टीव्ही आणि आम्ही

Submitted by manya_joshi on 21 May, 2008 - 11:31

संवाद साधण्यासाठी आम्हाला
'बाहेरचं ' कुणीतरी हवं असतं,
घरातल्यांबद्दल म्हणाल तर
बोलण्यासारखं काहीच नसतं.

काळजी, समस्या, दु़:ख, हुरहुर
हे रोज आमच्याही मनात दाटतं,
म्हणून सिरियल पाहतांना काळीज
प्लॅस्टिकच्या पिशवीसारखं फाटतं.

पूर्वी परीटघडीचे कपडे आम्ही
फक्त सणावारांनाच वापरीत असू
आता टीव्ही पाहून वाटतं की,
किचनमधेही रोज जरीकाठी साड्या नेसू

आजकाल भाजीत मीठ नसलं
तरी मुकाट्यानं गिळतो आम्ही.
सिरियल पहात जेवतांना
मध्येच असं उठतं का कुणी ?

घरातल्या समस्या सोडवायला
आम्ही कधी नाही म्हणतो ?
ती जर तीस मिनीटात सुटली नाही
तर फक्त उद्यावर धकलतो.

टीव्हीमुळे माणसं दुरावतात
असं उगाचंच तुम्हाला वाटतं,
इथं सिरियलमध्ये आमचं
रोज नव्याशी नातं जुळतं.

खेळ, वाचन, छंद, कलागुण
हे सारं कसं जोपासणार ?
असं केलं तर रोजचे
वीस च्यानल्स कसे पहाणार ?

हळ्दीकुंकु, वाढदिवस असे मेगा इव्हेंटस
आम्हालाही करावेसे वाटतात,
पण प्राईमटाईम उपलब्ध नसल्याने
हे विचार मनातच रहातात.

आजकाल पाहुणे मंडळीसुद्धा
आमच्याकडे क्वचितच येतात,
समजा आलीच तरी
ब्रेकमध्ये भरपूर गप्पा होतात.

गुलमोहर: 

सही लिखेला है यार... मजा आली.. Happy
- अनिलभाई

मस्तच !!! आय ओपनर आहे Happy
-प्रिन्सेस...

छान लिहिलंय.. चिमटे मस्त काढलेत..

मन्या, छानच कविता...
ते ब्रेकमध्ये गप्पाही काही खरं नव्हे रे. माणसं एकाचवेळी दोन दोन मालिका बघतात... एकीच्या ब्रेकमध्ये दुसरी....

आवडलीच कविता!

कविता खूप आवडली! मस्तच!
नेमक्या दोन्ही मालिकांमधे ब्रेक आली की देवाजवळ दिवा (प्राइमटाईम म्हणजे संध्याकाळ!), बाथरुमला जाऊन येणं, पाणी पिऊन घेणं वगैरे कामं उरकता येतात! आलेल्या पाहुण्यांना 'चहा घेता का' (मनात 'नको' म्हणालात तर फार बरं) असंही विचारुन घेता येतं!

ब्रेकमध्ये प्रतिसाद पाहू असं ठरवलं पण हे वाचण्याच्या आनंदात पुढचा ईपिसोड हुकला. खूपच छान वाटलं. मित्रांनो, आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

मन्या, अगदी खरं आहे..

मन्या तुझ्यामुळे मला टीव्हीचं नाही पण मायबोलीचं मात्र व्यसन लागलंय.
कविता मस्त लागली.

खूपच आवडली आणि मनापासून पटली दे़खील Happy

अगदी खरं आहे सगळं(हेच तर आपलं दुर्दैव!)
कविता खूप आवडली.
..प्रज्ञा