कर्नाटक सरकारचा भानामतीचा 'बुद्धिवादी शास्त्रीय शोध' प्रकरण ८

Submitted by शशिकांत ओक on 17 February, 2012 - 06:44

मित्र हो,
अनेकदा लोक करणी / भानामतीवरील त्यांना आलेला विलक्षण अनुभव मानो याना मानो अश्या तऱ्हेने सादर करतात.त्यानंतर अनेकांना आपापल्या अनुभवांची त्यात भर घालायला सुरसुरी येते. त्यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट प्रतिक्रिया येतात.काही त्यांना सुचवतात, “आपण करणी वा भानामती खरी असते असे न बिचकता खणखणीतपणे म्हणा व त्यावर चर्चा करायला टाका”. काही म्हणतात, “भानामती /करणीचा तर स्वतःला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात”.
लोक आपले अनुभव सांगायला का बिचकतात यावर ज्ञान तपस्वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे एके ठिकाणी म्हणतात –

लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात?

कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रुढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तिंचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे अनुभव आलेल्या व्यक्तिंची संख्या प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्या ही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. यावर कोणी प्रश्न विचारील. त्याला उत्तर – ‘तशी संधी त्यांना मिळत नाही’ हेच आहे. खाजगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर आपला अनुभव जाहीरपणे सांगायला मागे पुढे पहात नाहीत, असे आढळून आले आहे. त्याचे एक अलिकडील घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे भूतपुर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे यांनी आपल्याला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन होय.

प्रा. गळतगे हे परामानसशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक भानामतीच्या केसेस प्रत्यक्ष जाऊन, भेटून, संबंधितांशी मनमोकळी चर्चा करून त्यावर आपले विचार सादर केले आहेत.
भानामती कोण करते? यावरील त्यांनी एक मत सादर केले आहे. ते त्यांच्या "विज्ञान आणि चमत्कार" पुस्तकाचा मूळ गाभा आहे. हळू हळू त्यातील प्रकरणे ही सादर करावयाचा मानस आहे. परंतु त्याआधी सदस्यांची मनोधारणा अनुकुल नाही तरी विचार करायला - वाचायला तयार आहोत इतपत खाली आणायला त्यांच्या अंनि पुस्तकातील काही प्रकरणे सादर केली.असो.
भानामती व करणी सब झूट है म्हणणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण त्याला प्रत्यावाद करणारी या विषय़ावर देश- विदेशातील कोणी अभ्यास करून काही विचार सादर केले असतील तर ते वाचायला आवडतील.

भानामतीवरील एका सरकारी अहवालाची चिकित्सकाच्या भूमिकेतून पडताळणी केली आहे -
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 8

कर्नाटक सरकारचा भानामतीचा 'बुद्धिवादी शास्त्रीय शोध'

1980 साली गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातील अनेक गावात भानामतीचे प्रकार वरचेवर घडू लागल्यामुळे व या प्रकरणांचा वृत्तपत्रात फार गवगवा झाल्यामुळे त्याचे पडसाद कर्नाटक विधान परिषदेतही उमटले. आणि काही सदस्यांनी लक्षवेधी सुचना मांडून सरकारला या प्रकारांची अधिक चौकशी करण्याचा आग्रह केला गेला. तदनुसार विधान परिषदेचे सदस्य व बंगलोर युनिवर्सिटीचे भूतपुर्व व्हाईस चान्सलर डॉ. एच. नरसिंहय्या (जे भानामती, चमत्कार, ज्योतिष इ. खोटे मानणारे बुद्धिवादी म्हणून ख्यातनाम आहेत.) त्यांच्या नेतृत्वाखाली सात विधानपरिषद सदस्यांची या भनामतीच्या शास्त्रीय शोधासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरोसायन्यसेस’ (NIMHANS)या बेंगलोर येथील विज्ञान संस्थेतील सहा लेक्चरर्स, व पोस्ट गॅज्युएट व रेसिडेंट्स लोकांचे ही सहाय्य घेतले. गुलबर्गा, बीदर जिल्ह्यातील संबंधित बारा गावांना या सर्व मंडळींनी प्रत्यक्ष भेट दिली व दोनशेहून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या. परस्तूर या खेड्यातील सदतीस व्यक्तींच्या शऱीर व मानसशास्त्रीय तपासण्या केल्या आणि 1981 सालच्या प्रारंभी हे इतिवृत्त तयार करून प्रसिद्ध केले.
समितीचा निष्कर्ष
या भानामतीचा अभ्यास करून समितीने जो निष्कर्ष काढला आहे, तो समितीच्याच शब्दात पहा –
“या भानामतीचे बळी बनलेल्या बऱ्याच लोकांची सखोल तपासणी केल्यावर व भानामतीच्य़ा उपलब्ध घटनांची काळजीपुर्वक सखोल छाननी केल्यावर या शोध समितीने असा एकमुखी व ठाम निर्णय काढला आहे, की ही तथाकथित भानामती कोणत्याही अज्ञात शक्तीने घडून येत नाही.” ( हा निश्कर्ष समितीने अधोरेखित केला आहे.)
(त्या प्रकरणातील काही मथळे)

  • समितीची शास्त्रीय जबाबदारी

अशा रितीने ही भानामती कुठल्याही अज्ञात शक्तिने घडून येत नसेल तर कोणत्या ज्ञात शक्तिने घडून येत होती, हे सांगण्याची शास्त्रीय जबाबदारी समितीवर येऊन पडते. ती जबाबदारी समितीने व्यवस्थित पार पाडली आहे काय असा प्रश्न आहे. ... पण खेदची गोट अशी, की या समितीने या घटनांची केवळ सारवासारव केली आहे ... आणि आवश्यक शास्त्रीय तपासणीसारख्या गोष्टींचा नावालाही उल्लेख नाही .... त्याचे सार समितीच्याच शब्दात असे – “Some of the prominent causes (of Banamati) have been fear, ignorance, superstition, personal and family problems, religious feuds and village politics.” (“या भानामतींच्या कारणांपैकी प्रमुख कारणे म्हणजे भीती, अज्ञान, अंधश्रद्धा, वैयक्तिक आणि कौटुंबिय समस्या, गरिबी, धार्मिक वैमनस्य आणि गावचे राजकारण”)

  • याला म्हणतात भानामतीचा शास्त्रीय शोध!
  • मनोव्याधींचा व भानामतीचा निश्चित संबंध काय?
  • समिताची भानामतीचा शास्त्रीय कारणमिमांसा
  • कपडे कसे जळाले?
  • “भानामतीला बळी पडलेली गावे एक जात भ्रमिष्ट!” – इति समिती
  • सुशिक्षित लोक सुद्धा भानामतीवर विश्वास का ठेवतात?
  • शेवटी समितीचा फुगा फुटला !

भानामतीचे प्रकार बंद करण्यासाठी शेवटी समितीने भानामती किंवा चेटूक करणाऱ्यांवर बंदी घालावी अशी सरकारला शिफारस केली आहे. पण नग्न साधूंच्या समाजात कपड्यांवर व शिंप्यांवर बंदी घालावी असे म्हणण्यासारखे हे हास्यास्पद नाही काय? जे मुळातच खोटे आहे, अस्तित्वातच नाही त्यावर बंदी कसली घालता?
भानामतीवर कायद्याने बंदी घालायची शिफारस करून भानामती खोटी नाही हेच समितीने अप्रत्यक्षपणे मान्य केलेले नाही काय?

  • फुटलेल्या फुग्याच्या शेवटी चिंध्या –

ब्रिटिश पार्लमेंटने 1735 साली Witchcraft Act(चेटूक कायदा) पास केला होता. तो चेटूक खरोखरच करण्यात येत असल्यामुळेच, म्हणजे त्यात तथ्यांश असल्यामुळेच पास केला होता.
संपूर्ण प्रकरण येथे वाचा

गुलमोहर: 

नमस्कार सर

परामनशास्त्राबद्दल थोडंसं..

विलक्षण घटनांचं गूढ उकलणारं हे शास्त्र आहे असा अभ्यासकांचा दावा आहे. त्याला मी नाकारीत नाही. पण विज्ञानाच्या कसोटीवर ते सिद्ध झालेलं नाही म्हणूनच वैज्ञानिक कम्युनिटीकडून त्याला मान्यता नाही. मानसशास्त्रज्ञांमधेही केवळ ४% इतकीच मान्यता त्याला मिळाली आहे.

वैज्ञानिक कम्युनिटीकडून मान्यता मिळावी हा अट्टाहास बुचकळ्यात टाकतो. विज्ञान तुमच्यावर बंदी घालत नाही. तुमचे पोटापाण्याचे धंदे बंद करा असं म्हणत नाही तर आमच्या कम्युनिटीकडून मान्यता हवी असल्यास भरपूर मेहनत घ्या, कष्ट करा, डेटा जमवा, अनेकानेक सर्वे करा, अ‍ॅक्स्पेटेबल प्रोसेसेस डिफाईन करा आणि त्यातून गेल्यावर सर्वांना सारखेच रिझल्टस मिळतील असे संशोधन सादर करा इतकेच त्यांचे म्हणणे आहे.

तुमच्या ज्ञानतपस्वींना ( कुठे मिळते हो ही मानसशास्त्रातली पदवी ? ) विचारा टेलिपथीला शास्त्रीय संज्ञा म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्यांनी असे कष्ट घेतले आहेत का ?

गॅलिलिओ पृथ्वी गोल आहे हे सांगण्यासाठी मेला, एका खोलीत संसार करून क्युरी दांपत्याने किरणोत्साचा शोध लावला, प्रा. रूदरफर्ड ने कसलेही सहाय्य नसताना स्वखर्चाने अणूचे मॉडेल मांडले, त्याच्यावर लेख लिहीले, टीका सहन केली आणि नंतर ते सिद्ध झाले. पुढे त्याच्याच शिष्योत्तम असलेल्या नील्स बोहरने त्या मॉडेलमधे असलेली अपूर्णता पूर्ण केली. इथं बाबावाक्यं प्रमाण चालत नाही. न्यूटनसारखा शास्त्रज्ञ पण त्याच्याही प्रमेयांना छेद गेलाच आणि तो वैज्ञानिक कम्युनिटीने मान्य केला. इथं अंधश्रद्धांना मान्यता नाही. न्यूटनने सांगितलं मग त्याला छेद द्यायचाच नाही असं इथं होत नाही. तुमच्याकडे तितकी बुद्धीमत्ता असेल तर तुम्ही स्वतःचं नाणं खणखणीत वाजवून सिद्ध करू शकता. असं रडतराऊ सारखं भोंगळ युक्तीवाद घेऊन फिरत बसावं लागत नाही.

या काय यायचं ते एकदाच. चला टेलिपथी हे शास्त्र आहे हे सिद्ध करून दाखवा..तुम्हाला सन्मान मिळेल. उगाच रडीचा डाव खेळत बसू नका ही नम्र विनंती. थांबवा हे .. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा, पण ते मांडताना बुद्धीवाद किंवा बुद्धीवाद्यांवर आगपाखड करू नका. भानामती हे शास्त्र आहे असले प्रमेय घेऊन तुम्ही बुद्धीवादावर आगपाखड करणार असाल तर मला त्यावर उपरा विनोद सुद्धा सुचत नाही इतका अंगचाच विनोद या सर्व लिखाणात आहे.

गॅलिलिओचं उदाहरण कमिटमेंट साठी दिलंय. सर्वोच्च कमिटमेंट, आपल्या म्हणण्यावर इतकी निष्ठा असेल तर का नाही भानामती पण शास्त्र म्हणून उदयास येणार ? पण आमचे पाय दोन्ही दगडांवरती. बुद्धीवादावर विश्वास नाही इथून सुरूवात करायची आणि विज्ञान हे एक ढोंग आहे इथपर्यंत पोहोचायचं.. पण कसं ? मस्तपैकी मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घ्यायची, पीएचडी करायची आणि विज्ञानाच्या क्षेत्रातच नोकरी करायची.. मग स्थिरता आली कि त्याच विज्ञानावर दुगाण्या झाडायच्या !

भोंदुगिरी म्हणजे काय याची व्याख्या काय याचा विचार करत होतो.. आता त्याची गरज वाटत नाही.

मित्रा,

...भानामती हे शास्त्र आहे असले प्रमेय घेऊन तुम्ही बुद्धीवादावर आगपाखड करणार असाल तर मला त्यावर उपरा विनोद सुद्धा सुचत नाही इतका अंगचाच विनोद या सर्व लिखाणात आहे....

प्रा. गळतगेंनी असे सुचवलेले त्यांच्या लेखनात कुठेही नाही.तसे आपण म्हणताय...

लिखाणात त्यांनी सरकारी अहवालावर फक्त भाष्य केले आहे.
आपण प्रकरण आठ मधील लेखनावर गळतगे यांच्या लेखनातील त्रुटी जरूर दाखवाव्यात. त्यातील काही मुद्दयांवर प्रकाश टाकावा. आपण उपस्थित केलेल्या मुद्यांचा संदर्भ, स्पष्टीकरण प्रा. गळतगे सरांच्या इतर प्रकरणातील लेखनातून सापडेल. म्हणून इथे मी जास्त सविस्तर प्रतिसाद देत नाही.

Kiranyake अतिशय समतोल आणी स्पष्ट लिखाण.

भानामतीवर कायद्याने बंदी घालायची शिफारस करून भानामती खोटी नाही हेच समितीने अप्रत्यक्षपणे मान्य केलेले नाही काय?>>>
जे मुळातच खोटे आहे, अस्तित्वातच नाही - ते खोटे आहे हे समजण्याची अक्कल जर समाजात असती तर बंदी घालायचा प्रश्नच आला नसता. ओकबाबा महाराज भानामती हि खोटी आहे, भानामती करणार्यांनी तो खोटेपणा करु नये म्हणुन बंदी घाला असे म्हणणे आहे.

कायपण आणी कसलेपण युक्तिवाद !

मित्रा,
"भानामती हि खोटी आहे, भानामती करणार्यांनी तो खोटेपणा करु नये म्हणुन बंदी घाला असे म्हणणे आहे."

भानामती खोटी असेल म्हणजेच अस्तित्वात नसेल तर ती करणार कोण? तुला जर असे म्हणायचे असेल की भानामतीच्या नावाने काही गैर प्रकार केले जाणारे पकडले गेले तर त्यंना शिक्षा द्यायला कायदा हवा. पण मग तसा वेगळा कायदा असायची गरज नाही पीनल कोड मधील तरतुदी पुरेशा आहेत. पण त्याकाळी चेटुक विद्याकरून लोकांना त्रास देणाऱ्यांना सजा व्हावी म्हणून तो विशेष कायदा त्याआधी खूप पुर्वी पासून अस्तित्वात होता तो नंतर इंग्लंडच्या राज्यातील लोकांनी अशा केसेस होतात हे मान्य करून तो पुन्हा पास केला होता. असे म्हणतात. असो.
जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे म्हणतात ते खरे आहे.
या धाग्यावर अजून कोणी स्वतःला किंवा त्यांच्या घरातल्या कोणाला आलेल्या अघटित प्रकारांचे कथन सादर केलेले नाही. कदाचित संकोचाने करत नसतील. पण इथल्या सदस्यांपैकी अनेकांना तसा अनुभव आलेला असेल. ही बाब अशी आहे कि त्याचा गवगवा केला जात नाही.असो.

Kiranyake +१ - मुख्यतः <<अ‍ॅक्स्पेटेबल प्रोसेसेस डिफाईन करा आणि त्यातून गेल्यावर सर्वांना सारखेच रिझल्टस मिळतील असे संशोधन सादर करा इतकेच त्यांचे म्हणणे आहे.>>

भारतामधे गॅलिलिओ सारखे कुणाला कधि जाळले/मारले का?

भारतामधे गॅलिलिओ सारखे कुणाला कधि जाळले/मारले का?

गॅलिलिओचं उदाहरण इथं फक्त कमिटमेंटसाठी दिलं गेलंय हे स्पष्ट आहे. अशी कमिटमेंट दाखवून भानामती, जादूटोणा अशी कम्युनिटी वाढवत न्यावी असं म्हणायचं आहे. त्यातून लोकांना रोजगार मिळेल, समाजाचा सर्वांगीण विकास होईल असं दिसलं कि लोक आपोआपच पाठिंबा देतील. मग वैज्ञानिक कम्युनिटीलाच अशा कम्युनिटीकडे जावे लागेल.. गळे काढायची वेळच येणार नाही.

भारतामधे कुणाकुणाला कशासाठी विरोध झाला, वैज्ञानिक दृष्टीकोण होता का ? मुळात शिक्षणाची परवानगी होती का हा विषय वेगळा आहे.

मधली प्रकरणे कुठे गेली ?>>> ती फक्त श्रद्धावान लोकांना दिसतात, बाकीच्यांनी ती भानामती मानावी.

असे अनुभव आलेल्या व्यक्तिंची संख्या प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे.

पृथ्वी सपाट आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो हा माझ्या-तुमच्यासकट प्रत्येकाला रोज येणारा 'अनुभव' आहे. एखादा अनुभव हजारोंना एकाचवेळी आला तरीही ते 'सत्य' असतेच, हे आवश्यक नाही. तेव्हा बहुमताचा युक्तिवाद एकंदर लेखाइतकाच पोकळ आहे.

भानामतीवर कायद्याने बंदी घालायची शिफारस करून भानामती खोटी नाही हेच समितीने अप्रत्यक्षपणे मान्य केलेले नाही काय?

"'क्ष' कंपनीचे जोडे घातले तर आकाशात उडता येते" अशी जाहिरात करणार्‍यावर सरकारने बंदी घातली म्हणजे सरकारला 'क्ष' कंपनीचे जोडे घालून खरोखरच आकाशात उडता येते, हे मान्य आहे- असे होत नाही.
('राजा भिकारी, माझी टोपी घेतली.. डुम डुम डुमाक' ही गोष्ट आठवली.)

ब्रिटिश पार्लमेंटने 1735 साली Witchcraft Act(चेटूक कायदा) पास केला होता.
१७३५ सालच्या ब्रिटिश पार्लमेन्ट अधिकार्‍यांची बुद्धिमत्ता दयनीय होती असे दिसते. २०१२ साली त्या विचारांची भुरळ पडणे हे चिंताजनक आहे.

पुढील लेखासाठी शुभेच्छा.

ओक सर

तुमच्याविषयी संपूर्ण आदर बाळगून असं म्हणावंसं वाटतं..

भानामती अस्तित्वात आहे हे तुमचं म्हणणं. तुम्ही किंवा ज्ञात जे तर्कशास्त्र मांडता त्याच तर्कटाच्या आधारे असंही आव्हान देता येऊ शकतं कि भानामती आहे हे सिद्ध करा. पळपुटे युक्तिवाद नकोत इथं. हा उफराटा न्याय झाला.. एखादी गोष्ट दिसून येत नाही असा निष्कर्ष काढल्यानंतर ती का नाही असं सिद्ध करायची जबाबदारी समितीवर नसून समितीचं काहीतरी चुकतंय असं मानणा-यांवर ती गोष्ट का आणि कशी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदाई असते हा बेसिक नियम लक्षात घ्या. लक्षात घ्या असं उगाचच म्हणतोय, कारण ज्ञात गळतगींचं तर्कट सोयीने पळतय. जरा विचित्रच उदाहरण देतोय पण इथं ते फिट्ट आहे.. एखादी बाई एखाद्याला चारचौघात म्हणू लागली कि मी तुझी बायको आहे आणि तो व्यक्ती ते नाकारू लागला तर त्या व्यक्तीला ती माझी बायको कशी नाही हे सिद्ध करावे लागेल कि आधी त्या बाईला ती त्याची बायको कशी आहे याचे जुजबी का होईना पुरावे द्यावे लागतील ? तुमचे ज्ञानतपस्वी तर त्या व्यक्तीलाच ती तुझी बायको कशी नाही हे सिद्ध करा म्हणतील. अर्थात ज्ञान या शब्दाशी माझा दूरान्वयेही संबंध नसल्याने ज्ञानतपस्वींच्या ज्ञानावर शंका घेणं हा माझा उद्देश नाहीच इथं. आमचे आपले अडाणी ठोकताळे मांडलेत..

चला आता सोक्षमोक्षच लावूयात. भानामती आहे आणि समितीचा निष्कर्ष चुकीचा आहे हा विश्वास कसा आला असावा ? खात्रीची आणि ठाम माहिती असल्याशिवाय नाही ना ? मग त्या ठाम माहितीचा उपयोग करून जाहीर भानामतीचे प्रयोग ठेवा. या प्रयोगाचे बळी होण्यासाठी स्वयंसेवक मिळतील याची खात्री मी देतो. प्रयोग करण्यासाठी तुम्हाला कुणी सापडतंय का सांगा ! बघा, सुवर्णसंधी आहे ही. भानामतीला न्याय मिळवून द्यायचाय आपल्याला. काय म्हणता ?

> चला आता सोक्षमोक्षच लावूयात.

जोक ऑफ द डे! Happy
असं करुन कसं चालेल?

मी देतो भानामतीचे उदाहरण. काही चांगले वाचायला इथे (मायबोलीवर) यावे तर असे भकतेच दिसते. याला भानामतीच म्हणायला हवे.

हे ओककाका त्या ज्ञानतपस्वींचे मिडीयम असल्यासारखे का लिहीतात? म्हणजे "त्यांनी असे लिहीले आहे, त्यात त्रुटी दाखवा" वगैरे. हे स्वतःच तर ... ?

हजारो लोकांना पटतं म्हणजे खरं असतं असं नाहीच. नवा नियाम आहे (तो ही चूकीचाच): विकिपेडीयावर जे म्हंटले असेल ते सत्य. तिथे काय म्हणतात या बद्दल?

ज्ञानतपस्वींनी कडेगावच्या भानामती प्रकरणी तिथल्याच गावक-याने केलेला हा खुलासा. याला उत्तर कोण देणार ज्ञानतपस्वी कि ओकसर ?

http://www.misalpav.com/node/20452

या लेखातल्या प्रश्नांची ज्ञात गळतगी अथवा ओकसर यांनी लवकरात लवकर उत्तरे देणे गरजेचे आहे. हे शक्य नसल्यास गैरसमज पसरविणारे आणि सर्वसामान्यांच्या अंधश्रद्धेस कोणतेही कष्ट न घेता खतपाणी घालणारे लिखाण प्रसृत करणा-या या लेखमालेबद्दल ज्ञात गळतगी यांचेतर्फे ओकसर यांनी वाचकांची बिनशर्त माफी मागावी.

अवांतर : हे प्रा. गळतगी कोण आहेत, त्यांना ज्ञानतपस्वी ही पदवी कुणी आणि कशाबद्दल दिली, ही पदवी मिळण्याचे निकष काय आहेत आणि देणा-यांचे ज्ञानक्षेत्रातील योगदान काय आहे हे जाणून घेण्याची विशेष उत्सुकता आहे. शक्य असल्यास माहिती देण्यात यावी.

या धाग्यावर अजून कोणी स्वतःला किंवा त्यांच्या घरातल्या कोणाला आलेल्या अघटित प्रकारांचे कथन सादर केलेले नाही >>>

मला या नाहि पण तुमच्याच दुसर्या धाग्यावर लिहिलेला अनुभव इथे परत लिहितो. शिवाय दोन्हि धाग्यांवरचे अघटीत अनुभव इथे एकत्र करतो (बाकिच्या सदस्यांचेहि)
१. त्या धाग्यावर भानामती झाली आहे. कोणीतरी मकरंद नावाचा माणुस गायबच झाला आहे. डोळ्यातुन खडे वगैरे येणे फारच छोटी गोष्ट आहे. त्या माणसाच्या हातातुन (म्हणजे लेखणीतुन) शिव्या आल्या त्याहि गायब झाल्या आहेत.
२. अनिल सोनवणे यांना प्रकरण एक आणी सात सोडुन मधली दिसली नाहित. मला प्रकरण एक आणी आठ दिसले, सात दिसले नाहि. त्यांना जे प्रकरण सात दिसले तेच मला आठ दिसले का काय ?
३. आगाउचा एकच लेख तीनदा प्रकाशित झाला
४. आगाउ परवाच कुठल्यातरी धाग्यावर भांडणं चालली होती, ती पहायला गेला तोप्रेंत त्या प्रतिक्रिया गायब होउन भांडणारेच गळ्यातगळा घालून बसले होते.
४. aschig ला काही चांगले वाचायला इथे (मायबोलीवर) यावे तर असे भकतेच दिसते. याला भानामतीच म्हणायला हवे असे त्याला वाटते.
५. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मला दिसतच नाहित.

अजुन किती हवी आहेत ?

माझ्या वरच्या पोस्ट मध्ये हि भानामती झाली आहे. मला दोनदा चौथा मुद्दा दिसतो. तुम्हाला दिसतो का ? मी तर एकदाच चौथा मुद्दा लिहिला होता.