यावर प्रोजेक्ट बारगळला. नंतर चालू झाली ती वणवण. रत्नागिरीत नोकरी मिळेना. मुळात सतिशला स्वतःलाच तिथेच अडकून रहायचं नव्हतं. म्हणून मुंबईला आला. अर्थात घरच्याचा याला जबरदस्त विरोध. "लोट्याच्या माळावर मिळेल नोकरी"हेच एक तुणतुणं.
मुंबईला आल्यावर नोकरी मिळाली ती सहा हजार पगारावर. काम होतं टेस्टिंग कमिशनिंग. या कामसाठी नाशिक, गोवा, अहमदाबाद असं बर्याच ठिकाणी फिरवलं पण, पगार काही वाढत नव्हता. आणि दुसरी नोकरीपण मिळेना. शेवटी जो काही पैसा साठवला होता त्याच्या जोरावर त्याने डिग्रीला अॅडमिशन घेतली. ती पण वयाच्या चौवीसाव्या वर्षी. एक्स्टर्नल डिग्री करण्यापेक्षा कॉलेज करून डिग्री करणे त्याला जास्त योग्य वाटले. कणकवलीला त्याने डिग्री पूर्ण केली. डिग्री संपल्यावर (डिस्टिंक्शन मिळाले) त्याला कॅम्पस मधे आर कॉममधे जॉब मिळाला. हे काम आयटीमधले असल्याने फक्त ऑफिस वर्क होते. थोडे दिवस हा जॉब केल्यावर परत कंटाळा यायला लागला. हा कंटाळा म्हणजे रोज रोज तेच ऑफिस, तेच काम, आणि तीच लोकं. शिवाय काम केल्याचं समाधान पण मिळत नव्हतं. ऑफिस पॉलिटिक्स हा एक वैतागवाणा विषय होताच. तिथे काम कमी असल्याने लोकांचा बराचसा वेळ पॉलिटिक्स करण्यात जायचा.
एकदा माझे पप्पा आणि त्यांचे बॉस मुंबईला कामानिमित्त आले होते. जाता जाता वाटेत नवी मुंबईला आमच्या घरी थांबले होते. तेव्हा बोलता बोलता सहज विषय निघाला की मंगलोरला नविन यार्ड सुरू होत आहे वगैरे वगैरे. तेव्हा पप्पांच्या बॉसनी सतिशला तुला जॉईन करायला आवडेल का? असे सहज विचारले. नंतर रीतसर इंटरव्ह्यु वगैरे झाल्यावर तो ट्रेनिंगसाठी रत्नागिरीला जॉईन पण झाला. इथे काम होते शिप बिल्डिंगचे. पगार वाढ होतीच. त्यामुळे याला स्टेप बॅक असे म्हणता येणार नाही. हा पूर्णपणे करीअर चेंज होता. त्याशिवाय मुळात हे काम करायला सतिशला फार आवडलं.
इथे सतत वेगवेगळ्या पद्धतीचं काम असतं. प्रत्येक जहाज वेगळं तसं त्याचं काम वेगळं. टीम वर्क आणि स्वतःचं डोकं दोन्ही लढवावं लागतं. कल्पनाशक्ती वापरावी लागते. त्याशिवाय शारिरीक कष्टाचे काम असतेच पण काहीतरी बनवल्याचं/निर्माण केल्याचं एक वेगळंच मानसिक समाधान असतं. नाही म्हटलं तरी थोडंफार साहसीपणा असतो. सुनामीची वॉर्निंग आल्यावर जेव्हा इतर लोक बीच रिकामा करतात तेव्हा हे लोक जाऊन अँकर व इतर सिस्टीम्स तपासून येतात. हे एक उदा.
पोर्ट आणि स्टारबोर्ड माहित नसलेला माणूस दोन वर्षान्च्या अनुभवानंतर जेव्हा डोळ्यासमोर ड्राँईन्ग नसताना नेव्हल आर्किटेक्टला त्याच्या चुका धडाधड फोनवर सांगू शकतो. तेव्हा, ती त्याची फक्त "नोकरी" नसते. ते त्याचं पॅशन बनलेलं असतं. पैसा कमावणे या उद्देशापलिकडे जाऊन केलेलं छंदीपणा असतो.
एका अर्थाने बघायला गेलं तर ही नोकरी म्हणजे २४ तासाचा जॉब. जहाजावर काम करणारी माणसं, जहाजावरचे सामान या सर्वाची अंगावर जबाबदारी असतेच. त्यामुळे येणारे ताण तणाव अपरिहार्य आहेत. पण या तणावामुळे त्रास होत नाही. उलट काम नसेल तेव्हा अस्वस्थता येते. वर्क लाईफ बॅलन्स हा समतोल सांभाळावा लागत नाही कारण, काम आणि आयुष्य दोन्ही वेगवेगळे होत नाही आहेत.
सतिश पूर्वी आयटीमधे असताना "आज मी खूप दमलो" हे रोज म्हणायचा. खरंतर सान्पाडा ते डीएकेसी इतकाच प्रवास. शिवाय ऑफिस वर्क, दमण्यालायक काही कामच नसायचे. पण तेव्हा त्याचा मेंदू काम नसल्याने थकायचा, आता जवळ जवळ पंधरा किमी बाईकवर. शिवाय जहाजाच्या आतमधे सतत पाच सहा तास उभे राहून काम. ऑफिसवर्क केले तर अर्धापाऊण तास. असे असून देखील त्याला कामाचा थकवा जाणवत नाही. घरी आल्यावर अर्थात काम नसते पण फोनाफोनी चालू असते. काही ईमर्जन्सी असेल तर रात्री अपरात्रीदेखील जावे लागते. पण त्यावेळेला नाराजी नसते. जेव्हा घरामधे गरज असेल तेव्हा सुटी घेतोच. याबाबतीत मात्र तो फार सुदैवी आहे. काम जास्त नसताना (म्हणजे पावसाळ्यात) तर सलग सुट्टीदेखील बिनदिक्कत घेता येते.
जगण्यासाठी भरपूर पैसा हवाच हे आम्ही दोघानीही मान्य केलय. त्यामधे नाकबूल करण्यासारखे काही नाही. काटकसर करून आम्ही सुखाने जगू शकत नाही. शिवाय गरजेच्या वस्तू आणि सुख चैनी हव्या आहेत. अर्थात पैसा कमवायचा म्हणून सर्वचआवडत्या गोष्टीचा त्याग करायचा आणि मन मारून जगायचे असे आमचे सूत्र नाही. पण एकदा का पैसा हवा आहे हे मान्य केले की तो कमवण्यासाठी लागणार्या कष्टांचं कौतुक करावं लागत नाही, हे मात्र खरं. त्याचबरोबर पैसा कमावताना नक्की कुठे सीमारेषा आखयाची हेदेखील ठरवून ठेवलेले आहे. सतिशला परदेशी नोकरीच्या संधी त्याने फक्त आणि फक्त फॅमिली अॅकोमोडेशन या एका कारणासाठी नाकारल्या आहेत. कारण, मला आणि मुलीला भारतात सोडून जायची त्याची तयारी नाही. पैसा कमी मिळाला तरी चालेल पण कुटुंब एकत्र हवं.
Pages