च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!
यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!
माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?
विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.
मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?
काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.
मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.
मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.
मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.
अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.
अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?
अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.
अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.
ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.
तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.
येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.
मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.
आमच्याकडे आहे सांगण्यासारख
आमच्याकडे आहे सांगण्यासारख बरच काही. पण सध्या जे उपद्व्याप करतोय ते बघता इथे वरचेवर लिहिण शक्य नाही.
किर्या.... कुठायस ?
खूप छान विचार करायला भाग
खूप छान विचार करायला भाग पाडणारा लेख, पण कोणीच प्रतिक्रीया का नाही दिल्या?
मी अशी छोटी उडी २००१ मध्ये
मी अशी छोटी उडी २००१ मध्ये घेतली होती... सरकारी नोकरीत सिस्टीम अॅडमिनीस्टर होतो... सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरच भूत डोक्यात गेलं... चालू नोकरीत डिव्हिजन/ रोल बदलून मागितला पण दिला नाही... नोकरी सोडली आणि दुसर्या खाजगी कंपनीत कमी पगारावर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर म्हणून लागलो...
आता जरा मोठी उडी मारायची आहे अजून ४ वर्षानंतर (चाळिशी झाल्यावर)... रॅटरेसमधून बाहेर पडायचं आहे... माहितीक्षेत्रातील करियर सोडून नॉन्-मेनस्ट्रिम करियर करायचं आहे... मनाजोगतं दिवसाचं रूटिन करायच... होमवर्क/ आर्थिक नियोजन चालू आहे...
सल्ला -
निर्णय घेण्याआधी सर्व गोष्टींचा विचार करा, बॅकअॅप प्लान तयार ठेवा...
कधीही घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप करु नका - अपयश हिच यशाची पहिली पायरी आहे.
जबाबदारी असल्यास त्याचे आर्थिक नियोजन करा
आयुष्यात चेंज घेतलाच पाहिजे..पण Calculated Risk घेऊन... कारण आपल्या निर्णयावर आपल्या घरच्यांचे आयुष्य अवलंबून असते...
Good Luck!
अरे मस्त आहे ह्या धाग्याचा
अरे मस्त आहे ह्या धाग्याचा विषय.
मायबोलीकरांच्या सक्सेस स्टोरीज नक्कीच वाचायला आवडतील.
मी रॅट रेस मध्ये अडकलो होतो
मी रॅट रेस मध्ये अडकलो होतो अनेक वर्षे.
व्यवसाय प्रमुख् ,खूप नावाजलेली कंपनी
पगार उत्तम्,हुद्दा उत्तम्,मानमरातब्,इतर सोयी सर्व उत्तम
मन लागत नव्हतं,
मला आवडायचं संगीत, वाचन्,भटकंती,मुलाना शिकवायला
रोज बॉटम लाईन्,टॉप लाईन चा गजर ऐकून कान किटले होते
एके दिवशी धाडकन निर्णय घेतला
यातून बाहेर पडायचा,
सगळ्यानी वेड्यात काढले,
उरलेली नोकरी गुणिले पगार हा गुणाकार सगळ्यानी दाखविला
पण हिने मात्र साथ दिली
बाहेर पडून २ वर्षे झाली
कॉलेजात शिकवतो,जन्मभराचे अनुभव मुलाना सांगतो
त्यांना इंटरव्ह्यु साठी तयार करतो,
त्यांच्या बरोबर तरुण राहतो
पैसा पहिल्याच्या एक पंचमांशही मिळत नाही
पण खूप पुरतो,आधीचा कमी वाटायचा
वेळ माझ्या मूठीत आहे
आणखी एक नवीन क्षेत्र सापडलं आहे
मी आता अनुवाद पण करतो -अनेक मोठ्या प्रकाशकांसाठी
पुस्तके लिहितो लहान मुलांसाठी
भटकतो खूप
मी मोठे पणा म्हणून हे लिहित नाहीए
पण हे घडू शकतं -एवढच सांगण्यासाठी
मस्तय धागा.. रेव्यु तुमचा
मस्तय धागा..
रेव्यु तुमचा अनुभव भारी...
मलाही असं काही करायला आवडेल.. मला पण बदल हवाय पण नक्की काय करायला आवडेल तेच कळत नाही
बहुतेक काहीच न करणे जास्त आवडेल
तुम्ही कॉलेजात शिकविता का? त्यासाठी काय पात्रता लागते ... म्हणजे शैक्षणिक पात्रता...?
रेव्यु, राजू७६, खूप छान
रेव्यु, राजू७६,
खूप छान अनुभव, शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
काहीशा अशाच अवस्थेतून मी स्वतः आणी काही मित्र सुद्धा जात आहेत.. असो, इतरांचेही अनुभव वाचायला आवड्तील.
तुमचं नाव चांगलं आहे. तुम्ही
तुमचं नाव चांगलं आहे. तुम्ही या नावामागे स्वामी हा शब्द जोडून नव्या क्षेत्रात प्रवेश करू शकता.. खूप छान व्यवसाय आहे
रेव्यु खूप छान अनुभव
रेव्यु खूप छान अनुभव प्रेरणादायी अगदी.
. मी बिल्कूल महत्वाकांक्षी नाही. संधी मिळाल्यास नोकरी सोडून घरी बसायला खूप आवडेल. मी आत्ता आहे त्याच कंपनीत आधी अॅडमिन मध्ये होते, तिथे मग ग्रोथ, रॅट रेस, पी आर आला... मी हॉरिझाँटल जम्प घेऊन सेक्रेटरी झालेय व्हिपीची. पण इथली टेंशन्स वेगळी आहेत. कंटाळा येतो.
कधी कधी प्रश्न पडतो मला जगायला पैसा का लागतो?
धन्यवाद सगळ्याना
धन्यवाद सगळ्याना
रेव्यु, कौतुक! आपल्याला नक्की
रेव्यु, कौतुक! आपल्याला नक्की काय काम करण्यात आनंद मिळतो हे समजणे आधी महत्त्वाचे. मग मोठ्या तडजोडी न करता ते करायला मिळणे म्हणजे सुखी मनुष्याचा सदरा सापडणेच.
दक्षिणा, अजिबात काहीच करावेसे न वाटणे हे थोडे काळजीचे आहे. बर्याच वेगवेगळ्या गोष्टी करून, प्रयोग करून बघ काय आवडतंय.. मधूनच सध्याच्या कामातून सुट्टीही घेऊन बघ. आवडीचे क्षेत्र सापडण्यासाठी शुभेच्छा!
वा वा राजू आणि
वा वा राजू आणि रेव्यु....मस्त
निर्णयाआधीचा वैताग...निर्णय घेतानांची घालमेल...त्यानंतरचे स्थिरस्थावर होईपर्यंतची लढाई..त्यानंतर हळूहळू मिळत जाणारा आनंद आणि आता मागे वळून पाहतांना, असे जरा विस्कटून सांगा की राव...
रेव्यु (म्हणजे काय?) तुम्ही अनुवाद करता म्हणजे नक्कीच चांगलं लिहित असाल. थोडे डीटेल्वारी अनुभव सांगता का तुमच्या प्रवासातले?
वर्षापूर्वी धागा आहे धागा, ऊघडणारे कंटाळून विसरले वाटतं.
माझे काही अनुभव सांगतो. मी
माझे काही अनुभव सांगतो.
मी आयटी क्षेत्रात २० वर्षे काम केलं. त्यातली ६-७ वर्षे परदेशात होतो. सुरवातीची ६ वर्षे सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये आणि नंतर कमर्शियल डोमेन मध्ये होतो. शेवटची ८-१० वर्षे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रोग्रॅम मॅनेजर, अकाऊंट मॅनेजर असे रोल केले. हे सर्व करताना आर्थिक स्थिरता आली व व्यक्तीगत जीवनात या सर्वांची मी मोठी किंमत मोजली. मार्जिन, स्टाफिंग, कस्टमर सॅटिसफॅक्शन, अशा गोष्टींनी व कॉर्पोरेट क्षेत्रातल्या जीवघेण्या स्पर्धेने व राजकारणाने डोक्याला खूप ताप व्हायचा. सुमारे २००३ पासून या क्षेत्रातून कायमस्वरूपी बाहेर पडण्याचे विचार सुरू होते. पण व्यक्तीगत जीवनात बर्याच संकटातून जाऊन बाहेर पडल्यावर शेवटी २००८ मध्ये या क्षेत्राला कायमस्वरूपी रामराम ठोकला. अर्थात आयटीतून बाहेर पडताना आर्थिक आढावा घेऊन पुढील आर्थिक प्लॅनिंगही केले होते.
बाहेर पडल्यावर वर्षभर काहीही केले नाही. १ वर्षानंतर आयटीत परत जावेसे वाटू लागले. २ इन्टरव्ह्यू पण दिले. पण जॉब कंडीशन्स न पटल्याने जॉब घेतले नाहीत. नंतर आयआयटी प्रशिक्षण देणार्या एका संचालकांशी ओळख झाली. गेल्या १-२ वर्षांपासून आता तिथेच फाऊंडेशन बॅचेसला गणित शिकवतो. आठवड्याला फक्त ४-६ तास शिकवायचे. या वर्षीपासून एक बॅच जास्त घेऊन आठवड्याला ८-९ तास शिकवायचे आहे. गणितातली मजा आता लक्षात येत आहे. विद्यार्थ्यांना तयार करण्याचा व ज्ञानदानाचा आनंद घेत आहे.
आयटीत जेवढे उत्पन्न होते त्याच्या १/५ सुद्धा उत्पन्न नाही, पण आयटीत डोक्याला जेवढे ताण व काळज्या होत्या व त्यांच्यामुळे आलेल्या व्यक्तीगत समस्या होत्या, त्याच्या १/५० सुद्धा ताण व काळज्या इथे नाहीत. ज्या कारणामुळे आयटीतून कायमस्वरूपी बाहेर पडलो, त्या बर्याचशा व्यक्तीगत समस्या संपल्या व उरलेल्या नियंत्रणात आहेत.
आयटीतून बाहेर पडायला कुटुंबियांचे भक्कम पाठबळ लाभले. अन्यथा हे शक्य झाले नसते.
आर्थिक आढावा घेऊन, नियमित बचत करून, आर्थिक व इतर गोष्टींचे व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबियांना विश्वासात घेतले तर आधीच्या क्षेत्रातून बाहेर पडून आपल्या आवडीचे काम यशस्वीरित्या करता येते.
हे मी कदाचित आधी लिहिलंही
हे मी कदाचित आधी लिहिलंही असेल, तरी परत लिहितो.
मी अगदी लहान वयात सी.ए. पूर्ण केले. (२२ व्या वर्षी) हे क्षेत्र म्हणजे निव्वळ डोक्याला ताप.
आर्टिकलशिप करताना टॅक्सच्या तारखा संभाळायचा खुप ताण यायचा. त्यावेळी ३० जून म्हणजे खुपच कामे उरकायची असत. आणि त्याच काळात २२ जूनला पहाटे २ वाजता मला प्रचंड डोकेदुखी आणि पोट दुखीने हॉस्पिटलमधे दाखल व्हावे लागले. अनेक चाचण्या करुन डॉक्टरांना निदानच करता येत नव्हते,
त्यांनी माझा हात हातात घेऊन चौकशी केली. तू काय करतोस, काय आवडते वगैरे ? मग त्यांनीच मला दाखवून दिले कि आवडत्या गोष्टी करायला मला वेळच मिळत नाही. त्यांनी मला एक गुरुमंत्र दिला जो मी आजवर पाळतोय.
मी माझ्या व्यवसायाला फक्त आणि फक्त आठच तास देतो. बाकीचा पूर्ण वेळ हा माझा असतो. ऑफिसच्या बाहेर पडल्यावर मी ऑफिसमधल्या कुठल्याच गोष्टीची चर्चा करत नाही. ऑफिसमधे असताना मात्र पूर्णपणे त्यात असतो.
आता इतक्या वर्षांच्या (२७) अनुभवानंतर व्यवसायात इतका हात बसलाय कि त्यासाठी अजिबात मानसिक शक्ती खर्च करावी लागत नाही.
त्यामूळे ती उर्जा, छंदासाठी, वाचन, लेखन, पाककला, फोटोग्राफी, माहितीपट, चित्रपट बघणे, भटकंती, मूलाशी खेळणे या सगळ्यांसाठी वापरता येते.
व्यवसायातून बाहेर पडायचे सगळ्यांना जमेलच असे नाही, पण स्वतःला वेळ देणे, तितकेसे कठीण जात नाही.
रेव्यु, मस्त पोस्ट. माझीही
रेव्यु,
मस्त पोस्ट. माझीही शेवटची ३ वर्षे आहेत ही रॅटरेसमधली. मग मनाजोगते काम करणार आलटुनपालटुन (असे नवरा आणि मी आत्ता म्हणतोय). दोघांनीही मन मारुन काम करण्यात पॉईंट नाही. पाहुयात.
जरा तपशीलवार लिहाल का?
खरं सांगायचे तर रॅटरेसपण मला आवडते, त्यातुनही खूप शिकले, कामही भरपूर केले, तडजोडी मर्यादेत राहुन केल्या मूल्यांना धक्का न लावता. पण रॅटरेससोबतच इतरही अनेक गोष्टी आवडतात.
मास्तुरे- अनुमोदन. कुटुंबियांना विश्वासात घेऊन काय ते करावे.
मिल्या ,चमन,रैना मी वयाच्या
मिल्या ,चमन,रैना
मी वयाच्या १७ व्या वर्षी नोकरी सुरू केली-आर्थिक कारणांमुळे.अख्खी करियर मॅन्ञुफॅक्चरिंग मध्ये काढली.स्नातकोत्तर पातळीपर्यंत्चे शिक्षण (अभियांत्रिकी) नोकरीबरोबरच पाळ्या अॅडजस्ट करून केले. पहिली २५ वर्षे खूप मजा आली.जगभर हिंडलो,भारतभर हिंडलो.
बरोबरच वाचन्,गाणे ऐकणे,कार्यक्रमात निवेदन करणे ,इ चालू ठेवलो.उत्तरेत २१ वर्षे असूनही मराठीची नाळ तोडली नाही,व स्वखर्चाने खूप पुस्तकसंग्रह केला.
२१ व्या शतकाबरोबरच जीवघेणी रॅट रेस व कुतर ओढ सुरू झाली.यात मुख्य भर टाकली मोबाईलने.स्वतःचा वेळ उरेना (कृपया-फोन बंद ठेवणे तुमच्या हातात होते असा सल्ला खूप जण देतील पण मला ते शक्य झाले नाही.) माझे छंद वेगळे होते.मला मॅन्युफॅक्चरिंगही आवडायचे पण त्यातील टेक्निकल भाग, मॅनेजमेंट नाही. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षातील यूनियन लीडर्स कडून धमक्या येणे इ.इ. ,हँडल तर केल्या पण वीट येवू लागला.मानसिक व थोडाफार शारिरिक त्रास होवू लागला होता. अन शेवटी हा निर्णय ५५ व्या वर्षी घेतला.वरपांगी मी टॉप वर होतो -लौकिक दृष्ट्या.
हा निर्णय घेतानाच्या बाबी
-एका मुलीचे लग्न झाले होते,दुसरीचे शिक्षण चालू होते.
-हाऊसिंग लोन संपले होते.
- महिन्याचा खर्च एका साध्या विचारसरर्णीच्या विभक्त पध्दतीच्या कुटुंबास किती लागतो याचा अंदाज घेतला.
-दुसर्या मुलीची जबाबदारी ,आर्थिक रीत्या किती आहे हे पाहिले.
-फक्त छंद जोपासले तर दिवस काढू शकेन का याचा विचार केला-उत्तर नाही आले.
-मग आणखी काय करू शकतो त्याचा विचार केला व मनाने सांगितले तू शिकवू शकतोस.
-या एका विचारावर,काही रिस्क व काही आत्मविश्वास अशा संमिश्र भावनांत राजिनामा दिला. -एप्रिल २०१०
-नंतर ३ महिने भटकलो.
-एका कॉलेजात सहज भेट दिली व प्रिन्सिपॉलना भेटलो व शिकविण्याव्यतिरिक्त मुलांना त्यांच्या करीयर संबंधी व नोकरीसंबंधी मार्गदर्शन करू शकेन असे वाटले.याशिवाय माझ्या गेल्या ३५ वर्षांच्या इंडस्ट्रीशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्या साठी प्रॉजेक्ट्स देणे,तेथील तज्ञांची भाषणे आयोजित करणे इ. कॉलेज मॅनेजमेंटने न सांगता सुरू केले. पहिल्या वर्षी ८०% मुलांना नोकर्या मिळाल्या व या प्रकारे कॉलेजचा एक अविभाज्य घटक बनलो.
या बरोबरच ,मी इंडस्ट्रीत असताना माझी भाषा (इंग्रजी,मराठी व हिंदी) चांगली आहे अशी ख्याती होती.एकदा मला त्यांनी त्यांच्या वेतन युनियनच्या कराराची प्रत भाषांतरासाठी पाठविली. मी ते केले अन मला प्रचिती झाली की अरेच्चा-हे तर आपण करू शकतो.याच सुमाराला माझे एक वरिष्ठ प्राध्यापक स्टीव्ह जॉब्ज्च्या चरित्राच्या भाषांतराचे काम करीत होते. त्यांना मी मला एक चॅप्टर प्रयोगात्मक द्यायला विनंती केली .ते भाषांतर त्यांना पसंत पडले. त्यांना ते ५००-६०० पानी भाषांतर डिसेंबर २०११ पर्यंत पूर्ण करायचे होते,कारण त्या आयजॅक्सन्च्या पुस्तकाचा अनुवाद १५ डिसेंबरपर्यंत जगातील वेगवेगळ्या भाषात प्रकाशित व्हायचा होता. पण दुर्दैवाने जॉब्ज ऑक्टोबर ५ ला निवर्तला व त्यामुळे ही अंतिम तारीख बदलण्यात आली व ती आता १ नोव्हेंबर झाली.मग मला आणखी चॅप्टर मिळाले व आम्ही हे काम वेळेवर पूर्ण केले.अशी ही माझ्या अनुवादकार या कारकीर्दीची सुरुवात.
मग स्वतंत्रपणे काम सुरू केले.तत्पूर्वी मी अनेक प्रकाशकांशी संपर्क साधला,भेटलो,माझ्या कामाचे नमूने दिले व स्वीकृत करून घेतले.पहिले प्राधान्य माझे काम चांगले करण्यास दिले.मला पहिले पुस्तक मराठी ते इंग्रजी मिळाले पण ते माझ्या नावावर मिळाले नाही कारण मला क्षेत्रात अजून नाव नव्हते व प्रकाशकाला रिस्क घ्यायची नव्हती म्हणून माझे काम मी एका प्रसिध्द व्यक्तीकडून संपादन करून घेतले व त्यांच्या नावानेच प्रकाशित करण्यास मान्यता दिली.आता ते ते या महिन्यात प्रकाशित होईल.त्यानंतर मला आता ५ पुस्तके (२ मराठी-इंग्रजी,३ इंग्रजी -मराठी-माझ्या नावावर प्रकाशित होणारी- मिळाली आहेत्.महिन्याला जर साधारण १०० तास दिले तर २० ते २५ हजार कमावता येतात्,पेपर बॅक मापाचे २५० ते २७५ पानांचे एक पुस्तक महिन्याभरात करतो.इंग्रजी ते मराठी या भा.षांतरात मला मायबोलीवरील टंकलेखनाचा खूप फायदा झाला कारण फार कमी अनुवादकार मराठीत टाईप करून अनुवाद देतात व त्यामुळे तो माझा युनिल सेलिंग पॉइंट आहे.यान शिवाय अनुवाद करताना त्या पुस्तकातील वातावरण निर्मिती,गर्भितार्थ वगैरे ठेवताना जी मजा येते ती वेगळीं. नवनवीन वाचन होते ते वेगळे.वेगळ्या क्षेत्रातील लोक भेटतात व नवीन शिकायला मिळते.
या शिवाय लहान मुलांसाठी नेते,देश्,शोध इ. २५ मालिका इंग्रजीत केल्या आहेत.
असा हा प्रवास.
रेव्ह्यु, महान आहात! तुम्हाला
रेव्ह्यु, महान आहात! तुम्हाला दंडवत!
तुमची सविस्तर पोस्ट खुप भावली.
प्रेरणादायी लिहीले आहेत
प्रेरणादायी लिहीले आहेत रेव्यु. मस्त वाटले वाचून.
रेव्यू, तूमच्या मार्गावर
रेव्यू, तूमच्या मार्गावर जावेसे वाटतेय.
खूपच प्रेरणादायक!!
खूपच प्रेरणादायक!!
रेव्यु, मस्त लिहिले आहे.
रेव्यु, मस्त लिहिले आहे. आवडले.
खूप छान अनुभव प्रेरणादायी
खूप छान अनुभव प्रेरणादायी अगदी...! तुम्हाला दंडवत!
वॉव. मस्त पोस्ट रेव्यु.
वॉव. मस्त पोस्ट रेव्यु. धन्यवाद. यु मेड माय डे.
रेव्यु एक सेप्रेट लेख लिहाच
रेव्यु एक सेप्रेट लेख लिहाच या विषयावर. खूपच प्रेरणादायी आहे.
many people would like to follow their dreams, like you.
All the very best.
रेव्यु, उत्तम पोस्ट. फारच
रेव्यु, उत्तम पोस्ट. फारच प्रेरणादायी लिहिले आहे. सविस्तर लेख अवश्य लिहा.
रेव्यु, वा! मस्त पोस्ट.
रेव्यु, वा! मस्त पोस्ट. मनापासुन आभार.
सध्या मी अशाच बदल करण्याच्या मार्गावरुन जात आहे. तुमची पोस्ट फार उपयोगी पडेल.
रेव्यु, खरच खूपच छान अनुभव,
रेव्यु,
खरच खूपच छान अनुभव, येऊद्या अजून !!
रेव्यु... फारच मस्त अनुभव...
रेव्यु... फारच मस्त अनुभव...
उडी मारायची आहे पण कधी आणि कशी हा विचार चालू आहे सध्या..
प्रेरणादायी अनुभव रेव्यू!!
प्रेरणादायी अनुभव रेव्यू!!
सर्वांना मनःपूर्वक
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
थोडे सविस्तर लिहू का विचार करतोय!!
यामुळे कुणाच्या मनातील कोलाहल कमी झाला तर ते लिखाण सार्थकी लागेल!!
Pages