पोटापुरता पसा पाहिजे ....गदिमांना आदरांजली

Submitted by किंकर on 14 December, 2011 - 00:11

जर का तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि काय हवे ते माग म्हणाला तर ? तर आमची मागणीची यादी तयार होई पर्यंत, किंवा मनातली इच्छा देवास सांगेपर्यंत,बहुदा देव कंटाळून निघून जाईल.कारण आपण खूप संभ्रमात पडू,हे मागू का ते मागू या भावनिक गोंधळात बुडून जावू.पण जर तुमच्या भावनेला जर अचूक शब्दात पकडून तुमची रास्त मागणी देवाकडे पोहचवायची असेल तर ?त्यालाही एक छान उपाय आहे, तुमच्या भावनेला अचूक वाट करून देण्यासाठी,तुम्ही अशा माणसाला साकडे घालू शकता, ज्याचे शब्द भांडार अगणित आहे. देवाकडे काय मागायचे हि अडचण तुमच्या आमच्या सारख्या माणसांची. या शब्द प्रभूकडे देवाने विचारले, "बोल वत्सा, तुला काय हवे ते माग" तर या शब्द प्रभूच्या ओठी शब्द येतात ..

'पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी' ..

आले न लक्षात, तुमची भावना कोणतीही असो, ती व्यक्त करण्यासाठी न्याय शब्द देणारे कवी आहेत,ज्यांना सरस्वतीचा आशीर्वाद नव्हे तर वरद हस्तच लाभला होता,ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके 'गदिमा' उर्फ श्री.गजानन दिगंबर माडगुळकर

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळ या एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला. बालपण तेथून जवळच असलेल्या माडगूळ या गावी गेले. पुढे शिक्षणासाठी ते पंत प्रतिनिधी यांच्या औंध या संस्थानात आले. पण दुर्दैवाने त्यांना इयत्ता १० वी नंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. माझ्या मते त्यांनी त्यावेळी थांबवले ते शिक्षण चार भिंतीच्या शाळेतील. पण बिन भिंतीच्या शाळेत ते इतके शिकले कि, त्यास सीमा नाही. त्यांनी लिहिलेल्या कथा,कविता या पुढे एम. ए. च्या अभ्यासासाठी निवडल्या गेल्याच, पण त्याशिवाय त्यांच्या साहित्य निर्मितीवर अभ्यास करून किमान चार ते पाच जणांनी पी.एचडी मिळवली आहे. आणि ती पी.एचडी हा त्या पदवी धारकांच्या इतकाच 'गदिमा' यांचाही सन्मान आहे. पण स्वतःचे लौकिक शिक्षण अपुरे असून हि पुढील पिढीला संदेश देताना गदिमा त्यांच्या गीतातून सांगतात-

व्यर्थ जन्म रे विद्येवाचून, ज्ञान जगातील घेई वेचून
कीर्ती आण तू पायी खेचून, यशवंत हो, जयवंत हो,

वयाच्या १९ व्या वर्षी आपले नशीब अजमावण्यासाठी, घरदार सोडून त्यांनी चित्रपट सृष्टीचे दार,करवीर नगरीत येवून ठोठावले. पैसा, प्रसिद्धी थोडी उशिरा लाभली,पण यश मात्र पदरी पडले.कारण त्यांच्या अंगी असलेले शब्द कौशल्य. सुरवातीच्या उमेदवारीच्या काळात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत संपली तरी मी समाधानी राहीन, हि त्यांची वृत्ती होती. हि भावनाच त्यांच्या 'पोटापुरता पसा पाहिजे' या गीतात दिसते. याच गीतात ते शेवटी म्हणतात...

सोसे तितुके देई ,याहुनी हट्ट नसे ग माझा
सौख्य देई वा दुखः ईश्वरा, रंक करी व राजा
अपुरेपण हि नलगे ,नलगे पास्तावाची पाळी..

आणि त्यास जागून ते जगले.दोन वेळच्या जेवणाची सोय होताच, आपल्या पोटा पाण्याच्या व्यवसायाच्या पलीकडे जावून राहिलेला वेळ त्यांनी साहित्य,काव्य निर्मिती यासाठी दिला.भावनेला शब्दरूप देणे हा त्यांचा सहजधर्म होता.त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्वतःला देशसेवेसाठी झोकून देताना तरुणांच्या मनात देशप्रेम निर्माण करणारी अनेक गीते रचली.पण स्वतःच्या राष्ट्रास माउलीची उपमा देत केलेली -

वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, हि रचना आजही अंगावर रोमांच उभे करते.

गदिमा म्हटले कि, गीत रामायण हे नाते अतूट आहे.सलग ५२ आठवडे नियमितपणे रेदिओ केंद्रावरून प्रसारित झालेल्या गीत रामायणातील अनेक रचना त्यांनी ऐनवेळी तयार केल्याचे सुधीर फडके यांनी अनेकदा सांगितले आहे.गीत रामायण लिहून झाल्यावर त्यांना 'आधुनिक वाल्मिकी'असे संबोधण्यात येवू लागले. गदिमा स्वतः मात्र गीत रामायण हे ईश्वरी आशीर्वादातून झालेली रचना आहे असेच नम्रतेने सांगत.त्यामुळेच त्यांनी गीत रामायणाची जन्म कथा सांगताना, 'एक अदृश्य अंगुली लिहिते' असे म्हणत ते नतमस्तक होतात. स्वतः इतकी अमुल्य निर्मिती करताना संदेश मात्र देतात कि - पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...

अर्थात गदिमांच्या अनेक विध पैलूंपैकी गीत रामायण हा त्याच्या रचनेतील 'कोहिनूर' म्हणता येईल. पण त्यांनी त्याच बरोबर चित्रपट सृष्टी करिता पण प्रचंड काम केले आहे. गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयीने मराठी चित्रपट सृष्टी वर आपली मोहर अशी उमटवली कि ते एक युग म्हणूनच ओळखले जाते.अर्थात त्यांचे चित्रपट सृष्टीसाठीचे योगदान इतके मोठे आहे कि त्यांनी एकूण १५७ मराठी व २३ हिंदी चित्रपटासाठी योगदान दिले. त्यांचे मराठी इतकेच हिंदी भाषेवरील प्रभुत्व देखील सुरेख होते.त्यांची पटकथा असलेल्या 'दो आंखे बारा हाथ ' या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट मोह्त्सवात झाली होती.

गदिमा वृतीने प्रेमळ असले तरी स्वभावाने तापट म्हणूनच ओळखले जात.त्यामुळे त्यांना कोणी डिवचले कि ते हमखास अधिक सुंदर रचना करत असत. शब्द रचनेवरील त्यांची हुकमत इतक्या टोकाची होती कि एकदा त्यांना, आहे ना तुमच्यात सहजता मग 'ळ' या शब्दावर काव्य करून दाखवा,असे आव्हान दिले. त्यावर उत्तर म्हणून त्यांनी त्याच बैठकीत आपल्याला एक अजरामर रचना दिली ती म्हणजे ..

घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा

लावणी आणि संत काव्य या दोन्हीवरील त्यांचे प्रभुत्व वादातीत होते. त्यामुळे ज्या लेखणीतून ..
'फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या उसला लागल कोल्हा'

हि रचना उतरली त्याच लेखणीने

इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची...

हि रचना दिली आहे यावर पटकन विश्वास बसत नाही. आणि असा समजुतीचा घोटाळा तुमचा आमचा होतो असे नाही तर एच. एम. व्ही. या कंपनीने प्रथम,' इंद्रायणी काठी' ची रेकॉर्ड काढताना त्यावर गीतकार म्हणून गदिमांचे नाव न छापता पारंपारिक रचना असे छापले होते.

मला तर नेहमी वाटते कि अक्षरास अर्थाचे कोंदण दिल्याशिवाय शब्दार्थ सार्थ होत नाहीत आणि असे शब्दांना अचूक कोंदणात बसवणारे कारागीर म्हणजे 'गदिमा'. त्यांच्या नजरेने पाहिले तर कुरूप वेडे बदकाचे पिल्लू देखील राजहंस होते. किंवा त्यांच्या शब्द सामर्थ्यातून ते प्रसंगी देवाला विकत घेण्याचे धाडस करू शकतात. आणि तेदेखील कवडी दमडी न खर्च करता.

या प्रतिभा संपन्न कवी, पटकथाकार, गीतकार, चित्रपट अभिनेता आणि माजी विधान परिषद सदस्य श्री. गजानन दिगंबर माडगुळकर यांची आज पुण्यतिथी. आज त्यांना आपल्यातून जावून ३५ वर्षे होत आहेत. ते देह रूपाने आपल्यात नसले तरी शब्द रूपाने अनंत काळ पर्यंत आपल्यातच राहणार आहेत. पण तरीही शेवटी म्हणावे वाटते कि ..

जरा मरण यांतून सुटला कोण प्राणिजात ?
दुखः मुक्त जगला का रे कुणी जीवनात ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

आणि त्यांनी दिलेला हाच जीवनाचा संदेश समजावून घेण्याचा अल्पसा प्रयत्न हीच त्यांना आजच्या स्मृतीदिनी खरी आदरांजली.

गुलमोहर: 

व्वा! किंकर मस्तच लिहिलय. खरच, गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयीने केलेले काम अतुलनीयच आहे. Happy
गदिमाना श्रद्धांजली.

सुंदर लेख!

कॉलेज मधे असताना कधीतरी मराठी गाणी आवडू लागली आणि मग हळुहळू लक्षात आले की काही गाण्यांची शब्दरचना अत्यंत सुरेख आहे. ती बरीचशी गदिमांची होती हे कळू लागले. मग तर त्यांच्या प्रत्येक गाण्याची प्रत्येक ओळ नीट समजावून घेण्यात इंटरेस्ट निर्माण झाला. अशी गाणी नीट ऐकली की काय जबरदस्त प्रतिभा होती हे जाणवते.

माझी आवडती अनेक आहेत, जमल्यास आणखी लिहीन पण आत्ता लगेच आठवणारे म्हणजे "कबिराचे विणतो शेले..." मधले एक वाक्य "दास रामनामी रंगे, राम होई दास". दास शब्द दोन अर्थाने वापरून कबिर रामनामात दंग असताना त्याचा दास होऊन त्याचे काम राम करतो ही कल्पना इतक्या चपखल शब्दात मांडलेली आहे! (आणि पुलंची चाल व संगीत हे आणखी वर)

किंवा गीतरामायणातील "राजस मुद्रा, वेष मुनींचे" अशा ओळी. पहिल्यांदा ऐकताना काहीतरी अलंकारिक भाषा आहे यापेक्षा जास्त लक्षात यायचे नाही. मग जेव्हा त्यातला अर्थ लागतो तेव्हा काहीतरी नवीन माहिती मिळाल्यासारखा आनंद होतो.

गदिमांची कोणतीही गाणी असा आनंद नेहमी देतात.

गदिमांवरील 'नक्षत्रांचे देणे' हा अल्फा टीव्ही ने केलेला कार्यक्रम आवर्जून बघावा असा वाटतो मला. तो कार्यक्रम बघताना गदिमांच्या सर्व पैलूंना न्याय देण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न जाणवतो.

फारएण्ड, दिनेशदा +१

किंकर, आतमध्ये इतका सुंदर लेख लिहिला असेल हे शीर्षकावरून पटकन कळत नाही. म्हणूनच २ दिवस लागले इथे यायला... Sad

छान लेख!
'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, ज्योतीने तेजाची आरती' ही गदिमांची मला सर्वात आवडलेली ओळ.
गदिमांवरील नक्षत्राचे देणे हा खरेच एक अप्रतिम कार्यक्रम झाला. त्यात त्यांच्या काही तुलनेने अज्ञात कवितांचे वाचनही आहे.

'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, ज्योतीने तेजाची आरती>>> माझ्याही

प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर वगैरे असे लिहीलेले बर्‍याच लेखांमधे येत असते, या वाक्प्रचाराचा उगम म्हणजे हीच ओळ आहे की काय कोणास ठाऊक!

फारएण्ड - सविस्तर व अचूक प्रतिक्रियेसाठी आभार, आपणही छान लिहू शकाल गादिमांवर.
दिनेशदा, पुरंदरे शशांक ,स्मितागद्रे, वत्सला,आगाऊ- आपणासर्वांचे मनपूर्वक आभार.
आनंदयात्री- पहिले शीर्षक बदलून लेख अधिक व्यवस्थित आपण मांडला का? त्यासाठी परत एकदा धन्यवाद. गदिमांचा 'नक्षत्रांचे देणे' ऐकण्याचा योग अजून आलेला नाही.

सुंदर लेख,
"पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती" अशी ती ओळ आहे.
पूर्वी कॅसेट प्लेयर्सही घरोघरी नव्हते तेव्हा रामनवमीला सायंकाळी एका वाचनालयात सार्वजनीक गीत रामायण कॅसेट ऐकायचा कार्यक्रम असे.
त्यांनी 'जगाच्या पाठीवर' सिनेमात लिहिलेली गाणीही अप्रतीम आहेत.

Back to top