९०च्या त्या दशकात, लहानाचे मोठे होणं ही फार भाग्यवान गोष्ट होती! ह्याचे कारण ....ज्या लोकांनी त्या काळात बालपण घालवले त्यांना आठवेल...सायकल हे आपलं वाहन होतं, दुचाकी आस-पास विपुल असत..... घरी 'लॅंडलाइन' असणं गर्वाने सांगितले जायचे, आणि मित्रांना त्यावर घरी फोन करणे नित्याचे असत......मोबाइल हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात आणि त्यांनी 'पेजर' ची जागा अजुन घेतली नव्हती! खूप कमी मित्रांच्या घरी 'केबल' असत! शाळेत, मुलीशी बोलणं, ह्याचा अर्थ काहीतरी 'सुरू' आहे असा घेतला जात, व 'शिक्षा मिळणे' ही गोष्ट 'शरमेने' मान्य केली जायची! 'इंग्रजी' माध्यमाची मुलं सुद्धा 'मॅडम'....त्या कितीही मोठ्या असल्या तरी त्यांना 'मिस' असच म्हणून, उगीच त्यांना तरुण असल्याचे भास होऊ देत! ( असे असल्यावर 'मॅडम' तरी मुलांच्या चुका कशाला सुधारतील? )
मी 'आठवीत' असताना , 'केबीसी' ने इतिहास घडवला होता...रात्री ९ वाजता सर्व रस्ते रिकामे दिसत! तर ह्याची 'लहान मुलांची आवृत्ती' माझ्या बालपणी घडली! 'जंगल बुक' च्या निमित्ताने! होय! तो दिवस असायचा रविवारचा, आणि ती वेळ असायची सकाळी १० ची! एक पिवळी 'अंडर-पॅंट' नेसलेला हा 'मोगली' नावाचा मुलगा आमचा सर्वांचा लाडका झाला होता. ही आमच्या रविवार सकाळची अगदी आनंदाची सुरूवात असे! मोगली चे पराक्रम आमच्यासाठी फार आनंद देणारे ठरत! आत्ता विश्वास बसत नाही....पण...त्या सकाळी १० वाजता, कुणीही पोर बाहेर खेळताना दिसत नसे! एक-दोन वर्षानंतर, ह्याच मोगली ची जागा 'मिकी माऊस' व 'डोनाल्ड डक' ने घेतली! अर्थात 'डिसनी अवर' ने! हा 'आवर' 'आवरणे' खरच कठीण जात! ह्यात 'प्लूटो' ह्या कुत्र्याला, बरेच प्रयत्न करून काहीही मिळत नसे, तर 'गुफी' ह्याच्या आवाजावर आम्ही निदायत 'फिदा' होत असु! दुसरीकडे, 'अंकल स्क्रूज' आणि त्याचे 'पुतणे' खजीना शोधत बसत, तर 'डोनाल्ड डक' नेहमीच बदडला जाई! मिकी आणि मिनी ह्यांची प्रेम कहाणी त्या वयात सुद्धा आमच्या मनात एक विचित्र भावना निर्माण करून जायची! पुढे तर ह्या डिसनी ची जागा 'सबकुछ कार्टून' अश्या 'कार्टून नेटवर्क' ने घेतली. पण हा प्रकार घरी यायला घरी 'केबल' असणे जरूरीचे होते....आणि लहान वयात आम्हाला त्याची परवानगी नव्हती! म्हणून 'दूरदर्शन' मध्ये आम्ही समाधान मानले! पण ह्या चिमुकल्या वयात ह्या 'दूरदर्शन' ने बर्याच गोष्टी 'जवळून' दाखवल्या आणि ह्या 'दोन वाहिन्यांशी' आमची चांगलीच गट्टी जमली होती!
थोड्या काही वर्षांनी ह्याच रविवार सकाळी ११.३० वाजता 'महाभारत' सुरू होत असे! आणि ह्या मालिकेने घरातील सर्वांसाठी एक तास एकत्र बसणे जणू योजलेच होते! काय मज्जा यायची! त्यातले 'तत्व' काय, हा विचार करण्याचे ते वय नव्हते, पण ह्या 'कथे' बद्दल नक्कीच काहीतरी 'वेगळ' असा वाटायच! मला, 'भीम' ह्या व्यक्ती बद्दल विशेष आकर्षण होते.....आणि असं पण, मुलांचा कल हा 'शक्ति'कडे असतोच!
पण सर्वात नवल मला ज्या एका गोष्टीचं वाटतं, ती म्हणजे, आमचे मनोरंजन हे 'दोन वाहिन्या', एवढेच होते! पण तरीही आम्ही त्याची मज्जा पूर्णपणे लुटली! ह्याचे कारण असे असेल, की त्या वेळेच्या मालिका, ह्यात बर्याच गोष्टी अश्या होत्या, ज्या आमच्या वयाला पूरक होत्या! आमच्या भावनांना पूरक होत्या! 'राजेशाही' ची ओळख पटवून द्यायला ' ग्रेट मराठा' आणि 'टिपु सुलतान' होते, 'दैवी' गोष्टींची झलक दाखवायला, 'महाभारत' आणि 'जय हनुमान' होते! मला खास आठवतोय, 'द ग्रेट मराठा' मधला महाजी शिंदे, ज्याला घोड्यावर पाहून एक वेगळेच शौर्य मनात यायचे! मला 'भीम आणि दुर्योधन' ह्यांचे गदा-युद्ध सुद्धा ह्याच भावनेने बघितल्याचे आठवते! चौथीत असताना तर, मी आणि माझा वर्गमित्र, आदल्या दिवशी महाभारतात काय झाले, ह्याची 'अभिनया' सहित चर्चा करायचो! ह्या पार्श्वभूमीवर मला आजची लहान (?) मुलं वर्गात काय चर्चा करतात ह्याची जबरदस्त उत्सुकता आहे! असो!
'वीकडेझ' च्या त्या खास 'सीरियल' कोण विसरेल बाबा?! एक होती 'तेहकिकात' जेव्हा एक 'सॅम डिसिल्वा' नावाचा डीटेक्टिव, त्याच्या 'गोपी' नावाच्या सचिवा बरोबर, 'नैसर्गिक नियमांचे' पालन करून शोध लावत असे! त्याची जागा नंतर, 'राजा' नावाच्या एका डीटेक्टिव ने घेतली, ज्याची मदत करायचे एक 'रॅंचो' नावाचे माकड! लहान मुलांना मजा वाटेल की नाही ह्याने? विनोदी मालिकांनी तर आपला झेंडा अजुन वर लावला होता! तरुण 'शेखर सुमन' ला 'देख भाई देख' मध्ये कोण विसरेल? गैर-हिंदी भाषिकांना हिंदी शिकवणारा, 'जबान संभाल के' चा 'पंकज कपूर' सुद्धा चांगलाच आठावतो! पण, विनोदी मालिकांचा फड जर कुणी जिंकला असेल, तर तो 'श्रीमान श्रीमती' ह्या मालिकेने! त्यात केशव कुलकर्णी, ह्याचे निरागस विनोद न विसरता येणारे असेच आहेत! त्यात बाकी सार्या कलाकारांचा अभिनय देखील छान होता! मी अजुन सुद्धा ही मालिका, कधी कधी 'यू-ट्यूब' वर बघतो! त्यातल्या 'केशव' चे निधन लवकर झाले... नाहीतर ही मालिका अजुन खूप वर्षे नक्कीच चालली असती! काही अश्या 'मालिका' आहेत.....ज्या मे पूर्णपणे नाही बघू शकलो...पण त्यांच्या आठवणी मधून मधून जाग्या होत असतात! त्या म्हणजे...'टाइगर'. 'शक्तिमान', 'चंद्रकांता', 'जल्दी-जल्दी' , 'विजय' .....पण हो! हे सगळे 'दोन वाहिन्यांमुळे!' आणि दोन वाहिन्यांमध्ये!
अजुन एक, कधीही ने विसरणारी बाब, जी ह्या कृत्रिमता नसलेल्या दशकात होती, ती म्हणजे त्या वेळेच्या जाहिराती! नुसती लोकांनी एक वस्तू घ्यावी....आणि जाहिरात करणारा मोकळा व्हावा ही भावना तेव्हा नव्हती! आणि संगीत, हा त्यातला एक 'अदब' असलेला भाग होता! त्यातील 'हमारा बजाज' ही एक अशीच जाहिरात इतकी मनात बसली, की आज असा अगदीच कुणी असेल ज्याला ही माहिती नाही! 'धारा' च्या त्या जाहिरातीत, 'जले...बी...' म्हणणारा तो गोंडस मुलगा पण आपल्याला आठवत असेल! त्यात माझ्या आवडती होती 'पूरब से सूर्य उगा' गाणं असणारी 'शिकायला प्रोत्साहित' कॅरणारी जाहिरात! त्यात, आपण लहानपणी शिकवलेल्या मुलाने 'पेंट-ब्रश' हातात घेऊन नवीन व्यवसाय सुरू केलेला बघून, आजोबांना झालेला आनंद! भाटियार रागतील ते गाणे, विसरणे अशक्य! नंतर, 'लिरिल' साबणाने, धबधाब्यात नाचणारी प्रीती झिंट, व 'कॉम्प्लां' पिणारे लहान 'शहीद कपूर' आणि 'आयेशा टाकिया'.....नंतर, ' ये बात कुछ हजब नही हुई', असा म्हणणारा तो, व चटकन, 'हाजमोला, सर' उत्तर देणारी ती....त्याच्या विशिष्ट आवाजात 'लीज्जत पापड' म्हणणारा तो 'ससा'.....आपले दात किती मजबूत आहेत, हे सांगणारा, विकको वज्रदन्ती वापरणारा तो म्हातारा......आपल्या प्रीयकराने क्रिकेट खेळताना मारलेल्या शतका नंतर, भर मैदानात 'डेरी मिल्क' खात नाचणारी ती तरूणी'......आणि 'ये फेवीकोल का जोड हैं....' म्हणणारा तो.....अश्या किती तरी आठवणी आहेत!
अजुन एक खास लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे, दोन 'सीरियल' मध्ये असलेले 'फिलर्स'! त्या सार्या कलाकारांना आपण कसे विसरू शकतो, ज्यांनी मिळून 'मिले सूर मेरा तुम्हारा' गायले! राष्ट्रीय एकात्मता दाखवण्याची ह्याच्याहून चांगली कल्पना तरी काय असु शकेल! परवाच कुठे तरी नवीन 'मिले सूर' चे चित्रीकरण बघितले.....पण बर्यापैकी शून्य कामगिरी केलेले काही लोकं त्यात बघून, आणि कृत्रिम आवाज काढलेले बघून, हे काही जास्त दिवस चालायचे नाही, ह्याची खात्री पटली! भारताचे तमाम मोठे खेळाडू..... मशाल घेऊन धावताना आठवतात.....त्यात, पी. टी. उषा चे हरणांच्या बरोबर, धावताना केलेले अचूक चित्रीकरण सुंदरच! पण त्यात खास असा आठवतो तो म्हणजे सुनील गावसकर चा चेहरा! अगदी हसतमुख असा धावणारा गावसकर, मला क्रिकेट आवडते म्हणून कदाचित....लक्षात राहिला आहे! नंतर नाही विसरलो मी 'बजे सरगम' ह्या सुंदर गीताला!
आपण बर्याचदा आपल्या आई-बाबांना , आजी-आजोबांना....ते बदलत नाहीत ...स्वतःच्या काळातील गोष्टी सोडत नाहीत! पण जेव्हा मी ह्या माझ्या बालपणाबद्दल विचार करतो....तेव्हा माझ्या मनात नेहमी तुलना सुरू होते.....तुलना होते आजच्या मुलांच्या बालपणाशी! विचार येतो.....आपण किती सुखी होतो....आपण किती निरागस होतो....! मग मोठ्यांनी असा विचार करण्यात काहीही गैर नाही ना! पण मग जाणवते....की ह्या दशकाबद्दल आपल्या मनात अजुन जागा आहे....कारण ते कलात्मक होते, नैसर्गिक होते, पण त्यात आपले बालपण मिसळलेले होते!
मस्तच आशयगुणे... पण तुम्ही
मस्तच आशयगुणे... पण तुम्ही खूप काही मिसलं (लेखात नाही..तुमच्या लहानपणी )... माझ्या लहानपणी (८० च्या दशकात) हमलोग, बुनियाद, ये जो हे जिंदगी, नुक्कड, मराठीत श्र्वेतांबरी... अजून खूप कार्यक्रम होते...
श्वेतांब'रा' मुद्दे आवडले
श्वेतांब'रा'
मुद्दे आवडले लेखातले.
(७० च्या दशकाबद्दल काय लिहावे?)
जरा दमानं पोस्टा की प्लीज .
जरा दमानं पोस्टा की प्लीज . एका दिवसात तीन लेख ? तुमचा कुठे ब्लॉग आहे का ? तिथले सगळे लिखाण इथे असे एक गठ्ठा टाकताय असे वाटतेय .
शुद्धलेखनाकडे लक्ष देत चला पोस्टण्यापूर्वी. डिटेक्टिव्ह, झिंटा, व्हिको वज्रदंती, प्रियकर हे अन इतर बरेच शब्द चुकीचे लिहिले गेलेत. शिवाय एवढी अवतरणचिन्हे कशासाठी ती ? एखाद्या शब्दाचे विशेष महत्व अधोरेखित करायचे असेल तर अवतरणचिन्हे वापरावीत असा संकेत आहे. प्रत्येक विशेषनामाकरता ती वापरणे जरूर नाही.
राजु७६ आणि आशयगुणे तुम्ही
राजु७६ आणि आशयगुणे तुम्ही दशकांत घोटाळा केला आहे
९० चे दशक म्हणजे १९८१-१९९०
८० चे दशक १९७१-१९८०
२० वे शतक १९०१-२०००
२१ वे शतक २००१-२१००
९० च्या दशकात
हमलोग, बुनियाद, ये जो हे जिंदगी, नुक्कड, श्वेतांबरी, करमचंद, जाएंट रोबो
होते
गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात
मोंगली, ही मॅन, डिस्कवरी ऑफ ईंडिया, शक्तिमान हे होते.
मला वाटते
नव्वदीतले कार्यक्रम असे म्हणणे योग्य होइल जसे 90's
आशयगुणे मस्त लिहिलयं. निलिमा
आशयगुणे मस्त लिहिलयं.
निलिमा <<< The 1990s, also known as "the Nineteen Nineties" or abbreviated as "the Nineties" or "the '90s", was the decade that started on January 1, 1990, and ended on December 31, 1999. >> साभार विकी.
होय श्री 90's चे भाषांतर
होय श्री 90's चे भाषांतर नव्वदी असे होते असे वर सुचविले आहे (नव्वदीच्या दशकातले (९० च्या नाही) ,दहाव्या दशकातले किंवा शेवटच्या दशकातले असे पण चालेल)
कारण जर ९१ ते १००, ९० चे दशक झाले तर
० ते १० पहिले दशक किंवा दहाचे दशक न बनता ० चे दशक बनेल आणि
० चे दशक नसते.
आशयगुणे छान लिहिलय, मी माझे बालपण ९० च्या दशकातले (८१- ९०) समजते म्हणुन
लिहिले, खरे तर मुद्दा एवढा महत्वाचा नाही.
आशयगुणे, मस्त लेख. जुन्या
आशयगुणे, मस्त लेख.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जंगल बूक मधल्या 'शेरखान'ला नाना पाटेकरचा आवाज होता म्हणून तो कायम लक्षात राहिला. जंगल बूक, डक टेल्स ह्या मालिका नंतर आंतरजालावर शोधायचा प्रयत्न केला पण मिळाल्या नाहीत. अजूनही मिळाल्या तर बघायल आवडतील. तेव्हाच्या विनोदी मालिका अजूनही बघायला मजा येते.
>>परवाच कुठे तरी नवीन 'मिले सूर' चे चित्रीकरण बघितले.....पण बर्यापैकी शून्य कामगिरी केलेले काही लोकं त्यात बघून, आणि कृत्रिम आवाज काढलेले बघून, हे काही जास्त दिवस चालायचे नाही, ह्याची खात्री पटल>>>> १००% अनुमोदन.
तुमच्या यादीत अजून काही मालिकांची भर घालतो -
सुरभी - रेणूका शहाणे आणि सिद्धार्थ काक ह्यांनी भारताच्या कानाकोपर्यांची करून दिलेली ओळख.
फौजी / सर्कस - शहारुख खान तेव्हा तरूण होता!
एक से बढकर एक - गाण्यांचे काउंटडाउन करणार्या अनेक मालिकांमधली ही सुरुवातीच्या काळातली मालिका रविवारी रात्री लागायची.
व्योमकेश बक्षी - 'तेहकिकात' च्या आधीची मालिका - रजत कपूर होता त्यात.
आपल्या प्रीयकराने क्रिकेट
आपल्या प्रीयकराने क्रिकेट खेळताना मारलेल्या शतका नंतर, भर मैदानात 'डेरी मिल्क' खात नाचणारी ती तरूणी'...... >>>>>>>>>>>>
अगदी डोळ्या समोर आली........
व्योमकेश बक्षी आणि डिस्कवरी
व्योमकेश बक्षी आणि डिस्कवरी ऑफ ईंडिया (भारत एक खोज) आताहि बघायला आवडतात. डीडी - भारती वर येतात.
व्योमकेश बक्षी - दर मंगळवारी
व्योमकेश बक्षी - दर मंगळवारी १० वाजता डीडीवर लागतं..आजही असेल.
हमारा बजाजची जहिरात अमुल बटर
हमारा बजाजची जहिरात अमुल बटर आणि रविवारी सकाळी ११:३० ला लागणारी स्पिरिट औफ युनिटि कोन्सर्ट
अजुनही आठवतात
अप्रतिम लेख. जुन्या आठवणी
अप्रतिम लेख. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. रविवारी सकाळी लागणारे छायागीत. त्याची पण तेवढ्याच उत्सुकतेने आमच्या घरी वाट पाहिली जायची.
खरेच बालपण डोळ्यांसमोरुन
खरेच बालपण डोळ्यांसमोरुन तरळुन गेले.....
आशयदा मस्तच सही आठवण करून
आशयदा मस्तच सही आठवण करून दिली. मी तर विसरूनच गेले होते. खरच काय सुंदर दिवस होते. मला वाटत तेव्हाची सगळीच मुल वयानुसार खूप निरागस म्हणायला हवीत. आपल्या आई वडीलांच्या पिढीने आपल बालपण अगदी मस्त जपल. मी तर अगदी बावळट सारखीच होते कुणी काही सांगीतल की माझा लगेच विश्वास बसायचा. माझ्या ह्या स्वभावामुळे माझी आई, बाबा. ताई आणि आजी सतत माझी खूप काळजी घायाच्या....मला थोड विक्रम वेताळ आणि शक्तिमान बद्दल सुधा आठवत. महाभारतातले आणि रामायणातले ते बाण......अग्नी, पर्जन्य, वायू......काय काय खेळायचो आम्ही.
खूप छान आवडल आणि आठवलही
खूप छान आवडल आणि आठवलही
डी डी मेट्रो चॅनल तर
डी डी मेट्रो चॅनल तर कार्यक्रमांची पर्वणी होती..
दांडीयात्रा मिसलीच तुम्ही...
दांडीयात्रा मिसलीच तुम्ही...
छान
छान लिहीलय....नॉस्टॅल्जिक.......
मुला मुलांची मजे मजे ची
मुला मुलांची मजे मजे ची "बालचित्रवाणी" हे विसरलात का:??
पुर्ण बालपण समोर ऊभे राहिले.. नाहीतर आजकाल टी.व्ही च्या मालीका ची किळस येते.
आपल्या सर्वांचे आभार! आपल्या
आपल्या सर्वांचे आभार! आपल्या प्रतिक्रियांमुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढेल ह्यात शंकाच नाही!
काही लोकांनी अजून उदाहरणे देऊन ही जागा समृद्ध केली आहे....आणि माझ्याही आठवणीत भर टाकली आहे....त्यांचे देखील मनापासून आभार!
सगळ्या बालपणीच्या आठवणी
सगळ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. केचपच्या जाहिरातीमध्ये पंकज कपूरला नेहमी 'it's different' म्हणणारा जावेद जाफरी,मॅगीची संगीमय जाहीरात, हम लोग,सर्कस,नुक्कड सारख्या सिरीयल्सही अगदी खासच!
आशयगुणे, मस्त लेख. जुन्या
आशयगुणे, मस्त लेख.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सगळ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
अॅडिशन म्हणुन रविवारची रंगोली, पान पसंदची जाहीरात शादी और तुमसे कभी नही. :-), देख भाई देख.
महाभारत- मै समय हु, अरुण गोविलचा रामायण आणि नंतरचा स्वप्निल जोशीचा क्रिशना सगळेच मस्त.
हम लोग,सर्कस, व्योमकेश बक्षी,बुनियाद, ये जो हे जिंदगी, श्वेतांबरा इतक्या नाही आठवत. मी अगदी पहिली-दुसरीत होते तेव्हा.
अन् त्याकाळी अतिशय भारी
अन् त्याकाळी अतिशय भारी ग्राफिक्स असलेली शक्तिमान
सुरेख लेख!
सिग्मा , धूप छाव, फटिचर, हम
सिग्मा , धूप छाव, फटिचर, हम पन्छि एक डाल के आडोस्-पडोस, देविजि, याही मालीका यायच्या.
कळायच काहीच नाहि पण आवडायच्या
जुन्या आठवणी जाग्या
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
सिग्मा, हिमॅन,मोगली, डिस्ने आवर आणि गुच्छे कधी चुकायच नाही.
एका रविवारी माझ रामायण पाहायच चुकल तर बहिणींनी त्या एपिसोडला रामाने रावनाला मारल अस खोटच सांगितल. तेव्हा ते पाहायला मिळाल नाही म्हणून मी रडलो होतो.
रविवारी सकाळी ९.०० वाजले कि वडील मला झोपेतुन उठवायचे,"उठ, चंद्रकांता सुरू होइल"
छान आठवण करविलीत!
छान आठवण करविलीत!
महाभारताच्या काळात एका रविवारी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्माची सभा होती मुम्बईत सकाळी १० वाजता आयोजकांनी सभेच्या ठिकाणी लावलेल्या CCTV वर महाभारत लावून ठेवणार असे आगाऊ जाहिर केलेले जेणे करून लोक वेळेवर सभेच्या ठिकाणी येतील!
माझा हा लेख मायबोलीवर जुना
माझा हा लेख मायबोलीवर जुना आहे....तो कसा बाहेर आला एकदम ह्याचे आश्चर्याच वाटतंय मला!
aabasaheb - समजू शकतो.....कृष्णा सीरिअल मध्ये कालिया-नृत्य चुकायला नको म्हणून मी पळत पळत घरी आल्याचे स्मरतंय.
कृष्णा- तुम्ही सांगितलेला किस्सा जबरदस्त आहे!
सुमेधा, नन्ना, भानुप्रिया, बंडू - हे एक न संपणारी यादी आहे. ह्या सगळ्यावर अजून एक-दोन लेख नक्कीच लिहिले जातील!
अजुन एक राहील captain vyom
अजुन एक राहील captain vyom मराठीत नाही जमलं लिहायला.
मस्तच!! काय सुंदर दिवस होते
मस्तच!! काय सुंदर दिवस होते ते
चार आण्याला मिळणारा पेप्सीकोला, मेलेडी चॉकलेट आणि "मेलेडी है चॉकलेटी" जाहिरात
पानपसंद, पानपसंदची जाहिरात ("शादी और तुझसे कभी नही")
काय काय आणि किती किती लिहावे!!
ही दोन चॅनेल बघायला बांबू घेऊन तो अॅन्टेना फिरवायची कसरत करायला लागायची
ही दोन चॅनेल बघायला बांबू
ही दोन चॅनेल बघायला बांबू घेऊन तो अॅन्टेना फिरवायची कसरत करायला लागायची - प्रचंड अनुमोदन!!!!
captain vyom तर होतंच...रविवार सकाळ गाजवायला 'कहाणी पोटलीबाबा की' देखील होते!
Pages