विवश

Submitted by बेफ़िकीर on 26 December, 2011 - 02:27

"मग तू पोलिसात का जात नाहीस?"

दयाच्या या उत्स्फुर्त प्रश्नातील भाबडेपणाची तीव्रता उत्तर द्यायला भाग पाडणारच हे संगीताला समजले. बेसीनमधील भांडी घासताना पाण्याचा नळ बंद करत तिने मागे वळून पाहिले आणि मालकीण असलेल्या दयाला वाईट वाटणार नाही अशा स्वरात म्हणाली.

"काय आस्लं तरी आपले मालकच्चेत न्हा? ही कपाळाची जखम जाईल यक दिवस इरून, पण मी चौकीवं गेल्यानं झालेली जखम मिटंल का? संसाराला झाल्याली?"

"म्हणून हा असा मार खायचा? काल पातेलं फेकून मारलं, उद्या सुरा खुपसेल तो पोटात"

डोळ्यांत पाणी जमा झालं तशी संगीता पुन्हा भांड्यांकडे वळली. बाईंनी दिलेली औषधे आणि इतर उपचारासाठीचे पैसे ओट्यावरच असले तरी तिला आत्ता दयाबाईंचा हा सल्ला रागच आणत होता. हा सल्ला म्हणजे सरळ सरळ संसार मोडण्याचाच सल्ला होता.

पण दयाला सोक्षमोक्ष उगाचच लावावासा वाटत होता.

"आधी मला उत्तर दे, तुझी घुसमट होत नाही संसारात? आमच्यासारख्यांचे संसार आणि घरं पाहून असं नाही वाटत की आपलाही संसार असाच असावा?"

तीक्ष्ण डोळे करत संगीता पुन्हा मागे वळली.

"लहानमोठं इतकंच असतं बाई.... घुसमट तुमचीबी होतीच्चे.... तुम्हाला त्ये जानवत नाही इतकंच"

===============================

नंतरचे दोन तास दया जुन्या फोटोंचे अल्बम पाहात बसली होती. लग्नाला अठरा वर्षे झालेली होती. या दरम्यान सासू आणि सासरे दोघेही निवर्तले होते. पियु आता पंधरा वर्षांची होती. नुकतीच दहावी झाल्याने ती मामाकडे म्हणजे मुंबईला काही दिवस गेलेली होती. आली की अ‍ॅडमीशनचा किरकोळ त्रास, कारण तिला मार्क्स भरपूर पडणार यात शंकाच नव्हती.

लग्नातल्या फोटोत आपण किती सुंदर आणि किती बारीक दिसत आहोत हे पाहून पुन्हा निराशा दाटू लागली तशी ती टीव्ही लावून काहीतरी पाहू लागली. संगीता काम संपवून निघून गेलेली होती. जुना अल्बम बंद केलेला असला तरीही स्मृतींचा अल्बम मनात उघडला गेलेला होता.

अरंगेत्रमसाठी तयार होऊन ती पावणेसहाला विंगेतून पडदा अजून न उघडलेल्या स्टेजवर कोणाशीतरी बोलायला आली तेव्हा कुमार जंगम कोणाबरोबर तरी तेथेच आलेला होता. भरतनाट्यमच्या हिरव्या कच्च पोषाखात नटलेली दया कुमारच्या डोळ्यात आणि मनात भरली आणि ओळख झाली. ओळख झाल्यानंतर अर्धवट वयाच्या दयाच्याही रात्री कुमारच्या आठवणीत काही वेळ जाग्याच राहायला लागल्या. दया एकवीस वर्षांची झाल्यावर मात्र आई वडील मागे लागले आणि आई खोदून खोदून विचारायला लागली की मुले बघायला तू नाही का म्हणत आहेस तेव्हा एक दिवस कुजबुजत दयाने आईला सांगितले की कुमारने तिला प्रपोझ केलेले आहे.

आपल्यातलाच आहे आणि घरचा अतिशय व्यवस्थित आहे म्हंटल्यावर सरळ ठरवूनच टाकले लग्न तिच्या आई वडिलांनी! ते दोघे कुमारच्या आई वडिलांची वेळ घेऊन त्यांना भेटून येईपर्यंत दयाच्या जीवाच्या जी घालमेल होत होती. मात्र त्यांनाही चालू शकेल हे कळल्यावर ती आनंदाने रात्रभर जागली.

साखरपुड्यानंतर कुमारने तिला सांगून टाकले की तो तिच्यावर भाळण्याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या भेटीत दिसलेले तिचे रूप! त्या अरंगेत्रमनंतर तिचा एकही कार्यक्रम झालेला नव्हता. अरंगेत्रमच्या दिवशी तिचे लालीत्य पाहून सगळेच अवाक झालेले होते. कुमार तर जाताना तिला पुन्हा भेटलेला होता. मात्र गराड्यात असलेल्या दयाला ते आठवतही नव्हते. त्यानंतर झालेल्या भेटीत नृत्याचा विषय एकदोनदा निघाला असला तरी त्याला तितके प्राधान्य नव्हते चर्चेत!

साखरपुड्यानंतर आणि लग्नाआधी तिचा एक आणखी कार्यक्रम झाला जो गुरूपौर्णिमेनिमित्त होता. एका खासगी देणगीदाराकडून मिळालेल्या देणगीतून केलेल्या या कार्यक्रमाचे जे काही किरकोळ उत्पन्न आले ते सर्व समाजकार्यसाठी देण्यात आले. तेव्हा तिच्या होणार्‍या सासरचेही आठ एक लोक आलेले होते. प्रचंड स्तुती व कौतुकाच्या वर्षावात त्या दिवशी ती आणि कुमार नंतर फिरायला गेले.

तेव्हा ही चर्चा झाली.

"दया... लग्नानंतर डान्स सोडणार आहेस ना?"

दचकली असली तरी दयाने तसे काही दाखवले नाही. एक तर कुमारमध्ये मन गुंतलेले होते. साखरपुडा झालेला होता. नृत्य हा प्रश्न काही अगदी ऊग्र प्रकारे पुढे आलेला नव्हता. हसत हसत तिने विचारले.

"का रे? नाही आवडत घरी ??"

"तसं काही नाही... मलाच विशेष आवडत नाही... म्हणजे तू डान्स करणे हे माझ्याशिवाय कोणी पाहिलेले"

पाकळ्या खुडून फेकून द्याव्यात आणि देठ हातात राहावा तशी अवस्था झाली.

"त्यात काय विशेष... नाही कंटिन्यू करणार"..... मनाच्या अगदी विरुद्ध हे वाक्य बोलली दया!

लग्न धूमधडाक्यात झाले. अनेक नृत्यांगना मैत्रिणी, गुरू याही आलेल्या होत्या.

संसाराला खरी सुरुवात झाली ती कुमारने नोकरी सोडून इन्जेक्शन मोल्डिंग कॉम्पोनन्ट्सचा व्यवसाय सुरू केला तेव्हा! श्रीमंत होण्याचा राजमार्ग खुला झाला आणि राहणीमान झपाट्याने वाढू, बदलू लागले. नवनव्या वस्तूंनी घर भरू लागले. हे सगळे लग्नानंतरच्या केवळ दिड वर्षातच झाले. कुमार नुसताच ब्रेन नव्हता तर एक जन्मजात सेल्समन होता. आपले म्हणणे गळी उतरवणे हा त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. भरभराटीच्या दिवसांनी इतक्या लवकर जन्म घेतला की पियूच्य जन्माला उशीर करणे मस्टच झाले.

सुनेचे कोडकौतुक होत होतेच तश्या कुरबुरीही होत होत्याच!

कुरबुरींनी आधी जेवणाच्या ताटातील मीठाची जागा घेतली. नंतर चटणी, लोणचे, कोशिंबीर असा प्रवास करत त्यांनी भाजीची जागा घेतली तेव्हा कुमार खडबडून जागा झाला आणि त्या दिवशी घरातले पहिले सिरियस भांडण झाले.

दया अजूनही डान्सच्या क्लासला जाते हे कुमारला माहीत असले तरी तो इतक बिझि असायचा की त्यात त्याला फारसा रस नसायचा! पण सासूबाईंनी टोमणे मारत मारत डान्स क्लासचा मुद्दा इतका पेटवला की शेवटी सोक्षमोक्ष लावणे अत्यावश्यक झालेच.

'सगळ्या जगासमोर नाचायची काही गरज नाही आहे' हे विधान सासूबाईंनी तारस्वरात व कुमारसमोरच केले. सासरे तर अबोल होऊन वगैरे दुसर्‍याच खोलीत गेले होते. त्यांचीही साथ नाही म्हंटल्यावर दयाने कुमारकडे पाहिले. कुमारचे वाक्य आजही आठवते.

"हॉबी महत्वाची आहे दया, पण घरात जर त्यामुळे वाद होत असतील तर ती हॉबी चांगली म्हणता येईल का हे सांग ना तू???"

"अरे पण ही काय वाईट हॉबी आहे का? शास्त्रोक्त नृत्य आहे हे! मी काय तमाशाच्या फडावर उभी राहतीय का?"

झाले! या वाक्याने कुमारही भडकला आणि म्हणाला की घरात मोठ्यांसमोर कसे बोलायचे असते हेसुद्धा विसरलीस की काय!

माहेरच्यांना मनस्ताप नको म्हणून दया काही न बोलता आणि डान्स बंद करून तशीच राहू लागली. काही दिवसांनी शांतता निर्माण झाली. सासर्‍यांची तब्येत बिघडल्यावर तिने मनापासून त्यांचे केले. ते पाहून तर कुमारच काय पण सासूबाईही खुष झाल्या. मात्र दुर्दैवाने सासरे गेले.

सासरे गेल्याच्या दुसर्‍या महिन्यात दयाने तिची बातमी दिली. हे आणखीनच पकाऊ ठरले. कारण अत्यानंदाने कुमार जरी तिला हवे नको ते पाहू लागलेला असला तरीही सासूचा आनंद तिसराच होता.

त्या म्हणत होत्या की हेच पुन्हा जन्माला येणार!

मुलगी झाली.

सुधारणावादी असले तरी सासूच्या कपाळावर एक अदृष्य आठी आहे हे अगदी कुमारलाही समजत होते. पण आपलीच आई असल्याने त्याने दुर्लक्ष केले.

दोन वर्षांनी सासूबाई दयाला आणखी एक चान्स घ्यायचा सल्ला देऊ लागल्या.

दयाने स्पष्ट सांगितले की एकच मुलगी पुरे आहे.

यावर भडका वगैरे उडाला नसला तरीही सासूच्या मनातील ती इच्छा अपुरी राहिली ती राहिलीच!

पियूला जेव्हा तिच्या पाचव्याच वर्षी दया नृत्य शिकवू लागली तेव्हा मात्र पुन्हा भडका उडाला.

याहीवेळेस सासूने तमाशा केला व म्हणाल्या की हे डान्सबिन्स कायमचे बंद!

मात्र यावेळेस दयाने त्यांच्य वरताण आवाज काढत कुमारलाही चकित केले व मी माझ्या मुलीला काय शिकवायचे काय नाही हे माझे माझे बघेन असे सरळ ठणकावून सांगितले.

वचक बसलेली सासू आता किरकोळ प्रकार कुमारला सांगायला लागली. एक दिवस तर तोच आल्या आल्या भडकला आणि नाचायचा सराव करत असलेल्या आपल्या मुलीला त्याने दिली एक ठेवून!

व्यवसायातील अनेक अडचणींमुळे कुमारला राग आलेला असणार असे गृहीत धरून दयाने पियूला जवळ घेत घडल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले तर आतल्या खोलीतून कुमार गरजला.

"पुन्हा मला हे चाळबिळ बांधलेले चालणार नाहीत पायात पियूच्या"

मनात सुखावलेल्या सासूबाई आता अगदी मानभावीपणे पियूला लाडाने आत वगरे घेऊन गेल्या आणि त्या कृत्याचा अर्थ असा होता की चूक पियूची नसून दयाची आहे.

दोन दिवस कुमारशी एक शब्द बोलली नाही दया!

'वेदा नृत्यशाळे'च्या बाराव्या वाढदिवसाला मोठे फंक्शन करायचे ठरले तेव्हा मात्र जुन्या शिष्यांना संपर्क केला गेला. दयाला संपर्क केला गेला तेव्हा पियूच्या या प्रकाराला दोन महिने होऊन गेलेले होते. एक बक्षीस, स्टेजवर नुसत बोलावणार आणि नंतर अल्पोपहार असा कार्यक्रम असल्याने चक्क सासूबाई आणि कुमारही यायला तयार झाले.

नृत्यशाळा सोडून आणि घरात स्वतः सराव करून आता सहा सात वर्षे झालेली होती.

अत्यंत उत्साहाने जुन्या मैत्रिणींना आणि गुरूला भेटायला म्हणून दया आपल्या कुटुंबासहित कार्यक्रमाला गेली. तिचे नांव पुकारल्यावर एक वेगळाच प्रकार झाला.

ज्या नृत्यांगना तिला ओळखत होत्या त्यांना तिचे नैपूण्य माहीत असल्याने त्यांनी संयोजकांना घोषणा देऊन विनंती करायला सुरुवात केली की दयाचे नृत्य झालेच पाहिजे. दया अर्थातच बाहेर जायची साडी नेसलेली असल्याने ती नृत्य करणे शक्यच नव्हते. तिने गिफ्ट व फुले स्वीकारली, गुरूंना प्रथेप्रमाणे नमस्कार केला आणि पायर्‍या उतरायला लागली. मात्र गुरूंच्याच सूचनेवरून संयोजकांनी तिला पुन्हा वर बोलावले. गुरूंनी तिला काही मिनिटे नृत्य करण्यास सांगितल्यावर दोनतीनवेळा नाही म्हणून शेवटी दया माईक हातात घेऊन व गुरू व संयोजकांप्रती आदर व्यक्त करून पुढे बोलू लागली.

"मी जवळपास सात वर्षापुर्वीची शिष्या आहे. अनेक जुन्या मैत्रिणीही आज भेटल्या. मात्र काही कारणाने मला नृत्य करता येणार नाही. तेव्हा कृपया माफ करावेत. मी पुन्हा आभार मानत"

कुमारला आणि सासूला इकडे अभिमान वाटत असला तरी दोघांच्याही मनात एकच विचार एकदम आला होता.

'दया या क्लासची इतकी पॉप्युलर विद्यार्थिनी आहे??? का? कशी काय? '

निष्कारण हेवा होता हा!

घरी गेल्यावर बक्षीस फोडून बघितले तर नटराजाची मूर्ती होती. ती मूर्ती पाहूनही कुमार निराशच झाला. देऊन देऊन काय दिले तर मूर्ती! सासूने तर मूर्ती उडत उडतच पाहिली. पियू मात्र मूर्ती कुठे ठेवावी हा विचार बराच वेळ करत होती.

कणीक मळताना बाहेरचीच साडी अंगावर असल्याने दयाच्या मनत विचार आला. 'आता आई काहीतरी कमेंट करतील,साडी बदलायची नाहीस का वगैरे'! हात धुवून ती साडी बदलून आली. पुन्हा किचनमध्ये येताना तिच्या मनात एक प्रश्न उभा राहिलेला होता. 'सून नेमकी घराची मालकीण.... मालकीण तर जाऊचदेत, पण निदान एक स्वतंत्र व्यक्ती कधी होते???मरताना ???'

बिझिनेसमध्ये गुंतलेला आणि बायकोकडून केवळ कर्तव्याची अपेक्षा करणारा कुमार, शिक्षण आणि मैत्रिणीत रमलेली पियू, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास आसूसलेली आणि भांडकुदळपणा करणारी सासू! अशा कॉम्बिनेशनमध्ये दयामधील एक दिलदार स्त्री, एक कुशल नृत्यांगना, एक स्वतंत्र व्यक्ती मारली जात होती. भरडली जात होती.

इतके होऊनही किरकोळ आजाराने सासू गेली तेव्हा धाय मोकलून रडली ती! कुमार सतत घराच्या बाहेरच असल्याने काही असले तरी सासूसारख्या एका मोठ्या वयाच्या माणसाचा काहीसा आदर आणि आधार होता. ओक्याबोक्या घरात आता आठ दहा तास काढावे लागणार होते रोज! त्यातल्यात्यात कंपनी म्हणजे कामाला येणारी समवयीन संगीता!

एक नवीनच प्रश्न आता उभा ठाकला.

'करायचे काय????????'

वाचनाचा किंचित कंटाळा, टीव्ही सिरियल्समध्ये एखादाच तास जाणार, भाजी वगैरे आणायची तर त्यातही एखादाच तास जाणार!

मग तिने विचार केला की तसेही सासूबाई असताना आपण काय कात होतो??? तेच करायचे.

पण मग हळूहळू मनात तो विचार डोकवू लागला की सासू असताना जे करायचो तेही आता करावेसे वाटत नाही आहे. सासू असताना आपल्याला या घरात सतत सिद्ध होत राहावे लागायचे. निदान आपण तरी स्वतःला सतत सिद्ध करत राहायचो. आता तर काय?? या सासूबाई फोटोमध्ये आणि हा पाच खोल्यांचा फ्लॅट आपल्या एकटीचा जवळजवळ दहा तास रोज!

आता व्यक्तीमत्वाचा एक मोठा पैलू नष्ट झालेला होता.

तो म्हणजे 'सिद्ध होण्याची गरज व त्यासाठी करावी लागणारी उठाठेव'!

म्हणजे केवळ कोणीतरी मेल्यामुळे मी सिद्ध होते? तशी नाही होऊ शकत सिद्ध?

कुमार दहा दिवस सहलीला घेऊन गेला! खूप बरे वाटले. पियू तर नाचतच होती.

पण सहलीहून परत घरी आल्यानंतर सगळा विचार केल्यावर दयाला गोची जाणवली.

सहलीला जाणे ही कुमारची वैयक्तीक गरज जास्त होती. तो एकटाच टीव्ही पाहात बीअर पीत बसत होता. आपल्याबरोबर असे त्याने काहीच केले नाही. बाहेर आला नाही, काही खरेदी नाही. ती फक्त त्याची विश्रांती होती. आपण आणि पियूच सगळे करत होतो.

हे काय?

हे काय आहे?

म्हणजे आपण ही केवळ एक नैतिक जबाबदारी आहोत की काय कुमारची? की बाबा सहलीला जायचे असले तर बायकोलाही ने बर का?

आपण असमाधानी का आहोत नेमक्या?

काय हवे आहे आपल्याला? ते मासिकांमध्ये लिहिलेले असते तसे नवर्‍याने केवळ प्रेमाने चार शब्द बोलणे? नुसते जवळ घेऊन प्रेम व्यक्त करणे? कृतज्ञता व्यक्त करणे की तुझ्यामुळे माझा संसार चालला आहे अशी?

अर्थात कुमार तेही करतच नाही.

पण आपल्याला तरी फक्त तेच कोठे हवे आहे?

आपल्याला काय हवे काय आहे?

डान्सची मुभा? पियूला डान्स शिकवण्याचे स्वातंत्र्य? पैसा? राणीपद? अजून एक मूल? सासूबाई? भटकंती? पिक्चर्स आणि हॉटेलिंग? की.....

.... की आपल्याला आपल्यातील 'दया' हवी आहे... ती शोधायची आहे??

कोण दया?

ही दया कोण??

शेलाट्या फिगरची कॉलेजकन्या? नृत्यात वीज होणारी? पियूच्या जन्माच्या कळा सोसणारी? कुमारच्या शेजेला दरवळवणारी?? माहेराहून सासरी गेलेली एक विवाहीत मुलगी?? सासूबाईंना खोटे आणि स्वतःला खरे सिद्ध करणारी सून? सासर्‍यांचे मनोभावे करणारी सून? त्या फंक्शनला डान्स करणार नाही म्हणणारी आणि तरीही आजही तितकीच पॉप्युलर असलेली शिष्या?

सोसायटीतील बाकीच्या बायका काय करतात? त्यांचे व्यक्तीमत्व हे कशाचे मिश्रण असते? नवर्‍याची बायको, मुलांची आई, सासूची सून याच सर्व घटकांचे की त्यांना काही अधिक कंगोरे मिळालेले असतात ज्यांना टेकून त्या सध्याचा संसार ओढतात आणी तरीही स्वतःला त्य कंगोर्‍याची मालकीण म्हणूनच ओळखतात? काय करतात त्या? कोणी जीमला जाते, कोणी घरी क्लास घेते, कोणी पाककलेमध्ये स्वारस्य दाखवत त्यातच अगती करत राहते आणि कोणी नोकरी करते.

आपण कसली नोकरी करायची?

==========================

तिन्हीसांजेला दया अशीच बसली होती गॅलरीत! शेजारची मैत्रिण तिच्या तीन वर्षांच्या मुलीला काहीतरी भरवत हिच्याशी गप्पा मारत होती. आत्ता पियू येईल आणि पुन्हा खेळायला जाईल. मग लगेच कुमार आला तर आला नाहीतर त्याचा कॉल येईल की आज उशीर होणार आहे अणि जेवूनच येणार आहे. मग आपले विचार सुरू होतील पुन्हा! बारसाडेबाराला लॅच उघडून तो आत येईल तेव्हा आपण जाग्या असलो तरीही झोपल्याचे सोंग करू आणि तेच त्यालाही बरेच वाटेल. मग अशीच एक सकाळ उद्या, अशीच दुपार आणि अशीच एक संध्याकाळ उद्या! मग एक शनिवार आणि मग एक रविवार! ज्या दोन दिवसांची जग पतीक्षा करते तेही आपल्यासाठी चाकोरीबद्ध! पियूला बाहेर घेऊन जाणे दोघांनी आणि मग उगाचच एकमेकांमध्ये अतिशय इन्टरेस्ट असल्यासारखे वागणे, अगदी हातात हात, पाठीवर थाप, हासणे आणि थट्टा! आणि मग पुन्हा प्रतीक्षा एका कोरड्या सोमवारची आणि तो घेऊन येत असलेल्या पुढच्य वारांच्या कोरडेपणाची!

हे सगळे सुख आहे असे का मानतात सगळेजण?

मी याला दु:ख का मानत आहे?

मला काय हवे आहे हे मला शब्दबद्ध का करता येत नाही आहे?

माझे या दोघांवरही निरतिशय प्रेम आहे आणि त्यांचेही माझ्यावर!

पण ही कोणती दिशा आहे आणि कोणता प्रवास आहे ज्यात आपण कुठे आणि कसे जायचे ते ठरवणे आपल्या हातात नाहीच आहे ?

माझ्यात एखादी बंडखोर स्त्री आहे असे तर मुळीच नाही. पण या कंटाळ्याचे स्वरूप दिवसेंदिवस इतके ऊग्र का होत चालले आहे? मला वेगळे व्हायचे नाही आहे, वेगळे राहायचे नाही आहे, वेगळे काही करायचेही नाही आहे.

मी या काटेरी चक्राचा एक दात इतकीच का होऊन राहिले आहे? हे प्रश्न मलाच भेडसावतात की सगळ्यांनाच?

घर लावायचे आणि सुंदर बनवायचे याला काही मर्यादा? बास की आता? कोण कौतुक करणार आहे? साड्या किती घेणार? का घेतल्यास विचारणारेही कोणी नाही आणि नेसत का नाहीस म्हणणारेही!

मी एकटीच आहे का?

आरश्यात पाहताना कसला पश्चात्ताप होतो? सुटत चाललेले शरीर हे नवर्‍याचे स्वारस्य घालवणारी बाब आहे की स्वारस्य नसणे हे शरीर सुटवणारी?

कायमच प्रत्येक स्त्रीला एक सासू असावीच का? जी सतत हे दाखवून देत राहते की तू सिद्ध व्हायला हवेसच?

मन गुंतवू शकणारे सर्व उपाय करून झालेले आहेत.

उरलेले उपाय मी करूच शकत नाही. म्हणजे करावेसे वाटत नाहीत.

एखादी ट्यून लावून नाचले तर कोणाला समजणार आहे? पण नाही तसे करावेसे वाटत! का? कारण त्याचा निखळ आनंद घेता येत नाही.

कंटाळा!

आपण संपलो आहोत!

किंवा आपण आपल्याला संपवलेले आहे.

सगळ्या अशाच जगतात. कोणाची तक्रार नसते. गिरिजाने भिसीत थट्टेखोर स्वभावानुसार बिनदिक्कत सांगितले. आम्ही अजून रोज दोनवेळा करतो. कोणालाच पटले नाही. थट्टाच झाली त्या विषयाची! पण त्यामुळे बावळटासारखा तोच विषय सुरू झाला. आम्ही आठवड्यातून तीन वेळा आणि आम्ही महिन्यातून दहा वेळा! प्रत्येक जण हे असे काहीतरी सांगून खिदळतीय आणि प्रमाण कमी किंवा जास्त असण्याची कारणे सांगतीय! हा नसतोच घरात, ह्याला अजून ते लागतेच वगैरे! आम्हाला काय करायचे आहे त्याच्याशी! मला विचारल्यावर मी सरळ सांगीतले... या खासगी बाबी आहेत.. ही चर्चा बास! मग आग्रह, चेष्टा, काही करतच नाही का तुम्ही वगैरे प्रश्नांचा भडिमार! काय करायचंय यांना?? पण सांगावे लागले. कुमार आठवड्यातून एकदोनदाच वेळेवर घरी येतो. त्याही दिवशी बहुतांशी दमलेला वगैरेच असतो. कंटाळलेला असतो. मग अशात रात्री एक एक वाजेपर्यंत टीव्ही तरी बघतो किंवा साडे दहाला झोपून तरी ज्ञातो. हे न सांगूनही उपयोग नव्हताच. सगळ्यांना माहीतच आहे की कुमार घरात किती असतो ते! आता यातील काही जणींनी रात्री हासत हासत हे नवर्‍याला सांगून टाकलेले असेल. मग नवरे थट्टेत म्हणाले असतील की म्हणूनच ती अशी बघते वगैरे! मग नवर्‍याची त्यावरून थट्टा करून मनसोक्त प्रेम करून त्या बायका झोपून गेलेल्या असतील. नालायक आणि र्निलज्ज!

या शिवायही माणूस जगू शकतो हे पटत का नाही यांना?

मी आवडतच नसेन हे तर कारण नसेल ना कुमारने लक्ष न देण्याचे?

पण मी वेगळी आहे. मला त्याची अजिबात फिकीर नाही वाटत! त्याला त्या अर्थाने नसले आवडत तर न आवडो! कित्येक वर्षे त्याच्याबरोबर घालवल्यानंतर जर अशाच अपेक्षा उरत असतील तर काय फायदा? तो बेढब आणि कुरूप दिसत असता तर???

जाऊदेत! आपल्याला मानसिक विकार जडलेला असणार! सगळ्याचाच कंटाळा येणे हा विकारच!

नावीन्यालाही तोचतोचपणाची फोडणी देत बसणे हे आपले आयुष्य! कदाचित सगळ्याजणींचेच!

चेंज!

अतिशय वेगाने बदल होत असले तरच टिकणारे मन मिळालेले असावे बहुधा आपल्याला!

नवर्‍याचा मार खाऊनही ही संगीता रोज इतकी टवटवीत कशी दिसते? कुमारला आज रात्री सांगूनच टाकू!

मला मार! खूप रागव! काहीतरी घडूदेत! घडूदेत काहीतरी!

जरा जखमाबिखमा झाल्या शरीराला की बरे, कशाततरी मन गुंतेल!

त्याची काय हिम्मत होणार म्हणा हात उचलण्याची? तसा साधाच आहे तो! साधा! सर्वच बाबतीत! धंदा जोरात चालवणे, घर चालवणे, राहणीमान वाढवत नेणे आणि अधूनमधून कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केल्यासारखे करणे! हा साधेपणाच आहे. संगीताच्या नवर्‍यासारखा आपला नवरा असता तर आपण माहेरी गेलो असतो. ती कोणत्या सामर्थ्याने सासरीच राहून त्याला सोसत असेल??

काहीतरी लफडे व्हायला पाहिजे लफडे! कुमारची एखादी मैत्रिण वगैरेच निघायला पाहिजे! मग आपल्याला ते कळल्याचे त्याला कळवून नंतर त्यागबिगच करायचा एकदम! त्याग हेच आयुष्य,मी तुझी कायम वाट पाहात राहीन, ती तुला आवडत असली तरी मला वाईट वाटलेले नाही वगैरे वाक्य एकदम दिलीपकुमारसारखा चेहरा करून म्हणता येतील.

श्शी:! कसले विचार! सुख दुखत आहे. हो का?

फार विचार करते मी!

या सगळ्याचा अंत काय?

एक मरण! तेही सामान्य!

चारचौघांना समजलेले, काही क्षण शॉक्ड करणारे, मग रडवणारे, मग आठवणी आणणारे आणि शेवटी विसरून गेलेले!

असामान्यही व्हायचे नाहीच आहे. पण कंटाळा मात्र खराखुरा आला आहे सगळ्याचा!

समजा आज सर्व घर पसरून ठेवले आणि कुमारला शिव्या द्यायला उद्यूक्त केले तर?? नाहीतर आधी पियूच भडकेल म्हणा! आणि आवरेलही! तिला कसं सांगणार की हे तुझ्या वडिलांना चिडवायला केलेले आहे??

काय करावे?

काहीही, पण आजच, आणि आत्ताच!

भांडूयात कोणाशीतरी! कोणाशी? नकोच! बोंब होईल त्याची!

============================================

चार वर्षे होऊन गेली त्या विचारांना! पण आपल्यात हिम्मत नाही काही बदलण्याची! काय केले आपण? विचार करत करत नुसताच वेळ घालवला.

पण वेळ गेला हे काय कमी आहे का? नाहीतर इतका वेळ कसा गेला असता? दु:खात गेला असला तरी गेला तरी ना? काय करावे या घुंगरांचे? आज लॉफ्ट आवरताना मिळाली. ही सर्टिफिकेट्स आणि हे घुंगरू! द्यायचे का फेकून? मग रडू वगैरे येईल जरा! ते काय, तसंही येतंच म्हणा! कुमारला कळले तर उलट 'बरे झाले' असेच म्हणेल!

हल्ली फारसा बोलतही नाही आपल्याशी! काय उरलंय आता बोलायचं तरी म्हणा! कॉलेजमधून घरी येताना पडून फूटपाथवर डोके आपटून पियू गेली तेव्हापासून तो बोलतच नाही. सगळे संपल्यासारखेच वाटत आहे. सासूबाई म्हणायच्या तसे आणखीन एक मूल असते तर? पियूचे सगळे ड्रेसेस संगीताच्या मुलीसाठी देऊन टाकले आपण! मधे तर एकदा दुपारी डान्सही केला, उगाचच मन पुन्हा ताळ्यावर आणायला! पण आता सगळे भकासच वाटते.

घराचे जणू चैतन्यच गेलेले आहे.

काहीतरी वेगळे व्हायला हवे होते ना? किती प्रचंड वेगळे काहीतरी झाले आता! पियूला जाऊनही आता साडे तीन वर्षे झाली. आता कुमार घरी शक्य तितका लवकर येतो , काही न बोलता स्वतःचे वाढून घेतो आणि जेवून टीव्ही बघताना सोफ्यावरच झोपून जातो. आता भिसीही बंदच! पियूच्या जाण्यामुळे झालेल्या दु:खातून बाहेर काढण्यासाठी सारखे लोक येत असायचे पहिले वर्षभर! आता ते आपापल्या व्यापात आहेत.

कुमारशी बोलायला जावे तर तुटकपणे तरी बोलतो किंवा खेकसतो तरी! माझा काय दोष? त्या दिवशी तिला बरे नसतानाही कॉलेजला जा म्हणाले यात? इतके काही फार बरे नव्हते असे नाही! मलाही वाटणारच की कॉलेज बुडू नये असे! तिला काय मी मारले आहे?

माझा अर्थ काय याचे फिक्कट फिक्कट उत्तर मात्र मिळू लागले आहे मला आता! भीषण असले तरी... खरे आणि ... बरेही आहे...!

माझा अर्थ काय!

आई वडील् गेले तरीही कुमारला माझी गरज होतीच! पियू गेली तरी आहेच! मी... एक गरजेची वस्तू!

मी गेले तर तो बाहेर जेवून घरी यायला लागेल!

गरजेची वस्तू व्हावे हे तेव्हाच का मनात आले नाही? किती आनंद निर्माण झाला असता तेव्हापासूनच!

सासूलाही माझी गरज होती, मी कोणीच नाही किंवा निदान 'तितकीशी गरजेची तरी नाही'हे दाखवण्यासाठी!

सासर्‍यांनाही होती, कारण त्यांची बायको त्यांचे सगळे नव्हती करू शकत आजारपणात!

कुमारला तर मी हक्काचीच मिळालेली आहे.

पियू माझीच मुलगी म्हंटल्यावर माझी गरज असणारच!

गरज नव्हती ती फक्त मला!

माझ अर्थ हाच, की स्वतःला एकही गरज नसलेली अशी सर्वांच्या गरजेची वस्तू!

पाचवा मजला घेतला तेच चांगले झाले! पहिल्या मजल्यावरून पडून उपयोग तरी काय?

आपली निदान एक गरज तरी भागवता येईल!

या अशा निरर्थक आयुष्याची गरजच नाही आहे हे सांगण्याची..... अगदी ठणकावून सांगण्याची गरज!

संगीता म्हणते तेच खरे! सर्वांच्या गरजेची होऊनही टवटवीत राहणे हाच धर्म असावा! पण मला खरे जाणण्याचीच गरज वाटत नाही आहे. माझे जर खोटे असले तर.... ते खोटेच मला प्रिय आहे... मला ही घुसमट नाही सहन होत... कधीचीच!

बाय कुमार!

====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

एक मरण! तेही सामान्य!

चारचौघांना समजलेले, काही क्षण शॉक्ड करणारे, मग रडवणारे, मग आठवणी आणणारे आणि शेवटी विसरून गेलेले!
>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी

प्रचंड विचार करायला लावणारी.
बेफी तुमच्या कथेच्या नायिका प्रगल्भ विचारांच्या असतात. Happy

जबरा!!!!
कुरबुरींनी आधी जेवणाच्या ताटातील मीठाची जागा घेतली. नंतर चटणी, लोणचे, कोशिंबीर असा प्रवास करत त्यांनी भाजीची जागा घेतली>>>>>>>>
'सून नेमकी घराची मालकीण.... मालकीण तर जाऊचदेत, पण निदान एक स्वतंत्र व्यक्ती कधी होते???मरताना ???'
चारचौघांना समजलेले, काही क्षण शॉक्ड करणारे, मग रडवणारे, मग आठवणी आणणारे आणि शेवटी विसरून गेलेले!
सोसायटीतील बाकीच्या बायका काय करतात? त्यांचे व्यक्तीमत्व हे कशाचे मिश्रण असते? नवर्‍याची बायको, मुलांची आई, सासूची सून याच सर्व घटकांचे की त्यांना काही अधिक कंगोरे मिळालेले असतात ज्यांना टेकून त्या सध्याचा संसार ओढतात आणी तरीही स्वतःला त्य कंगोर्‍याची मालकीण म्हणूनच ओळखतात? काय करतात त्या? कोणी जीमला जाते, कोणी घरी क्लास घेते, कोणी पाककलेमध्ये स्वारस्य दाखवत त्यातच अगती करत राहते आणि कोणी नोकरी करते. >>>>>>>>>>>>>>>>>.अशक्य लिहिता तुम्हि बेफिकीर!!शिर साष्टांग नमस्कार तुम्हाला!!

फार फार आवडली.. Happy तुमच्या कथेच्या नायिका प्रगल्भ विचारांच्या असतात .. अगदी अगदी..

ही दया आवडली. तुमच्या सगळ्या नायिकांमध्ये जवळची वाटली. कदाचित असं रिकामपण थोड्या काळासाठी का होइना अनुभवलं होतं म्हणुन रेलेट करु शकले असेन.

ह्याच प्लॉट वर प्रिया तेंडुलकर ची एक गोष्ट होती ( कथा संग्रह "ज्याचा त्याचा प्रश्ण") "ईडियट बॉक्स" त्यात हे एकटेपण, रितेपण फार अंगावर आले होते.

इकडे शेवटी तुम्ही मुलीला मारलेत. त्या मुळे ते एकटे पण अंगावर नाही आले. कितीही बीझी आणि स्वयंपुर्ण आई सुध्धा मुलीच्या म्रुत्यु ने कोलमडुन पडेल. त्या मुळे तिचा जो साचलेला एकटे पणा आणि रिते पणा आहे तो उठुन नाही आला.

मुळातलं तिचं शल्य ती डावलली गेली त्यात आहे. तिचा संसार तिच्या मना सारखा होत नाहिये. सगळं चांगलं आहे, पण तिच्या मनाला येणारं नाही. कारण ती असली काय आणि नसली काय्....काहिच फरक पडत नाही. मुलगी गेली हे शल्य ह्या सगळ्याहुन फार वेगळे आहे. भली भली माणसे अशा आघातांन्नी खचुन जातात. इथे प्रश्ण वेगळा आहे. इथे आपली नायिका विवश आहे. मजबुर आहे. पण परिस्थीतिने मारलेली नाही. तिची परिस्थीती रुढ अर्थाने फार चांगली आहे. हुशार मुलगी, आधाराला सासु, कर्तुत्ववान नवरा, आर्थीक मजबुती, जास्त जबाबदार्‍या नाहीत्, नवरा बाहेरख्याली नाही..वगैरे वगैरे.... म्हणजेच परीस्थिती फारच चांगली. ( नायिका स्वतः सुध्धा ते मान्य करते)तरीही काहितरी बोच... हवा तो मोकळे पणा न मिळालेली, नवर्‍याची साथ नसलेली, सासु च्या मना जवळ न पोहोचु शकलेली, आवडत्या छंदा पासुन दुर असलेली. ती बोच पुर्ण कथेत होती. मग अशा तर्‍हेने शेवट नसता झाला तर जास्त चांगला इफेक्ट आला असता.

आर्थात हे माझे मत.

तरीही ही खुपच मनाला भावली. अशा दया आपल्याला अनेक वेळेला भेटतात. कधी कधी काही बाबतीत प्रत्येक लग्न झालेली बाई कधी तरी एकदा तरी "दया" होतेच. आर्थात हे काही समर्थन नाही. तरीही कुठेतरी आपली कुटुंब पध्धती बाई ला "दया" बनवतेच.

__^__!!

टुकार लिखाण!

असो!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफ़िकीर | 26 December, 2011 - 23:49 नवीन
टुकार लिखाण!
असो!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!

>>> आय्डी बदलायला विसरलात बेफिकिर ....आता वाद नाही होणार ह्या कथेवर Biggrin

अवांतर प्रतिसादा बद्दल क्षमस्व !

--पंत

पंत - Rofl

पंत, आयशप्पथ हे लेखन टुकार आहे! माझ्यामते तरी!

आता काही लिहिले तर कोण प्रतिसाद देणार नाही Lol

पण स्वतःवर टीका करतानाही मुक्तकंठाने करायला काय प्रॉब्लेम???????

सही लिहितात तुम्ही!
<<चार वर्षे होऊन गेली त्या विचारांना! पण आपल्यात हिम्मत नाही काही बदलण्याची! काय केले आपण? विचार करत करत नुसताच वेळ घालवला. >> असे होते खरे कधी कधी ..ह्या विचारांच्या गुंत्यातून जो स्वताला सोडवून घेतो तोच जिंकतो नाहीतर हे गुंत्याचे चक्र घात करते.अशा वेळी दया ला मदतीचा हात मिळाला असता तर गुंता सुटू शकला असता ..पण ..

स्त्रीयांवर लिहावं ते तुम्हीच..

अनेक रूपं दाखवलीत तुम्ही स्त्रीची. ही कथा वाचून निवडक दहात नोंद करायला विवश केलंत तुम्ही...
अप्रतिम

अशा दया आपल्याला अनेक वेळेला भेटतात. कधी कधी काही बाबतीत प्रत्येक लग्न झालेली बाई कधी तरी एकदा तरी "दया" होतेच. आर्थात हे काही समर्थन नाही. तरीही कुठेतरी आपली कुटुंब पध्धती बाई ला "दया" बनवतेच...>> खरय

बेफिकीर,

तुम्ही स्वत:च कथेला टुकार म्हणालात! आता मी काय म्हणणार यावर!!

दयाचा स्वत्व शोधण्याचा संघर्ष अधिक प्रभावीपणे चित्रित व्हायला हवा होता असं वाटतं. तिचा कंटाळा कथेतून पुरेपूर पाझरलेला दिसून येतो. तिला संघर्षच नको आहे. लढाई सुरू होण्याच्या अगोदरच ती हरल्यासारखी वाटते.

बायका अश्यावेळी नवर्‍याच्या कामात रस घेतात किंवा समाजकार्य वगैरे करतात. दयाकडे तर स्वत:चं छंदकौशल्य आहे. हा पैलू अडगळीत पडल्यासारखा वाटतो.

दयाचा नवरा हाडाचा सेल्समन आहे. आपलं म्हणणं समोरच्याच्या गळी उतरवणं हा त्याच्या डाव्या हातचा मळ आहे. ते बघून तरी काहीतरी शिकायला हवं होतं तिने.

असो.

कथेतून घ्यायचा बोध म्हणजे सतत शिकायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आपला नम्र चाहता,
-गामा पैलवान

Pages

Back to top