काल झालेल्या गटगचा वृत्तांत

Submitted by बेफ़िकीर on 2 January, 2012 - 04:29

गोरेगाव येथे स्थित एका पिंपळाच्या पारावर बसणार्‍या व पोपटाच्या मदतीने लोकांना भाकिते सांगणार्‍या एका कुडमुड्याने रस्त्यावरून चाललेल्या मिलिंद पाध्ये या इसमाला हाका मारून जवळ बोलावून सांगितले की तुमच्या एस्टीमची बॅटरी अठ्ठेचाळीस तासांनी डिसचार्ज होणार असून तुम्हाला एक कवी व एक समीक्षक त्या प्रसंगातून बाहेर काढतील व या सर्व घटनाक्रमाच्या साक्षीदार म्हणून ललिता पवार उर्फ बागेश्री उर्फ ललितराणी, मोडतोड हीच शुद्ध निर्मीती मानणार्‍या दक्षिणा आणि समीक्षकांच्या पत्नी असल्यामुळे अबोल असलेल्या समीक्षकांच्या पत्नी उपस्थित राहतील.

हे कळताच मिलिंद पाध्येंनी सडेतोड शब्दात सांगितले की ललितराणी या व्यक्तीला ते ती एकटी असताना भेटू शकत नाहीत व त्यांचे पती आल्याशिवाय एस्टीमची बॅटरी डिसचार्ज होणार नाही यासाठी एखादा विधी सांगा! कुडमुड्याने त्यांना 'स्वतःचे सर्व ड्यु आय नष्ट करा' असा सल्ला देताच नैसर्गीक सात्विक संतापाने उसळत मिलिंद पाध्येंनी त्यांचा एकही ड्यु आय नसल्याचे छातीठोकपणे ऐकवले. यावर कुडमुड्या यांनी एकाचवेळी शोलेमधील अमजदखान, घातकमधील डॅनी डेंझोंग्पा व मायबोलीवरील पंत या तिघांप्रमाणे भीषण हसून त्या विनोदाला दाद दिली. थरथर कापत मिलिंद पाध्ये यांनी 'भुंगा' हा माझा ओरिजिनलच आय डी आहे असे सांगताच कुडमुड्या यांनी पश्चात्तापदग्ध मनस्थितीत आपल्याकडील पोपटाला हवेत सोडून देत 'मी नाही यापुढे भविष्य सांगणार' अशी भीष्मप्रतिज्ञा केली. मात्र तो पोपट एखाद्या क्षुल्लक पाककृतीप्रमाणे पुन्हा पुन्हा तेथेच कडमडत सर्वांगाने ओरडत राहिला की तुम्ही नव्हताच भविष्य सांगत, मी सांगत होतो.

शेवटी एकदा भुंगा यांचे सात्विक माबोचारित्र्य मान्य झाल्यावर कुडमुड्यांनी आशीर्वाद दिला की समीक्षकांना जर ताप वगैरे आलेला नसला तर ललितराणी यांचे यजमान नक्की येतील. हे भुंगांनी कवी बेफिकीर यांना सांगताच बेफी म्हणाले की ते असल्यावर समीक्षक येतीलच कसे? पण समीक्षक ही पक्की निर्ढावलेली जमात असते असे विधान एकही कविता न करूनही भुंगा यांनी केले याचे श्रेय कोणाला द्यावे हे समजत नाही. या विधानाबाबत परेश लिमयेंना दिवे हवे असल्यास ते मिळतील.

तर फोनाफोनी होत असे ठरले की भुंगा यांच्या एस्टीमची बॅटरी वृंदावन हाईट्स या कोथरुडमधील एका इमारतीजवळ डिसचार्ज होणे हे सर्वांनाच श्रेयस्कर व सोयीस्करही आहे. याचे कारण किंवा कारणे अनेक होती. ही कारणे त्यांच्या महत्वाच्या प्राधान्यानुसार खालीलप्रमाणे:

१. ललितराणी यांचे सासर तेथून माणसाच्या चालण्याच्या अंतरावर आहे.

२. भुंगा यांची सासुरवाडी तेथून डायनॉसॉरने चालण्याच्या अंतरावर व बॅटरीवाल्याने तीन मिनिटांत पोचण्याच्या
अंतरावर आहे व भुंगा यांना सासुरवाडीतून बौद्धिक विश्रांती मिळण्यास हे ठिकाण बरे आहे.

३. दक्षिणा यांचे घर तेथून खूप लांब आहे (येथेही दिवे मिळतील )

४. परेश लिमये व त्यांच्या सौ. यांना ही जागा सापडेलच याबाबत काहीही शाश्वती नाही.

५. बेफिकीर हा नैतिक अधःपात झालेला मध्यमवयीन गृहस्थ तेथेच राहतो.

वर्षाची इतकी भीषण सुरुवात कोणाचीही कधीही होऊ नये अशी प्रार्थना करून वृत्तांताला सुरुवात करतो.

पहाटेच मला जाग येण्याआधी एक स्वन पडले. अतिशय दु:खद असे ते स्वन पाहून मी किंचाळत उठलो. त्या स्वप्नात बागेश्री व दक्षिणा या दोघी माझ्या बायकोसमोर माझ्या २४ पैकी प्रकाशित प्रकरणांची आस्वादक चर्चा करत होत्या. पीएमटीतून एखादा पेन्शनर उतरावा तसा माझा चेहरा उतरलेला होता. यशःश्रीला हे स्वप्न सांगताच तिने अडीच मिनिटांचा अबोला धारण करून माझी पाचावर धारण बसवली. माझी अवस्था 'फक्त माध्यम प्रायोजकांनी आवाहने केल्यावर वर येणार्‍या' गप्पांच्या पानासारखी झाली. म्हणालात तर आहे, दिसत तर नाही अशी!

ती अघोरी पहाट ते दुपारी बारा हा कालावधी मी नवीन लेखनाच्या पहिल्या पानावरील एखाद्या 'काकाक' प्रमाणे नम्रपणे वावरत काढला. दर क्षणागणिक खाली जात असूनही मी आहे हे मात्र कळत होते.

बारा वाजता 'आपण मूळ साहित्यकृती प्रकाशित करण्यापुर्वीच तिचे विडंबन व्हावे' अशा पद्धतीने यशःश्रीने विचारले की 'करायचे काय आहे?'! यावर मी बाणेदारपणे उत्तर दिले की 'हे माझेच गटग आहे व ते मी एकटाच पार पाडेन'! त्यावर तिने 'डोंबल' असे म्हणून उपम्यासाठी रवा आणायला सांगितला. घरी 'थुत्तरफोड' जमाव जमणार असल्यामुळे 'मेन्यू बदलायला लागेल' असे मी म्हणून पाहिले. संपादनाची सोय घरात नसल्यामुळे 'जे लिहिले तेच फायनल' या नियमाप्रमाणे उपमा ठरला.

दरम्यान मी पौड रोडला जाऊन एक बॅटरीवाला पाहून ठेवला. परेश लिमयेंचा ताप उतरत असल्याची दु:खद बातमी कळताच माझ्या मनावर शोककळा निर्माण झाली. आक्रंदणार्‍या मनस्थितीत मी सर्वांना एसेमेस केला की ताप उतरल्यामुळे समीक्षक येणार आहेत. माझ्या एसेमेसमुळे निर्माण झालेला त्सुनामी दोन वाजेस्तोवर धुमाकूळ घालत होता. (त्सुनामी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याचे एकदा संयुक्ताच्या सभासदांशी झालेल्या माझ्या वादात मला पटलेले आहे, पण ते अलाहिदा! तेथे 'गटग' हा शब्दही 'ती गटग' असा म्हणतात असे ऐकले आहे.) त्यात ललितराणी व दक्षिणा यांनी न येण्याच्या धमक्या देऊन पाहिल्या. शेवटी मी त्यांना कन्फर्म केले की समोर असल्यावर परेश नीट बोलतो. तो नीट न बोलल्यास तुम्हाला प्रत्येकीला दहा दहा मिनिटे वाढीव बोलण्याची मुभा मिळेल. हेही पुरेसे नसल्यामुळे मी शेवटी सांगितले की परेश लिमये सहपरिवार येत आहेत. तेव्हा कोठे त्यांना मनःशांती मिळाली.

'निसर्गाच्या गप्पांप्रमाणे' वाढत असलेला माझा उत्साह आणि 'पार्ल्यातल्या गप्पांप्रमाणे' वाढत असलेला यशःश्रीच्या बोलण्यातील उपरोध हे दोन्ही असह्य होऊन माझे बाबा त्यांच्या खोलीत जाऊन जप करू लागले व दोन कामवाल्या बायका पाय आपटत निघून गेल्या. शेवटी मी 'अगदी नुकतेच माबोचे सभासद घेतलेल्या सदस्याप्रमाणे' 'बारा वर्षे सव्वीस आठवडे' झालेल्या सदस्याला म्हणतात तसे यशःश्रीला म्हणालो:

"उपम्याऐवजी मटार करंज्या चालतील का?"

गझलेत काफिया बदलावा तसा मेन्यू बदलला.

अ‍ॅडमीनने कारवाई केलेल्या सदस्यासारखा चेहरा करून मी मटार करंज्या, फळे व केक आणला. तेवढ्यात विरंगुळ्याच्या पानावर सूडाच्या भूमिकेतून काही ड्यु आय येतात तसे माझे तळेगावचे काका आणि वहिनी आले आणि कसलेतरी पेढे देऊन चहा घेऊन निघून गेले. अवांतर प्रतिसादांनी येणारे नैराश्य माझ्या मनावर जम धरतेय तोवर ललितराणी बागेश्री यांनी 'स्पेन्सरच्या बाजूला असलेल्या दोन गल्ल्यांपैकी तुमची कोणती' असे 'गणेशोत्सवात ही कथा कोणाची' असे विचारतात तसे विचारले.

चार वाजता 'वाट पाहणे' सुरू झाले तेव्हा भुंगा यांनी संदेश पाठवला की 'तुमच्या कादंबरीच्या पुढच्या भागाप्रमाणेच मला उशीर होत आहे'! ही सुखद बातमी वाचून मी नाचतोय तोवरच बेल वाजली आणि एक पिवळा पोषाख परिधान केलेली अहिंसक चेहर्‍याची स्त्री उगवली.

"या... आपण कोण?"

असे मी म्हणताच क्षणभर त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर 'थोबाड फोडू का' या स्वरुपाचे भाव आले व लगेच गेले. मी जे ओळखायचे ते क्षणात ओळखले. तिची आणि यशःश्रीची ओळख करून देत दोघींनाही त्या दोघीही कोल्हापूरच्या आहेत याची आठवण करून दिली. त्यानंतरच्या गपा ऐकण्यासारख्या आहेत.

द इज फॉर दक्षिणा आणि य इज फॉर यशःश्री! शालेय स्वरुपाचे संवाद लेखन खूप मागेच बंद केलेले असले तरी आज करत असल्याबद्दल टण्या यांची माफी मागण्याच्या विचाराचा मी 'माझा पुपुवर होतो तसा' अनुल्लेख करत आहे.

द - तुम्ही कोल्हापूरच्या आहात? कुठे आहे घर??

य - सुभाषनगर आणि प्रतिभानगर

द - नाही कारण आमचं मूळ गावातच घर असल्यानेमला काहीच माहीत नाही..

य - कोणत्या शाळेत होतात??

द - अमुक अमुक... तुम्ही??

य - अमुक अमुक...

द - हो का??

य - मग तुम्हाला राहुल जुवेकर माहीत असेल??

द - हो ई चांगला माहीत आहे... इत्यादी

य - मग त्याची बहिण माझी धाकटी वहिनी आहे...

द - म्हणजे गौरी??????????????????????????????

य - हो... तुम्ही काय करता???

द - मी अशा अशा ठिकाणी आहे...

य - मग यांना संदीप माहीत असेल नाही हा रे भूषण???

द - कोण संदीप??

य संदीप गोडबोले??

द - हो ई माहीत आहे की...

य - तो माझा सख्खा आत्तेभाऊ...

द - संदीप गोडबोले तुमचा आत्तेभाऊ???????????????????????

आपल्याच देखत आपल्याच साहित्यकृतीची वाट लागत आहे आणि आपण काहीही करू शकत नाही आहोत अशी काहीतरी माझी अवस्था होती.

तेवढ्यात हिरवा ड्रेस परिधान करून एक शालेय विद्यार्थिनी आली. तिने व दक्षिणा यांनी 'येथे आपल्याला काही मिळेल की नाही' असा विचार करून आणलेले खाद्यपदार्थ भेट म्हणून दिले. देताना मात्र 'पहिल्यांदाच आले ना म्हणून आणले' असे समर्थन ऐकवले.

"तुम्ही बागेश्री का?"

असे मी त्या विद्यार्थिनीला विचारताच भुंगा घरात आला आणि घरात चैतन्य सळसळल्याचा अनुभव मी गृहीत धरला. भुंगा आला की असे म्हणतात असे मी ऐकलेले आहे. आपलं काय जातंय म्हणायला?

भुंगा आणि पंत यांना वेगवेगळे भेटले की आपल्याला एक आसूरी आनंद मिळतो असे बागेश्री यांना वाटत असावे व त्यामुळे त्या अचानक दिलखुलासपणे मधुबालासारख्या हासल्या. (हेही म्हणायचे असते असे समजले आहे).

आता जमलेल्या जमावातून माझे स्थान नष्ट होऊ लागल्यामुळे मी परेशला फोन केला व त्याने निघतच असल्याचे सांगितल्यामुळे मला अधिकच दडपण जाणवू लागले. चुकून एखादे ललित दोनदा प्रकाशित होते तसे मी बागेश्रींना पुन्हा 'तुम्ही बागेश्री का' हेच विचारले. श्री बागेश्री म्हणजे प्रसाद न येण्याचे कारण विचारणे ही एक औपचारिकताही पार पाडली. प्रसाद देशमुख आले असते तर नंतर ते कधी साधे पुण्यातही आले नसते याची सर्वांनाच कल्पना होती.

तोवर आजारपणातून उठल्याप्रमाणे अजिबात न दिसणारे समीक्षक आपल्या अबोल व सस्मित चेहर्‍याच्या पत्नीला सोबत घेऊन अवतरले. ते आल्यावर साहित्यनिर्मीती या भानगडीत न पडणार्‍या, म्हणजे दक्षिणा व भुंगा यांना काहीच वाटले नाही. मात्र ललितराणी यांना क्षणभर 'नवमराठी समाजातील काव्याचे स्थान' यावर काहीतरी स्फुरणार असे वाटू लागले. मेधा लिमये या स्वतःहीपेक्षा आपल्या पतीराजांना अधिक नीट ओळखत असल्याने त्या 'न बोलणे हाच यशाचा एकमेव मार्ग' हा उपाय योजत होत्या.

जमलेल्या कॉम्बिनेशनमध्ये कोणीच कुणाचे 'गेल्या दहा बारा वर्षांपासून' वगैरे शत्रू नसल्याने किंवा मित्रही नसल्याने एक विचित्र अवघडलेपण निर्माण झालेले होते जे पूर्वी येथे तरहीची नवीन ओळ दिली गेल्यावर व्हायचे.

कोणाशी कसे वागता येईल हे ज्याचा तो ठरवत होता.

असंबद्ध गप्पा हा धागा का निघाला असावा याची साधारण कल्पना येऊ लागल्यावर सर्वांना डायनिंग टेबलवर आचारण करणे हे मला खात्रीलायकरीत्या सहाय्यभूत ठरेल असे वाटले.

'कोणती गाडी घ्यावी' आणि 'कोणता मोबाईल घ्यावा' यावर पी एच डी केलेली असूनही यातील कोणती खुर्ची घ्यावी हे मात्र प्रत्येकाला सांगावे लागले. मी घरात असल्याने भुंगाच्याच शेजारी बसलो.

प्रथम सर्वांनी भुंगा व गोरेगावचा कुडमुड्या यांचे आभार मानले व बॅटरी किती वाजता जाईल असे विचारले. त्यावर भुंगा यांनी 'प्रयत्न चालू आहे, गाडी बंद करून सर्व दिवे ऑन ठेवलेले आहेत' असे आनंददायी उत्तर दिले.

आहारानंतर व काहीश्या आग्रहानंतर हे सगळे निघतील असे वाटले,. पण कसले काय! यशःश्रीने 'सखी गं टाक पुढचं पाऊल' लावल्यामुळे कोणीही पाऊल उचलेना! समीक्षक स्वतः, संयमाचा पुतळा मेधा आणि यशःश्री हे सिरियल पाहू लागले.

मग दक्षिणा यांनी 'थोडे गॉसिपिंग करूयात का' असा प्रामाणिक व सर्वांच्याच मनातील प्रश्न विचारल्यावर मी, त्या, ललितराणी व भुंगा हे माझ्या खोलीत आलो व अशा विचित्र कॉबिनेशनचे जे कोण माबोशत्रू असतील त्यांचा कधी नव्हे इतका अपार उल्लेख सुरू झाला. वाचकांनो, त्यात आपले नांव तर नव्हते ना असा विचार मनात असल्यास खात्री बाळगा की ते होते. वेबमास्टर आणि रोमात राहणारे सोडून उर्वरीत सर्वांवर गहन चर्चा झाली.

दरम्यान माझ्या मनात आलेली काही वाक्ये किंवा प्रश्नः

१. मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही?

२. आज सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही?

३. आज झक्की वाचणार्‍याला बरे वाटेल असे तर बोलले नाहीत? (दिवे)

४. आज जामोप्या, इब्लिस, मास्तुरे यांनी गळ्यात गळे तर घातले नाहीत? (दिवे)

हे सर्व प्रश्न परेश लिमये ठामपणे 'सखी गं' पाहात असल्यामुळे मनात आले होते.

अर्धा तास गॉसिपिंग झाल्यानंतर सर्वांनी पुन्हा एकत्र बसून गपा मारल्या व मला एक गझल ऐकवायला सांगितली. माझ्याच घरात असल्यामुळे दाद द्यावीच लागली.

नंतर निघायची (एकदाची) वेळ झाल्यावर ( यशःश्री, परेश व मेधा) सोडून सर्वजण खाली उतरले. तेवढ्यात परेशही उतरला व खरच भुंगाच्या एस्टीमची बॅटरी गेली आहे ना हे त्याने चेक केले. ठरल्याप्रमाणे भुंगा वैतागला व दक्षिणा व ललितराणी यांनाही सहानुभूती वाटल्याचे दाखवावेच लागले. नंतर ललितराणीयांना आठवले की येथे त्या गटगला आलेल्या होत्या व त्यांना घरीही जायचेच आहे. त्यामुळे त्या चालत निघून गेल्या. दक्षिणा यांना मी रिक्षेजवळ (प्रत्यक्षातल्या .... विपूत फिरतात त्या रिक्षा नव्हेत) सोडले व परेश व भुंगा यांना घेऊन ठरल्यापमाणे बॅटरीवाल्याकडे पोचलो. तेथे यथावकाश बॅटरी बदलून मिळाल्यावर भुंगा यांनी सर्वांचे आभार मानले. झालेल्या मनस्तापावर उतारा म्हणून परेश यांनी ' आपण चौघांनी बाहेर जेवायला जाऊयात का' असा नम्र मुद्दा मांडून पाहिला व माझ्या सौ नेतो हाणून पाडला. मग तिने मेधा यांना कुंकू लावले व त्यांनीही यशःश्रीला! मग परेश आणि मेधा हे व्यथित अंत:करणाने आपल्या वाटेला निघून गेले.

साधा 'ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा' म्हणून धागा काढायला जावे आणि तो भयंकर गाजावा तसे हे गटग पार पडले.

काही तळटीपा:

१. वाचताना दिले गेले नसल्यास येथे दिवे मिळवावेत.

२. परेश लिमये आता बरे आहेत.

३. दक्षिणा येथे वावरतात त्यापेक्षा अधिक अदबशीर वागतात.

४. आमच्याकडेच गटग व्हावे असा कोणताही नियम नाही.

५. बागेश्री हासण्याचा कोणताही आविर्भाव न करताही हासल्यासारखे आवाज काढू शकते.

=====

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

साधा 'ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा' म्हणून धागा काढायला जावे आणि तो भयंकर गाजावा तसे हे गटग पार पडले.>>> Rofl

कल्पकतेला सलाम...
कालच्या गटग इतकाच हा व्रुत्तांतही सुंदर झाला आहे!

एस्टीमची बॅटरीच ह्या गटग मागची एकमेव हिरोईन निघाली हे फार सफाईदार पद्धतीने सिद्ध झाहले Lol

Biggrin

Rofl

वा !!

अरे मस्तच कि ! नवीन वर्षाची सुरूवात चांगलीच केलीत ..
मजा केली ना ... जेवायला बांगडा होता कि पापलेट ? कि घासपूस Proud

बेफीजी लिखाण आवडलं. आपण पहिल्यांदाच गो या अक्षराने लेखाची सुरूवात केल्याचं पाहून सुखद आश्चर्याचा धक्का बसला. शेवट ते या अक्षराने झाल्याने समाधान वाटलं. शेवटी काही आकडे कमी पडले का ? Wink Lol

आपला नम्र (:फिदी:)

बी.पै.

छानच लिहिलेत बेफिकीर! Happy

बी.पै, नाश्त्याला उपमा होता पण नंतर मटारच्या करंज्या असा बदल झाला, हे वाचनातून सुटले का? Wink

अजून जास्त मंडळी गटगला आली असती तर रंगत आली असती...
बाकी हे गटग खरेच झालेय का?

आपली नम्र

अ.पै. (:फिदी:)

पोटात ढकललेली मटार करंजी, गाजर हलवा, फळफळावळ, केक, चहा या सगळ्याला जागून मी हा वृत्तांत चांगला झाला असल्याचे जाहीर करतो....

वर तुम्हाला बहाल करण्यात आलेल्या "स्त्रीभूषण" पुरस्काराविषयी आपण चकार शब्द काढलेला नाही भूषणजी..... Proud हा निव्वाळ तुमचा विनयच असू शकतो याची खात्री आहे Biggrin म्हणून मी याचा उल्लेख करत आहे Wink

सदर पुरस्कार आपल्याला आपल्या सौ. च्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि बंद पाकिट या स्वरूपात मिळालेला आहे, याचीही वाच्यता करतो जाताजाता. Happy

रच्याक, बंद पाकीट उघडलेत का Wink Rofl

"स्त्रीभूषण" पुरस्काराविषयी >> मिलिंद ला हा पुरस्कार न मिळाल्याचं दु:ख आहे, त्यामुळे बेफी तुम्ही त्याला थोडे मार्गदर्शन करावे या विनंतीसह मीही जाहीर करते की हा वृत्तांत उत्तम झाला आहे. Happy

वर तुम्हाला बहाल करण्यात आलेल्या "स्त्रीभूषण" पुरस्काराविषयी >>> अभिनंदन बेफिकीरजी!!! बहाल करण्यात आलेले पारितोषिक आपल्या उपयोगाचे निघावे या सदिच्छा!!!

कौतुक शिरोडकर यांना अनुमोदन! Proud
हे म्हणजे समानशीलव्यसनेषु सख्यम्! आजून काय!! Lol मूळ सुभाषित संस्कृतमधील असले तरी शील आणि व्यसन यांचे मराठीतले अर्थ घ्यावेत! Light 1 कुणाचं शील कसं आहे आणि कुणाची व्यसने कशी आहेत...! बस्स, इथेच थांबतो! Rofl Light 1

बेफिकीरांना उद्देशून शेर मारावेसे वाटतात :

खुलते तुझ्या ढंगात ती अलवार वैखरी नेस तू |
झटकण्याजोगी नाहीस अगदीच होपलेस केस तू ||

सुसाट सुटलेली प्रतिभा माझीच मी आवरतो |
वा तोंडास माझिया आणशील घनदाट फेस तू ||

पटकावूनही पारितोषिक ठेवले ते गुलदस्त्यात
आत्मस्तुती ना गायलीस, लई केलेस ब्येस तू ||

काय जाहले कळले मजला दाराआडील गटगात |
मोठ्या दिमाखात सजवलीस चावडीवरील वेस तू ||

असाच राहो लेखनप्रवाहो संततधारैव बेफिकीर, |
फिरूनी तुझ्या बेफिकीरीस दे एक अनवट ग्रेस तू ||

केवळ दिवेच नाही तर आख्खी दिवाळी घ्या!

अगंगंगंगं

गामा पैलवान की जय !

भटसाहेबांचीच आठवण झाली गझल वाचून. त्यांचे काही शेर असेच नाठाळांसाठी असायचे. अर्थात ते पेटलेलेच असायचे कायम. त्यांना पेटवावं लागत नसे Proud

ग्रेस तर लाजवाब आणि फेस शी काय वाकडं आहे होय Lol

या ग्रूपचे पुढचे गटग गणेशोत्सवात ठरत असल्याने हा धागा पुनर्प्रकाशित करण्यत येत आहे.

नावनोंदणी केली तरी चालेल.

पुढील गटग गणेशोत्सवादरम्यानच्या काळात माझ्या घरी होईल. इच्छुकांनी कृपया येथे तसे कळवावे व सोयीच्या तारखाही कळवाव्यात. या गटगचे शीर्षक 'दिलजलोंका मेला' असे ठेवण्यात येत आहे. ठमादेवी येणार नसल्यास चॉकलेट केक मिळणार नाही.

-'बेफिकीर'!

खूप छान लिहिलंय. उपस्थित सदस्यांची वैशिष्ट्ये/लकबी मायबोलीचे संदर्भ देऊन छान वर्णन केली आहेत. बहुतेक ठिकाणचे पंचेस अगदी चपखल वाटले.
पुढील गटगच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

एक पिवळा पोषाख परिधान केलेली अहिंसक चेहर्‍याची स्त्री उगवली. >>:खोखो:
मोजकेच पण कळीचे शब्द टाकून डाव रंगात आणता राव..!!
लैच जबरी ..!
असेच लिहित राहा . शुभेच्छा!

Pages