’हा भारत माझा’ विशेष खेळ - आभार आणि प्रतिक्रिया

Submitted by Admin-team on 23 February, 2012 - 23:01

मायबोली.कॉमने प्रथमच आयोजित केलेला 'हा भारत माझा'चा विशेष खेळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे काल रसिकांच्या 'हाउसफुल' प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला. या प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल उपस्थित सर्व रसिकांचे मन:पूर्वक आभार.

या खेळासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे/सुनिल सुकथनकर व कलावंत दीपा श्रीराम, उत्तरा बावकर उपस्थित होते. तसेच या खेळासाठी डॉ.श्रीराम लागू, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, आरती अंकलीकर-टिकेकर, डॉ. अरूणा ढेरे, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, अमित अभ्यंकर,आनंद आगाशे, प्रवीण मसालेवाले श्री. चोरडिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ह्या सर्वांचे आभार.

एवढा मोठा उपक्रम स्वयंसेवकांच्या मदतीशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. या खेळासाठी चारूदत्त, दक्षिणा, पौर्णिमा, रंगासेठ, कांदापोहे, ऋयाम, अतुल, फारेंड, अवल, मंजिरी सोमण, स्वाती, निलेश (NDA) यांची बहुमोल मदत मिळाली. तसेच रूमाने तातडीने मायबोलीचा बॅनर करून दिला. तुमचा वेळ या उपक्रमासाठी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सर्वात शेवटी अरभाट आणि चिनूक्स. या दोघांशिवाय हा उपक्रम पार पडूच शकला नसता. मला वाटतं, गेले १०-१५ दिवस हे दोघे हा उपक्रमच जगत असावेत. Happy अरभाट आणि चिनूक्स, तुमच्याबद्दलच्या भावना शब्दांत लिहिता येणार नाहीत. मायबोली.कॉम तुमची ऋणी आहे.

हा एकंदर कार्यक्रम तुम्हांला कसा वाटला, चित्रपट कसा वाटला याबद्दल या धाग्यावर लिहू शकता.
[हा चित्रपट अजून सर्वांसाठी प्रदर्शित झालेला नसल्याने प्रतिसादात कृपया चित्रपटाची कथा/शेवट/महत्त्वाचे प्रसंग याचा उल्लेख करू नये.]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल चित्रपट बघितला. Happy
ही संधी मिळवुन दिल्याबद्दल, मायबोली, चिनुक्स आणि सहकार्यकर्त्यान्चे मनःपूर्वक आभार.
चित्रपटाबद्दल लिहीण्याबोलण्यासारखे खूपच काही आहे.
नमुन्यादाखल मध्यमवर्गीयाचे चित्रण करतानाही, एकन्दरीतच सर्वथरातील समाजमनाच्या "दांभिकतेवर" अचूक बोट ठेवलय असे मला वाटले. शिवाजी हवाय पण तो दुसर्‍याच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती काय की सदैव, अमक्यातमक्या "दुसर्‍याचे वागणे कसे अयोग्य अन त्याने काय योग्य वागायला हवे" यावर शब्दच्छल करीत बसणार्‍या, पण स्वतःच्या आयुष्यात शब्दशः "आपणही कुठे कुठे कधी लपुन तर कधी कायद्याच्या भाषेत तर कधी अनैतिकतेचे लन्गडे समर्थन करीत तेच शेण खातो" हे प्रकर्षाने अधोरेखित झालय असे मला वाटते.
एक तास पन्च्चावन्न मिनिटान्च्या चित्रपटात, एकही गाणे नाही, नाचाचे दृष्य नाही, हॉट ड्रेपरी नाही, अवाढव्य सेट्सचा खर्च नाही, अ‍ॅक्सिडेण्ट्/गाड्यान्च्या उलथापालथी, अतार्किक हाणामार्‍या असले काहीही नाही, पब्लिकला भावनिकदृष्ट्या उत्तेजित करणारी दृष्ये नाहीत, गुडिगुडी प्रसंगान्ची लगड नाही वा नाही शोकात्मक आसवेधारी दृष्यान्ची चळत, कसलाही संदेश कसल्याही "लाऊड" पद्धतीने दिलेला नाही की नाही भाषणबाजी, कोणत्यातरी एखाददोन व्यक्तिरेखान्ना वजनदार बनविलय असेही नाही, थोडक्यात म्हणजे "पब्लिकला जे हव अस्त(?)" त्यातिल इथे काहीही नाही, सहसा मराठी चित्रपटात ठळकपणे जाणवणारी बाब म्हणजे "नाटकीय पद्धतीने म्हणले गेलेले संवाद अन त्यान्ची शब्दरचना" तर ती देखिल इथे तशी नाही, अन तरीही सलग दोन तास हा चित्रपट कुठल्याही विचारी/सूज्ञ माणसाला खिळवुन ठेवू शकतो, आत्मावलोकन करायला भाग पाडू शकतो हे या चित्रपटाचे अर्थात दिग्दर्शकाचे/सहकर्मचारी-कलाकारान्चे यश आहे असे मला वाटते.

लिंब्या + १. Happy

लिंब्या खूपच मस्त लिहीले आहेस. एकदम मनातले व सर्वांना जे म्हणावेसे वाटले असेल चित्रपट पाहुन नेमके तेच व अतिशक मोजक्या शब्दात लिहीले आहेस. शाब्बास. Happy

लिंब्या खूपच मस्त लिहीले आहेस. एकदम मनातले व सर्वांना जे म्हणावेसे वाटले असेल चित्रपट पाहुन नेमके तेच व अतिशक मोजक्या शब्दात लिहीले आहेस.>>>>>> +१

चित्रपट आवडला... माबो, माध्य-प्रायोजक आणि सर्व स्वयंसेवकांना खूप खूप धन्यवाद Happy

कालचा प्रिमियर मस्त झाला. पूर्ण ऑडिटोरियम भरलेलं होतं. प्रिमियरआधी सुनील सुकथनकरांनी ह्या चित्रपटामागची पार्श्वभूमी सांगितली दहा पंधरा मिनिटात. हा पूर्ण चित्रपट केवळ एका कॅमेर्‍याच्या सहाय्याने कुठलेही स्पेशल इफेक्टस्,लाईट्स अ‍ॅरेंजमेटस किंवा स्पेशल कॉस्चुम्स वगैरेंशिवाय अतिशय कमी बजेट्मध्ये तयार झालय हे याचे वैशिष्ट्य.
पार्श्वभूमी नंतर चित्रपट आणि त्यानंतर परत१५-२० मिनीटे सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांच्याशी गप्पा असा एकूण कार्यक्रम झाला. चित्रपट चांगला झालाय.आवडला. ही थोडक्यात कालची रूपरेषा.बाकी डिटेलमध्ये बाकीचे सांगतीलच.

लिंब्या,मस्त लिहिलयस रे..

चिन्मय,अरभाट आणि सर्व स्वयंसेवकांचे आभार.

लिंब्या खूपच मस्त लिहीले आहेस. एकदम मनातले व सर्वांना जे म्हणावेसे वाटले असेल चित्रपट पाहुन नेमके तेच व अतिशक मोजक्या शब्दात लिहीले आहेस.>>>>>> +१

चित्रपट आवडला... माबो, माध्य-प्रायोजक आणि सर्व स्वयंसेवकांना खूप खूप धन्यवाद ++१

>>> प्रतिसादात कृपया चित्रपटाची कथा/शेवट्/महत्वाचे प्रसंग याचा उल्लेख करू नये] <<<
अरे माझी पोस्ट या महत्वाच्या सूचनेला छेद देत नाहीयेना? मी पुन्हापुन्हा वाचली, मला तसे जाणवत नाहीये, पण जाणकारान्नीच तपासुन घ्यावे ही विनन्ती! Happy म्हणजे लगेच दुरुस्त करता येईल/वा मॉडरेटर्सनी दुरुस्त करावी! Happy
धन्यवाद.

लिंब्या खूपच मस्त लिहीले आहेस. एकदम मनातले व सर्वांना जे म्हणावेसे वाटले असेल चित्रपट पाहुन नेमके तेच व अतिशक मोजक्या शब्दात लिहीले आहेस. >> ++२

आवडला . लिम्बूनी म्हटल्याप्रमाणे "दांभिकतेवर" अचूक बोट ठेवणारा .
साध उदाहरण , अण्णा हजारेंच्या पाठींब्याच्या प्रत्येक रॅलीला जाणार्या माझ्या ऑफिसमधल्या कितितरी लोकानी खोटी RENT AGREEMENT करून HRA दाखवलाय . ५०० रू दिले की कोरा (सही शिक्यासह) पेपर मिळतो म्हणे , भरा काहीही ... आणी हा भ्रष्टाचार नाही का विचारल्यावर म्हणे सरकार तसेही सगळे पैसे घोटाळ्यातच घालवते , मग आमच्या कष्टाचा पैसा त्याना का द्यायचा ? Sad

खास भावे-सुकथनकर शैलीतला चित्रपट! अत्यंत फोकस्ड कथानक, फाफटपसारा न करता मांडणी, सर्व कलाकारांचे नैसर्गिक अभिनय. नेहेमीसारखीच रेणुका दफ्तरदार तुलनेने कमी लांबीच्या रोलमधे अत्यंत प्रभावी अभिनय करून गेलीये. आपण आपल्या भोवतालच्या आयुष्याचा/ समाजाचाच अस्सल तुकडा पहातोय असं वाटावं..
नंतरचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम फार सुरेख झाला. चित्रपटाएवढाच तोही आवडला.

आणि सगळ्यात मोठ्ठे आभार संयोजकांचे आणि स्वयंसेवकांचे. अतिशय उत्तम व दर्जेदार व्यवस्था होती. चिनूक्स आणि अरभाटाचे खास आभार (दोघं कड्डक झब्बे घालून प्रमुख आयोजक म्हणून अगदी लक्ष वेधून घेत होते) Happy

काल संध्याकाळी बरोब्बर ६.०८ वाजता राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या दारात उतरले आणि मायबोलीच्या ठसठशीत बॅनरच्या पार्श्वभूमीवर लिंबुभाऊ ची मूर्ती दिसली.... त्याला विचारलं, ओळखलं का? तर तो म्हणाला, हो, ओळखलं ना, ललिता ना Proud
फिल्म संग्रहालयाच्या दारातून आत सोडायला सुरूवातच केली होती... तिथे ऑडिटोरियम मधे जाण्यासाठी लाईन लाऊन सर्व माबोकर उभे होते... सर्व स्वयंसेवक मायबोलीचा बॅज लाऊन हजर होते. ऑडिटोरियम आतून खूपच छान आहे, स्वच्छ आणि वेल मेंटेन्ड आहे... तिथे आत चपला-बूट, खाद्यपदार्थ, शीतपेये काहीही न्यायला अलाउड नाहीये.
आत शिरल्यावर साडी ल्यालेली पूनम सुहास्य वदनाने सर्वांचे स्वागत करत होती. आम्ही, (मी आणि मनोज) पटापटा शक्य तितक्या मागच्या जागा पकडल्या. हळूहळू सर्व ऑडिटोरिम हाऊसफुल्ल झाले.
बरोब्बर ६.३५वाजता चिन्मय बोलायला उभा राहिला... त्याने चित्रपट सुरू होण्याच्या आधी दिग्दर्शकाची (त्यावेळी फक्त सुनील सुकथनकरच आलेले असावेत) ओळख करून दिली... मोजून ५-१० मिनिटं स्वतः सुनील सुकथनकर चित्रपटाविषयी बोलले... हा चित्रपट करायची कल्पना कशी डोक्यात आली, कलाकारांचे कसे सहकार्य मिळाले वगैरे.

आणि चित्रपट सुरू झाला..... 'हा भारत माझा' हा चित्रपट मनाला पूर्णपणे पटणारा आहे, आपल्या अगदी घरातला, आपल्याच आजुबाजूला, कदाचित आपल्यात घरात सापडणार्‍या व्यक्तिरेखा यात अगदी सहजपणे वावरतात म्हणूनच त्या जवळच्या वाटतात. लिंबूने लिहिल्याप्रमाणे भव्य दिव्य असे दृष्य स्वरूपात काहीही नसले तरी त्यात भव्य दिव्य आणि खोलवर रुजलेली चांगुलपणाची, संस्कारांची पाळंमुळं आहेत. रोजच्या रुटीन मधल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे संदर्भ इथे अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तरलपणे मांडले आहेत.
चित्रपटाची भक्कम बाजू म्हणजे यातले कलाकार... विक्रम गोखले, उत्तरा बावकर (हे तर कसलेलेच, यांच्याबद्दल वेगळे काय सांगणार), द्फ्तरदार भगिनी, जितेंद्र जोशी, आणि बाकीचे सगळेच अतिशय सहज अभिनय करतात. असे वाटतच नाही की चित्रपट पहातोय, एखाद्या शेजारच्या घरात डोकावून पाहिले तर कसे वाटेल अगदी तसेच. प्रत्येकाने जरूर पहावा असाच हा चित्रपट आहे, याची मांडणीही अतिशय लक्षवेधक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण शूटिंग पुण्यातले आहे Happy

यानंतर सुरू झाला मान्यवरांचा सत्काराचा आणि गप्पांचा कार्यक्रम (मान्यवरांच्या सत्कारासाठी चिनूक्स ने आरती (अवल) बरोबर माझे नाव पण घेतले पण ते मला ऐकूच न आल्यामुळे मी स्टेजवर जाऊ शकले नाही Sad )
प्रेक्षकांच्या मोजक्या आणि समर्पक प्रश्नांना दिग्दर्शक द्वयीने त्यांच्या भूमिकेतून उत्तरे दिली. चित्रपटाइतकाच हा गप्पा आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही खूप छान झाला.

[हा चित्रपट अजून सर्वांसाठी प्रदर्शित झालेला नसल्याने प्रतिसादात कृपया चित्रपटाची कथा/शेवट/महत्त्वाचे प्रसंग याचा उल्लेख करू नये.]>>>>>>>> हात शिवशिवत असून सुद्धा फार्फार कन्ट्रोल्ड लिहावं लागतंय Sad

फिल्म संग्रहालय वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असल्यामुळे रात्री ९.३० ला तिथून बाहेर पडणे क्रमप्राप्त होते पण तत्पूर्वी सुमित्राताई भावे आणि उत्तरा बावकर या दोघींशी सविस्तर बोलता आलं. Happy
उत्तरा बावकर या माझ्या शाळेतल्या मैत्रिणीची आत्या असल्याने त्यांच्याबद्दल तेव्हापासूनच तिच्याकडून खूप ऐकत आले होते तो संदर्भ त्यांना दिल्यावर त्या अजूनच आपुलकीने बोलल्या माझ्याशी, मुळातच त्यांचा चेहरा प्रेमळ आहे. Happy
असो, सध्या इतकाच वृत्तांत... कृपया संबंधितांनी फोटो टाकावेत. Happy

इतका सुरेख कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मायबोली, संयोजक, चिनूक्स, अरभाट सर्वांचे मनःपूर्वक आभार. Happy

अजून एक सांगायचंच राहिलं... चित्रपट सुरू व्हायच्या आधी ऑडिटोरियम मधे मायबोली शीर्षकगीतातला भुंग्याचा आलाप घुमला आणि नंतर गीतही ... Happy

मंजिरी, मस्त वृत्तांत... Happy

मान्यवरांच्या सत्कारासाठी चिनूक्स ने आरती (अवल) बरोबर माझे नाव पण घेतले पण ते मला ऐकूच न आल्यामुळे मी स्टेजवर जाऊ शकले नाही>>>>>>> मला वाटलं की तीच मंजिरी म्हणुन Happy

इतका सुरेख कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मायबोली, संयोजक, चिनूक्स, अरभाट सर्वांचे मनःपूर्वक आभार.>>>> +१

कृपया संबंधितांनी फोटो टाकावेत.>>>>> +१

लोकहो, +१ करताय ते चांगलेच आहे पण त्याच बरोबर तुमच्या शब्दातही लिहा एकंदर कार्यक्रम आणि चित्रपटाबद्दल.

एनएफएआयच्या परिसरात ६.१० पासूनच तूफान गर्दी होती. ते लोक शिस्त, वेळ ह्याबाबतीत बरेच काटेकोर आहेत. त्यानुसार ६.२० पासून प्रेक्षागृहात मायबोलीकरांना सोडायला सुरूवात झाली. मायबोली गीतही त्याच दरम्यान सुरू झाले Happy सर्व जण स्थानापन्न झाल्यानंतर चिनूक्साने मायबोलीची थोड्क्यात माहिती देऊन शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. सुनील सुखथनकर ह्यांनी चित्रपटाबद्दल सांगितले. त्यांना प्रेक्षागृहाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर सुरू झाला चित्रपट. समाजाचे बिंब चित्रपटात दिसते असं म्हणतात. अण्णा हजारे आंदोलनाचे समाजातले चित्र एका कुटुंबात कसा प्रभाव पाडते हे एका चित्रपटाद्वारे अत्यंत साध्या तरी थेट भिडेल अशा पद्धतीने दाखवले आहे. अचूक पात्रनिवड, चपखल संवाद आणि पुण्यातल्या अनेक ओळखीच्या जागांमध्ये शूटिंग- हे सर्वच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिक्रिया मिळवत होते. सर्वच पात्रांचा अभिनय अतिशय म्हणजे अतिशयच सहज. आपल्या घरात घडत असल्याप्रमाणे संवाद. तरी सतत पुढे सरकणारे कथानक. चित्रपटात एक संवाद आहे- एक कायदा असतो जो सरकार करतं, एक कायदा असतो जो आपण म्हणजे लोक करतात. आपण सध्या लोकांचा लोकांनी लोकांसाठी केलेला कायदाच मान्य करून त्यानुसार जगतो आहोत. हे इतकं अंगवळणी पडलं आहे, की सरकारी कायदा काही अलग आहे ह्याचा जणू विसरच पडला आहे! आण्णा हजारेंच्या आंदोलनाचं फूटेज हेही चित्रपटातलं एक प्रमुख पात्रच आहे. ते आण्णा हजारे आणि चित्रपटातले आण्णा, आण्णा आणि आई ह्यांच्यामधले सहज संवाद, रेणूका दफ्तरदारचा बोलका चेहरा, परिस्थितीने पिचलेले आणि तरी तारूण्याच्या जोशात काहीतरी करून दाखवायची इच्छा असलेले इन्द्राचा मोठा भाऊ आणि मेहुणा आणि तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेला, अजूनही फारशी दुनिया न पाहिल्यामुळे निरागस असलेला, तत्त्वांची चाड असलेला इन्द्रा- सर्वच अतिशय आवडले. उत्तरा बावकर किती गोड असाव्यात! नो वन्डर त्यांना ह्या भूमिकेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

चित्रपट तर सकस आहेच. त्याशिवाय अरभाट आणि चिनूक्स ह्यांनी घेतलेले परिश्रम ह्यांचा इथे उल्लेख करावाच लागेल. असा खेळ आयोजित करणं ही केवळ हौस आहे. आणि ह्या हौसेला चिकार मोलही लागलं त्यांना! Happy चित्रपट काय, नंतर कधीतरी वितरित होईलच. तेव्हा पाहणारे पाहतीलच. पण केवळ मायबोलीकरांसाठी अशा शो करणं, त्यासाठी लागणारं सव्यापसव्य करणं, शक्यतो सगळ्यांच्या मनाप्रमाणे सांभाळून घेणं आणि तरीही उरलेली टीका झेलणं हे सगळं आणि ह्यापेक्षाही बरंच काही जास्त त्यांनी ह्या खेळासाठी केलं आहे. त्या दोघांना मनःपूर्वक धन्यवाद. त्यांची हौस आणि कष्ट पाहूनच सर्व स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पुढे आले आणि झेपेल तो खारीचा वाटा उचलला.

उत्तम चित्रपट
अतिउत्तम संयोजन
दर्जेदार व्यवस्था
आणि मायबोलीकरांसमवेत ह्या सर्वाचा आस्वाद.
एक कायम स्मरणात राहणारी संध्याकाळ होती कालची.

चिनूक्स , आरभाट >> मस्त आयोजन Happy ...

कथा अजिबात 'काल्पनिक' वाटत नाहि (ति तशी नाहिच्चे). सिनेमातल्या कितितरी घटना आपल्याला अगदि आपल्याच घरातल्या वाटतात . . . सिनेमात आपल्याला आपण स्वत:, आपली आई , बाबा , दादा, ताई, मित्र , नातेवाईक दिसत रहातात आणि मग सिनेमा 'भिनत' जातो.

कसलीही आडवळणे (climax) न घेता, उगाच अलंकारिक भाषेचे ईमले न चढवता, नाच्-गाणी न घालता केलेली उत्तम कलाकॄती Happy

चुकवलेत तर चुकाल असे काही . . .

लोकहो, +१ करताय ते चांगलेच आहे पण त्याच बरोबर तुमच्या शब्दातही लिहा एकंदर कार्यक्रम आणि चित्रपटाबद्दल.>>>> भावना त्याच, पण बाकीचे इतकं चांगलं लिहितायेत आणि आता परत तेच कसं लिहायचं म्हणुन ते +१... Wink काढु का?

चित्रपट (रीलीज झाल्यावर) नक्की बघणार.

अरभाट आणि चिनूक्स यांचे खास अभिनंदन. Happy मायबोली हा ब्रँड एक संकेतस्थळ म्हणून न राहता मराठी प्रसारमाध्यमसृष्टीतील एक वेगळा प्रयोग बनत चाललेला आहे. याचे खरंच मनापासून कौतुक आहे.

मी आधीच ठरवल होत की ह्या चित्रपटाला कसही करुन जायचच.
आणी तो योग आलाच जुळुन. खरच चिनुक्स आणी आरभाट याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
सगळ अगदी वेळेवर आणी शिस्तीत सुरु झाले. (दोघेही तसे पक्के पुणेकर आहेत म्हणा :हाहा:)
तसे माझ्या ओळखीचे फार कमी चेहरे दिसले

पण तेही कामात जरा जास्त बिझी होते म्हणुन जरास बोर झाल कार्यक्रम सुरु होई पर्यंत....
मला डॉ. श्रीराम लागु आलेले माहीतच नाही मला त्यांना भेटायचे होते Sad जाउद्या नेक्स्ट टाईम भेटेल त्यांना..

उत्तरा बावकर यांना भेटायची फार इच्छा होती कारण त्यांचा वास्तुपुरुष हा चित्रपट मला फार आवडलेला आहे आणी मला त्यांना गावाकडे असल्या पासुन भेटण्याचे इच्छा फर होती ती काल फक्त मायबोली मुळे प्रत्यक्षात आली त्या बद्दल मायबोली टीम चा खुप खुप आभारी आहे...
त्या खरच खुप डाऊन टु अर्थ वाटल्या...
हा त्यांचा फोटो माझ्या मोबाईल मधुन.....

अरभाट आणि चिनूक्स यांचे खास अभिनंदन. स्मित मायबोली हा ब्रँड एक संकेतस्थळ म्हणून न राहता मराठी प्रसारमाध्यमसृष्टीतील एक वेगळा प्रयोग बनत चाललेला आहे. याचे खरंच मनापासून कौतुक आहे. +१

सुमित्रा मावशी आणि सुनिल, हार्दिक अभिनंदन. सुरेख अनुभव.

'हा भारत माझा' मस्तच आहे एकदम ! एकुणच कार्यक्रम सुरेख झाला. सुनिल सुकथनकर आणि सुमित्रा भावे अगदी छान टीम आहे . ऑडिटोरियम आणि एकुण परिसर पण मस्त. मायबोली, संयोजक, आणि स्वयंसेवकांचे आभार . तुम्ही सर्वांनी परिश्रम घेतलेत आणि त्यामुळेच आम्हाला हा अनुभव मिळाला .

हे सारे वाचून खूप अभिमान वाटला, खूप छान वाटलं. या सार्‍यात भाग घेता न आल्याचं, बरंच काही मिस केल्याचं वाईट वाटतंय.
चिन्मय, अरभाट आणि स्वयंसेवक, मनःपूर्वक अभिनंदन. Happy

चित्रपट महोत्सवात पाहिला होता हा, आणि त्यानंतर दोन दिवस हिप्नॉटाईझ्ड व्हायला झालं होतं. लिंबु, मंजिरी, पूनम आणि इतर- छान लिहिलंय. Happy

'हा भारत माझा'चं फारएंडाने लिहिलेलं परीक्षण - http://www.maayboli.com/node/31673

>>> हात शिवशिवत असून सुद्धा फार्फार कन्ट्रोल्ड लिहावं लागतंय <<< अगदी अगदी! Happy

एक उल्लेख महत्वाचा, चिनुक्सने सुरवातीला मायबोलिची ओळख ज्या अन जितक्या मोजक्याच शब्दात करुन दिली ना, ते अप्रतिम. शब्दशः लक्षात नाही, पण ते सर्व शब्द देखिल इथे कुठेतरी नोन्द होऊदेत, अन आम्हालाच कळूदे, की आमची मायबोली का आहे, कशी आहे, कशाकरता आहे.

लिम्बी अन धाकटीलाही चित्रपट अतिशय आवडला. Happy

अभिनयाबाबत विक्रम गोखलेन्चा मानदण्ड का मानला जातो त्याचा पुनःप्रत्यय आला. अतिशय सहजसुन्दर अभिनय्/देहबोली.
बाकी कलाकारात, सगळ्यान्चाच अभिनय चान्गला असला तरी मला मात्र ती जी कोण भाची दाखविली आहे ना, तिचा अभिनय "उजवा" वाटला.

तान्त्रीक बाबीन्वर देखिल बरेच लिहीता येईल.
क्यामेरामनचे कौशल्य, अन ज्याकाही ट्रीक्स प्रत्यक्ष शुटीन्ग दरम्यान वापरल्या असतील त्याबद्दल माहित नाही, पण रस्त्यावरील काही धावत्या गाडीवरील प्रसन्ग अफलातुन टिपलेत असे माझे मत.

डबिन्गचे काय केले/वा नाही केले हे माहित नाही, पण एकच प्रसन्ग मला खटकला तो म्हणजे खुळखुळा वाजवितानाचा आवाज. अन्यथा सम्पुर्ण चित्रपटात आवाज/दृष्याच्या सन्गतीच्या दृष्टीने कोठेही खटकले नाही.

मात्र माझे राखिव मत असे पडले की
१. चित्रपटाचा शेवट अधिक खुलविता आला असता, अधिक सु:स्पष्ट करता आला असता.
२. मात्र तसे केले असते तर विषयात अन्तर्बाह्य गुन्तलेल्या प्रेक्षकाला ह्याप्प्पी गुडीगुडी एण्डचा/सर्वकाही आलबेलचा फिल येऊन, चित्रपटाच्या मूळ उद्देशाला देखिल हरताळ फासला गेला असता असेही वाटते.
सबब, मी पुन्हा चित्रपट बघेन, अन माझे (बदलण्याकरता) राखिव मतातील नेमका भाग पक्क्या मतात बदलिन.

Pages