संभाने विडीचा शेवटचा कश मारला आणि उद्विग्न मन:स्थितीत विडी चुरगाळून फेकून दिली. काय करावे त्याला अगदी सुचेनासे झाले. आकाशात ढग दाटून आले होते. मुसळधार पावसाची चिन्हे दिसत होती. प्रारब्धाने त्याला एका विचित्र वळणावर आणून उभे केले होते. दवाखान्यात त्याची माई मृत्युशय्येवर असहाय्य अवस्थेत पडून होती. त्याला आपल्या पोटच्या पोरासारखी माया लावणारी माई! आपण काहीच करू शकत नाही तिच्यासाठी, पण तिच्या पोरासाठी कहितरी करू शकतो ना? मग आपली अशी द्विधा मन:स्थिती का व्हावी? संभाने अजून एक विडी शिलगावली. विडीच्या धुराकडे तो बराच वेळ पहात राहिला.
माई त्याची मोठी वहिनी. दादाचे लग्न झाले आणि दोन वर्षातच त्याची आई गेली. तो सगळ्यात छोटा मुलगा होता. त्याला तसे तीन भाऊ आणि एक बहीण होती. पण मृत्यू त्यांच्या घराला पाचवीला पुजलेला होता. कोणी जास्त जगले नाहीत. तो आणि दादाच वाचले. तो दोन वर्षाचा असताना पित्याचे छत्र हरवले. त्याला बापाचा चेहेराही नीट आठवत नव्हता. सहाव्या वर्षी आई गेली. माई आणि दादाच्या लग्नाला उणीपुरी दोन वर्षंही झाली नसतील त्यावेळी.
संभाला जुने दिवस आठवले. किती माया होती माईची त्याच्यावर! "आईविना पोरकं पोर" म्हणून प्रेमाने जवळ घ्यायची ती त्याला. दादाची कामाई ती कितीशी? पण त्यातही कटकट न करता गुण्यागोविंदाने नांदत होते ते. वेळप्रसंगी स्वत:च्या पानातली अर्धी भाकर त्याच्या पानात टाकत असे. "वाढतं वयं हाये तुझं" असं सांगून स्वत: अर्धपोटी रहायची. चार घरची धुणीभांडी करायची आणि त्याच्या शाळेची फी भरायची. नवीन कपडे, चपला, दप्तरे, वह्या, पुस्तके कशालाही कमी पडू नये म्हणून राब राब राबायची. दादा आणि माई सर्वस्व होते त्याचे! परीक्षेला जाण्यापूर्वी देवाच्या आधी तो माईच्या पाया पडत असे. माई चिडायची त्याच्यावर. "देवाच्या पाया पड आगुदर! त्याबिगर आशिर्वाद देनार न्हायी!" वेडी होती ती. ज्यांच्यापाशी देव नसतात, ते तसबीरीच्या पाया पडतात. इथे साक्षात लक्ष्मी त्याच्यासमोर उभी होती. मग तसबिरीच्या पाया का पडावे? दादाचा सहवास त्याला जास्त लाभलाच नाही. सतत रिक्षावर असे तो. अहोरात्र मेहनत करून चार पैसे घरी आणायचा. दादाने तिला नवी साडी आणली होती कधी? लोकानी दिलेल्या फाटक्या तुटक्या विरलेल्या साड्या असत तिच्या आंगावर. एखाद्या घरच्या बाळंतीणीला न्हाऊमाखू तेल मालिश करायचे काम मिळाले तर एखादी नवी साडी पदरात पडत असे. संभा दहावी नंतर आय. टी. आय. झाला आणि त्याला एका कंपनीत वायरमनची नोकरी मिळाली. माईला स्वर्ग ठेंगणा झाला होता त्या वेळी. सबंध वस्तीत धावत धावत जाऊन पेढे वाटले होते तिने. पहिल्या पगारात त्याने माईला नऊवारी पातळ आणून दिले होते. कितीतरीवेळ त्या पातळाकडे डोळे भरून पहात बसली होती ती. नवेकोरे पातळ तिच्या आश्रूनी भिजून गेले होते.
संभाच्या बोटाला विडीचा चटका बसल्यावर तो भानावर आला. आभाळ कुंद झाले होते. दिवसा ढवळ्या अंधारून आले होते. वार्याला वेग सापडला होता. पालापाचोळा वार्याबरोबर फेर धरून नाचत होता. त्याला दवाखान्यात जाण्याचा धीर होत नव्हता. गेले काही दिवस माईची तब्येत खूप खालावली होती. त्यात तो जीवघेणा ताप! आज सकाळपर्यंत माई बरी होईल अशी त्याला आशा होती. पण डॉक्टरानी "ताप मेंदूपर्यंत गेला आहे. जगण्याची शक्यता नाही" असे अगदी निर्दयपणे सांगून टाकले. त्याच्या घाराण्याच्या ह्या जुन्या मित्राने अजून एक हल्ला केला होता. त्याने असे हल्ले ह्याआधी पाहिले होते. संत्याच्या, त्याच्या पुतण्याच्या जन्मानंतर दादाचा आणि दादामाईच्या मोठ्या मुलीचा रिक्षाच्या अपघातात झालेला मृत्यू त्यांचे घर हदरवून गेला. "शापित घराणे आहे! इतक्या उशिरा मूल जन्माला आले पण शापातून घराणे वाचते थोडेच! मुलाच्या जन्माबरोबर बापाचे आणि मोठ्या बहिणीचे दिवस भरलेच म्हणून समजा." लोक आपापसात कुजबुजत. माईने लेकाकडे पाहून आश्रू आवरले आणि डोळे पुसले. खंबीरपणे पुन्हा उभी राहिली. संतूला इंजीनियर करणार म्हणत असे ती.
"संत्याचं काय होणार?" भावानांचा आवेग संपल्यावर संभाच्या मनात परत विचारांचे काहूर माजले. संभाचे मन परत एकदा भरून आले. पोरकेपणाचे दु:ख त्याच्याही वाटेला आले होते. पण माईने त्याच्या डोक्यावर मायेची सावली धरून त्याला आईची उणीव कधी जाणवू दिली नाही. "विठा सांभाळेल का संत्याला?" विठा संभाची बायको. त्याना जाई नावाची छोटी मुलगी सुद्धा होती. "संत्याची माया आहे जाई वर! पण विठा? तिचेही संत्याशी भांडण नाही खरे!" रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तापलेल्या जमिनीवर पाणी पडून जमिनीतून वाफा येत आहेत असे वाटू लागले होते. "विठा समजून घेईल का चिडेल माझ्यावर? तिच्याशी चर्चा न करता आपण निर्णय घ्यावा का? तिच्याशी बोलावं एकदा". विठा स्वाभावाने थोडीशी महत्त्वाकांक्षी होती. ती एका शॉपिंग मॉल मध्ये काम करत होती. तिचे अघळपघळ वागणे, डोक्यावर पदर न घेता चालणे, पुरुषांसारखे कपडे घालणे माईला आवडत नसे. बाईने बाईच्या मर्यादेने वागावे असे माईला वाटे. हे असले कपडे घालायला लागणार असतील तर ही नोकरी काय कामाची? आणि तिला नोकरीची काय गरज? संभा कमावत होता की! विठा आणि माईचे ह्यावरून रोज खटके उडत. भांडाभांडी होत असे. विठाला मात्र पैसे जोडायचे होते. घर घ्यायचे होते. जाईला इंग्लिश शाळेत घालायचे होते. ह्याच कारणास्तव त्यानी अजून एक मूल होऊ दिले नव्हते. आत्ता कुठे नव्या नोकरीत संभाला बरा पगार मिळू लागला होता. अजून एक मूल होऊ द्यायला हरकत नाही असा विचार त्यानी केला होता. त्यानंतर मात्र माईने त्यांच्याशी बोलणेच सोडले होते. "आपले घराने शापित हाये! जनमनारे पोर बापाभयनीच्या जिवावर उठतं! काशाला इशाची परीक्षा बघाया निघालासा?" ती कळवळून म्हणाली. "माझा काय ह्यावर इश्वास न्ह्यायी." विठा आपल्या मुद्याला अडून होती. माईने पहिल्यांदा प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. पण विठा ऐकत नाही हे पहून अकांततांडव केला. नाही नाही ते बोलली विठाला. आपल्या पोरीच्या आणि नवर्याच्या जिवाशी खेळू पहाते असा आरोप केला. विठाही चिडली. भांड्याला भांडे लागले. संभाने मध्यस्थी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ! आपले माईंशी पटणार नाही. दोघी एकाच घरात राहू शकत नाही. आपण वेगळे घर शोधु असा विठाने हट्ट धरला होता. आपल्याला वेगळे रहाणे शक्य नाही. माईना आपण सोडू शकत नाही. तुला तिच्याशी जमवून घ्यावे लागेल असे संभाने स्पष्ट केल्यावर मात्र विठा अजूनच आक्रमक झाली होती. माई आणि विठा ह्यांचा असह्य अबोला चाले घरात. संभाला जीवन नकोसे होऊ लागले होते. अशातच माईची तब्येत अशी अचानक बिघडू लागली होती. गेले काही दिवस त्यानी थोडेसे दुर्लक्ष केले होते. तापच आहे! होईल ३/४ दिवसात बरा! आठवडा झाला पण ताप कमी होण्याचे नाव घेत नव्हता. घरगुती उपाय झाले, औषधे आणून झाली, पण कशाचाही उपाय चालेना. माई दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. शेवटी त्याने तिला दवाखान्यात दाखल करून घेतले. शंभर टेस्ट झाल्या. आज सकाळी डॉक्टरानी त्याला आणि विठाला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले आणि ही भयंकर खबर दिली.
डॉक्टरांच्या भेटीनंतर शेजारी बसलेल्या विठाकडे भरल्या डोळ्यानी पाहून तो वेड्यासारखा उठला होता आणि दवाखान्याच्या बाहेर येउन कितीतरी वेळ बसून राहिला होता. विठा त्याला आत बोलवायला आली होती. बोलते करायचा प्रयत्न करत होती, पण लाल डोळ्यानी भेसूर मुद्रा करून तो बाहेरच बसून राहिला. विठा समजूत घालून थकली आणि आत निघून गेली, आज त्याची समजूत कोणीही घालू शकणार नव्हते. देवाने क्रूर खेळ खेळला होता त्याच्याशी. माई रोज दिवा लावायची देवासमोर. तो करतो ते भल्याकरताच असे म्हणायची. हेच चांगले घडायचे होते ना! आयुष्यभर वेड्यासारखे राबत राहिली ती. मग आज तिला चांगले दिवस दिसू नयेत? हा कसला न्याय? रोज अर्धपोटी झोपणार्या त्या माऊलीला भरल्या पोटी समाधानाची झोप मिळू नये? त्याची आई गेली त्यावेळी त्याला नीट कळत नव्हते. पण आज तो खर्या अर्थाने पोरका होणार होता. त्याचे मन सतत आक्रोश करत होते. रडून रडून त्याच्या डोळ्यातील आश्रू संपून गेले, पण हृदय अजून आक्रंदत होते. उद्या घरात माई नसणार ही कल्पना त्याला सहन होईना. घर धुंडाळले, कितीही आर्त स्वरात हाका मारल्या तरिही त्याची माई त्याला परत भेटणार नव्हती. भाकरी करून वाढणार नव्हती. "माझा गुनाचा पोर!" म्हणून दृष्ट काढणार नव्हती. "आमच्या संभाला जेवडा पगार मिळतुया, तेवडा घरान्याच्या सात जल्मानी पायला न्हवता!" अशी बढाई मारणार नव्हती. घराला घरपण देणारी त्याची माई भरल्या घरातून क्षणात उडून चालली होती. क्षणभर हे सगळे स्वप्नच आहे असे वाटू लागले त्याला. अंथरुणावरून हसत हसत उठेल आणि म्हणेल "कसं फशिवलं तुला! लई मज्जा केली तुजी" त्याच्या डोळ्यातून आश्रूंचा झरा वाहू लागला. लहानपणी तो पडला, रडला तर त्याचे डोळे माई तिच्या पदराने पुसत असे. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असे. किती बरे वाटायचे? देवाने तिच्या पदरात मायेचा घडा पालथा केला असावा. तिचा पदर चेहेर्यावरून फिरला की सगळे दु:ख विसरायला होत असे, मन शांत होत असे. आज त्याला त्या पदराच्या स्पर्शाची नितांत आवश्यकता होती. पण त्याला माया लावणारा तो पदर एका वादळात उडून चालला होता. संभाला शक्य असते तर त्याच्या अंगातले सगळे बळ एकवटून तो त्या वादळाशी लढला असता. पण तो असहाय्य होता. नियतीपुढे हताश होता.
कोणीतरी हाक मारली आणि संभा भानावर आला. माईला शुद्ध आली होती. त्याला आत बोलावले होते. त्याची पाऊले दवाखान्याकडे वळली तोच मुसळधार पाऊस सुरू झाला. ढग कानठळ्या बसणाऱ्या आवाजात गडगडत होते. विजेच्या लखलखाटात त्याची वाट मध्येच लखकन उजळून निघत होती. दवाखान्याच्या पायरीपाशी संभा थबकला. "नपुंसक आहेस तू!" त्याच्या मनाने त्याच्या असहाय्यतेवर हला चढवला. "पोटच्या पोरापेक्षा जास्त माया करणार्या माईला मरतानासुद्धा सुख देऊ शकत नाहीस. जन्मभर काबाडकष्ट करून पोट भरले तिने तुझे! आणि तू स्वत:च्या सुखापाई तिच्या पोराला तिच्या पश्चात वार्यावर सोडायला निघालास? कुठे फेडशील हे पाप?" आकाशात विजेचा लखलखाट झाला. त्या प्रकाशात आसपासचा परिसर, पायर्या, दवाखाना उजळून निघाले. त्याच्या मनाने निर्धार केला. "संत्याला इंजिनियर करायचे आपण! माईच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज आहे आपल्यावर. त्याची परतफेड करायची. काय होईल? फार तर फार विठा चिडेल काही दिवस. थोडीशी चिडखोर असली तरीही मनाने चांगली आहे ती. आणि आपल्या भावना आपली पत्नी समजून घेणार नाहीतर कोण? घर नाही होणार कदाचित. पण चालेल. संत्या तरी कुठे जाणार? त्याच्या मामाकडे? छे!! दारूडा आहे पक्का. आपल्या बायको पोराना बदडून काढतो तो हैवान. त्याच्या घशात संत्याला घालायचे? शक्य नाही." संभाच्या पावलाना गती आली. नव्या चैतन्याने तो माईच्या खाटेकडे निघाला.
माईच्या खाटेपाशी आल्यावर तो थबकला. माईचा थकलेला देह त्याच्याने पहावेना. वाळून काडी झाली होती ती. गाल सुकून खपाटी गेले होते. गालाची हाडे पार वर आली होती. डोळे खोल गेले होते. त्यांच्याभोवती काळी वर्तुळे जमा झाली होती. पांढर्याशुभ्र चादरीवर तिचा गलितगात्र देह मृत्यूची वाट पहात उदासपणे पडून होता. शेजारी विठा डोळ्याला पदर लावून बसली होती. जाईला त्यानी मावशीकडे सोडले होते, पण संत्या तिथेच होता. आपल्या आईला काय होतय हे समजू न शकणारं ते कोवळं पोर कोपर्यात भेदरून उभं होतं. संभाची चाहूल लागल्यावर माईने डोळे किलकिले केले. किती निष्प्राण वाटत होते तिचे डोळे! "म्या काई वाचत न्हायी." तिने क्षीणपणे उद्गार काढले. "माई! असं बोलू नकोस. मी डॉक्टरांशी बोललो अत्ता. ते म्हणाले की...."
"उगाच लबाड सांगू नगंस! तुला लई ल्हानपनापासून वळखते म्या. चेरा बगिटलास का तुजा? समदं आरशावानी लख्ख हाये. संभा! माजं ऐक पोरा! संतूची जबाबदारी तुज्यावर न्हायी! मामाकडं जाईल त्यो! तुमी दोगं राजारानी वानी संसार करा! माजे आशिरवाद हायेत तुमच्यासंगट! संतू मामाकडं जाशील ना! निट रायाचं. मामीला टिरास देयाचा न्हायी! काय काम पडेल ते कर रे रा......" तिला पुढचे शब्द बोलवले गेले नाहीत. तिने संत्याला खूणेनेच जवळ बोलावले. क्षीण हातानी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. दोन्ही हातानी त्याचा चेहेरा जवळ घेऊन त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले.
संभाच्या भावनांचा कडेलोट झाला होता. त्याला बरेच काही बोलायचे होते. संत्याला आपण इंजिनियर करू असे वचन माईला द्यायचे होते. तिने आजवार त्याच्यासाठी केलेल्या अपार कष्टांचे आभार मानायचे होते. जन्मदात्या आईनेही पोरासाठी केले नसते तेवढे तू केलेस गं! असे सांगायचे होते. मी तुला सूख नाही देऊ शकलो. तू माझी आई बनलीस, पण मी चांगल मुलगा होऊन तुला सुखी नाही ठेवू शकलो अशी माफी मागायची होती. तिच्या पदरात चेहेरा लपवून परत लहान बनायचे होते, मनसोक्त रडायचे होते. त्याने बोलायचा प्रयत्न केला पण शब्द त्याच्या गळ्यातून बाहेर पडत नव्हते. डोळ्यातले आश्रू आणि गळ्यातला अवंढा कष्टाने रोकून तो अवघडून उभा राहिला.
बाजूला बसलेली विठा हे ऐकून ताडकन उभी राहिली. "बस्स काय वईनी! हीच पारख केली आमची! आमचं तुमचं भांडण झालं म्हनून तुमच्या पोराला वार्यावर सोडू व्हय आम्ही? का आमच्यावरचा राग पोरावर काढायला निघाला?" गप्प बसलेल्या संभाला पाहून तिचा राग अनावर झाला. "तुमी बी कसे वो? पोरावानी माया करनार्या बाईचे उपकार असे फेडाया निगाला! गप्प बसला गुरावानी! बिचार्या पोराला कंसमामाच्या घशामंदी घालाया निगाला? दया माया बाजारला इकली व्हय?" भांभावलेल्या संत्याला तिने आभाळाच्या मायेने पोटाशी धरले. "संतू आमच्याकडं राहील! आमी खाऊ त्यातून चार घास खाईल त्यो! शिकवू त्याला! मोट्टा विंजिणियर होईल. आमच्यासाठी घर घेईल. घेनार ना!"
माईने डोळे मिटून घेतले होते. तिच्या डोळ्यातून पानी घळाघळा वाहत होते. थरथरत्या हातानी तिने विठाचा हात घट्ट पकडून धरला. बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. ताजातवाना सूर्य ढगाआडून डोकावत होता. सायंकाळचे किरण खिडकीच्या झरोक्यातून उडी मारून अलगद आत आले. धूसर झालेल्या डोळ्यानी संभा आपल्या पत्नीच्या ह्या रूपाकडे विस्मयचकित होऊन पहात राहिला. राहून राहून त्याचे डोळे भरून येत होते आणि त्या डोळ्यात सूर्यकिरणात न्हायलेली विठाची सोन्यासारखी उजळलेली मूर्ती तो मन भरून साठवून ठेवत होता.
सांभाळ
Submitted by येडाकाखुळा on 22 May, 2008 - 02:51
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच... छान
मस्तच... छान लिहिले आहे.
मस्त रे..
मस्त रे..
आणखी एक
आणखी एक सुन्दर कथा.
छान लिहिलि आहे.
पुढिल कथेसाठि शुभेच्छा.
सुरेख
सुरेख वर्णनशैली!
अप्रतिम... 'द
अप्रतिम...
'दाद'च्या लिखाणाशी तुमची लेखणी स्पर्धा करतिये. आणि आम्हा वाचकांची काहीच तक्रार नाहिये..
मित्रहो
मित्रहो प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आफताब,
नाही मित्रा! दादच्या लेखणीशी स्पर्धा करण्याची ताकद माझ्या लेखणीत नाही. हे म्हणजे व्यंकटपती राजूच्या बॅटने सचिन तेंडुलकरच्या बॅटशी स्पर्धा करण्यासारखे आहे.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!! आफताबला अनुमोदन. दाद आणि तुमची कथा असली की वाचल्याशिवाय राहवत नाही आणि वाचुन झाल्यावर वेळेचे सार्थक होते. असेच लिहित राहा.
-प्रिन्सेस...
येडाकाखुळ
येडाकाखुळा, रडवलंत!! खुप छान कथा. अगदी चित्र उभे राहीले डोळ्यासमोर शेवट्च्या प्रसंगी त्या विठाचे, माईचे आणि संभाचे. भरुन आलं!!
विनोदाच्य
विनोदाच्या भट्टीनंतर कथेचीपण तेवढीच छान जमली की ! पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
नेहमीप्रम
नेहमीप्रमाणेच सुरेख.....
खरच
खरच डोळ्यात पाणी आलं. जेवताना वाचायला नको होती. घासच जाईना.
खूपच छान.
खूपच छान. पकड जबरदस्त आहे कथेची.
आवडली!
आई..ग. फारच
आई..ग. फारच सुरेख! डोळ्यात पाणी आलं.. खूप छान रंगवली आहे कथा.. प्लीज लिहीत रहा!
खुप खुप
खुप खुप सुरेख लिहलत्...एकसंध आणि जबरदस्त लिखाण आहे..असच लिहित रहा..
येडे... अगदी
येडे... अगदी अगदी आवडली कथा. काय नाहीये? सशक्त कथाबीज आहे, फ्लो आहे, आवश्यक तव्हढ्या घटना, संवाद आहेत, पात्रांचा सहभाग अन त्यांचं व्यक्तिमत्वं फुलण... अगदी हवं तितकच, कथेला कलाटणी आहे आणि मला अगदी आवडतो तसा पॉझिटीव्ह शेवटही आहे....
अगदी परखडपणे बोलायचच तर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल बोलता येईल मला :).... अहो, येडे का खुळे तुमी? तुमच्यासारखं लिहिता यायला, मला नवस बोलायचाय
असो... सुंदर लिहिता हो... अगदी 'येडाकाखुळा' सारखं... त्या 'दाद'सारखं नाही! शिकायला मिळतय मला... तेव्हा असंच लिहीत रहा!
छान जमलीय.
छान जमलीय. बराच विचार करून लिहिलीय, ते जाणवतेच. सगळी कथा सलग लिहिण्याचा हा नवा पायंडा, असाच चालू रहायला हवा.
खूपच छान.
खूपच छान. डोळ्यात खूप पाणी आलं.पुढच्या कथेची वाट पाहातोय.
रडवलंत!!
रडवलंत!! डोळ्यात खूप पाणी आलं. अगदी चित्र उभे राहीले डोळ्यासमोर शेवट्च्या प्रसंगी त्या विठाचे, माईचे आणि संभाचे. खुप छान कथा. भरुन आलं!!
ये.का.खु.
ये.का.खु. नेहमीप्रमाणे मस्त......
बापरे!
बापरे! खुपच छान लिहले आहे. चक्क ऑफिसमध्ये पण डोळे पाणावले.
लय बेस
लय बेस लिवलसा!! आक्शी डोळ्यातून पाणी काढायला लावलसा बगा!!
खुप सुरेख
खुप सुरेख लिहिल आहे.
मस्त जमली
मस्त जमली आहे कथा, आवडली.
ZZZzzzzakkkaaasachhhhhhhhhhhh
ZZZzzzzakkkaaasachhhhhhhhhhhh...............
खूप छान
खूप छान कथा...
सर्व मसाला परफेक्ट.. विनोदी तर तुम्ही छान लिहिताच.
पण कथेचा फ्लो आणी शब्दरचना एकदम जबरदस्त.
अहो
अहो खुळे.......... छान लिहिता हो तुम्ही....... आता येडं कसं म्हणायचं तुम्हाला
खरंच मनापासून आवडलं तुमचं लिखाण !
<<अर्ध्या
<<अर्ध्या भाकरीचं कर्ज>>
खूप आवडली कथा.
..प्रज्ञा
छान जमली
छान जमली आहे कथा.
पुढील लिखाणास शुभेच्छा.
फारच सुरेख
फारच सुरेख लिलिले आहे..दोल्यत पनि आले..आसच लिहित जा...सुभेच्या
कथा खूप
कथा खूप आवडली. डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाहीच वाचता आली. अशी सोन्यासारखी माणसं असल्यावर माई सुखाने प्राण सोडणार.
Pages