१६ डिसेंबर १९७२. पुण्याच्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन' या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
विजय तेंडुलकर यांनी लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.
आज १६ डिसेंबर २०११ रोजी घाशीराम चाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने घाशीरामच्या पहिल्या प्रयोगापासून ते थिएटर अॅकॅडमी, पुणे या संस्थेने १९९२ पर्यंत केलेल्या, देशापरदेशातील प्रत्येक प्रयोगात सूत्रधाराची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रीराम रानडे यांनी सांगितलेला ’घाशीराम’च्या तालमीपासून ते पहिल्या प्रयोगापर्यंतचा साक्षात जिवंत अनुभव.
---------------------------------------------------------------------------
पुण्यनगरीत जायचं | राष्ट्र सेवादल कलापथकात आणि पी.डी.ए.मध्ये शिरायचं | पडेल ते काम करायचं | आणि जमेल तसं शिकायचं | पण सांगली मिरज सोडायचं | असा निर्धार करूनच मी १९५९ मध्ये पुण्यात आलो. कलापथकाची दारं शामराव पटवर्धन, शाहीर लिलाधर हेगडे आणि निळू फ़ुले यांच्यामुळे पटकन उघडली. पण पी.डी.ए.चं 'तिळा तिळा दार' उघडायला तब्बल बारा वर्षांची तपश्चर्या करावी लागली. तोपर्यंत पुण्यातला पी.डी.ए.चा प्रत्येक प्रयोग, पुरूषोत्तमच्या एकांकिका, राज्यनाट्यस्पर्धा या साऱ्या गोष्टींनी मी पार झपाटून गेलो होतो.
मी बी.एड. करीत असताना पी.डी.ए.चे श्रीधर राजगुरू यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्यांचं बोट धरून मी पी.डी.ए.मध्ये शिरलो. 'जब्बार पटेल एक नवीन नाटक करताहेत. तू संध्याकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास गरवारे प्रशालेत ये'. अण्णा राजगुरूंनी मला सांगीतलं.
तोवर जब्बार काय ताकदीचा कलावंत आहे हे मी त्याच्या 'जनावर', ’लोभ असावा’, ’तू वेडा कुंभार’,’जादूगार’, ’खून पहावा करून’,’अशी पाखरे येती’ या विविध एकांकिका आणि नाटकामधून जोखून होतो. त्याच्या एकतर्फी प्रेमातच पडलो होतो म्हणाना !
संध्याकाळी गरवारे शाळेच्या हॉलमध्ये गेलो, तर माझ्याआधीच तिथे विशी-बाविशीची गोरी, घारी वीस-पंचवीस पोरं जमली होती. कुणी काय, कुणी काय गाउन दाखवलं. कुणी कुठला उतारा म्हणून दाखवला. मलाही काहीतरी म्हणून,करून दाखवायला सांगितलं.
मी डाव्या कानावर हात ठेवून वसंत बापटांच्या महाराष्ट्राच्या पोवाड्यातला काही भाग म्हणून दाखवला.
ही मराठी भूमी धन्य । अशी नाही अन्य। देउनी धनधान्य। वाढवी आम्हा काळी आई।
आधी वंदन तिच्या पायी। शाहीर हो तिची कीर्त गाई ॥ -जी-जी-जी ॥
आणि आलो परत घरी.
पुढे काही दिवसांनी पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने फर्गसनमध्ये सतीश आळेकर आणि सुरेश बसाळे भेटले. त्यांनी सांगितलं, आपण ’घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडूलकरांचं नाटक या वर्षीच्या राज्य नाट्यस्पर्धेसाठी पी.डी.ए. तर्फे करतो आहे. तुझी निवड केली आहे. लवकरच तालमी सुरू होतील.
घाशीरामच्या तालमीचा पहिला दिवस आठवला की आजही माझ्या अंगावर काटा येतो. दरदरून घाम फुटतो. सूत्रधाराची - " चुकलो बामणोजी, पाया पडतो बामणोजी, माफी असावी बामणोजी" अशी छोटी छोटी संवादवजा वाक्यं म्हणताना तोंडाला फेस आला. आठ दहा दिवस असा सिलसिला सुरू होता. सहकाऱ्यांची नाराजी त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे जाणवू लागली.
आज अखेरचा दिवस, जमलं तर ठीक नाहीतर ’घाशीराम’ला अखेरचा रामराम अशी खूणगाठ मनाशी बांधूनच तालमीला गेलो. आणि जब्बारला काय वाटलं कुणास ठाऊक? त्यानं आज आपण स्टॅंडींग रिहर्सल घेऊ असं ठरवलं.
चंद्रकांत काळे आणि मी, असा भटजी-सूत्रधाराचा प्रयोग सुरू झाला आणि काय कळ फिरली देव जाणे !गेले आठ दहा दिवस मला जे काम जमत नव्हतं ते मी सहजपणे करायला सुरुवात केली. आम्ही दोघे मुक्तपणे वावरू लागलो.
’तिसरा तुझा बाप, चावला तुला साप’ असे म्हणून चंद्रकांत निघाला आणि मी ’अगंगंगं ! विंचू चावला’ असं म्हणत एक पाय हाताने धरून नाचू लागलो. चंदूही माझ्याही भोवती गरा गरा फ़िरू लागला.
"अहो तुम्ही सरदार, माडीवाले, गाडीवाले, घोडीवाले, कुठेजी चालले? " असे संवाद म्हणताना एका पायाची मांडी घालत जमिनीवर बसकण मारली. ’गाढवाचं लग्न’मधील दिवाणजीच्या भुमिकेतील जातीवंत सोंगाड्या वसंत अवसरीकरची ही सही सही नक्कल होती.
त्या दिवशीच्या तालमीत अंगात काहितरी संचारल्याचा भास होत होता. तेव्हाच घाशीराम मधली माझी भूमिका पक्की झाली.
दुसऱ्या दिवसापासून कृष्णदेव मुळगुंद घामटं निघेपर्यंत आम्हाला नाचवायचे, स्वत:ही नाचायचे.
मग यायचे संगीतकार भास्कर चंदावरकर. त्यांनी नवीन चाली बांधून आणलेल्या असायच्या. मला सर्व प्रकारच्या गाण्याची आवड. पण सूर कशाशी खातात ? याचा पत्ताच नाही. आता आली का पंचाईत? सूत्रधाराच्या तोंडी शास्त्रीय ठुमरीपासून ते लावणी, कव्वाली, कीर्तनापर्यंत सर्व प्रकारची गाणी !
माझ्यावर पुन्हा आउट होण्याची वेळ. पण दिग्दर्शक जब्बार पटेलने हा नोबॉल डिक्लेअर केला. मी आउट होता होता वाचलो.
जब्बारने एका सूत्रधाराचे तीन भाग केले. रवीन्द्र साठे, चंद्रकांत काळे यांना शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक. त्यांच्या तोंडी त्या चालींची गीते. ते निळ्या पगडीतले परिपार्श्वक !
आणि लोकगीतं, पोवाडा, अशी मी बेसूर-भेसूर झालो तरी मला सांभाळून घेणारी कोरसपद्धतीची, लोकसंगीतावर आधारित असलेली गाणी माझ्या तोंडी अशी योजना झाली.
तालमी आता रंगू लागल्या. सुरूवातीला 'वाचिक तालमीची' भीती बसल्यानं तालमीला जायला टाळाटाळ करणारा मी, कधी एकदा संध्याकाळ होते आणि नाच, गाणे आणि नाटकाची प्रत्यक्ष तालीम सुरू होते याची वाट पाहू लागलो.
अस्सल दारूड्याचे हात, सूर्य डुबला की जसे थरथरू लागतात आणि पावलं आपोआप दारूच्या गुत्त्याकडे वळतात तशी आम्हा सर्वांची अवस्था झाली. संध्याकाळी साडे-सहा ते रात्री दोन-अडीच अशी अखंड तालीम जवळ जवळ तीन-साडेतीन महिने सुरू होती. जब्बार दौंडहून यायचा.
या काळात मी फ़क्त एकच दिवस गैरहजर होतो. ते सुद्धा वासुदेव पाळंदे यांच्या वडिलांच्या अंत्य-संस्कारांसाठी गेलो होतो म्हणून.
एका रात्री तालीम संपवून आम्ही परतत होतो. संभाजी पुलाच्या चौकात जब्बार थांबला आणि ’गौरी गेली, नाना राहिले. घाशीराम कोतवालाने गौरीवियोगाचे दु:ख काळजात ठासले" हा भाग त्यानं साभिनय म्हणून दाखविला.
एकदा लकी रेस्टॉरंटपाशी ’राम्या, आता तू योग्य ट्रॅकवर आहेस. चालू ठेव. नंतर मी तुला अधिक बारकावे सांगतो’ असं म्हणून दिलासा दिला.
’नित्य नूतन हे गीतातत्व’ प्रमाणे रोज नवीन नवीन काही सुरू होतं. पहिला अंक बसायलाच विलंब लागला. दुसरा अंक त्यामानाने लवकर बसला. मोहन आगाशे, रमेश टिळेकर, स्वरुपा नारके, मोहन गोखले, सुरेश बसाळे, रमेश मेढेकर, नंदू पोळ, आनंद मोडक, उदय लागू, चंद्रकांत काळे, रवीन्द्र साठे, सुषमा जगताप, अशोक गायकवाड, श्रीकांत राजपाठक, भोंडे .. ..किती किती जणांची नावे लिहू? असा मस्त संच जमला.
नानाच्या लग्नाचा रंगमंचावरचा सीन तर मला वाटतं तासाभरात आकारला. ब्राम्हणांच्या लग्नात कोणकोणते धार्मिक विधी असतात याची माहिती जब्बारने लिहून आणायला सांगितली होती. चंदावरकरांनी लोकगीताच्या परंपरेतील मस्त चाल करून आणली होती. तालीम सुरू झाली आणि चंदावरकरांनी मला सांगितलं - तालासुरांचा फारसा विचार न करता तुझ्या पद्धतीने बिनधास्त म्हण. चुकलास तर रवी, चंदू आनंद आणि आख्खा कोरस आहेच.
मग काय हो ?
होऽऽऽ माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन |
असं म्हणत मी माझ्याही नकळत जी गिरकी मारली, ती बघून जब्बारनं जी दाद दिली ती मी कधीही विसरू शकणार नाही. पुढे मी अनेक प्रयोग केले. अगदी ’हाउसफ़ुल्ल’ प्रयोगातही ती तशी दाद नाही मिळवू शकलो. ती तशी गिरकी कदाचित पुढे कधीच नाही जमली !
अश्या एकीकडे मोठ्या धामधुमीत घाशीरामच्या तालमी सुरु झाल्या होत्या. मी ही आता सूत्रधाराच्या भूमिकेत खोलवर शिरू पाहात होतो. घाशीराम’ची संहिता मी वाचली त्यावेळी नाना फ़डणीसांच्या आणि त्या काळच्या पेशवाईच्या कारकीर्दीविषयी मी बराच अज्ञानी होतो. काही जुजबी गोष्टी माहित होत्या. या नाटकाच्या निमित्तानं अधिक खोलात शिरून त्याचा जरा बारकाईने अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला.
लहानपणापासून मला वाचनाचे वेड. फर्गसन कॉलेजमधील ग्रंथपाल प्रभाकर साने आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध. त्यांच्या ओळखीने फर्गसन ग्रंथालयातील 'नाना फडणवीसांचे चरित्र' [लेख़क वासुदेवशास्त्री खरे], 'घाशीराम कोतवाल' [लेखक मोरोबा कान्होबा], नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, पेशवाईतील शिक्षा, पेशवाईतील पत्रव्यवहार, बेळगावच्या रानडे नावाच्या लेखकाने नाना फडणवीसाविषयी आणि पेशवाईसंबंधी लिहीलेले पुस्तक, नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकरांनी लिहीलेले सवाई माधवरावांचा मृत्यू असं जेवढे मिळेल तेवढे साहित्य वाचून काढले. तेंडूलकरांनी नाटकात रंगविलेले ’गुलाबी’ हे पात्रही एका जमाखर्चाच्या नोंदीत मिळाले. चोरी केल्याच्या आरोपावरून ब्राम्हणाला करायला लागणा-या 'दिव्याच्या प्रसंगाचा' तपशील 'पेशवाईतील शिक्षा' या पुस्तकात मिळाला. ’घाशीराम’ आणि त्याचा मुलगा ’काशीराम’ याविषयी वेगवेगळे संदर्भ मिळाले. ३१ ऑगस्ट १७९१ रोजी गुलटेकडी भागात घाशीरामाला ब्राम्हणांनी ठेचून मारले ही माहिती मिळाली. सवाई माधवराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे [पाटीलबाबा] यांच्या राजकीय संबंधांविषयी माहिती मिळाली.
ह्या सगळ्या वाचनातून माझी खात्री झाली की नाटक लिहीण्यापूर्वी तेंडूलकरांनी या सा-या गोष्टींचा कसून अभ्यास केला आहे. नाटक कोणत्या पद्धतीने मांडायचे याचा आराखडाही त्यांच्या डोक्यात पक्का आहे. या तुमच्या तेंडूलकराला नेमकं वाईटच कसं दिसतं? असं अनेकजण आजही विचारतात. 'घाशीरामचा' अभ्यास करताना मला एक जाणवलं की माणूस, त्याच्या प्रकृती, विकृती, स्वभाव 'काल-आज-आणि-उद्या सारखाच'! तेंडूलकरांनी घाशीराममधून या प्रवृत्तीवर बोट ठेवलं. माणसाच्या, समाजाच्या मनाचा, त्याच्या चढ्त्या-उतरत्या वर्तनाचा ठाव घेतला.
या घाशीराम कोतवालच्या निमित्ताने माझे बखरी, ताम्रपट, सनदा, पत्र व्यवहार यासंबंधीचे नकळत बरेच वाचन झाले.
घाशीरामच्या यशाचे श्रेय कोणाला? यासंबंधी पुढे अनेक वर्षे उलटसुलट चर्चा झाल्या.
याचे जब्बार पटेलांना श्रेय किती? असा खवचट प्रश्नही अनेकांनी मला विचारला. आजवर मी त्याचे उत्तर दिले नाही. पण आज प्रथमच सांगतो. नाटक ही एक सामुहिक कलाकृती असल्याने लेखकापासून, दिग्दर्शकापासून, कलाकारापासून ते पडदा उघडणाऱ्या आणि पाडणाऱ्या रंगमंचावरच्या आणि रंगपटातल्या प्रत्येकाचेच त्यात योगदान असते. त्यामुळे घाशीरामच्या बाबतीत श्रेयाचा धनी कोण? हा प्रश्ण निरर्थक आहे.
जब्बारची माझ्या डोळ्यांनी बघितलेली आणि अनुभवलेली कमाल म्हणजे तेंडुलकरांनी लिहिलेल्या एका सूत्रधाराचे 'तीन' करून, कलाकारांच्या गुणांप्रमाणे त्यांचा उपयोग करून घेणे आणि नाटकाचे 'तीन तेरा, नऊ अठरा' न करता चाळीस-पन्नास नवख्या, हौशी कलाकारांना हाताशी घेऊन उत्तम, गोळीबंद प्रयोग सादर करणे.
घाशीरामच्या तालमी सुरु असताना हळू-हळू एक गोष्ट माझ्या ध्यानी येऊ लागली की पी.डी.ए. मधली सिनीयर मंडळी फारशी तालमीकडे फिरकत नाहीत. भालभा केळकर आणि एक दोघे दोन-तीन वेळाच येऊन गेले, पण वागण्या-बोलण्यात तटस्थपणा जाणवायला लागला होता. तरी एके दिवशी भीत भीतच मी सुरेश बसाळेला 'असं का रे?' असं विचारलं. त्यावर त्यानं उत्तर दिलं - आमच्या संस्थेत ही पद्धत आहे. एकदा एखाद्याकडे काम सोपवलं की मधे त्यात कुणी लुडबुड करायची नाही. तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा.
आम्ही जीव ओतून तालमी करत राहिलो आणि बघता बघता १४ डिसेंबर उजाडला. घाशीरामची रंगीत तालीम केशवराव घुल्यांच्या सहाय्यानं पिंपरीच्या हिंदुस्थान अॅन्टीबायोटीक्सच्या सभागृहात ठरली.
रात्रीची वेळ. रंगभूषाकार निवृत्ती दळवी, प्रभाकर भावे चकोट केलेल्या ब्राह्मणांच्या रूपात आम्हाला सजवू लागले. कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदराचा टिळा. पात्रे सजली. वाद्ये लागली. ध्वनी-प्रकाश योजना झाली. रंगीत तालमीला स्वतः तेंडूलकर आवर्जून उपस्थित होते. रंगीत तालीम छानच झाली. तालमी नंतर काही कागद तेंडूलकरांनी नाना फडणवीसांचे काम करणा-या मोहन आगाशे यांच्या हाती दिले.
दुस-या दिवशीच्या तालमीत जब्बार रंगीत तालमीतल्या त्रुटी आमच्याकडून घोटून घोटून दुरुस्त करून घेत होता, तस तसा माझा शिणवटा वाढत चालला. शेवटी शेवटी तर मी बधिरच झालो. तालीम संपवून घरी आलो आणि तापानं फणफणलो. अंग जबरदस्त ठणकू लागलं. रात्रभर झोप नाही.
सकाळी सकाळी माझी पत्नी संजीवनीनं अण्णा राजगुरुंना फोन केला ' अहो, यांच्या अंगात बराच ताप आहे'. पलिकडून उत्तर आलं - रामला म्हणावं शांत पडून रहा. सगळं ठीक होईल.
सकाळी दहा वाजता डॉ. विद्याधर वाटवे घरी हजर. आल्या आल्या त्यांनी आधी दोन इंजक्शनं दिली. गोळ्या औषधं दिली. काहीतरी खा आणि मगच गोळ्या घे हे ही त्यानं निक्षून सांगीतलं.
सक्त विश्रांती घ्यायची आज्ञा केली आणि संध्याकाळी सात वाजता 'भरत' वर ये असं सांगून निघून गेला.
संध्याकाळपर्यंत मी अर्धवट गुंगीत होतो. शेवटी उठलो, दाढी आंघोळ केली. देवाला हात जोडून विनवणी केली - आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा खेळ उभा केला आहे. तो निर्विघ्नपणे पार पडू दे...
... आणि 'भरत' वर पोचलो.
पाहता पाहता सोंग रंगली....आणि तिसरी घंटा घणघणली. प्रेक्षागृहातील दिवे विझले. रंगमंचाचा दर्शनी पडदा बाजूला झाला.
धूसर प्रकाशात मागील काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर एक चौकोनी कमान. त्यावर मधोमध श्रीगजाननाची मूर्ती. रंगमंचाच्या मध्यभागी एक निरांजनाचं तबक. त्याच्यामागे प्रेक्षकांना रंगमंचावर मस्तक ठेवून अभिवादन करणारा कोणी एक तरूण कलाकार.
मृदुंगावर दमदार थाप पडली. मृदुंगाच्या तालावर तो कोणी एक उभा राहिला. तबकातील फुले त्याने प्रेक्षकांच्या दिशेनं उधळली. निरांजनाच्या ज्योती अधिकच उजळल्या. मृदुंगाच्या लयीवर तो तरूण आता नृत्य करू लागला, त्याच्या नाचाचा वेग वाढला. नृत्य संपवून तो रंगपटात गेला. रंगमंचावर अस्पष्ट प्रकाश आणि पुन्हा एकदा प्रेक्षागृहातील दिवे उजळले.... प्रेक्षकांच्या मागील बाजूनं आवाज घुमला,
श्रीगणराय !
हळूहळू हा घोष वाढत गेला आणि करवतीकाठी धोतर, बाराबंदी, गळ्यात करवतीकाठी उपरणे, डोकीवर पेशवाई पद्धतीचे चक्री पागोटे, कानात भिकबाळी, कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदूर अशा वेशातले बारा-पंधरा ब्राम्हण 'श्रीगणराय' चा निनाद करत प्रेक्षकातून वाट काढत रंगमंचावर अवतरले. बघता बघता रंगमंचावर, हात जोडून पुतळ्यासारख्या स्तब्ध उभ्या राहिलेल्या ब्राम्हणांची रांग तयार झाली. पुन्हा मृदुंगावर दमदार थाप पडली. श्रीगजाननाचा मुखवटा धारण केलेला एक कलाकार लयदार पाऊले टाकत रंगमंचावर पदन्यास करू लागला.
आता तो पाठीमागील नि:स्तब्ध असलेला ब्राम्हणांचा पडदा सजीव झाला, झुलू लागला, गाऊ लागला
श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामणहरी |
बामणहरी नर्तन करी, श्रीगणराय फेर की धरी ||
नमन संपले. ब्राम्हणांच्या पडद्यातील कलाकारांनी रंगमंचावर विविध ठिकाणी वाद्यांच्या तालावर विविध गट केले. वाद्यांचा वेग आणि आवाज टिपेला पोचला आणि सूत्रधारानं रंगमंचावर प्रवेश केला...
हो | हो || हो ||| असा आवाज देऊन वाद्यांना थांबवण्याचा इशारा करून त्यानं मागे स्तब्ध झालेल्या ब्राम्हणांची एक एक करुन ओळख करून दिली -
हे सर्व पुण्याचे ब्राम्हण !
वेदांत शास्त्री, ज्योतिषमार्तंड, आम्ही कुंभकोणम... आम्ही बनारस....
आम्ही पुणेकर | आम्ही पुणेकर | आम्ही पुणेकर |||
रंगमंचावर एक अद्भुत नाट्य साकारत होतं. माझा ताप कुठल्याकुठे पळून गेला होता. माझ्या आजाराचा, थकव्याचा पूर्णतः विसर पडला होता. बघता बघता पहिला अंक संपत आला. नाना फडणवीसांच्या, मोहन आगाशेच्या स्वगत पण जाहीर आदेशानं -
"घाश्या, अक्करमाश्या, केला, केला तुला कोतवाल...."
आणि सूत्रधारानं दवंडी घुमवली " ऐका होऽऽऽ ऐका, आजपासून घाशीराम सावळदास यास पुण्याचा कोतवाल केला आहे हो ऽऽऽ
साध्या सुती धोतर, अंगरख्यातील घाशीराम धीमी पाऊले टाकत रंगमंच्याच्या मधोमध उभा राहिला. दोन ब्राम्हणांनी नम्रपणे त्याच्या अंगावर रेशमी अंगरखा चढवला. कंबरपट्टा बांधला. डोईवर सरदारी पगडी चढवली. तबकातील आसूड घाशीरामाच्या हाती दिला. घाशीरामानं रंगमंचावर विखुरलेल्या, नतमस्तक झालेल्या अवघ्या ब्राम्हणांवर करडी नजर फिरवली. हातातला आसूड कडाडला आणि त्याने विकट हास्य केलं ' हा.. हा... हा... हा' आणि पहिला अंक संपला.
दुस-या अंकाचा पडदा उघडला तोच मुळी अतिशय आक्रमक, अंगावर येणा-या गीताच्या आणि पदन्यासाच्या तालावर. गीताचे शब्द तेच होते पण त्यांचा अविष्कार अत्यंत वेगळा होता.
श्रीगणराय नर्तन करी |
आम्ही पुण्याचे बामण हरी |
बामणहरी नर्तन करी |
श्रीगणराय फेर की धरी ||
ब्राम्हणांच्या पडद्याच्या मधोमध असलेला सूत्रधार पुढे आला आणि पुन्हा "होऽऽऽ हो ऽऽऽहोऽऽऽ" करीत आता ब्राम्हणांच्या पडद्याचा आवाज थांबवत त्यानं घोषणा केली
"पुण्यनगरीत घाशीराम कोतवाल झाले"
पडद्याचा कोरस घुमला - झाले |
सुत्रधारानं कहाणी सांगायला सुरुवात केली...
"त्यांचा कारभार चाले, कारभार चाले, हो कारभार चाले |
गौरी बोले, नाना डोले, घाशीरामाचा कारभार चाले |
गौरी नाचे, नाना नाचे, घाशीरामाचे फावले साचे|
मग रंगमंचावर पुण्यातल्या ब्राम्हणांवर कडक 'घाशीरामी' सुरू झाली. एक क्रूर नाट्य अवतरलं आणि कोतवाली, पुण्याची अवघी रखवाली करता करता एके ठिकाणी घाशीराम फसला...
आणि अखेर शेवटी शेवट आला |
एक हात जेरबंद करून, घाशीरामाला ब्राम्हणांच्या पुढे सोडला. संतप्त जमावानं त्याच्यावर दगडधोंड्यांचा वर्षाव सुरु केला. जखमी, घायाळ, हिंस्त्र श्वापदासारखा रक्तबंबाळ घाशीराम गर्जना करतोच आहे -
मी तुमच्या छाताडावर नाचलो. मारा. ठेचा मला |
मग एका भल्या धिप्पाड ब्राम्हणाने एक जड शिळा उचलली. आपल्या दोन्ही उंच हातांवर भक्कमपणे पेलली आणि जखमी घाशीरामाच्या मस्तकावर दणकन आदळली. घाशीराम गपगार झाला.
आहे त्या स्थितीत ब्राम्हणांचा जमाव गोठला, स्थिर झाला आणि भग्नशिराच्या घाशीरामाचं मृत्यूनृत्य सुरु झालं. ताशा कडकडला, टिपेला चढला आणि एका असहाय्य क्षणी घाशीराम रंगमंचावर कोसळला - कायमचा.
जमावानं विजयी आरोळी ठोकली आणि धीरगंभीर पावलं टाकत नानांनी प्रवेश केला. सर्व जमावानं कमरेत वा़कून त्यांना अभिवादन केलं. नानांनी हाताच्या काठीनं ढोसून घाशीराम नक्की मेला आहे याची खात्री केली आणि नाना रंगमंचाच्या एका कोप-यात आले. प्रकाश वलय फक्त त्यांच्यावर.
नानानी पुण्यनगरीला आवाहन केलं -
"पुण्यपतनस्य नागरिकहो ! या नगरावरील एक महान संकट सरले. एक रोग टळला. आपणासर्वांना छळणा-या नरकासुराचा, घाश्या कोतवालाचा वध झाला वध. श्रींच्या कृपेने सर्व यथायोग्य पार पडले. त्याची कृपा आपणासर्वांवर आहेच. .....
.... या शुभघटनेनिमित्त पुण्यामधे तीन दिवस उत्सव चालावा अशी आमची आज्ञा आहे.
विजयी आरोळ्या ठोकत पांगलेला ब्रम्हसमुदाय पुन्हा रांगेत उभा राहिला. पुन्हा दणक्यात
श्रीगणराय नर्तन करी |
आम्ही पुण्याचे बामण हरी | - चा द्रुत लयीत कोरस सुरु झाला.
नानांनी गुलाबीला खुणेनं बोलावलं. नानांभोवती नाचून ती रंगपटात गेली.
ब्राम्हणांचा पडदा घाशीरामाचं कलेवर ओलांडून पुढे आला. रांगेच्या एका टोकाला मृत घाशीराम. मागे अंधूक प्रकाशात इंग्रज अधिकारी...त्या बारा ब्राम्हणांच्या रांगेत सामील झालेले नाना फडणवीस....आणि पुन्हा एकवार
श्रीगणराय नर्तन करी |
आम्ही पुण्याचे बामण हरी |
बामणहरी नर्तन करी |
श्रीगणराय फेर की धरी || - चा गजर.
रंगमंचाचा मखमली पडदा पडला.. खेळ संपला...
१६ डिसेंबर १९७२. पुण्याच्या भरत नाट्यमंदिरात महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत 'प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन, पुणे' या हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थेने सादर केलेल्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग निर्विघ्नपणे पार पडला..... पुढील काळात अनेक विघ्ने निर्माण करण्यासाठी !
थिएटर अॅकॅडमीची स्थापना होण्यासाठी. अनेक वादळे उत्पन्न करण्यासाठी आणि झेलण्यासाठी. कलावंतांची कसोटी पाहण्यासाठी. त्यांच्या सत्वपरीक्षेसाठी.
समाजमन ढवळून काढण्यासाठी आणि आधुनिक मराठी रंगभूमीवरील एक 'माईल-स्टोन' ठरण्यासाठी !
१६ डिसेबर १९७२ ... घाशीरामच्या पहिल्या प्रयोगाची ही कहाणी तुमच्यापर्यंत पोचवणारा....या सर्व ऐतिहासिक घटनांचा मी एक साक्षीदार - घाशीराम कोतवाल नाटकामधील सूत्रधार.
बाकी इतिहास पुढे केव्हा तरी... तूर्त येथेच अर्धविराम घेतो.
तुम्हा तो सुखकर हो शंकर |
- श्रीराम रानडे
(ramranade at gmail dot com)
'घाशीराम कोतवालची' झलक
'घाशीराम कोतवाल' हे नाटक बघत मी आणि माझी बहिण लहानाचे मोठे झालोय. विंगेतून, हौद्यातून, प्रेक्षागृहातून, नाटक न समजण्याच्या वयापासून ते त्यावर विचार करण्याच्या, चर्चा करण्याच्या वयापर्यंत आम्ही हे नाटक पाहात आलोय. आपण न कळत्या वयातही काय अद्भुत अनुभवलंय, घडताना पाहिलंय असं आज आम्हाला अनेकदा वाटतं.
दुर्दैवानं मूळ संचातल्या कलाकारांच्या नाटकाचा प्रयोग आज कोणत्याच स्वरूपात पाहायला उपलब्ध नाही. नाटकाचं ऑडियो रेकॉर्डिंग ऐकून आजही अंगावर शहारा येतो. नुसतं रेकॉर्डिंग ऐ़कून नाटकाच्या प्रेमात पडलेले, झपाटलेले मला अनेक भेटले. 'घाशीरामची' लहानशी का होईना 'दृष्य स्वरूपातली झलक' तयार करायची असा विचार अनेक वर्ष मनात घोळत होता. बाबांच्या 'बहुरंगी बहुढंगी' या एकपात्री प्रयोगाच्या निमित्तानं ती संधी मिळाली.
१९८९ च्या सुमारास 'घाशीरामच्या' जर्मनीच्या दौ-याच्या निमित्तानं एक माहितीपत्रक काढलं होतं. त्या मधे नाटकाच्या प्रमुख घटनांचे फोटो आहेत. त्या फोटोच्या माध्यमातून आणि ऑडियो एडिट करून प्रेक्षकांना पाच्-सहा मिनिटात मूळ 'घाशीराम कोतवालची' झलक दाखवायची असं ठरलं आणि ही 'ऑडियो-व्हिज्युअल' तयार झाली.
हे काम पुष्पक कर्णिक, निलेश अग्नीहोत्री, नेत्रा जोशी आणि मुकुल रेणावीकर यांच्या मदतीशिवाय घडूच शकलं नसतं. 'घाशीराम कोतवाल' नाटकाच्या मूळ संचातील कलाकारांची ही झलक तुमच्यापर्यंत पोचवण्याचं सगळं श्रेय माझ्या ह्या मित्रमंडळींचं.
अवघ्या काही तासांपूर्वी हा लेख माझ्यापर्यंत पोचला. तो तुमच्यापर्यंत १६ डिसेंबरच्या मुहुर्तावर पोचवणं शक्य होतंय ते नंदन कुलकर्णी (नंद्या) यानी टंकलेखनासाठी केलेल्या मदतीमुळेच.
- आरती (RAR)
वाह ! मस्तच श्री अरविंद
वाह ! मस्तच
श्री अरविंद नारायण ठकार (तात्या) यांचेकडून खूपदा ऐकलं होतं. ब-याचशा कलाकारांना भेटणंही झालं . अर्थात तरूण असतानाचा हा फोटो खूपच सुंदर
१९८९ च्या सुमारास
१९८९ च्या सुमारास 'घाशीरामच्या' जर्मनीच्या दौ-याच्या निमित्तानं एक माहितीपत्रक काढलं होतं
घाशीराम १९८०-८१ च्या दरम्यान जर्मनीला गेले होते ना?
वा, वा! सुरेख! नंद्याचेही
वा, वा! सुरेख!
नंद्याचेही आभार.
अप्रतिम लेख..........
अप्रतिम लेख..........
जबरदस्त नाटक!
जबरदस्त नाटक!
धन्यवाद! छान माहिती दिली!
धन्यवाद! छान माहिती दिली!
जबरी नाटक. माहितीबद्दल
जबरी नाटक. माहितीबद्दल धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद तुला रार.
मनःपूर्वक धन्यवाद तुला रार. श्रीराम रानडेंचेही अनेकानेक आभार. छान, उत्कंठावर्धक लिखाण आहे. महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचं दस्तावेजीकरण आहे हे. अजून सविस्तर आणि तपशिलांसह लिहून घेता आलं तुला त्यांच्याकडून तर ग्रेट होईल.
स्लाईडशो बघून अंगावर काटा आला. अप्रतिम!!!
मस्त!
मस्त!
वा! सुरेख! धन्यवाद, आरती.
वा! सुरेख! धन्यवाद, आरती.
सही. खूप छान लिहिलंय.
सही. खूप छान लिहिलंय. चित्रदर्शी शैलीत.
ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकलंय. सरारून काटा आलेला ते ऐकताना सुद्धा....
ही ऑडिओ-व्हिज्युअल झलक अपलोड केल्याबद्दल अनेक धन्यवाद!
जबरदस्त नाटक ! खुप ऐकलेय
जबरदस्त नाटक ! खुप ऐकलेय याबद्दल. पण अजुन काही योग आला नाही. कधी येतो कोण जाणे?
माहितीबद्दल आभार...
खूप-छान-लिहीलंत आवडलं.
खूप-छान-लिहीलंत
आवडलं.
अतिशय उत्तम लेख!! नवीन संचात
अतिशय उत्तम लेख!!
नवीन संचात घाशीराम पाहिलेला आहे. जुन्या संचाची मजा त्यात तेवढी नसावी कदाचित परंतू तरी प्रयोग विलक्षण होता ह्यात वाद नाही.
सुंदर आठवणी. हे नाटक मी १९८५
सुंदर आठवणी.
हे नाटक मी १९८५ च्या दरम्यान टाटा ला बघितले. अर्थातच त्यात श्री रानडे होतेच.
पण ते म्हणताहेत ते खरे आहे. प्रत्येकाचा अभिनय दर्जेदार असला तरी हे नाटक एक
सांघिक कला म्हणूनच लक्षात राहिले.
एकदम भारून टाकणारा अनुभव होता तो. नाटकातून बाहेर लक्षही जात नसे (त्या प्रयोगाला माझ्या शेजारी शेरॉन प्रभाकर बसली होती, तिच्याकडेही लक्ष गेले नव्हते.)
पुढे नाटकाच्या सिडीत, चंदावरकरांनी त्याचे अन-ऐतिहासिक असणे आणि तरीही ते वैश्वीक असणे, यावर छान भाष्य केले आहे ते ऐकले. आणि नाटक आणखीनच आवडले.
भारी! आरती, रानडेकाका आणि
भारी!
आरती, रानडेकाका आणि नंद्या यांना अनेकानेक धन्यवाद
मस्त.. एकदम भारी.
मस्त.. एकदम भारी.
चित्रदर्शी लिखाण....
चित्रदर्शी लिखाण.... मनःचक्षूंसमोर वाचताना ती चित्रे, प्रसंग साकारत होते. घाशीरामने पुण्याच्या एका पिढीलाच झपाटून टाकले होते. खूप खूप धन्यवाद हा लेख इथे आणल्याबद्दल.
नंद्याचेही धन्यवाद!
खूप सुंदर! संपूर्ण लेख
खूप सुंदर!
संपूर्ण लेख वाचताना कानात' श्री गणराय...' वाजत होतं. अतिशय सुरेख आठवणी आहेत ह्या.
आरती, तुला आणि नंद्याला अनेक धन्यवाद!
अप्रतिम लेख
अप्रतिम लेख
अप्रतिम!
अप्रतिम!
सुरेख. परत परत वाचण्यासारखं
सुरेख.
परत परत वाचण्यासारखं लिखाण. हे लिखाण इथे आणल्याबद्दल खूप धन्यवाद.
सुरेख लिहिलयं.
सुरेख लिहिलयं.
सुरेख लेखन. रानडेकाकांना
सुरेख लेखन.
रानडेकाकांना नमस्कार.
आरती व नंदन कुलकर्णी - विशेष धन्यवाद.
फारच छान.
फारच छान.
Stunning! अप्रतिम लेख आहे!
Stunning! अप्रतिम लेख आहे! सहज वाचायला सुरूवात केली, आणि पूर्ण वाचून, ती क्लिप पाहिल्याशिवाय राहवले नाही. जबरी!
आजच मिरर मधे बातमी
आजच मिरर मधे बातमी वाचली.
चला, म्हणजे परत एकदा पुणेकर क्रोधाने चरफडणारैत म्हणयचं.
आता तेंडुळकर साहेबांना लाखोल्या वाहणारे लेखही अधून मधून पेपरात वाचायला मिळणार...
मागचे वर्ष बालगंधर्वांच्या (टिका/स्तूती) लेखानी गाजले.
२०१२ हे वर्ष तेंडुळकरांचे असणारै...
क्लासिक! धन्यवाद रार,
क्लासिक!
धन्यवाद रार, रानडेकाका आणि नंद्या.
मस्तं लेख.... !!
मस्तं लेख.... !!
संग्राह्य लेख रार! अनेकानेक
संग्राह्य लेख रार! अनेकानेक धन्यवाद!
Pages