अण्णा हजार्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी 'जनलोकपाल विधेयक' संमत व्हावं, या मागणीसाठी आंदोलन छेडलं, आणि बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सामील झाला. उपोषणं, मोर्चे, चर्चा, वादविवाद असं कायकाय घडू लागलं. या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसलं. या ऐतिहासिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'हा भारत माझा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोव्यात भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला. मायबोली या विचारप्रवर्तक चित्रपटाची माध्यम प्रायोजक आहे.
सुमित्राताई आणि सुनील यांनी कायमच आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं आहे. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. अण्णा हजार्यांचं आंदोलन सुरू असताना हा चित्रपट चित्रीत केला गेला, हे महत्त्वाचं. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जेमतेम एक लाख रुपये खर्च केले गेले, हेही महत्त्वाचं. या चित्रपटनिर्मितीची कहाणी सांगत आहेत सुमित्राताई..
अण्णा हजार्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन छेडलं आणि त्यात लाखो लोक सामील झाले. लोक रस्त्यावर उतरले, आपापल्या गावात, शहरात उपोषणाला बसले, तरुणांनी मोर्चे काढले. वृत्तपत्रांमध्ये पानंच्या पानं भरून हाच विषय, टीव्हीवर चोवीस तास याच आंदोलनाची वृत्तांकनं. हे सगळं मी बघत होते, आणि मला काही प्रश्न पडले. या आंदोलनात सहभागी झालेले त्यांच्या रोजच्या आयुष्यात कधीच भ्रष्टाचार करत नसतील का? केवढ्या मोठ्या संख्येनं लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. भ्रष्टाचाराला विरोध करत होते. हे लोक जर भ्रष्टाचारात सहभागी नसतील, तर फार आनंदाची गोष्ट आहे. पण मग तांबडा दिवा मोडून गाडी दामटणं, उजव्या बाजूनं बिनदिक्कत गाडी चालवणं, नो पार्किंग झोनात गाडी उभी करणं, पोलिसानं पकडल्यावर हळूच एक नोट सरकवणं, बसथांब्यावर, बँकांमध्ये रांगा मोडणं, रस्त्यावर थुंकणं, लाच देणं आणि लाच घेणं हे सारं कोण करतं? ज्या अर्थी आंदोलनात सहभागी झालेले इतक्या जोरकसपणे भ्रष्टाचाराला विरोध करतात, भ्रष्टाचारी राजकारण्यांना विरोध करतात, त्या अर्थी हे आंदोलनकर्ते कधीच कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नसावेत. मग भ्रष्टाचार करणारे नेमके कोण? दुसरं म्हणजे मला वातावरणात सगळीकडे उन्माद जाणवत होता. रस्त्यांवर झेंडे नाचवत, घोषणा देत जाणं, स्वत:बद्दलच्या गैरसमजातून स्वत:लाच चढवून घेणं यांतून आपल्या देशाचं नक्की काय भलं होणार आहे, हा प्रश्न मला सतत छळत होता.
पण तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण मुलं या आंदोलनात सहभागी झालेली पाहून मला आनंदही होत होता. हे आंदोलन अहिंसक होतं, हेही माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. दुकानं बंद करायला लावणं, काचा फोडणं, जाळपोळ करणं असं कुठेही घडत नव्हतं. आणि म्हणून या आंदोलनाच्या निमित्तानं प्रत्येकानं स्वत:च्या आयुष्यात डोकावून पाहणं, मला आवश्यक वाटत होतं. मी भ्रष्टाचार करतो का, जाणतेअजाणतेपणी भ्रष्टाचाराला पाठिंबा देतो का, हे तपासून पाहणं गरजेचं होतं. आपले अनेक राजकारणी आज तिहारच्या तुरुंगात आहेत, त्यांनी केला त्या पातळीचा भ्रष्टाचार नसेल तो. पण कायदे न पाळणं, नियम तोडणं, जबाबदारी झटकणं हाही भ्रष्टाचारच आहे. हा भ्रष्टाचार जर आपण रोजच, सतत करत असू, तर या भ्रष्टाचाराला हळूहळू समाजमान्यता मिळते, किंवा आपल्या मनात या भ्रष्टाचाराच्या बाजूनं अनेक समर्थनं तयार होतात. आणि म्हणून प्रत्येकानं स्वत:ची वागणूक तपासून बघणं मला फार महत्त्वाचं वाटत होतं. हे आंदोलन सुरू होतं तेव्हा मी सारखी टीव्हीसमोर बसून होते. टीव्हीवरची वार्तांकनं, चर्चा बघत होते. या चर्चा बघून, ऐकून आणि मला पडलेल्या प्रश्नांतून, विचारांतूनच एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा मला सुचली. या कुटुंबासमोर एक तशी लहानशी समस्या उभी राहते. ही समस्या सोडवण्यासाठी आपण भ्रष्टाचार करायचा की नाही, या पेचात हे कुटुंब सापडतं. ही कथा सुचली तेव्हा मला वाटलं की, या कथेच्या माध्यमातून आपण स्वत:ला या आंदोलनाशी जोडून घेऊ शकतो. कारण आम्ही चित्रपट बनवतो. रस्त्यावर उतरून घोषणा देण्यापेक्षा हे आंदोलन बघून आपल्या मनात जे विचार येत आहेत, ते चित्रपटातून लोकांसमोर मांडले, तर बरं होईल, असं वाटलं, आणि कथा सुचल्याबरोबर ताबडतोब मी घरात सगळ्यांना ती सांगितली. आमच्याबरोबर नेहमीच काम करणार्या सगळ्या मुलांना ती आवडली. पण चित्रपट बनवायचा तर निर्माता शोधणं, कलाकारांच्या तारखा घेणं, पूर्वतयारी करणं यांत अनेक महिने जातात, आणि इकडे हे आंदोलन तर भरात आलं होतं. त्यामुळे ताबडतोब चित्रीकरण सुरू करायला हवं होतं. पण चित्रपट बनवण्यासाठी पैसे लागतात, आणि आमच्याकडे पैसे अजिबात नव्हते.
चित्रपट बनवणं हे सध्या इतकं खर्चिक झालेलं आहे, आणि दिवसेंदिवस अजूनच खर्चिक होत आहे, की सामान्य माणसाला, आमच्यासारख्या दिग्दर्शकाला चित्रपट बनवणं फार कठीण झालं आहे. तेव्हा चित्रपटाची तांत्रिक बाजू अधिक स्वस्त कशी करता येईल, या दृष्टीनं गेले अनेक महिने आमचा विचार सुरू होता. या चित्रपटाच्या निमित्तानं मग आम्ही कमी खर्चात चित्रपट बनवता येतो का, ते पाहायचं ठरवलं. सुरुवात कलावंतांपासून केली. ’आम्हांला हा चित्रपट तातडीनं करायचा आहे, कारण हे आंदोलन महत्त्वाचं आहे. पण आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही पैसे न घेता हा चित्रपट कराल का’, असं विचारायचं ठरवलं. सर्वप्रथम विक्रम गोखल्यांना विचारलं. मध्यंतरी एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. डॉ. राणी बंग प्रमुख पाहुण्या आणि विक्रम गोखले अध्यक्ष होते. त्या वेळी ते म्हणाले होते की, राणी बंगांसारख्या कर्तृत्ववान मंडळींच्या आयुष्यावर, कामावर चित्रपट तयार व्हायला हवेत. मी आणि सुनील प्रेक्षकांत होतो, आणि आमचं नाव घेऊन ते म्हणाले की, यांनी असा जर चित्रपट केला, तर मी सर्वतोपरी मदत नक्की करेन. ते मी लक्षात ठेवलं होतं, आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही विक्रम गोखल्यांना चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. ते त्यांच्या कामात फार व्यग्र होते. पुढचे दोनतीन महिने त्यांच्याकडे चित्रीकरणासाठी अजिबात तारखा नव्हत्या. पण मी माझ्या कथेविषयी, चित्रपटाविषयी त्यांना सांगितलं, आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा असा की, ते म्हणाले, हा चित्रपट लगेच तयार होणं अत्यावश्यक आहे. मी उद्याच पुण्याला येतो आणि मग आपण बोलू. पण या चित्रपटासाठी तू म्हणशील तेव्हा मी तारखा देईन, हे नक्की.
हे बोलणं झाल्यावर मी आधी लगेच पटकथा लिहून काढली. माझ्या डोक्यात कथानक तयार असलं, तरी पटकथा अजून लिहिली नव्हती. 'उद्याच येतो', असं विक्रम गोखल्यांनी म्हटल्यावर मात्र मला जबाबदारीची जाणीव झाली, आणि मी पटकथा एकटाकी लिहून काढली. म्हटल्याप्रमाणे दुसर्या दिवशी विक्रम गोखले पुण्याला आमच्या घरी आले. मी त्यांना पटकथा ऐकवली. ती त्यांना आवडली. ते म्हणाले, आपण लगेच चित्रीकरणाला सुरुवात करू, कारण आंदोलन सुरू असतानाच चित्रीकरण व्हायला हवं. मग मी उत्तरा बावकरांना विचारलं. त्यांनी ताबडतोब होकार दिला. रेणुका आणि देविका दफ्तरदार तर घरच्याच. ’आसक्त’चे सगळेच कलाकारही नेहमी आमच्याबरोबर असणारे. ओंकार गोवर्धन, आलोक राजवाडे, ओम भूतकर, मदन देवधर यांना ’आपल्याला चित्रपट करायचाय’ एवढंच सांगितलं, आणि ते आले. दीपाताई लागू, जितेंद्र जोशीही लगेच तयार झाले. मानधन न घेता काम करण्याची तयारी प्रत्येकानं दाखवली होती.
कलाकारांचा होकार मिळाल्यावर तांत्रिक बाजूचा विचार सुरू झाला. १६ एमएम फिल्मवर चित्रीकरण करायलाही फार पैसे लागले असते. आमच्याकडे कॅननचा एक सेव्हन डी कॅमेरा आहे. अगदी उत्तम रिझल्ट या कॅमेर्यानं मिळतात. काही मर्यादा आहेत या कॅमेर्याच्या वापराला अर्थात, पण आमचं काम या कॅमेर्यावर उत्तम झालं असतं. मग कोणाशीतरी बोलताना कळलं की, फाइव्ह डी कॅमेर्याचं एक व्हर्शन सेव्हन डीपेक्षा चांगलं आहे, आणि हा कॅमेरा चित्रपटाच्या कॅमेर्याइतके उत्तम रिझल्ट देतो. आम्ही हा कॅमेरा वापरून बघायचं ठरवलं. या मागे दुसरा असा एक विचार होता की, चित्रपट शक्य तितका वास्तववादी हवा असेल, तर त्यातली कृत्रिमता जायला हवी. म्हणजे तांत्रिक बाबींतली कृत्रिमता टाळायला हवी. म्हणून आम्ही फाइव्ह डी कॅमेर्याच्या शोधास निघालो. चित्रीकरण सुनील करेल, असं आम्ही ठरवलं होतं. पण नंतर वाटलं की दिग्दर्शकावर ही जास्तीची जबाबदारी नको. म्हणून आम्ही आमच्याबरोबर काम करणार्या आमच्या नेहमीच्या छायालेखकांना विचारलं. पण नेमकं झालं असं की, संजय मेमाणे, मिलिंद जोग, धनंजय कुलकर्णी हे सगळे दुसर्या कामांमध्ये व्यग्र होते आणि आधी स्वीकारलेली काम सोडून आमच्या चित्रपटासाठी येणं काही शक्य नव्हतं. मग फाइव्ह डी शोधू आणि चित्रीकरण सुनील करेल, या आमच्या आधीच्या निर्णयावर आम्ही परत आलो. फाइव्ह डी भाड्यानं मिळवण्यासाठी आम्ही चौकशी केली, आणि कॅमेर्याचं रोजचं भाडं ऐकून थबकलो. ते भाडं आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. आमच्याकडे जेमतेम लाखभर रुपये होते, त्यात हे भाडं बसणं शक्य नव्हतं. आमचा संकलक आणि मित्र मोहित टाकळकर मग आमच्या मदतीला धावून आला.
उत्तम नाट्यदिग्दर्शक म्हणून नावाजलेला मोहित तेव्हा त्याच्या पहिल्या चित्रपटाची तयारी करत होता. हा चित्रपट फाइव्ह डीवर चित्रीत होणार होता, आणि हे चित्रीकरण करणार होता अमोल गोळे हा तरुण छायालेखक. अमोलनं (अमोल गुप्त्यांचा) ’स्टॅनले का डिब्बा’ हा चित्रपट फाइव्ह डीवर चित्रीत केला होता. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, ट्वेंटियेथ सेंच्यूरी फॉक्ससारख्या बड्या कंपनीनं तो विकत घेतला होता. त्यामुळे फाइव्ह डीच्या दर्जाबाबत आता आमच्या मनात शंका नव्हती. मोहितकडून अमोलचा नंबर घेऊन सुनीलनं त्याला फोन केला. आमच्या चित्रपटाबद्दल सांगितलं. अमोल म्हणाला, "मी आजच सकाळी पुण्यात आलोय, आणि मोहितच्या शूटिंगला अजून वेळ आहे, सध्या तालमी सुरू आहेत फक्त. मी लगेच तुम्हांला भेटायला येतो", आणि तासाभरात तो आमच्या घरी हजर झाला. त्याला विचारलं आम्ही कॅमेरा वाजवी भाड्यानं कुठे मिळेल ते. तो म्हणाला, "कॅमेरा भाड्यानं कशाला घेता? माझा कॅमेरा हा तुमचाच आहे असं समजा. तुम्हांला कॅमेरा आणि कॅमेरामन दोन्ही फुकट. मीच शूट करतो तुमचा चित्रपट". आमचा मोठ्ठा प्रश्न अशाप्रकारे सुटला.
मग कृत्रिम प्रकाशयोजनेला फाटा देता येईल का, याचा विचार आम्ही केला. चित्रीकरणाच्या वेळी उपलब्ध अवकाशाचा फार कमी भाग वापरता येतो, कारण बरीचशी जागा ही मोठाल्या दिव्यांनी व्यापलेली असते. ही प्रकाशयोजना करण्यात वेळ खूप जातो. दिवे एका जागेहून दुसरीकडे हलवायला माणसं लागतात. म्हणजे खर्च खूप वाढतो. शिवाय या प्रखर दिव्यांमुळे कलाकारही अनेकदा अवघडतात. अर्थात तरीही ते उत्तम अभिनय करतात, आणि ही खूप कठीण गोष्ट आहे. पण भवताली दिवे नसतील, तर ते जास्त खुलून अभिनय करतील, असं मला वाटलं. या सगळ्या कारणांमुळे नैसर्गिक प्रकाशातच चित्रीकरण करायचं, असं आम्ही ठरवलं. हेच ध्वनियोजनेच्या बाबतीतही आम्ही केलं. कॅमेर्यावरच ध्वनिमुद्रण केलं, वेगळी यंत्रणा वापरली नाही. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही नेपथ्याच्या बाबतीत घेतला. चित्रपटातलं वातावरण, त्यातली संस्कृती हे कृत्रिमरीत्या तयार केले जातात. आम्ही हे टाळून कथानकामध्ये जसं घर आहे, तसं घर शोधायचं, आणि आहे तसं वापरायचं ठरवलं. हेच कपडेपटाच्या बाबतीतही. रंगभूषा तर एरवीही आम्ही शक्यतो टाळतोच. यावेळी आम्ही कलाकारांसाठी कपडे विकत घेतले नाहीत. कलाकारांनी त्यांच्या घरचे, रोजच्या वापरातले कपडे चित्रपटासाठी आणले.
अशी पूर्वतयारी सगळी झाली दोन दिवसांत, आणि मग आम्ही सर्व कलाकारांना बोलावून मीटिंग घेतली. पटकथेचं वाचन केलं. वाचनाच्या वेळी काही त्रुटी लक्षात आल्यावर पटकथेवर मी पुन्हा एकदा हात फिरवला. सारस्वत कॉलनीतल्या एका घरात आम्ही बरंचसं चित्रीकरण केलं. मध्यंतरी आम्ही दूरदर्शनसाठी अभिजात साहित्यावर आधारित एक मालिका केली होती, आणि त्या मालिकेच्या एका भागाचं चित्रीकरण आम्ही सारस्वत कॉलनीतल्या एका घरात केलं होतं. त्या घराच्या खाली हे घर होतं. घरातल्या वस्तू न हलवता आम्ही चित्रीकरण केलं. अगदी वेगानं आमचं काम सुरू होतं. पंधरा दिवसांत जवळजवळ ८०% चित्रीकरण आम्ही आटपलं. चित्रीकरण सुरू झाल्यावर कसल्याशा कामासाठी एक दिवस किशोर कदमचा फोन आला. ’सध्या नवीन काय?’ असं त्यानं विचारलं. त्याला सांगितलं मी आमच्या चित्रपटाबद्दल.
’मग मला का नाही सांगितलं? मला का नाही बोलावलं?’
’अरे, आमच्याकडे पैसे नाहीत. पण येतोस का तू? चित्रीकरण सुरू आहे अजून’.
’उद्याच येतो’.
आणि म्हटल्याप्रमाणे दुसर्या दिवशी किशोर हजर झाला. त्याला डोळ्यासमोर ठेवून मी एक प्रसंग लिहिला, आणि तो आल्यावर लगेच चित्रीत केला.
हा चित्रपट खरं म्हणजे आम्हांला सलग चित्रीत करायचा होता. पण काही अडचणी आल्या आणि त्यामुळे सलग चित्रीकरण आम्हांला करता आलं नाही. तरीही दीडदोन महिन्यांत आम्ही सगळं चित्रीकरण संपवलं. रस्त्यावरचं आंदोलन आम्हांला चित्रीत करता आलं हे महत्त्वाचं. वीरेंद्र वळसंगकरनं चित्रपटाचं संकलन केलं, आणि शैलेंद्र बर्वेचं पार्श्वसंगीत आहे. अण्णा हजार्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. चित्रपटातल्या कुटुंबात आईवडील आणि त्यांची तीन मुलं आहेत. दोन मुलगे आणि एक मुलगी. मुलगी मोठी. तिचं लग्न झालं आहे, आणि सध्या बाळंतपणासाठी ती माहेरी आली आहे. या घरात एक समस्या निर्माण झाली आहे. फारशी गंभीर नाही ही समस्या, आणि तीतून मार्ग काढता येत नाही, असंही नाही. पण बाहेर अण्णांच्या आंदोलनाचं वारं ऐन भरात आहे. घरातल्या टीव्हीवरही हे आंदोलन दिसतं आहे, आणि प्रत्येकजण जसं जमेल तसं टीव्हीवर हे आंदोलन बघतो आहे. अनेक तर्हेच्या लोकांचे अनेक तर्हेचे विचार हे कुटुंब ऐकत असतं. घरातल्या तरुण पिढीला तर हे आंदोलन फार महत्त्वाचं वाटतं. या देशाचा नागरीक म्हणून माझी भूमिका काय असावी, माझं कर्तव्य काय, मी या समाजाचा घटक आहे, म्हणजे नेमकं काय, लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीत संसदेचं स्थान काय, मतदार म्हणून माझी जबाबदारी काय आणि माझे हक्क कुठले, या सगळ्या विषयांना हे आंदोलन स्पर्श करत होतं, आणि या देशव्यापी आंदोलनाच्या निमित्तानं समोर आलेले मूलभूत विचार ही तरुण पिढी ऐकते, त्यांवर विचार करते, आणि अंतर्मनात डोकावून पाहते. रस्त्यावरचं, टीव्हीवरचं आंदोलन आणि या तरुणांचे विचार यांचं नातं या चित्रपटातून पुढे येतं.
चित्रीकरण सुरू असताना आणि पूर्वतयारीच्या वेळीही टीव्ही सारखा सुरू असे. यावेळी आमच्या जोरदार चर्चा रंगत. प्रत्येकाची राजकीय, सामाजिक मतं निराळी. आंदोलनाविषयीही भूमिका वेगवेगळ्या. गंमत अशी की, आंदोलनाविषयी चटकन भूमिका घेता येत नाही, आणि त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही, अशी परिस्थिती. त्यातून होणारे वादविवाद फार मजेशीर होते. आंदोलनाच्या काळात आम्ही घरात सतत आयबीएन-लोकमत हीच वाहिनी बघत होतो. निखिल वागळे ज्या तर्हेनं सगळ्या बाजूंनी या आंदोलनाविषयी माहिती, विचार मांडत होते किंवा विचारवंतांशी, कायदेतज्ञांशी, राजकारण्यांशी संवाद साधत होते, ते खूप आवडत होतं आम्हांला, आणि म्हणून आम्ही या वाहिनीला विचारलं, की आम्ही अशाप्रकारचा एक चित्रपट करत आहोत, तर तुम्ही तुमचं फूटेज आम्हांला वापरायला द्याल का? कथानकाची गरजच होती ती. त्यांचं ताबडतोब उत्तर आलं की, काहीच हरकत नाही, बिनदिक्कत आमचं फूटेज वापरा. आंदोलनाच्या काळात अण्णा, त्यांचे सहकारी, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते, मेधा पाटकर, अभय बंग यांसारखे सामाजिक कार्यकर्ते, नंदन निलेकणी, अझीम प्रेमजी असे उद्योगपती आणि असंख्य सामान्य नागरीक टीव्हीवर आपली मतं मांडत होते, आणि ही सारी मतं मला आमच्या चित्रपटात समाविष्ट करता आली.
अण्णा हजार्यांचं आंदोलन फार महत्त्वाचं होतं, यात शंकाच नाही. पण भ्रष्टाचार संपवण्याचा तो एकमेव मार्ग आहे का, याचा विचार व्हायला हवा. मुख्य म्हणजे भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर सुरुवात आपल्या स्वतःपासूनच व्हायला हवी, आणि त्यासाठी भ्रष्टाचार म्हणजे केवळ मोठ्ठी आर्थिक फसवणूक नव्हे, हे लक्षात घ्यायला हवं. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही काही मतं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणार्या या आंदोलनात आम्ही आमच्या पद्धतीनं सामील झालो आहोत. हा चित्रपट म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, अशी आमची इच्छा आहे.
सुरेख.
सुरेख.
वा!! या सिनेमातील मध्यवर्ती
वा!! या सिनेमातील मध्यवर्ती कल्पना खूप आवडली !! सद्य परिस्थितीची जाण ठेवून लगोलग त्यावर चित्रपट काढून निर्माता,निर्देशक,कलाकारांनी त्यांची सामाजिक जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडलेली दिसत आहे.
या चित्रपटाला खूप शुभेच्छा!!!
लवकरच आम्हालाही पाहायला मिळो अशी आशा करत आहे!!
Pages