बेवारस

Submitted by nikhilmkhaire on 14 May, 2008 - 06:28

नुकताच मी मेलो.
नुकताच म्हणजे;
अजून हातपायदेखील नीटसे आखडले नाहीत.
मरण्याआधी काही वेळ सगळ्यांनी खूप पळापळ केली...
मग कार्डिओग्राम आणि मी
एकत्रच नि:श्चेष्ट झालो.

डॉक्टर 'सॉरी' म्हणून निघून गेला.
कशासाठी ते नाही कळलं.
माझ्या मरणाचं त्याला दु:ख झालं असावं?
छे! छे! काहीतरीच काय...

मग नर्सने सलाईनच्या नळ्या ओढून काढल्या आणि
तोंडावर खास 'हॉस्पिटल छाप' पांढरी चादर ओढली.
थंड देहातील काळाकुट्ट अंधार लपवण्यासाठी पांढरी चादर!
आवडलं आपल्याला.

कसा वारलो?
चारचौघांसारखाच.
हं, म्हणजे चारचौघांसारखाच जगलो आणि
चारचौघांसारखाच मेलो.
अणि हो, वारलो वगैरे नाही; मेलोच!

कसं वाटतंय?
त्यात काय वाटायचं.
जन्मापासूनच सुरु झालेलं चक्र पार करुन
अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेला मी काही पहिलाच नाही.
अनेक आहेत इथे.

आत्ताच वार्डबॉय शवागारात घेऊन आला.
पण इथली बोचरी थंडी वगैरे म्हणतात
ती काही विशेष जाणवत नाही.
त्याआधी पोस्टमॉर्टम झालं,
कोणास ठाऊक काय सापडलं!
मन वगैरे नक्कीच नसेल.

इथे शवागारात आल्यावर वॉर्डबॉयने
पायाच्या अंगठ्याला कसलीशी चिठ्ठी बांधली.
नाव असावं बहुतेक.
मेल्यावर का होईना, नावं मिळालं म्हणून बरं वाटलं.
कुतुहल म्हणून पहायला गेलो,
चिठ्ठीवर 'बेवारस' एवढंच लिहीलं होतं.

-निखिल.

गुलमोहर: 

हम्म.. खरंय... असतिल असे कित्येक

चिठ्ठीवर 'बेवारस' एवढंच लिहीलं होतं.

बापरे

वाह क्या बात हे यार .........!

मजा आली वाचायला/ अनुभवायला .. कारण जीवच नव्हता सहन करायला. .....

अरूण कोलटकर वाचतोयस का?

आवडली... जनरली मृत्युवगैरे वरच्या कविता अश्या दुख्खी वगैरे असतात.. ही फारच कॅज्युअली लिहील्यासारखी वाटली, आणि त्यामुळेच शेवट अंगावर आला!! :|

व्हा काय सुन्दर आहे असे म्हना

आई शप्पत काय धक्का आहे. सुरुवातीला वाटलं एखाद्या चाकोरीबध्द आयुष्य जगलेल्या माणसाच्या स्वतःच्या मृत्युबद्दलच्या भावना असतील ... पण हे तर भलतच ... शेवट अगदी सुन्न करणारा आहे. जगात असे कितीतरी असतील. कविता खुप आवडली.

!!!!