’हा भारत माझा’ विशेष खेळ - आभार आणि प्रतिक्रिया

Submitted by Admin-team on 23 February, 2012 - 23:01

मायबोली.कॉमने प्रथमच आयोजित केलेला 'हा भारत माझा'चा विशेष खेळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे काल रसिकांच्या 'हाउसफुल' प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला. या प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल उपस्थित सर्व रसिकांचे मन:पूर्वक आभार.

या खेळासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे/सुनिल सुकथनकर व कलावंत दीपा श्रीराम, उत्तरा बावकर उपस्थित होते. तसेच या खेळासाठी डॉ.श्रीराम लागू, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, आरती अंकलीकर-टिकेकर, डॉ. अरूणा ढेरे, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, अमित अभ्यंकर,आनंद आगाशे, प्रवीण मसालेवाले श्री. चोरडिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ह्या सर्वांचे आभार.

एवढा मोठा उपक्रम स्वयंसेवकांच्या मदतीशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. या खेळासाठी चारूदत्त, दक्षिणा, पौर्णिमा, रंगासेठ, कांदापोहे, ऋयाम, अतुल, फारेंड, अवल, मंजिरी सोमण, स्वाती, निलेश (NDA) यांची बहुमोल मदत मिळाली. तसेच रूमाने तातडीने मायबोलीचा बॅनर करून दिला. तुमचा वेळ या उपक्रमासाठी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सर्वात शेवटी अरभाट आणि चिनूक्स. या दोघांशिवाय हा उपक्रम पार पडूच शकला नसता. मला वाटतं, गेले १०-१५ दिवस हे दोघे हा उपक्रमच जगत असावेत. Happy अरभाट आणि चिनूक्स, तुमच्याबद्दलच्या भावना शब्दांत लिहिता येणार नाहीत. मायबोली.कॉम तुमची ऋणी आहे.

हा एकंदर कार्यक्रम तुम्हांला कसा वाटला, चित्रपट कसा वाटला याबद्दल या धाग्यावर लिहू शकता.
[हा चित्रपट अजून सर्वांसाठी प्रदर्शित झालेला नसल्याने प्रतिसादात कृपया चित्रपटाची कथा/शेवट/महत्त्वाचे प्रसंग याचा उल्लेख करू नये.]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!! Happy

इतक्या सुरेख कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल खेदही वाटतोय.>>>>>१

वा! छान. Happy
या सिनेमाच्या निमित्ताने घेतलेली दिग्दर्शकद्वयींची मुलाखत महिन्याभरापूर्वी आयबीएन-लोकमतवर पाहिली होती. तेव्हाच घरच्यांना अगदी अभिमानाने सांगितलं होतं की माबो याची मिडिया-पार्टनर आहे.

काल अनवधानाने रुमा यांचे आभार मानायचे राहून गेले. त्याबद्दल दिलगीर आहोत. रुमाने तातडीने सुंदर बॅनर (जो बाहेर गेटावर लावला होता) करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या 'हा भारत माझा' चित्रपटासाठी स्वयंसेवक म्हणुन काम करायला मिळाले त्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. स्वयंसेवक म्हणुन माझ्यावर प्रकाशचित्रे काढण्याची जबाबदारी चिन्मयने सोपवली होती. प्रकाशचित्राच्या माध्यमातुन प्रतिक्रीया देत आहे.

मायबोली बॅनर प्रवेश्द्वारावर असे झळकत होते.

'हा भारत माझा' चे बॅनर

सिनेमा सुरु होण्यापूर्वीचे निवांत क्षण

रांगेत उभे राहुन प्रेक्षागृहात प्रवेश करताना मायबोलीकर

उत्तरा बावकर, अरुणा ढेरे

अमित अभ्यंकर

कार्यक्रम सुरु होताना चिन्मयने मायबोली संकेतस्थळ राबवत असलेले उपक्रम व माध्यम प्रायोजक करत असलेल्या चित्रपटाची रुपरेषा समजावताना. 'हा भारत माझा' ची थोडक्यात ओळख समजावुन देताना.

प्रेक्षकवर्ग

सुनिल सुकथनकर चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपट कसा बनवला त्याची माहीती देताना

गिरीश कुलकर्णी सहकलाकारांसोबत

डॉ. श्रीराम लागु, दीपा श्रीराम व सुमित्रा भावे

पाहुणे कलाकारांचा संवाद

उमेश कुलकर्णी सहकलाकारांसोबत

चित्रपट संपल्यानंतर सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधला.

'हा भारत माझा टीम'

प्रेक्षकांनी सुमित्रा भावे/सुनिल सुकथनकर व हा भारत माझा टीमशी संवाद साधला.

हास्य विनोदात रंगलेले कलावंत

मायबोलीकर कुटुंबासमवेत गप्पागोष्टी करताना उमेश कुलकर्णी

फोटो मस्त आलेत रे केप्या.. हायला इथे टाकणार आहेस सांगीतले असतेस तर त्या दिवशी टोपी घालुन आलो असतो .. Happy

काही कारणांनी चित्रपटाला येऊ शकले नाही. खुप वाईट वाटतय..
एक छानशी संध्याकाळ आपण मिस केली याचे दु:ख आहे... फोटो आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया खुपच
मस्त आहेत. आवडल्या... Happy

चिनूक्स , अरभाट आणि इतर स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार !
केपीकाका, तुम्हाला फोटोंबद्दल पेशल धन्यवाद !

केप्या,मस्त फोटो रे... :).

हायला इथे टाकणार आहेस सांगीतले असतेस तर त्या दिवशी टोपी घालुन आलो असतो ....>>>राम्या,टोपी की टोप रे.. Proud

लिंबुटिंबु,मंजिरी,पौर्णिमा.... सुंदर वृतांत लेखन!
रंगासेठ,कांदापोहे ..... सुंदर प्रचिंमुळे कार्यक्रमाला न येताही झलक बघायला मिळाली. सर्वांना धन्स!
अवल.... कार्यक्रमातील तुझ्या सहभागाची बातमी फोनवरुन कळली Happy

"हा भारत माझा" ही 'अण्णा सुखात्मे' यांच्या कुटुंबाची गोष्ट आहे. ही गोष्ट जितकी अण्णांच्या कुटुंबाची आहे, तितकीच तुम्हाआम्हा सर्वांचीदेखिल आहे. अण्णा, त्यांची पत्नी, त्यांची मुलं-मुली, नातवंडं अशा सर्वांचं एक घर. ह्या सर्वांची सुखदु:खाची समीकरणं आपल्यासारखीच. प्रगती करण्यासाठीची धडपड असो, एकमेकांना सहकार्य करत राहणं, कधीमधी स्वार्थीपणानं वागणं असो, सारं तसंच.

येणारा प्रत्येक दिवस हा काही सारखा नसतो. तो कधी आनंदाचा, समाधानाचा असेल तर कधी प्रचंड त्रासदायकही असेल. आपल्या परीने प्रयत्न करत, 'आपल्या आनंदाच्या दिवसाची' सारेच वाट पहात असतात. आनंदाचा पाठलाग करणं नैसर्गिक खरं, पण कधीकधी असा पाठलाग करताना होणारी दमछाक असह्य असते. "हा भारत माझा" हा चित्रपट, "सुखात्मे कुटुंबासमोर उभा ठाकलेला एक प्रसंग व त्या प्रसंगाचे सर्व कुटुंबियांवर पडणारे पडसाद" यांची गोष्ट सांगतो.

एप्रिल २०११ मधे अण्णा हजारेंनी "भ्रष्टाचार विरोधी देशव्यापी आंदोलन" सुरु केलं. राजकारणाच्या बाबतीत बरेचदा निरुत्साह दाखवणारा भारतीय तरूण, मोठ्या जोमाने त्या आंदोलनात सामील झाला. "एक भला माणूस, निरपेक्ष भावनेने देशाच्या भल्यासाठी काहीतरी करतो आहे, तेव्हा आपण मागे राहणे बरोबर नाही!" ही भावना तीव्र होत गेली आणि "बघताय काय? सामील व्हा!" म्हणत प्रत्येक भारतीय, आंदोलन वाढवत गेला.

अण्णा सुखात्म्यांचं कुटुंबदेखिल हा लढा पहात होतं. त्यावर आपली मतं व्यक्त करत होतं. अण्णांच्या समर्थनार्थ निघणार्‍या शांतता रॅलीमधे भाग घेत होतं. अण्णांना पाठिंबा देत असतानाच त्यांच्या मनातही प्रश्न उमटत होते. प्रश्नांची उत्तरं सहज मिळणार नव्हतीच, पण विचारचक्र सुरु झालं होतं. ह्या विचारचक्रातूनच सुखात्मे कुटुंबीयांना त्यांच्या प्रश्नाची उकल होणार होती.

"हा भारत माझा" हा चित्रपट आपण सर्वांनी अनुभवलेल्या त्या आंदोलनाच्या क्षणांना उजाळा देतो. पुन्हा एकदा फिरून त्यावर विचार करायला आपल्याला भाग पाडतो, तो 'उपदेशांचे डोस' न देता; 'समाज सुधारणा', 'प्रबोधन' वगैरे करण्याचा आव न आणता. चित्रपट पाहताना त्यातल्या काही पात्रांच्या लोभी वागण्यावर हसू येतं, पण चित्रपट संपल्यानंतर त्या गोष्टी विसरल्या जात नाहीत. त्यांच्या वागण्यातली कुरुपता थोड्याफार प्रमाणात स्वतःमधे, आजूबाजूच्या व्यक्तींमधे सापडल्यावर 'आता मात्र विचार करण्याची वेळ आल्याचं' समजून जातं.

'कथानकाची गरज' म्हणून मोठाले बंगले, आयटम साँग्स, आटलेल्या / फाटलेल्या कपड्यातल्या हिरॉईन्स, 'विनोदाचा शिडकावा' वगैरे न पचणारं ह्यात काहीच नाही. 'जाऊदे... आपला मराठी पिक्चर आहे' म्हणून सांभाळून घ्यावं लागत नाही. दुर्दैव असं, की 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' नंतर असं म्हणता येण्याची वेळ फारशी आली नाही.

केवळ मराठीच नव्हे, तर जास्तीत जास्त भारतीयांनी हा चित्रपट पाहिला, आणि त्यावर थोडा जरी वेळ विचार केला तर अण्णा हजारेंनी सुरु केलेल्या आंदोलनाला पुन्हा नव्याने झळाळी मिळेल यात शंका ठेवायला जागाच नाही!

* * * *

"ऋयाम. तुझ्यासाठी किती तिकीटं हवीत?"
"दहा दे"
"फक्तं!!!!!????????"
"अर्र... सॉरी. स्लीप ऑफ टंग... एकशे दहा म्हणायचं होतं"

चिनुक्साने "हा भारत माझा" बद्दल सांगितलं, तेव्हाच 'आम्ही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमधे' हा चित्रपट पाहिलाय, फार छान आहे असं सांगितलंच होतं. त्यामुळे घरच्यांना तसंच काही मित्रांना गुरुवार संध्याकाळबद्दल सांगून ठेवलं होतं. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वच्या सर्व १६ जणांकडून (नंतर लोक वाढले) माझं कौतुक केलं गेलं, 'मीच' एक चांगला चित्रपट बनवल्यागत Happy खरं तर ह्यातलाच एकजण 'आर्ट फिल्म असेल ना.. ठिक आहे. म्हणजे, बघूया की. काय त्यात??' म्हणत आला होता. चित्रपट पाहिल्यावर घरी जाताना, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचं सर्वात जास्त कौतुक हाच करत होता.

एनएफएआय च्या आवारात शिरतानाच 'मायबोली'चं सुरेख बॅनर दिसलं आणि मनोमन त्या बॅनरबहाद्दरांना नमस्कार घडला. त्यातून 'एनएफएआयचं' एकूण वातावरण असं आहे, तिथे गेलं की 'आपलं जुनं, खरं पुणं' दिसतं असं मला वाटतं. त्यात तिथे मायबोलीकर आणि स्वयंसेवककर म्हणून वावरायला मिळाल्यावर आपल्याला अजून आनंद झाला.

"ऋयाम."
"ओ"
"तिथे जा, तिकीट तपासायला. हे घे. शर्टाला लाव." मायबोलीचं 'म' असलेला बिल्ला देत चिनूक्स बोलत होता. क्सारभाटाची लगीनघाई सुरु असल्यानं फारसं बोलता आलं नाही. मायबोली गटग असल्यागत बरेच जण भेटले. बरेच जण मिसले गेले. स्वयंसेवक/विका न्टून थ्टून , चांगले कपडे घालून आले/ल्या होते/त्या.

अरभाट सरांनी 'अं.. प्लीज, लाईन मारा!' असा पुकारा दिला तसे लोकांनी सत्वर लाईन मारली. तेवढ्यात दरवाजा उघडला, अन मी आणि अतुल आत जाऊन बॅटरी घेऊन तिकीटं तपासायला उभे राहिलो. चिनूक्साच्या सांगण्यावरून मी हे काम घेतलं असलं, तरी "बरोबर! तिकीटं तर चेक करशीलच, बरोबर येणार्‍या पोरींनाही! नाही का? ख्यॅख्यॅख्यॅ!" म्हणून कोणीतरी आपलं समाधान करून घेतलं. मी अरभाटाच्या हेल्मेटची शपथ घेऊन सांगतो, तो टक लावून पहात असलेल्या त्या लाल ड्रेसमधल्या सूंदर पोरीकडेदेखिल मी ढुंकूनही पाहिले नाही.

तिकीटं तपासून झाल्यावर आम्ही सभागृहात शिरलो. दरम्यानच्या काळात, आत चिनुक्स भाषण करत होता. लोकांनी लय टाळ्या वाजवल्या. सुनील सुकथनकरांनीही भाषण केलं पण ह्या कशाचाही तपशील मिळू शकला नाही. कृपया योग्य लोकांनी योग्य तो प्रकाश पाडावा.

भाषणं संपली आणि पुढचे दोन तास कसे गेले समजलंही नाही! चित्रपट तर उत्तम होताच, पण तितक्याच उत्तम होत्या त्या त्यानंतर झालेल्या गप्पागोष्टी! चित्रपट पाहून आधीच त्यांचा पंखा झालेलो, सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरं ऐकताना अजून २पट पंखा झालो. चित्रपटाच्या कथेचा उलगडा होईल या भितीपोटी प्रश्नांबद्दल लिहू शकत नसल्याचा खेद! पण सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली. मला एक प्रश्न होता, तो वेळेअभावी विचारता आला नाही. मला त्यांना विचारायचं होतं, "बाकी सगळं छान समजलं, पटलं. पण ते... ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचं काय झालं?"

९.३० ला 'एन एफ ए आय' रिकामं करण्याची सक्ती असल्यानं घाईघाईत बाहेर पडावं लागलं, पण हा सुंदर कार्यक्रम मनातून जात नव्हता. त्या दिवशी घरी जाताना हा चित्रपट, दिग्दर्शक, कलाकार, निमंत्रीत कलाकार यांच्याबद्दल आदर आणि मायबोली, ह्या उपक्रमाचे स्वयंसेवक, आणि दस्तुरखुद्द चिनुक्स झब्बावाला व अरभाट हेल्मेटवाला यांच्याबद्दलच्या अभिमानाची भावना मनात घेऊन घरी गेलो.

कांदापोहे, फोटो छान आलेत! आणि माझा फोटो काढल्याबद्दल विशेष धन्यवाद Happy
तो दरवाज्याजवळ्चा पांढर्‍या शर्टाचा हात माझाच आहे. आणि दरवाजापलिकडे उर्वरीत मी आहे. Uhoh

कांदापोहे, अप्रतिम फोटो Happy पुन्हा एकदा चित्रपटाची संध्याकाळ जशीच्या तशी डोळ्यासमोर ठेवल्यामुळे मस्त वाटलं Happy

मस्त चित्रपट, चिनूक्स, अरभाट व सर्व संयोजक, स्वयंसेवक यांचे मनःपुर्वक अभिनंदन, छायाचित्रेही सुंदरच

मिल्या आलेला आधी माहीत असते तर भेट झाली असती Happy

(चित्रात दिसत आहे)

ऋयाम अफाट लिहिलं आहेस Happy

. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचं काय झालं?" >>>>>>>>>तो दरवाज्याजवळ्चा पांढर्‍या शर्टाचा हात माझाच आहे. आणि दरवाजापलिकडे उर्वरीत मी आहे.>>>>>>>>>>> Lol

तो दरवाज्याजवळ्चा पांढर्‍या शर्टाचा हात माझाच आहे. आणि दरवाजापलिकडे उर्वरीत मी आहे.>>>>>>> मयूर Lol

रुमा, बॅनर मस्तच Happy

धन्यवाद लोकहो. Happy अनेक सेलिब्रिटी (माबोकर) राहुन गेल्याबद्दल खेद आहे.

मायबोलीनं मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी माध्यम सहयोग देण्यास सुरुवात केल्याला आता सहा महिने झाले. या काळात ’देऊळ’, ’पाऊलवाट’, ’जन गण मन’ आणि आगामी ’मसाला, ’हा भारत माझा’, ’संहिता’, ’तुकाराम’ या चित्रपटांशी मायबोलीचा माध्यम प्रायोजक म्हणून संबंध आला, येत आहे. ’हा भारत माझा’चा मायबोलीकरांसाठी खेळ आयोजित करणं, हा याच उपक्रमाचा एक भाग होता. एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर भाष्य करू पाहणारा, आणि तरीही करमणूकप्रधान असा हा चित्रपट लवकरात लवकर मायबोलीकरांना पाहायला मिळावा, अशी इच्छा होती. शिवाय मायबोलीचा माध्यम सहयोग केवळ ऑनलाइन प्रसिद्धीपुरता मर्यादित न राहता मायबोलीकरांना या चित्रपटांतल्या कलाकारांशी, दिग्दर्शकांशी संवाद साधता यावा, हा हेतूही होता.

सुमित्राताई - सुनील यांच्याशी बोलताना मनात आलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मायबोलीचे वेबमास्तर आणि प्रशासक यांनी लगेच परवानगी दिली, शिवाय वेळोवेळी मार्गदर्शनही केलं. या दोघांचेही मन:पूर्वक आभार. Happy

नव्या चित्रपटाच्या तयारीत अतिशय व्यग्र असूनही (आणि मुख्य म्हणजे चित्रपटाचा खेळ आयोजित करण्याचा आपल्या शून्य अनुभवाकडे सपशेल दुर्लक्ष करून) या खेळासाठी परवानगी दिल्याबद्दल आणि उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधल्याबद्दल सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचेही आम्ही आभारी आहोत.

मायबोलीकरांच्या सहभागाशिवाय हा उपक्रम यशस्वी होणं अशक्य होतं. ’हा भारत माझा’च्या खास खेळाला उपस्थित राहिलेल्या, आणि मायबोलीच्या या उपक्रमाला मनापासून पाठिंबा देणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आम्ही ऋणी आहोत.

या खेळासाठी पौर्णिमा, रुमा, चारूदत्त, दक्षिणा, रंगासेठ, कांदापोहे, अतुल, अवल, मंजिरी सोमण, स्वाती, निलेश (NDA) यांची बहुमोल मदत मिळाली. तिकीटविक्रीसाठी, तसंच खेळाच्या दिवशी एकंदर व्यवस्थापनात केलेल्या मदतीबद्दल या मित्रांचे आभार मानले तर आम्हांला फटके मिळतील, याची आम्हांला नम्र जाणीव आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनात काही त्रुटी जरूर राहिल्या; आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. चित्रपटाचा खेळ शनिवारी किंवा रविवारी आयोजित न करता आल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली, अनेकांना हा चित्रपट बघता आला नाही, पण आमचा नाइलाज होता. नवीन नियमांनुसार ’राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात’ संध्याकाळी चित्रपट दाखवायचा असेल, तर आता फक्त मंगळवार आणि गुरुवार हे दिवस उपलब्ध आहेत. पुण्यातल्या अनेक चित्रपटगृहांशी आम्ही संपर्क साधला होता. त्यांची भाडी आपल्याला परवडण्यासारखी नव्हती, शिवाय ही चित्रपटगृहंही फक्त सोमवार-गुरुवार याच चार दिवसांमध्ये उपलब्ध असतात. प्रेक्षकांना चित्रपटाचा आस्वाद उत्तम घेता यावा, म्हणून चांगली ध्वनिव्यवस्था नसणार्‍या, प्लास्टिकच्या खुर्च्या असणार्‍या, हलत्या पडद्याच्या सभागृहात हा खेळ आयोजित करायचा नव्हता. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळीच चित्रपटाचा खेळ ठेवावा लागला.

या खेळासाठी झालेला खर्च वगळता राहिलेले रु. सात हजार आपण सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांना दिले आहेत. त्याची पावती खाली जोडली आहे. खर्चाचा सर्व तपशील आणि पावत्या प्रशासकांना दिले आहेत.

receipthabharatmaza.jpg

’हा भारत माझा’ हा चित्रपट ४ मे, २०१२ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाला आणि चित्रपटाच्या निर्मितीत सामील असलेल्या सर्व तंत्रज्ञ-कलाकारांना आपण यापुढेही असाच पाठिंबा द्याल, याची खात्री आहे.

सर्वांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार.

धन्यवाद.

Pages