इंग्रजीतून सातत्याने लिहिणारे भारतीय लेखक म्हटले की दोन पिढ्यांमागे अगदीच एका हाताची बोटे पुरायची मोजायला. मुल्कराज आनंद, मनोहर माळगांवकर, आर के नारायण, झाले. फारतर खुशवंत सिंह आणि कमला मार्कंडेय.
ही यादी पूर्णतः स्मरणाधारित असल्याने एखादे ताकदीचे नाव सुटले असेल तर आधीच 'चुभूदेघे' म्हणतो.
आणि एखादे(च) पुस्तक लिहून प्रसिद्ध झालेले कुणी असतील तर ते माझ्या रडारवर नाहीत हेही नोंदून ठेवतो.
या लेखकांमधले थोडेसे मनोहर माळगांवकर सोडले तर बाकीच्यांचे लिखाण एका ठरीव साच्यातले असे. माळगांवकरांचासुद्धा 'कान्होजी आंग्रे' एवढाच अपवाद. आर के नारायण यांनी तर मालगुडीची गिरणी सुरू करून सगळ्यांचेच भुस्कट पाडले. पण तेव्हा 'ग्रॅहॅम ग्रीनने (पक्षी: एका 'साहेबा'ने) पुढे आणलेला लेखक' हे कवचकुंडल असल्याने त्याबद्दल बोलायची कुणाची शहामत नव्हती.
एका पिढीमागे अमिताव घोष, उपमन्यू चटर्जी, विक्रम सेठ, सलमान रश्दी, ओ व्ही विजयन, या आणि अशा मंडळींची गिनती करताना हातापायाचे बोटे काही पुरेनात. आणि विषयही बरेच वैविध्याकडे झुकले. राज राव, अशोक रावकवी वगैरे मंडळींनी तर समलिंगी संबंधांवर भलतीच जनजागृती करून टाकली. पण ते सोडले तरीही इंग्रजीतून लिहिणार्या भारतीय लेखकांच्या पुस्तकांनी लायब्ररीचे अख्खे शेल्फ भरू लागले.
या पिढीत अशी दहाबारा शेल्फे भरतील एवढी अशा लेखकांची संख्या वाढली आहे. आणि विषयांमधले वैविध्यही अंगावर येईल इतके रंगीबेरंगी झाले आहे. प्रवासवर्णने, ललित लेख, कादंबर्या, कथा, रेलचेल आहे नुसती. त्यातील काही पुस्तकांबद्दल लिहावे असा हेतू आहे. त्याआधी दोन खुलासे.
एक म्हणजे नोबेल पारितोषिक अगदी म्हणजे अगदी ताबडतोब, शक्यतो दिवस मावळायच्या आत (किंवा मावळला असल्यास पुन्हा उगवायच्या आत) द्यावे या दर्जाचे स्वनामधन्य चेतन भगत यांच्या पुस्तकांबद्दल लिहिण्याचा माझा अजिबात विचार नाही. माझी ती कुवतच नाही.
दुसरे म्हणजे ही पुस्तके कुठल्याही प्रकारच्या 'उच्च साहित्या'त मोडतात असा माझा मुळीसुद्धा दावा नाही. 'क्रॉसवर्ड'मध्ये गेल्यावर एका वेळेस पाचशे रुपयांच्यावर खर्च करायचा नाही (तेवढेच मिळतात हो एकावेळेस!) या अटीवर घेतलेली ही पुस्तके. त्यामुळे पुस्तकाच्या ब्लर्बसोबतच (किंबहुना त्याही आधी) किंमत बघून घेतलेली पुस्तके एवढे(च) या पुस्तकांचे वैशिष्ट्य.
नमनाचे घडाभर तेल झाले. आता पुस्तकाविषयी.
'पेंग्विन बुक्स'ने 'मेट्रो रीडस' या शीर्षकाखाली एक पुस्तक मालिका सुरू केली आहे. "लव्ह ऑन द रॉक्स" हे इस्मिता टंडन धन्कर यांनी लिहिलेले पुस्तक या मालिकेतले.
ही एक रोखठोक खुनाखुनीची रहस्यकथा आहे. घडते एका मालवाहू जहाजावर. त्याचा कॅप्टन एकदम पियक्कड. फर्स्ट ऑफिसर आरॉन अँड्र्यूजचे नुकतेच लग्न झालेले आहे आणि त्याची बायको सांचा त्याच्यासोबत काही काळ घालवण्यासाठी जहाजावर आलेली आहे. ती येण्याआधी पहिला खून झालेला आहे. त्याबद्दलही तिला कळते ते आडवळणानेच. आणि तिचा नवरा तिला काही सांगायला तयार नाही. किंबहुना तो अजूनच काहीतरी लपवतो आहे अशी तिला शंकावजा खात्री होण्यासारखेच त्याचे वर्तन आहे. फर्स्ट इंजिनियर हर्ष कॅस्टिलो हा आरॉनचा जवळचा मित्र. पण आरॉन आणि सांचाच्या दरम्यान चालू झालेल्या झकापकीमध्ये हर्षचे वर्तनही संशयास्पद वाटू लागते. त्यात अजून एक खून पडतो, एक चोरी होते, स्पेशल इन्व्हेस्टिगेशनसाठी राघव श्रीधर नामक एक बिग बॉस बोटीवर पोहोचतो. शेवटी अर्थातच नीट उलगडा होतो.
नेहमीच्या रहस्यकथेहून वेगळे म्हणजे ही कथा वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीकोनातून उलगडत जाते. त्यात इतर माहीत असलेल्या पात्रांबरोबरच 'मान्ना' नामक एक पात्रही आहे, जे कोण आहे हे पुरेसे स्पष्ट होत नाही. पण ते पात्र खुनी असावे असा संशय मात्र हळूहळू आळत जाणार्या बासुंदीसारखा दाट होत जातो (मधुमेही लोकांसाठी: पिठल्यासारखा दाट).
यातली इंग्रजी भाषा ही इंग्रजी भाषाच वाटते. जी शाळेत शिकलो ती इंग्रजी भाषा. त्यामुळे "वाटतेय तर इंग्रजी, पण.... बघू अजून चार पाने वाचून, कदाचित समजेलही" असे स्वतःशीच घोकत पानांमागून पाने उलटणे नशिबी येत नाही. आणि त्यातील शब्दसंपदाही सर्वसाधारण लोकांना कळेल अशीच आहे. GRE वा CAT साठी वर्ड-लिस्ट्स घोकणार्या जनतेसाठी राखीव नाही. शिव्या, अपशब्द, शारिरिक क्रियांचे सरळसोट उल्लेख असले काही नाही.
मर्चंट नेव्हीच्या जहाजावरच्या लोकांची वेगळी अशी एक भाषा असते. ती भाषा प्रमाणाबाहेर वापरून ("सेकंडचा नाईटवॉच संपला तेव्हा फर्स्टमेट गॅलीमधून स्टारबोर्ड डेकला जायला निघाला होता. तेवढ्यात त्याला बोसनची सावली ब्रिजच्या दिशेने जाताना दिसली" इ इ) आपण कसे साहित्यामध्ये वेगळे नाणे पाडायला निघालो आहे हे जाहीर करण्याची अनंत आसक्ती काही लेखकांना असते. या लेखिकेला तसला काही सोस नाही. तिला मर्चंट नेव्हीची पार्श्वभूमी नाही. लेखिका एमबीए केल्यावर 'थॉमस कुक'मध्ये काही काळ नोकरी करून पूर्णवेळ लेखन करण्यासाठी नोकरीतून मोकळी झाली.
मैथिली दोशी आफळे यांचे मुखपृष्ठ साधे, पण एकदम वेगळे आहे. अंधेरीपासून चर्चगेटपर्यंत गर्दीत शिजून निघावे, उतरल्या उतरल्या समुद्रावरून एक झुळूक यावी आणि प्रसन्न वाटावे तसे हे डिझाईन बघितल्यावर वाटते.
थोडक्यात, वाचल्याबद्दल कुठलाही पश्चात्ताप होणार नाही याची खात्री देणारी साधी सोपी कादंबरी. किंमत बघता संग्रहणीयही म्हणता येऊ शकेल.
प्रकाशकः पेंग्विन बुक्स
प्रथमावृत्ती: २०११
किंमतः रु १५०
टीप - पुढचे पुस्तक May I Hebb Your Attention Pliss - अर्णब राय. त्याबद्दल कुणी समानधर्मी लिहायला तयार असेल तर आनंद आहे. मग मी त्याच्या पुढच्या पुस्तकाकडे वळेन.
<<अनंत आसक्ती >> मस्तच
<<अनंत आसक्ती >>
मस्तच कोपरखळी!
ये गप्पे, अनंत सामंतांना काय
ये गप्पे, अनंत सामंतांना काय बोलू नको, मला आवडतं त्यांच लेखन
आणि तुझसुद्धा.
बाबु, ही कमेंट मला की चौकसला
बाबु, ही कमेंट मला की चौकसला उद्देशून?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! अतिशय सुंदर! पुन्हा
व्वा! अतिशय सुंदर! पुन्हा पुन्हा वाचले!
आवडला परिचय!
आवडला परिचय!
मस्त लिहिलंय !
मस्त लिहिलंय !
आवडला परिचय !
आवडला परिचय !
पुस्तक नाही बॉ वाचणार हे, पण
पुस्तक नाही बॉ वाचणार हे, पण तुमची शैली म्हणजे मायबोलीवरचा जरा सुखद काळ आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रैना +१
रैना +१
पुस्तक परिचय करण्याची
पुस्तक परिचय करण्याची स्वच्छ्,सरळ शैली आवडली..
आवडला परिचय. रैना + २.
आवडला परिचय.
रैना + २.
एक म्हणजे नोबेल
एक म्हणजे नोबेल पारितोषिक...... द्यावे या दर्जाचे स्वनामधन्य चेतन भगत यांच्या पुस्तकांबद्दल लिहिण्याचा माझा अजिबात विचार नाही. माझी ती कुवतच नाही.>>> तोडलयं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
'क्रॉसवर्ड'मध्ये गेल्यावर एका वेळेस पाचशे रुपयांच्यावर खर्च करायचा नाही (तेवढेच मिळतात हो एकावेळेस!)>>> समदु:खी आहात
पुस्तक परिचय आवडला.
पुस्तक परिचय आवडला.
रैना. आगाऊ ++१. मस्त लिहिले
रैना. आगाऊ ++१.
मस्त लिहिले आहे. पुस्तक वाचायला हवे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुस्तक परिचयाची शैली आवडली.
पुस्तक परिचयाची शैली आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रैना +३...
रैना +३...
छान लिहिलंय. पुस्तक मिळवून
छान लिहिलंय. पुस्तक मिळवून वाचेन.
अनंत आसक्ती >> हे काही पटले नाही, असो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परिचय आवडला. पुस्तक वाचेन
परिचय आवडला. पुस्तक वाचेन सावकाश.