चांदराती हासली तू

Submitted by Kiran.. on 18 January, 2012 - 18:09

चांदराती हासली तू हासले नं चांदणे
अंबराला जाग आली वाजता गं पैंजणे

राहवेना साहवेना म्हणुनी केले असे
आरसा चोरून पाही रूपडे हे देखणे

धुंद झाल्या धुंद झाल्या लाजल्या दाही दिशा
बघ मुक्या या तारकांची तेज झाली स्पंदने

काल राती कोण गेले ओठ माझे चुंबुनी
मग असे भानावरी जमते मला ना राहणे

का सखे डोळ्यांतुनी तू धाडिशी बोलावणे
भासली तू हासलीशी सोड ना हे लाजणे

Kiran

गुलमोहर: 

किरणः धुंद कविता. मस्त आणि जबरदस्त.
'कालराती' म्हणल्यामुळे 'काळरात्री' असा अर्थ निघतो. तुम्हाला 'काल रात्री' (last night) असे अभिप्रेत आहे असे वाटते.

काल राती असे करतो. Happy थँक्स.
रात्री पेक्षा राती हा शब्द मला आवडतो.. गावची तेव्हढीच आठवण

किरण्या, 'तेज' बदलता येतो का ते पहा. Happy
चांदणे हासले का नाही ? Uhoh (एक गहन प्रश्न)
काल राती कोण गेले ओठ माझे चावुनी >>>> उंदीर जास्त झाले असतील घरात. Proud

छान .... रोमॅंटिक कविता

’तेज’ साठी ’शीघ्र’, ’द्रुत’ हे पर्याय सापडले.
यापैकी ’शीघ्र’ शब्दात तितकी मजा येत नाही.
’द्रुत’ मुळे एक मात्रा कमी पडते.

"बघ मुक्या या तारकांची जाहली द्रुत स्पंदने"
हा बदल कसा वाटतो ?

फारच छान !!

( अवांतर :
काल राती कोण गेले ओठ माझे चावुनी
मग असे भानावरी जमते मला ना राहणे

हे कडवे जरासं "स्त्रीमुखी" वाटले ...त्यामुळे जर्रासा गैरसमज झाला होता Wink )

खूपच सुंदर. दुसर्‍या कडव्यात 'राहवत नाही, साहवत नाही म्हणून जरा चोरून आरशात हे देखणे रुपडे पाहिले' असे अपेक्षित असेल तर थोडे आणखी पॉलिश करायला हवे. अर्थत माझे वैयक्तिक मत आहे हे.

धन्यवाद सर्वांचे
कर्णिक सर, आरशाला देखील राहवले नाही आणि त्यानेही चोरून तिचे रूप न्याहाळले असा अर्थ अभिप्रेत आहे .