Submitted by संयोजक on 20 February, 2012 - 22:17
मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे खाली दिलेल्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.
- आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
- तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
- मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
- तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
- महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
- मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
- लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
- परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
- प्रांजळ अनुभव लिहिणे अपेक्षित आहे. चांगले वाईट काही नाही. फक्त प्रांजळ अनुभव. कोणी काय करावे, काय करायला हवे होते,असे उपदेशपर कृपया लिहू नका. फक्त तुम्ही काय करता तेवढे लिहिणे अपेक्षित आहे.
* हा धागा संयोजकांकडून प्रशासित आहे हे कृपया लक्षात घ्या! दोषारोप न करता फक्त सद्य परिस्थिती कथन करणे आणि आपला मानस; एवढेच लिहावे ही विनंती आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या प्रतिसादात बरंच काही
आधीच्या प्रतिसादात बरंच काही लिहायचं राहिलं होतं. म्हणून परत ही जोड.
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
घरात मराठी वृत्तपत्र येत नाही सध्या. औरंगाबादला गेल्यावर मात्र तो मुलांसाठीच्या पुरवण्या घेवून स्वतःच वाचत (?) असतो. त्यावर रंगरंगोटी करायला आवडतं. मराठी चित्रपट, नाटक इ. कधी दाखवले नाही. घरात मराठी चॅनल दिसत नाही. गोष्टी मात्र आवडतात. रात्री झोपताना इम्मी गोष्टी सांग असं म्हणत असतो. आज्जी आजोबांशी किंवा इतर नातेवाईकांशी फोनवर बोलतच नाही, तिथे गेल्यावर हिंदी + मराठीत बोलत असतो.
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?:
माझ्या माहेरी खूप काही सणवार कधीच केले गेले नाहीत. आईकडे असताना सण म्हणजे खाणं-पिणं, शेजार्या-पाजार्यांकडच्या पुजा आणि घराची सजावट (रांगोळ्या, झेंडूच्या माळा इ.इ.) असंच समिकरण होतं. त्यामूळे मी पण यापेक्षा काही जास्त करत नाही. त्यातनं नवर्याकडचे सण वेगळेच आहेत. ते कसे साजरे करतात हेही आम्हाला जास्त माहित नाही. दिवाळी सासरी सगळ्यांबरोबर साजरी होते. बाकी सण सुट्टीप्रमाणे लक्षात येईल तसं काही गोड्-धोड करून /आणून साजरे होतात. गणपतीच्या वेळी मात्र इथल्या महाराष्ट्र भवनात त्याला एक दिवस घेवून जाते.
कोणत्या नातेवाईकाशी कोणत्या भाषेत बोलायचं आहे हे मात्र माहित आहे. मला मराठी, हिंदी, पंजाबी, इंग्लिश या भाषा कळतात असं सगळ्यांना सांगत असतो. पूर्वी माझी मदरटंग हिंदी आहे असं तो सगळ्यांना सांगायचा. हल्ली मराठी आहे म्हणतोय.
मातृभाषेशिवाय पितृभाषा पण यावी अशी आमची इच्छा आहे. घरात नवरा आणि दिर बर्याचदा आपापसात पंजाबीत बोलतात. त्यामूळे पंजाबीपण थोडीफार कळते. बर्याचदा नविन वस्तू /शब्द कळाला की त्याला चारी भाषांमध्ये काय म्हणतात हे तो विचारत असतो. उदा म्हैस दिसली तर ये क्या है? माझं उत्तर म्हैस. मराठीमे क्या कहते है? मग परत मी - मराठीत म्हैस म्हणतात आणि हिंदीत भैंस. आणि इंग्रजीत बफेलो. मग पंजाबी मे? मी- मज. जर पंजाबी शब्द मला माहित नसेल तर पापाला विचारु असं सांगून लगेच त्याला प्रतिशब्द सांगायचा प्रयत्न करते. त्याला या चारही भाषातले शब्द लगेच लक्षात राहतिल अशी आमची अपेक्षा नाही. पण पुढेमागे जेंव्हा तो ते शब्द ऐकतो, तेंव्हा त्याला त्यांचा अर्थ नक्कीच कळतो.
याशिवाय पापा त्याला पंजाबी गाणी शिकवत असतो. गाडीत जाताना त्याला पण एफ एम ऐवजी सरताजची सिडी ऐकायला आवडते. हल्ली लग्नाला जावून आल्यावर २-३ पंजाबी रॅप सॉग्ज पण म्हणायला शिकलाय. आठवड्यातून एक दिवस पापा बरोबर बसून यु ट्युबवर पंजाबी गाणी ऐकण्याचा कार्यक्रम असतो. त्यात सध्याच्या लेटेस्ट गाण्यांबरोबरच पापा जुनी गाणी पण ऐकवत असतो.
सर्वांची उत्तरे वाचली.
सर्वांची उत्तरे वाचली. वेगळेपणा आवडला उत्तरांमधला.
--आपल्या मुलांना मराठी बोलता,
--आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
होय. दोन्ही मुलांना व्यवस्थित मराठी बोलता येते. लिखाण व वाचन कमी आहे खुपच. सध्या चॅनेलवरील हिंदी कार्टुन्समुळे मराठीत अधुनमधुन हिंदी शब्द डोकावतात. उदा: परवाच मुलगी काहीतरी दाखवताना म्हणाली मला आणखी एक तरीका माहीत आहे.
--तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
काहीच प्रयत्न करत नाही. घरी सगळेच मराठीतच बोलतो फक्त. दोन्ही मुले आम्हाला आई व बाबाच म्हणतात. न शिकवता.
--परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
परदेशात रहात असताना जो गोतावळा होता तो पण मराठीच होता त्यामुळे कदाचीत मराठीपण उतरले असावे.
अल्पना, चार भाषेतले प्रतिशब्द
अल्पना, चार भाषेतले प्रतिशब्द - हे भारीच आहे.
मला आयामचा हेवा वाटतोय; खरंच सांगते...
माझा मुलगा १४ वर्षाचा आहे
माझा मुलगा १४ वर्षाचा आहे ,पुण्यात इन्ग्रजी माध्यमात शिकतो. घरी मराठीत बोलला तरी मित्रांबरोबर (मराठी मित्रांसकट) मात्र इन्ग्रजी/हिन्दी मधे बोलतो. घरी मराठी /इंग्रजी दोन्ही भाषांमधिल चिकार पुस्तके आहेत. घरी टिव्ही नाही त्यामुळे वाचन भरपूर असल तरी पण मराठी वाचत मात्र नाही. साम दाम दन्ड भेद सगळे उपाय थकलेत माझे.
त्याच्या मित्राना बोलावुन एक नोटिस्बोर्ड अन्क लिहायचो आम्ही. हळुहळु मराठी मात्र नाहिशी झाली त्यातुन.
खर तर मुलाना आवडतील अशी वयानुरुप पुस्तक आहेत. अस्खलीत मराठी ( प्रसन्गी शालजोडीतले....) बोलता येतं बोललेल कळत पण वाचना बाबतीत मात्र अनास्था आहे.
इथे भारतातच रहातो त्यामुळे सणवार होतातचत, त्यात सहभागी ही होतो.(रान्गोळी काढणे, सरस्वती पुजन, गुढी उभारणे ते होळीत बोंब मारणे) मराठी असण ही ओळख मात्र कदाचित पुण्याबाहेर /भारताबाहेर गेल्याशिवाय रुजणार नाही का?(हेमावैम)
माझे प्रयत्न मात्र चालु आहेत त्यानी वाचाव ह्या साठी.
हा धागा वाचुन काही नविन उपाय सापडतोय का तेही पहाते.
आपल्या मुलांना मराठी बोलता,
आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
-- माझी मुलगी ७ १/२ वर्षांची आहे आणि ती अजूनतरी चांगलं मराठी बोलू शकतेय . तिचा जन्म जर्मनीमधलाच . तिला दोन्ही आजी आजोबांशी आणि सर्व नातेवाईकांशी संवाद साधता आला पाहिजे हा आमच्या दोघांचा आग्रह होता . म्हणून घरात कटाक्षाने मराठीच बोलतो . ती लहान असताना इथे आजूबाजूला एकच मराठी फॅमिली होती , बाकी सगळे साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन . त्यामुळे बाहेर मराठी शिकायची शक्यता कमीच होती . मात्र दरवर्षी माझे आईवडील किंवा सासूबाई सासरे इथे येत असल्याने आणि आम्ही भारतात जात असल्याने तिच्या कानावर मराठी नेहमीच पडते .
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते
-- माझी मुलगी जर्मन माध्यमातून शालेय शिक्षण घेतेय
. तिच्या जन्मापासून ती इथे असल्याने जर्मन ही सुद्धा तिची मातृभाषा आहे असं तिचं म्हणणं आहे
. आम्ही दोघंही जर्मन बोलत असल्याने तिला शाळेत घालायची वेळ आल्यावर फारसा विचार करावा लागला नाही . मराठी काय ,जर्मन काय किंवा इंग्रजी काय , कोणत्याही भाषेत तिला उत्तमरीत्या व्यक्त होता येतंय ना , एव्हढाच आमचा निकष होता .
जर्मनीत आमच्या भागात भारतीयांबद्दल अजून अप्रूप आहे . तुम्ही घरी कोणती भाषा बोलता , थोडंसं बोलून दाखवा अशी नेहमीच विचारणा होत असते . भारतीय भाषांबद्दल आणि भारतीयांच्या भाषाप्रभूत्वाबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते . त्यामुळे नकळत माझ्या मुलीच्या मनात मराठीचा अभिमान निर्माण झाला , त्यातूनच सध्या तिने मराठी लिहायला शिकायचं मनावर घेतलंय . स्वतःचे नांव , मैत्रिणींची नांवं , टीचरचे नांव ती मराठीत लिहू शकते . लवकरच थोडं तरी का होईना मराठी वाचायला शिकायचंय असं ती सध्या मला म्हणतेय
. मी मायबोलीवर असताना स्क्रीनजवळ येऊन मराठी वाचण्याचा प्रयत्न चालू असतो
.
वीकेंड स्कूल्सचा अनुभव नाही .
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
-- मराठी चित्रपट , गाणी , सारेगमप ह्याची तिला आवड आहे . पूर्वी जिंगलट्यून्स , नक्षत्रांचे देणे - " आता खेळा नाचा " बघायला तिला फार आवडत असे . कौशल ईनामदारने संगीतबद्ध केलेलं मराठी अभिमान गीत तिने अनेकदा ऐकलंय . अवधूत गुप्ते , मुग्धा वैशंपायन ह्यांना तिला भेटायचंय म्हणते . मराठी गोष्टी तिला ऐकायला आवडतात . मात्र शाळा सुरु झाल्यापासून काही कठीण मराठी शब्दांचा अर्थ जर्मनमधून समजावून द्यायला लागतो
.
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
नक्कीच . जर्मनीत राहताना जाणवणारी एक गोष्ट म्हणजे वर सांगितलं तसं , की लोकं तुम्हांला नेहमी मराठी / भारतीय संस्कृतीबद्दल चौकशी करतात . त्यामुळे आपसूकच आपण आपले सण कसे साजरे करतो , का साजरे करतो ह्याचा विचार केला जातो . अगदी भारतासारखे धूमधडाक्यात सण इथे साजरे करत नसलो तरी आम्ही जवळपास दरवर्षी गणपती बसवतो , दिवाळीला कंदील बनवतो , काही मोजका फराळ बनवतो . तेव्हा माझी मुलगी तिच्या मित्र मैत्रिणींना बोलावून ही सगळी माहिती देण्याचं काम स्वतःहून आनंदाने करते . तिला ह्याची उपजतच आवड आहे . इथे गेल्या ३ -४ वर्षांत नवरात्र आणि संक्रांत हळदी कुंकू , दांडिया हे सण सुद्धा जोरदार साजरे होतात . त्यामुळे साधारण कोणता सण कधी येतो हे तिला लक्षात राहू लागलंय . मोदक , पुरणपोळी , करंजी , साबूदाणा खिचडी खाणं तिला अजून तरी आवडतंय .
आपल्या मुलांना मराठी बोलता,
आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
मुलगी ५ वर्षाची आहे जन्मापासुन तोक्योमधे आहे. जन्म व्हायच्या आधीच मुलीशी कोणत्या भाषेत संवाद साधायचा यावर साधकबाधक चर्चा केली. कारण पितृभाषा उडिया आहे. त्याशिवाय आम्ही दोघे घरात एकमेकांशी हिंदी बोलतो. दोन्ही बाजुंच्या नातेवाईकांना आणि आम्हालाही सोपे जावे म्हणुन मी मराठीत आणि त्याने उडीयामधेच बोलावे असे ठरवले. ते आजतागायत पाळत आहोत. त्याशिवाय जपानी डे केअर मधे जाऊन जपानी अगदी मातृभाषेइतकच सहज बोलते. सध्या मराठी,उडीया,जपानी, इंग्रजी याभाषा सहजपणे बोलते तर हिंदीमधुन त्रोटक संवाद साधु शकते. ( हिंदी ती आपली आपण आमचे ऐकुन शिकली)
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
मराठी थोडे थोडे, इंग्रजी,जपानी बरेचसे बरेचसे वाचता येते. मराठी वाचनासाठी मी मुद्दाम प्रयत्न चालु केले आहेत. घरी पुस्तकातली थोडी वाक्ये वाचुन घेणे इ. करते. वाचेल त्या सगळ्याचा अर्थ कळेलच असे नाही. त्यासाठी मी कथावाचन केल्याप्रमाणे आवाज चढउतार करुन गोष्ट वाचुन दाखवते. यामुळे अर्थ कळतो. माहित नसलेले शब्द शिकवते. लिहिण्यासाठी सुद्धा नुकतीच सुरुवात केली आहे. अजुन बराच पल्ला गाठायचा आहे.
तीला स्वत:ला वेगवेगळ्या भाषा येणे याची फार गंमत वाटते. नविन शब्द जाणुन घ्यायचे असतात. भाषा सरमिसळ न करण्याची सुरुवातीला कसरत केली पण आता तीला ते व्यवस्थित कळले आहे.
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
यातील काहिच वापरत नाही. आजी आजोबांशी नेहेमीच संवाद चालु असतो.
तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
-
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
शिकवणे गरजेचे वाटते. कारण एकतर मला स्वतःला संवाद साधण्यासाठी तीच भाषा जवळची आहे. आजीआजोबांशीहि संवाद साधणे जरुरी आहेच. त्याशिवाय मराठी भाषेत बरेच चांगले साहित्य आहे ते तीला वाचता यावे अशी एक सुप्त इच्छा आहे. ( अर्थात इतर भाषांतही आहे हे मान्यच)
लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
नुकत्याच वाचत्या झालेल्या मुलांना अजुन मस्त वाटावी अशी चित्र असणारी मोठ्या अक्षरांची पुस्तके फारशी नाहीत. लहान मुलांची म्हणुन जी पुस्तके मिळतात तीही आईबाबांनी वाचुन दाखवावी लागावी अशा छोट्या अक्षरांची अस्तात. इतके लिहिलेले पाहुन मुलांचा उत्साह कमी होतो असे वाटते.
त्याला उत्तर म्हणुन मी स्वतःच छोटी पुस्तके बनवणे. एखादी बालकविता मोठ्या मोठ्या अक्षरात प्रिंट करुन भिंतीवर लावणे अशा गोष्टी करते. त्याशिवाय मराठी पुस्तकांतुन मुलींच्या गोष्टी फारशा दिसत नाहीत, त्यामुळे माझ्या गोष्टीत हमखास मुलगी असते. लेकीला स्त्रीपात्र असलेल्या गोष्टी आवडतात.
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
यामुळे शब्द समुह वाढत असेल. पण वेळेअभावी आम्ही काही साजरे करत नाही. तोच वेळ मी लेकीसोबत खेळण्यात घालवते.
आम्ही बेंगलोरला रहातो. घरात
आम्ही बेंगलोरला रहातो. घरात मराठी बोलतो. मुलीला मराठी नीट बोलता येते. ती सध्या ४.५ वर्शाची आहे.
सध्या मुलगी इंग्रजी माध्यमाचा LKGत जाते. तिला लहानपणापासुन मराठी बालगीते, गोष्टी सांगतेय.शाळेत ,डेकेअर मध्ये ती इंग्रजी,कन्नड,हिंदी भाषा बोलते.
२ वर्षापासून तीला मी अंकलीपीतुन मुळाक्षरं,अंक वाचायला शिकवली . ह्यावर्षी तीला मुळाक्षरं,अंक लिहायला शिकवले. आता ४-५ महिन्यापासुन बाराखडी वाचायला,लिहायला शिकवली . आता ती बालगीते, मायबोली
वाचुन दाखवते. (अजुन जोडाक्ष्अरे वाचता येत नाहि) . ती छोटी छोटी वाक्येही लिहिते. शब्दांना मराठी,इंग्रजी,कन्नड,हिंदी भाषेत प्रतीशब्द विचारते. 
मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी अशी इच्छा आहे.
पोस्ट संपादित.
पोस्ट संपादित.
वाचतोय. सगळ्यांचेच पोस्ट छान
वाचतोय. सगळ्यांचेच पोस्ट छान आहेत.
माझा मुलगा पावणे-पाच वर्षांचा
माझा मुलगा पावणे-पाच वर्षांचा आहे. तो झाल्यानंतर मध्ये सव्वा वर्ष आम्ही पुण्यात होतो पण बाकीची सगळी वर्षं भारताबाहेरच राहिलो आहोत. सुरुवातीपासून त्याच्याशी कटाक्षाने मराठीतच बोलत होतो त्यामुळे त्याला मराठी चांगले बोलता येते. त्यामुळे आजीआजोबांशी व्यवस्थित संवाद साधतो. अजून मराठी लिहिता-वाचता येत नाही. शिकवायची इच्छा नक्कीच आहे. आत्ता इंग्लिश फोनिक्स, शब्द बनवणे, लिहिणे शिकत असल्याने त्यावर थोडा हात बसेपर्यंत मराठी लिहायला शिकवायची घाई करावी असं मला वाटत नाही. मराठी माध्यमात शिकणार्या मुलांना आजकाल पहिलीपासून इंग्लिश सुरु होते. त्याप्रमाणे सहा वर्षांच्या आसपास मराठी अक्षरओळख सुरु करावी असा आत्तातरी बेत आहे.
पहिली तीन वर्षं तो शाळेत असा जात नव्हताच. आठवड्यातून एकदा एक तास असणार्या लहान मुलांसाठी असलेल्या खास वर्गात त्याला घेऊन जायचो आणि आम्हीही तिथे असणे बंधनकारक होते. तिथल्या शिक्षकांनी तुम्ही मातॄभाषेतच बोला, इंग्लिश तो आपोआप शिकेल असे आवर्जून सांगितले होते. तेव्हा त्याला इंग्लिश अल्फाबेट्स ओळखता यायची, नर्सरी र्हाईम्स, आकडे माहीत होते पण ते तितकेच. इंग्लिशमधून केलेले संभाषण त्याला कळत नसे कारण घरी १०० % मराठी. आम्हीही थोडे गाफील राहिलो. तीन वर्षांचं झाल्यावर त्याला रोज चार तासांसाठी माँटेसरीत घातले आणि पहिला धक्का अनुभवला. तो मुळात भयंकर बडबड्या. मनात येईल ते सगळं बोलून दाखवायचं. शाळेत गेल्यावर त्याला टीचर काय सांगतायंत ते काहीच कळेना. त्यातून ती माँटेसरी. एका जागी बसून आपापलं काम करायचं. वर्गात मोकळेपणाने फिरायची जास्त मुभा नाही, शिस्तीचं वातावरण. ह्यामुळे तो बिथरल्यासारखा झाला. शाळेत चार तास रडतच राहायचा. त्यावेळी पहिल्यांदा जाणवलं की मराठी येणं आवश्यक असलं तरी घरी फक्त तेच बोलून आपण फार मोठी चूक केली. त्याच्याशी थोडसं तरी इंग्लिश बोलायला पाहिजे होतं. त्यातून तोपर्यंत तो इंग्लिश कार्टून्सही बघायचा नाही. फक्त मराठी गोष्टी, गाण्यांच्या सीडीज. फार कठीण गेले ते काही महिने ! जसजसं इंग्लिश कळायला लागलं तसतसा हळूहळू शाळेत रुळला. ह्या वर्षी आम्ही युकेत असल्याने आता गेल्या वर्षीची शाळा बदलली पण आता शाळा खूप आवडतेय हे बघून फार बरं वाटतं. गेले काही महिने खूप फरक झालाय त्याच्यात. अजूनही मराठी येतंच आहे पण हल्लीच मला जाणवलं की काहीतरी भरभरुन सांगताना तो बरेचदा इंग्लिशमधून बोलायला लागतो. 'तू मला ही स्टोरी रीड करुन दाखवशील का ?' अशी सरमिसळही व्हायला लागलीय. मध्यंतरी इंग्लिशच्या अनुभवाचा धसका घेऊन मी मुद्दाम बराच वेळ त्याच्याशी इंग्लिशमधून बोलायचे. आता ते थांबवून पूर्णवेळ मराठी सुरु केलं पाहिजे ( इंग्लिश गाणी, गोष्टी म्हणतानाचा वेळ सोडून ) कारण त्याने मराठीही तितकंच छान बोलावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.आधी आमच्या आसपास मराठी मंडळी फारशी नव्हती. युकेत मात्र त्याच्या वर्गातच अजून दोन मराठी मुलं आहेत आणि आमच्या प्लेडेटस चालू असतात. आमचे असे निरीक्षण आहे की मुलं आपसात इंग्लिशमध्येच बोलतात. आमच्याशी बोलताना मात्र मराठीत बोलतात.
हल्ली आमच्याकडे टीव्ही / इंटरनेटचं चित्र अगदीच बदललं आहे. पूर्वी तो माझ्याबरोबर सारेगमप सारखे मराठी कार्यक्रम बघायचा पण हल्ली साडे-सहा तास शाळेत जात असल्याने मला जो काही टिव्ही बघायचाय तो मी तो नसताना बघते. त्याच्या टिव्ही टाईममध्ये तो इंग्लिश कार्टून्सच बघतो किंवा इंटरनेटवर इंग्लिशमधून असलेले कॄष्ण, हनुमानासारखे अॅनिमेटेड मूव्हीज आवडीने बघतो. मराठी बालगीतांतला रस अगदीच कमी झालाय. जोपर्यंत त्याला मराठी येतंय तोपर्यंत मी ह्याची फारशी काळजी करणार नाही कारण मध्ये आम्ही भारतात गेलो असताना तिथे तो अगदी सहजतेने मराठी कार्यक्रम बघायला लागला होता. इथे मध्ये त्याला 'तार्यांचं बेट' चित्रपट इंटरनेटवर दाखवला तर त्याला आवडला होता.
वीकेंड स्कूलचा अनुभव नाही. सगळ्यांबरोबर शिकताना जास्त मजा येते तेव्हा पुढेमागे त्याला नेऊन बघायचा प्रयोग करायला आवडेल.
लहान मुलांसाठी असलेल्या गोष्टी खूप गोड आहेत पण त्या इथल्या पुस्तकांसारख्या मुलांना आपलेआपण वाचायला उद्युक्त करतील अशा वाटत नाहीत. ( मोठी ठळक अक्षरं, कमी आणि सोपे शब्द, आशय समजावून देणारी चित्रं. ) म्हणजे मी तरी अशी मराठी पुस्तकं खूप प्रमाणावर पाहिली नाहीयेत. एकदा वाचायची गोडी लागली आणि चांगले वाचता येत असेल तर मात्र मराठीत पुस्तकांना तोटा नाही.
मी स्वतःच सणवार, कर्मकांडं ह्यापासून खूप दूर गेले आहे. मी सण साजरे करु म्हटलं तर नवरा साथ देईल पण आपणहून काही करायला जाणार नाही त्यामुळे आमचे जे काही मराठीपण राहिले आहे ते फक्त खाद्यसंस्कॄतीत. ते सुद्धा त्या त्या सणाला ते ते पक्वान्न होईलच ह्याची खात्री नाही. आठवड्यातून चार ते पाच दिवस आपल्या पद्धतीचे जेवण असते. अजूनतरी मुलाला भारतीय पद्धतीचे खाणे आवडते.
वाचतोय. सगळ्यांचेच पोस्ट छान
वाचतोय. सगळ्यांचेच पोस्ट छान आहेत. >>>> अनुमोदन. पण स्त्रियाच लिहीत आहेत. पुरूषांचा यात सहभाग नाही ही बाब खटकत आहे.
पुरूषांचा यात सहभाग नाही ही
पुरूषांचा यात सहभाग नाही ही बाब खटकत आहे. स्मित >>
मामी, तुम्ही अपेक्षा का करत होता ? मायबोलीवर मुलांच्या संगोपनासंबधित कितीशा चर्चांमधे पुरुषांचा लक्षणीय सहभाग दिसलाय तुम्हाला ?
नाही म्हणायला झक्की आणि
नाही म्हणायला झक्की आणि कापोच्या पोस्ट्स आहेत.
हो ना, खरंय अपेक्षा करणंच
हो ना, खरंय अपेक्षा करणंच चुकीचं. माझ्या नवर्यालाही मराठी येत असतं तरी तो काही लिहू शकला नसताच.
माझा मुलगा ६ वर्षांचा आहे.
माझा मुलगा ६ वर्षांचा आहे. मराठी लिहीता, वाचता, आणि इतकं बोलता ही येत नाही पण व्यवस्थित समजतं. त्याला स्वतःला मराठी बोलता यावे अशी खुप इच्छा आहे, ह्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे आजी आजोबा. दररोज फोन वर बोलणं होतं, त्यांनी बोललेलं त्याला कळतं पण तो इंग्लिश मध्ये जे काही सांगतो ते त्यांना इतकं नीट कळत नाही. सध्या तो इंग्लिश नीट वाचायला शिकतोय त्यामुळे त्यात मराठी बोलता यावे ह्या करता काही अजून करावे असं वाटत नाही. थोडा मोठा होईल आणि समज वाढेल तसे त्याला आणखिन मराठीतून बोलण्याकरता प्रोत्साहन देणार आहे.
सण वार साजरे करतो त्यांनी आपल्या संसकृतीची थोडीफार तरी माहिती मिळते असं वाटतं. आता बर्यापैकी समज असल्यामुळे तो प्रश्न विचारतो आणि त्यामुळे आपल्या संसकृती/प्रथांबद्दल ज्ञान वाढते.
माझा मुलगा १६ महिन्यांचा आहे,
माझा मुलगा १६ महिन्यांचा आहे, त्यामुळे मी आत्ता काहीच लिहू शकणार नाही.
थोडं विषयाला धरून नाहीये ,माफ करा, पण एक गोष्ट मला, इतक्या दिवसात जाणवली ती सिंडीने लिहीली आहे इथे. मराठी गाणी,बडबडगीतांमधले अॅनिमेशन तितके छान नसते. इथल्या नर्सरी र्हाईम्स जितक्या आवडीने पाहतो मुलगा तितकी बडबडगीते 'पाहात' नाही. त्या अॅनिमेशनमध्ये खूप गोंधळ असतो (मराठी गीतात ब्लॉन्ड केसांची मुलं वगैरे!) , लहान मुलांच्या दृष्टीने केऑसच असतो अगदी. एकदम साधे, कमी पण ब्राईट रंग इत्यादी पाहिजे. मायबोलीवर इतके कलाकार लोकं आहेत्,काहीतरी करूया ना आपण! निदान एक धागा काढुया का, जिथे चांगली गाणी,बडबडगीतांचा विदा गोळा करता येईल.
आपल्या मुलांना मराठी बोलता,
आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
आम्ही गेली १६ वर्ष परदेशात आहोत. माझा मुलगा १७ वर्षाचा आहे आणि मुलगी ७ वर्षाची आहे. दोघांनाही मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येतं.
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता?
घरात मराठीच बोलतो. मुलांनी इंग्लिशमध्ये उत्तरं दिली तर तेच मराठीत सांगा म्हणून सांगतो. खूपदा क्रियापदं मराठीत आणि बाकी सर्व इंग्लिश शब्द असं झालं की ते त्यांना जाणवून देतो. आम्ही इंग्लिशमधून बोललो तर दोघं ते आमच्या लक्षात आणून देतात :-).
रोज एखादं मराठी वाक्यं मुलासाठी लिहून ठेवायचे (चिट्ठी). त्याने ते सकाळी वाचायचं आणि उत्तर लिहून ठेवायचं असा नियम होता. एखाद्याच शब्दात तो उत्तर लिहायचा. हे खूप वर्ष केलं, पण आता त्याचा अभ्यास वाढल्याने हे बंद झालं आहे. मुलीला रोज पाच शब्द लिहायला आणि दोन चार वाक्य वाचायला सांगते. (विनोदी शब्द लिहायला सांगितले की मुलं खुश असतात)
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
मंडळात जातो, पण तिथे मुलं इंग्लिशच बोलतात. इतर बाबींचा उपयोग केलेला नाही.
लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
नाही. परदेशात वाढणार्या मुलांसाठी त्यातले बरेच शब्द कठीण वाटतात. प्रत्येकवेळेला स्पष्टीकरण ऐकावं लागलं की मुलांचा त्यातला रस संपतो.
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
मी घरी सणवार करत नाही. त्यामुळे काही फरक पडला आहे असं वाटत नाही.
ह्या विषयाशी संबंधित एक
ह्या विषयाशी संबंधित एक गोष्टा तुम्हा सर्वान बरोबर share करावीशी वाटतीये.. माझी "Learn Marathi For Kids" App Android market मध्ये "विनामूल्य" उपलब्ध आहे.
This app is to help people of Indian origin to teach their children our mother tongue 'Marathi' through a very interactive and fun way.We have sincerely tried to make an app which will really help our children to learn Marathi with more interest.
here is the link
https://market.android.com/details?id=com.pmpandroid.learnmarathikidsv2
It would be really great if you could try it out and also share with your friends
धन्यवाद
पूनम पंडित
आपल्या मुलांना मराठी बोलता,
आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
- मुलगी साडेसहा वर्षाची आहे. सगळा वेळ वास्तव्य बंगळुरु. वर्षाकाठी सरासरी - २ महीने माझी व मुलींची महाराष्ट्र वारी (दोघांच्या घरी) + ४ महीने दोन्हीकडचे मिळून आजी-आजोबा आमच्याकडे. आजी-आजोबा, मावश्या या सगळ्यांशी कायम मराठी संभाषण होते.
घरात सतत मराठीतच बोलणे असते. मुलीही एकमेकींत मराठीतच बोलतात. पुण्यात जातो तेव्हा अगदी मराठी शेजार / मैत्रिणी , त्यामुळे नवीन मराठी शब्द कळतात. व्होकॅब्युलरी पुण्या-मुंबईकडच्या मुलांपेक्षा कमी असणार पण शक्यतो संपूर्ण संभाषण मराठीतच असते. कधीकधी वाक्यरचना / शब्दरुपे चुकतात, पण सांगितले की लक्षात ठेवतात. आपण-आम्ही, काल-उद्या, यात गोंधळ होतो बर्याचदा. मराठीतले नादमय शब्द खूप आवडतात जसे - गंमत-जंमत, गडबडगुंडा, आरडा-ओरडा, हिडीस-फिडीस, खुदुखुदू, वटवट.
आजी-आजोबांशी त्यांच्या प्रमाणे लक्शात ठेवून बोलतात, जसे आम्ही घरात सोफा, बेड म्हणतो, पण आजी-आजोबांशी बोलताना कोच, कॉट असे त्यांचे शब्द वापरतात. (हे मराठी शब्द आहेत की नाही ते मला माहीत नाही). सर्व वस्तूंची मराठी नावे वापरतात जसे घड्याळ, बादली, पेला.
आजूबाजूला बहुतांशी उत्तर व दक्शिण भारतीयांचा प्रभाव असल्याने इंग्रजी-हिंदी मधे संभाषण होते. माझ्या मराठी मैत्रिणींशी / त्यांच्या मुलांशी आपोआपच मराठीतूनच बोलले जाते.
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
- इंग्रजी माध्यमातून शिक्षण. मराठी भाषा शिकवण्यासाठी पुस्तके वाचून दाखवणे व मराठीतून बोलणे याव्यतिरिक्त काही वेगळे प्रयत्न नाहीत. देवनागरी लिपी शी तोंडओळख आहे, स्वतःचे व घरच्यांचे नाव लिहीलेले 'साईट रिडींग' प्रमाणे ओळखता येते, त्याहून जास्त अजून केले नाही. यावर्षी कदाचित करु.
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
- पुण्याला गेल्यावर कधीकधी बालमित्र बघितले जाते तेवढेच. मराठी सीडीज / कॅसेट्स मधे आधी रुची वाटायची, आता बाकी कार्टून्स / मूव्हीज बघितल्यावर आवडत नाहीत. माझी आई त्यांच्याशी जे मराठी खेळ खेळते त्यातून बराच फायदा होतो. जसे कापूस्कोंड्याची गोष्ट खेळ खेळताना बरीच लांबलचक वाक्यरचना आई मुद्दामहून करते. तेव्हा धापा टाकत का होईना मुलगी पण प्रयत्न करते ते रिपीट करायचा. माझ्या आईचं पत्र हरवलं वगैरे आवडीने खेळतात, पण फक्त माझ्या आईशीच. तेच आम्ही खेळायला बसलो तर वेगळे खेळ खेळू म्हणतात. बाकि आई जमेल तसे त्यांना श्लोक वगैरे शिकवते तेव्हा रस घेतात. पण तेही ती गेली की परत म्हणत नाहीत फारसे.
लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का? - वर सगळ्यांनी लिहीलेली जोत्स्ना प्रकाशनाची पुस्तकं काही मला २-३ दा प्रयत्न केला तरी मिळाली नाहीत दुर्दैवाने. माझ्याकडे जी अनमोल वगैरे आहेत त्यात वयोगटाच्या मानाने फार अवघड शब्द व वाक्यरचना आहेत असे वाटते. ३ ब्राह्मण च्या ऐवजी ३ मित्र करुन सांगावे लागते. बर्याचश्या संकल्पनाच फारश्या माहीत नसल्याने / कालबाह्य झाल्याने, त्यातल्या गोष्टींमधे रस वाटत नाही. कालानुरुप गोष्टींचे मराठि पुस्तक असणारच, पण मला अजून सापडवायचेय.
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
- माहीत नाही. मराठी मैत्रिणींचा गृप मिळून कायम आम्ही डोहाळ-जेवण, बारसे, बोरन्हाण, हे विशेष मराठी समारंभ व दिवाळी - भोंडला - संक्रांतीचे हळदीकुंकू इत्यादी सण साजरे करायचो. व त्याचे फोटोही आहेत, त्यामुळे दरवेळी ते पाह्ताना त्या वेळच्या आठवणी येतात व लक्शात राहते. बाकी व्रत-वैकल्ये हे मीच करत नसल्याने त्यांनाही माहीत नाही. हे सण मराठि आहेत हे मात्र त्यांना कळले असावे. कारण सोसायटीमध्ये मराठेतर लोकांच्या सणांमध्येही आम्ही खूप मजा करायचो. उत्तरीयांची लोहरी, मल्याळ्यांचा ओणम आणि इतर सर्व प्रांतियांचे सण हे सगळे साग्रसंगीत केले जायचे, त्यामुळे त्यांना ते माहीत आहे व आवडायचेही.
कालच्या पोस्टीत अजून एक
कालच्या पोस्टीत अजून एक लिहायचं राहिलं -
माझा मुलगा लहान असताना आम्ही एक तोंडी शब्दखेळ खेळायचो.
एका शब्दाने सुरूवात करायची. पुढच्या भिडूने त्याच्याशी रिलेटेड अजून एक शब्द सांगायचा. तिसर्या भिडूने या दुसर्या शब्दाशी रिलेटेड अजून एक शब्द सांगायचा. या तिसर्या शब्दाचा पहिल्या शब्दाशी काही संबंध नसला तरी चालेल. उदा - 'नदी'. त्यावरून आठवतं 'पाणी'. पाण्यावरून एखाद्याला 'माठ' आठवेल, अजून कुणाला 'तहान' आठवेल. आता तहान किंवा माठचा नदीशी संबंध नाही, पण पाण्याशी आहे. तर, असं करत करत पुढे जायचं आणि पुन्हा 'नदी या शब्दाशी साखळी येऊन पोहोचली की नवीन शब्दाने सुरूवात करायची.
शब्द मराठीच हवा हा एकच आग्रह.
उदा. ही साखळी पहा -
नदी-पाणी-माठ-माती-चिखल-किल्ला-शिवाजी महाराज-मावळे-तलवार-युध्द-विजय-आनंद-वाढदिवस- (इथे मुलं हमखास 'कोल्ड्रिंक्स' सांगतात. मग आपण त्यांना त्याचा मराठी प्रतिशब्द सांगायचा.)-पेय-पाणी-नदी
जरा वरच्या वयोगटात नदी नंतर पाणी आठवायच्या ऐवजी आपसूक 'प्रवाह' हा शब्द मुलांना आठवतो. ही साखळी कितीही मोठी होऊ शकते.
कधीतरी मुलांना सुरूवात करायला सांगायची. आपण सुरूवात केलेल्या शब्दाशी साखळी परत आली की त्यांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय असतो.
हा खेळ कितीही जणांच्यात आणि कधीही खेळता येतो. मुलांना भरवताना, प्रवासात, अगदी कधीही. मुलं यात खूप रमतात. माझा मुलगा तर आख्ख्या घरा-दाराला यात भाग घ्यायला लावायचा.
या खेळाने माझ्या मुलाच्या मराठी शब्दसंग्रहात प्रचंड भर पडली. सर्वांनी अगदी अवश्य हा प्रयोग आपापल्या मुलांवर करून बघा.
आपल्या मुलांना मराठी बोलता,
आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
महाराष्ट्रातच वास्तव्य असल्याने/आजुबाजुला शाळेत्/इतरत्र मराठमोळी मित्रमंडळी असल्याने असेल पण मराठी छान बोलते, शाळेत १ ली पासून मराठी विषय असल्याने आणि त्या आधीच गोष्टी/गाणी माध्यमातून ओळख झाल्याने मराठी लिहायला वाचायला तिच्या वयाच्या मानाने उत्तम जमतय.
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी गणपती उत्सव, दहीहंडी इ. उपक्रम शाळेतही होतात. शिवाय बसमधे गणेश उत्सवा दरम्यान येता जाताना आरती/श्लोक म्हणणे होते म्हणून आरत्या बर्यापैकी तोंडपाठ आहेत
वाचायची गोडी आपोआप लागली, घरात बघून बघून असेल्/तिला स्वतःलाही त्यात रस असेल. तिच्या करता खास लायब्ररी लावल्याने तिला स्वतःकरता पुस्तक निवडुन ते लायब्ररितल्या ताई/मावशी कडे एन्ट्री करायला द्यायला आवडतं.
तिच्या लायब्ररी मधे अधून मधून मुलांची आवड वाढवण्यासाठी बुकमार्क स्पर्धा व्.घेतात त्यामुळेही लायब्ररी प्रिय आहे तिला (त्यात तिचेही बुकमार्क्स् लावले आहेत म्हणूनही :P)
कवितांशी दोस्ती विंदांच्या पुस्तकांमुळे वाढली. यमक कळण्यासाठी आम्ही सुरवातीला "इंग्रजी र्हाईमींग वर्ड्स सारखा मराठी र्हाईमिंग वर्ड्स"हा खेळ खेळायचो. आता अधून मधून यमक जुळवून काही बाही ऐकवत असते आम्हाला.
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
सध्या तरी तिला ह्या सगळ्यात रस वाटतोय
लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
तिचा वाचायचा उत्साह टिकून आहे म्हणजे पुस्तकं चांगली असणारच असं म्हणायला वाव आहे.
बरीच चांगली पुस्तकं आहेत उपलब्ध
@ ललिता_प्रिती वा, मस्त खेळ.
@ ललिता_प्रिती
वा, मस्त खेळ. छान आहे डोकॅलिटी!!! नक्की खेळायला लावणार.
सगळ्यांचा पोस्ट छान आहेत.
सगळ्यांचा पोस्ट छान आहेत. बरंच नविन कळतंय.
ललिता_प्रिती, मस्त खेळ आहे. आमच्या घरातल्या थोड्या मोठ्या वयोगटातल्या मुलांसाठी लगेच अंमलात आणणार.
लले मस्त खेळ आहे, विकांत
लले मस्त खेळ आहे, विकांत प्रवासात जाणार आहे तेव्हा उपयोग होईल ह्या खेळाचा
आमची मुले आता खूपच मोठी झाली
आमची मुले आता खूपच मोठी झाली आहेत. पण पुढे काय वाढून ठेवलय याचा अंदाज येइल तुम्हाला.
आमच दोघांचही शिक्षण उच्च मराठी माध्यमातून झाल. माझ स्वतःच मराठी शाळेत असताना खूपच चांगल होत. आताही आहे, पण साहित्यिक पातळी वरच नाही. घरी पूर्ण मराठी वातावरण. माझे आई बाबा आमच्या कडेच रहात असत.
मुलांच शिक्षण मिश्र मराठी-इंग्रजी शाळेत झाल , पण इंग्रजी पहिली भाषा.
दोघही उत्कृष्ट मराठी बोलतात. अगदी इंग्रजी बोलताना पण आपल्या बहुतेकांसारख त्यांच "मराठी" पण समजत.
पण मी आता अस बघतोय की त्यांच्या दॄष्टीने मराठी भाषा म्हणजे फक्त आईबाबा, नातेवाइक , मराठी मित्र यांच्या बरोबर बोलायची भाषा.
मराठी भाषेचा इतर आनंद काही त्यांना काही घेता येत नाही. नाटक समजत नाही. म्हणी समजत नाहीत. नेहमीच्या वापरातला एखादा शब्द नसेल तर तो समजत नाही. कविता वाचन नाही. मराठी पुस्तके तर लांबच पण दररोजचे वर्तमानपत्र सुद्धा नाही. पु.ल. नाही की स्वामी नाही. कुसुमाग्रज नाही की बालकवी नाही. ययाती नाही की मृत्युंजय नाही. जी ए तर कोसो दूर. आणि हे सगळ घरी दारी मराठी वातावरण असून. मराठी लिहायला सांगितल तर हजार चुका सापडतील. अगदी आपण इथे मराठी लिहिताना होतात तश्या. आपल्याला समजतात. त्यांना समजतील असे नाही.
ते जे काय वाचतात किंवा बघतात ते सगळ इंग्रजीतून. कविता, नाटक, पुस्तके, मालिका, वर्तमानपत्र. .घरातल्या वातावरणा व्यतिरिक्त त्यांच्यावर प्रभाव इंग्रजीतून व्यक्त झालेल्या विचारांचा. अशामुळे विचारांच्या एकसुरी प्रगती पेक्षा विविध विचार ऐकल्याने, वाचल्याने जाणिवा अधिक प्रगल्भ होतात काय, माहित नाही. (हे वाक्य त्यांना कळणार नाही हे मात्र नक्की)
हे चूक की बरोबर सांगता येत नाही. ही प्रगती आहे की नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही. ही फक्त एक वस्तुस्थिती आहे.
माझ दुसर एक मत आहे. पूर्वी भाषेतला बदल हळू हळू व्हायचा. आजकाल जग जवळ आल्यामुळे या बदलाचा वेगही इतर गोष्टींप्रमाणे वाढलाय. तुम्ही रविवार सकाळ वाचत असाल तर त्यात यु.म. पठाण यांचे एक सदर येते. त्याचा विषय आहे फार्सीतून मराठीत आलेले शब्द. त्याला अर्थातच शेकडो वर्षे लागली. ते वाचून मला तर शंका यायला लागली आपण फार्सी बोलतो की मराठी.
आता तसेच इंग्रजीचे. एका ६ शब्दांच्या वाक्यात सर्सास ४ शब्द वापरणारे थोर महात्मे दररोज दूरदर्शनवर दिसतात. यालाच आजकाल मराठी म्हणत असावेत. हा बदल मात्र जरा जास्ती वेगात घडतो इतकच.
वा क्या बात है हे सुद्धा बहुतेक अस्सल मराठी म्हणून चालत असावे.
मराठीपण कशाला म्हणायचे हा प्रश्न उरतोच.
इथे फक्त मराठीचेच अनुभव
इथे फक्त मराठीचेच अनुभव द्यायची असतील तर माहीत नाही पण माझ्या मावशीचा पुण्यातला अनुभव थोडा वेगळा आहे.चांगल्या मराठी माध्यमाच्या नावाजलेल्या शाळेत तिच्या मुली जात होत्या पण ती जिथे राहते तिथे मात्र सगळीच लहान मुले अगदी मराठी घरातीलदेखील इंग्रजीतुन शिकत होती .त्यामुळे मुलींना त्यांच्याबरोबर खेळताना न्युनगंड यायला लागला.थोडेसे वाळीत पडल्यासारखे वाटु लागले,कारण मग त्यांचे बोलण्याचे विषयही थोडेसे वेगळे.आजकालच्या लहान मुलांना आधीच इतके ताण असतात त्यात भाषेची भर,मावशीला मराठी माध्यम निवडुन चुक केली की काय असे वाटायला लागले.त्यामुळे तीने घरात जिथे शक्य होइल तिथे इंग्रजी वापरायचे हा फतवा काढला.इग्रंजी सिनेमे ,बातम्या,पुस्तके,टाइम्ससारखी वर्तमानपत्रे ह्याचा उपयोग करुन मुली आजुबाजुच्या मुलांबरोबरीने बोलण्याइतक्या इंग्रजीला सरावल्या. पुढे सायन्सलाच गेल्या त्यामुळे तिथेही ह्या इंग्रजीचा फायदाच झाला,पण ह्या सगळ्या प्रक्रियेत मराठी मात्र धेडगुजरे झाले.
तिला मुलींचे मराठी बिघडण्याचे वैषम्य मुळीच वाटत नाही.तिच्या मते मराठी काय आपसुक बोलतोच की पण इंग्रजी आले नसते तर पोरींनी आत्मविश्वास मात्र गमावला असता तो कायमचाच .
सगळ्यांच्या पोस्टी छान आहेतच
सगळ्यांच्या पोस्टी छान आहेतच आणि एक पालक म्हणुन त्यातुन बरचस शिकण्या सारखं / प्रयोग करण्या सारखं पण आहे.
आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
माझी मुलगी साडे सहा वर्षाची आहे. जन्म फक्त भारतातला पण सध्या वाढतीये ईथे.
मराठी बोलते पण खुप शुद्ध नाही , समोरच्या मराठी व्यक्तीला कळण्याइतके. तिने मराठी लिहायला / वाचायला शिकलच पाहिजे असा हट्टाहास नहिये पण निदान बोलल तरी पाहिजेच अशी अपेक्शा आहे. आजी-आजोबा आणि तिच्या संभाषणात आम्ही माध्यम होवु नये, त्यांनी एकमेकांशी मनमोकळ बोलाव, भाषेचा अडथळा येवुनये अस तर नक्की वाटत आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न पण करतो आणि तीची साथ पण आहे.
आमचा इथे खुप मोठा मित्र परिवार आहे आणि त्या मधे जवळपास ७०% मराठी आहेत. ही मराठी मुल घरी जरी त्यांच्या पालकांशी रोज मोडक-तोडक मराठी बोलत असले तरी एकमेकांशी मात्र खुप क्वचित मराठी बोलतात. आम्ही त्यांना फोर्स नाही करत मराठी बोलायचा.
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा
खास असा काही प्रयत्न नाही पण ती जे काही शिकली आहे ते आमच्या, आजी-आजोबा, इतर लोक ह्यांच्या सतत मराठी बोलण्या वरुनच.
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
मराठी बालगीते तीला आवडतात. सारेगम लिटिल-चाम्प्स हा प्रोग्राम तिला खुप आवडला होता.
अग्गोबाई-ठग्गोबाई ही सिडी तर ती खुप ऐकायची. मागच्या भारत बारी मधे एकदोन बाल नाट्य पण पाहिली आणि तिला ती आवडली होती.
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?

काही काही छान आहेत. तिला तिच्या आजी ने एक गोष्टी चे पुस्तक दिले होते (कृष्ण जन्मा वर) त्यामधे वरचा भाग ईंग्लीश मधे होता, मधे चित्रं आणि खाली तेच मराठी मध्ये भाषांतरीत केलेल. हा कन्सेप्ट मला आवडला होता. तिने तो ईंग्लीश पार्ट वाचला मग तीला मराठी पार्ट वाचुन दाखवला. पुर्ण गोष्ट झाल्यावर म्हणाली 'english is nice to read and marathi is nice to listen'
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
आम्ही इथे गणपती, दिवाळी असे सण साजरे करतो. विशेषता: गणपतीच्या वेळेस ती डेकोरेशन, आरत्या, प्रसाद आणि एकंदरीत असलेल वातावरण ती एन्जाय करते. पण हे करतांना तिच्यामधे मराठीपण उतराव हा एकच हेतु नसतो.
शेवटी मी वर लिहिल्या प्रमाणे तिला आमच्या सगळ्या नातेवाईकांबरोबर मनमोकळा संवाद साधता यावा भाषेचा अडसर येवु नये हिच ईच्छा
ललिता-प्रिती चा खेळ पण छान आहे जरुर खेळेल तिच्या सोबत
अल्पना, तुझ्या मुलाच पण कओतुक
> आपल्या मुलांना मराठी
> आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
माझे मुलं मध्यप्रदेशात वाढलेत. त्यांना मराठी बोलणारे लोक क्वचितच भेटलेत. त्या मुळे त्यांना बोललेलं कळतं पण लिहिता, वाचता किंव्हा बोलता इतकं चांगलं येत नाही.
> तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
मी, त्यांच्या दोघी आजी आणि आजोबा त्यांच्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करतो, ह्या व्यतिरिक्त मराठी शिकवण्याचे असे वेगळे काही प्रयत्न करत नाही.
> मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
आजी आजोबा मराठीत बोलतात. पण ते त्यांच्या सवयीतून आलेलं आहे. मुलांना मराठी यावं ह्या साठीचा मुद्दाम केलेला तो प्रयत्न नसतो. मुलांना मराठीतील नाटक, सिनेमा कळत नाही. त्यांना त्यात मजा येत नाही, कारण भाषा तितकी व्यवस्थित कळत नाही.
> मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
नाही गरजेचं वाटत नाही, कारण ते आधीच इतके व्यस्त असतात अभ्यास आणि रुची क्लासेस मधे की त्यांच्यावर ही जबरदस्ती करणे नकोसे वाटते. जे काय बोलतात आणि जेवढं कळतं तेवढं सध्या पुरे असं वाटतं. पुढे त्यांना आपणहून मराठीची गोडी लागली तर चांगलंच आहे.
मराठी सणवार असे मी फक्त गुढीपाडव्याला गुढी उभारणे आणि संक्रांतीचं हळदीकुंकू (ज्याला गेट टूगेदर म्हणावं लागतं कारण मला मराठी मैत्रिणी नाहीत) करणे एवढेच करते. त्यात मुलांना गम्मत वाटत असली तरी त्याने त्यांच्यात मराठीपणा काही येत असेल असं जाणवत नाही. हे दोन सण सोडले तर बाकीचे सगळे सण इथे बहुतेक त्याच पद्धतीने साजरे होतात. त्या मुळे वेगळे असे काही वाटत नाही मुलांना. शिवाय शिवाजीं बद्दल अतोनात प्रेम आणि आदर, नौवारी, नथ, पुरणाची पोळी, फोडणीचा कुस्करा/भात आणि थालीपीठ ह्या व्यतिरिक्त मराठीपण काय हे मलाच अजून कळलेलं नाहीये.
१००% मराठी परीसरात राहत
१००% मराठी परीसरात राहत असल्यामुळे मराठी भाषा बोलायला शिकवण्याचा प्रश्नच नव्हता.
हा मुद्दा महत्वाचा आहे. आपल्या घरी मुलांना शिकवणे ठीक असले तरी त्यांना जर आजूबाजूला कुणि मराठी बोलणारे असले तर आपोआप त्यांना भाषा आणखी जास्त येऊ लागते. नाहीतर जर आईवडिलांच्या शिकवण्याचा कंटाळा आला की फक्त रवीवारी एकदा मराठी बोलले की झाले!
आमच्या मुलांचे मराठी म्हणूनच बरेच अपूर्ण राहिले.
जसे, आम्ही आमच्या मुलाला घरी इंग्रजी शिकवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. (इथल्या लोकांनी अॅक्सेंट वरून जाम सतावले होते, त्यामुळे न्यूनगंड) पण शाळेत जायला लागल्याबरोबर आपोआप व्यवस्थित इंग्रजी बोलू लागले.
Pages