नमस्कार मायबोलीकर,
मी मराठी नेट तर्फे घेतल्या गेलेल्या "मी मराठी नेट लेखन स्पर्धा २०१२" मध्ये माझ्या या कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक श्री. श्रीकांत बोजेवार उर्फ थंबी दुराई हे या स्पर्धेचे परीक्षक होते.
मायबोलीकर कवठीचाफा उर्फ श्री. आशिष निंबाळकर यांच्या "चक्रावळ" या कथेस प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तसेच मीमराठीकर 'नीलपक्षी' यांची "कोंबडीला मालक पाहीजेच" ही कथा तृतीय पारितोषिक विजेती ठरलेली आहे.
स्पर्धेचा निकाल इथे वाचता येइल.
****************************************************************************************************
"ए हिरो वो देख, आ गयी तेरी 'चिकनी चमेली'?"
राज्याने रोहनच्या पोटात कोपराने ढोसत खुसखुसत सांगितले तसे रोहनने त्या दिशेने पाहीले. चमेली नेहमीप्रमाणेच चमकत होती. साधारण गव्हाळ म्हणता येइल असा वर्ण, शार्प फिचर्स आणि नावाला साजेशी चमचम करणारी चंदेरी साडी. पदर कंबरेला खोचलेला, तोंड बहुदा तिचे नेहमीचेच जर्दा पान खाऊन लालभडक झालेले. रोहनकडे नजर जाताच तिने त्याला एक कचकचीत डोळा मारला आणि ...
"रुक रे, आती मै अब्बीच!" असे म्हणत पुढच्या व्यक्तीकडे वळली.
"रोहन्या, तू पण ना, या जगाबाहेरचा आहेस साल्या. तूला सापडून सापडून ही चमेलीच सापडली? अबे भीक मागणारीच हवी होती तर त्यातही कोणीतरी 'बाई' शोधायची होतीस? हे काय? धड बाई ना बाबा?"
रोहन नुसताच हसला, तोवर चमेली समोर येवुन उभी राहीली होती.
"किंव रे चमडी? साले, अकेला होता है तो मेरे पिछे पिछे आके इधर उधर हात लगाने को मंगताय और मेरे चिकनेको मेरेइच खिलाफ भडकाताय क्या?"
चमेलीने आपली जेमतेम अडीच इंचाची छाती पुढे काढत एका हाताने राज्याच्या पृष्ठभागावर एक लाडिक फटका मारला आणि दोन्ही हात छातीसमोर आणत आपल्या परंपरागत पद्धतीने दोन खणखणीत टाळ्या वाजवल्या.
"किंव रे चिकणे, तेरे को बोला था ना ऐसे दोस्तोसें तो दुश्मन भले करकें!"
"चमेली, तु काय त्याच्याकडे ल़क्ष देते? तुला तर माहीती आहे ना त्याचा स्वभाव? तो असाच आहे. तुला पाहील्यावर तर त्याला अजुनच चेव येतो."
रोहनने हसत हसत राज्याला शालजोडीतला दिला तसा राज्या हसायला लागला. बसस्टॉपवरील लोकांनी त्यांना बघून बघीतल्यासारखे केले. पहिल्या दिवशी जेव्हा चमेली या बस स्टॉपवर दिसली तेव्हा रोहनने तिला हाक मारुन जवळ बोलावले होते. त्यावेळी मात्र लोकांच्या, विशेषतः तरुण मुलींच्या नजरा पार विचित्र झाल्या होत्या. होणारच ना हो. एक देखणा, गोरा गोमटा अगदी सहा फुटी, एखाद्या ग्रीक देवतेसारखा दिसणारा तरुण तिथल्या इतक्या सुंदर मुली सोडून एका भिक मागणार्या हिजड्याशी एवढी जवळीक दाखवतो हे तसे थोडे विचित्रच होते.
इतरांचे सोडा, पहिल्या भेटीत राज्याची प्रतिक्रिया सुद्धा अशीच काहीशी होती. अर्थात ते साहजिकही होते म्हणा कारण राज्या गेल्या सहा महिन्यापासुन रोहनला ओळखत होता. बीडसारख्या तुलनेने कमी विकसीत जिल्ह्यातून शिक्षणासाठी म्हणून मुंबईला आलेला रोहन जागीरदार, राज्याचा रुम पार्टनर होता. अतिशय सरळ, सभ्य पण विदर्भ, मराठवाड्याचा असल्याने तो झटकाही त्याच्यात होताच. स्त्रीयांच्या बाबतीत अगदीच शामळु नसला तरी फार पुढारलेलाही नव्हता. अतिशय हुशार, अभ्यासु मुलगा. एकच दोष होता रोहनमध्ये तो म्हणजे त्याचं भावनाप्रधान कवीमन!
तसा रोहन कधीच कुणाच्या अध्यात्-मध्यात नसायचा. मुलींचे वावडे नव्हते त्याला पण स्वत:हुन ओळख करुन घेणे, त्यांच्या मागे पुढे रेंगाळणे असले प्रकार त्याच्या गावीही नसायचे. अगदी स्वतःहून ओळख करुन घेणार्या मुलींशीही त्याचे वागणे जेवढ्यास तेवढे. तसा तो उशीराच मुंबईत आला होता, कॉलेजचे प्रवेश कधीच संपलेले होते. पण बहुदा रोहनच्या वडीलांची पोहोच चांगली असावी, त्यामुळे त्याला कॉलेजला प्रवेश मिळून गेला होता. हॉस्टेल मात्र फुल्ल झालेले असल्याने तिथे दाळ शिजली नाही. पण कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी ओळख झालेल्या राजेश जगतापने त्याला आपली रुम (आणि भाडेही अर्थातच) शेअर करण्याची ऑफर दिली आणि त्याने ती सहज स्विकारली. तसा रोहन सधन घरचा. वडीलांचा छोटासाच पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. पण या वेड्याला मुंबईची ओढ लागलेली. वडीलांच्या मागे लागुन त्याने मुंबईत कॉलेजला प्रवेश घेतला होता. येताना बाईक बरोबर घेवुन आलेला. पण एकदा राज्याबरोबर बसने प्रवास केला आणि गच्च भरुन वाहणार्या बसची मज्जा त्यालाही आवडायला लागली. त्यानंतर आठवड्यात किमान तीन दिवस बसने कॉलेजला जायचे हे ठरुनच गेले. गेले सहा महिने राज्या त्याचा सभ्यपणा अनुभवत होता. विशेषतः तरुण मुलींच्या बाबतीत हा मुलगा इतका सोवळा कसा काय राहु शकतो? तेही आपल्याकडे एवढे अॅसेट्स असताना? याचे राज्याला कोडे पडले होते. म्हणुनच परवा जेव्हा बस स्टॉपवर रोहनने चमेलीला हात केला तेव्हा राज्यापण शॉक झाला होता.
"रोहन...., आयला कॉलेजमध्ये इतक्या पोरी तुझ्या मागे लागताहेत. त्यांच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीस आणि आज चक्क हा हिजडा? "
तसा रोहन गालातल्या गालात हसला. या आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येणार हे माहीत होते त्याला. पण त्याचा स्वभावच असा होता की जे पटेल तेच करणार. दुनीया जाये तेल लेने......! पण नकळत तो त्या विचारातच हरवला. त्याला चमेलीशी झालेली पहीली भेट आठवली.....
तसे तर कॉलेज आणि रुम दोन्हीही अंधेरीतच असल्याने त्याचे नेहमी बसने किंवा बाईकनेच जाणे व्हायचे. पण त्या दिवशी तो बाबांच्या आग्रहावरुन लोकल ट्रेनने विरारला त्यांच्या एका स्नेह्यांच्या घरी गेला होता. तिथेच जेवण वगैरे झाले. परत येताना तसा बराच उशीर झाला होता त्याला. रात्री ११ वाजुन गेले होते. उलटे अंधेरीकडे जायचे असल्याने लोकल गाड्यांना फारशी गर्दी नव्हती. लोकलने मीरारोड ओलांडले आणि अचानक कसलास गलका ऐकु आला म्हणून त्याने आवाजाच्या रोखाने पाहीले. २-३ हिजडे मिळून आपल्यातल्याच एका हिजड्याला मारहाण करत होते.
"तेरेको कित्ते बार बोला, इदर नइ आनेका करके. तेरा इलाका अंधेरी है ना तो उदरीच धंदा करनेका, ये हमारा इलाका है, इदरकु फिरसे दिखी ना तो टांग तोड देगी मै तेरा. बोलके रखती पैलेसेच."
एका साडी नेसलेल्या (गुडघ्यापर्यंत वर घेतलेली), पुर्णपणे पुरुषी दिसणार्या, गालावर दाढीची खुंटे बाळगणार्या हिजड्याच्या तोंडी ती स्त्रीयांची भाषा फार मजेशीर, काहीशी विचित्रही वाटत होती. ते तिघेही हिजडे तसलेच सांडच्या सांड दिसत होते. त्यातल्या त्यात ज्याला ते मारहाण होते तो हिजडा मात्र बर्यापैकी नाजुक होता. गोरापान, नाजुक चणीचा, देखण्या चेहर्याचा.........
"अरे जमनामौसी, मै तो किसीसे मिलने गयी थी नालासोपारामें. धंदा करने नै आयी थी रे इदर."
तो चौथा गयावया करुन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ते त्या तिघा/तिघींच्या पचनी काही पडत नव्हते. तिघे मिळुन चौथ्याला मारहाण करतच होते. डब्ब्यातलं पब्लिक नेहमीप्रमाणेच आपण त्या गावचेच नाही अशा पद्धतीने तमाशा बघत होतं. शेजारचा माणुस मरत असेल तरी जोपर्यंत स्वतःला धक्का लागत नाही तोपर्यंत आपण त्या गावचेच नाही अशी वृत्ती असते. येथे तर चार हिजड्यांच्या आपापसातील भांडणात पडण्याचे त्यांना काहीच कारण वाटत नव्हते. सुरुवातीला रोहनने पण दुर्लक्षच केले. पण त्या तिघांचा जोर वाढतच चालला तसा त्याला राहवेना, तो उठुन मध्ये पडला.
"ए छोडो उसको, उसने बोला ना , वो यहा धंदा करने नही किसीसे मिलने आया था करके?"
तसा त्यांच्यापैकी एकाने त्याच्याकडे मोहरा वळवला. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत त्याने विचारले.
"ए चिकने, तेरी सगेवाली लगती है क्या रे ये चमेली?" तसं गाडीतलं पब्लिक हसायला लागलं. रोहन क्षणभर गोरामोरा झाला. पण लगेच त्याने स्वतःला सावरुन घेतलं.
"हो आहे ! या जगातला प्रत्येक माणुस माझा नातेवाईकच आहे. काय म्हणणं आहे? सोडा त्याला." रोहनने बाह्या मागे सरकवल्या आणि तावा तावात पुढे झाल्या. तेवढ्यात पुढचं स्टेशन आलं, तसे रोहनचा रुद्रावतार पाहून त्या तिघांनी पळ काढला. जाता जाता एक जण पिंक टाकुन गेलाच तरीही....
"जिसको तू 'त्याला, तो' बोल रहा है ना, वो एक हिजडा है...., ना मर्द ना तो औरत! दुर ही रहना, फिर कभी देख लेंगे तेरेको."
"सच तो कहा है साब उन्होने. मै तो हु ही एक हिजडा. ना मर्द ना औरत ! हम जैसोसे दुरही रहो आप. भले घरके लगते हो!"
इतका वेळ मार खाणारा तो चौथा विव्हळत म्हणाला. तसे रोहनने त्याला खांद्याला धरुन उठवले, तिथल्याच एका बेंचवर बसवले.
"इन्सान तो हो , मेरे लिये उतनाही काफी है!"
रोहन हसुन म्हणाला तशी त्याच्या डोळ्यात एक मिस्कील चमक परत आली.
"बंबईमे नये लगते हो बाबु.......!"
अंधेरी आलं दोघेही उतरुन आपापल्या दिशेने रवाना झाले. पण हे नातं इथेच संपायचं नव्हतं. पुढे कुठल्या ना कुठल्या ठिकाणी रोहनची आणि 'त्या'ची भेट होत राहीली. कुठल्यातरी क्षणी मैत्री झाली. एक पुरुष आणि एक हिजडा या पलिकडे जावून दोन माणसे या पातळीवरची ती मैत्री होती. झोकुन देणं हा रोहनचा स्वभावच होता.
"ए चिकने, चल अपनी बस आ गयी."
चमेलीच्या आवाजाची नक्कल करत राज्याने रोहनचा शर्ट खेचला तसा रोहन परत वर्तमानात आला आणि खांद्यावरची सॅक सांभाळत बसकडे धावला.
" रोहन्या, यार मला एक सांग, नक्की काय, म्हणजे कसलं रिलेशन आहे तुझं चमेलीबरोबर." राज्याने न राहवून विचारले
"कसलं म्हणजे?" रोहनने डोळे मिचकावत उलट विचारले तसा राज्या गडबडला.
"म्हणजे...? म्हणजे... तसलं काही नसणार याची खात्री आहे मला. पण हे जरा विचित्रच वाटत नाही का तुला?"
"काय विचित्र आहे त्यात. मी ही एक माणुस आहे, तुही एक माणुस आहे, चमेलीही माणुसच ! मग जर तुझ्याशी माझी घनिष्ट मैत्री होवू शकते तर चमेलीशी का नाही?"
राज्या भडकला.....
"शब्दांचे खेळ नको खेळु माझ्यासोबत. तुझ्या चमेलीसोबतच्या नात्याला कसलेही ऑब्जेक्शन नाहीये माझे, तो तुझा व्यक्तीगत मामला आहे. पण एक मित्र म्हणून फक्त ते संबंध कश्या स्वरुपाचे आहेत हे जाणुन घ्यायची इच्छा आहे मला. तू जर त्या 'कल्याणी'च्या प्रपोजलला सहमती दिली असतीस तर ते समजण्यासारखे होते. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातील नाते समजण्यासारखे आहे. पण एक पुरुष आणि एक.......... ! हे काहीतरी विचित्र आहे असं नाही वाटत तुला?"
त्यांच्याच क्लासमधली कल्याणी देशमुख, भावी कॉलेज क्वीन आत्तापासुनच हात धुवून रोहनच्या मागे लागली होती. पण रोहन काही तिला दाद द्यायला तयार नव्हता. त्या पार्श्वभुमीवर रोहनची चमेलीशी असलेली मैत्री जवळच्या सगळ्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय होवू पाहत होती. राज्याला एकच भीती वाटत होती ती म्हणजे हे जर कॉलेजमध्ये पसरले तर त्याचा रोहनच्या करियरवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे तो आता थोडासा गंभीर झाला होता या विषयावर. ही वेळ कधी ना कधी येणार होतीच, त्यावर रोहनकडे स्पष्टीकरण पण तयार होते. राज्याने निर्वाणीने हा प्रश्न विचारला आणि स्वतःच्याही नकळत रोहन परत भुतकाळात शिरला....
त्यादिवशीच्या लोकलमधील भेटीनंतर बर्याच वेळा चमेलीची आणि त्याची भेट कुठे ना कुठे होत राहीली होती. कधी बस स्टॉपवर, कधी रेल्वे स्टेशनवर..... कधी असेच बाजारात फिरताना. अंधेरी ईस्ट हा चमेलीचा व्यवसायाचा इलाखा होता. सुरुवातीला थोडा टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्या कायम काही तरी हटके शोधण्याचा आणि मग स्वतःला झोकुन देण्याचा स्वभाव त्याला चमेलीच्या बिनधास्त आणि बेफिकीर वागण्याकडे आकर्षित होण्यापासून रोखु शकला नव्हता. कुठल्यातरी क्षणी त्याच्या मनाने स्विकारले होते की चमेली एक चांगली मित्र होवू शकते आणि त्याच्यासाठी ते पुरेसे होते.
"तू प्रॉपर कुठली आहेस?'
"क्या करेगा जानकर? शादी बनायेगा मेरेसे? बच्चे तो हो नही पायेंगे."
आपल्या नेहमीच्या बेफिकीर स्टाईलमध्ये चमेलीने उलट विचारले आणि रोहन एकदम कावराबावरा झाला. काय उत्तर द्यावे तेच सुचेना त्याला.
"ए चिकणे, डर मत्..मै तो ऐसेइच मजाक कर रैली थी! मै जानती है रे... आमच्या नशिबात हे शादी-बिदी काय नसतं राजा. साली सगळी जिंदगीच नशिबाला फितुर झालेली. गंमत म्हणजे नशिब पण आपलं आणि जिंदगी पण आपली,पण तरीही दोघापैकी कुणावरच आपला हक्क नाही राहीलेला. तेरेको मालुम ४ साल पैले एक 'इन्सान' मिला था.........!"
"इन्सान? ते तर रोजच भेटत असतील तुला चमेली."
"कहा यार...., चार साल पैले एक मिला था होर उसके बाद अब जाके तू मिला है! आमच्यासारख्यांच्या किस्मतमध्ये साले जानवरच ज्यादा होते है! इन्सान होते कहा है हमारे लिये?"
हसत हसत बोलणार्या चमेलीच्या आवाजातला दर्द अगदी सहजपणे रोहनच्या मनाला स्पर्षून गेला. आपली असहायता जाणवली आणि तो अजुनच अबोल झाला.
"अरे रोहन, तू तो एकदम , वो क्या बोलते है सेंटीमेंटल हो गया यार. मै तो ऐसेही मजाक कर रही थी!"
आपल्या शब्दातला काटेरीपणा कमी करण्याचा प्रयत्न करत चमेलीने रोहनची समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत काटा रुतायचा तो रुतला होताच.
त्यानंतरच्या भेटींमधुन कधीतरी रोहनला तिच्याबद्दल कळले होते.बिहारमधल्या कुठल्यातरी एका खेड्यातुन ती मुंबईत आली होती, रादर आणली गेली होती. एका अतिशय परंपरावादी मुस्लीम घराण्यात ती जन्माला आली होती. जन्मल्यानंतर काही काळातच तिच्यातला वेगळेपणा तिच्या आई-वडीलांच्या लक्षात आला आणि ती आपोआपच आई-वडीलांपासून दुर होत गेली. बिहारच्या त्या खेडेगावातील रुढीग्रस्त वातावरण, जुनाट परंपरां आणि रिती रिवाजांमध्ये अडकलेले कुटुंबीय साहजिकच तिच्यापासुन दुरावत गेले होते. पण तिच्या त्या तृतीयपुरुषी शरीरातले मन मात्र एका स्त्रीचे होते. तिला जरी तृतीयपुरुषी असण्याचा शाप मिळालेला असला तरी तिचं बाह्य शरीर मात्र एखाद्या स्त्रीप्रमाणेच डौलदार आणि आकर्षक होतं. त्रासात का होइना पण बालपण सहज संपलं, लाजेकाजेस्तव घरच्यांनी जगापासून ही बाब लपवून ठेवली होती. तिचं नावही नसीमन ठेवण्यात आलं होतं. पण सोळावं ओलांडलं आणि नियतीने दावा साधला......
यु.पी.-बिहारच्या च्या अजुनही सरंजामशाही मिरवणार्या खेड्यातून जे होतं तेच नसीमनच्या बाबतीत झालं. गावच्या मुखियाची नजर पडली आणि वयाच्या सतराव्या वर्षी सर्वात पहिल्यांदा नसीमनचं अपहरण झालं. मुखियाने मजा तर लुटलीच पण इतके दिवस लपवून ठेवलेलं गुपीत आता जगजाहीर झालं. लोकांच्या तिच्याकडे बघण्याच्या नजरा बदलल्या. गावातल्या रिकामटेकड्या टोळभैरवांना तर 'नसीमन' म्हणजे हक्काची सोय वाटू लागली. घरच्यांनी तर नावच टाकलं होतं. आपल्या माणसांपासून तुटलेल्या नसिमनला चार वर्षांपुर्वी पहिला आधार मिळाला तो 'चमन'चा. तिच्या आयुष्यात आलेला पहिला 'इन्सान'. चमनने तिला आपल्याबरोबर मुंबईला आणलं........
"तू यकीन नै करेगा रोहन, पर चमन मेरे साथ ब्याह रचानेवाला था! "
"काय सांगतेस काय चमेली?" रोहनसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. पण लगेच त्याच्या आवाजात संशय आला. "तुम्हे पक्का यकीन है? और था का मतलब?"
"वो यहा गोदीमें वर्कर था! हमारे बंबई आनेके बाद दुसरेही हप्तेमें एक कंटेनरके नीचे दब गया, मै फिरसे अकेली हो गयी! लेकीन रोहन, वो एक हप्ता मैने जिंदगीके सारे सुख भोग लिये थे......! हम पुरी बंबई घुमे, कभी लोकल ट्रेन, कभी बस, कभी पैदल..... बहोत खुश थी मै, लेकीन हसते रहना शायद मेरी किस्मतमें नही था!"
"फिर..........?"
"फिर क्या..., कोशीश तो बहुत की कुछ काम करनेकी, मेहनत करनेकी! पर लोगोंकी नजरे होर नियते फिसलते देर नही लगती! मुझे तो उपर वालेने बला का हुस्न दिया था! बदकिस्मतीसे, किसी तरहा जमनामौसी को मेरेबारेमें पता चलही गया! उसके बाद मुझे इनके गिरोह का मेंबर बनाया गया जबरन. दस दिन तक कमसे कम पच्चीस लोग मेरेको रोंदते रहे, किसी अनजान पलमें सारे अहसास मर गये...., उनके साथ वो नसीमनभी मर गयी !
वही मेरेको यें नया नाम मिला... "चमेली"!
शुरु शुरुमें भोत रोती थी मै...., कई राते जाग के निकाली है मैने उसके यादमें! लेकीन अब तो बस.... यही साली हरामकी जिंदगी है......! साले इतने जानवर भरे हुये है यहा की तेरे जैसे इन्सान कमही मिलते है! तू यकीन नई करेगा रोहन, लेकीन तेरा वो दोस्त, राजेश भी दो बार मेरे साथ 'बैठ' चुका है!"
चमेलीच्या डोळ्यात पाणे होते आणि रोहनच्या डोळ्यात प्रचंड आश्चर्य ! "राजेश?"
"यकीन नही होता ना? कभी पुंछ के देख उसको!"
"भोत सपने देखे थे मैने भी. तब कुछ समझता नही था. पास पडौसकी औरते जब उनके शोहर के बारेमें, बच्चोके बारेमें बाते करती थी, तो मै भी सोचती थी.... की कभी मेरीभी शादी होगी, प्यार करनेवाला शोहर होगा, बच्चे होगे. जब समझ आयी तो पहली बार जाना की ये सपने कमसेकम मेरे बारेमें तो कभी पुरे नही होनेवाले. भोत रोयी थी उस वक्त.... उसके बाद तो जैसे आँसुही सुख गये...!"
चमेलीने एक शुष्क नि:श्वास सोडला...... !
त्यानंतरच काही दिवसांनी 'कल्याणी'ने रोहनला प्रपोज केले होते. खरेतर रोहनलाही कल्याणी आवडायला लागली होती. पण का कोण जाणे त्याने कल्याणीला स्पष्टपणे नकार देवुन टाकला. तो स्वतःच प्रचंड गोंधळलेला होता.
नक्की काय चाललय आपल्या मनात. हे कसलं द्वंद्व आहे. कल्याणी की चमे......
छे छे... काहीतरीच !
पण मग आपण कल्याणीला नकार का दिला?
कमॉन रोहन, स्वतःलाच फसवण्याचा प्रयत्न करु नकोस रे. त्याने तुलाच त्रास होणार आहे.
पण चमेली..? मग आई-बाबा? कस्सं शक्य आहे हे?
एक गोष्ट मात्र नक्की चमेलीने मनात घर केलय हे पक्कं !
............
...................
..........................
"रोहन, रोहन्या... फोन वाजतोय तुझा. कोण पेटलाय बघ तरी जरा."
राज्याचा आवाज ऐकला आणि रोहन वर्तमानात परत खेचला गेला. त्याने खिश्यातुन मोबाईल काढून कानाला लावला.
"हॅलो रोहन जागीरदार बोलतोय."
"मी हवालदार डोइफोडे बोलतोय, डी.एन. नगर पोलीस चौकीतुन. तुम्हाला लगेच इथं चौकीवर यावं लागेल."
"पण कशासाठी? मी काय केलय आणि फोन नंबर कुठे मिळाला तुम्हाला?"
"साहेब एका डेडबॉडीच्या खिश्यात एक मोबाईल सापडलाय. एक चिठ्ठीपण आहे, चिठ्ठीवरच मागे तुमचा नंबर लिहीलेला होता नावासकट. म्हणुन तुम्हाला फोन लावलाय."
"डेडबॉडी?"
" अंधेरीतल्या एका हिजड्याची डेडबॉडी आहे साहेब. तुमच्या नावाने एक चिठ्ठी पण आहे."
रोहनच्या हातातला फोन पडता - पडता वाचला. तेवढ्या बस कुठल्यातरी स्टॉपला थांबली. तसा रोहन धडपडत उठला आणि बस मधुन उतरला. अरे-अरे करत राज्याही त्याच्या मागे उतरला...
"रोहन, काय झालं? कुणाचा फोन होता? तु एवढा घाबरल्यासारखा का वाटतोयस?"
रोहनने काही न बोलता एक रिक्षा पकडली, तसा राज्याही त्याच्यामागोमाग रिक्षात शिरला.
रोहन गप्पच होता.
डी.एन. नगर पोलीसचौकीसमोर रिक्षा थांबली, रिक्षावाल्याच्या अंगावर १००ची एक नोट टाकत रोहन चौकीच्या आत धावला. चेंज परत घेण्यासाठी थांबावे की नको याचा विचार करण्याची पाळी राज्याची होती. पण रोहनला इतका घाबरलेला पाहून तोही तसाच त्याच्यामागे चौकीत पळाला.
"साहेब, मी रोहन जागीरदार !"
हवालदाराने त्याच्याकडे एकवार खालपासुन वरपर्यंत पाहीले.
"ह्म्म्म चांगल्या घरातले दिसता?"
"हवालदार साहेब, घरे सगळी चांगलीच असतात. त्यातली माणसे बरी वाईट असतात. तुम्ही मुद्द्याचे बोला. चमेली कुठे आहे?"
"म्हणजे तुम्ही त्या हिजड्याला ओळखताय तर. चला आमचा बाण अगदीच वाया गेला नाही तर...!"
"ती चिठ्ठी?"
हवालदाराने ती चिठ्ठी त्याच्या हातात सरकवली आणि एक रजिस्टर पुढे केले.
"इथे सही करा. चिठ्ठी अर्धवटच आहे. सुरुवात केली असावी पण नंतर बहुदा विचार बदलला असावा म्हणून अर्धवटच सोडून दिलीय. तारिख किमान ४ दिवसांपुर्वीची आहे. मघाशी समोरच्या चौकात एका ट्रकने उडवले, जागच्या जागी खल्लास. मेंदुच बाहेर आला होता. बॉडी क्लेम करायची असेल तर उद्या संध्याकाळी या हॉस्पिटलमध्ये. "
हवालदाराने अतिशय कोरड्या स्वरात सांगितले, त्याच्यासाठी असे अपघात नेहमीचेच होते. खरेतर त्याने एवढेही श्रम घेतले नसते, पण चमेलीकडे सापडलेली ती चिठ्ठी त्याने वाचली असावी बहुदा....
"प्यारे रोहन,
प्यारे या शब्दावर काट मारलीय क्युंकी मै उस काबिल नही. जब भी तुम्हे देखेती हुं, मुझे मेरे चमनकी याद आती है! दो ही तो 'इन्सान' मिले थे जिंदगी में...एक 'वो' होर एक 'तू' ! कभी कभी लगता है , कही मेरेको तुमसे प्यार तो नही हो गया! साला ये दिलभी अजीब हिमाकती है, इतनी ठोकरे खायी, फिरभी आस नही मिटती! लिख तो रही हुं लेकीन मुझे नही लगता कभी ये चिठ्ठी तुम्हें देने की हिंमत भी कर पाऊंगी या नही? काश, तुम्हारी तरह मै भी नॉर्मल इन्सान होती....!
दिल तो बहुत करता है की शादी होती, बच्चे होते तो कितना मजा आता जिंदगी में ! लेकीन साली अपनी जिंदगी भी ..... , खाली बोतल की तरह......!
एक बात बताऊ चिक............"
इथुन पुढे काहीच लिहीलेले नव्हते, आणि आता कधीही लिहीले जाणार नव्हते.
रोहनचा चेहरा वेदनेने पिळवटुन गेल्यासारखा दिसत होता. डोळे भरुन आले होते. हवालदार आश्चर्याने एकदा रोहनकडे तर एकदा राज्याकडे पाहात होता. एका लावारिस हिजड्यासाठी डोळ्यात पाणी आणणारा तरुण त्याने प्रथमच पाहिला होता. रोहनचे डोळे सारखे सारखे त्याच ओळींवरुन फिरत होते.
"दिल तो बहुत करता है की शादी होती, बच्चे होते तो कितना मजा आता जिंदगी में ! लेकीन साली अपनी जिंदगी भी ..... खाली बोतल की तरह......"
त्याने मनाशी काहीतरी निश्चय केला.....
"राज्या, खिश्यात किती पैसे आहेत तुझ्या? माझ्याकडे अडीच-तीन हजार आहेत. "
राज्याने खिसा चाचपला, हजारभर निघाले त्याचाही खिश्यात.
"यात सोन्याच्या दोन वाट्या आणि काळे मणी नक्कीच येतील.चल........"
रोहन उत्साहात बाहेर पडला, राज्याही काहीच न कळल्यासारखा त्याच्यामागे बाहेर पडला.
हवालदाराने समाधानाने आपल्यासमोरचे रजिस्टर मिटले. चमेली आयुष्यभर एक हिजडा म्हणून जगली होती, पण मेल्यानंतर का होइना सौ. चमेली रोहन जागीरदार म्हणून सुखाने सरणावर चढणार होती.
समाप्त.
विशाल कुलकर्णी
विशालदा.. अभिनंदन... कथा
विशालदा.. अभिनंदन...
कथा आवडली...
खरं तर हे वेगळ सांगायची काही गरज आहे का...??
लेखनशैली अप्रतीम आहे.
लेखनशैली अप्रतीम आहे.
वॉव, दॅट्स ग्रेट, रिअली ग्रेट
वॉव, दॅट्स ग्रेट, रिअली ग्रेट - हार्दिक अभिनंदन.
पारितोषिकाबद्दल अभिनंदन पण ही
पारितोषिकाबद्दल अभिनंदन
पण ही कथा हेच एक पारितोषिक आहे, तुम्ही तुमच्या वाचकांना दिलेले:-)
सविस्तर लिहावेसे वाटत आहे, नंतर लिहीन बहुधा
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
बेफि, सगळी मेहनत भरुन पावली
अम्याभौ, तुझ्यासारखे काही बोटावर मोजण्याइतके मित्र आहेत ज्यांच्यामुळे माझ्या हातुन कधी कधी का होइना पण चांगले लेखन होते. Thanks for always being there for me !
विशाल्,अभिनंदन!! कथा खूप
विशाल्,अभिनंदन!!
कथा खूप आवडली.. सहसा या विषयावर कधी इतकं भावपूर्ण वाचलेलं आठवत नाहीये ..
रोहन तू तेव्हढा भाव खाऊन घेत्लास!!!!
भारी! शेवट जरा फिल्मीष्टाईल
भारी!
शेवट जरा फिल्मीष्टाईल वाटला.
अभिनंदन विकु.
अभिनंदन विकु.
धन्यवाद
धन्यवाद
विशाल, माझा भा.पो.का. कालच
विशाल, माझा भा.पो.का. कालच झाला आहे त्यामुळे पुनरुल्लेख टाळतो.
पण खरंच कथा म्हणून अतिशय चांगली उतरली आहे. भाषाशैली ओघवती आहे. त्यामुळे अथ पासून ईती पर्यंत एका दमात वाचली गेली. सुंदर !
अभिनंदन विशालभाऊ..
अभिनंदन विशालभाऊ..
विशालदा.....अभीनंदनssssssssss
विशालदा.....अभीनंदनssssssssssssss
एवढ्या महिन्यात तिकडे काही वाचायला उसंत मिळाली नाही. सुंदर लिहीलंय्स रे...ह्याधीक शब्द नाहीत ह्या कथेला माझ्याकडे!
छान आहे
छान आहे
छान आहे
छान आहे
अप्रतीम!!!!
अप्रतीम!!!!
वीशाल, हळवीआणि तरल कथा या
वीशाल, हळवीआणि तरल कथा या काळात देखील लीहु शकलास.................. तु ईंसान असशील. फक्त त्याकरीता अभिनंदन.
सगळ्याचे मनःपूर्वक आभार
सगळ्याचे मनःपूर्वक आभार
आवडली, एकदम हळवी कथा! शेवट
आवडली, एकदम हळवी कथा! शेवट असा झाला हेच बर झालं का? असा एक विचार मनात येऊन गेला
सुपर्ब. एकदम निशब्द करणारी
सुपर्ब. एकदम निशब्द करणारी कथा......................
रडु कि हसु हेच कळत नाहे आहे मला....................................
मन रडल हे नक्किच.
विशालदादा.. कथा
विशालदादा.. कथा आवडली....
अभिनंदन...
अभिनंदन छान आहे कथा!
अभिनंदन
छान आहे कथा!
अरे विशल्या.....!!!! मस्त रे
अरे विशल्या.....!!!!
मस्त रे मित्रा, मस्त ! खूप कौतुक वाटलं तू ही साहीत्यिक झालास. लिहीत रहा
पारितोषिकाबद्दल देखील अभिनंदन
छान पैकी माझ्या पार्टी
छान पैकी माझ्या पार्टी मागण्याकडे सोईस्कररित्या केलेल्या दुर्लक्षाचा णिशेध !!!!!!!!!!!!!!!
अभिनंदन विशाल , चांगली
अभिनंदन विशाल ,
चांगली लिहिलीय.
विशालभौ अभिनंदन ..आणि एक
विशालभौ अभिनंदन
..आणि एक वेगळाच विषय समोर आणलास... आवडली कथा
अभिनंदन विशाल... अतिशय सुंदर
अभिनंदन विशाल... अतिशय सुंदर कथा.
किती वेगळा विषय आणि प्रचंड ताकदीनं मांडालयस. नको त्या डिटेल्स्मधे बटबटीत होऊ शकली असती कथा..
जियो... जियो
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार
दादची मनमोकळी दाद म्हणजे अजुन एक पारितोषिक ! सारं भरुन पावलं....
अभिनंदन विशाल! वेगळा विषय न
अभिनंदन विशाल!
वेगळा विषय न ओघवतं लिहिणं छान वाटली कथा.
धन्यवाद भावना
धन्यवाद भावना
अभिनंदन विशाल कथा आवडली.
अभिनंदन विशाल
कथा आवडली. कथेची मांडणी नेहमीप्रमाणेच सुरेख... पण शेवट असा फिल्मी न करता रोहनच्या भावनाप्रधान स्वभावाला साजेसा करता आला असता असं मला वाटतं. तुझी निरीक्षणशक्ती जबरी आहे... त्यांची भाषा अचूक टिपली आहेस.
Pages