माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा (भाग-५ कैलास पर्वत परिक्रमा)

Submitted by अनया on 22 December, 2011 - 11:09

माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा (भाग-५ कैलास पर्वत परिक्रमा)

ह्या वर्षीच्या जून-जुलै महिन्यात कैलास-मानसची पवित्र यात्रा करण्याचा योग आला. त्या नितांतसुंदर अनुभवाचे मी माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!

भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261

दिनांक २३ जून २०११ (दारचेन ते डेरापूक)

आज आमची कैलास यात्रा सुरू होणार होती. सगळ्यांनी घरी खुशाली कळवून, ‘आता तीन दिवस दूरध्वनी नाही. आता परिक्रमा झाल्यावरच संपर्क होईल’ असे कळवले होते. सामानदेखील, तीन दिवसाकरता लागेल तितकेच लहान सॅकमध्ये घेतल होत. बाकीच दारचेनला ठेवून दिल होत.
२०,२१,२२ जून तीन दिवस आराम झाला होता. आता परत चालायला सुरवात करायची होती. तीपण साधी-सरळ नाही. परिक्रमेतील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजे ‘डोल्मा पास’ किंवा ‘पार्वती शीला’ १८६०० फुटांवर आहे. तीन दिवसांच्या आणि ५४ किलोमीटरच्या परिक्रमेला दारचेन ह्या १५५५० फुटांवर असलेल्या कॅम्पपासून सुरवात होते. परिक्रमेचा पहिला मुक्काम २२ किलोमीटर दूर आणि १६३०० फुटांवरील डेरापुक ह्या ठिकाणी असतो. दारचेनच्या आधीपासूनच कैलासपर्वताचे दर्शन व्हायला सुरवात होते.

कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मजकोण तारी.

DSC_5645.jpg

दारचेन कॅम्प गाठेपर्यंत आमच्या बॅचमधील सर्व यात्रींची तब्येत उत्तम होती. किरकोळ खरचटणे किंवा पायाला चालून-चालून फोड येणे ह्याव्यतिरिक्त कोणाला काही झाले नव्हते. आमच्या बरोबरच्या डॉक्टरांना आपले कौशल्य दाखवायला काही संधी मिळत नव्हती. पण देवाला सगळ्यांची काळजी असते! दुसऱ्या दिवसापासून डॉक्टरांना भरपूर काम मिळायला लागल. तकलाकोटच काहीस् अस्वच्छ स्वैपाकघर, गाठलेली उंची , ह्या सगळ्या कारणांनी एक-एक भिडू गारद होऊ लागला.

सगळ्यात पहिला मान आमचे चित्रकार तावडेजी ह्यांनी मिळवला. दारचेनला रात्री त्यांच पोट भयानक दुखायला लागल होत. सगळे काळजीत, डॉक्टर, एल.ओ.सर सगळ्यांची पळापळ. त्यांना खूप त्रास होत होता. पण त्यांनी जिद्दीने परिक्रमेला येण्याच ठरवल. बाकी यात्री मदतीला होतेच. मलासुद्धा अशक्तपणा जाणवत होता. अगदी थोड अंतर चालल तरी मोठा डोंगर चालल्यासारखा थकवा येत होता. परिक्रमेचे ५७ किलोमीटर चालण अशक्य वाटत होत. जिथे घोड्यावर जाता येईल तिथे घोड्यावरून जायचं अस ठरवून टाकल. अती विरळ हवेचे फार भयानक परिणाम होऊ शकतात. तो धोका पत्करण्यात काही अर्थ नव्हता.

इथल्या खोल्यांच्या किल्ल्या हव्या असतील, तर १०० युवानच डिपॉझीट ठेवायला लागणार होत. ‘कुठे एक रात्रीसाठी उपद्व्याप,’ असा विचार करून आम्ही काही किल्ल्या घेतल्या नव्हत्या. पण आमच्या नारंग सरांनी घेतल्या आणि रीतसर हरवल्या सुद्धा!! सरांची मजामजा चालली होती. पण अश्या त्यांच्या गमतीशीर वागण्यामुळे संपूर्ण यात्रेत ते आम्हाला आमच्यातलेच एक वाटले. सगळ्यांबरोबर गप्पा करणारे, फिरायला जाणारे, गोंधळ घालणारे! ते कोणीतरी मोठे ऑफिसर आणि आम्ही यात्री, अस वातावरण नव्हत.
सकाळी कसली तरी संशयास्पद भाजी आणि पुऱ्या खावून आम्ही दारचेन कॅम्प सोडला. आता कैलास परिक्रमा संपवून आम्ही इथे एक रात्र राहणार होतो. नंतर मानसची परिक्रमा करून तकलाकोटला परत जाणार होतो.

बसमधून साधारण अर्धा-एक तास गेल्यावर ‘यमद्वार’ ही जागा आली. ह्या जागेपासून आपली परिक्रमा सुरू होते. ह्याचा शब्दशः अर्थ ‘यमाचा दरवाजा’ असा होतो. इतर अनेक ठिकाणी दिसलेल्या तिबेटी-बौद्ध धर्मात महत्वाच्या असलेल्या पताका यमद्वार येथेही होत्याच.

यमद्वार

ymdwar-1.jpg

त्या पाताकांना ‘तारबोचे’ असा शब्द आहे. ह्या पताका उभ्या असतात किंवा मग एका जागी सुरू होऊन लांबलचक पसरतात. त्यांचे रंग आणि क्रम ठरलेला असतो.निळा, पांढरा, लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग ह्याच क्रमाने असतात. त्यांचा संदर्भ आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांशी असतो. हिंदू धर्माचा प्रभाव तिथे अगदी स्पष्ट जाणवतो.यमद्वारला सर्व यात्रींनी प्रदक्षिणा घातल्या. थोडी पूजा-अर्चा झाली.

आता बस परत जाणार होती. आमचे दोन गाईड ‘तेम्पा’ आणि ‘डिंकी’ मात्र आमच्यासोबत होते. तिथेच पोर्टर आणि पोनीवाले गोळा झाले होते. सगळ्यांना पोर्टर-पोनी मिळाल्यावर वाटचाल सुरू झाली.

तिबेटी पोनीवाला

k-parikrama-3.jpgDSC_5690.jpg

हवा अगदी स्वच्छ होती. आभाळ निळेभोर दिसत होते. डाव्या बाजूला लांछू नदी आणि उजव्या बाजूला कैलास पर्वताचे सतत दर्शन होत होते. लांबपर्यंत रस्ता दिसत होता.

कैलास परिक्रमेला सुरवात

k-parikrama-1.jpgk-parikrama-2.jpg

माझी तब्येत ठीक नसल्याने मी घोड्यावर बसले होते. भारतातल्या आमचे मदतनीस फार आपुलकीने, प्रेमाने वागायचे. इथे तस नव्हत. एक तर भाषेचा मोठा प्रश्न होता. त्यातून एकूण मामला तीनच दिवसांचा. त्यामुळे घोड्यावर बसताना-उतरताना मदत न करणे, यात्रींना घोड्यावर बसायचं असेल तेव्हा गायब होणे, पाण्याची बाटली भरून आणायलाही नकार देणे, असले प्रकार वारंवार होत होते. चालताना घोड्यांची आपसात आपटा-आपटी झाली, तरी पोनीवाले थंड! ह्या सगळ्यात यात्रींची मात्र घाबरगुंडी व्हायची.

निरनिराळ्या आकाराचे पर्वत

ch sparsh-2.jpg

सगळा वाळूचा, दगडधोंड्यांचा प्रदेश होता. जागोजागी जुन्या बौद्ध गुहांचे भग्न अवशेष विखरून पडले होते. मोठ्या झाडांच्या अनुपस्थितीत सगळा भाग काहीसा वैराण, रुक्ष वाटत होता.

DSC_5608.jpg

आपल्या डोळ्यासमोर सृष्टीसौंदर्याची एक ठराविक कल्पना असते. घनदाट झाडी, समृद्ध जंगल अस काहीही नसतानाही हा सगळा प्रदेश कल्पनातीत सुंदर होता. स्तब्ध, शांत सौंदर्य! प्रदूषण, धूर ह्या शब्दांचा अर्थही विसरायला होईल इतकी स्वच्छ हवा होती. त्या अनुभूतीच वर्णन करण, खरच मला शक्य नाही. ती ज्याची त्याने अनुभवायची गोष्ट आहे.

DSC_5612.jpg

आजचा रस्ता ८ किलोमीटरचा होता. साधारण दोन-अडीच तासानंतर कॅम्प दिसायला लागला. रस्त्यात एक छोटा ओहळ होता. त्याच्या अलीकडे पोनीवाल्याने उतरवल. तिथून जेमतेम पंधरा मिनिटांचा रस्ता होता. तेवढाही मला जड झाला. पाय ओढत, धापा टाकत कशीतरी कॅम्पवर पोचले. ह्या कॅम्पपासून चार किलोमीटर गेल्यावर ‘चरणस्पर्श’ ही जागा आहे. कैलास पर्वताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याची ही जागा. इथे पोनीवाले येत नाहीत.

चरणस्पर्श: ओम् नमः शिवाय

ch sparsh-1.jpgचरणस्पर्श: कैलासाचे पहिल्या रांगेतून दर्शन

ch sparsh-3.jpgch sparsh-4.jpg

मला आजिबात चालण्याचे त्राण नव्हते. त्यामुळे जीवावर दगड ठेवून मी न जायचा निर्णय घेतला. आमच्यापैकी वीस लोक जाऊन आले. त्यांचे फोटो पाहून अजूनही काळजात एक कळ येतेच. पण त्या संध्याकाळपासून माझ पोट पारच बिघडल. चरणस्पर्शला जाऊन कदाचित अजून त्रास झाला असता, अशी स्वतःची समजूत करून घेण्यापलीकडे आता काही करू शकत नाही.असो.

उद्या ह्या यात्रेतला सर्वात उंच भाग ‘डोल्मा पास’ किंवा ‘पार्वती शीला’ गाठायची होती. त्याची काळजी करत आणि पोटाच्या त्रासाने सारख उठत रात्र कशीबशी ढकलली.

दिनांक २४ जून २०११ (डेरापूक ते झोंगझेरबू)

पहाटे पहाटे आमचे पोर्टर-पोनीवाले आले. भाषा येत नसल्याने सगळा खाणाखुणांचा मामला! सगळे तिबेटी चेहरे सारखेच वाटतात, त्यामुळे पहाटेच्या अंधुक प्रकाशात धमाल उडाली होती. शेवटी यात्री आणि त्यांचे मदतनीस ह्यांची जुळवाजुळव होऊन सगळे मार्गस्थ झाले.

DSC_5681.jpg

अजूनपर्यंतच्या यात्रेतील लीपुलेख खिंडीचा रस्ता सगळ्यात अवघड असे वाटत होते. पण डोल्मापास हा त्याहूनही कठीण असे अनुभवी यात्री सांगत होते. सगळ्या प्रवासातील उंच म्हणजे १९५०० फूट आणि सगळयात दूरचा पल्ला २५ किलोमीटर आज पार करायचा होता.

dolma-3.jpg

त्यात भरीस भर म्हणून ह्या सर्व प्रदेशातील लहरी हवामानाचा प्रदेश म्हणूनदेखील ह्या डोल्मापासची ख्याती आहे. बघता बघता कधी हिमवादळ आणि हिमवर्षाव सुरू होईल ह्याचा काही नेम नसतो. अनेक भाविकांना ह्या लहरी वातावरणाचा फटका बसल्याने आपली परिक्रमा अर्धवट टाकून परत फिरावे लागल्याची अनंत उदाहरणे आहेत. वादळ-वाऱ्याची टांगती तलवार असल्याने सर्वात कठीण प्रवास समजला जातो.

डोल्मा पासची अत्यंत खडतर वाट

dolma-2.jpg

कडाक्याची थंडी पडली होती. त्या प्रचंड थंडीत, बोचऱ्या वाऱ्यात कोणी चालत तर कोणी घोड्यावर मार्गस्थ झाले. चालणाऱ्या लोकांना थोडी उब तरी तयार होते. घोड्यावर बसणारे मात्र काकडून जातात. थंडीने मग झोप येते, डोळे मिटायला लागतात. त्याच्यावर उपाय म्हणून सगळे ‘ओम् नमः शिवाय’चा जप करत राहतात. डोल्मापासचे उंचच उंच कडे पार करताना सगळ्यांची दमछाक होत होती. एकामागून एक डोंगर-दऱ्या आम्ही पार करत होतो. रस्ता काही संपत नव्हता. रस्ता अतिशय खडकाळ, डोंगराळ, उभ्या चढणीचा असल्याने श्वास फुलत होता. सगळेजण कापराचा वास घेत घेत श्वास काबूत आणायचा प्रयत्न करत होते. नशिबाने हवा आजही छान होती. त्याबाबतीत आम्ही अगदी नशीबवान होतो. यात्रा सुरू झाल्यापासून हवा बहुतेक दिवशी चांगली होती. रेनकोट वापरायची वेळ फारशी आली नव्हती.

DSC_5685.jpg

पुण्यात फिरताना जिकडे तिकडे पर्वती दिसते, तसच डोंगरांच्या मधून कैलास पर्वताचे दर्शन होत होते. परिक्रमेत सगळ्या बाजूंनी कैलास पर्वताचे दर्शन होते. अर्थातच ही कैलासाची प्रदक्षिणा असते. आपण त्यावर चढाई करत नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी काही परदेशी गिर्यारोहकांनी हा पर्वत पादाक्रांत करायचा प्रयत्न केला होता. पण त्यांना त्यात यश आल नाही. आता मात्र पर्वताचे पावित्र्य लक्षात घेऊन चीन सरकार त्यावर चढायची परवानगी नाकारते.

k-parikrama-4.jpg

माझी तब्येत ठीक नव्हती, पोट पारच बिघडल होत. विरळ हवेमुळे हा त्रास इथे बऱ्याच जणांना होतो. थंडी, अशक्तपणा आणि श्वास घेताना होणारा त्रास ह्याने मी अगदी मेटाकुटीला आले होते. मला माझ्याच श्वासोच्छवासाचा आवाज येत होता. पाठीतून कळा येत होत्या. इच्छाशक्तीच्या जोरावरच मी आणि माझे सहयात्री चालले होते.

तसेच पुढे जाता जाता आजूबाजूला सर्वत्र जुन्या कपड्यांचा खच पडलेला दिसायला लागला. आपल्याकडील जुन्या वस्तू इथे टाकल्या की आपले दारिद्र्य इथे राहते आणि पुढील आयुष्यात आपल्याला समृद्धी येते असा स्थानिक तिबेटींचा समज आहे, त्यामुळे ते आपल्या वस्तू इथे टाकतात. कोणाच्या काय चालीरीती, समज असतील ते सांगता येत नाही. पण ह्या सगळ्यातून तिथले प्रदूषण मात्र वाढत चालले आहे हे नक्की.

कैलास पर्वताच्या उत्तर भागाचे दर्शन होत होते. दिवस वर आल्यामुळे आता शिखर चांदीने मढवलेले वाटत होते. पुढे काही अंतर गेल्यावर डोंगरावर सर्वत्र लहान-मोठे दगड एका विशिष्ट आकारात रचलेले दिसत होते. बरोबरचे तिबेटी लोक तिथे प्रार्थना करत होते. तिथे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून, त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी समजूत असल्याचे कळले.

ह्या सगळ्या जागांना महाभारतातील संदर्भ आहेत अस म्हणतात. मी तिथे ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे, सर्व पांडव द्रौपदीसह ह्या परिक्रमेसाठी आले होते. यमद्वार येथे द्रौपदीचा मृत्यू झाला. भीमाने विचारले,’ ही का पडली?’ युधिष्ठिराने सांगितले,’ तिने मनापासून प्रेम फक्त धनंजयावर केले म्हणून. तू पुढे चल’. असे एक-एक पांडव कैलास परिक्रमेत मृत्यू पावले. उरला फक्त युधिष्ठिर आणि त्याच्या बरोबर सुरवातीपासून चालणारा कुत्रा. परमेश्वराने कुत्र्याला स्वर्गात येता येणार नाही, असे सांगितल्यावर धर्मराजाने त्याला नकार दिला. शेवटी दोघेही स्वर्गात पोचले. (तस बघितल तर अर्जुनाने, भीमाने द्रौपदीसोडून इतर बायकांवर प्रेम केल होतच की! असो!!)

लवकरच आम्ही डोल्मापासला पोचलो. त्या शीळेला असंख्य रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. तिथल्या निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्या पताका, समोर दिसणारा पांढराशुभ्र कैलास पर्वत! ते सगळ इतक विलोभनीय होत, की अजूनही ते आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. सर्व यात्रेकरू, तिबेटी लोक तिथे भक्तीभावाने प्रार्थना करत होते. आम्ही मराठी यात्रींनी मिळून तिथे ‘दुर्गे दुर्घट भारी, तुजवीण संसारी’ ही आरती जोरात म्हणून मराठी आवाज घुमवला!

(डोल्मा पास) पार्वती शिळा

dolma-4.jpg

ती शिळा म्हणजे पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी जिथे बसून प्रार्थना केली होती, तेच स्थान. पूजाअर्चा झाल्यावर सगळे तिथे शांत बसले होते. पण अजून बराच पल्ला बाकी होता. तिथे हवा अत्यंत विरळ असल्याने आणि हवामानाचा भरवसा नसल्याने फार वेळ थांबण धोक्याच होत. नारंग सर ज्यांची पूजा झाली, त्यांना पुढे पाठवत होते.

सर्वोच्च जागी पोचल्याचा आनंद!

dolma-5.jpg
आता रस्ता उताराचा होता. तो चालतच पार करायचा होता. इतक्या वळणांच्या, खडकाळ रस्त्यावर घोड्यावर बसण, फार धोक्याच होत.
त्या उतरणीच्या रस्त्यावर पांढरा-वीस मिनिटे चालल्यावर एका दरीमध्ये पाचुसारख्या चमकत्या हिरव्यागार रंगाचे ‘गौरी कुंड’ दिसायला लागले. एक-दीड हजार फूट तरी खोल असेल. आकाराने साधारण दोनेक किलोमीटरचा परिसर असेल. चारही बाजूंनी उंच, भव्य पर्वत होते. हे सरोवर उमेसाठी शंकराने निर्माण केले अशी आख्यायिका आहे.

गौरी कुंड

gauri kund-1.jpg

सगळे यात्रेकरू गौरीकुंडाचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात. पण तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता खोल जाणारा, खडकाळ आणि वितळलेल्या बर्फामुळे अजूनच निसरडा झालेला होता. बरोबरचे पोर्टर-पोनीवाले पाच युआन घेऊन तीर्थ आणून देत होते. आमच्या बॅचमधले काही हौशी लोक आणि नारंग सर खाली उतरून गेले.

DSC_5676.jpg

बाकी आम्ही जनरल पब्लिक पुढे चालायला लागलो. उताराचा रस्ता असला तरी चांगलाच थकवा जाणवत होता. नदी काठाला कोरडा भाग बघून सगळे थांबले. जवळचा सुका मेवा, बिस्किटे अस थोड खाऊन घेतल्यावर जरा तरतरी आली. थोडी विश्रांती आणि पोटात पडलेलं अन्न ह्यांनी जरा ताजेतवाने होऊन झोंगझेरबूकडे चालायला सुरवात केली. थोड्याच वेळात पोनीवाले येऊन पोचले.
dolma-6.jpg

घोड्यावर बसून आरामात इकडे तिकडे बघत सरळ-सपाट रस्ता काटायला लागलो. नदीच्या किनाऱ्याने, कधी खडकाळ पायवाट, कधी चिखल, कधी झरे असा रस्ता होता. चालताना कितीही जपल तरी बूट ओले झालेच होते. पायांना संवेदनाच नव्हती.

अजुनी चालतोची वाट, वाट ही सरेना

dolma-1.jpgDSC_5657.jpg

त्या सोप्या रस्त्यात आमच्या बॅचचे ७० वर्षांचे तलेरा काका घोड्यावरून चांगलेच जोरात पडले. जवळचे यात्री, पोनीवाले सगळेच मदतीला धावले. उत्साही, सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या काकांची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यांच्या कमरेला चांगलाच मार लागला होता. तिघा-चौघांनी मिळून त्यांना परत घोड्यावर बसवल. वेदनाशामक गोळ्या दिल्या, स्प्रे मारला.
असा हा आमचा अक्षरशः तोंडाला फेस आणणारा प्रवास दुपारी एकदाचा संपला.

दिनांक २५ जून २०११ (झोंगझेरबू ते दारचेन)

झोंगझेरबूचा कॅम्प

DSC_5695.jpg

झोंगझेरबू हे पूर्वी तिबेटी संस्कृतीचे मोठे माहेरघर होते. पण कालच्या वाटचालीत सगळीकडे उध्वस्त अवशेष दिसत होते. झोंगझेरबू कॅम्पचा परिसर अतिशय सुंदर होता. मोठा सपाट मैदानी प्रदेश, त्यातला लांबवर दृष्टीस पडणारा रस्ता आणि सोबत नदीचा प्रवाह.

उध्वस्त अवशेष

DSC_5694.jpg

कदाचित काही वर्षांपूर्वी इथे गुंफा,मंदिरे असतीलही. आज मात्र फक्त भग्नावशेष, माती, दगड दिसत होते. कॅम्पच्या आसपास असलेल्या डोंगरांवर सुरेख निळसर झाक होती.

सुलेखन

ymdwar-2.jpgDSC_5575.jpg

आधीच्या रात्रीसुद्धा मला पोटाचा त्रास होत होताच. माझ्याबरोबर नंदिनी आणि इतर मैत्रिणींना जगायला लागल होत. आजचा चालायचा रस्ता त्यामानाने सोपा होता. फार चढ-उताराचा नव्हता. अंतरही आठ किलोमीटरचेच होते.
k-parikrama-5.jpgDSC_5708.jpg

माझ्या तब्येतीमुळे तेही मला मोठे वाटत होते. त्यातल्या त्यात आनंदाचा भाग म्हणजे तेवढे आठ किलोमीटर पार केले की बसमधे बसून दारचेनला जायचं होत. पुढची मानसची परिक्रमा चालत करावी लागत नाही. थेटपर्यंत बस जाते. थोडे दिवस विश्रांती मिळाली असती.
हा सगळा प्रवास फार आल्हाददायक होता. डोल्मापास पार करण्याचा ताण संपला होता. बॅचमधल्या पन्नासही यात्रींची परिक्रमा नीट पार पडली अश्या समाधानात मजा मस्ती करत सगळे चालले होते. दोनेक तासात आम्ही बसपाशी पोचलो.

कैलास परिक्रमेचा अखेरचा क्षण

k-parikrama-7.jpg

स्वप्नवत वाटणारी ही खडतर परिक्रमा पूर्ण झाल्याच्या आनंदाने बहुतेकांच्या डोळ्यात पाणी आल होत. पंढरीच्या वारकऱ्यांसारखे सगळे एकमेकांच्या पाया पडत होते. बरेच लोक उत्तरेकडचे होते. तिथे ‘बहेन-बेटियाँ पांव नही छूते’ असा कडक नियम आहे. त्यामुळे सगळे आमच्या पाया पडत होते!

जरा वेळाने आम्ही बसमध्ये बसून दारचेनला रवाना झालो. दारचेनला हवा थोडी खराब होती. जवळच्या अष्टपद गुहा बघायला जायचं होत. ‘ हवा सुधारली तर ६-६ जणांना घेऊन जाऊ. तोपर्यंत आराम करा’ अस आमचा आता मित्रच झालेला गाईड ‘तेम्पा’ ह्याने सांगितल.

दुपारी चारच्या सुमारास हवा थोडी स्वच्छ झाली. लगेच आम्ही ६ जण जीपमध्ये बसून निघलो. रस्ता जेमतेमच होता. वाळू पसरली होती. वळण भयानक होती. आमचा चालक द्रुतगती मार्गावर असल्यासारखा आरामात गाडी चालवत होता. चाक पंक्चर होणे हा एक नेहमीचा यशस्वी कार्यक्रम पार पाडून आम्ही तासाभरात अष्टपदला पोचलो. तिथून कैलासाचे छान दर्शन होत होते.

अष्टपद जवळून कैलासाचे दर्शन

k-parikrama-9.jpgashtpad-2.jpg

डोंगराच्या टोकाला परंपरागत तिबेटी पताका दिसत होत्या. इतक्या निसरड्या डोंगराच्या टोकाला पताका लावणाऱ्याच्या हिमतीला आणि दूरवरून दिसेल अशी जागा निवडणाऱ्याच्या सौंदर्यदृष्टीला दाद द्यावीशी वाटली.

अष्टपद गुंफा

ashtpad-1.jpg

अष्टपद येथील गुंफा बौद्ध आणि जैन धर्मियांना फार महत्वाच्या वाटतात. ह्या गुंफांमध्येच जैन धर्मातील पहिले तीर्थंकर आदिनाथ वृषभ देवांनी तपश्चर्या केली. इथेच त्यांना निर्वाणप्राप्ती झाल्याचा जैन ग्रंथात उल्लेख आहे, अस म्हणतात.

नंदिनी आणि इतर जणांनी जवळचा एक छोटा डोंगर चढून कैलासाचे अजून जवळून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि अजून एक यात्री तिथेच बसून राहिलो. त्या अतीउन्चीवरच्या गुंफांजवळ शांत वाटत होत. आपल्या मनातल्या विचारांचा आवाजसुद्धा नको वाटत होता.

अष्टपदचा नयनरम्य परिसर

ashtpad-3.jpg

हळूहळू पुन्हा ढग आले. हवा खराब होऊ लागली. उरलेली मंडळी परत आल्यावर जीपमध्ये बसून आम्ही परत दारचेनला आलो. घरी फोन करून परिक्रमा नीटपणे पूर्ण झाल्याची बातमी दिली. दुसऱ्या दिवशी उठायची घाई नव्हती. बारा तास झोपता येईल, ह्या सुखद विचारात सगळे यात्री आपापल्या खोल्यात गुडूप झाले! सगळे स्वप्नात बहुधा माझ्यासारखीच मानसच्या परिक्रमेची स्वप्न बघत असतील!!

ह्या पुढचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!

भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!

सही Happy

मस्त Happy

अनया, एकदम झकास. त्या २०-२५ किमीसमोर ८-१० किमीही अगदी किस झाड की पत्ती वाटत असतील नै?

तू महाभारतातला जो संदर्भ दिलायस तोच संदर्भ मी माणा गावातल्या भीमपूल या ठिकाणी ऐकलाय. काय खरं नि काय खोटं महाभारतच जाणे.

सुंदर वर्णन आणि फोटो..
प्रामाणिकपणे सांगायचे तर हेवा वाटतोय.

मस्तच. तुमच्या या लिखाणामुळे आमची पण ऑफीसमध्ये बसल्या बसल्या कैलास प्रदक्षिणा झाली, त्याबद्दल तुमचे आभार.

तुमच्या मनोबलाला दाद द्याविशी वाटते!! खरच खुप छान लिहिता आहात. हे लिहिताना तुम्हाला एक वेगळेच समाधान मिळत असणार.

हाती पायी नीट परिक्रमा झाली तुमची , तुम्ही खुप सुदैवी आहात.

अनयाजी,
तुमचे अभिनंदन!
एक प्रश्ण वेडगळ वाटेल पण कुतुहलाने विचारतेय,
आता पर्यंत सर्व नेटवर पाहिलेल्या फोटोत कैलासपतींची छबी (जी नैसर्गिक रित्या झाली आहे असे म्हणतात) फोटोत पाहिल्यावर पटकन असाच भास होतो की कोणीतरी कैलासपतींची कोरलेली प्रतिमा आहे.
जी फोटोत जशी दिसते तशीच अगदी जवळून पाहिल्यावर खरोखर उठावदारपणे शिवजींची कोरलेली प्रतिमा वाटते का?
का ती जी प्रतिमा एक आभास आहे का? बर्‍याच जवळून कशी दिसते?

दुसरे म्हणजे मानसरोवरात सर्व भाविक अंघोळ करतात असे एकलेय पण सरोवराचे तापमान काय असते?
लोकं कशी काय अंघोळ करतात?

वरदाला अनुमोदन.
फारच ओघवते वर्णन, प्रकृती बिघडूनही तुम्ही सर्व परिक्रमा पार पाडलीत - दंडवत.
- ही अतिविलक्षण व पवित्र यात्रा (मनाने का होईना) घडवल्याबद्दल मनापासून धन्यवाद व प्रणाम.

सीमन्तिनी :कल्पना तर छान आहे. माझ्या लिखाणाच हे कौतुक आहे, असच मी समजते.

झंपी :शिवजींची प्रतिमा म्हणजे? माझ्या फोटोत दिसते ती अमूर्त प्रतिमा असेल तर, अगदी खरच तस दिसत. ओम् पर्वत पाहताना सुद्धा कोणीतरी ‘ओम्’ अक्षर कोरलंय अस वाटत. (७व्या भागात येईलच वर्णन!) चमत्कारच वाटतो!

आउटडोअर्स :भारतात एकूणच रामायण-महाभारताचे संदर्भ सगळीकडे मिळतात. कोणतीही गुहा, अर्धवट राहीलेल मंदीर सगळ तिथेच जोडल जात. त्यामुळे हे होण स्वाभाविकच आहे.

बाकी सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल आभार. ‘नीटपणे यात्रा होणे’ हा खरच नशीबाचा भाग आहे. लिहिताना तुमच्या सगळ्यांबरोबर मी सुद्धा परत यात्रा करते आहे.

अनया,ही एव्हढि खडतर यात्रा will power strong असल्यामुळे तू पूर्ण केलीस्,त्याबद्दल तुझे अभिनंदन.
फोटोंमुळे आमचीही यात्रा झाली.

हाही भाग अतिशय उत्कंठापूर्ण, रोमांचक अनुभव देणारा.... तुमचे अनुभव वाचताना आपणच तो प्रवास करतोय असा भास होत होता. सोपी नाहीये ही परिक्रमा हे पदोपदी जाणवत होते. हाती पायी धड परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन! Happy

अनया
तुम्ही दिलेल्या भारत सरकारच्या वेबसाइटवरपण "मानसरोवर" असा शब्द आहे मानस सरोवर असा नाही. तेव्हा तेवढी दुरुस्ती करा सगळ्या शीर्षकात.

दुरुस्ती करायला काही हरकत नाही, पण मानस + सरोवर ह्याचा जोडशब्द मानसरोवर कसा होइल? विकिपिडियावर 'मानस सरोवर' असा उल्लेख आहे.

पाचही भाग आज वाचले. सुरेख लिहीले आहेत. अतिशय अकृत्रिम आणि ओघवती शैली आहे तुमची. ही खरोखर खडतर यात्रा तुम्ही चालत पूर्ण केलीत! प्रचंड कौतुक तुमच्या जिद्दीचं.

पण मानस + सरोवर ह्याचा जोडशब्द मानसरोवर कसा होइल? >>> Happy त्यालाही काही कारण अथवा व्युत्पत्ती असेल. शिवाय काही गोष्टींना उत्तरं नसतात हेही आहेच Happy 'मानसरोवर' हा योग्य शब्द आहे. तो कृपया सर्व भागात दुरुस्त करा.

'मानससरोवर' हा शब्द बरोबर आहे. ब्रिटिशांनी कधीतरी मूळ शब्दातला एक स खाल्ला आणि ते 'मानसरोवर' झालं.

संस्कृत साहित्यात 'मानससरोवर' हा शब्द सर्वत्र आढळतो. अगदी बाणाच्या 'हर्षचरितम्'मध्येही 'मानससरोवर' अशीच योजना आहे. तुमसीदासाच्या 'रामचरितमानस'मधील 'मानस' या शब्दाची योजना 'रामाच्या चरित्राचं पवित्र सरोवर' या अर्थी केली आहे.

सत्त्वशीला सामंतांचा हा लेख वाचनीय आहे - http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=7719...

चिनुक्स: लोकसत्तेतला लेख वाचला. माहितीबद्दल आभार. माझ्या मनातला काय बरोबर हा झगडा संपला. आता मी खात्रीने ‘ मानस सरोवर’ असच म्हणेन!

Pages