"गडचिरोली" नाव ऐकुनच डोळ्यासमोर काही येत असेल तर ते घनदाट अरण्य आणि नक्षलवादी ...
बाकी याबद्दल काही माहित होते तर ते एवढेच की महाराष्ट्राच्या एखाद्या कोपर्यात वसलेले गाव.. की जिल्हा... की जंगल असावे.. पण तो नक्की कोणता कोपरा हे देखील मी कधी महाराष्ट्राच्या नकाशावर शोधण्याचे कष्ट घेतले नव्हते..
पण माझ्या गावीही नसलेल्या ह्या गावी मला आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर जावे लागेल हे माहित नव्हते..
मी अभिषेक अशोक नाईक, अका तुमचा अभिषेक, शाळेतील एक हुशार मुलगा, पण मुळातच अभ्यासाची आवड नसल्याने आणि आळशी स्वभावामुळे कसेबसे माझे शिक्षण झाले. आणि झालो एकदाचा स्थापत्य अभियंता. मुंबईतील V.J.T.I. या नावाजलेल्या कॉलेजचा विद्यार्थी असल्याने Campus Interview मधुन कान्दिवलीच्या एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरीही लागली. पहिल्याच दिवशी कंपनीच्या मालकानी सर्व नवीन मुलांची शाळा घेतली. आपल्याकडे काय काम चालते, कसे चालते, हे सांगितले. कंपनीची लाल करुन झाली. शेवटी म्हणाले, "मुलानो तुम्ही Civil Engineering मध्ये आला आहात, इथे Hardwork ला पर्याय नाही..." पहिल्याच दिवशी माझ्यासारख्या कामचुकार योद्ध्याचे खच्चीकरण करण्याचा यापेक्षा दुसरा सोपा मार्ग नसावा. मनात आले, की सर तुम्ही आधी का नाही भेटलात, आलोच नसतो या लाईन ला..
पुढे ४-५ महिन्यातच मला कळून चुकले की इधर मेरे जैसे आलसी इन्सान का टिकाव लगना मुश्कील है.. पाच आकडी पगाराने सुरुवात तर झाली होती पण पुढची जवानी तो सहा आकडी करण्यात मला घालवायची नव्हती आणि मग दुसरे पर्याय शोधायला सुरुवात झाली. अशातच MPSC ची जाहिरात आली आणि सरकारी नोकरीचा साधा सरळ पर्याय दिसू लागला. फ़क्त एक परीक्षा की काय पास व्हायचे होते. फॉर्म भरला आणि आठवडाभर सुट्टी टाकून दिली. अभ्यास फारसा केला नसुन देखील परीक्षा बरी गेली. मग सुरु झाली ती निकालाची प्रतिक्षा... वर्ष सरले.. सरकारी कारभार ना.. मनोमन ठरवले, ठिक आहे, मी सुद्धा तुमच्याकडे कामाला लागल्यावर अशीच टंगळमंगळ करतो बघा प्रत्येक कामात.. मधल्या काळात नोकरी बदलली, रिलायंन्स मध्ये कामाला लागलो. हो ना करता वर्षभराने लागला एकदाचा निकाल. चांगल्या मार्काने पास होऊन तोंडी मुलाखतीच्या राऊंडसाठी माझी निवड झाली होती. Interview ला जाताना माझी lady luck रिलायन्स मधील माझी बेस्ट फ्रेन्ड प्रेरणा हिला बरोबर घेउन गेलो. Interview छान गेला. पण याचा निकाल देखील यथावकाश ३-४ महिन्याने लागला. आणि अपेक्षेप्रमाने झालो होतो सिलेक्ट.. असिस्टंट ईंजीनिअर (सार्वजनिक बांधकाम विभाग)... आता वाट बघायची होती ती फक्त पोस्टींग कुठे होते याची. पण यालाही परत सहा महीने लागतील असे वाटले नव्हते..
साधारण सहा सात महिन्याने एका मित्राचा फ़ोन आला. अरे नेट चेक कर, तुमची लिस्ट लागली बघ. ऑफिस मध्येच होतो. लगेच PWD ची साईट ओपन करुन चेक केले. पण काही जणांचीच नावे लागली होती त्यात... अर्थातच माझे नव्हतेच, म्हणजे अजून काही दिवस, काही महिने वाट बघा.. त्या लिस्ट वरुन एकदा नजर टाकली तर ३८ पैकी १९ जणांची पोस्टींग मुंबईला झाली होती. मी स्वता मुंबईचा असल्याने आणि संबधित पोस्टसाठी मेरिट मध्ये सुद्धा सर्वप्रथम असल्याने माझी पोस्टींग सुद्धा होईल मुंबईला असा एक विश्वास वाटू लागला.
त्यानंतर मग रोज ऑफिस मध्ये गेल्या गेल्या आधी एकदा PWD ची वेबसाईट चेक करायचो आणि मगच कामाला लागायचो. आणि अश्यातच एकदा हवी होती ती सूचना झळकली. बाकी सारे ठीक होते, पण कसे कोणास ठाऊक, मुंबईच्या जागी मला नागपूर दिसत होते...
पण आता दुसरा पर्याय नव्हता. दोन वर्षे ज्याची वाट बघत होतो तो जॉब केवळ नागपूरला जावे लागणार म्हणून सोडायचा नव्हता. अर्थात नागपूर म्हणजे काही दुर्गम प्रदेश अश्यातला भाग नव्हता, पण मुंबई पासून फार दूर होते. एक महिन्याच्या आत भरती व्हायचे होते. म्हणून सर्वप्रथम काही केले तर ते नोकरीचा राजीनामा दिला.
नागपूर जायची तयारी सुरु झाली. इंटरनेटवरून तिकिटे बूक करून झाली, नागपूरचा मॅप मिळविला, नागपूरच्या जवळपास राहणार्या मित्रांकडे चौकशी केली, काय काय बरोबर लागेल याची खरेदी झाली.. थोडक्यात नागपूरला जायची मनाची पण तयारी झाली.
पण..... नागपूरला जायला १० दिवस उरले होते आणि अश्यातच घरी एक पत्र येउन थडकले..... नागपूर विभागातर्फे, नागपूर विभागाअंतर्गत... माझी पोस्टींग.... गडचिरोली येथे झाली होती...
थोडावेळ कोणाला काय बोलायचे हे सुचत नव्हते. आधीच रिलायन्सचा जॉब सोडुन बसलो होतो, राजीनामा मागे घेण्याची अंतिम तारीख देखील टळून गेली होती. आता एकच पर्याय शिल्लक होता, तो म्हणजे जे काही होईल ते होईल, बिनधास्त जा गडचिरोलीला किंवा मग घरी बसा.
दुसर्या दिवशी ऑफ़िसला गेलो. मित्र म्हणाला की एकदा बोलुन तर बघ बॉसशी, काय बोलतो ते.. कदाचित घेइल तुला परत.. पण अंगात मराठ्यांचे रक्त ना, तानाजीने दोर कापून टाकला होता, आणि हा खुद्द तानाजीलाच माघार घ्यायचा सल्ला देत होता. आता जायचेच गडचिरोलीला असे ठरवून नेटवरून गडचिरोलीची माहिती जमा करायला सुरुवात केली. नागपूर ते गडचिरोली - सुमारे १७० कि.मी. अंतर.. आधीच ट्रेनचे नागपूरचे तिकिट बूक केले होते, आता तिथुन आणखी १७० कि.मी. जायचे होते. तिथवर ट्रेन जात नव्हती. म्हणजे गाडीघोड्याची काय व्यवस्था ते पण बघने गरजेचे होते. याच विचारात घरी आलो तर समोर दारातच आणखी एक पत्र घेउन आई उभी.. ही नोटीस गडचिरोली विभागातर्फे आली होती.. त्यानी माझी पोस्टींग गडचिरोली विभागातील, आलापल्ली या उपविभागातील, सिरोंचा इथे केली होती. काहीही रीअॅक्ट न करता मी सरळ लॅपटॉप उघडला आणि गूगलमॅप वर सिरोंचा शोधू लागलो. गडचिरोली पेक्षा आता आणखी काही वाईट होऊ शकत नाही हा विश्वास...., जो पुढील पाचच मिनिटात तुटला.. सिरोंचा हे ठिकाण गडचिरोलीपासुन १८० कि.मी. अंतरावर होते.. म्हणजे नागपूरपासून तब्बल ३५० कि.मी. झाले होते आता..
जास्त विचार करुन डोक्याला त्रास देण्यापेक्षा थोडावेळ ऑर्कुट वर टाईमपास करायचे ठरविले. आणि कल्पीताई ऑनलाईन दिसल्या..
कल्पीताई म्हणजे कल्पी जोशी, यांची आणि माझी ओळख तशी काही दिवसांपूर्वीच ओर्कुट वरील मुक्तपीठ या कम्युनिटी मधील, आणि ती ओळख सुद्धा त्या नागपूर विभागात राहायच्या म्हणून पुढे मागे कामात येतील या थोड्याश्या स्वार्थी विचारातून झालेली. अर्थात त्या फारशी मदत करतील अशी खास आशा-अपेक्षा नव्हतीचे. कारण त्या तेथील एक नावाजलेल्या कवियत्री ज्यांचे नुकतेच एक कवितांचे पुस्तक आणि गाण्यांची कॅसेट प्रकाशित झाली होती, आणि मी एक असाच टवाळक्या करणारा सभासद. सहज त्याना "हाय" केले आणि आता नागपूर विभागात गडचिरोली मधील सिरोंचा की कुठे जात आहे असे सांगितले.
"अरे व्वा, जा की मग..." समोरुन एक अनपेक्षित प्रतिक्रिया आली. पुढे बोलताना मला समजले की कल्पीताई या सध्या चंद्रपूरला राहायला असून आलापल्ली आणि सिरोंचाच्या आजुबाजूच्या परीसराबद्दल त्यांना थोडीफार माहिती आहे. तसेच त्यांचे काही दुरचे नातलगही तिथे जवळपास राहताते. एवढेच नाही तर त्यानी मला मदत करायची सुद्धा तयारी दर्शवली. बुडत्याला काडीचा आधार असतो, पण इथे तर हातात ओंडका आला होता आणि मला पुढचा मार्ग सुद्धा आता तोच दाखविणार होता.
कल्पीताईंचा फोन नंबर घेउन त्याना "बाय" केले आणि बघतो तर समोर अपर्णा उभी. मी नागपूर नाही तर गडचिरोलीला जात आहे ही खबर लागली होती या बाईसाहेबाना. या बायकांचे नेटवर्क बाकी खूप भारी असते. कुठून खबर काढली देव जाने आणि आता माझ्याबरोबर गडचिरोलीला यायचा हट्ट धरून बसली होती. काय म्हणे तर क्रेझ आहे नक्षलवादी एरिया बघायची.
अपर्णा....!
तशी आमची ओळख ओर्कुटवरच झालेली, पण ऑर्कुट हे तिचे माझ्या आयुष्यात येण्याचे एक माध्यम असावे फक्त.. माझ्यामुळे हसणारी, माझ्यासाठी रडणारी... मला चिडवणारी, पण माझ्यावर कधी न चिडणारी... प्रत्येक मुलाला आपल्या आयुष्यात एखादी तरी अशी मैत्रीण असावी असे वाटावे, अशी माझी बेस्ट फ्रेन्ड अपर्णा.
कोणत्या मुर्खाला वाटणार नाही की हि प्रवासात आपल्या बरोबर असावी, पण मी काही माथेरान किंवा महाबळेश्वरला फिरायला जात नव्हतो. पण आता हे या वेडाबाईला कोण समजवणार..? बरे आईला सांगावे तर ती सुद्धा नेहमीप्रमाणे हिच्याच पक्षात, काय म्हणे तर मुलगी बरोबर असेल तर तुझी कोणीतरी मदत तरी करेल, नाही तर रस्त्यावर झोपायची वेळ येईल. राहता राहिला हिच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर हा तिने स्वताच सोडविला होता. पर्समध्ये मिरचीपूड ठेउन... आता बोला, बाईसाहेब एवढ्या तयारीत आल्या होत्या तर त्याना नाही तरी कसे कसे बोलणार... शेवटी हो ना करता आम्ही दोघे एकत्रपणे गडचिरोलीवर स्वारी करायला सज्ज झालो..
दुसर्या दिवशी कल्पीताईना फोन केला. त्यानी चार धीराचे शब्द सुनावले, आणि बिनधास्त ये असे म्हणाल्या. निदान जायच्या आधीच मनातल्या मनात जे अतिनाटकीय चित्र उभे करुन ठेवले होते ते तरी बर्यापैकी निवळले. मी त्याना माझ्याबरोबर अपर्णासुद्धा येत आहे हे सांगितले, तर त्यांनी मला आधी चन्द्रपूरला यायचा सल्ला दिला, अर्थात ते सल्ला कम आमंत्रण होते. कारण कल्पीताई स्वता चन्द्रपूरला B.S.N.L. च्या सेवेत होत्या. त्यामुळे मग पुढच्या सर्व प्रवासाचे प्लॅनिंग कसे करायचे हे ठरवायला त्यांची फार मदत झाली. मला कोणत्याही परिस्थितीत १६ नोव्हेंबर, मंगळवार पर्यन्त सरकारी खात्यात जमा व्हायचे होते. म्हणून आधी नागपूरचे तिकिट रद्द करून रविवारची सेवाग्राम गाडीची चन्द्रपूरची २ तिकीटे बूक केली, अर्थात माझे आणि अपर्णाचे. दुपारी ३ वाजताची गाडी होती, जी चन्द्रपूरला सोमवारी सकाळी १० पर्यंत पोहोचनार होती. तिथुन बस पकडून अहेरीला जायचे ठरले, जे चन्द्रपूरपासून १०० कि.मी अंतरावर होते, अहेरीला रात्री मुक्काम करून मग दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवारी सिरोंचाला पोहोचून तिथे पोस्टींग.
अहेरीला मुक्काम कुठे करायचा हा प्रश्न सुद्धा कल्पीताईनीच सोडविला होता. त्यांच्याच नात्यातील एक सदग्रुहस्थ श्री आतिशकुमार यांचा नंबर त्यानी मला दिला. त्यांच्याशी फ़ोनवर बोलल्यावरसुद्धा बरेच हलके वाटले, सोमवारी रात्री आमच्याच घरी मुक्कामाला या असे त्यांनी सांगितले. कोण कुठच्या कल्पीताई, चार दिवसांची ऑर्कुटवर झालेली ओळख, आणि त्यांच्या नात्यातील अहेरीचे आतिशकुमार. खरेच, आयुष्यात चांगली माणसे भेटायची असेल तर ती कशीही कुठेही भेटतात. अर्थात, जी मुलगी विश्वासाने माझ्याबरोबर गडचिरोलीसारख्या जागी येत होती त्या अपर्णाची आणि माझी ओळख सुद्धा ऑर्कुटवरच तर झाली होती..
Everything is planned.... असे जेव्हा असते तेव्हा सुद्धा तसेच घडेल याचा नेम नसतो, आणि इथे तर सगळे तोडकेमोडके रामभरोसे होते. बरे, शुक्रवारी नेटवरून आलापल्ली बांधकाम विभागाचा फोन नंबर मिळविला आणि तिथे फोन केला तर समजले की सारे जण कोणत्यातरी लग्नसमारंभाला गेले आहेत, आणि शनिवार-रविवार सुटटी असल्याने आता सोमवारीच काय ते भेटतील. परत एकदा मनात आले, सरकारी कारभार... ठिक आहे.., येतोय मी हि.., तुमच्यातीलच एक व्हायला..
जायचा दिवस उजाडला, अपर्णा सकाळीच आमच्या घरी आली होती. पाचेक दिवसांचा काय तो प्रवास होता आणि या बाईसाहेबांनी ८-१० कपड्यांचे जोड आणले होते. म्हणाली की आम्हा मुलीना तेच तेच कपडे रीपीट करायला नाही आवडत. कॅमेरासुद्धा बरोबर घ्यायचा हट्ट करत होती, पण मोबाईल जिंदाबाद बोलून समजावले कसेबसे. बाकी मस्त गॉगलवॉगल डोक्यावर चढवून तयार झालेली, म्हणजे मॅडम एकदम पिकनिकच्याच मूडमध्ये होत्या तर...
निघायच्या आधी परत एकदा नेटवर तिकिट कन्फर्म केले, तर RAC 2, RAC 3 दाखवत होते. म्हणजे निदान बसायची तरी सोय झाली होती. अर्धा तास लवकरच स्टेशनवर पोहोचलो. गाडी आधीच लागली होती पण लिस्टवर आमचे कुठेच नाव दिसत नव्हते.. A/C 3 Tier चे फक्त २ डब्बे होते. चुकुन सेकंड A/C मध्ये झाले असावे म्हणून तेथील लिस्ट चेक केली, तर तिथेही नाव नाही..
दुपारी ३ ची गाडी ३ लाच सुटली पण आमच्या जागेचा पत्ता नव्हता... शेवटी कुठच्यातरी डब्ब्यात चढलो आणि एक रिकामी जागा बघून सामान ठेवले. थोड्यावेळाने T.C. आला. त्यानेही आपली लिस्ट चेक करून सांगितले की, "आपका तो नाम ही नही है, आप without ticket हो, चलो अगले स्टेशन पर उतर जाओ अभी..." झाले, अपर्णाची लगेच टेन्शनने रडायला सुरुवात, खरे तर मलाही टेंशन आले होते, कारण जर ही ट्रेन चुकते तर माझी पोस्टींगची लास्ट डेटही चुकली असती. तरीही हातातल्या Electronic Slip वर भरवसा होता, यात RAC लिहीलेय म्हणजे निदान बसायला तरी नक्की दिले पाहिजे. कुठेतरी काहीतरी चुकत होते, पण नक्की काय ते मला समजत नव्हते आणि तो T.C. काही समजुन घेणार्यातील वाटत नव्हता. त्याचे मग्रुरीने बोलने पण एवढे डोक्यात गेले ना कि या रेल्वेमधील भैय्या लोकांविरुद्ध आज जे काही मराठी नेते आवाज उठवत आहेत ते योग्यच आहे असे वाटू लागले. शेवटी सरळ भाषेत त्याला सांगितले, "मेरा इंटरनेट से टिकिट बूक है, पैसा भी कटा हुआ है, अभी मेरा नाम यहा क्यू नही ये मेरेको मालूम नही, मै इस ट्रेन मे से उतरने वाला नही हू... बस...!!" त्याने लगेच एक फोन फिरविला. वाटले आता रेल्वे पोलिस नाहीतर रेल्वे स्टाफची चार पोरे येतील आणि आपल्याला धक्के मारून उतरवतील पण पाचच मिनिटात आणखी एक T.C. आला. नशीबाने हा मराठी होता. बाकी काहिही बोला, अश्यावेळी मराठी माणूस भेटणे खरेच आधाराचे असते. काका-मामा करून हळुहळू त्यांना सगळा प्रॉब्लेम समजवून सांगितला. त्यांनी माझी स्लिप हातात घेउन चेक केली आणि.... दुसर्याच क्षणाला मोठमोठयाने हसायला लागले...
C.S.T. Mumbai वरुन सुटणारी सेवाग्राम एक्सप्रेस हिचे खरे म्हणजे २ भाग असतात. वर्धा जंक्शन इथे पोहोचल्यावर एक भाग तसाच नागपूरला जातो, तर दुसरा भाग ईजिंन पासून वेगळा होऊन पॅसेंजरला जोडला जातो आणि मग ती गाडी चन्द्रपूरमार्गे बल्लारशहा इथे जाते. असे काही असते हे आम्हाला माहीत नव्हते, आणि चुकून आम्ही नागपूरला जाणार्या डब्यात चढलो होतो. अर्थात ही चूक त्या आधीच्या T.C. ला कशी लक्षात आली नाही याचा राग आलाच, पण शेवटी एका टेंशन मधून मुक्त झाल्याच्या आनंदात त्या दोघांचे आभार मानून आमच्या डब्याकडे रवाना झालो.
एव्हाना सहा वाजले होते, तीन तास तणावाखाली कसे गेले समजलेच नव्हते. रात्री नऊ वाजता भारतीय रेल्वेचे जेवण करून झाले. अपर्णा बरोबर असल्याने झोपायचा प्रश्नच नव्हता, रात्रभर गप्पांची मैफल रंगली, अर्थात एकतर्फीच... तिची बडबड ऐकता ऐकता कधी झोप लागली समजलेच नाही. सकाळी लवकरच जाग आली. तशी मला झोपायची आवड असली तरी अश्या प्रवासात मात्र सकाळी उठून बाहेरचे निसर्गसौंदर्य बघायची संधी मी सोडत नाही. चन्द्रपूर जवळ आले तसे कल्पीताईंना फोन लावला, पहिला हॉल्ट तिथेच होता. कल्पीताईंचे ऑफिस चन्द्रपूर स्टेशनच्या बाहेरच होते. चन्द्रपूरला आल्यावर तसे बरे वाटत होते. स्टेशनच्या जवळपास बर्याच सरकारी इमारती होत्या. अजूनपर्यंत तरी कोणत्या दुर्गम भागात आल्यासारखे वाटत नव्हते. B.S.N.L. चे ओफ़िस शोधून कल्पी जोशी यांची चौकशी केली तर एकाने थेट त्यांच्या टेबलपर्यंत आणून सोडले. अपेक्षेपेक्षा चांगले स्वागत झाले, जणू काही माझी एखादी मावशीच भेटत होती मला. ख्यालीखुशाली विचारून झाली, चहापाणी झाले. मग कल्पीताईंनी ऑफिसच्या लोकांना आमची ओळख करून द्यायला सुरुवात केली. मुंबई वरून आलेत, PWD मध्ये Asst. Engg. म्हणून सिलेक्शन झालेय हे सांगितल्यावर समोरच्याच्या डोळ्यात दिसणारे कौतुक माझी पोस्टिंग सिरोंचा इथे झाली आहे हे समजल्यावर सहानुभूती मध्ये बदलत होते. प्रत्येकजण मग तिथे कसे राहायचे, कसे वागायचे याच्या सूचना देऊ लागला. एका क्षणी वाटले की कुठे या पोरीला घेऊन पुढे जायचे, इथुनच परत फिरुया. पण अपर्णानेच जायची तयारी दर्शविली. खरेच, कौतुक वाटले या पोरीचे.
चन्द्रपूरहून निघायच्या आधी आलापल्ली बांधकाम विभागाला परत फोन केला, एव्हाना वर्हाड लग्नावरून परत आले होते. श्री. जयराम म्हणून कोणी Jr. Engineer होते, त्यानी फ़ोन उचलला. माझे नाव सांगताक्षणीच ओळख पटली, कारण त्यांच्याकडे सुद्धा नोटिसीची एक प्रत पोहोचली होती. "आप आ जाओ साहब, मै स्टॅंड पे आ जाता हू.. आपको लेने के लिए.." खूप विश्वास आला या शब्दांनी. एक म्हणजे तिथे कोणीतरी आहे ज्याला आपली काळजी पडली आहे, आता मी एकटा नाही आहे तर आपली मदत करायला, पुढचा मार्ग दाखावायला आहे कोणीतरी तिथे. आणि दुसरे म्हणजे ‘साहेब’ हे सबोंधन. जोईन करायच्या आधीच डिपार्टमेंटचा माणूस झाल्यासारखे वाटू लागले होते.
कल्पीताईंचा निरोप घेऊन आलापल्लीच्या दिशेने रवाना झालो, इथून पुढचा प्रवास बसने करायचा होता. त्यामुळे गाडी लागल्यावर उलटी होऊ नये म्हणून गोळ्या घेतल्या. अपर्णाला गाडी लागायचा खूप त्रास होतो नेहमी, त्यामुळे अश्या प्रवासाच्या आधी ती काही खात नाही की प्रवासात काही बोलत नाही. आज सोमवारचा तिचा उपवास असल्याने तसेही तिने काही खाल्ले नव्हतेच, पण तिचे न बोलणे म्हणजे माझ्यासाठी सुद्धा एक प्रकारचा उपवासच होता.
चन्द्रपूर बसस्टॅण्डवर तेव्हा आम्हीच सेंटर ऑफ अॅट्रेक्शन वाटत होतो. साहजिकच होते म्हणा, आमचा गेट-अपच तसा होता. अपर्णा ही जीन्स-कुर्ता मध्ये, माझी सिक्स पॉकेट आणि डेनिमचे डार्क ब्लू शर्ट, दोघांच्या डोळ्यावर गॉगल, पाठीवर मोठाल्या सॅक, हातात पाण्याची बॉटल ज्यातून दर दोन मिनिटाने पाण्याचा एक घोट मारणे सुरूच. पण आम्हाला मात्र उगाच लोकांच्या डोळ्यात भरायचे नव्हते. कारण कल्पीताईंच्या ऑफिसमधील लोकांनी दिलेल्या सूचनाच तश्या होत्याप... प्रवासात कोणाला सांगू नका की आम्ही बांधकाम विभागाचे आहोत म्हणून, बसमध्ये तुमच्या बाजूलाच एखादा त्यातील बसला असेल की तुम्हाला ओळखता ही येणार नाही. दिसायला आपल्यासारखेच एज्युकेटेड असतात ते, स्थानिक लोकांमध्ये सुद्धा त्यांचे एवढे कनेक्शन असतात की एखादा सरकारी अधिकारी तिथे पोहोचायच्या आधीच त्यांना खबर असते, २-४ दिवसातच तुमच्या फोन नंबर पासुन सगळे डिटेल त्यांच्या अकाउंटला जमा झाले असतील, तिथे राहताना देखील आजूबाजूला काय चालू आहे याचे आपल्याला काही देनेघेणे नाही असाच आपला अॅटिट्यूड ठेवा, स्थानिक लोकांशी तर मु्ळीच वाद नको, आपली चुक नसली तर कान पकडून चुकलो म्हणायचे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे... कोणी कितीही आग्रह केला तरी सरकारी गाडीतून फ़िरु नका..!
याच विचारात असताना बस स्थानकात शिरली. अपर्णाची बसायची चांगली सोय व्हावी म्हणून त्वरीत दाराकडे धाव घेतली. बसमधील सर्व जन उतरल्यावर विजयीविराच्या आवेशात आत चढलो आणि बघतो काय तर प्रत्येक सीटवर कोणाचा न कोणाचा रुमाल, फडके, बॅगने आधीच जागा अडविली होती. इतरवेळी नक्कीच इकडचा रूमाल तिकडे करून काहीतरी झोल केला असता, पण इथे कोणाशी पंगा घ्यायचा नव्हता. तरीही थोडेफार झगडून लास्ट सीट वर दोघांपुरती जागा मिळविली. पण मग एका वृद्ध जोडप्याला बसायला जागा देउन स्वता उभा राहिलो. पुढचा ३ पैकी २ तासाचा प्रवास मग उभ्यानेच झाला. म्हातारे जोडपे मात्र बसायला जागा मिळाली म्हणून खूश होते बाकी माझ्यावर. त्यामुळे प्रवास तसा कंटाळवाना झाला नाही. प्रवासभर त्यांची बडबड चालूच होती. बोलता बोलता समजले की त्यांचा मुलगा गडचिरोली फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे. त्यामुळे सहज विश्वासाने मी सुद्धा त्यांना माझ्याबद्दल सांगितले. त्याचबरोबर आजूबाजुच्या २-४ लोकांचेसुद्धा कान टवकारले गेले. अर्थात नंतर अपर्णाने मला यावरून बरेच सुनावले.
दुपारी ४ वाजता गाडी आलापल्लीला पोहोचली. स्टॅंडला उतरलो तोच डिपार्टमेंटची दोन माणसे पुढे आली. तसे आम्हाला ओळखणे फारशी कठीण गोष्ट नव्हती. त्यांच्यातील एक श्री जयराम होते, ज्यांच्याशी माझे फोनवर बोलणे झाले होते. आणि दुसरा मात्र माझ्यासारखाच पोरसवदा मुलगा होता. अजय पोटे, जो माझ्याबरोबरच सिलेक्ट झाला होता. वीसेक दिवसांपूर्वीच सिरोंचा इथे जॉईन झाला होता पण आज काही कामानिमित्त आलापल्ली इथे आला होता. चेहर्यावर थोडेसे कौतुकाचे भाव होते त्याच्या. कारण मी मुंबई वरून एवढ्या लांब काही येत नाही असेच त्याला वाटले होते. त्यांच्याबरोबर बोलत ऑफिसपर्यंत पोहोचलो जे स्टॅंडपासून पाचच मिनिटांच्या अंतरावर होते. महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी ऑफिससारखेच होते ते. बाहेरच सरकारी पांढरी गाडी उभी होती जिला पाहताच चुकूनही तिच्यात बसायचे नाही हि सूचना आठवली. सर्वांशी ओळख झाली, चहापाणी झाले. सुदैवाने मला जॉईन करण्यासाठी सिरोंचाला पोहोचायची गरज नव्हती कारण इथूनच पुढचे सोपस्कार होणे शक्य होते. फक्त जॉईन व्हायच्या आधी सहाय्यक कार्यकारी अभियंता (Asst. Exe. Eng.) श्री. पाटील यांच्याशी एकदा भेट घेण्यास सांगितले.
पाटीलसाहेबांच्या चेहर्यावर सुद्धा तसेच भाव दिसत होते जसे इथे आल्यापासून मी सार्यांच्या चेहर्यावर बघत होतो. कोण हा येडछाप मुंबई वरून इथे मरायला आला आहे. बाकी आता याची सवय़ झाली होती. पण रिलायन्समधील Design Engineer चा जॉब सोडून आलो आहे हे ऐकल्यावर तर ते आणखीनच वाढले. अर्थात मुलगा हुशार असणार अशी एखादी कौतुकाची छटा सुद्धा त्यात दिसल्यासारखी वाटली. साहेबानी जॉईन तर करून घेतले, पण म्हणाले आला आहेस तर ५-६ महिने राहा इथे, फिर जरा, आजूबाजूचा परिसर बघ, मग बघू कामाचे काय ते... म्हणजे मी इथे टिकत नाही याची त्यांनाही पुर्ण खात्री होती तर.. पाटील साहेबांनीच मग आमची त्या रात्रीची राहायची सोय आलापल्ली PWD Guest House वर केली.
त्यानंतर शेवटचा भेटायचा कार्यक्रम होता तो कार्यकारी अभियंता, आलापल्ली उपविभाग (Executive Engineer) यांच्याबरोबर.. आणि त्या पदावर चक्क एक महिला होती. भोसले मॅडम, जसे नाव तसेच व्यक्तीमत्व. भारदस्त आणि प्रसन्न. मॅडम आपल्या कामात काहिश्या व्यस्त होत्या, म्हणून मी सहज त्यांच्यामागचा बोर्ड वाचू लागलो. माजी कार्यकरी अभियंत्यांचे नाव आणि कार्यकाल लिहिला होता त्यात. गेल्या ४-५ वर्षाच्या कालावधीत १५-१६ नावे दिसली, आणि चालू वर्षातील या मॅडम सुद्धा पाचव्या होत्या. एक जण तर केवळ ११ दिवसांचा पाहुणा होता त्यात... ती लिस्ट पाहता आता मी किती दिवस टिकतोय हाच विचार मनात येऊ लागला...
"भीती वाटते का?" समोरून अचानक आलेल्या प्रश्नाने विचारांची लिंक तुटली. उत्तरादाखल केवळ हसलो. भीती वाटत असती तर आलोच नसतो ना एवढ्या लांब, हेच त्यातून दाखवून द्यायचे होते.
"नक्षलवाद्यांबद्दल बरेच ऐकले असशील ना..?", भोसले मॅडमनी विचारले.
हो, ते तर बरेच उलट-सुलट ऐकून आलोय, बाकी खरे काय खोटे काय ते समजेलच काही दिवसात... मनातल्या मनातच म्हणालो.. आणि उत्तरादाखल पुन्हा फक्त हसलो.
माझ्याशेजारी तेव्हा पांढरा सदरा-लेंगा घालून एक सद्ग्रुहस्थ बसले होते. त्यांची ओळख झाली तसे समजले की ते तेथील राजकारणातील एक बडे प्रस्थ तसेच नावाजलेले समाजसेवक होते. श्री बाबा कदम, स्थानिक व्रुत्तपत्रांमध्ये सतत झळकनारे एक नाव, ऐकल्या-वाचल्यासारखे वाटले कुठेतरी. मुंबईवरून एवढ्या लांब त्यांच्या विभागात आलो म्हणून बाबासाहेबांना सुद्धा माझे तसे कौतुकच वाटत होते. त्या रात्रीला ते देखील मुक्कामाला आमच्या बरोबर गेस्टहाऊसलाच राहणार होते.
एवढा वेळ बिचारी अपर्णा मात्र माझी वाट बघत एकाच ठिकाणी बसून होती. तिला बरोबर घेउन मग आम्ही गेस्टहाऊसकडे निघालो.
गेस्टहाऊस तसे बर्यापैकी छान होते. एकूण आठ खोल्या होत्या. पण त्या आठवड्यात तिथे कुठला तरी समारंभ असल्यामुळे सगळ्या फुल झाल्या होत्या. बाबासाहेबानी आपल्या मोठेपणाचा जराही बाऊ न करता, तेथील एका सहकार्याच्या रूम मध्ये स्वताला अॅडजस्ट करून घेतले. पण माझ्याबरोबर अपर्णा असल्याने तेथील एका रूममधील सर्व लोकांना दुसरीकडे वळवून आमची सोय करण्यात आली. "एखादी मुलगी बरोबर असली की राहण्याची काही ना काही सोय होते, हे आई बरोबरच बोलत होती हे जाणवले. रूमदेखील छान मोठी आणि ऐसपैस होती. आत शिरताच सामान सोफ़्यावर फेकून स्वताला बेडवर झोकून दिले. प्रवासाचा थकवा जाणवू लागला होता. त्यातच सकाळपासून फारसे असे काही खाल्ले देखील नव्हते. आंघोळ करून मग आधी जेवनाची ऑर्डर दिली. एव्हाना अंधारून आले होते. रात्र झाल्यावर इथे बाहेर पडू नका अशी विनंती कम सूचना बरोबरच्यांनी आधीच केली होती, आणि ती मानण्यातच शहाणपण होते. जेवन यायला अजून अर्धा तास लागनार होता, तो पर्यंत गप्पा मारायला म्हणून बाबासाहेब आमच्या रूमवर आले. थोड्यावेळातच आमची ट्यूनिंग छान जमली. आणि मग बाबासाहेब सुरु झाले. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच कोणीतरी माझ्याशी एवढे नक्षलवाद्यांबद्दल बोलत होते आणि मी ते विश्वासाने ऐकत होतो,
"नक्कीच आदिवासींवर अत्याचार होतात. मी गेल्यावर्षी सिरोंचा आणि भामरागडला साधारण १ महिना होतो. तिथे खरेच डोके सुन्न करणारी परिस्थिती आहे. नक्षलवादी तेथील आदिवासींवर खूप अत्याचार करतात. तेथील युवकाना शाळेत जाऊन देत नाहीत. खूप दहशत आहे त्यांची. तिथे दि एड विद्यालय आहे पण स्थानिक आदिवासी एकही नाही. तेन्दु पत्ता, बांबू कापणी साठी नक्षलवादी खूप अत्याचार करतात. खूप कमी पगारावर त्यांना राबविले जाते आणि नक्षलवादी लोकांविरुद्ध काही बोलले तर मारुन टाकले जाते. नक्षलवादी आणि टेंडर मालक आणि तेथील नेता यांच्या संगनमताने ही सगळी पिळवणूक चालते. यातून मिळणार्या पैश्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नक्षलवादी लोकांचा वापर केला जातो. अर्थात त्यातील मोठा भाग या नक्षलवादी लोकाना दिला जातो. आता जर हे आदिवासी लोक सुधारले तर या टेंडरमालकांचे, नेत्यांचे, आणि नक्षलवाद्यांचे खूप प्रॉब्लेम होतील म्हणून हे नक्षलवादी अश्या प्रकारची डेवेलपमेंट जाणूनबुजून होऊन देत नाहीत. मध्यंतरी या सर्व आदिवासीना गाई म्हशी दिल्या होत्या आणि दुधाचा प्रकल्प सुद्धा सुरू केला होता पण या नक्षलवादी लोकांनी आदिवासींना दूध न देण्याबदद्ल धमकावने सुरू केले. परिणामी दुधाचा प्रकल्प बंद झाला. गायी म्हशींचा वापर सध्या शेणासाठी केला जातो. तर थोडक्यात अशी आहे ही सगळी परिस्थिती...."
आता या सर्वांमध्ये मी कुठे येतो आणि मला नक्की येथील स्थानिक लोकांपासून भीती आहे की नक्षलवाद्यांपासून की यातले काहीच नाही, म्हणजे मी भला आणि माझे काम भले असा अटिट्युड मला ठेवायचा आहे की आणखी काही... काही कळेनासे झाले. तेवढ्यात जेवण आले आणि बाबासाहेब आमचा निरोप घेउन निघाले.
काही का असेना दुसर्या दिवशी आम्हाला सिरोंचासाठी निघायचे होते. दिवसभराच्या थकव्याने लगेच डोळे मिटले, सकाळी सुद्धा बरीच उशिरा जाग आली. पाटीलसाहेबांची भेट आणि परवानगी घेउन आम्ही सिरोंचाला निघालो. अपर्णाला गाडी लागायचा त्रास होतो म्हणून यावेळी खाजगी वाहनाने प्रवास करायचे ठरविले. आलापल्ली ते सिरोंचा (९८ कि.मी.) म्हणजे साधारण २ तासांचा प्रवास होता. आलापल्ली सोडून जशी गाडी हायवेला लागली तसा मस्त वारा वाहू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजुने मस्त घनदाट जंगल होते. नेटवर गूगलमॅप आणि छायाचित्रांमध्ये जंगल बघणे आणि स्वता ते जंगल कापत पुढे जाणे यातील फरक अनुभवत होतो. याची मजा काही औरच होती. दोघांच्याही मनात यावेळी जराही भिती नव्हती, उलट कॅमेरा बरोबर का नाही घेतला याची हळहळ वाटत होती. अपर्णा पाठीमागे इतर बायकांबरोबरच बसली होती आणि मी पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसलो होतो. वासिम शेख, ड्रायव्हर मुसलमान होता. दुसर्या दिवशी ईद असल्याने स्वारी खुशीत होती. गाडीत पाठीमागे एक नर्स बसली होती. ती सुद्धा सिरोंचाला कामाला होती. नेहमीची सवारी असावी. ड्रायव्हरच्या आणि तिच्या गप्पा चालू झाल्या. ड्रायव्हरचा हिंदी बोलायचा टोन हैदराबादी होता, त्यामुळे ऐकायला मज्जा वाटत होती. थोड्याचवेळात मी सुद्धा त्यांच्या गप्पात सामील झालो. त्या दोघांकडून सिरोंचा बद्दल बरीच माहिती समजली.
जेव्हा मी त्यांना सांगितले की माझी तिथे सहाय्यक अभियंता म्हणून पोस्टींग झाली आहे तेव्हा तो ड्रायव्हर लगेच म्हणाला, "अरे आपके चौधरी साहब तो मेरे खास पेहचान के थे. मेरे गाडी मे ही आते जाते थे. तीन महीने पहिले कार्लेश्वर मंदीर के यहा कही सर्व्हे करने गये और उधरही मर गये." मी आणि अपर्णा दोघे दचकून एकमेकांकडे बघू लागलो... मर गये या फिर मार दिये गये..??
कदाचित ते ड्रायव्हरच्या लक्षात आले असावे. त्यावर तो हसून म्हणाला, "अरे वैसे नही, हार्टअॅटेक से गये.." तरीही सारे संशयास्पद आहे असाच भाव आमच्या चेहर्यावर होता. मग त्या ड्रायव्हर आणि नर्स कढून हळूहळू तिथे घडलेल्या नक्षली कारनाम्यांची माहिती मिळू लागली. गेल्या ३-४ महिन्यांच्या कालावधीत बरेच काही घडले होते या सिरोंचा नावाच्या छोट्याश्या गावात. दोन पोलिस मारले गेले होते, चार-पाच सरकारी अधिकार्यांच्या एका टीमचे अपहरण झाले होते. गावचा सरपंच सुद्धा पोलिसांचा खबरी म्हणून मारला गेला होता. ज्या रोड ने आम्ही आता प्रवास करत होतो तो तर घातपातांसाठी प्रसिद्ध असा होता. अर्थात ते तसेही आम्हाला कळून चुकले होतेच. कारण अधूनमधून काही ठिकाणी भर रस्त्यात झिगझॅग पॅटर्नमध्ये १०-१२ ड्रम मांडलेले दिसायचे, जेणेकरून गाडीचा वेग मंदावण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग तिथेच कुठेतरी रस्त्याच्या कडेला साध्या वेषातील स्टेनगनधारी पोलिस दिसायचा. अर्थात तो पोलिस आहे हे सुद्धा आम्हाला त्या ड्रायव्हरने सांगितले म्हणून समजले नाहीतर आधी आम्हाला तो नाना’च वाटला होता. "नाना" हा कोडवर्ड मी आणि अपर्णाने नक्षलवाद्यांसाठी बनविला होता.
त्या ड्रायव्हरने आम्हाला थेट बांधकाम विभागाच्या ऑफिसपर्यंत आणून सोडले. आजूबाजूचा परिसर छान होता. ऑफिसला लागूनच आमचे राहण्याचे क्वार्टरस होते. माझ्याआधी जॉईन झालेले दोघेजण आणि आधीपासून तिथे असलेला एक Jr. Engineer तिथेच राहत होते. खरे म्हणजे नुसते घर नाही तर त्यांचे ऑफिससुद्धा तेच होते. कारण त्यांची सगळी कामे तिथेच बसून चालायची. कॉम्प्युटर, ईंटरनेट, प्रिंटर, फोन सगळ्या सोयी-सुविधा त्या Jr. Engineer च्या क्वार्टरमध्येच होत्या. एवढेच नव्हे तर त्याची स्वताची कारसुद्धा होती, आणि दर महिन्याला एकदा तो आपल्या घरी किंवा बायकोच्या माहेरी जाउन यायचा, ते सुद्धा विमानाने. हैदराबादचे विमानतळ तिथून जवळ पडायचे. थोडक्यात काय, तर जिथे कनिष्ठ अभियंता एवढे छापत असेल तिथे माझ्यासारखा सहाय्यक अभियंता नक्कीच उपाशी मरणार नव्हता.
त्या दिवशी आमची राहण्याची सोय Guest House मध्ये केली होती. खाली कोणीतरी दुसरे थांबले होते, वरचा मजला आम्हाला दिला होता जो VIP गेस्टरूम होता. आई खरेच बरोबर म्हणाली होती, मुलगी बरोबर असेल तर राहायची व्यवस्था नेहमी चांगली होते, हे पुन्हा एकदा पटले. गेस्ट हाऊस खरेच भारी होते, आणि त्यापेक्षा भारी होते ते त्याच्या व्हरांड्यातून दिसणारे दृष्य. व्हरांडापण कसला जणू काही टेरेस फ्लॅटच होता तो. पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि खरे सांगतो, एवढा नयनरम्य, डोळ्यांचे पारणे फेडनारा कि काय म्हणतात तो सुर्यास्त आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो, आणि तो सुद्धा अनपेक्षितपणे. अपर्णा तर हरवूनच गेली. मी सुद्धा पटकन मोबाईल काढून त्या सर्वाचा एक विडिओ चित्रित केला. सिरोंचाच्या ज्या नदीबद्दल ऐकून आलो होतो तिचे असे सुर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर विलोभनीय दर्शन घराच्या व्हरांड्यात बसल्याबसल्या होणे हा खरच सुखद धक्का होता. खाली डाव्या बाजूला प्रशस्त आवार होते आणि मधोमध एक मंदीर, ज्यामुळे एकंदरीत वातावरणाला आपसूक एक मांगल्य आले होते. उजव्या बाजूला पाठीमागे पसरलेले सिरोंचा गाव दिसत होते. एकंदरीत ते गेस्ट हाऊस एका मोक्याच्या जागेवर होते जिथून सार्या गावाचा व्ह्यू मिळत होता. अपर्णाला सुद्धा माझ्याबरोबर मुंबईहून एवढे लांब आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. पहिल्यांदाच मला ही असे वाटले कि जर खरेच असे निसर्गसौंदर्य अनुभवता येणार असेल तर राहूया खुशाल इथे वर्षभरासाठी... पण ते वाटणे शेवटचेच ठरले..
रात्रीच्या जेवणाची सोय गेस्टहाऊसमध्येच झाली असती, पण आमचा खानसामा ४ दिवसांसाठी रजेवर गेला होता. म्हणून मग बरोबरच्या २ ईंजिनीअरसह बाहेर खानावळीत जायचे ठरविले. ते साडेसहा-सातलाच जायचे बोलत होते, पण ही कसली जेवायची वेळ असे बोलून आम्ही साडेसात पर्यंत टाईमपास केला. पण साडेसहा आणि साडेसात मध्ये काय फरक असतो हे आम्हाला त्या दिवशी समजले. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. रस्त्यांवर दिवे असण्याचा प्रश्नच नव्हता. उलट आम्हाला आमच्या बॅटरीचा प्रकाशसुद्धा फार कमी वाटत होता. तरी एक बरे होते की बरोबरच्या दोघाना रस्ता व्यवस्थित माहीत होता. खानावळ सुद्धा जेमतेमच होती. कसेबसे जेवण उरकून बाहेर पडलो. अपर्णाला रात्री खाण्यासाठी काहीतरी घ्यायचे होते म्हणून आजूबाजूला एखादे दुकान दिसते का हे बघायचे ठरविले होते, पण त्याची आता काही सोयच उरली नव्हती. रस्त्याने जाताना आजूबाजूला नजरेला पडनारे स्थानिक लोकांचे कोंडाळे छातीत अक्षरशा धडकी भरवत होते. त्या अंधार्या रात्री ते भिल्ल आणखी आणखी काळेकुट्ट वाटत होते. सगळ्यांचा नजरा आमच्यावरच रोखल्या होत्या. त्यांच्या नजरेला नजर न देता गप सरळ नाकासमोर बघून चालन्यातच शहाणपणा होता. अपर्णाने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. मला काय दुर्बुद्धी सुचली जे मी या मुलीला असल्या जागी बरोबर घेउन आलो असे वाटू लागले. माझ्याबरोबरच्या दोन सहकार्यांची सुद्धा तशीच अवस्था असावी. त्यांच्यासाठी हा रस्ता सवयीचा झाला असला तरी मुलगी बरोबर असल्याने त्यांना देखील असुरक्षित वाटू लागले होते. मगाशी जेवताना एवढ्या गप्पा मारणारे ते दोघे आता मात्र चिडीचूप होते. ऑफिसच्या आवारात शिरलो. गेस्ट हाऊसची बिल्डिंग त्या भयान अंधारात एखाद्या विरान डाकघरासारखी वाटत होती. त्या एकंदरीत वातावरणाला एवढे घाबरलो होतो की बरोबरच्या दोन साथीदारांची क्वार्टर आल्यानंतर पुढे आमच्या गेस्टहाऊस पर्यंत जायला आम्ही वॉचमनला बरोबर घेतले.
वॉचमनला टिप देऊन कटविले आणि दार बंद करून घेतले तोच अपर्णा आतून किंचाळत परत बाहेरच्या खोलीत धावत आली. भिंतीवर पाल की काय पाहिली होती तिने. तशी ती एवढी काही डरपोक नव्हती पण कदाचित अजून मगासच्या वातावरणातून बाहेर आली नसावी असे वाटून आत जाउन पाहिले तर क्षणभर मी सुद्धा चरकलो. पाल कसली चक्क सरडा वाटत होती ती आकाराने. लांबूनच शुक शुक करून आणि पाय आपटून तिला पळवायचा प्रयत्न केला तशी ती खिडकीच्या पडद्यामागे गेली... पण ती गेली तशी पडद्याच्या दुसर्या बाजूने आणखी एक सळसळत बाहेर आली. घरभर नजर फिरविली तर अरे बापरे..., पालींचे साम्राज्य पसरले होते सगळीकडे.
तरी एक गोष्ट चांगली होती की आमचे बेडस रूमच्या मधोमध होते, कुठे भिंतीला लागून नव्हते. मगाशी याच रूमच्या व्हरांड्यातून अनुभवलेली संध्याकाळ आणि आताची रात्र, दोन टोकाचे अनुभव होते. आतासे कुठे साडेआठ-नऊ वाजत होते, त्यामुळे झोपही अशी काही येत नव्हती. पण जागे राहून ती रात्र आणखी भयान होत जाताना पाहण्यापेक्षा सरळ झोपून जाणे हाच चांगला पर्याय होता. एकदा सकाळ झाली की परत तेच विलोभनीय दृष्य असणार होते. म्हणून अपर्णाला झोपायचा सल्ला दिला तर खरा, पण स्वताला डोळे मिटायची सुद्धा भीती वाटत होती. तसेच एकमेकांच्या नजरेत नजर घालून बराच वेळ बघत होतो. माझ्या नजरेत आधार शोधणारी तिची नजर नकळत मलाच आधार देउन जात होती. नकळत डोक्यातले सारे विचार शून्य झाले, जणू काही ती काळरात्र काही क्षणांपुरती थांबली होती आणि आमच्यातील अव्यक्त असे नाते अलगदपणे उलगडले जात होते. तेवढ्यातच बाहेरच्या दारावर थडथड झाली. आणि आमची तंद्री भंगली. आतूनच विचारले, "कोण आहे...?" तर उत्तरादाखल त्याहीपेक्षा मोठी थडथड... जणू काही दार उघडा नाहीतर तोडून आत येतो असेच सुचवायचे होते.
अपर्णाला नजरेनेच धीर देऊन मी दार उघडायला बाहेर आलो. पण पाठोपाठ अपर्णासुद्धा आली. कदाचित तिला एकटीला आत थांबायची भिती वाटत असावी किंवा मला सोबत म्हणून आली असावी. दार उघडून पाहतो तर समोर ३-४ अनोळखी लोक. त्यात मगाशी आम्हाला सोडायला आलेला रात्रपाळीचा वॉचमन सुद्धा होता. त्यालाच विचारले काय झाले, तर बाजूचा उत्तरला, "कुछ नही साब, बडे साहब आपसे मिलना चाहते है."
अरे कोण बडा साहब? आणि ही काय वेळ होती भेटायची? रात्रीचे नऊ म्हणजे तिथे बारा वाजून गेल्यासारखेच होते. अश्यावेळी हे अनोळखी लोक दारात. एकाला न्यायला ४ जण... एक ना दहा, हजार प्रश्न एकाचवेळी डोक्यात आले. वाटले की कल सुबह मिलते है असे सांगून कटवावे सरळ. तेवढ्यात आणखी एक जण गरजला, "चलो जल्दी करो साब, टाईम नही है अपने पास." त्याच्याकडे पाहिले तर काळाकुट्ट धटिंगण होता. जर मी यायला नकार दिला तर मला सहज खांद्यावर टाकून आणता येईल यासाठी त्याला घेऊन आले असावेत. वाद घालन्यात अर्थ नव्हता की त्यांच्यासोबत जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. प्रश्न होता तो फक्त अपर्णाचा. तेवढ्यात तीच माझ्या कानात येऊन पुटपुटली, "वेलकम टू गडचिरोली... हे नक्किच नाना लोक आहेत, चल गपचूप." संकटातसुद्धा काहीतरी पीजे मारून नाहीतर बकवास करून टेंशन कमी करायचे हा अपर्णाचा फंडा होता, पण या वेळी मात्र तिचा हा प्रयत्न खूप केविलवाणा भासत होता. कारण समोर काय उभे ठाकले आहे हे तिच्या चेहर्यावर दिसून येत होते.
त्या काळोखात गेस्टहाऊसच्या गोलाकार पायर्या उतरताना घट्ट पकडून ठेवलेल्या अपर्णाच्या हाताचा थंडगार स्पर्श मला जाणवत होता. खाली एक जीप आमची वाट बघत उभी होती. आम्ही जवळ पोहोचायच्या आधीच ईंजिन स्टार्ट करायचा आवाज झाला. खरेच त्यांच्याकडे टाईम नव्हता. त्या खाचखळग्यांनी भरलेल्या अंधारी रस्त्याने सुद्धा जीप सुसाट पळत होती. आम्हाला पाठीमागे बसविण्यात आले होते. समोर बसलेल्या दोघांची नजर सतत आमच्यावर रोखली होती. जणू काही चालत्या जीपमधून बाहेरच्या काळोखात उडी मारायचे धाडसच आम्ही करणार होतो. सुरुवातीला नक्की कुठे जात आहोत याचा अंदाजा घेण्याचा प्रयत्न केला पण मग तो सुद्धा सोडून दिला. फिरवून आम्हाला गेस्टहाऊसच्या मागच्या गल्लीत आणले असते तरी समजले नसते. सहजच मुंबई-पुण्याचे रिक्षावाले आठवले. नाही म्हणायला रस्त्यात दोन वेळा पाण्याचा खळखळाट जाणवला. पण गावच्या ठिकाणी असे नदी-नाले जागोजागी असतात. तसेही आमच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली नव्हती, म्हणजे गुप्तता वगैरे बाळगण्याचे कष्ट त्यांनीही घेतले नव्हते. कदाचित आमची तोंडे कायमची बंद करण्याचा त्यांचा हेतू असावा. अंगावर सररकन शहारा आला. डोक्यातले विचारचक्र थांबायचे नाव घेत नव्हते पण सुमारे २०-२५ मिनिटांच्या प्रवासानंतर जीप मात्र थांबली.
जीपमधून उतरल्यावर आजूबाजूला पाहिले तर घनदाट जंगल. रस्ता नावाचा प्रकार सुद्धा नव्हता. इथपर्यंत आमची जीप आली कशी याचेच आश्चर्य वाटले. आता इथे आमचे एनकाऊंटर होणार बहुतेक. मनात आलेला विचार परत कसाबसा झटकून टाकला. तेवढ्यात एकाने मोबाईल वर फोन लावला. म्हणजे अजून BSNL नेटवर्कच्या हद्दीत होतो तर... त्यांचे फोनवर काय बोलणे झाले देवास ठाऊक, पण इथून पुढे चालतच जायचे होते. अजूनही ते लोक मला ‘साहब’ म्हणूनच हाक मारत होते आणि हीच काय ती दिलासा देणारी बाब होती.
चालताना पायाला खडे टोचू लागले तसे जाणवले की आपण तसेच स्लिपरवर आलो आहोत. दोघांचे मोबाईल, पैशाचे पाकिट, घड्याळ सारे काही रूमवरच सोडून आलो होतो. झोपायच्या आधी रोज घरी फोन करायचो. माझा फोन नाही बघून कदाचित आईने आज स्वता केला असेल, तो सुद्धा तसाच वाजत असेल. जास्त उशीर झाला तर त्या बिचारीला टेंशन येईल. आई आठवली तशी व्याकुळता आणखी वाढू लागली. कदाचित हेच हाल त्या अपर्णाचे झाले असतील. खरे म्हणजे या क्षणी मला खंबीर बनून तिला आधार देण्याची गरज होती. हातातील तिचा हात अलगद दाबून तिला नजरेने धीर द्यायचा प्रयत्न केला. त्या अंधारात सुद्दा तिचे डोळे रडवेले झालेले दिसले. दातांमध्ये खालचा ओठ दाबून कसाबसा तिने आलेला हुंदका टाळला. मगासपर्यंत मी मुकाट्याने जे घडतेय ते घडू देत होतो आणि जास्त विचार न करता पुढे काय होतेय याची वाट बघत होतो. पण आता मात्र काहीतरी विचार करायची गरज होती, नाहीतर कदाचित वेळ निघून जाणार होती. बरे ते आपसात काय बोलत होते त्यातील एका शब्दाचा अर्थ लागेल तर शप्पथ. त्यांचे सगळे संभाषण तेलगू मध्ये चालू होते. सिरोंचा हे महाराष्ट्र आणि आन्ध्रप्रदेशच्या सीमेवर येत असल्याने तेथील लोकांना हिन्दी, मराठी, तेलगू या तिन्ही भाषा बर्यापैकी अवगत असतात. त्यातील एकाला हिम्मत करून विचारले, "हम जा किधर रहे है, किनसे मिलना है, और कितनी देर लगेगी??" एका दमात २-३ प्रश्न विचारून टाकले. एवढ्या वेळच्या शांततेनंतर अचानक फुटलेल्या माझ्या वरच्या पट्टीतील आवाजाने क्षणभर अपर्णासुद्धा चपापली आणि मला नजरेनेच शांत राहायचा सल्ला दिला. पण त्यांची यावर काहीही प्रतिक्रिया नव्हती. हतबल झाल्यासारखे वाटत होते. अपर्णा बरोबर नसती तर खरेच वाट दिसेल तिथे वेड्यासारखा पळत सुटलो असतो. तेवढ्यात समोर एक घर दिसू लागले. आम्हाला बाहेर थांबायला सांगून दोघे जन आत गेले. गेस्ट हाऊसचा वॉचमन आणि मगासचा तो राकट दांडगट काळाकुट्ट धटिंगण आमच्याबरोबर बाहेरच थांबले होते. अचानक आतून कसल्यातरी झटापटीचा आवाज येऊ लागला. बघताबघता आवाज वाढू लागला आणि पाठीमागून एक अस्फुट किंकाळी... परत भयाण शांतता... आवाज मात्र नक्कीच ओळखीचा वाटत होता...
मगासचा एक माणूस बाहेर आला आणि इशार्यानेच आम्हाला आत बोलाविले. बरोबरचे दोघेजण बाहेरच रखवालीला थांबले. मी आणि अपर्णा आत गेलो. घर म्हणजे एकच मोठा हॉल होता. बाहेरून लक्षात आले नव्हते पण पुर्ण लाकडाचे स्ट्रक्चर होते. सिविल ईंजिनीअर तेही स्ट्रक्चरल डिझायनर असल्यामुळे कोणत्याही घरात प्रवेश केला की आधी त्याचे एका ईंजिनीअरच्या द्रुष्टीकोणातून निरीक्षण करायची सवय आहे मला, पण आज मात्र वेळ पडली तर इथून निसटायचे कसे हाच विचार डोक्यात होता. एवढ्या मोठया रूमला एकच दरवाजा होता, जिथून आम्ही आत आलो होतो आणि त्याच्या बाहेर देखील तो मगासचा धटिंगण उभा होता. नाही म्हणायला दोन बाजूने खिडक्या होत्या, पण त्यांच्यावरची जळमटे पाहता त्या वर्षानुवर्षे उघडल्या गेल्या नसाव्यात. रूमच्या मधोमध पंखा टांगतात तसे छतावरून वायर सोडून त्याला एक बल्ब लटकवला होता. तोही जेमतेम प्रकाशाचा. त्याच्या भोवती फिरणार्या रातकिड्यांच्या सावल्यांमुळे रूममधील प्रकाश आणखी निस्तेज वाटत होता. तेव्हढ्यात एका कोपर्यातून कण्हन्याचा आवाज आला. पाहताच छातीत धडकी भरली. तो अजय पोटे होता. माझ्याबरोबरच सिलेक्ट झालेल्यांपैकी एक. अंगाचे मुटकुळे करून पडला होता. मगाशी जो झटापटीचा आवाज ऐकू आला होता त्याचे कारण हे होते तर. त्याच्याजागी मी आता स्वताला बघू लागलो होतो. कदाचित माझे पण थोड्यावेळात हेच हाल होणार होते. पण मग अपर्णाचे काय... सगळे विचार परत फिरून फिरून अपर्णावर येउन थांबत होते.
समोरून आलेल्या आवाजाने भानावर आलो. रूममध्ये आणखी एक माणूस होता. कदाचित त्यांचा म्होरक्या असावा. मला त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. मुकाट्याने बसलो. हॉट सीट की काय ते यालाच बोलत असावेत. अपर्णा माझा खांदा पकडून माझ्या मागे उभी राहिली. म्होरक्याने इशारा करताच त्याच्या दोन साथीदारांपैकी एक जन बाहेर गेला तर दुसरा माझ्या उजव्या बाजूला येउन उभा राहिला. आणि मग प्रश्नोत्तरांचा राऊंड सुरू झाला..
"नाव?"
"अभिषेक..., अभिषेक नाईक"
"आणि ही कोण, बायको का?"
"नाही, मैत्रीण आहे माझी"
"मग इथे कशाला घेउन आलास?"
"असेच, सहज, फिरायला म्हणून."
"फिरायला." एक छद्मी हास्य..
"मग तू कशाला आला आहेस?"
"कशाला म्हणजे..? परिक्षा पास झालो आणि इथे सिरोंचाला पोस्टींग झाली, सहाय्यक अभियंता म्हणून..."
वाक्य पुरे होते ना होतेच तो खेकसला, "ज्यादा हुशारी करू नकोस # # #, नाहीतर तुझे पण तेच हाल करेन जे तुझ्या साथीदाराचे केले आहे"
गेले दोन दिवस जे साहेब साहेब ऐकायची सवय झाली होती त्याची धुंदी क्षणात उतरली.
तो अजय पोटे बद्दल बोलत होता, पण तो माझा नक्की कसला साथीदार होता, कालच तर ओळख झाली होती आमची.
तेव्हढ्यात तो परत गरजला, "बोल पटपट चल.., आणि कोण कोण आहेत तुमच्यात? आणि कसली खबर काढायला आला आहात?"
कदाचित तो मला सरकारी खबरी समजत असावा. पण आता मी तो नाही आहे हे त्याला मी कसे समजवणार होतो हे मला समजेनासे झाले. एखादी गोष्ट आपण आहोत हे समजवू शकतो, सिद्ध करू शकतो, पण नाही आहोत हे कसे समोरच्याला पटवायचे. बरे पटविले तरी पुढे काय? इथून सुटका? छे... ती त्याही परिस्थितीत शक्य नव्हती. असेही मरायचे होते आणि तसेही मरणारच होतो. मांजरीचे पळायचे सगळे रस्ते बंद झाल्यावर जसे तिच्यात लपलेली वाघीण बाहेर पडते आणि प्रतिहल्ला करते तसेच काहीसे माझे झाले. अचानक माझ्या आवाजात देखील जोर आला.
"मला काही माहित नाही तुम्ही काय बोलत आहात, मी कोणाचा खबरी-बिबरी नाही आहे. असतो तर एकटा आलो असतो, बरोबर हिला आणले नसते, प्लीझ आम्हाला जाउ द्या. आम्ही कोणाला तुमच्याबद्दल सांगणार नाही..." एवढे बोलून मी खुर्चीतून उठायला गेलो तोच बाजुच्या इसमाने एक थाडकन लाथ मारली कि मी खुर्चीसकट कोलमडलो. मी पडलो तसा तो आणखी पुढे सरसावला. कदाचित आणखी एक लाथ पडणार होती माझ्या पेकाटात. हे बघून अपर्णा त्याच्या अंगावर झेपावली. तिचा काय निभाव लागणार होता म्हणा त्याच्यासमोर, त्याने तिलाही झटकून दिले. पण त्यामुळे मला जरा सावरायला वेळ मिळाला. रागाच्या भरात मी खुर्ची उचलून त्याला मारायला गेलो तोच उजव्या हातातून एक सनक गेली. मगाशी त्या गुंडाने मारलेली लाथ हाताच्या कोपरावर बसली होती. ती संधी साधून त्याने माझी खुर्ची हवेतच पकडली आणि खेचून घ्यायचा प्रयत्न केला. आमची झटापट बघून त्यांच्या म्होरक्याने माझ्यावर पिस्तोल रोखले. आयुष्यात कधी विचार देखील केला नव्हता अश्या एका प्रसंगाला प्रत्यक्षात सामोरे जात होतो. स्वताकडे अशी पिस्तोल रोखलेली बघून खरे तर माझी गाळण उडायला हवी होती, पण जशी ती पाहिली तशी हातातील खुर्ची त्या म्होरक्याच्या अंगावर फेकायचा प्रयत्न केला. खुर्चीला दुसर्या बाजुने त्या गुंडाने पकडले असल्याने ती कुठे फेकली तर गेली नाही पण हवेतल्या हवेत डाव्या बाजुला कलंडली आणि खळकन आवाज होऊन सार्या रूम मध्ये अंधार पसरला.
हे सारे अनपेक्षित आणि नकळतपणे घडले होते. पण झालेल्या अंधाराचा फायदा घेणे गरजेचे होते, आणि तो सुद्धा लगेच. कारण मगाशी मी या लोकांना मोबाईलवर बोलताना पाहिले होते. कदाचित ते याच म्होरक्याशी बोलत असावेत. म्हणजे इथे यांच्याकडे मोबाईल नक्की असणार. एवढ्याश्या खोलीत आम्हाला हुडकून काढण्यासाठी त्या मोबाईलचा प्रकाशसुद्धा पुरेसा होता. म्हणून इथून त्वरीत बाहेर पडने गरजेचे होते. पण बाहेर तो मगासचा धटिंगण आणि त्याचा एखाद दुसरा साथीदार अजून असणार होतेच. कदाचित ते जवळ नसावेत किंवा आत काय घडले आहे याची त्यांना कल्पना नसावी. कारण बल्ब फुटण्याच्या आवाजाव्यतिरिक्त कोणताही मोठा आवाज झाला नव्हता. रूमला दरवाजा देखील एकच होता. आणि त्याच दिशेला कुठेतरी वाटेत एक गुंड उभा होता. तेही हातात खुर्ची घेउन. कारण ती खुर्ची कुठे पडल्याचा आवाज ऐकू आला नव्हता. बल्ब फुटल्याफुटल्या मी ती खुर्ची सोडून अपर्णाचा हात पकडला होता. या अंधारात सर्वात महत्वाचे होते ते आमची चुकामूक न होऊ देणे. आणि आता तिला घेउनच या रूमच्या बाहेर पडायचे होते.
पुढील घटनाक्रम फार वेगाने घडला. समोरच्या गुंडाच्या पोझिशनचा अंदाजा घेउन सरळ त्यालाच जोरात धडक मारली, आणि होती नव्हती तेवढी ताकद काढून एकाच हाताने त्याला ढकलून दिले. तो सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त कोलमडला आणि कदाचित त्याच्या म्होरक्यावर जाउन पडला असावा. कारण त्या दोघांचे धडपडण्याचे आवाज ऐकू आले. कदाचित अंधारामध्ये चाचपडत आधार शोधण्याच्या मानसिकतेमुळे आपल्या शरीराचा बॅलन्स वीक होत असावा, त्यांचे तसेच झाले असावे, नाहीतर त्यांना असे धक्का देऊन पाडणे माझ्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. पण हीच संधी होती, अपर्णाला घेऊन सुसाट बाहेर पळालो.
पण ऊफ्फ... दरवाज्याबाहेर पडतो ना पडतो तोच कोणालातरी धडकलो. ज्याला धडकलो त्याची शरीरयष्टी पाहता नक्कीच हा तो धटींगणच होता. नाक क्षणभर सुन्न झाल्यासारखे वाटले. अपर्णाचा हात सुद्धा हातातून सुटला. त्याने मला घट्ट पकडून ठेवले. याच्याशी आता झगडून फायदा नव्हता, म्हणून मी सुद्धा माझ्यापरीने त्याला पकडून ठेवले आणि जोरात अपर्णाला "पळ इथून, मी येतो मागून" असे ओरडलो. पुढची १५-२० सेकंद मी, अपर्णा माझा विचार न करता पळावी म्हणून ओरडत होतो. चांदण्याच्या प्रकाशात तिची सावली धावताना दिसली. तेवढ्यात समोरून आणखी एक जन धावत आला. त्याने अपर्णा पळाल्याच्या दिशेने टॉर्च मारला, पण त्याचा जेमतेम प्रकाश जवळच्या दोन झाडांना भेदून फार पलीकडे जाऊ शकला नाही. थोड्यावेळासाठी मी त्या दिशेने एकटक बघत बसलो. कधीकधी एखादी व्यक्ती केवळ सोबत म्हणून आपल्याबरोबर असते, पण नकळत तिची साथ आपल्याला किती आधार देत असते हे ती नजरेपलीकडे गेल्यावरच समजते. आता त्या लोकांच्या तावडीत मी एकटाच होतो.
मला परत आत नेउन खुर्चीला बांधून ठेवण्यात आले. जाताना माझ्या पोटात एक जोरदार गुद्दा लगावायला ते विसरले नाहीत. बाहेरून कडी लावण्याचा आवाज ऐकू आला. आता बाहेर नक्की किती जन होते की एकही नाही हे कळायला मार्ग नव्हता. मी तसाच बाहेरून काही आवाज येतो का याची चाहूल घेत बसून होतो, पण रातकिड्यांच्या किर्रर शिवाय आणखी कसलाच आवाज नव्हता. अंग जाम दुखत होते. एवढा वेळ त्याकडे लक्ष नव्हते पण आता जाणवू लागले होते. यापुढे आणखी मार खायची जराही इच्छा नव्हती. त्यापेक्षा सरळ गोळी खाऊन मरणे परवडले असे वाटू लागले. त्यातच डोक्यात अपर्णाचा सुद्धा विचार होताच. कुठे गेली असेल, कशी असेल, हे लोक तिच्या मागावर तर गेले नसतील, आणि सापडलीच त्यांच्या तावडीत तर तिला इथे परत घेउन येथील की तिथेच तिचे काही बरेवाईट करतील.
जवळपास अर्ध्या तासाने कडी उघडण्याचा आवाज ऐकू आला. वाटले तेच आले परत, पण बघतो तर ती अपर्णा होती. मला वाटले पण नव्हते की ही वेडी इथेच कुठे तरी दडून बसली असेल आणि अशी मला सोडवायला परत येईल.
पण आली.....
आणि फसली....
तिच्या पाठोपाठच आणखी दोन जन आत शिरले. कदाचित जवळपासच असावेत त्यामुळे चाहूल लागताच हजर झाले.
"चलो साहब, यहासे निकलना है." यावेळी त्यांचा आवाज बर्यापैकी मवाळ होता. पण पुढे काय वाढून ठेवले होते देवास ठाऊक. गपगुमान त्यांच्यामागून निघालो. बाहेर त्यांचा म्होरक्या आणखी एका साथीदारासोबत उभा होता. त्यांच्यात काय बोलणे झाले समजले नाही. कदाचित तेलगू भाषेत असावे पण मग आम्हाला घराच्या मागच्या बाजूला नेण्यात आले. तिथे आणखी एक गाडी उभी होती. बहुधा मधला वेळ ते याच गाडीत बसले असावेत जे नेमके अपर्णाच्या पाठोपाठ हजर झाले. परत आमचा गाडीचा प्रवास सुरू झाला. त्या घनदाट जंगलातूनसुद्धा तो ड्रायव्हर इतक्या सराईतपणे गाडी चालवत होता की जणू एखादा अदृष्य रस्ता त्यालाच काय तो दिसत होता. पंधरा-वीस मिनिटांच्या प्रवासाने आम्ही एका गोदामाच्या जवळ पोहोचलो. आम्हाला आत नेण्यात आले. लाकडाची मोठी वखार दिसत होती. इथे मात्र बरेच जन होते. आम्ही आलो तरी त्यांची आपापली कामे चालूच होती. लाकडाच्या तस्करीबद्दल ऐकून होतो, कदाचित हा त्यातीलच प्रकार असावा. पण आता इथून निसटणे सोपे नव्हते हे समजून चुकलो. तरीही इथे मगासच्या अंधार्या आणि कोंदट वातावरणापेक्षा बरे वाटत होते. गोदाम बरेच मोठे आणि पुरेसे प्रकाशित होते. आम्हाला एका माणसासमोर नेऊन उभे केले. कदाचित हा त्या सर्वांचा बॉस असावा. "फिलहाल अंदर के रूम मे डाल दो. सुबह देखेंगे इनका क्या करना है." त्याची अशी ऑर्डर मिळताच आमची रवानगी आतल्या रूम मध्ये झाली. रूम कसली, चार बाय सहाची काळकोठरीच होती ती. जेमतेम दोन माणसे पाय पसरू शकतील एवढी जागा. दार जसे बंद करून घेतले तसा पूर्ण काळोख झाला. दरवाजाच्या फटीतून काय तो तेवढा प्रकाश आत येत होता. थोडावेळ आम्ही तिथेच पाय दुमडून बसून राहिलो. पण झोपेचा अंमल जाणवू लागला होता. हळूहळू पाय पसरले आणि कसेबसे आडवे झालो. दाराला कान लावून बाहेर काय चालू आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण छे.. काहीच समजत नव्हते. बघताबघता कधी डोळा लागला समजलेच नाही.
पहाटे कधीतरी जाग आली, बर्यापैकी प्रकाश आत आला होता. पाहतो तर त्या छोट्याश्या अडगळीच्या रूमला देखील वरच्या बाजूला एक बर्यापैकी मोठी खिडकी होती, ज्यातून आम्ही आरामात बाहेर सटकू शकत होतो. अचानक सुटकेचा मार्ग दिसल्याने झोप उडून गेली. ऊडी मारून त्या खिडकीचा खालचा काठ पकडला, आणि अंग वर खेचून घेउन कसेबसे डोके बाहेर काढून काही दिसते का याचा अंदाज घेउ लागलो. पण बघता क्षणीच निराशा झाली. कारण सगळा पाणथळीचा भाग दिसत होता. आजूबाजूला बरीच चिखल की दलदल पसरली होती. म्हणजे खिडकीतून उडी टाकायचो आणि सरळ चार फ़ूट आत जाऊन रुतायचो. निराश होऊन खाली उतरलो. अपर्णा अजून तशीच झोपली होती. तिला उठवायची इच्छा नाही झाली. तसाच दाराला कान लावून बसून राहिलो. थोड्याच वेळात दार उघडले गेले. आम्हाला बाहेर काढले. काल रात्रीचा बॉस आपल्या सहकार्यांशी बोलत समोर उभा होता. इथेही संभाषण तेलगू भाषेतून, त्यामुळे यावेळी सुद्धा काही समजण्यास मार्ग नव्हता. तेवढ्यात बाजूच्या टेबलवर नजर गेली. बघतो तर एक गावठी कट्टा म्हणजेच एक पिस्तोल होते. सहज उचलले. आत गोळ्या होत्या की नाही हे माहीत नव्हते. त्यामुळे समोरच्यांवर रोखून धरू की नको हे ही समजत नव्हते. तितक्यात समोरील एकाची नजर माझ्यावर पडली. त्याने द्या ती इकडे बोलत हात पुढे केला आणि मी सुद्धा पुढे आलेल्या हातावर जसा अलगद प्रसाद ठेवतात तितक्याच सहजपणे ती त्याला सुपुर्त केली. अपर्णाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. असा काय हा मेंगळटसारखा वागला, असा भाव तिच्या चेहर्यावर होता. पण खरेच असतीही गोळी त्या बंदूकीत तरी पुढे काय, ती ताणून धरून त्या मातब्बर लोकांच्या तावडीतून फरार होने ही हिन्दी सिनेमात दाखवितात तेवढी सोपी गोष्ट नव्हती.
आम्हाला परत तेथून हलविण्याचे ठरले. पण यावेळी मात्र आमच्या दोघांच्या डोळ्याला पट्टी बांधली गेली. एव्हाना गाडीतून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी फ़िरायची आम्हाला सवय झाली होती, पण यावेळी मात्र निर्वाणीची वेळ जवळ आल्यासारखे वाटत होते. गाडी सुरू झाली. डोक्यातले सर्व विचार थांबवून आता फ़क्त देवाचे नाव घेत होतो. १०-१५ मिनिटांच्या प्रवासानंतर अपर्णाला त्रास होऊ लागला, तसे त्यांना गाडी थांबवायची विनंती केली. अपर्णाला उलटी होत होती, म्हणून थोड्यावेळासाठी गाडी थांबवून आम्हाला दोघाना मोकळे केले. आम्ही एका कच्च्या रस्त्यावर होतो, म्हणजे निदान जंगल तरी मागे सोडून आलो होतो. अपर्णाचा उलटीचा कार्यक्रम आटपला तसे परत आमचे हात आणि डोळे बांधण्यात आले. हा प्रवास शेवटचा आहे असे काहीसे स्ट्रॉंग फीलींग येत होते आतून पण नक्की सुटकेचा आहे की आमच्या शेवटाच्या दिशेने आहे हे समजत नव्हते. आणि समजत नव्हते ते त्यांची आपापसातील भाषा. सिरोंचामध्ये नक्षलवादी भागात टिकायचे असेल तर कसे वागावे याच्या शंभर सूचना ऐकून आलो होतो, पण एक मात्र मी स्वताहून समजलो होतो ते म्हणजे इथे तेलगू भाषा येणे गरजेचे होते. जीपमध्ये बसल्याबसल्या परत डोळा लागला, पण थोड्याच वेळात जीप अचानक थांबली. आम्हा दोघाना बाहेर खेचून काढण्यात आले आणि काही समजायच्या आतच धडाधड गोळ्या मारण्यात आल्या. अश्याच काहिश्या स्वप्नाने खाडकन झोप उडाली तो खरेच जीप थांबली होती. डोळे आणि हात बांधलेल्या स्थितीतच आम्हाला बाहेर काढण्यात आले. नेऊन एका बाकड्यावर बसविण्यात आले. तिथून सुद्धा आणखी कुठे उठून जाऊ नये म्हणून आमचे पाय बाकड्याच्या पायाला बांधून टाकले. तोंडात रुमालाचा बोळा कोंबला गेला. आणि मग ते तिथून निघून गेले. आता नक्की कुठच्या जंगलात कुठल्या झोपडीत आम्हाला बांधून ठेवले होते हे कळायला काही मार्ग नव्हता. त्याही अवस्थेत आम्ही दोघानी एकमेकाना ऊंह उंह करून मी अजून पर्यंत तरी सहीसलामत आहे आणि इथेच तुझ्याजवळ आहे याची जाणीव करून दिली.
जवळपास तासभर आम्ही त्या अवस्थेत होतो. एव्हाना बर्यापैकी उजाडले असावा हा अंदाज आणि जर कुठे आडवाटेला नसू तर कोणीतरी सोडवायला येईन ही आशा. आणि खरेच कोणाचीतरी चाहूल लागली. आम्हाला सोडविण्यात आले. डोळ्यावरची पट्टी काढून बघतो तर धक्काच बसला. आम्हाला बांधून ठेवली ती जागा दुसरीतिसरी कोणती नसून आमचेच बांधकाम विभागाचे ऑफिस होते. बाहेरच्या बाकड्यावरच आम्हाला बांधून ठेवण्यात आले होते. ज्यांनी आम्हाला सोडवले ती आमच्याच डिपार्टमेंटची माणसे होती. त्यांना मी माझी ओळख पटवून दिली. झालेल्या प्रकाराची कोणासमोरही वाच्यता करणे योग्य नव्हतेच, म्हणून आम्ही त्वरीत गेस्टहाऊसवर गेलो आणि सामानाची बांधाबांध सुरू केली. इथून शक्य तितक्या लवकर आलापल्लीला परतने गरजेचे होते. तिथून चन्द्रपूर आणि पुढे मुंबई. मनात फक्त परतीचे विचार चालू होते. कोणाला भेटायचे नव्हते की कोणाला काही सांगायचे नव्हते. पण अचानक अजय पोटे आठवला. त्याचे काय झाले असेल? तो अजूनही त्यांच्या तावडीत असेल का? की तो खरेच खबरी तर नसेल? काही का असेना त्याच्या सुटकेसाठी कोणालातरी जे घडले ते सांगणे गरजेचे होते. पण कोणाला? विश्वास ठेवायचा तरी कोणावर? शेवटी जमलेच तर त्याला मदत होईल असे काही करायचे पण उगाच आता स्वताचा आणि अपर्णाचा जीव आणखी धोक्यात घालायचा नाही या निष्कर्शाप्रत आलो.
घड्याळात वेळ चेक केली, आतासे सकाळचे साडेआठ वाजले होते. पटापट सामानाची आवराआवर करून नऊ पर्यंत बसस्टॅण्ड गाठले. तिथून आलापल्लीला जाणारी बस पकडणार होतो पण एक प्रायवेट गाडीवाला थेट चंद्रपूरला सोडायला तयार झाला, अर्थात जादा पैसे घेऊनच.. पण पैश्याचे मोल होते कोणाला त्यावेळी. सिरोंचा ते चंद्रपूर सुमारे ५ तासांचा प्रवास होता. मध्ये एका ठिकाणी चहापानासाठी गाडी थांबविली तसे पाटीलसाहेबाना (Asst. Eng. Alapalli) फोन लावला आणि जे जे घडले ते सारे कथन केले. त्यांच्याकडून जे समजले ते खरेच धक्कादायक होते. त्यांचे नक्षलवाद्यांशी काय धागेदोरे होते की नाही ते त्यानाच ठाऊक पण हे असे काही घडणार याची त्यांना आधीच कल्पना होती. नवीन जॉईन झालेल्यांपैकी एक जन आपली खबर काढण्यासाठी आला आहे अशी बातमी नक्षलवाद्यांना लागली होती आणि त्याला ते संपवणार हे पाटील साहेबांना माहीत होते. बाकी तो कोण होता हे खुद्द पाटील साहेबांनासुद्धा माहीत नसल्याने त्यानी मला कोणतीही आगाऊ सूचना देउन सावध केले नव्हते, अर्थात याबद्दल आता ते माझी माफी मागत होते. त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. अजय पोटेचे काय झाले असेल हे पण मनातून काढून टाकले. त्याचे भविष्य तो स्वताच घेऊन आला होता. परत गाडीत येऊन बसलो. मनात आता कोणताही अनुत्तरीत प्रश्न उरला नव्हता. खर्या अर्थाने मला परतीचे वेध लागले होते.
अपर्णाने काय झाले असे नजरेनेच विचारले. उत्तरादाखल फक्त हसलो आणि तिला अलगद थोपटले. परतीचा प्रवास सुरू झाला होता. बरोबर साथीला होता तो एक कधीही विसरला जाणार नाही असा अनुभव आणि कधीही गमवायचा नाही असा एक जोडीदार, अपर्णाच्या रूपात...
-x- समाप्त -x-
--------------------------------------------------------------------------------------------
कथेतील सर्व पात्र, घटना काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी सार्धम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
.
.
.
...Tumcha ABHISHEK
थरारक आहे खरा अनुभव. थोड्या
थरारक आहे खरा अनुभव.
थोड्या लेखनाच्या चुका आहेत त्या सहज सुधारता येतील.
अभिषेक, एकच नंबर ,
अभिषेक, एकच नंबर ,
मस्तच! सहीये कथा! काल्पनिक
मस्तच! सहीये कथा! काल्पनिक अजिबात वाटत नाही.
अभिषेक.. स्पीचलेस!!!!
अभिषेक.. स्पीचलेस!!!!
दिनेशदा - प्रतिक्रियेबद्दल
दिनेशदा - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद - एखाद्याच्या पहिल्या लिखाणात असतील, असाव्यातच अश्या चुका नक्कीच आहेत, आणि आपण म्हणाल्याप्रमाणे त्या सहज सुधारण्यासारख्याही आहेत, जे मला आज शक्यही आहे. पण तरी मला जे लिहिले आहे ते तसेच ठेवावेसे वाटले. आळस म्हणून नाही तर माझे पहिले लिखाण तसेच जपण्यासाठी म्हणून काही पैलू कच्चेच राहू दिलेत.
थरारक अनुभव दिलास.. मस्त
थरारक अनुभव दिलास.. मस्त कथा..
एक महिन्याच्या आत जमा व्हायचे
एक महिन्याच्या आत जमा व्हायचे होते.>>>>
एक महिन्याच्या आत रुजू व्हायचे होते.
कथा खूप छान. आवडली.
छान लिहलय, अगदि खिळवून
छान लिहलय, अगदि खिळवून ठेवणारी कथा!
आवडेश!!!
आवडेश!!!
छान आणि वेगळ्या वातावरणातली.
छान आणि वेगळ्या वातावरणातली. खरंच थरारक वाटली.
थरारक अनुभव दिलास..
थरारक अनुभव दिलास.. मस्त>>सत्य कथा आहे का?
@ प्रितीभुषण हा हा... नाही
@ प्रितीभुषण
हा हा... नाही हो.. अश्या सत्यकथा स्वताशी घडतील एवढे भाग्य कुठे आपले. पण कथेचा पुर्वार्ध खरा अनुभव आहे.. मनात थोडी धाकधूक होती हे ही खरेच.. सुदैवाने खूप चांगली माणसे मिळाली त्या दिवसात म्हणून भिती निवळत गेली.. पण आधी मात्र नक्षलवाद आणि नक्षलवादी विभागाची भिती मनात असताना असे काहीसे आपल्याशी घडणार असे वाटायचे.. त्याच कल्पनेतून हे उतरले.
जबरदस्त कथानक.
जबरदस्त कथानक.
पण कथेचा पुर्वार्ध खरा अनुभव
पण कथेचा पुर्वार्ध खरा अनुभव आहे.. मनात थोडी धाकधूक होती हे ही खरेच.. सुदैवाने खूप चांगली माणसे मिळाली त्या दिवसात म्हणून भिती निवळत गेली.. >> मग अजुनही गडचिरोली सारख्या नाना लोकांच्याच विभागात आहात का?
मस्तच! सहीये कथा! काल्पनिक
मस्तच! सहीये कथा! काल्पनिक अजिबात वाटत नाही.>>>>+++
छान लिहलय, अगदि खिळवून ठेवणारी कथा!>>>>++++
घटना काल्पनीक आहेत, >>> पण
घटना काल्पनीक आहेत, >>> पण अगदी सत्य असल्यासारख्या लिहिल्या आहेत.
होप हि कथाच आहे.
डिस्क्लेमर वाचेपर्यंत ही एक
डिस्क्लेमर वाचेपर्यंत ही एक सत्यकथाच वाटत होती. तुम्ही हे सर्व अनुभवले आहे असेच वाटत होते.
अभिषेक, लिहत
अभिषेक,
लिहत रहा.
शुभेच्छा!!!
चांगली आहे कथा! पुलेशु
चांगली आहे कथा!
पुलेशु
कथेतील सर्व पात्र, घटना
कथेतील सर्व पात्र, घटना काल्पनीक आहेत, त्याचा कुठल्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी सार्धम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
ह्या वाक्याने ह्या कथेतुन बाहेर काढले.
आवडेश.
@ मी_चिऊ यातील पहिले वर्णन
@ मी_चिऊ
यातील पहिले वर्णन माझ्या जॉईनिंगच्या वेळचे आहे, तेव्हा जमणार नाही आपल्याला ही नोकरी असे समजून परत आलेलो, तरी मग महिन्याभराने पुन्हा विचार बदलला आणि गडचिरोली सिटी मेन ऑफिसला पोस्टींग दिली तर जॉईन होतो म्हणून अर्ज केला आणि त्यानुसार पाच-सहा महिने केले तिथे काम.. नक्कीच त्या जिल्ह्यातील काही भाग संवेदनशील असतील पण तेवढे वगळता काही घाबरण्यासारखे असे नसते हा अनुभव या पाच-सहा महिन्यात घेतला. नंतर खाजगी कंपनीतून एक चांगली ऑफर आल्याने निघालो मग तिथून..
चांगला प्रयत्न आहे.
चांगला प्रयत्न आहे.
भयानक नक्षलवाद हा सगळ्यात
भयानक
नक्षलवाद हा सगळ्यात मोठा धोका आहे देशाला हे खरंच. अस्तनीतले निखारे.
मेरिट मध्ये सुद्धा सर्वप्रथम
मेरिट मध्ये सुद्धा सर्वप्रथम असुनही गडचिरोली पोस्टिंग??
@ सुयोग.. खरे आहे हे..
@ सुयोग.. खरे आहे हे.. मेरीटचा मुळात पोस्टींगशी काही संबंध नसतो. माझ्या मेडीकल चेकअप आणि पोलिस इन्कवायरीचा रीपोर्ट लेट आला म्हणून नंतरच्या स्लॉटमध्ये माझे आणि त्यामधील सर्वांचे म्हणजे ७ जणांचे पोस्टींग चंद्रपूर, गडचिरोली भागातच झाले.
आधी सेवाग्रामचा अनुभव खरा
आधी सेवाग्रामचा अनुभव खरा होता म्हणुन म्हटल विचारु हे पण सत्य आहे का
थरारक अनुभव. छान झालीये कथा.
थरारक अनुभव. छान झालीये कथा.
>>थरारक अनुभव. छान झालीये
>>थरारक अनुभव. छान झालीये कथा.<< +१
गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात १६ जवान शहीद
मस्त आवडली
मस्त आवडली
लेखनशैली चांगली आहे. तुम्ही
लेखनशैली चांगली आहे. तुम्ही अजून लिहा...... त्यानेच आणखी छान लिहिता येईल....
डिस्क्लेमर शेवटी टाकलात हे चांगलेच केलेत........
Pages