याला म्हणतात नशीब....

Submitted by कौतुक शिरोडकर on 27 March, 2009 - 06:44

प्रताप नाईक

कधी कधी वाटतं की आपलं नशीब जोरावर आहे, कारण सगळं कसं मनासारखं घडत असतं. पण चालता-चालता असं एक वळण येते की सगळेच मार्ग तिथे संपलेले असतात. असतो तो फक्त एक डेड एन्ड. भविष्यात काय वाढून ठेवलय हे जर कळलं असतं तर आयुष्य जास्त सोपं झालं असतं. नाही का ? पण सगळं कसं मनासारखं होईल ? वाट म्हटली की वळण आहेच.
मी प्रताप... प्रताप नाईक. माझ्या आयुष्यातलं हे वळण आलं ते साधारण महिन्यापुर्वी. नेहमीप्रमाणे संध्याकाळी मी ऑफिसमधून निघालो ते तडक मरिन लाईन्सला पोहोचलो. संध्याकाळ बरीच सरली होती. मेघना... माझं लेटेस्ट अफेयर... मी सांगितलेल्या जागेवर बसून चणे खात टाईमपास करत होती. तिच्या त्या ’जीन्स टीशर्ट’ च्या आऊटफिटमध्ये नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. तिला पिक अप करून निघालो ते सरळ गिरगाव चौपाटीला. दोन शहाळी घेऊन आम्ही एका आडोशाला बसून दुसर्‍या दिवशीचा कार्यक्रम ठरवत होतो. खरं तर असं ’पब्लिक प्लेस’मध्ये बसणं माझ्यासाठी रिस्की होतं. ओळखीची माणसं नको तेव्हा कडमडतात हा सर्वसाधारण नियम आहे. शिवाय अशावेळी ओळख दाखवण्याची काहींची हौस फारच दांडगी असते. मी गाडी ’सनसेट’ पबला फिरवणार होतो पण मघ्येच मेघनाने समुद्रावर जाण्याचं टूमणं लावलं. तिला ते वाळूत बसून समुद्र पहायला आवडतो म्हणे. जास्त रॉमेंटीक वाटतं. यात कसला आलाय रोमान्स ? डोंबलाचा. पण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तिला नाराज करणे परवडणारे नव्हते. बरेच कष्ट पडले होते तिला पटवण्यात. म्हणून मग बसलो वाळूत.
"मग उद्याचं नक्की ?" तिने विचारलं. माझं लक्ष मात्र आमच्यापासून दोन हात अंतरावर बसून सुर्यास्ताचे, समुद्राचे वा होडीचे.... यांच्यापैकी कोणाचेतरी किंवा अजून कसलेतरी फोटो काढण्यात रमलेल्या ध्यानाकडे गेले. ढगळ सदर्‍यातल्या त्या अवताराकडे कॅमेरा मात्र उत्कृष्ट होता. बहूधा कॅननचा. तो स्वत:च्या तंद्रीत फोटो काढण्यात मग्न. मी त्याच्या हालचाली न्याहाळत होतो. मला सारखं वाटत होतं की त्याचं लक्ष आमच्याकडेच आहे म्हणून. ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं.
"प्रताप" मेघनाने आवाज दिला. मी तिच्याकडे वळलो."अरे, काय विचारतेय मी ? उद्याचं नक्की ना ?" त्या फोटोवाल्याकडे नजर टाकून ती पुन्हा माझ्याकडे वळली.
"शंभर टक्के. उद्या तुझा वाढदिवस म्हणजे फक्त सेलेब्रेशन. नथिंग एल्स. बोल तुला काय हवय ?" मी आता त्या ध्यानावरची नजर वळवून पुर्णपणे तिच्या नजरेत रमलो.
"काय देशील ?" तिने थट्टेने विचारलं.
"तुला काय हवय ?" मी तिच्या जवळ येत म्हणालो.
"हाऊ अबाऊट सम डायमंड, प्रताप ? " तिने संधीचा पुर्ण फायदा उचलला. त्याबाबतीत तिचा हात धरणारी अजून तरी मला कुणी भेटली नव्हती. ऑन अदर हॅंड, तिच्याएवढी देखणी अजून कोणी भेटली देखील नव्हती. त्यामुळे थोडक्यासाठी गोल्डन चान्स घालवायचा नव्हता.
"डायमंडस आर फोरेव्हर." कोणत्यातरी जाहीरातीतील वाक्य फेकून मी तिला खेटलो. तिच्या इतक्या जवळ आल्यावर माझ्या नकाराचा प्रश्नच नव्हता. माझा होकार मिळताच ती आनंदाने उसळली आणि हातातले शहाळं फेकून तिने मला मिठीच मारली. मीही माझे हात मोकळे करून तिच्याभोवती टाकले. ते ध्यान अजूनही कॅमेराच्या कसरती करत होते. यावेळेस बहूधा त्याच्या रेंजमध्ये पाण्यात एकमेकांच्या मागे धावणारे जोडपे होते.
"प्रताप, त्या माणसामध्ये असं काय आहे म्हणून तू सारखा त्याच्याकडे पहातोयस ? " मेघनाने माझी हालचाल नेमकी हेरली.
"काही नाही. सहज. त्याचा कॅमेरा फार सुंदर आहे." मी पुन्हा तिच्याकडे वळलो. " तू काय म्हणत होतीस ? " मी विचारलं.
"हेच की या अवस्थेत जर तुझ्या बायकोने पाहीलं तर काय होईल ? " तिने दात विचकून विचारलं. पण मला ती थट्टा आवडली नाही. आवडण्यासारखं काही नव्हतच त्यात. मी काही न बोलताच, माझ्या चेहर्‍यावरच्या बदललेल्या हावभावावरून ते तिच्या लक्षात आलं.
"सॉरी." तिने कान धरले. तिच्या चेहर्‍यावरचे निरागस भाव इतके अप्रतिम होते की मला राहवलं नाही..... आणि ती मागे सरली.
"चल निघूया. उद्या आपल्याला जायचयं." ती उठली व कपडे झाडू लागली. मागोमाग मीही कपडे झाडत उठलो. .... त्रास असतो असं वाळूत वगैरे बसणं म्हणजे. शुजमध्येही वाळू गेलेली. घरी जर चुकून सुलूने पाहीलं तर..... घरी पोहोचायच्या आत थाप तयार करून ठेवावी लागेल. ध्यान मात्र अजून तिथेच बसून होतं. आपल्याच नादात.
"उद्या सकाळी बरोबर अकरा वाजता इरॉसला भेट. आय विल बी देअर." मी तिला निघता-निघता पुन्हा आठवण करून दिली. तिला दादरला सोडून मी पुढे निघून गेलो.

मेघना

वाव ! डायमंडस..... !!!!!

मक्या

आपण मक्या... म्हणजे साला पाळण्यात घातला तेव्हा मकरंद. पण मक्याच म्हणतात आपल्याला सगळे. धा वर्षापुर्वी आपला बाप जाता-जाता आपल्याला एक कला शिकवून गेला. फोटोग्राफी. आपण पण शिकलो. बाकी शिक्षणात आपल्याला काय रस नव्हताच. पण फोटोग्राफी मात्र दिलसे शिकलो. त्यानंतर बरेच फोटो काढले. लग्नाचे, बारशाचे, साखरपुड्याचे, प्रोग्रामचे, चिकन्या थोबड्यांचे, सडकछाप लोकांचे........चिक्कार फोटो. पण साली कडकी मात्र कायम खिशात ठाण मांडून बसलेली. बकवास लाईफ. अरे आपल्याला पण वाटतं ना, स्टाईलमध्ये राहायचं..... मस्त भटकायचं... फोरेनची प्यायची... फाईव्ह स्टारमध्ये चेपायचं... चार चाकीतून चक्कर मारायची.... फालतूमध्ये हॉर्न मारायचा.... लोक साली कसली कसली मजा करतात आणि आपण काय तर ... नुस्ते फोटो खेचतोय. नशीवाच्या बैलाला....... पण नशीब आपल्यावर एक दिवस फिदा झालं, भाऊ ! तो आपलं नशीब लिहीणारा खाडकन जागा झाला आणि आपल्याला शश्या भेटला. शशिकांत गावडे. आर. टी. ओ.त असतो. तो भेटला आणि आपल्या लाईफची लाईनच कंप्लिट चेंज झाली. गावडे काय बोलला म्हायीताय...." मक्या, हा जो एरिया हाय ना... इथे तुला सगळ्या प्रकारची लफडेबाज माणसं भेटतील. इथे सरकारी लोक आहेत, तसेच प्रायव्हेट कंपन्यातून हजार लाख घेणारे पण हायेत. तुझ्याकडे मस्त हुनर आहे बघ. तू झकास फोटो काढतोस. अशा लोकांचे फोटो काढ. त्यांच्याकडे टेबलाखालचा पैसा बराच असतो. तो खर्च कसा करायचा हा प्रश्न त्यांना नेहमी सतावतो. अशा लोकांना आपण मदत करायची." शश्या बोलला आणि आपण तेव्हाच ठरवलं. बसं झालं. आता कान आणि डोळे उघडे ठेवायचे आणि आपल्या कलेचा चांगला वापर करायचा. शश्याने आपल्याला फुल टिप दिली या धंद्याची. पण त्याचा साल्याचा एक प्रोब्लेम होता. दुनियाभरचे नाद होते त्याला. कायम साला पैशासाठी रडायचा. जेव्हा भेटायचा तेव्हा हात पुढे. द्यायला लागायचे. धंद्यात पार्टनर ना. आतापर्यंत जेवढ्या लोकांना कापला त्यात ९०% कस्टमर त्याने दाखवलेले. त्यामुळे मामला कसा ५०-५० चा. त्यातच त्याने एक लोचा केलेला. आर.टी.ओ. त कामाला लावतो म्हणून बर्‍याच जणांकडून माल घेतलेला आणि ते सगळे पाठी लागलेले. पैसे दे म्हणून. लागला माझ्या मागे, त्याला माहीत आपली सेविंग हाय ती. आपण पैसा जमवलेला. भरपूर नसला तरी आपल्यासाठी जाम होता. कधी कधी वाटायचं कोण तरी मोठा बकरा मिळायला पायजेल आणि नशीबाने पुन्हा साथ दिली. म्हैन्यापुर्वीची गोष्ट....
काय झालं की आपण जाम पिकलो होतो. म्हटलं चला..... चौपाटीला टाईमपास करू. पोचलो गिरगाव चौपाटीवर. वाळूत आडवा झालो. आपल्याला हे फार पुर्वीपासून आवडायचं, असं वाळूत आडवं होणं. मग बसलो फोटो काढत. थोड्या वेळाने आपल्यापासून दोन हात अंतरावर ते दोघे बसले. नेहमीची ती टिपीकल लव स्टोरी... पण या स्टोरीतले हिरो-हिरोइन कॉलेजवाले नव्हते. हा प्रकार वेगळाच होता. लावला एक कान त्यांच्याकडे. त्याच्या आयटमने डायमंड डिमांड केला आणि तो हिरो फटाफट ’हो’ बोलला. तिच्या तर .... आपल टाळकं तिथेच ठणठणलं. म्हटलं, काहीतरी लोचा आहे इथे भिडू. कान त्यांच्याकडे तसाच ठेऊन लागलो ऍंगल घ्यायला. आपला डाउट चुकला नाय. चुकणार कसा... आपली स्पेश्यालिटी हाय यात. माणूस धंद्यात पडला की शिकतोच ना, पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो तसा. ती आयटम त्याची बायको नव्हतीच.
याला म्हणतात सालं नशीब. लाईफमध्ये फर्स्ट टाईम शिकार स्वत:हून चालत हजर. पार्टी तगडी होती यात काय डाऊट नव्हता. ती कबुतरांची जोडी निघाली, तसा आपणपण सुमडीत निघालो मागून. त्याने त्याची होन्डा सिटी काढली आणि आपण आपली डायरी. गाडी नंबर नोट केला व ताबडतोब शशिला डायल केला.
"शश्या, उद्या या नंबरची आपल्याला सगळी रामकहाणी पायजे."
दुसर्‍या दिवशी सकाळी इरॉसला. ती उभीच होती. एक्दम टकाटक आयटम. साला कोणी पण घसरेल. त्याची गाडी आली आणि फर्स्ट क्लिक. दोघेही आपल्या कॅमेर्‍यात बंद. तीन-चार फोटो तिथेच टाकले. त्यांची गाडी निघाली. आपली सुमो तयार होतीच..... साला लखन्या काय गाडी चालवतो.... एका मिनिटासाठीपण पार्टी आपल्या टप्प्यातून सुटली नाय. त्याला दोनशे रुपये एक्स्ट्रा दिले आपण... डायरेक्ट लोनावळा. संध्याकाळपर्यत त्यांच ते ’प्रायव्हेट लाईफ’ कंप्लिट आपल्या कॅमेर्‍यात कैद होतं. एकदम कंप्लिट. कारण पार्टीने रुम बुक केला तो पण साला आपल्या गफूरभाईच्या ’लव्हबर्डस’ मध्ये. याला म्हणतात नशीब. शशीने त्याच काम एक्दम चोख केलं. घरचा, ऑफिसचा पत्ता, फोन नंबर सगळं तयार. वर न विसरता बोलला..’मक्या, आपल्याला विसरू नको.’. ही याची सवय एक्दम खराब. पैशासाठी जीव घालवतो साला. तरी याला कधी हप्ता चुकला नाय आपला.

शशिकांत गावडे

मक्याने तगडी पार्टी पकडलीय. यावेळेला मोठा हात मारणार. पैसा नुसता कुजवतोय बॅंकेत. वापरायची अक्कल नाय गाढवाला. पंधरा दिवस झाले याच्याकडे पाच लाख मागून. पण अजून तंगवतोय. एकदा सगळ्यांच्या तोंडावर मारले की सगळा लफडाच संपेल. मॅटर वरपर्यंत गेला तर नोकरी जाईल. मक्याला काहीही करून पटवला पाहीजे. पाच लाखाचा प्रश्न आहे.

प्रताप नाईक

इंटरकॉम वाजताच मी स्पीकर ऑन केला.
"यस ? "
"सर, कोणी मि. मकरंद आलेत. त्यांना तुम्हाला भेटायचय." नेहा. आमच्या ऑफिसची ऑपरेटर. मस्त दिसते पण ऑफिसमध्ये लफडं नको म्हणून ट्राय नाही केली.
"अपॉइंटमेट आहे का ? " मी पाकीटातली मार्लबोरो काढत विचारलं.
"नाही सर." नेहा.
"मग जाऊ दे. अपॉइंटमेंट दे त्याना नंतरची." मी इंटरकॉम कट केला व सिगरेट शिलगावली. परवाचा दिवस मस्त गेलेला मेघाबरोबर. मी अजूनही त्याच तारेत होतो. तेवढ्यात पुन्हा इंटरकॉम वाजला.
"यस? " मी धुराची वलये सोडत बोललो.
"सर त्यांना एक मिनिट बोलायचय तुमच्याशी." नेहाच्या आवाजावरून वाटलं की काहीतरी गडबड आहे.
"ठिक आहे. दे. " दोन-तीन सेकंदातच एक अनोळखी आवाज कानावर आला.
"नमस्कार साहेब, तुमच्यासाठी एक पार्सल आहे."
"ठेवा तिथे रिसेप्शनला." मी त्याला बोललो.
"नाही ठेवू शकत साहेब. महत्त्वाचं आहे. पर्सनली डिलिव्हरी घेतलीत तर बरं होईल." आवाजात विनंती होती.
"ठिक आहे. रिसेप्शनला फोन द्या." मी एक कश घेतला.
"यस सर...? " नेहा.
"बबनबरोबर पाठव त्याला." मी इंटरकॉम डिसकनेक्ट केला. साधारण पंधरा मिनिटांनी तो माझ्यासमोर होता. शिडशिडीत बांधा. वाढलेले कुरळे केस. दाट मिशा. वाढलेले दाढीचे खुंट. ढगळ सदरा. चेहरा ओळखीचा वाटला मला. पण आठवेच ना.
"बोला, काय पार्सल आहे ? " मी खुर्चीवर रेलत विचारलं.
"हे घ्या साहेब." त्याने एक ए-४ साईजचे खाकी पार्सल पुढे केले. मी पार्सल घेतले.
"ठिक आहे. तुम्ही निघू शकता." मी त्याला इशारा केला. पण तो जागचा हलला नाही.
"साहेब, चेक तरी करा. सगळं नीट हाय की नाय ते." त्याने पुढे सरून विनंती केली. मी पार्सल उचलून उघडले. आत पाहीले. त्यात फोटो होते. मी त्याच्याकडे पाहीलं. त्याच्या चेहर्‍यावर आता भाव बदलले होते. स्मित झळकत होते. मघासचा अजिजीचा भाव बिलकुल नव्हता. मी फोटो बाहेर काढले. क्षणार्धात त्या १६ डिग्री टेंपरेचर असलेल्या कॅबिनमध्ये मला दरदरून घाम फुटला. पहिलाच फोटो ... मेघना आणि मी हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये बोलत होतो तो होता. मी घाईघाईने पुढचे फोटो चाळले. बस....... आणखी नको. मी फोटो पुन्हा त्या खाकी पाकीटात सारले. काय बोलावं तेच सुचेना.
"हे घ्या साहेब." मी वर पाहीलं. त्याच्या हातात टिश्यु पेपर होते. "घाम पुसा." डोक्यात संतापाची तिडीक उठली.
"यु बास्टर्ड.............. " मी तिरमिरीतच खुर्चीतून उठलो.
"शिवी नाय. ऑफिस आहे साहेब. शांत व्हा." त्याने हाताच्या इशार्‍यावर मला थांबवलं. मलाही आपण काय करायला चाललो होतो ते लक्षात आलं. मी थांबलो. पण मेंदू थांबायला तयार नव्हता.
"मी बसू का ? " त्याने विचारलं आणि मी काही बोलायच्या आतचं तो बसला. तो मिश्किलपणे माझ्याकडे पहात होता आणि मी आता ह्याच्या डोक्यात नेमकं काय घालू या विचारात होतो.
"बसा साहेब." त्याने बसण्याचा इशारा केला आणि माझ्याच नकळत मी बसलो. त्याच्या जाळ्यात तर मी फसलो होतोच. आता काहीही करण्यात अर्थ नव्हता. एक तर आम्ही ऑफिसमध्ये होतो व दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यात काय आहे ते अजून कळलं नव्हतं. हे ते कॅमेरावालं ध्यान हे आतापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. यापुढे नो पब्लिक प्लेस. पुन्हा हा मुर्खपणा नाही. नकळत मेघनाला मनातल्या मनात शिव्या हासडल्या.
"शिव्या घालू नका साहेब. आवडत नाय आपल्याला." त्याने चेहरा वाचला माझा.
"तुला नाही. स्वत:ला घालतोय." मी रागावर पुर्ण ताबा ठेवत बोललो.
"मग चालेल." तो हसला. मी त्याच्यावर नजर रोखून होतो आणि तो मला वाचण्याचा प्रयत्न करतोय हे माझ्या लक्षात यायला लागलं. आता या क्षणी त्याची इच्छा जाणून घेणे जास्त महत्त्वाचे होते. त्याचा अवतारावरून तर तो एक सर्वसाधारण ब्लॅकमेलर वाटत होता. यात अजून काही मेख नसावी. म्हणून मग मीच मुद्द्याला हात घातला.
" किती हवेत ? "
"आपल्याला हप्त्याला कमीत कमी पाच हजार लागतात आणि यात भाव-ताव नाय. फिक्स रेट." तो हसत बोलला. मी काहीच बोललो नाही. पाच हजार म्हणजे काही जास्त मोठी रक्कम नव्हती. पण ती दर आठवड्याला आणि असे आठवडे तरी किती.... पण त्याच्या त्या डिमांडने ही गोष्ट क्लियर झाली की हा या खेळातला नवखा खेळाडू आहे. पण तुर्तास माझी शेंडी त्याच्या हातात होती. त्यामुळे गाढवाचे पाय धरणे भाग होते.
"उद्याला येतो. याच टायमाला. येतो साहेब." नमस्कार करून तो गेला. मी पार्सल बॅगेत सारलं. सिगरेट शिलगावली. नजर काचेपलिकडे गेली. बाहेर समुद्र आज एकदम शांत होता आणि मी त्याला बाटलीत कसा उतरवता येईल याचा विचार करू लागलो.

मक्या

आजपर्यंत बर्‍याच लोकांना कॅमेर्‍याच्या जीवावर नाचवलं. पण ते सगळे साले हजारपत्तीवाले. तसा आपला डिमांड पण एक्दम लो असायचा. जास्त घेऊन तरी साला करणार काय ? बॅंकेत तशी सॉलिड जमा झालेली आता. कमी मागितले की देणारा जास्त च्यांव च्यांव करत नाय. वर साला पोलिसाचा पण लोचा नाय. सुमडीत काम करायचं. बोंबाबोंब नाय पायजेल. पण ही आपली नवी पार्टी एक्दम सॉलिड. म्हणून पाच हजार बोललो. डायमंड देतो आयटमला. त्याला पाच हजार म्हणजे किस झाड की पत्ती. या टायमाला निशाना परफेक्ट लागला. नशीबाने ही आठवड्याला खुलणारी लॉटरी लागली. आतापर्यंत टोटल चार हप्ते झालेत आपण पैसे घेतोय. पण हा साला माणूस थोडा डेंजर वाटतोय. आतापर्यंत एवढ्या लोकांना ब्लॅकमेल केलय पण हा थोडा टेढी खीर वाटतोय. साला, बोलतो कसा,’ हे जास्त होतयं. एकदाच काय ते घे आणि संपव.’ येडा समजतो काय आपल्याला ? सोन्याची कोंबडी कोण कापतो काय ? हप्त्या-हप्त्याला अंडी मिळतात ना... मग टेंशन कशाला घ्यायचा ? आज पाचवा हप्ता. आज साल्याला चांगला पिळून काढूया. नरिमन पॉईंटला ऑफिस हाय त्याचं. मस्त बिल्डींग. फुल काचेची. जिकडे बघावं तिकडे आरशे लावलेत.
त्याच्या ऑफिसला पोचलो आणि आपल्याला बघीतल्याबरोबर त्या पोरीने त्याला फोन लावला. ही पोरगी पण एक्दम खल्लास हाय यार. एक्दा ट्राय करायला पाहीजे. नेक्स्ट टाईम येताना मस्त टकाटक येऊया. दिली लाईन तर दिली. पोरीनं फोन ठेवला आणि पाच मिनिटात आपण त्याच्या कॅबिनमध्ये. काय साला टकाटक कॅबिन हाय. स्टाईलमध्ये एक्दम. साला, दिसतो पण एक्दम शारूख. उगाच नाय पोरी पटत.
"हे घे." आपल्याला बघीतल्याबरोबर पैशाचं पाकीट त्यानं टेबलावर फेकलं. आपल्याला फेकलेल्या पैशाचा काय प्रोब्लेम नाय. आपण साला आमिताभ थोडी हाय जो फेके हुये पैसे नही उठाता. जोक मारला. आपण पैसे उचलले आणि बोललो, " साहेब, या टाईमाला थोडे जास्त पाहीजे होते."
"किती ? " तो बोलला. आयच्यान, काय माणूस हाय. बिल्कुल खिटखिट नाय. सरळ विचारतोय
' किती ?’. सही एक्दम. पैला कस्टमर हा आपला जो साला खिचखिच नाय करत. अशा कस्टमरला जास्त त्रास नाय द्यायचा.
"धा हजार" आपण पटकन बोललो.
"आता नाहीत. तू नेहमी नेतोस तेवढेच ठेवलेले मी." तो बोलला. आपण काही बोलणार तोच त्याचा मोबाईल वाजला. त्याने फोन घेतला. नोकीयाचा फोन होता. पण कवर नाय त्याला. शश्याने मोबाईलला मस्त लेदर कवर घातलय. इम्पोर्टॅड. मला नवीन आणून देतो बोललेला. विचारला पायजे त्याला.
"बोलतोय........ नाही. आता मी मिटींगमध्ये आहे.............. काम आताच करायचयं............ थांबलोय मी. या तुम्ही. खाली पोहोचलात की फोन करा. " त्याने फोन ठेवला आणि तो आपल्याकडे वळला.
"हे बघ. फक्त एकच सौदा कर. एकदाच आणि ही भानगड संपव. तुझ्या अशा सारख्या येण्याने इथे कुजबूज वाढली आहे. किती हवेत ते सांग आणि घेऊन जा. बोल लवकर." दोन्ही हात टेबलावर ठेवून तो बोलला. एक्दम स्ट्रेट ऑफर. गोल्डन चान्स. आयला, गावड्या बरोबर बोलतो, ’इथे लोकांकडे भरपूर पैसा हाय.’
"धा द्या." आपण दगड मारला.
"जास्त होतात. अंथरूण पाहून पाय पसरावे माणसाने. पाच देतो. उद्या याच वेळेला येऊन घेऊन जा. सगळे फोटो, निगेटिव्हज.. सगळं काही उद्या मिळायला हवं. फायनल डिल." तो बोलला.
आयला, पाच लाख. तेही एका फटक्यात. आतापर्यंत कधी मोठा हात मारला नव्हता. थोडक्यात भागायचं आपलं. आपला कस्टमर एकदम नंगा झाला की शेवटी त्याल एक कॉपी द्यायची आणि खुष करून टाकायचं. आपली नेहमीची स्टाईल. पण एवढे नव्हते मिळालेले कधी. याला म्हणतात सालं नशीब.
"ठिक हाय साहेब. उद्या येतो." आपण उठून जायला उभे राहीलो तसा साहेब बोलला.
"बस." आपण बसलो. " कॉफी घेणार ? " साहेबाने विचारलं.
आयला, एवढी इज्जत तर साला गावडेनी पण आपल्याला दिली नव्हती.
"कॉफी ? " आपला आपल्या कानावर विश्वासच बसला नव्हता.
"हं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. आयुष्यातला फार महत्त्वाचा धडा तुझ्यामुळे शिकलोय आणि ज्यांच्याकडून मी काही शिकतो त्यांचा मी नेहमी आदर करतो." तो बोलला. कोपर्‍यातल्या टिपॉयवर थर्मास होता. त्याने एका मगात कॉफी ओतली आणि आपल्याला दिला. दुसर्‍या मगातपण ओतली आणि मग टेबलावर ठेवला.
"घे." तो बोलला आणि आपण मग तोंडाला लावला.
"सावकाश. गरम आहे कॉफी." तो मध्येच बोलला.
"आपल्याला काय प्रोब्लेम नाय. आपण गरम-गरमच पितो. तुम्ही पण घ्या." आपण त्याला बोललो.
"मला थोडी थंड लागते. तुझं चालू दे." तो बोलला. पहिल्या घोटात तोंड कडू झालं.
"साखर हवीय का ? मला कमी लागते. " त्यानं आपल्या चेहर्‍यावरनं ओळखलं. आपण ’नको’ बोललो. त्यानंतर कॉफी संपवून मग आपण त्याला सलाम केला आणि निघालो. बिल्डींगच्या बाहेर पडलो तोच गावडेचा फोन. डिसकनेक्ट केला. साल्याने लफडा केलाय आणि आता पैसा माझ्याकडे मागतोय. याच्या बापाने ठेवलाय काय पैसा माझ्याकडे ? आयला, मेहनत माझी. याच काम फक्त पत्ता सांगायचं आणि म्हणे ५०% पायजे. बसस्टॉपवर पोहोचेपर्यंत तीनदा वाजला. घेतला मग शेवटी.
"मक्या, मला टाळतोय तू ? नुकसानीत जाशील." शश्या जाम चिडलेला होता.
"बसच्या मागे धावत होतो रे. नायतर घेतलाच नसताना फोन. बोल." आपण टोपी घातली त्याला.
"माझ्या कामाचं काय झालं ? " शश्या मुद्द्यावर आला डायरेक्ट.
"आता थोडी तंगी हाय रे. ही नवी पार्टी उद्या घबाड देणार आहे. उद्यापर्यंत कळ काढ. आणि माझ्या मोबाईल कवरचं काय झाल ?" आता काहीही करून याला सांभाळायला पायजेल. नायतर सगळा लफडाच व्हायचा. मेन माणूस हाय तो आपला.
"उद्या घेऊन भेटतो तुला संध्याकाळी." शश्याने एवढं बोलून फोन कापला. त्याच्या तर या शश्याच्या....................

शशिकांत गावडे

पाणी नाकातोंडात जायला लागलय. एवढं समजवल तरी मक्या समजत नाय. माझाच चेला आणि मलाच डाव शिकवतोय. उद्या सोक्षमोक्ष लावूया काय तो. बस झालं आता. मी मरेन तर कोणाला ना कोणाला सोबत घेऊनच.

प्रताप नाईक

माझा अंदाज खरा ठरला. तो या धंद्यातला छोटा खेळाडू आहे हे माझ्या पहिल्या दिवशीच लक्षात आलं होतं. पण घाई करण्यात अर्थ नव्हता. म्हणून इतके दिवस धीर धरला आणि काल त्याला सरळ ऑफर दिली. तो नाही म्हणणार नाही याची खात्री होतीच मला. आज सगळा हिशोब होणार होता. एकदाचे हे प्रकरण संपणार होते. या नसत्या लफड्यामुळे गेला महिनाभर मेघनाला भेटलोच नाही. काहीही करून हे प्रकरण संपवणं गरजेचे होते. माझ्या पाठी त्याच्या येण्याची ऑफिसात चर्चा व्हायला लागली. म्हणून त्याला शेवटचा सौदा विचारला. नशीब माझं की तो तयार झाला. चार वाजत आलेले. मी सगळी तयारी करून ठेवलेली. बरोबर चार वाजता इंटरकॉम वाजला. तो आला होता.
"नेहा, त्याला पाठवून दे." मी नेहाला सरळ-सरळ ऑर्डरच दिली ती काही बोलायच्या आत. तो आला तेव्हा त्याच्या हातात पुन्हा एक कवर होते. पण यावेळेस छोटे होते. मी ड्रॉवरमधलं पार्सल काढून त्याला दिलं.
"हवं तर तू चेक करू शकतो." मी त्याला स्पष्टच सांगितलं.
"काय साहेब लाजवताय. एवढा विश्वास आहे. हे घ्या." त्याने त्याच्या हातातील कवर पुढे केले. मी ते घेऊन ड्रॉवरमध्ये टाकले.
"तुम्हीपण चेक करा ना साहेब." तो बोलला.
"त्याची गरज नाही." मी बोललो. "ही आपली शेवटची भेट समजायची का मी ? "
"हो साहेब." त्याने पाकीट कुरवाळत उत्तर दिलं. मी कोपर्‍यातल्या टिपॉयवरील थर्मास उचलला.
"कॉफी ?" मी बोललो. त्याने होकारार्थी मान डोलावली. मी कॉफी ट्रेमधल्या मगमध्ये ओतली. ट्रे त्याच्यासमोर धरला. त्याने मग घेतला. मी दुसरा मग उचलून त्यात कॉफी ओतली. त्याने मग तोंडाला लावला. चेहरा परत कडवट... कालच्यासारखा. किंबहूना जास्तच.
"सावकाश घे. काही घाई नाही." माझ्या बोलण्यावर तो हसला. मी मग घेऊन त्याच्यासमोर बसलो, तोच सेल वाजला.
"हॅलो.... बोलतोय....... ठिक आहे......... मी थांबतो. तुम्ही या." मी फोन ठेवला. त्याने आता कॉफी प्यायला सुरुवात केली होती. मी अजून हात लावला नव्हता आणि त्याचा मग जवळपास संपलेला. पण चेहर्‍यावरचा कडवटपणा अजून होता.
"अजून हवीय का ?" मी कॉफीचा एक सीप घेऊन त्याला विचारलं.
"नको. बस. येतो मी." तो निघाला व मी खुर्चीवर रेललो. शेवटी एकदाची ही ब्याद टळली होती. मी सिगरेट शिलगावली.

मक्या

मग तोंडाला लावला आणि एक्दम कडवट लागलं. कारल्यासारखं. मोठ्या लोकांची साली टेस्ट एक्दम खराब. आपल्या कोपर्‍यावरच्या अण्णाचा चहा घेतला की साला मुर्दा पण उठून नाचेल. मस्त पानीकम अद्रकवाला चाय. ही साली एवढी कडू कॉफी हे लोक पितात तरी कशी ? आजची कॉफी जास्त कडू वाटली. पण हातात पाच लाख होते. त्याच्यासमोर असली कॉफी क्या चीज है यार ! एका फटक्यात पाच लाख. कधी एकदा बघतो असं झालेलं. खाली पोहोचलो तेव्हा त्याच्या ऑफिसातले सगळे साले विचित्र बघत होते. पण आज आपल्याला यांच्यासाठी वेळ नव्हता. बाहेर गेटवरच टॅक्सी पकडली. रिस्क नाय घ्यायची. पाकीट घट्ट धरून बसलो. टॅक्सी जरा चाळीपासून थोडी लांबच थांबवली. टॅक्सीतून उतरलो व हात पाकीटासाठी खिशात घालणार तोच समोर मोबाईलच लेदर कव्हर. वर बघीतलं तर शश्या. आयला, याला पण आताच यायचं होतं. पण साला ते मोबाईलचं कवर आणलं साल्याने. जबान दिलेली आपल्याला. आणणार बोललेला.. काय सालं टकाटक कवर हाय. जीव जडलेला त्याच्यावर. पाच लाख मारले खाकोटीला आणि त्याच्या हातातून पटापट कवर घेतलं आणि प्लास्टिकमधून बाहेर काढलं. काय सालं लेदर ... मस्त. ओरजिनल लेदरचा वास वेगळाच. त्याला काय बोलणार तोच साला मागून एका बाईकवाल्याने हॉर्न दिला. आपलं तर टाळकं सटकलं. त्याला खुन्नस दिली आणि पलटलो तर टॅक्सीवाल्याची मचमच.
"अरे साब, पैसा." प्लास्टिक फ़ेकून कवर खिशात टाकलं आणि खिशातील पाकीट काढून त्याला पैसे दिले आणि मोकळा केला. पाकीट खिशात, कवर खिशात आणि पुन्हा पाच लाख हातात घट्ट. शश्या बघतच होता.
"काय बघतो ?" विचारलं त्याला आपण.
"काय नाय ? माझ्या कामाचं काय झाल ?" नेहमीची रड साल्याची. फोनवर जास्त बोलतो, पण समोर असला की मग ठंडा एक्दम.
"दोन दिवसात करतो, आईशपथ." आपण गळ्याला हात लावला.
"मक्या, पंधरा दिवसात किती शपथा घेतल्यास त्या मोज कधीतरी. आज घबाड मिळणार बोललेलास. तुझ्या भरोशावर पार्टीला जबान दिली मी आणि तू......" शश्या पुढे काय बोललाच नाय. त्याची नजर बंडलवर होती. तो जाम चिडलाय ते दिसत होतं त्याच्या चेहर्‍यावर. आपणपण गप बसलो. शश्या तसाच फिरला आणि गेला. लोचा झाला कायतरी... झाला तर झाला. पैला जाऊन नोटा बघू. शश्या दिसेनासा झाला तसा चाळीकडे वळलो. बंडल खाकेला मारून कवर काढून मोबाईलला घातलं. मस्त वाटलं. आजचा दिवसच मस्त. इतके दिवस पायजे होतं ते कवर मिळालं. शश्याची ब्याद गेली आणि हातात पाच लाख. घरी पोचलो. बंडल पुन्हा खाकेला मारून खिशातलं पाकीट काढलं, मोबाईल तोंडात धरला आणि खाकेतलं बंडल संभाळून टाळं उघडलं. खरातांचा शिर्‍या बघत होता कठड्याला रेलून. आत गेलो आणि दाराला कडी लावून आधी पार्सल फोडलं. आत पाचशेच्या नोटांचे धा बंडल होते. करकरीत पाचशेच्या नोटा. एक बंडल उचललं. त्या नव्या कोर्‍या नोटांचा वास घेतला. बरं वाटलं. सगळी बंडले रांगेत समोर ठेवली. पण एवढ्या नोटा घरात कशा ठेवायच्या ? रिस्क हाय याच्यात. एकतर लोकांचा नजरेत यायला लागलय आजकाल. तो बाबू बोलला पण त्या दिवशी, ’काय भाय, आजकल धंदा जोरमद्दे हाय काय ? बराच माल उडतोय." हे घरात नको. आयला काय सुचतच नाय पैसा बघीतला की. एक गाडी घ्यायची आता. गावडेला सांगायला पायजे. तो लावेल सेटींग. नको....गाडी नको. इथे बोंबाबोंब होईल. गावडे बोलेल, साला गाडी घेतो पण आपल्याला पैसे देत नाय, एक काम करूया... यातल्या अर्ध्या नोटा उद्या बॅंकेत टाकुया म्हणजे अर्ध टेंशन तरी जाईल. बस्स. हेच बरोबर... बॅंकीची स्लिप कुठे टाकली ? ... सापडली. लाख रुपये एकामध्ये आणि बाकी दुसरीकडे. एकाच जाग्यावर नको. नाहीतर नसता लफडा व्हायचा. नोटा खर्‍या आहेत की नाय ते पण बघायला पाहीजे ? सांगता येत नाही हल्ली काय ? नोटा मोजायला पण पायजेल. बसलो मग मोजायला..... पण हा काय लफडा .... नोटा कुठे गेल्या.... कोरे कागद..... सगळी बंडल तपासली. प्रत्येक बंडलमध्ये पहीली आणि शेवटची नोट फक्त पाचशेची होती. बाकी कोरे कागद. दगलबाजी..... मक्याशी दगलबाजी... त्याच्या तर आता...... स्वत:ला फार हुशार समजतो काय ? पण त्याला माहीत नाय की आपण पण बारा गावचं पाणी प्यायलोय. एक कॉपी अजून आहे आपल्याकडे. साल्याचे पोस्टरच लावतो सगळीकडे. मक्याशी दगा करण्याची त्याला सजा द्यायलाच पायजे. साल्याचा मोबाईल नंबर हाय आपल्याकडे. मोबाईला काढला आणि त्याचा नंबर डायल केला. फोन एंगेज होता. परत फिरवला तरी एगेज. साला सेलेब्रेट करतोय वाटतं आयटमबरोबर. पुन्हा लावला. तहान लागायला सुरूवात झाली. घसा कोरडा झालाय. ओठांवरून जीभ फिरवली तसा कॉफीचा कडवटपणा पुन्हा जाणवला. बाटली समोरच होती. म्हटलं आधी साल्याला फोन लावूया.... लागला. तो ’हॅलो’ बोलला आणि आपण डायरेक्ट त्याची आई-बहिण काढली.
"शिव्या नाही घालायच्या. मलाही आवडत नाही." आपलाच डायलॉग आपल्याला.
"तुला काय वाटला, सगळे निगेटिव्हज तुला दिले म्हणून ? येडा नाय आपण. आता तुला चांगलाच धंद्याला लावतो बघ. नाक घासत येशील." आपली सणकली होतीच. धमकी दिली त्याला ताबडतोब.
"तुझ्याकडे आता काहीच नाही. माझ्या माणसाने तुझ्या घरून ती केव्हाच काढलीत. तू कॉफी घेत बसला होतास तेव्हा." तो बोलला आणि घशाला जास्तचं कोरड पडली. समोरची बाटली लावली तोंडाला. अर्धी संपवली. बरं वाटलं. पण पाणीही कडवट वाटलं.
"पाणी प्यायलास का ? " तो बोलला. "बर वाटतयं की..... जळजळतयं." घशात जळजळायला लागलं. जळजळ छातीत उतरली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. नसा पिळवटायला लागल्या. काय होतेय तेच कळेना. फोन अजून कानाला होता.
"त्रास जास्त होतोय का तुला ? आता आणखी दोन मिनिटे. नंतर मात्र सगळं कसं शांत होईल. पुन्हा कुणाचे फोटो काढण्यासाठी तू शिल्लक राहणार नाहीस. गुड बाय." त्याने फोन ठेवला आणि आपल्या हातातला फोन गळला. असं वाटायला लागलं की कोणीतरी आपल्याला उसासारखा पिळतोय. जळजळ वाढायला लागली. तोंडातून शब्द फुटत नव्हता. उभं राहायची ताकदच संपली. समोर बघीतलं. खिडकी अर्धी उघडी होती. तो एकच लास्ट चान्स. टेबलाला धरून पुढे सरकलो. तोल गेला. टेबल कलंडलं. खाली पडलो. डोळ्यासमोर आता अंधार यायला लागला. कशीतरी मान वर करून खिडकीकडे पाहीलं. खुरडायला सुरूवात केली. भिंतीला धरून उभा राहीलो खिडकीपाशी गेलो. खिडकी ढकलली आणि तोल गेला. शेवटचं एव्हढच आठवतयं की अर्धी बॉडी खिडकीबाहेर लोंबकळत होती.

इन्स्पे. जगताप

कधी नव्हे ती सुशी माहेरी जायला तयार झाली. म्हटलं, दोघांना घेऊन जा बरोबर. तर त्यालाही तयार. तीन दिवस आता घरात निवांतपणा होता. ताबडतोब माट्याला कळवलं.
"माट्या, आजपासून तीन दिवस आपल्या महालात पार्टी."
"काय बोलतोस काय जग्या ? " माट्याचा आवाजात उत्साह नुसता ओसंडत होता.
"सुशी तीन दिवस माहेरी चाललीय. संध्याकाळी तू सरळ घरीच ये. मी पण लवकर खसकेन. आपली फुल गॅंग जमा करायची जबाबदारी तुझी.... भोसलेला सांग सोमरसाचा बंदोबस्त करायला. दारूबंदीला आहे तो हल्ली...... आणि हो ती मुकेशची सीडी आणायला विसरू नकोस." पार्टीला अजून काय पाहीजे.... नॉनवेज, दारू आणि मुकेशची गाणी. प्यायला लागलो तेव्हापासून मुकेश म्हणजे आपला जीव की प्राण. काय दर्द त्याच्या गळ्यात. तो गायला लागला की आत कुठेतरी तीळ तीळ तुटायचं. सगळे प्रेमभंग असे स्लाईड्शो सारखे समोर यायचे. आता तीन दिवस पुन्हा बॅचलर लाईफ. पण मनातले मांडे मनात म्हणतात ना ते काही खोटं नाही. तो एक फोन आला आणि पुऱ्या प्लानची वाट लागली.
साडेसहा वाजेपर्यंत मी सगळं गुंडाळलं होतच. मराठेला आधीच पटवलेला. लवकर येण्याचं प्रॉमिस केलेले त्याने. बस..... सगळं कसं मनासारखं झालेलं आणि तोच...........
... तोच तो नतद्र्ष्ट फोन वाजला. दुपारपासून प्रत्येक फोनच्या रिंगवर माझी रिऍक्शन डोंगरेला पाठ झालेली. माझ्या चेहर्‍यावरची नाखुषी बघतच हवालदार डोंगरेने फोन उचलला.
"हॅलो, काळा चौकी पोलिस स्टेशन." डोंगरेने नेहमीचं वाक्य टाकलं.
"............." पलिकडचा आवाज घाबरलेला होता हे नक्की. दोन फुटांवरून मला काहीच ऐकू आलं नाही. पण एक मात्र नक्की की माझ्या पुर्ण कार्यक्रमाची वाट लावण्याची जय्यत तयारी झाली होती.
"कुठे ? " डोंगरेच्या आवाजावरून खात्री झाली की काहीतरी मोठी भानगड आहे. माझ्या नकळतच मी शिवी हासडली. कुणाला.... ते मलाही नव्हतं माहीत. डोंगरेंनी चमकून पाहीलं.
मी खुर्चीवर टेकलो व डोंगरेकडून येणार्‍या बॅड न्युजची वाट पहात बसलो. फोन ठेवून डोंगरे माझ्याकडे वळले.
"साहेब, सोनटक्केच्या चाळीत एकजण खिडकीत लोंबलाय."
"म्हणजे ? " मी उगाच चिडतोय हे जाणवतं होतं. पण नाईलाज होता.
"म्हणजे एकजण खिडकीत लोंबलाय आणि मुव्हमेंट नाही काहीच. दरवाजा आतून बंद आहे. चाळीच्या सेक्रेटरीचा फोन होता." डोंगरे तोलून मापून एकेक शब्द बोलत होते.
"चला." मी कसायाकडे निघालेल्या बकर्‍यासावरखा आवाज काढला. डोंगरेने गपचूप जाधवला इशारा केला.
थोड्याच वेळात आम्ही सोनटक्केच्या चाळीबाहेर होतो. चाळीचा पाठचा भाग रस्त्याला लागून होता. मध्ये फक्त कंपाऊंडची भिंत होती. चाळ दुमजली होती. दुसर्‍या माळ्यावरच्या खिडकीत तो लोंबकळत होता. रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमलेली. मी खालूनच त्याला न्याहाळत असताना डोंगरे एका चष्मेवाल्याला घेऊन आले. टिपीकल मिडलक्लास चाळकरी होता तो. त्यात तो पट्ट्यापट्यांचा लेंगा. असला लेंगेवाला बघीतला की माणूस माझ्या टाळक्यातच जातो. मला तो लेंगा आवडत नाही यात त्याचा काय दोष ? पण एवड्या दिवसात जमवलेला प्लान फिसकटला हे अजून मला हजम झालं नव्हतं.
"हा कोण ? " रागाच्या भरात मी ’अहो-जाहो’ पण विसरलो.
"हे सेक्रेटरी कदम. यांनीच फोन केलेला." डोंगरेंनी माहीती पुरवली. आपल्याच घरात खुन झालाय अशा अर्विभावात तो घामेजलेला सेक्रेटरी. मी काही विचारायच्या आतच तो बोलला."मकरंद.... मकरंद बोर्‍हाडे."
"कदम बोललात ना तुम्ही डोंगरेंना ?" मी वर लटकलेल्या देहाकडे पहात बोललो.
"मी नाही... तो.... तो वर लटकलाय तो... तो मकरंद बोर्‍हाडे. फोटोग्राफर आहे..म्हणजे होता. एकटाच राहतो... राहायचा." सेक्रेटरी मागे वाघ लागल्यासारखे वर्तमानकाळाला भुतकाळात ढकलून भरभर माहीती देत होते. तो मेलाय याची जणू त्यांना खात्रीच.
"अजून काही ? " मी त्यांच्याकडे वळलो.
"नाही. अजून काही नाही." सेक्रेटरी किंचित गोंधळलेला.
"म्हणजे माणूस कसा होता ? बोलायला ? वागायला ? कुणाशी भांडण ? कुणी मित्र ? कुणी शत्रू ?" स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून मी पुढील चौकशी केली व चाळीच्या मेन गेटच्या दिशेने निघालो. कधी डाव्या बाजूने तर कधी उजव्या बाजूने माझ्याबरोबर चालत, कदम कदमताल करत माहीती देत होते. दुसर्‍या मजल्यावरच्या त्याच्या खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत एव्हढं कळलं की छानचौकीत राहतो. एकटा जीव आहे. चाळीत कुणाशीही खास संबध नाहीत. वडीलोपार्जित घरात तो एकमेव शिल्लक होता. येण्या-जाण्याला काही ताळतंत्र नव्हता. चाळीत कोणाला त्याचा काडीचा त्रास नव्हता. थोडक्यात संशय घेण्यालायक काहीच नाही.
दरवाजा आतून बंद होता. माझ्या इशार्‍यावर डोंगरेनी तीन-चार धक्क्यात ते उघडलं. डोंगरेंनी कोल्हापुरच्या तालमीत कमावलेले शरीर असं कधी कधी उपयोगी पडते. तिथे दार उघडलं आणि इथे मोबाईल वाजला. बघीतला तर माट्या,
"बोल माट्या" तो पुढे काय बोलणार हे माहीत असूनही मी त्याला विचारलं. पुढची पाच मिनिटे त्याने माझी चांगलीच तासली.
"माट्या, हे आटोपलं की पोहोचतोच. किल्ली शेजारच्या जंगमांकडे आहे. घे त्यांच्याकडून. येतोय मी. तू आता उरल्या सुरल्या मुडची @@@@. येतो मी." माझ्या शेवटच्या वाक्याला कदम दचकले ते माझ्या लक्षात आलं. आजूबाजूला गर्दी वाढलेली होती. तोंडावर थोडा ताबा ठेवायला हवा. आधीच खात्याची इमेज खराब आहे. त्यात आपली भर नको. तेव्हा जगताप, पर्सनल प्रोब्लेमस बाजूला ठेवा व कामाला लागा, मी स्वत:ला समजावलं. मोबाईल खिशात टाकून मी आत शिरलो. डोंगरे बॉडी चेक करत होते. तो गेलाय याची त्यांनी खात्री केली. माझी नजर खाली पडलेल्या पाचशेच्या बंडलावर गेली. माझ्या मागोमाग आत आलेल्या कदमांकडे मी वळलो.
"कदम, तुम्ही जरा दारावर थांबा. जाधव, आत कोणीही येता कामा नये." चार पावलं आत आलेले कदम उलट्या पावली परत दारात गेले. मी दाराजवळ परतलो व खोलीवर नजर टाकली. खाली फरशीवर पाचशेची साधारण आठ-दहा बंडल्स पडलेली. जवळच बॅंकेचे स्लीपबुक, पलिकडे एक रिकामी बिसलरीची बाटली, मोबाईल आणि एक लोबकळणारा फोन. सर्वसाधारण चाळीतील मिडल क्लास खोली विशेष असं काहीच नव्हतं त्या एका कॅननच्या कॅमेर्‍याशिवाय. अप्रतिम होता. शिवाय नवीन दिसत होता. खिडकीच्या अलिकडील टेबल कलंडलं होतं. मरणार्‍याचा संबध या बंडलाशी आहे व इथूनच सगळी सुरूवात करायची आहे हे लक्षात आलं. डोंगरेनी काळजीपुर्वक बॉडी खाली झोपवली. शरीरावर कसल्याच खुणा नव्हत्या. ओठ मात्र काळेनिळे झालेले. विषप्रयोग. सिम्पल केस.
"डोंगरे, कोणत्याच वस्तुला हात लावू नका. विष कोणत्या वस्तुला आहे ते असं कळायचं नाही. हॅंडग्लोव्हज वापरा." मी चटकन डोंगरेना सुचना दिली आणि सभोवार नजर टाकायला सुरूवात केली. डोंगरेंच्या अनुभवी नजरेनेही प्रकार ताडला.
"आत्महत्या असेल काय साहेब? " डोंगरे मयत इसमाचे निरिक्षण करत बोलले.
"सांगता येत नाही. पण शक्यता कमी आहे. तसं काही सापडते काय पाहू." आम्ही अर्ध्या तासात त्या घरातला कोपरा न कोपरा तपासला.
"डोंगरे, खिडकीखालचा परिसर बघा. दोघा तिघांना घ्या सोबत. काही सापडतय का बघा." डोंगरे गेले. झाल्या प्रकाराचा थोडाफार अंदाज आलेला. "जाधव, आजुबाजुला जरा चौकशी करून या." जाधवाबरोबर बाहेर जाऊन मी दाराला कडी घातली. कदम तत्परतेने पुढे आले.
"याला घरात शिरताना कोणी पाहीलं का ? " माझ्या या प्रश्नावर कदमांनी चाळकर्‍यावर नजर फिरवली. एक बाई पुढे आली.
"संध्याकाळी आला तो. एकटाच होता. हातात एक पार्सल होतं. धावत-धावत आला. नेहमीसारखा नाय."
"अजून कोणाला काही माहीती ? " माझ्या या प्रश्नावर दोन चार जण पुढे आले. त्यात फारसं काही हाती आलं नाही. थोड्याफार फरकाने सगळ्यांनी एकच कॅसेट वाजवली. डोंगरे रिकाम्या हातांनी परतले. आम्ही पुन्हा खोलीत शिरलो. डोंगरेनी वस्तूंची यादी बनवायला घेतली. तपासाच्या दिशेने लागणार्‍या वस्तूची यादी. माझी नजर अजूनही काही सापडते का म्हणून शोधत होती. डोंगरेंनी आवाज दिला. मी वळलो. त्यांच्या हातात एक बंडल होतं. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह पाहताच त्यांनी बंडल उलगडलं... शॉकींग... आत कोरे कागद होते. मी पटकन आणखी दोन बंडल्स चेक केले. त्यातही तेच. माझी नजर चमकली. केस थोडी इंटरेस्टींग झालेली. जाधव परतले ते थोडीफार माहीती घेऊन. थोड्या वेळानंतर बॉडी पॉस्टमार्टेमसाठी पाठवून, बर्‍याच गोष्टी सोबत घेऊन व खोलीला सील ठोकून आम्ही निघालो. मी घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे अकरा उलटले होते.
माट्या, भोसले, जग्या सावंत, निफाडकर आणि आमचा एकमेव नाट्यकलाकार शिंदे... सगळे हजर होते. सगळ्यांचा एकेक राऊंड झालेला.
"जगाला ताप देऊन आपले लाडके यजमान आलेले आहेत तेव्हा....." सावंताने मला पाहताच सुरूवात केली आणि माट्याने माझा एकंदरीत मुड बघून त्याला मध्येच दटावलं.
"जग्या तुझा पेग तयार आहे. चल ये पटकन आणि होऊन जाऊ दे ’ओहरे ताल मिले’...."भोसले पहिल्या पेगमध्येच गडबडायला सुरुवात करतो. साल्याचं खातंच चुकीचं. मी मुकाट्याने जाऊन बसलो आणि पेग गळयाखाली उतरवला. बरं वाटलं. आनंदाच्या भरात मघासपासून दाबून धरलेल्या सगळ्या शिव्या त्या मकरंदला व त्याच्या त्या खुनाला जबाबदार असलेल्या माणसाला घातल्या आणि तेवढ्यात भोसलेने गायला सुरुवात केली.
"सजनरे झुठ मत बोलो......."
"भोसल्या आता एक शब्द जरी गायलास ना तर नरडं आवळीन तुझं. गाण्याची @@@@ करू नको." मी उरला सुरला राग भोसलेवर काढला.
"चिअर्स फॉर अवर होस्ट. इन्स्पे. जगताप." निफाडकरचा बहुधा तिसरा असावा. तो नेहमीच वेगळ्याच जगात असतो. शेवटी एकदाचं ’चिअर्स’ झालं आणि मी सगळ्या जगाचा ताप विसरून माझ्या जुन्या मित्रात रमलो.

डोंगरे

एका मुडद्याने सगळीच संध्याकाळ खराब केलेली. त्यात रात्री घरी पोहोचलो तोच पोरगा बोलला की बिल्डरला ४०% ब्लॅक मनी पाहीजे. कुठून आणणार ? आयुष्यभराची जमाच मोठ्या कष्टाने २० % पर्यंत पोहोचली. सगळी आप्ल्या बापाची कृपा. "पोरा, कायद्याचं काम जबाबदारीच काम. सचोटीनं करावं. उपाशी राहीलास तरी बेहत्तर पण हात काळ करायच नाय." बाप गेला पण त्याच्या शब्दाला जागता जागता इथं जगणं महाग झालयं. म्हटल दुसरं काहीच नाही तर निदान स्वतःच हक्काचं एक घर घ्यावं. सगळं जमलं आणि आता हा लफडा. सालं नशीबच खराब.

प्रताप नाईक

ठरल्याप्रमाणे काम झालं होतं. पण भालेराव काही माझ्यापर्यंत पोहोचला नव्हता. मक्याच्या घरातून माझ्या सगळ्या निगेटिव्हज काढायचं काम मी भालेरावलाच दिलेलं. काम झालं याची त्याने फ़ोनवरून मक्या इथे असतानाच कल्पना दिलेली. सकाळपासून त्याच्याच फोनची वाट बघत होतो. मक्या गेल्यावर काल तो येणार होता पण आला नाही. मनात उगाच शंकेची पाल चुकचुकत होती. मेघनाचा दोनदा फोन येऊन गेला. नेहमीप्रमाणे मी तिला टाळलं. गेला महिनाभर हेच करतोय. इलाज नव्हता. जोपर्यंत हे लफडं संपत नाही तोपर्यंत तिला भेटायचं नाही हे ठाम ठरवलेलं.
सेल वाजला आणि मी चटकन पाहीलं. भालेराव होता.
"हॅलो, भालेराव, आहेस कुठे ? " माझा स्वर वरच्या पट्टीत गेला.
"नाशिकला आहे साहेब." त्याचा तो नेहमीचाच स्वर. सगळ्या जगात हा एकटाच असेल ज्याला कसलीच घाई नाही.
"नाशिक ?? तिकडे काय करतोयस ? माझ्या कामाचं काय झालं ? निगेटिव्हज कुठे आहेत ? " माझा तोल सुटायला लागलेला.
"एक अर्जंट काम निघालं साहेब. भेटतो चार दिवसांनी. तुमचा तो मक्या काल टपकला बर का. खिडकीत लटकत होता." त्याच्या स्वरात अजूनही घाई नव्हती.
"भालेराव, पुढचं मला सांगू नकोस. तुझे पैसे तयार आहेत. एका हाती दे आणि एका हाती घे." माझा आवाज थंडावलाय हे मला जाणवलं कारण भालेरावने सरळ मुद्द्यालाच हात घातलेला.
"वातावरण गरम आहे साहेब. तुमच्या वस्तू माझ्याकडे सुखरूप आहेत. मक्याची केस इन्स्पे. जगतापकडे आहे. गडी दोन दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल. तेव्हा तयारीत रहा. पळून जायचा विचार मनात पण आणायचा नाही. असं काही करू नका ज्यामुळे संशय बळावेल. तुमच्या विरोधात जाणारे पुरावे नाहीसे करा. ठेवतो. बोलू चार दिवसांनी." भालेरावने फोन ठेवला आणि मी खुर्चीत कोसळलो. आपण काय करून बसलोय या गोष्टीची आता प्रकर्षाने जाणिव झाली. हातांची थरथर जाणवायला लागली. घशाला कोरड पडली. समोरचा ग्लास उचलून एका दमात रिकामा केला. रिलॅक्स प्रताप...... मी स्वत:लाच समजवायला सुरूवात केली. थोड्याच वेळात मी स्वत:ला सावरलं आणि तोच इंटरकॉम वाजला. मी ऑन केला.
"सर, मि. वर्गिस आलेत. अजंता फार्माचे." नेहा.
"त्यांना बसव कॉनफरन्स रूम मध्ये. मी आलोच." मी आवाज पुर्णपणे संयत करीत बोललो. भालेरावचे शब्द आता डोक्यात थैमान घालत होते. पुरावे...... काय आहेत ते.... तो इथे आला होता ते तर इन्स्पेक्टरला कळेलच कारण शेवटचा फोन मला केला होता त्याने. नोटांची बंडले सापडली असतील का ? कदाचित असतील कारण ते पाहील्यावर त्याने फोन केलेला. नोटा नव्या कोर्‍या होत्या. त्यामुळे इन्स्पेक्टर बॅंकेत पोहोचू शकतो. या बाबतीत टोलवाटोलवी करता यायची नाही. शिवाय त्याच्या इथे किती फेर्‍या झाल्यात हे खाली सेक्युरीटी लॉग बुक मधून कळेल. त्यामुळे या सगळ्यांची कबूली द्यावीच लागेल. आणखी काय..... मग... समोरच्या टिपॉयवर दोन्ही मग होते. नवीन मग. कारण जुने मी कालच फ़ेकून दिले आणि हे नवीन आणले. सेम टू सेम. अजून काही, थिंक प्रताप. अजून काही... एवढच. आता फक्त नॉर्मल राहायचं..... रिलॅक्स राहायचं..... चेहर्‍यावर काहीच दिसता कामा नये.... काहीच नाही. तोच इंटरकॉम वाजला. मी फोन घेतला.
"सर, मि. वर्गिस वाट पहातायेत तुमची." नेहा.
"आलोच मी." मी दाराकडे वळलो.

इन्स्पेक्टर जगताप

डोकं ठणकत होतं. चारला झोपलो पहाटे. महफिल मस्त रंगली. पण भोसले ही नवीन कुठली दारू घेऊन आला ते काही कळलं नाही. डोक्यातच गेली ती. नशीब माझं की सेकंड होती. ठाण्यावर पोहोचला तसा डोंगरेंना हुकूम सोडला एक कडक चहाचा आणि सोबत सॅंडविचेस. भुक सडकून लागलेली.
"डोंगरे, कालच्या त्या लटकलेल्या बॉडीची काय नवीन खबर ? " सँडविचवर ताव मारत मी विचारलं.
"शेवटचा फोन साहेब त्याने प्रताप नाईकला केलेला. नरिमन पॉईटला ऑफिस आहे. कंपनीचे जनरल मॅनेजर आहेत." डोंगरे नेहमीसारखे खुशीत नाहीत अस वाटलं मला.
"डोंगरे, आज मुड ऑफ दिसतोय. काय झालं ?" मी चहाचा गरम घोट नरडीत घेत बोललो.
"काहीच नाय साहेब. पण मुडदा मरताना आपलं काम सोपं करून गेला" डोंगरेंनी पुन्हा विषयाला हात घातला.
"मग सेलेब्रेट करुया. चला, प्रताप नाईकांना भेटूया." मी बोललो.
"टेंशन नाय साहेब. त्यालाच इकडे बोलवलयं, येईल आता." डोंगरे म्हणजे हुषार माणुस. बर झालं त्याला बोलावलं ते... आता नाहीतरी नरिमन पॉईंटपर्यंत जायचा मुड नव्हताच.
साधारण वीस मिनिटात प्रताप नाईक समोर होता.
"बोला नाईक. तुम्ही बोला, आम्ही ऐकतो." मी जरा दरडावणीच्या सुरात त्याला घेतला. डोंगरे समोर बसून त्याला न्याहाळत होते. नुसता इशारा झाला की कानफटात देईन या अर्विभावात. डोंगरेंच्या काळ्याकभिन्न चेहर्‍याकडे पाहूनच भले भले पोपटासारखे बोलायचे. त्यामुळे हा फंडा नवख्या गुन्हेगारांसाठी वापरणे हे माझं नेहमीचं. डोंगरेंकडे बघत प्रतापने बोलायला सुरूवात केली.
"गेला महिनाभर मक्या मला ब्लॅकमेल करत होता. काल संध्याकाळी त्याने मला ठरल्याप्रमाणे सगळे फोटो व निगेटिव्हज दिले. पण त्याने मागितलेले पाच लाख माझ्याकडे नव्हते, म्हणून मी त्याला कोर्‍या कागदांची बंडले बनवून दिली. जेव्हा त्याने ते पाहीलं तेव्हा मला फोन केला आणि मध्येच बोलता-बोलता त्याचा फोनवर आवाज येणे बंद झाले. त्यांनंतर या संदर्भात यांचा फोन आला."
"विष कोणाकडून घेतलसं ? " मी पुढचा पेच टाकला.
"कसलं विष ? " प्रताप गोंधळल्यागत बोलला. अभिनय करतोय साला.... तीपण या इन्स्पेक्टर जगतापसमोर. करू देत.
"नाही माहीत. ठिक आहे. कळेल. डोंगरे याच स्टेटमेंट घ्या आणि आपण जरा याच्याबरोबर त्याच्या ऑफिसपर्यंत फिरून येऊ." मी डोंगरेना खुणावलं.
"ऑफिसला कशाला ? मी सांगतोय ना सगळं खर काय ते." प्रतापच्या कपाळावर घाम तरळला. चला... सुरूवात झाली. पुढे डोंगरे बघतीलच काय करायचं ते ?
"डोंगरे याला घ्या जरा बाजूला. मी आलोच बाकी आटपून." डोंगरेनी मान हलवली व प्रतापकडे वळले.
"चला." डोंगरेंच्या आवाजावर प्रताप जरा थरथरल्यासारखा वाटला.

प्रताप नाईक

हा इन्स्पेक्टर जगताप बराच ताप देणार हे नक्की. मेंदूची चाळणी करून टाकली संपुर्ण. किती प्रश्न... फक्त एक फेरी काय मारली पोलिस स्टेशनला सगळे असे बघतात जसा काही मी वॉंटॆड क्रिमीनलच. म्हणतात ना यांची दोस्ती पण नको आणि दुश्मनी पण नको. दोस्ती तर नाहीच पण दुश्मनी मात्र ठरलेली आता. या सापळ्यातून सुटका करून घ्यायलाच हवी.... पण कशी ? या क्षणी तर काहीच मार्ग दिसत नाही. आता वेट आणि वॉच हेच खरे. सेल वाजतोय. बघू कोण..... मेघना.... नको आता मेघना नको.... तिच काय आता कोणीच नको... आता फक्त जगतापपासून जीव वाचवायचा.

इन्स्पेक्टर जगताप

"डॊंगरे, प्रतापची जबानी आणि बॅंकेचे पासबुक या दोन गोष्टीतून एक बाब स्पष्ट झाल की मकरंद ब्लॅकमेलर होता. पण घरात एकही फोटो मिळाला नाही जो ही गोष्ट सिद्ध करेल. म्हणजेच ते फोटो त्याने कुठेतरी किंवा कुणाकडे तरी ठेवलेत किंवा ते कोणीतरी उचलले आहेत. मकरंदचे खास कोण ते जरा पहायला हवं. आणखी दोन गोष्टी पाहीजेत आपल्याला. पहिली म्हणजे तो टॅक्सी डायव्हर जो नरिमन पॉईंटवरून मकरंदला घेऊन आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतापला विष देणारा माणूस. बस एवढ पुरेसं आहे आपल्याला त्याला पोहोचवायला." मी माझ्या तर्काना जोडून बोललो.
"टॅक्सीवाला मिळेल थोडी शोधाशोध केली तर. चाळीबाहेरच्या पानवाल्याच्या सांगण्याप्रमाणे तो मुस्लिम टॅक्सीवाला होता. डोक्याचे व दाढीचे केस रंगवलेले होते. तसे बहुतेकांचे असतात त्यांच्यात पण तरीही सापडेल लवकर. त्याचवेळेस त्याच्याशी कोणी तरी बोलत होता असंही पानवाला म्हणाला. त्याने मकरंदला काहीतरी दिले एवढं तो बोलला. काय ते त्याने नीट पाहीलं नाही. प्रश्न उरतो तो विष देणार्‍याचा." डोंगरे विचारपुर्वक बोलले. मला त्यांची हीच गोष्ट आवडते. इन्स्पेक्टर व्हायच्या लायकीचा माणूस हा. पण प्रयत्नच केला नाही कधी त्यासाठी.
"डोंगरे, याचा अर्थ तो माणूसही शोधायला लागेल जो सर्वात शेवटी मकरंदला भेटला. आता विष देणारा कोण ते प्रतापच सांगेल. बर आपल्या पोस्टमार्टेम रिपोर्टच काय झालं ? आला का ? " मी फाईल्स चाळत बोललो.
"आलाय. माने, झाली का इंट्री ? " डोंगरे मानेंकडे वळले. दोन मिनिटात रिपोर्ट समोर होता. सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. पण गाडी अडकली ती एकाच ठिकाणी. म्हणजे विषप्रयोग झाला हे खरं पण विषासह ओठावर कारल्याच्या रसाचे अवशेष सापडले. कन्फुजिंग.... कारलं मध्येच कुठे आलं ? मी डोंगरेकडे पाहीलं. ते चहावाल्या पोर्‍याच्या बरोबर बसलेले. माझी नजर त्यांच्याकडे जाताच ते एक कटींग घेऊन आले. मी पुन्हा रिपोर्ट मध्ये अडकलो.
"साहेब चहा." डोंगरेनी चहाची आठवण करून दिली. मी ग्लासाकडे पाहील. मग त्यांच्याकडे.
"डोंगरे कपात आणून देता का जरा ? " डोंगरे गोंधळले. पण काही न विचारता चहा कपात घेऊन आले.
बराच वेळ मी कप न्याहाळत होतो. डोंगरे मला न्याहाळत होते. मी कप तोंडाला लावला. पुन्हा काढला. पुन्हा लावला.
"साहेब, चहा गार होतोय." डोंगरे पुन्हा चहावर आले.
"डोंगरे, आणखी एक कप मागवा. रिकामा पण चालेल." माझ्या या वाक्यावर डोंगरेंनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहीलं असं वाटल मला. डोंगरे कप घेऊन आले.
"डोंगरे, एक लिपस्टिक आणता का ? "
"साहेब, लिपस्टीक ?" डोंगरेंच्या चेहर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह. मी त्यांच्याकडे पाहीलं आणि नजरेनेच होकार दिला. लिपस्टिक घेऊन डोंगरे परतले तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर ’हा माणूस अशक्य आहे’ असा भाव होता. लिपस्टिक कपाच्या कडांना बाहेरच्या व आतल्या बाजुस लावून मी कप डोंगरेंना दिला. एव्हाना सगळा स्टाफ सगळं काम सोडून माझा तमाशा बघत होता. कप हातात घेऊन डोंगरे माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहात होते.
"कप लावा तोंडाला ?" मी त्यांना बोललो आणि मानसिक धक्का बसावा तसे डोंगरे हादरले.
"साहेब...." इतकं बोलून डोंगरे थांबले. सगळ्यांकडे नजर टाकून त्यांनी कप तोंडाजवळ नेला.
"थांबा." मी बोललो. डोंगरेंचा चेहरा खुलला.
"काय झाल ?" आनंद शक्य तेव्हढा दडवत डोंगरे बोलले.
"लिपस्टिक डार्क आहे डोंगरे. तुमच्या काळ्या ओठांवर नीट दिसायची नाही." मी बोललो आणि आयुष्यात पहिल्यांदा आपल्या काळ्या रंगाचे डोंगरेनी मनोमन आभार मानले व ते त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसले. मी नजर स्टाफवर वळवली. माझी नजर वळताच प्रत्येक जण आपापल्या कामाला लागले. पोलिसस्टेशनला आलेले पण सगळे माझी नजर चुकवायला लागले. पण नशीब जोरावर होतं. नेमकी त्याच वेळेला देशमाने मॅडम आत आली. त्यांना पाहताच माझी नजर चमकली.
देशमाने मॅडमनी कप तोंडाला लावला आणि मी ठसे नीट न्याहाळले. नशीब त्या लिपस्टिक लावत नव्हत्या. नाहीतर एखाद्या पुरूषावरच संक्रात आणावी लागली असती. माझं काम झालेलं. पण माझं ते असं त्यांच्या ओठांना नीट न्याहाळणं फार विचित्र दिसलं असेल. कारण प्रत्येकजण माझ्याकडे वेगळ्याच॑ नजरेने पहात होता. नशीब माझं सुशी कधी ठाण्यात येत नाही.
"डोंगरे, मकरंदच्या घरात मिळालेल्या सगळ्या वस्तू लॅबमध्ये टेस्टींगला पाठवा आणि जर डॉक्टरांना फोन लावा." थोड्याच वेळात मी लॅबमधल्या डॉक्टर दाणींशी बोललो आणि मग डोंगरेंकडे वळलो.
"चला डोंगरे." माझ्या इशार्‍यावर डोंगरे निघाले.

डोंगरे

काय विचित्र प्रसंग आणलेला साहेबांनी आज. नशीब... या रंगाने वाचवलं. कधी कधी विचित्र वागतो हा माणूस. रिपोर्ट वाचायला पाहीजे होता. काहीतरी असणार त्यात. नाहीतर असला झटका मध्येच आला नसता त्यांना. घरच्या गोष्टी सहसा सांगत नाही मी त्यांना. उगाच दुनियेभरच्या प्रॉब्लेमस मध्ये अजून आपला प्रॉब्लेम कशाला ? पण जीपमध्ये बसल्यावर त्यांनी हट्ट्च धरला लहान मुलाखारखा. मग सांगावच लागलं. पाठीवर थाप मारून बोलले," डोंगरे, टेंशन नाही घ्यायचं. यातून मार्ग निघेल. बघू काय करता येईल ते." मग नरीमन पॉईंटला पोहोचेपर्यंत ते रात्रीच्या गमतीजमती सांगत होते. तसा आवाज एवढा काही वाईट नाही त्यांचा. मुकेशची गाणी मस्त गातात.

प्रताप नाईक

इन्स्पेक्टर जगतापना कॅबिनमध्ये बसलेले पाहून धक्काच बसला. सोबत तो आंडदांड हवालदार डोंगरे.
"हॅलो, इन्स्पेक्टर." नाईलाजाने मी हात मिळवला." फोन केला असता तर मी आलो असतो."
"तुमच्यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांना जास्त त्रास देऊ नये असं वाटलं मला म्हणून स्वत:च आलो." इन्स्पेक्टरच्या बोलण्यातला उपरोध न कळण्याइतका मी दुधखुळा नव्हतो.
"बोला काय घेणा र?" मनाविरूद्ध तोंडून निघालेलं वाक्य.
"तुमच्याकडे कॉफी चांगली असते असं मकरंद म्हणाला." असं बोलून इन्स्पेक्टर उभे राहीले आणि थर्मासच्या दिशेला वळले. खिशातला रूमाल काढून मी कधी कपाळाचा घाम पुसला हे माझ्याच लक्षात आलं नाही. डोंगरेकडे नजर गेली तेव्हा मी काय केलं ते माझ्या लक्षात आलं. इन्स्पेक्टर आता मग न्याहाळत होते. थर्मासमधली कॉफी त्यांनी मगात ओतली व माझ्याकडे वळले. एक घोट घेतला व तोंड वाकडं करत म्हणाले." साखर खात जा थोडी."
"इन्स्पेक्टर... तुम्ही... इथे... का.....?" माझं वाक्य पुर्ण व्हायच्या आतचं ते पुढे बोलले.
"आलात, असचं ना ? बसा सांगतो." समोरच्या खुर्चीवर बसत ते बोलले. मीही बसलो.
"इथेच बसला होता का हो मकरंद ? की या खुर्चीत बसला होता ?" मी काहीच बोललो नाही. ते हसले. डोंगरेकडे वळले. "तुम्हीही बसा डोंगरे." डोंगरे त्यांच्या शेजारी बसले. काय बोलावं नेमकं तेच कळेना. दोघेही शांतपणे माझ्याकडे पहात बसले. मी काही बोलता का याची वाट पहात.
"मला वाटते डोंगरे, प्रतापरावांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. तेव्हा आपण त्यांच्या शंकाच समाधान करूया. त्याच काय आहे प्रतापराव, तुमच्याकडची कॉफी पिऊन मकरंद खाली गेला. त्याने अशफाकची टॅक्सी नं. एम एच ०१ जे ३२४८ पकडली." त्यांच्या या वाक्यावर डोंगरेंनी त्यांच्याकडे चमकून पाहील आणि मी भेदरून. डोंगरे का चमकले ते काही कळ्लच नाही. पण मला त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ कळला.
"मग कुठेही न उतरता मकरंद घरी गेला. त्याने पैसे काढले. त्यात कोरे कागद पाहून त्याने तुम्हाला फोन केला व मग मेला. छोटीशी गोष्ट. फक्त प्रश्न हा उरतो की हे विष दिलं कोणी ? आता तुमची ही कंपनी मेडीकल जर्नल्स बनवते. म्हणजे तुम्हाला हे विष मिळवणे काही कठीण नाही. ते कोणी दिलं ते सांगितलतं तर बरं. म्हणजे काय तेवढाच शोधाशोध करायचा त्रास वाचेल. बोला काय म्हणताय ?" इन्स्पेक्टर जगताप यांनी डोळ्यासमोर तारे चमकवले. मी रूमाल चेहर्‍यावरून फिरवला. त्यांनी कॉफीचे सीप घ्यायला सुरूवात केली.
"डोंगरे, त्यांच्या थिंकीग प्रोसेस पुर्ण होईपर्यंत तुम्हीही कॉफी घेतलीत तर चालेल." इन्स्पेक्टर डोंगरेकडे वळले. डोंगरेंनी निमुट कॉफीकडे मोर्चा वळवला.
"तुम्हाला तुमच्या वकीलाला फोन करायचाय का ? माझी काहीच हरकत नाही." जगताप माझ्याकडे वळले.
"माझा नाईलाज झाला होता. तो मला ब्लॅकमेल करत होता. म्हणून..."मी पुढे काही बोलूच शकलो नाही.
"आम्ही काय मेलोय ? आमच्याकडे या. तुम्ही सरळ कायदा हातात घेता म्हणजे काय ? " जगतापांचा आवाज वाढला.
"आता ...." मला काय बोलावं, काय करावं तेच कळेना.
"नाव सांगा ज्याने तुम्हाला सप्लाय केला त्याचं." जगताप मुद्द्यावर होते अजून.
"ढोलकीया. डॉ. पियुष ढोलकीया. डी-३०६, रोनित आर्केड, हिरानंदानी टॉवर्स, पवई. मॅक्डॊनाल्डच्या शेजारून सहावी बिल्डींग. सेल नंबर ९९६७२९९८९८." चावी द्यावी तसा भराभरा मी बोलत गेलो.
"लिहीलत का सगळं डोंगरे ? " जगताप माझ्याकडे नजर ठेवून बोलले.
"हो" एवढ्यावेळांनतर डोंगरें एकाक्षरी उत्तर. मी जगतापांकडे पहात होतो. वाटलं हा माणूस घेणार्‍यापैकी असावा. प्रयत्न करायला हरकत नाही.
"जगताप साहेब, त वरून ताकभात ओळखण्याचा हा प्रकार आहे. मीच मकरंदला विष दिलय याचा तुमच्याकडे पुरावा नाही. संशयाचा फायदा माझा वकील मला नक्की मिळवून देईल. तरीपण हे सगळे सोपस्कार टाळता येतील असा काही मधला मार्ग नाही का ? " मी हिंमत करून विचारलचं.
"डोंगरे, मधला मार्ग हवाय यांना ? देऊ का ? " जगताप डोंगरेकडे वळले. पण तो त्याला ओ की ठो कळलं नाही या अर्विभावात होता.
"प्रताप नाईक, तुम्ही म्हणताय त्यात थोडं तत्थ आहे. पण मी तुम्हाला फासावर चढवू शकतो. तेव्हढा पुरावा गोळा करणे माझ्यासाठी कठीण नाही. म्हणजे काल हे मग धुण्यासाठी नव्हते हे तुमचा पँट्रीवाला शपथेवर सांगेल. हे नवीन मग तुम्ही कुठून घेतलेत ते कळायला जास्त वेळ लागायचा नाही. मगाच्या कडांना विष लावले होते हे आमचे डॉक्टर कोर्टात सांगतीलच. पण मकरंदरख्या ब्लॅकमेलरच्या मरणावर मी उगाचच का धावाधाव करायची ? अशी नको असलेली माणसं कमी होत असतील तर चांगलच. म्हणून तुम्हाला मी एक छोटीशी ऑफर देतो. हे डोंगरे तुम्हाला एक फ़ाईल नंबर, नाव व पत्ता देतील. एक फोन नंबरही देतील. त्या नंबरला फोन करून त्या फाईलच्या ब्लॅक पेमेंटची जी अमाऊंट असेल ती तिथे भरायची. रिसीट डोंगरेच्या नावाची असेल. डोंगरे, तुम्ही डिटेल्स द्या त्यांना." एवढं बोलून जगताप दाराकडे वळले. "आणि हो... महत्त्वाची गोष्ट. फोन पब्लिक बुथमधून करायचा. चुक नकोय. रिसीट जेव्हा मिळेल तेव्हा तुमचं नाव या केसमधून कट होईल. येतो मी." जगताप बाहेर पडले आणि मी ताबडतोब डोंगरेकडून सगळी माहीती घेतली. पण डोंगरेच्या चेहर्‍यावरचे अविश्वासाचे भाव बाहेर पडेपर्यंत होते.

डोंगरे

हे अशक्य घडलं होतं. एका खुन्याला साहेबांनी सोडून दिलं. मला अजूनही खरं वाटत नाही हे.

इन्स्पेक्टर जगताप

"चला डोंगरे, चहा घेऊ." मी डोंगरे लिफ्टमधून बाहेर येताच बोललो.
"कॉफी घेतली ना आताच." डोंगरेच्या आवाजात नाखुषी होती.
"चहाची लज्जत कॉफीत नाही डोंगरे. या." मी पुढे निघालो व मागोमाग डोंगरे.
"अशफाक टॅक्सीवाला कुठे मिळाला तुम्हाला ? " डोंगरेचा प्रश्न.
"कोण अशफाक ? " मी मागे न वळता बोललो.
"मघाशी प्रतापला बोललात ना.. तो." डोंगरे कड्या जुळवत होते.
"थाप होती ती डोंगरे. मला वाटलं ओळखलं असेल तुम्ही. नाहीतर तो पठ्ठया असा पोपटासारखा वोलला नसता." मी गेटमधून बाहेर पडताच सभोवती नजर टाकली. दहा पावलावरच चहाचा स्टॉल व पानाची टपरी होती.
"पण साहेब येवढ्या वर्षात जे कधी झालं नाहीत ते आज पाहीलं मी." डोंगरेंच्या वाक्यावर वळलो मी. चेहर्‍यावर नाराजी स्पष्ट होती. "तुम्ही एका खुन्याला मोकळं सोडलत."
"डोंगरे, जगतापने कधी ड्युटीशी बेईमानी केली नाही. फक्त आता या क्षणी परिस्थितीचा फायदा उचललाय. बाहेरख्याली माणूस तो. शिवाय लाचखोर आहेच. त्याचा थोडा पैसा चांगल्या कामासाठी वापरला. चला चहा घेऊ."
चहा घेता घेता मी चौकशीला सुरूवात केली. शेवटी पानटपरीवाल्याकडे धागा सापडला. रंगवलेल्या केसांचा म्हातारा लवकरच भेटेल याची खात्री पटली.
ठाण्यावर पुन्हा पोहोचलो तेव्हा पहिला फोन डॉ. ढोलकीयाला लावला. त्यांना दुसर्‍या दिवशी स्टेटमेंट द्यायला बोलावलं.

प्रताप नाईक

इन्स्पेक्टर जगतातच्या सांगण्याप्रमाणे सगळं केलं. डोंगरेला रिसीट पोहोचवली. आता फक्त एक काम राहील ते म्हणजे भालेरावला गाठायचं. त्याचा सेल कितीदा ट्राय केला पण तो पठ्ठ्या उचलायला तयारच नव्हता. आता वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

इन्स्पेक्टर जगताप

शेवटी एकदाचा मेहबुब अब्दुल करीम खान सापडला. त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. मी योग्य वाटेवर होतो. जेथे त्याने मकरंदला सोडले होते तेथून पुन्हा चौकशीला सुरुवात केली. सगळे धागे जुळत गेले. पण मकरंदच्या घरात एकही फ़ोटो सापडला नव्ह्ता. ते कुठे गेले तो प्रश्न होताच. मुळात हा खून प्रतापने केला नाही हे मला पॉस्टमार्टम रिपोर्टवर कळलच होत. विष कॉफीबरोबर पोटात गेलं नव्हत. पण प्रतापने मकरंदला मारण्याचा पुर्ण प्लान केला होता. त्याने ढोलकीयांना सांगून विषाचा बंदोबस्त केला. पण ढोलकीयांनी त्याला कारल्याचं पाणी विष म्हणून दिलं. कायद्याला घाबरणारा माणूस तो. त्याने ते आपल्या दहा वर्षाच्या मुलाची दहावेळा शपथ घेऊन सांगितलं. प्रतापने ते विष समजून मगाच्या कडांना लावलं. आतून आणि बाहेरून. त्याचे अवशेष मकरंदच्या ओठांवर सापडले. त्यासाठीच तो लिपस्टीकचा खटाटोप. विषाचे अवशेष सापडले ते ओठांच्या बाहेरच्या बाजुस. वर आणि खाली. म्हणजे खुनी कोणीतरी दुसराच होता. खून आपणच केलाय या भ्रमात प्रताप होता व त्याला तसाच ठेऊन मी डोंगरेंचा प्रोब्लेम सोल्व केला. लॅब टेस्टींगमध्ये विष मोबाईल कवरवर सापडलं. ते कवर त्याला ज्याने दिलं त्याला पानवाल्याने पाहील होतं. मकरंदचा शेजारी शिरीष खरातकडून हे कळलं की दाराचे टाळे काढताना त्याने मोबाईल तोंडात धरलेला. तेव्हाचे ते ओठांना लागलेलं आणि मग पाण्याबरोबर शरीरात गेलं.

डोंगरे

प्रताप खुनी नाही हे साहेबांनी जेव्हा सांगितलं तेव्हा विश्वासच बसत नव्हता. पुन्हा थोडी धावपळ केली तेव्हा आमची संशयाची सुई शशिकांत गावडेवर अडकली. त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता व तो फरार झालेला. त्याने जेवढ्या लोकांकडून पैसए खाल्लेले त्यांनी सगळ्यांनी आरटीओला हल्लाबोल केला तेव्हाच तो फरार झाला. सध्यातरी शोधतोय त्याला. सापडेल. जाऊन जाऊन जाणार कुठे ?

प्रताप नाईक

गेल्या काही दिवसात इतकी अशांतता अनुभवली की शेवटी आठ दिवसांची रजाच टाकली आणि बसलो घरी. मेघनाला पण या गोष्टीची कल्पना दिली. आज सुलूच्या आग्रहाखातर महाबळेश्वरला जायचं ठरवलं. सगळी तयारी करून गाडी काढली. गेटबाहेर निघालो तोच फोन वाजला. पाहील तर भालेराव.
"आहेस कुठे ?" इतक्या दिवसांचा संताप त्या दोन शब्दात, सुलू दचकलीच. मलाही जाणवलं ते.
" इथेच आहे साहेब. तुमच्या वस्तू आहेत आमच्याकडे. हव्यात ना ? "त्याचा तोच कोणतीही घाई नसलेला सुर.
"मी आज महाबळेश्वरला चाललोय. आल्यावर बोलू." मी शक्य तितका आवाजात हळुवारपणा आणण्याचा प्रयत्न केला.
"हरकत नाही साहेब. तेव्हढं पैसाचं बघा. वस्तू फार किमती आहेत." पुन्हा तोच स्वर पण यावेळेस सुर वेगळा लागलेला.
"अर्थ काय याचा भालेराव ? " मक्याच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होतेय हे जाणवलं मला.
"तुम्हाला कळला तोच. भेटू आल्यावर. आणि महत्त्वाचें म्हणजे मी भालेराव आहे. मकरंद नाही हे लक्षात असू द्या" त्याने फोन डिसकनेक्ट केला. मी हताशपणे डोके मागे टेकवलं.
"काय झाल प्रताप ? " सुलूच्या स्वरात काळजी होती.
"काही नाही. चल निघू आपण." मी बोललो. मी गाडी स्टार्ट केली आणि दुसर्‍याच क्षणी आम्ही महाबळेश्वरच्या मार्गावर होतो. थोड्याच वेळात चिंता मिटलेली. कारण ...... अहो, इन्स्पेक्टर जगताप आहेत ना आता. याला म्हणतात नशीब.................

याला म्हणतात नशीब...... (शेवटचा भाग) (हा दुवा मिळत नाही अशी तक्रार आल्याने खाली पुन्हा लिंक दिली आहे. )
शेवटच्या भागाची लिंक - http://www.maayboli.com/node/7706

गुलमोहर: 

एकदम वेगवान कथा... भरपूर वळणं घेत घेत जातेय Happy
सर्व व्यक्तिरेखा मस्त उभारल्यात.

--------------
नंदिनी
--------------

तूफान प्रवाही...खिळवून ठेवणारी कथा...!

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

काय सही झालीय कथा! खुप आवडली.

मस्त कथा..आवडली...

काय भारी लिहिली आहे रे.............तोड दिया.....

सही रे! मस्त डायलॉग्ज , सगळ्या व्यक्तिरेखा फिट्ट अगदी. प्रत्येकाची भाषाशैली मस्त जमलीय!
एक शंका , त्या शश्याने विष द्यायचं तर मोबाईल कव्हर ला का लावावं? मक्या ते तोंडात घालेलच याचे चान्सेस कमीच ना?

आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम.................. आभार... आभार..... आभार.
मैत्रेयी, मक्याने मोबाईल तोंडात धरला ते त्याच नशीब. मक्या मोबाईल हाताळणार हे तर नक्की आणि हातातोंडाची गाठ पडतेच. आपल्या शंकेचे समाधान झाले असेलच.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

एकदम वेगवान कथा. वाचायला खूप मजा आली.

कौतुक
खुप सुंदर. तुझ्या कथा वाचताना नारायण धारप, सु शि सगळे आठवतात एकदम.अतिसुंदर !
एक शंका, तु नक्की ईथेच लिहितोस की कोणि मोठा लेखक आहेस ( मोठा लेखक आहेसच, पण सु शि सारखा )आणि नाव बदलुन ईथे येतोस?

सुरेख कथा कौतुक.... Happy
मैत्रेयीचा प्रश्न मलाही पडला होता, पण त्यावर तुझं उत्तर समाधानकारक वाटलं....

भार्री कथा!! किती खिळवून ठेवावं! छ्या!
मजा आली.. येऊदेत अजुन अशा कथा!

नमस्कार कौशि ...... जसे सुशि तसे कौशि Happy
कौशि फॅन क्लब ची कल्पना कशी वाटते? पहिला सभासद ..... विशाल कुलकर्णी !!

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

खूप छान वेगवान कथा. रिमझिमला अनुमोदन.. Happy फॅन नं. २ मी.. Happy

सही रे कौतुका Happy
एका दमात वाचली बघ. एक्दम वेगवान कथानक.
त्यात तुझी लिखाणाची स्टाईल पण जबरी Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

मैत्रेयीची शन्का रास्त वाटते, पण असो
एकन्दरीत आख्खी कथा भरपुर टर्निन्गपॉईण्टसहीत सुन्दर जमलीये Happy
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

खुप मस्त कथा सगळे ट्विस्ट्स आणी टर्न्स मस्त रेखाटलेत...क्या बात है!! खुप आवडली कौतुक Happy
सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

मस्त! कथाबीज छान अन धाटणी, शैलीही भारीच.
मनापासून आवडली. Happy
***
स्पॉयलर (कथा न वाचलेल्यांनी खालची वाक्ये वाचू नये)
प्रतिक्रियांमध्ये सस्पेन्स उघड करताना स्पॉयलर देत चला रे. ते कव्हरचं विष तोंडात जाऊन मक्या मेला, हे आधीच कळलं ना मला. (अर्थात कथेच्या प्रतिक्रिया आधी वाचल्यामूळे. असे बरेच लोक करीत असावेत.) Happy
त्यामूळे मजा कमी होते ना वाचण्याची.
***
असो. एकंदरित छानच जमलीये. Happy
--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

मला परफेक्ट वाटल. मोबाइल हाताळणे साहजीकच आले. मग फोनला तोंड किंवा हात तोंडात जाणे ह्यापैकी काहीतरी मागे पुढे स्टेप नक्कीच होण्याची शक्यता आहे खरी.

सॉल्लिड... म्हणजे सॉल्लिडच... एकदम खतरनाक. संपली नाहिये ना?

रिमझिम, आयडी फोटोसकट खरा आहे. काही माबोकर साक्षी आहेत. माझी लिखाणाची हौस मी इथेच भागवतो.
विशाल, रिकामा आहेस का सध्या ??? नको ते येतयं डोक्यात म्हणून विचारलं.
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार....... आभार........ आभार.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

झकास. तो तोंडात मोबाईल धरण्याचा प्रसंग अगदी मुव्हीसारखा आहे. अगदीच सही.
फ्लो जबरदस्त आहे कथेचा.

कौतुक्.......अगदि कौतुक करण्यासारखी कथा लिहीली आहेस.....

<<भार्री कथा!! किती खिळवून ठेवावं! छ्या! मजा आली.. येऊदेत अजुन अशा कथा!>> BSK शी एकदम सहमत..........

असेच छान छान लिहीत रहा.

Roops..........

" करु न याद मगर किस तरह भुलाऊ उन्हे, गझल बहाना करु, और गुनगुनाऊ उन्हे...."

जबरदस्त कथा,कौतुक! तू मा बो वर लिहितोस हे आमच्यासारख्यांचे नशीबच आहे.

मस्त... मोबाइल कव्हरची आयडीया एकदम अनपेक्षित कलाटणी त्यामुळे अजून मजा आली!

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

लै भारी राव!
कथा वाचायला सुरू करताना खिळवून ठेवणारी वाटली नव्हती, पण ती पार संपल्यावरच कळाल की किती 'भारी' होती.
अनेक धन्यवाद.

मस्त कथा कौतुक.... एकदम भारी झालीये. मस्त मज्जा आली कथा वाचताना..

Pages