सल!

Submitted by टोकूरिका on 27 December, 2011 - 23:12

'' गौरव ऊठ चल लवकर, फ्रेश हो पटकन. मी चहा टाकलाय ऑलरेडी... '' तयार होता होता अनु गौरवला ऊठवत होती.

'' हम्म.....'' गौरवची नेहमीची प्रतिक्रिया.

'' ए गौरव....ऐकतोयेस का तू? जागा आहेस की झोपलास पुन्हा? अरे क्लिनिकमध्ये जायचं नाही का आज?''

''हां....जागाय मी.......पाच मिंटं झोपू दे ना अनु! ''

'' अय गौर्‍या! उठ ना रे!..... श्शी!.....अजून किती हाका मारायला हव्यात मी तुला? आता ऊठतोस का??''

अनुने चिडून त्याच्या अंगावरची रजई ओढून बाजूला केली तसा गौरव ऊठून बसला.....अनु पुन्हा चहा गाळायला किचनकडे वळली.. …...

गौरव आणि अन्विता मधला हा रोजचा संवाद. अनु रोज अशी्च तयार होत गौरवला सतराशे साठ हाका मारायची. त्याला ऊठवताना तिच्या नाकी नऊ यायचे. गौरवला तिच्या्च हातचा चहा प्रिय! त्यामुळे तो ऊठेपर्यंत तरी तिला बाहेर पडता येत नसे......अगदी आवरून तयार असेल तरीही! त्यामळे गौरवच्या या एकेमेव वाइट्ट सवयीला ती जाम वैतागायची. पण तरीही ती कधी गौरवला दुखवत नसे.....तीचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. गौरवनेही अनुला सुखी ठेवण्यासाठी कसलीच कसर ठेवली नव्ह्ती..... स्वतः मेहनत करून त्याने आजतागायत अनुला भरभरून सुख, ऐश्वर्य, अन समाधान दिलं होतं............त्यांचा संसार तर दृष्ट लागण्याजोगा होता....... ''सुखी संसार'' या व्याख्येत बसणारं सारं काही होतं त्यांच्या आयुष्यात. दोघेही उच्चशिक्षित होते. गौरवने थोड्याच कालावधीत एक नामांकित डॉक्टर म्हणून नाव कमावलं होतं..... अनुही एका खाजगी कंपनीत एच आर हेड म्हणून काम करत होती. घरात लक्ष्मी वास करत होती,,,सगळ्या सुखसोयींची रेलेचेल होती......पण! इतकं वैभव असूनही दोघांचं आयुष्य अपूर्णत्वाच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात होतं......सगळं आमठाम असूनही दोघांच्या मनात एक सल होता............. एवढं भरभरून देताना ईश्वराने त्यांच्या नशिबात अपत्यसुख लिहिलं नव्हतं....... एवढ्या वर्षात त्यांना मुल झालं नव्ह्तं......!!

पहिली दोन तीन वर्षे त्याना काहीही वाटलं नाही. पण आता दोघांनाही हा सल रात्रंदिवस काट्यासारखा टोचू लागला. बाहेर फिरायला गेलेले असताना इतर जोडपी मुलांना घेऊन येतात, त्यांचे हट्ट पुरवताना , अन लाड करताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून गौरवलाही गहिवरून येत असे,,,तिथे अनुची मनस्थिती काय सांगावी??. पण असंख्य मनोवेदना सहन करत ते दोघे आपापलं आयुष्य जगत होते. अनु जमेल तितकं खुष रहायचा प्रयत्न करायची. ऑफिस अवर्सपेक्षा जास्त वेळ काम करणे, ऑफिस ते घरापर्यंतच्या प्रवासात वाचन करणे, घरी आल्यावर टीव्ही बघणे, गौरवशी गप्पा मारणे इत्यादी कामात तिचा आठवडा सहज निघून जाई.....पण रविवारी मात्र तिला भरल्या घरातही एकाकी वाटू लागे.......!

मग रविवारी ती मैत्रीणींना घरी बोलवून त्यांच्यात आपलं मन रमवी, किंवा गौरवसोबत बाहेर जात असे.....जास्तीत जास्त ऍक्टीवीटीज मध्ये अनु स्वतःला गुंतवून घ्यायची...........जेणेकरून विचारांची वादळं डोक्यात पिंगा घालणार नाहीत. गौरवसुद्धा तिला हवं ते करू द्यायचा. …........... इतकं करूनही कधी कधी दुखः आपलं डोकं वर काढत असे. तेव्हा मात्र अनु हमसून हमसून रडायची! ते पाहून गौरवचाही धीर सुटायचा. मग कितीतरी वेळ ते एकमेकांच्या कुशीत शिरून आपलं दुःख हलकं करून घेत. एकमेकांचा आधार बनत. असेच दोघेही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कधीकधी नात्यातली मजा अनुभवायला एक विशिष्ट वेळ यावी लागते. तत्पूर्वी आपण नात्याच्या दृढतेशी अन सखोलपणाशी पूर्णतः अनभिज्ञ असतो. गौरव अन अन्विता च्या बाबतीत तेच घडत होतं. लग्नाला सात वर्ष उलटून गेली तरीही त्याना अजून ती अनुभूती यायची होती. एकमेकांचा जोडीदार म्हणून दोघे कधी्च कमी पडले नव्हते. गौरवचा स्वभाव थोडा उतावळा होता पण अनु समंजस होती. आयुष्याच्या वाटेत जेव्हा जेव्हा गौरवने उतावीळपणे निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी अनुने समजुतीने त्याच्या निर्णयात फेरफार करून त्याला योग्य दिशा दाखवली होती.
आज अनुला फार एकटं वाटत होतं म्हणून तिने तिच्या ममाला फोन लावला. तिच्याशी बोलल्यावर थोडं बरं वाटेल म्हणून. पण तिनेही तोच विषय काढला तेव्हा अनुने फोन ठेऊन दिला आणि तीने टीव्ही ऑन केला. पण येणारे विचार थांबवणं तिच्या हातात कुठे होतं???
' आजवर आपण कुठलं सुख अनुभवलं नाहीये?? गौरव चांगला नवरा आहे, घरदार, संपत्ती कशाच्या बाबतीत आपल्याला कमी पडू देत नाही. मग आपण त्याला बाप होण्याचं सुख का देऊ नये??? बाळ होत नाहीये हा सल त्यालाही आहेच , पण कधीही तसं बोलून दाखवत नाही.....काय करावं? काही कळत नाहीये.............''

जोरजोरात दार ठोठावल्याचा आवाज आला तेव्हा अनुची तंद्री भंगली. धावतच जाऊन तिने दार उघडलं.

''काय गं?? केव्हाचा बेल वाजवतोय मी? झोपलेलीस का?? बरं वाटत नाहीये का?? ''

गौरवने आत आल्या आल्या प्रश्नांचा भडिमारच केला तिच्यावर..

'' नाही रे इथे्च होते मी! तू कधी बेल वाजवलीस पण??''

'' अगं अनु अशी काय करतेस??............. मी आता दरवाज्या तोडणारच होतो....... इतका वेळ बेल वाजवून तूला कळलंच नाही??................ किती घाबरलो असेन मी तुला कल्पना आहे का??'' गौरव जोरजोराने श्वास घेत होता.

'' सॉरी रे! विचारात कधी गुरफटले गेले समजलंच नाही मला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी!'' अनुने जवळ जाऊन त्याचा हात हातात घेऊन म्हटलं......गौरवला घाबरलेलं पाहून अनु रडकुंडीला आली होती.

'' अगं पण एवढा कसला विचार करत होतीस तू?? '' गौरवने तिच्या केसातून हात फिरवत विचारलं.

'' आपल्या बाळाबद्दल गौरव!'' अनुने सांगताच गौरवचा चेहरा हिरमुसला.

'' ओके. चल ते जाऊ दे! आता मला छानपैकी चहा करून दे पाहू!'' तिचा रडवेला चेहरा पाहून त्याला शंका आली होती्च की अनु पुन्हा डिप्रेस होइल हा विषय काढला की. म्हणून त्याने विषय टाळला, अन तो फ्रेश व्हायला गेला. पण अनुच्या डोक्यात त्या विचारांचं काहूर माजलं होतं. तिच्या चेहर्‍यावर गंभीर छटा पसरली होती. तिचा मूड बदलावा म्हणून गौरवने काहीतरी बोलायला सुरूवात केली.

'' मग कसा गेला आजचा दिवस?? काय काय केलंस ऑफिसमध्ये..??''

पण अनु अजूनही त्या विचारांतून बाहेर आली नव्हती. तिने आज गौरवशी सविस्तर बोलायचं ठरवलं होतं पण गौरव हा विषय काढला की चिडायचा, वैताग करायचा म्हणून थोडं बिचकतच तिने सुरूवात केली.

'' गौरव मी आज मम्माला फोन केलेला.''

''अरे वा काय म्हणाली? तब्येत वगैरे ठीके ना?? आणि बाबा कसे आहेत??''

''तिचं म्हणणं आहे की आपण आता टेस्ट्स करून पहायला हव्या.'' अनुने सरळ विषयालाच हात घातला.

'' अनु मम्माला वाटूदेत की कुणालाही... मला टेस्ट्स करायच्या नाहीयेत. ''

'' अरे पण तिला वाटतय म्हणून नाही, मलाही पटतय ते.'' हे ऐकून गौरव चिडला.

'' सॉरी अनु पण मला ते पटतही नाही अन म्हणूनच मी ते करणारही नाही.''

हे ऐकून अनुला रडूच फुटलं. गौरवच्या कुशीत शिरून ती रडत होती. '' मला बाळ हवय रे! प्लीज ऐक ना रे माझं!'' असं म्हणून त्याला टेस्ट्स करण्यासाठी विनवू लागली. पण गौरव ऐकायला तयार नव्हता.....
त्याच्या डोक्यात दुसरेच विचार नाचत होते.एकीकडे अनुला थोपटत तो तिला म्हणत होता...................

'' नको रडूस अनु....प्लीज ट्रस्ट मी......मी नक्की काहीतरी मार्ग काढेन यातून.''
आता अनुला हळूहळू झोप लागली. अन मनाशी काहीतरी ठरवून गौरव ही तिथेच झोपून गेला.

सकाळी अनु झोपलेली असतानाच गौरव क्लिनिकमध्ये जायला बाहेर पडला. ड्राईव्ह करताना सतत डोक्यात अनुचे विचार येत होते. तिचा रडवेला चेहरा समोर येत होता. खरं तर अनुइतकाच तोसुद्धा दुःखी होता. पण अनुला धीर देताना आपण स्वतः कोलमडायचं नाही हे त्यानं मनाशी पक्कं ठरवलं होतं...तो सारखा विचार करत होता...''अनु खरच खुप तडफडतेय! खुप कीव येते बि्चारीची! नोकरी सांभाळून आजवर तिने आपल्याला अन घराला खुप चांगलं सांभाळलंय. पण आता तिचा आत्मविश्वास डळमळतोय. एक प्रकारचा मेंटल स्ट्रेस जाणवतोय तिला बहुतेक. ते काही नाही आपण तिला यातून बाहेर काढलंच पाहिजे. आपण काय करावं म्हणजे ती यातून बाहेर पडेल????'' क्लिनिक आलं तशी त्याची विचारशृंखला तुटली. गाडी पार्क करून तो आत शिरला...
सकाळी्च रेग्युलर पेशंट्स, स्पेशल विझिट्स, नवीन अपॉंइंटमेंट्सची वर्दळ सुरू झाल्यामुळे त्याला फारसा विचार करता आला नाही. पण लंच नंतर च्या सगळ्या अपॉंइंटमेंट्स त्याने कॅन्सल केल्या. अन डायरीतला एका जुन्या मैत्रीणीचा नंबर फिरवून त्याने तिला क्लिनिकवर भेटायला बोलावलं..........ती केबिनमध्ये आली अन गौरवने रिसेप्शनिस्टला सक्त ताकीद दिली की, अगदी कुणीही आलं भेटायला तरी आत सोडायचं नाही.................नो न्यु अपॉंइंटमेंट्स.....नो फोन कॉल्स....नथिंग!!
तासाभराने अनु क्लिनिकमध्ये आली. रिसेप्शनिस्टने तिला अडवलं,,,

''मॅडम, गौरव सर महत्वाच्या मीटींगमध्ये आहेत. कोणालाही आत जायची परवानगी नाहीये.''

''अगं सांग ना त्याला मी आलेय. ''

''सॉरी मॅडम, ते कुठलाच फोन कॉलसुद्धा घेणार नाहीत.''

'' ठीके. कोण आलंय भेटायला एवढं?? ते तरी सांगशील??''

'' एक लेडी आहेत. नाव मला माहीत नाही.''

हे ऐकल्यावर अनुला कसंनुसंच झालं...न राहवून तिने दारावरच्या काचेतून डोकावून पाहिलं. गौरवचा चेहरा खुप गंभीर दिसत होता...ती मुलगी त्याच्या बाजुला उभी राहून त्याच्या पाठीवर थोपटत होती......अनुच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..तिने गौरवचा फोन ट्राय केला...स्विच्ड ऑफ होता......त्यामुळे ती अधिकच चिडली......रिसेप्शनिस्ट ला तिने '' मी इथे आले होते हे गौरवला सांगू नकोस'' असं सांगितलं.........अन वैतागून ती घरी निघून गेली.

संध्याकाळी गौरव घरी आला. फ्रेश होऊन हॉलमध्ये आला, तर अनु नेहमीपेक्षा शांत भासली त्याला. तिची कळी खुलवण्यासाठी तो काही ना काही विषय काढून बोलत राहिला, अनु मात्र नुसती ''हं'',,,''हां'',,,,,''होना'',,,,''ओके'' एवढंच म्हणत होती. कारण तिच्या डोक्यात येत होतं की, ''कोण असेल ती मुलगी?? गौरवशी एवढी जवळीक साधणारी मुलगी आपल्याला कशी माहित नाही?? याआधी तिला कधीही पाहिलं नाही...गौरवला विचारावं का सरळ?? पण मग त्याला कळेल की आपण ऑफिसला गेलोच नाही...आणि क्लिनिकमध्ये येउन गेलो ते.... रिसेप्शनिस्ट्ला आपण सांगितलं तशी ती वागली असेल का??'' एक ना दोन. अनुच्या डोक्यातलं विचारांचं चक्र काही थांबत नव्हतं. पण त्या मुलीबद्दल लागलेली उत्सुकता तिला अस्वस्थ करत होती. गौरव तिच्या हालचाली निरखत होता! अनुने मग नॉर्मल असल्यासारखं भासवत,,, जेणेकरून इंटरॉगेशनचा फीलही येणार नाही आणि त्या मुलीबद्दल माहितीही मिळेल,,,,,,,,,, अशा पद्धतीने सहज विचारल्यासारखं गौरवला विचारलं '' आजचा दिवस कसा गेला रे मग तुझा??''
इतक्यात अनुला काही सांगायचं नाही हे गौरवने आधीच ठरवलेलं होतं त्यामुळे बर्‍यापैकी सहजरित्या तो म्हणाला,,'' वेल, छानच म्हणायचा! रूटीनपेक्षा काहीतरी वेगळं केलं की मला मस्त वाटतं!''

''का रे? आज काय वेगळं केलंस तू?? '' अनु्चा उपहासात्मक प्रश्न!

गौरवला अनुपासून काहीच लपवायचं नव्हतं,,,,फक्त योग्य वेळ यायची वाट पाहत होता तो,,,,म्हणून त्याने आपल्या मैत्रीणीबद्दल....्तिच्याशी केलेया चर्चेबद्दल अनुला काहीच सांगितलं नाही,,,,उगाच टीव्हीकडे पाहत तो म्हणाला,,,'' काही खास नाही गं...एक स्पेशल विझिट होती आज. त्याबद्दल बोलतोय'' यातून काय अर्थ काढायचा तो अनुने काढला.....तिचा विश्वासच बसेना की कधीही आपल्यापासून काहीही न लपवणारा आपला नवरा आज चक्क खोटं बोलतोय आपल्याशी! अनु खुप दुःखी झाली....आता तिची खात्री पटू लागली की नक्की काहीतरी गडबड आहे,,,,पण गौरव याआधी असा कधीच वागला नव्हता. तो असा का वागतोय, हे उमगत नसल्याने तीची चिडचिड होत होती.... कारण याक्षणी काहीच करू शकत नव्हती ती. ती सरळ उठून बेडरूममध्ये गेली, झोप तर उडाली होती कधी्च! बेडवर पडल्या पडल्या ती विचार करत होती,'' काय घडत असेल?? गौरव अन त्या मुलीचा काय संबंध असेल?.....संबंध असेलतरी का??की हे आपल्याच मनाचे खेळ असतील?? की मग खरच ती मुलगी आपल्या सुखी संसारात विष कालवायला आलीय? अपत्यसुखाच्या मोहापायी गौरव तिच्याकडे ओढला गेला तर??? त्याने आपल्याला सोडून तिच्याशी लग्न केलं तर?? नाही नाही! संशय खुप वाईट असतो. आपण या मुलीबद्दल शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही.'' असा विचार करून तिने बाकी सगळे निगेटिव्ह विचार बाजुला सारले, अन हळूहळू झोपायचा प्रयत्न करू लागली. थोड्या वेळाने तिला झोप लागलीही.

सकाळी अर्जंट विझिट आहे असे सांगून गौरव लवकरच घराबाहेर पडला. अर्ध्याच तासाच्या फरकाने अनु तिच्या रोजच्या वेळेला ऑफिसला निघाली. घरापासून काही अंतरावर एका हॉटेलबाहेर गौरव उभा आहे हे पाहून तिने गाडी थांबवली...तिथेच थांबून ती त्याचं निरीक्षण करू लागली. अवघ्या दहा मिनिटांतच तिने त्या क्लिनिकमध्ये पाहिलेल्या त्या मुलीला तिकडे येताना पाहिलं......ते दोघे हसत हसत आत गेले.....ते पाहून अनु मात्र कोलमडून पडायचीच बाकी होती.....तिने गाडी घराकडे वळवली. घरी जाताना डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहात होत्या तर मनातून विचारधारा!
'' गौरवने आपली फसवणूक चालवली आहे. कालही तो आपल्याशी खोटं बोलला अन आजही खोटं बोलून पुन्हा त्याच मुलीला भेटायला आलाय. आपण त्याला किती साळसूद समजलो.?? अन हा काय निघाला! एवढा मोठा विश्वासघात?? काय गरज आहे असं याच्यासोबत राहण्यात?? ते काही नाही,,,, आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आपण!'' विचार करतच तिने गाडी पार्क केली, अन धाडकन दार उघडून आत शिरली....आधी मनसोक्त रडून घेऊन मग मात्र ती खंबीर झाली. तिने ठरवलं की गौरवला जाब विचारायचाच. लागलीच तिने त्याला फोन लावला आणि ताबडतोब घरी निघून यायला सांगितलं. गौरवला टेन्शन आलं की हिला काही झालं तर नसावं??

सोबत असलेल्या मैत्रीणीला तिथेच थांबायला सांगून तो थेट घरी आला. बघतो तर दार सताड उघडं. घरात शिरून बघतो तर सगळे दिवे बंद. तो अतिशय घाबरून घरभर अनुला शोधू लागला. बेडरूमकडे वळला तशी अनु त्याला बॅग पॅक करताना दिसली.

'' अनु काय गं?? काय झालं? बरी आहेस ना तू? कुणाचा फोन आला होता का?? ''

अनुने त्याच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला अन ती पुन्हा मुसमुसत बॅगेत कपडे कोंबू लागली.....अनु रडतेय हे पाहून गौरवने तिला दोन्ही खांद्यांना पकडून आपल्याकडे वळवलं.....तशी अनु त्याचे हात झिडकारत ओरडली....
'' हात लावू नकोस गौरव मला....मला आता एकही क्षण इथे थांबायचं नाहीये...मी जातेय....कायमची......आणि हेच सांगायला मी तुला इथे बोलावलं होतं''

गौरव अचंबित नजरेने तिच्याकडे बघतच बसला.
''अनु अचानक काय झालं तुला??''

'' तुला काहीच कसं वाटत नाही रे हे विचारताना?? मला विश्वासच बसत नाहीये की तू इतका खोटा वागतोयेस माझ्याशी....का फसवतोयेस मला??''

'' अनु कशाबद्दल बोलतेस तू?? मला कळेल असं बोलणारेस का?''

'' ठीके... मग मी जरा स्पष्टच बोलते आता.... तू आणि ती मुलगी........तुमच्यात जे काही चालू आहे ते मला स्पष्ट सांग....खरं तर याआधीच तू स्वतः सांगायला हवं होतंस....पण आता वेळ आलीच आहे तर मीच विचारते. त्या मुलीचं अन तुझं नातं आजपर्यंत तू माझ्यापासून लपवून ठेवलस.....का?? बोल ना का केलस असं?? अरे मी इतकं प्रेम केलं तुझ्यावर...,...तू एकदा म्हणाला असतास ना तरी तुझ्या मार्गातूनच काय तुझ्या आयुष्यातूनच कायमची लांब गेले असते मी....! गौरव आपण एकविसाव्या शतकात जगतोय ना?? तू स्पष्ट सांगितलं असतंस की मी तुला नकोशी झालेय तर तेव्हाही मला कदाचित एवढा त्रास नसता झाला जितका आत्ता होतोय....... काय कमी केलं मी तुला??? कुठे कमी पडलं माझं प्रेम??? मूल होऊ शकले नाही म्हणून तू इतकी खालची पातळी गाठावीस???? मूल होत नाही हा माझा दोष आहे की नाही ते तपासून घ्यायलाही तू तयार नाहीस.....मग विनाकारण मला शिक्षा का देतोयेस??? खरंच ही अपेक्षाच केली नव्हती रे मी कधी....इतकामोठा विश्वासघात कसा सहन करू मी सांग ना???? गप्प का आहेस बोल ना आता?????''

'' झालं का बोलून?? की अजून काही बाकी आहे?? नाही......म्हटलं बाकी असेल तर आत्ताच बोलून घे...जे काय साठवून ठेवलं आहेस ते एका दमात बाहेर काढून टाक.....अनु मी तुला आधीही सांगितलय आणि आत्ताही सांगतो...मला टेस्ट्स करून घ्यायला कमीपणा वगैरे वाटतोय अशातला भाग नाही.... पण त्या टेस्टस ने आपल्या वैवाहिक आयुष्यावर होणार्‍या परिणामांची भिती वाटते मला.....उगाच दोष कुणाच्यात आहे ते जाणून घ्या आणि मग हेवेदावे करत बसा.......तू काय अन मी काय?? मनामध्ये कायमचा सल घेऊन अपराधीपणाच्या ओझ्याखाली आयुष्य काढावं अशी माझी इछा नव्हती गं...अनु मी एक डॉक्टर आहे. अनेक कपल्स मी पाहिलीयेत ज्यांच्यामध्ये याच कारणावरून भांडणं होतात,,,,,,,अगदी टोकाचे निर्णय घेतले जातात...हे सगळं मी जवळून पाहिलय. अनु...अन राहता राहिला त्या मुलीच्या अन माझ्या नात्याचा प्रश्न! तोही आत्ताच सोडवतो...तू इथेच थांब मी आलोच''

'' अरे पण.............'' अनुला अर्धवट तोडत तो म्हणाला........''अनु मी बदललो नाहीये गं...प्लीज ट्रस्ट मी! थांबशील ना थोडावेळ......मी लगेच परत येईन....'' त्याला रडवेलं झालेलं पाहून अनु विरघळली...'' ठीके. संध्याकाळपर्यंत वाट पाहीन मी.....''

''थॅंक्स अनु...लव्ह यु...''

''लवकर ये... नाहीतर................नाइलाजाने मला हे घर कायमचं सोडून जावं लागेल....'' अनुचे हे शब्द ऐकायला गौरव तिथे थांबलाच नव्ह्ता. बाहेरून गाडी वेगात सोडल्याचा आवाज आला तशी अनु मट्कन बेडवर बसली...........

**********************************************************************************

संध्याकाळ होत आली होती. अनुने भरलेली बॅग हॉलमध्ये आणून ठेवली.....तेवढ्यात तिला बाहेर गाडीच आवाज आला.....तिने खिडकीचे पडदे बाजुला करून पाहिलं......घरासमोर येऊन गौरवने करकच्चून ब्रेक दाबले अन लगबगीने बाहेर आला तो......गाडीतून एक बॅग बाहेर काढली....अनु दार उघडायला गेली............समोर बघते तर गौरव त्या मुलीला घेऊन दारात उभा!.... आत येऊन तो अनुला म्हणाला,

'' अनू तू विचारत होतीस ना की ती मुलगी कोण आहे जिला मी भेटत होतो.? हीच ती. शुभदा गरवारे. माझी बालमैत्रीण. अनु तु जे समजत होतीस तसं काहीच नाहीये हे पटवून द्यायला मी तिला इथे आणलंय........शुभदा आणि मी शाळेत एकत्र होतो.......... अन महिनाभरापूर्वीच आमची भेट झाली एका सेमिनारमध्ये. आणि हो अनु तिचं लग्न झालय बरं का!'' गंभीर वातावरण हलकं करण्यासाठी गौरव मिश्किलपणे म्हणाला......

'' अरे पण मग तुम्ही चोरून का भेटत होतात.???? माझ्याशी खोटं बोलून तू हिला''......अनुने जीभ चावली. शुभदाला एकदम एकेरी संबोधणं तिचं तिलाच रुचलं नव्हतं! '' आय मीन ह्यांना तू का भेटत होतास?''

एवढा वेळ शांत असलेली शुभदा आता अनुच्या जवळ आली अन तिला म्हणाली,,

'' आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करत होतो. म्हणजे आयडिया गौरवची होती...मी फक्त थोडी मदत करत गेले.''

'' कसलं सरप्राईज?''
हे ऐकून गौरव बाहेर गेला अन आत आला तो एका छोट्या गोंडस मुलीला घेऊन...........अनु क्षणभर गोंधळली..........पण काय घडतय ते ध्यानात येताच अनुने लगेच धावत जाऊन त्या हसर्‍या बाहुलीला तिने जवळ घेतलं अन आपल्या कुशीत घट्टं कवटाळलं.....त्या इवल्या हसर्‍या जीवाला बघून अनुचा राग, संशय, चिडचिड सगळं काही दूर पळून गेलं होतं! उरले होते ते फक्त आनंदाश्रू! आनंदाश्रू! अन आनंदाश्रू!

आपल्या वागण्याचा अनुला पश्चाताप होत होता!

'' गौरव आय एम रियली सॉरी रे........मी मुर्खासारखी बडबडले तुला........विनाकारण संशय घेतला....पण मी तरी काय करू रे.??? तेव्हा तू खुपच बदलल्यासारखा वाटत होतास...''

''अगं अनु मी तुला सांगत नव्हतो. कारण हे सरप्राईज पाहिल्यावर मला तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद पहायचा होता. अन शुभदा ला मी भेटत होतो...कारण शुभदा ''निवारा'' नावाचं अनाथाश्रम चालवते...........त्यामूळे वेदश्री ला अडॉप्ट करताना मला तिच्या मदतीची गरज होतीच! शिवाय दोनच दिवसात मला ते करणं शक्य झालं जे शुभदा नसताना मी करू शकलो नसतो.''

हे ऐकून अनु वरमली....तिला स्वतःचाच राग आला.....अविचाराअंती आपण चुकीचा निर्णय घेत होतो, याची जाणीव होता्च ती कोलमडली........आज तिच्या उतावळ्या गौरवने आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय तिच्या मदतीशिवाय, एकट्याने अतिशय समजुतीने अन योग्य पद्ध्दतीने घेतला होता.......

''वेदश्री! किती गोड मुलगी आहे ही! '' असा विचार मनात आला अन अनु गौरवसमोर हात जोडून उभी राहिली..........

''मी खरंच चुकले गौरव! माझ्यासाठी तू इतकं करत होतास.......आणि मी मूर्खासारखा संशय घेतला तुझ्यावर......आणि शुभदा! तिच्याबद्दल मी नाही नाही ते मनात आणलं......मी खरंच अपराधी आहे तुमची! मला माफ करशील ना गौरव??? ''

'' ए वेडाबाई! अगं माफी परक्या लोकांची मागायची असते....कळ्ळं?? ''

त्याचे ते शब्द ऐकून अनुने त्याला घट्ट मिठी मारली.....गौरवने वेदश्रीला ही जवळ घेतलं.....शुभदा त्यांच्याकडे कौतुकाने पहात होती........अनुचा अपूर्णतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणारा संसार आता स्थिरावला होता.........तिच्या आयुष्याला नवी दिशा लाभली होती वेदश्रीच्या रूपाने!............गौरवच्या चेहर्‍यावर समाधान झळकत होतं........अनुच्या मनातला सल त्याने कायमचा उपटून टाकला होता!

********************************************************************************************************* समाप्त
*********************************************************************************************************
बुधवार, दि.२८.१२.२०११

वाचकमित्रहो, हा टो़कूचा पहिला कथालेखनाचा प्रयत्न बर्का! तेव्हा प्लीज सांभाळून घ्या मायबाप! Happy
आपल्या प्रतिक्रिया (चांगल्या असो की वाइट) जरूर नोंदवा! कथा आवडली तर उत्तमच, पण नाही आवडली तरी कळवा! निदान सुधारणेला वाव मिळेल नं मला!
आपली
टोकू Happy

'

गुलमोहर: 

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.......
अमित...धन्स मित्रा Happy
मयु, राजेश, मी_चिऊ धन्यवाद Happy

कथा छान आहे. दोघांमधल नात संयमपूर्ण भाषेत रंगवल आहे.

पण एकच सांगावस वाटत की, मूल दत्तक घेण इतक सोप नसत. आई किंवा बाबांना सरप्राईज वगैरे तर अशक्यच आहे. महिना-दोन महिन्यांची प्रक्रिया असते. प्रतिक्रिया अस्थानी वाटेल कदाचीत. गैरसमज नसावा.

नेहा, पहिल्या प्रयत्न खूप चांगला आहे.
अनयाशी सहमत.
Ellipses "............" याचा वापर कमीतकमी केलास तर उत्तम. लेखन खुलवण्यासाठी केलेला वापर योग्य ठरतो, मात्र इथे या कथेच वाचताना जर्क बसतो आहे त्यामुळे.

अनया, बेफी....तुम्ही म्हणताय ते मलाही ठाऊक आहे. पण शुभदा चं कॅरेक्टर त्यासाठीच आहे कथेत...गौरवच्या म्हणण्याखातर तिने फॉरमॅलिटीज पूर्ण करण्याआधीच वेदश्रीला घरी आणण्यासाठी गौरवला मदत केली...असा अर्थ घेणं अपेक्षित आहे...तसं गौरवने अनुला सांगताना म्ह्टलं आहे की शुभदा जर नसती तर त्याला २ दिवसात मूल अडॉप्ट करणं शक्य नव्हतं......

मोनाली, सुखदा, जाई, अश्विनीमामी, पजो धन्यवाद.. Happy

मला वाट्ते बाळ घरी येणार आहे हे सर्प्राइज महत्त्वाचे. पेपरवर्क तो होता रहेगा. माझी वहिनी पण अश्या स्वरुपाचे काम करते. एकदा होणार्‍या आईला भेटून बाळ परत गेले ही असेल अनाथ आश्रमात. मी पण दत्तक गेलेली मुलगी आहे. दत्तक विधान व पेपरवर्क होईपरेन्त मी त्या घरीच राहात होते.

तिची मानसिकता किती बदलली एकदम आणि इतका तिच्या मनाचा विचार करणारा नवरा आहे त्याची सकारात्मक विचार करणारी मैत्रीण आहे हे सर्व कथेचे प्रिमाइस चांगले आहे. आत्महत्या किंवा वांझोटी लफडी ह्यापेक्षा जीवनात दुसरे चांगले निर्णय घेण्याचा चॉइस असतो हे कथेत दाखविले आहे हे चांगले आहे. लिहिण्याचे क्राफ्ट सुधारेलच.

अश्विनीमामी यांच्या प्रतिसादाने माझं बरंच्सं काम हलकं केलं...धन्यवाद अश्विनीजी...

आत्महत्या किंवा वांझोटी लफडी ह्यापेक्षा जीवनात दुसरे चांगले निर्णय घेण्याचा चॉइस असतो हे कथेत दाखविले आहे हे चांगले आहे.>>>>>>>> गौरवच्या निर्णयातून मला अगदी हेच सुचवायचे होते.

पहिला प्रयत्न सुरेख आहे. विषयाचा शेवट छान साधला आहे. हा प्रश्न आजकाल बर्‍याच ठिकाणी ऐकायला मिळतो. दोष पुरूषाचा असेल तर त्याला नैराश्य व अपमानाचा सामना करावा लागतो! स्त्रीचा असेल तर तिच्या आयुष्याची फरपट ठरलेलीच असते. अशा वेळी कुणाचा दोष आहे हे पाहण्यापेक्षा कथेतल्या जोडप्याने घेतेलेला निर्णय सोळा आणे बरोबर वाटतो. ग्रामिण भागात पोहोचणार्‍या माध्यमांमधून असे मार्गदर्शक लेखन लेख, कथा, काव्य अशा स्वरूपात नियमीत प्रकाशीत व्हायला हवे. चांगला विषय हाताळल्याबद्दल अभिनंदन!

कथा म्हणून चांगली आहे पण आजच्या काळाचा विचार करता आणि व्यवहारीक दृष्टीने पहाता अजीबात पटली नाही. विशेषकरून जेव्हा कथा नायक डॉ. दाखवलाय. मूल हवे असूनही ७ वर्षे तपासण्या न करता राहिले हेच पटत नाही. आजकाल इतके अ‍ॅडव्हान्स शास्त्र आहे की छोट्या मोठ्या दोषांवर सहज मात करता येऊ शकते. नायिकाही इतकी हुशार उच्च्शिक्षित ई. असून ७ वर्षे फक्त दु:ख करत बसते, नवर्‍याबरोबर चर्चा करत नाही, बाकी पर्याय काय याचा विचारही करत नाही याचे आश्चर्य वाटतेय.

नंतर अचानक काही दिवसात दत्तक मूल आणून बायकोला सरप्राईज वैगेरे म्हणजे अतिच. दत्तक मूल घेताना आई आणि वडील दोघांची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. मूल हवे , मूल हवे असे कीतीही वाटत असले तरी एक दत्तक मूल घरी आणणे ही एक फार मोठी कमिटमेंट आहे. तेव्हा हा निर्णय दोघांनी मिळून घ्यायला हवा. टीव्ही, फ्रीज किन्वा गाडी प्रमाणे 'मूल' ही सरप्राईज गिफ्ट नाही होऊ शकत.असे मला तरी वाटते.

धन्यवाद डेलिया, ही प्रतिक्रिया फारशी आवडली नसली तरी ते आपले वैयक्तिक मत म्हणून घेत आहे.शेवटी प्रत्येकाचा आयुष्य, नाती यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सारखाच असला पाहिजे असा आग्रह नाही....त्यामुळे तुम्हाला जे वाटले ते तुम्ही स्पष्टपणे व्यक्त केलेत यातच आनंद आहे....

व्यवहार ही अशी गोष्ट आहे जी वैयक्तिक आयुष्यात किती मर्यादेपर्यंत वापरायची हे ज्याचे त्याने ठरवावे..........मी ज्या अर्थाने/दृष्टीकोन ठेवून ही कथा लिहिली त्यात आणि तुम्ही ज्या अर्थाने/दृष्टीकोनाने ती वाचलीत यात फरक हा आहे की मी ही कथा भावनिक दृष्टीकोनातून लिहिलेली आहे, अन तुम्ही ती व्यवहारिक नजरेने वाचताय.........कधीकधी पतीपत्नींमधील एकमेकांवरील दृढ विश्वास त्यांचे निर्णय सोपे करतो, आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडी, विचारशैली, परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी या गोष्टींचा पूरेपूर अंदाज असेल तर मूल दत्तक घेण्यापेक्षाही महत्वाचे निर्णय ती व्यक्ती एक्ट्याने घेऊ शकते. असो, विषयांतर न करता एवढेच सांगते की, कथेचा मूळ विषयच हा आहे की गौरव अन अन्वितामधील नातं इतकं घट्टं होतं की मूल दत्तक घेताना ना गौरवला अनुच्या नकाराची चिंता वाटली, ना अनुने त्याच्या निर्णयाचा अस्वीकार केला.......डॉ. असूनही गौरवने तपासण्या केल्या नाहीत कारण, कुणाच्याच मनात त्याला किल्मिष उत्पन्न व्हायला नको होतं....

नेहा, कथा म्हणुन छानच आहे, पण माझंही मत डेलियासारखंच. मला व्यक्तिशः ती पटली नाही.

हबांनी लिहिलं की - <<<ग्रामिण भागात पोहोचणार्‍या माध्यमांमधून असे मार्गदर्शक लेखन लेख, कथा, काव्य अशा स्वरूपात नियमीत प्रकाशीत व्हायला हवे. >>> मग कथेने चुकीचं मार्गदर्शन केलं.

डेलियाला १००% अनुमोदन. दोष जाणुन उपाय करण्यापेक्षा unpleasant situation पासुन दुर जाण्याची पळवाट वाटली मला ही. जाणुनबुजुन, समजुन-उमजुन दत्तक घेणं वेगळं पण टेस्ट करायच्या नाहीत म्हणुन दत्तक.... हे काही पटलं नाही. हे दत्तकाबद्दल चर्चा म्हणुन लिहिलं. कथा मार्गदर्शक नाही, पण चांगली आहे.

मने डेलियाला दिलेला प्रतिसाद वाच. प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. तू पण डेलियाच्या कॅटेगरीत मोडतेस असं मी म्हणेन, व्यावहारिक असणं केव्हाही चांगलं पण अति तिथे माती! गौरवने अनुला कल्पना न देता मूल दत्तक घेतलं, याला तिने विरोध करायला हवा होता असं व्यावहारिक मनाला वाटणं साहजिक आहे, पण त्या दोघांचं नातं बघता तिथे 'इगो' ला स्थान नव्हतंच मुळी.

छान

Pages