सुरू झाल्यावर थोड्या वेळातच लक्षात येते की आपण एक मनोरंजक, सहजसुंदर अभिनय असलेला चित्रपट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीला पाठिंबा म्हणून किंवा सो-सो शॉट्स ना "मराठीच्या मानाने ठीक आहे" वगैरे म्हणत बघावा लागणार नाही अस्सल मराठी वातावरणातील कथा, ते खेडे, त्यातले लोक, त्यांच्या समस्या व्यवस्थित दाखवल्या आहेत. गावातील राजकारण्यापासून ते भोळ्या नायकापर्यंत बहुतेक जण "नॉर्मल" वागतात.
मराठीत असे असणारा हा काही पहिलाच चित्रपट नाही, पण हे सुखद धक्के मराठीत नेहमीच बसत नाहीत, त्यामुळे आपण सरसावून बसतो, पुढे काय दाखवतात या उत्सुकतेने. नाहीतर रात्री साडेदहाच्या शोला "तू झोप, मी जागा आहे" ही चित्रपटाची टॅगलाईन मी बहुधा शब्दशः घेइन अशी भीती मला वाटत होती
दुसरे म्हणजे समोर दिसते तेच कथानक आहे आणि आपल्याला समजते तसेच ते आहे हा दुसरा सुखद धक्का! समोर दिसते ते तिसर्याच कशाचे तरी प्रतीक असून आपल्याला घरी गेल्यावर इतर रिव्यू वाचल्यावर समजेल, तोपर्यंत आपली अक्कल आधीच पाजळू नये असला प्रकार होणार नाही, या कल्पनेने बरे वाटते.
चित्रपट मला भरपूर आवडला. खेडे अस्सल वाटते, हायवेपासून लांब असलेले खेडे असेच फक्त झोपड्या असलेले असावे. त्या पिवळ्या टेकड्या वगैरे पुण्याबाहेर थोडे गेले की कोठेही दिसतात. खेड्यातले लोक म्हणून सगळे धोतर टोप्या घालून फिरत आहेत असला प्रकार नाही. सगळे लोक आपण एसटीने जवळपासच्या खेड्यात गेलो तर सहज भेटतील असेच वाटतात. ही पहिली जमेची बाजू.
प्रमुख कलाकारांचा अभिनय ही दुसरी: नाना आहे म्हंटल्यावर मला जरा शंका होती. त्याचे (किमान हिन्दीतील) रोल्स सहसा "सगळे याला माहीत आहे आणि दुसर्यांचे काही ऐकणार नाही" प्रकारचे असतात. येथे त्याने त्या भूमिकेनुसार अतिशय चपखल काम केलेले आहे. कसलाही बाह्य बटबटीत पणा न दाखवता बेरकी राजकारणी त्याने मस्त उभा केला आहे. सोनाली कुलकर्णीचा रोलही तितकाच मस्त. 'रिंगा रिंगा' व 'गंध' मधे तिची unflattering वेशभूषा व त्यानुसार नसलेले कॅमेरा अॅंगल्स या दोन्हीमुळे मला तिचे दोन्हीमधले काम आवडले नव्हते. पण येथे तिचे काम एकदम जमले आहे. नानापेक्षा थोडी लहान वाटते ती पण तेव्हढे दुर्लक्ष करता येते. गिरीश कुलकर्णी चा रोलही मस्त आहे. किशोर कदम चा "लाऊड" रोलही धमाल. डॉ मोहन आगाशे त्या रोलमधे एकदम फिट. त्यामानाने दिलीप प्रभावळकरचा रोलच जरा स्टीरीओटाईप वाटला. त्याने तो अगदी सहज केलेला आहे हे नक्की. बाकी कलाकारांना मी फारसा ओळखत नाही - त्यांची नावे माहीत नाहीत पण बहुतेकांची कामे चांगली झाली आहेत. अशा सेटअप मधे वीणा जामकर मात्र हवी होती, ती खूप अस्सल वाटते खेड्यातील रोल मधे.
गाणीही आवडली. त्या 'दत्त दत्त' गाण्याचे शब्द शोधले पाहिजेत. आयटेम साँग विशेष काही नाही. 'देवा तुला शोधू कुठं' रात्रीच्या भजनाच्या मानाने जरा जोरदार वाटते (टीपिकल शांतरसातील वाटत नाही) पण गाणे चांगले आहे. चित्रपट संपल्यावर तेच डोक्यात राहते.
ते उंबराचे झाड आणि तेथील भाग केन्द्रस्थानी धरून कथा पुढे सरकते तसे तेथे होणारे बदल छान घेतले आहेत. सुरूवातीचा शांतपणा, मग जमा होणारे लोक, थोडीफार बांधकामे, बकालपणा सगळे जबरी.
त्या पोरांची ती टॉम्या, एमड्या वगैरे नावे, बोलताना येणारे माफक इंग्रजी वगैरेही मस्त. मधे बरीच वर्षे चित्रपटातील ग्रामीण भाषा/बोली फ्रीज होऊन गेली होती, गेल्या काही चित्रपटांमधे जरा जास्त खरी वाटते, तशी यातही आहे. दिलीप-गिरीश चा तो संवाद असलेल्या शॉटचे लाईटिंग, तसेच गिरीश दत्ताच्या मूर्तीशी बोलतानाचे लाईटिंग, मागचा चंद्र वगैरे सुरेख आहे.
एक दोन रिव्यूज मधे वीज वगैरे नसतान वेबकॅम कसा असेल असे वाचले - त्या शॉट्पर्यंत गावात वीज, पाणी सगळे आल्याचे दाखवले आहे, त्यामुळे मला त्यात काही चुकीचे वाटले नाही.
आता काही इतर जाणवलेल्या गोष्टी:
ते उंबराचे झाड, नंतरचे देऊळ या गोष्टी व खेडे हे एका फ्रेममधे दाखवले तेव्हा लक्षात येते की ती जागा गावातून कोठूनही दिसेल अशी उंचावर आहे. पण त्या जागेचा संदर्भ असलेल्या कोणत्याही शॉट्समधे लोकांच्या वागण्यातून तसे जाणवत नाही. ज्यांच्या घराजवळ् टेकडी/देऊळ असेल त्यांच्या लक्षात येइल मला काय म्हणायचे आहे - सहज त्याबद्दल बोलताना नैसर्गिकपणे "तेथे वरती" असा निर्देश करणे किंवा हाताने ती दिशा दाखवून त्या दिशेला बघितले जाणे - जरा इंग्लिशमधून लिहायचे झाले तर अशा जागांचा अशा गावांवर एक "towering presence" असतो, तसा जवळच्या, सगळीकडून दिसणार्या त्या टेकडीबद्दल ते बोलत आहेत असे त्यांच्या देहबोलीतून अजिबात जाणवत नाही. उदा: सुरूवातीला तो केश्या करडी उंबराच्या झाडापाशी चरायला गेली असेल असे म्हणत तिला शोधायला जातो तेव्हा.
दिलीप प्रभावळकरचे कॅरेक्टर मला आवडले नाही - पण ते तसे दाखवण्याचे स्वातंत्र्य दिग्दर्शकाचे आहे हे कबूल - गावात जे होत आहे त्यावर आपला प्रभाव पाडण्याची संधी असताना एवढे अलिप्त होणारे अण्णा हे कदाचित सध्याच्या शिक्षित शहरीवर्गाचे उदाहरण असेल पण त्यांना निदान काहीतरी करताना दाखवायला हवे होते असे वाटले. तसेच शेवटी केश्याचे पुढे काय झाले ही उत्सुकता तशीच राहिली. ते एक "closure" मिळायला हवे होते. पुन्हा लेखक-दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य मान्य आहेच, पण ही "अॅज अ प्रेक्षक" मते
एक दोन ब्लूपर्स म्हणावे की मुद्दाम केलेल शॉट्स कळत नाही - तो शिक्षक पावतीपुस्तके वाटतो वर्गात, तेव्हा फळ्यावर आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक वगैरे असते, येथे काही विरोधाभास दाखवायचा होता का समजले नाही. देवळात मिरवणूक आल्यावर ढोल वाजवायला आसपास एवढी गावे असताना "न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग" चे लोक का आले कोणास ठाऊक तो गिरीश जेव्हा सीना नदी कोठे जाते (त्यातही थोड्या भौगोलिक गोच्या वाटल्या) वगैरे हाताने दिशा दाखवतो तेव्हा पाणी विरूद्ध दिशेला जाताना दिसते (आणखी माहिती दिली तर स्पॉईलर होईल) तो एक ब्लूपर वाटला. तसेच उत्तरार्धात केश्या किंवा अण्णा त्या बांधकामाकडे बघताना दाखवलेत ते त्या "आर्केलॉजीचे" होते की नियोजित हॉस्पिटलचे ते सहज कळत नाही.
पण या क्षुल्लक गोष्टी आहेत. चित्रपट आपल्याला पहिल्यापासून खिळवून ठेवतो आणि इतके निरीक्षण त्यामुळेच केले जाते. पूर्वार्ध थोडा संथ असल्याचे वाचले होते पण तसा मलातरी वाटला नाही.
एकूण जबरदस्त चित्रपट! जरूर पाहा.
हम्म्म, अगदी अचूक निरिक्षण
हम्म्म, अगदी अचूक निरिक्षण
डॉ श्रीकांत मोघे त्या रोलमधे
डॉ श्रीकांत मोघे त्या रोलमधे एकदम फिट>>> तुला मोहन आगाशे म्हणायचंय का फारेन्डा?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो धन्यवाद मंजुडी बदलले.
हो धन्यवाद मंजुडी
बदलले.
दिलिप प्रभावळकरांनी
दिलिप प्रभावळकरांनी हॉस्पिटलचे मॉडेल बनवले होते व त्या कामासाठीच ते नाना पाटेकरांकडे आलेले असतात. सरकारी निधीतून हे हॉस्पिटल बांधायचे असणार म्हणून राजकारण्याची आवश्यकता. राजकारणीच वरिष्ठांचा फोन आल्यावर डोळ्यादेखत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करतो म्हटल्यावर त्यांनी गप्प रहाणं पसंत केलं असेल. तरिही आयडियली त्यांनी थोडं प्रबोधन करायला हवं होतं.
तेव्हा फळ्यावर आझाद हिंद
तेव्हा फळ्यावर आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक वगैरे असते, येथे काही विरोधाभास दाखवायचा होता का समजले नाहीयात काय विरोधाभास वाटला कळले नाही. बहुधा सुभाषचन्द्र बोसांवरचा धडा होऊन गेला असावा. आ्. हिं .से. ही सुभाषचंद्रांनी स्थापन केलेली सेना आणि फॉरवर्ड ब्लॉक हा त्यानी स्थापन केलेला राजकीय पक्ष होता.त्यांच्या चरित्रात शिकवताना हे आले असावे.
"न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग"
"न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग" चे लोक का आले >>
अॅज अ लेटेस्ट ट्रेंड म्हणुन असेल रे. सुधारीत गाव.
आर्केलॉजी व प्रभावळकरांबद्दल अनुमोदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गावातल्या मुलांना देऊळ बनण्याआधी हजार रु. ची पावतीपुस्तके देणारा मास्तर फारच आशावादी वाटला.
रात्रीच्या भजनाच्या मानाने
रात्रीच्या भजनाच्या मानाने जरा जोरदार वाटते (टीपिकल शांतरसातील वाटत नाही) <<< अमोल, खेड्यात रात्री देवळात गायली जाणारी भजनं ही शांतरसातील असतीलच असे नाही. त्यामुळं ती तशी जोरदारच वाटतात. काळी दोनच्या जास्तीत जास्त वर कोणाची उडी जाते यावर चढाओढ बघायला मिळेल. जोरदार गायल्याशिवाय भजनात रंग आला किंवा 'गळा निवला' असं वाटतंच नाही. अशी भजनं त्यांच्यासाठी स्ट्रेस बस्टरचं काम करतात असं मला वाटतं.
बघायलाच हवा.
बघायलाच हवा.
फारएन्ड, आवडलं
फारएन्ड, आवडलं निरीक्षण!
गजानन +१!
गजानन, पटले. बाजो - जाणकार
गजानन, पटले.
बाजो - जाणकार दिग्दर्शकांच्या चित्रपटांत कोणतीही गोष्ट सहज म्हणून सीनमधे ठेवलेली नसते या ठाम समजातून हा प्रश्न निर्माण झाला. जरा overthinking झाले बहुधा
फॉरवर्ड ब्लॉक वगैरे थोडे कम्युनिझम कडे झुकणारे असावेत काय? आणि त्याबद्दल शिकवत असताना मास्तर विद्यार्थ्यांना मंदिर बांधण्यासाठी पावतीपुस्तके वाटतोय असे काही दाखवायचे होते काय वगैरे डोक्यात येत होते. नसेल एवढे कॉम्प्लेक्स कदाचित ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिक्चर सुरु झाल्यावर रांगोळी
पिक्चर सुरु झाल्यावर रांगोळी पसरून जी सुंदर कलाकारी करत होता कलाकार त्यातच डोळे गुंतून गेले.त्यामुळे कलाकारांच्या नावांकडे लक्षच जात नव्हते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खेडेगावाचं चित्रण अप्रतिम. थोडी लगानमधल्या खेडयाची आठवण झाली. रात्री अशा ठिकाणी दिसणारं चंदेरी आभाळ तर मस्तच दाखवलंय.
पुर्वार्धात सिनेमा रंगतदार झालाय. कलाकारांची कामे सहजसुंदर झाली आहेत.
नंतरचा भाग थोडा कंटाळवाणा वाटला.
अचानक साक्षात्कार होऊन देऊळ उभं करणं आणि मग सुरु होणारा बाजारूपणा व राजकारण हे मात्र अगदी वास्तववादी दाखवलंय.
खेड्यात रात्री देवळात गायली
खेड्यात रात्री देवळात गायली जाणारी भजनं ही शांतरसातील असतीलच असे नाही.
>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अहो कुठला शांतरस . खेड्यातल्या भजनात वीररस अगदी ओतःप्रोत भरलेला असतो. ती भजने नसून 'समरगीते' असतात जणू !
त्यातून होणारी ओळींची मोडतोड तर आणखीच गमतीची असते...
अप्रतिम चित्रपट .... खुप खुप
अप्रतिम चित्रपट .... खुप खुप आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयटेम साँग विशेष काही
आयटेम साँग विशेष काही नाही.<<<
मला त्या गाण्याची ट्रिटमेंट खरंच आवडली.
म्हणजे 'देऊळ बांधायला बाई नाचवणे' यातला चीपपणा, गलिच्छपणा सगळा त्या गाण्यात परफेक्ट आहे. शब्द, चाल, नाचणार्यांच्या कवायती, स्मिताचे कपडे सगळं सगळं ती चीपपणा अधोरेखित करणारं आहे.
मुन्नीसारखं आयटेम साँगचं ग्लोरिफिकेशन नाहीये त्यात.
तो चीपपणा जाणूनबुजून केलेला आहे. असाच घडलेला नाही. आणि मला ते तसं करणं फार आवडलं.
गाणं लक्षात राहो न राहो त्या प्रसंगाचा कथेशी असलेला संबंध करेक्ट रहातो आणि उगाच होत नाही ते गाणं त्यामुळे.
नीधप - अगदी सहमत...आणि
नीधप - अगदी सहमत...आणि गावातल्या कुणालाच त्यात वावगे वाटत नाही हे पण चांगलेच लक्षात राहते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देऊळवरचा आत्तापर्यंत मी
देऊळवरचा आत्तापर्यंत मी वाचलेल्या रिव्ह्यूजमधला सर्वात मस्त रिव्ह्यू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप अचूक निरिक्षणे!
चित्रपट ठीक आहे. मला तितकासा
चित्रपट ठीक आहे. मला तितकासा नाही आवडला. कदाचित फारच अपेक्षा ठेवल्या होत्या. सर्वच कलाकारांना न्याय देता आला नाही असे वाटले विशेषतः प्रभावळकर.. सो कु चा अभिनय सुद्धा नाही आवडला. तिचे दोघी आणि गा. पाउस (ग्रामीण भूमिका) फारच म्हणजे फारच उजवे आहेत.. ज्योती सुभाष, मोहन आगाशे आणि गि. कुलकर्णी ह्यांच्या भूमिका आवडल्या.
गजानन आणि बाजो यांना अनुमोदन.
गजानन आणि बाजो यांना अनुमोदन. गावातली भजने प्रचंड लाऊड, अगदी वीररसातली वगैरे असतात. रात्रीच्या गाढ शांततेत तर तिथे संगीतयुद्ध वगैरे चालू आहे की काय असं वाटतं. शिवाय आवाजाच्या पट्ट्यांची चढाओढ खेळणारे उत्साही कलाकार असतातच. टाळ, मृदंग आणि ढोलकीचे हे जोरकस नाद शिवारात, मळ्यांत राहणार्या सगळ्या लोकांनाच काय, पण अर्ध्या-एक मैलांवरच्या शेजारच्या गावात/वाड्यांत/पाड्यांतही ऐकू येतात, हे मी अनेक वेळा अनुभवलं आहे.
फारएंडच्या "towering presence" या मुद्द्याबद्दल-
ते उंबराचं झाड दुर्लक्षित होतं. करडी हरवल्यावर, खूप शोधल्यानंतर तिथे सापडावी- इतकं दुर्लक्षित. गावातल्या अनेक झाडांपैकी एक झाड होतं, आणि अनेक छोट्या मोठ्या टेकड्या-माळांपैकी एकावर ते उभं होतं. गावातल्या नेहमीच्या प्रसिद्ध जागांबदल बोलताना 'हेट्या', 'वर्हा', वरती, खालती, बरडीपल्याड, पांढरीजवळ असे शब्दप्रयोग वापरले जातात. त्या उंबराची जागा केशाला साक्षात्कार होईस्तोवर अशी प्रसिद्ध किंवा रोजच्या वापरातली, संदर्भातली नव्हती. अशा कुणाच्याही ध्यानात मनात नसलेल्या, दुर्लक्षित जागेचा महिमा अचानक वाढल्याचं उमेशने ज्या अफाट पद्धतीने दाखवलं आहे, त्याला तोड नाही.
फळ्यावरच्या मजकूराबदल काही वाटलं नाही. अशा खूप बारीक गोष्टींतून सर्वसामान्यांना न कळणारं, क्लिष्ट काहीतरी दाखवणारा दिग्दर्शक- अशी आपली इमेज व्हावी, हे खुद्द उमेशलाच आवडणार नाही बहुतेक. सहजसोप्या आणि सगळ्यांना कळेल, अशा गोष्टींतून विनोद करता करताच फटके मारून विरोधाभास दाखवत अंतर्मुख करून सोडणारी शैली- हे त्याचं ठेवणीतलं अस्त्र आहे. आणि तेच त्याला आघाडीचा व्यावसायिक दिग्दर्शक बनवणार आहे. याच्या थोडी विरूद्ध शैली त्याने 'विहीर'मध्ये वापरली होती, पण या अत्यंत सुंदर चित्रपटाने फारसं व्यावसायिक यश मिळवलं नाही. उमेशच्या पुढच्या 'मसाला' मध्येही तो 'वळू' आणि 'देऊळ'चीच शैली वापरेल, असं वाटतं.
सोनालीचा रोल थोडा लाऊड आणि किंचित ओव्हरअॅक्टिंग असलेला आहे. चित्रपटातली 'नानाची बायको' ही व्यक्ती मुळातच तशी आहे. गावातल्या सर्वात मोठ्या पुढार्याची बायको म्हणून थोडासा बेडरपणा, थोडासा 'मी कशाला आरशात..' हा भाव, तारूण्य आणि मध्यमवय याच्या सीमारेषेवर असलेल्या व्यक्तीला रोमान्स आणि रिस्पॉन्सिबिलीटी- हे दोन्ही जपण्याचा, दाखवण्याचा सोस- हे तिनं उत्तम दाखवलं आहे.
रमणबागेचा ढोल दिसणं आवडलं नाही. केपीने वर सांगितलेलं कारण पटूनही.
आयटम साँगबद्दल नीरजाला अनुमोदन. शहरीकरण आणि आधुनिकीकरण होतंय या समजात असलेल्या या भाबड्या लोकांना हे गलिच्छ, चीप आणि बीभत्स असं काहीतरी होतंय- हे कळत नाही. ते तस्संच्या तसं उमेशने छान दाखवलं आहे.
शेवटी केश्याचे पुढे काय झाले >>
काही प्रयोजनच नाही. केशा हा लौकिकार्थाने 'हिरो'ही नाही. उमेशने मुळातच कुणाला नायक केलेलं नाही. केशाच्या दृष्टीने अनपेक्षितपणे उद्भवलेल्या परिस्थितीवर त्याने स्वतःच्याच अल्प-स्वल्पमतीने उत्तर शोधून काढलं, इतकंच. ते उत्तर आणि शोधण्याची पद्धत त्याची स्वतःची आहे. इतर कुणाला पटावी, असा त्याचा हट्ट नाही. हे अंतिम उत्तर आहे, सार्वकालीन आहे असा हट्ट दिग्दर्शकाचाही नाही. ते उत्तर आणि पद्धत आपल्या डोक्याला शॉट लावून जाते हे मात्र खरं.
प्रभावळकरांनी आयडियली वगैरे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला असता, तर ते पटलं नसतं. अशी खरीखुरी माणसं गावागावांत आहेत. गावातल्या पुढारी लोकांनी डबल ढोलकी वाजवायला सुरूवात केल्यावर आपण पुढे बोलून काही फायदा नाही, हे त्या शहाण्या लोकांना बरोबर कळतं. जे ऐकतात त्यांना ते सांगायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ त्यांचं केशाला 'अरे बाबा, आपले वैयक्तिक अनुभव हे आपल्यापुरते ठेवले तर श्रीमंत राहतात. तू काय आणि कोणत्या पातळीवर बोलतो आहेस, ते कुणाला पटायचं नाही, म्हणून तुझ्यापुरतंच ठेव..' अशा अर्थाचं सांगतात, तेव्हा केशा ऐकून घेतो. फक्त त्याचं नक्की पुढं काय करावं, हे त्याला कळत नाही, इतकंच. शेवटी मात्र अण्णा आपल्याला असं का सांगत होते, हे त्याला नीट उमगतं. या दृष्टीने प्रभावळकरांच्या भुमिकेने ही जबाबदारी नीट आणि योग्यरीत्या पार पाडली आहे.
भौगोलिक गोच्या >> या मात्र माझ्या लक्षात आल्या नव्हत्या. पुन्हा बघितला तर कळेल. भाषेवरून हे गाव नगर जिल्ह्यातलं (किंवा पुणे-नगर जिल्ह्यांच्या सीमेवरचं) असावंसं वाटतं.
साजिरा, डीटेल प्रतिक्रिया
साजिरा, डीटेल प्रतिक्रिया आवडली. केश्याच्या बाबतीत मी जे क्लोजर म्हंटलो ते मला कोणत्याही पिक्चरच्या बाबतीत होते
म्हणजे नंतर ते लोक सुखाने राहू लागले, मग "एक वर्षानंतर पाटी" येउन पुढच्या काही गोष्टी, त्यावर केलेला माफक विनोद दाखवून दी एण्ड केला कीच चित्रपट संपल्यासारखे वाटते. म्हणून तसे लिहीले ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी गोष्टी बरोबर आहेत. फक्त एक त्या उंबराच्या झाडाबद्दल. ती टेकडी गावाशेजारीच आहे. जर गाय त्या उंबराच्या झाडापाशी गेली असे त्याला वाटते आहे तर त्या निवृत्तीअण्णांशी बोलताना त्याच्या देहबोलीतून वाटत नाही. हे मला पाहताना जाणवले एवढेच.
त्या भौगोलिक गोच्या - नंतर विचार केल्यावर वाटले की केश्यासारख्या माणसाला नद्यांची जी माहिती असेल तसे तो म्हणत असेल त्या वेळेस (" सीना नदी...पुढे जाऊन गोदावरीला मिळेल... मग तापी, नर्मदा वगैरे"). ते प्रत्यक्षात बरोबर नसले तरी तो केवळ एक त्याचा संवाद आहे.
फारएण्ड, मस्त
फारएण्ड, मस्त परीक्षण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडून अॅज अ वाचक अनुमोदन.
(चुकून दोनदा आलेले उडवले).
(चुकून दोनदा आलेले उडवले).
मी अजुन काही पाहीलेला नाहीये,
मी अजुन काही पाहीलेला नाहीये, पण इथे काही वेगळीच प्रतिक्रिया वाचायला मिळाली.
https://profiles.google.com/suhas.zele/posts/Rsqz499LvEN
मस्त परीक्षण, वाचून परत
मस्त परीक्षण, वाचून परत पहावासा वाटतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह फारएण्डा ! झकास लिहीलस.
वाह फारएण्डा !
झकास लिहीलस. उत्सुकता वाढली आणि अनावश्यक कथानक न दिल्याने रसभंगही होऊ दिला नाहीस. सही !!
माणसं खरी वाटतात याबद्दल..
वळू मधे खरंखुरं गाव आणि गावकरीच घेतलेले होते. वळू च्या कॅमेरामन बरोबर एक छोटा पोजेक्ट केलेला तेव्हां समजलं होतं. कदाचित आताही तसंच केलेलं असावं.. गावाचं नाव लक्षात नाही.. पण सातारा रस्त्यावरून डावीकडे गेलं आत आहे गाव. कलाकारांनी गावक-यांप्रमाणेच वेषभूषा केल्यानं त्यावेळी कलाकार आणि गावकरी वेगळे ओळखू येत नव्हते. आता चेहरे माहीत झालेत..
कलाकार भारीच घेतलेत सगळे ! बघायलाच हवा..
कालच 'कला' (CalAA) च्या
कालच 'कला' (CalAA) च्या सौजन्याने देऊळ बघायला मिळाला .. पिक्चर खरंच खूप छान जमला आहे!
पिक्चर झाल्याननंतर निर्माते अभिजीत घोलप ह्यांच्याशी प्रश्नोत्तरांची संधीही मिळाली .. आपल्यातलेच एक (काही वर्षांपूर्वी सॅन होजे मध्ये एक सॉफ्टवेअर इन्जिनीअर, मग स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, मग पुण्याला परत आणि तिथूनच काम स्वतःच्या कंपनीचे) असल्यामुळे प्रश्नोत्तरांनां एक रिअलिस्टीक आस्पेक्ट होता .. खूप छान झाला हा कार्यक्रम ..
फारेंड, तुझा रिव्ह्यू छान जमलाय .. खुपशा मुद्द्यांशी सहमत .. ब्लूपर्स मध्ये, केशा मुर्ती पाण्यात सोडताना ती तरंगते हे राहीलं .. प्रश्नोंत्तरांत आभिजीत घोलप ह्यांनीं काही भाष्यही केलं त्यावर पण मला नीट ऐकू आलं नाही .. मुर्ती प्लास्टर ऑफ पॅरीस ची होती आणि प्रेक्षकांवर तो सीन बघताना अपेक्षीत प्रभाव व्हावा असे दोन मुद्दे तेव्हढे ऐकल्याचे आठवतात ..
दिलीप प्रभावळकरांचं कॅरॅक्टर खटकलं नाही पण त्यांचा अभिनय मात्र खूप इंप्रेसिव्ह वाटला नाही .. मुन्नाभाईतल्या गांधीजींचा प्रभाव जाणवला त्यांच्या डायलॉग डिलीव्हरी वर ..
शेवटी केशा ला नसीरुद्दीन शहा दिसतो त्याबद्दलही प्रेक्षकांपैकी कोणीतरी एक निरीक्षण नोंदवलं की घोंगडं पांघरलेला माणूस दिसून काहितरी साक्षात्कार होणं हेच टेक्नीक विहीरमध्येही वापरलं आहे (मी बघितलेला नाही विहीर) आणि हा कुठल्यातरी इंग्लिश सिनेमात असलेल्या सीनचा प्रभाव आहे का आणि हे गिरीश/उमेश कुलकर्णी ह्यांचं सिग्नेचर आहे का, असा प्रश्न विचारला होता.
एकूण छान अनुभव .. आता वळू आणि विहीर पहायलाच हवा .. पण हे दोन्हीही (विहीर बद्दल कल्पना नाही पण वळू तसाच आहे ना?) असेच गावाकडच्या पार्श्वभूमीवर असतील तर मात्र stereotyped वाटतील की काय अशी शंका येते आहे ..
लोकहो, या चित्रपटात श्री
लोकहो,
या चित्रपटात श्री दत्तगुरूंचा अश्लाघ्य उल्लेख झाल्याचे ऐकून आहे. मी चित्रपट अद्याप पहिला नाही.
कोट्यावधी जनतेच्या श्रद्धास्थानाचा उल्लेख डार्लिंग दत्त, शॉलिंग दत्त, समृद्धीचे पार्किंग दत्त, मर्यादेचे मार्किंग दत्त, हाय हाय दत्त, मार्व्हलेस दत्त, किती हाय फाय दत्त, इत्यादि प्रकारे केलेला मला तरी अजिबात आवडला नाही. अर्थात, हे माझं वैयक्तिक मत.
दिग्दर्शकाला जो संदेश द्यायचा आहे तो योग्य प्रकारे देता येणार नाही का? इथे दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे हा प्रश्न नसून त्यापेक्षा जे काही दाखवलं आहे त्याचा जनमानसावर विपरीत परिणाम होऊ शकेल का हा आहे.
खुलेआमपणे आपली मते मांडावीत. लोकांच्या मनातली विविध मते जाणून घ्यायची इच्छा आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
जे काही दाखवलं आहे त्याचा
जे काही दाखवलं आहे त्याचा जनमानसावर विपरीत परिणाम होऊ शकेल का हा आहे. >> नाही. पिक्चर पाहा, ते गाण उपरोधीक स्वरूपात आहे.
बायदवे वेलकम हो राया ची गायिका उर्मिला धनगर आहे. गो उर्मिला!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार, बहुतांश प्रेक्षक उपरोध
केदार,
बहुतांश प्रेक्षक उपरोध लक्षात घेतील का? जरी घेतला तरी लक्षात ठेवतील का? की फक्त गाणंच लक्षात ठेवतील? मला दुसरी शक्यता जास्त वाटते.
भोंदू लोक पूर्वीही होतेच. त्यांच्यावर तुकारामबुवांनी कोरडे ओढलेत मात्र खोट्यावर प्रहार करतांना खरं कसं जाणून घ्यावं यावरही विपुल लेखन केलंय.
पण या चित्रपटातून खरं कसं ओळखावं यावर काहीच भाष्य नाही!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आ.न.,
-गा.पै.
अॅज अ प्रेक्षक मला पण
अॅज अ प्रेक्षक मला पण आवडला.
प्रॉपर्टी म्हणुन आमच्याकडचेच कप वापरल्यामुळे जास्त आवडला असावा.
आजच्या काळाला बरोब्बर लागु होत असला तरी थोडीफार अदलाबदल करुन कोणत्याही काळाला लागु व्हावा.
चित्रपटात दत्ताबद्दल आक्षेपार्ह काही वाटले नाही.
शेवटी केशा ला नसीरुद्दीन शहा
शेवटी केशा ला नसीरुद्दीन शहा दिसतो त्याबद्दलही प्रेक्षकांपैकी कोणीतरी एक निरीक्षण नोंदवलं की घोंगडं पांघरलेला माणूस दिसून काहितरी साक्षात्कार होणं हेच टेक्नीक विहीरमध्येही वापरलं आहे (मी बघितलेला नाही विहीर) आणि हा कुठल्यातरी इंग्लिश सिनेमात असलेल्या सीनचा प्रभाव आहे का आणि हे गिरीश/उमेश कुलकर्णी ह्यांचं सिग्नेचर आहे का, असा प्रश्न विचारला होता......
..हा प्रश्न मी विचारला होता. paulo coelho याने लिहिलेल्या Alchemist या कादंबरीचा प्रभाव उमेश च्या चित्रपटांवर आहे असे जाणवते .देऊळ या सिनेमात उत्तम अभिनय , उच्च दर्जाचे विनोद आहे. पण तरीही हा चित्रपट मनात दीर्घकाळ रेंगाळत नाही. विहीर याचित्रपट चा अंमल मात्र बराच वेळ मनावर राहतो .एका संथ लयीत पुढे सरकणारा विहीर बघितल्यावर मनात विचारांची साखळी सुरु होते .तसे देऊळ मध्ये वाटत नाही
अर्थात दोन्ही चित्रपट वेगळ्या जातकुळीचे आहे . एक गंभीर आणि दुसरा हलकाफुलका .अर्थात हे माझे विचार .
Pages